Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 30 November, 2008

धुमश्चक्री संपली

तब्बल ५९ तासांच्या अथक मेहनतीनंतर ताजमहाल हॉटेलमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांचा खातमा करण्यात एनएसजीच्या कमांडोंना शनिवारी सकाळी यश आले. तिघा दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर ऑपरेशन ताज संपल्याची घोषणा एनएसजीचे महासंचालक जी. के. दत्ता यांनी सांगितले . मुंबईवर हल्ला करुन ताजमधील लोकांना वेठीस धरणा-या दहशतवादाचा अंत झाल्यानंतर कमांडो, लष्करी जवान, मुंबई पोलिस व अग्निशामक दलाच्या जवानांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. या हल्ल्यांतील मृतांची संख्या १९५ तर, जखमींची संख्या सुमारे चारशेच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अतिरेक्यांनी किमान पाच हजार जणांना ठार करण्याचा कट रचला होता, अशी ताजी माहिती उपलब्ध झाली आहे.
शुक्रवारी दुपारी हॉटेल ओबेरॉय आणि रात्री नरिमन हाऊस बिल्डिंगमधून कमांडोंनी दहशतवाद्यांना नेस्तनाबूत केले होते. तथापि, ताज हॉटेलमध्ये लपलेले अतिरेकी कमांडोंना दाद देत नव्हते. ओबेरॉय व नरिमन हाऊसमधील कारवाया यशस्वी झाल्यानंतर , अंगात उत्साहाचे बळ संचारलेल्या एनएसजी कमांडोंनी शनिवारी पहाटे ऑपरेशन ताज आणखी वेगवान केले. कमांडोंच्या ताज्या तुकड्या सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबरच हॉटेलमध्ये घुसल्या. अतिरेक्यांना कंठस्नान घालण्याच्या इराद्यानेच ते आत शिरले होते. आतमध्ये जाताच त्यांनीही अंदाधुंद गोळीबार सुरू केला.
अतिरेक्यांनी हा हल्ला परतवून लावण्यासाठी प्रयत्न केले. आपल्याकडील ग्रेनेडमार्फत त्यांनी जवानांवर हल्ले केले. त्याशिवाय एके ५६ रायफलीमधून बेछूट गोळीबारही केला. एवढेच नव्हे तर पहिल्या व दुस-या मजल्यातील कारी रुमना आगही लावली. ही आग एवढी प्रचंड होती की , आगीचे लोट ताजच्या खिडक्यांतून बाहेर पडत होते. संपूर्ण ताज हॉटेल काळ्या धुराने माखून गेले. ही धुमश्चक्री सुरु असतानाच , तळमजल्यावरच्या खिडकीतून एका व्यक्तीला आतून बाहेर टाकण्यात आले. ही व्यक्ती म्हणजेच गेल्या दोन दिवसांपासून सर्वांना वेठीला धरणारा दहशतवादी असल्याचे नंतर स्पष्ट झाले. आणखी एका दहशतवाद्याला पोलिसांनी हॉटेलमध्येच कंठस्नान घातले. दोघांना ठार केल्यानंतर ऑपरेशन ताज यशस्वी झाल्याची घोषणा मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी केली.
दरम्यान , कमांडो व पोलिस ताज हॉटेलची कसून तपासणी करत आहेत. ताज हॉटेलमध्ये असंख्य मृतदेह पडले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याशिवाय आणखी काहीजण आतमध्ये अडकून पडले असल्याची भीतीही वर्तवली जात आहे.
पत्रकार सबिन सेहगल मृत्युमुखी
ताजच्या सहाव्या मजल्यावर अडकलेल्या, टाइम्स ऑफ इंडियाच्या वरिष्ठ पत्रकार सबिना सेहगल सैकिया दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यांचा मृतदेह हॉटेलमधून बाहेर काढण्यात आल्याचं त्यांच्या मित्रांनी सांगितलं.
बुधवारी एका लग्नासाठी सबिना ताजमध्ये गेल्या होत्या. नेमका तेव्हाच, दहशतवाद्यांनी ताजवर कब्जा मिळवला आणि अंदाधुंद गोळीबार केला. हॉटेलमधल्या अनेक रहिवाशांना त्यांनी ओलिस धरलं. या हल्ल्यात सबिना त्यांच्या खोलीत अडकल्या होत्या. बुधवारी मध्यरात्रीपर्यंत त्या एसएमएसच्या माध्यमातून कुटुंबियांच्या आणि मित्रांच्या संपर्कात होत्या, पण त्यानंतर हा संवाद तुटला आणि नेमकं काय झालंय, हे कुणालाच कळेनासं झालं. गुरुवारी पहाटे दोन वाजता, आपण बाथरुममध्ये अडकल्याचा निरोप त्यांनी आपल्या पतीला, शंतनु सैकिया यांना पाठवला होता.
त्यामुळे सबिना यांचे सारेच मित्र त्यांची आतूरतेने वाट पाहत होते. परंतु, दुर्दैवानं त्यांच्या मृतदेहाचं दर्शन घ्यायची वेळ सगळ्यांवर आली. सबिना ज्या मजल्यावर होत्या, त्याच मजल्यावर एक मोठा स्फोट झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.

त्या अतिरेक्याला जगायचंय
मला जगायचंय, मला मरायचं नाहीये. मला सलाईन लावा, हे वाक्य आहे बेछूट गोळीबार करून अनेक निरपराध लोकांचे प्राण घेणा-या आणि मुंबईला वेठीस धरणा-या दहशतवाद्यांपैकी एकमेव जिवंत दहशतवाद्याचे.
आझम अमीर कासम असे या २१ वर्षीय दहशतवाद्यांचे नाव आहे. अस्खलीत इंग्रजी बोलणारा हा दहशतवादी पाकिस्तानमधील फरिदकोट जिल्ह्यातील गरीपालपुरा या तालुक्याचा रहिवासी आहे. हा एकमेव दहशतवादी आहे की जो जिवंत असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
मुंबईला ५९ तास वेठीस धरणाऱ्या दहशतवाद्यांपैकी सर्वात प्रथम कॅमेऱ्यात टिपला गेलेला दहशतवादी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. दहशतवादी हल्ल्याचा कट कसा रचला गेला याची सर्व माहिती आता हाच दहशतवादी देणार आहे. त्याच्या फोटोमुळेच हा दहशतवाद्याची ओळख पटली आणि त्यामुळे त्याला पकडणे शक्य झाल्याचे एटीएसच्या प्रवक्त्यांनी सांगितले. आझम आणि त्याच्या साथीदाराने बुधवार आणि गुरूवारी मुंबईत दहशत पसरवली. त्यांनी सर्वप्रथम सीएसटी स्टेशन, टाइम्स इमारतीच्या मागे, मेट्रो येथे थैमान घातल्यानंतर पोलिसांच्या चोरलेल्या क्वालिस गाडी आणि नंतर ती खराब झाल्यावर त्यांनी स्कोडा गाडी चोरली. त्यानंतर ते गिरगाव चौपाटीवर परिसरात गेले. त्यावेळी त्यांची आणि गावदेव पोलिस स्टेशच्या पथकाची चकमक झाली. यात आझम याने सहाय्यक पोलिस इन्स्पेक्टर तुकाराम उंबाळे यांच्यावर गोळीबार करून त्यांना धारातीर्थी पाडले.
याच चकमकीत मात्र आझमच्या साथीदाराला पोलिसांनी कंठस्नान घातले. आझम याला हाताला जखम झाली. हे दोघेही ठार झाल्याचे लक्षात घेऊन त्यांचे देह नायर इस्पितळात दाखल केले. यातील एक दहशतवादी श्वास घेत असल्याचे एका पोलिसाच्या लक्षात आले. तो जिवंत असल्याचे पाहून नायर हॉस्पिटल रिकामे करण्यात आले आणि दहशतवादविरोधी पथकाला पाचारण करण्यात आले. आझम याला शुद्धीवर आल्यावर शेजारी पडलेला साथीदाराचा मृतदेह पाहून ओरडू लागला. मला जगायचे, मला मरायचं नाही आहे. मला सलाईन लावा, अशी विनंती त्याने नायर येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना केली.
"ओबेरॉय'ची हानी मोजणे कठीण
ओबेरॉय या पंचताराकिंत हॉटेलची नेमकी किती हानी झाले ते मोजणे कठीण असून अजूनही आम्ही त्याचा अंदाज करू शकत नसल्याचे मत ओबेरॉय ग्रुपचे चेअरमन पीआरएस ओबेरॉय यांनी व्यक्त केले आहे. हॉटेल कधी सुरू होईल , हे सांगणंही कठीण असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
अजून आम्हीच हॉटेलच्या आत गेलेलो नाही , जाऊ शकलेलो नाही. ओबेरॉयमधील सर्व मृतदेह आता बाहेर काढले असून हॉटेलच्या साफसफाईचे काम सुरू असल्याचे सांगून ते म्हणाले की , हॉटेलच्या नुकसानीबाबत काहीही सांगणे अशक्य आहे. हॉटेल असोसिएशनकडे तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारशी आम्ही त्याबाबत बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ओबेरॉयच्या एकूण दहा कर्मचा-यांना जीव गमवावा लागल्याचे सांगून ते म्हणाले की , या सर्व कर्मचा-यांच्या घराची आणि नातेवाईकांची आम्ही योग्य ती काळजी घेऊ. आमच्या ज्या कर्मचा-यांना जीव गमवावा लागला त्यांच्यापैंकी कोणीही ओबेरॉय हॉटेलवर हल्ला करण्यात सामील नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानात इस्लामाबाद येथील मॅरिएट हॉटेलवरही याच प्रकारचा हल्ला झाल्याचे आम्ही ऐकले होते , मात्र आपल्याकडे असे काही होईल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता असे सांगून ते म्हणाले की , हॉटेलची सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही योग्य ती पावले उचलूच. हल्ला होण्याच्या काही वेळापूर्वीच मी एका पारितोषिक वितरण समारंभाला जाण्यासाठी ओबेरॉयमधून बाहेर पडलो होतो. नाहीतर कदाचित मीही तुम्हाला दिसलो नसतो.
दरम्यान, सकाळी साडेआठच्या सुमारास ऑपरेशन ताज पूर्ण झाले , त्यानंतर एनएसजीचे जवान या वास्तुची तपासणी करत असून, अग्निशमन दल आग लागलेल्या भागावर नियंत्रण मिळवत आहे. त्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाशी साधलेल्या संवादात अनेक महत्त्वाचे मुद्दे सामोरे आले. हल्ल्याच्या या सा-या घटनांमध्ये अग्निशमन दलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सतत होणारा हॅण्डग्रेनेडचा वर्षाव आणि सतत गोळीबार होत असूनही या वास्तुला लावलेली आग अग्निशमन दलाने जीवावर उदार होऊन विझवली. त्यासाठी अग्निशमन दलाचा २० फायर इंजिन आणि १५० जवान डोळ्यात तेल घालून होते , अशी माहिती डेप्युटी फायर ऑफिसर राजन काटकर यांनी दिली. त्यामुळेच अग्निशमन दलाच्या या अतुलनीय शौर्यामुळेच ही वास्तू भस्मसात होण्यापासून वाचली हे विसरता येणार नाही.
ताज हॉटेलमध्ये ऑपरेशन पूर्ण झाल्यावर सुरू असलेल्या शोधप्रक्रियेत या ऐश्वर्याने भरलेल्या वास्तुची अवस्था भग्न , नष्ट झाली आहे. आतील ऐश्वर्याच्या अनेक खुणांची राखरांगोळी झाली आहे. भरजरी पडद्यांची पायपुसणी झाली आहेत , तर श्रीमंतीचे प्रतीक असणाऱ्या काचांचा जमिनीवर खच पडला आहे.


आझमकडे सॅटेलाईट फोन, शस्त्रे व नकाशे
या कारवाईत जिवंत हाती लागलेल्या आझम अमीर कासम या अतिरेक्याकडे पोलिसांनी शस्त्रास्त्र, सॅटेलाइट फोन आणि छत्रपती शिवाजी टर्मीनसचा नकाशा सापडला. या तरुण दहशतवाद्याने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली आहे. हा दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा मास्टर माइंड महिन्यापूर्वी मुंबईत येऊन गेला असेही त्याने सांगितले. त्याने अनेक महत्त्वाच्या भागांचे फोटो काढले. तसेच चित्रिकरण करून त्याने आपल्या गटाला प्रशिक्षित केले. शेवटच्या क्षणापर्यंत जास्तीत जास्त लोकांना मारा असे त्याने सांगितल्याचे आझम याने गुपीत उघड केले.

No comments: