Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 21 May, 2008

कॅसिनोवाल्यांनो, गाशा गुंडाळा भाजपचा मशाल आंदोलनाद्वारे झणझणीत इशारा

पणजी, दि. २० (प्रतिनिधी) : पर्यटनाच्या नावाखाली कॅसिनो जुगाराचे भूत गोव्याच्या मानगुटीवर बसवून येथील युवा पिढीला बरबाद करण्याचा विडा विद्यमान कॉंग्रेस सरकारने उचलला आहे. भाजप हा प्रकार मुळीच खपवून घेणार नाही. सरकारने मांडवी नदीतील "कॅसिनो' जहाज ताबडतोब हटवले नाही, तर पणजीतील जनता त्याविरोधात पेटून उठेल, असा झणझणीत इशारा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिला आहे.
पणजी शहर भाजप मंडळातर्फे आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली "काराव्हेला' या कॅसिनो जहाज कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेला. या मोर्चात भाजप युवा मोर्चा, महिला मोर्चा आणि पक्षाच्या आमदारांनी भाग घेतला. "कॅसिनो' जुगाराविरोधात भाजपने केलेल्या आंदोलनाच्या शुभारंभाचा हा भाग असून यावेळी असंख्य मशाली पेटवून कॅसिनोला विरोध करण्यात आला. "सेझ'च्या नावाने गोवा विकायला पुढे सरसावलेले कॉंग्रेस सरकार आता गोव्यातील भावी पिढीला जुगाराच्या अग्निकुंडात ढकलू पाहत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. गोव्यातून "कॅसिनो' हटवले नाहीत तर त्या विरोधात या मशाली आपली "भूमिका' बजावतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
गोव्यात सध्या मांडवी नदीत व्यवसाय करणारे "काराव्हेला'हे एकमेव कॅसिनो जुगार जहाज आहे. मांडवी नदीत हॉटेल लीलाचे अन्य एक जहाज नांगरून ठेवले असताना "प्राइड ऑफ गोवा' नामक अन्य एक दुमजली कॅसिनो जहाजाचे आगमन झाले आहे. सरकारने अन्य चार कॅसिनो जहाजांना परवानगी दिली असून त्याबाबत माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी सरकारातील कुणालाही विश्वासात घेतले नव्हते, असा आरोप यावेळी करण्यात आला. सदर कंपनीकडून शुल्कही आकारण्यात आले असून हा संपूर्ण व्यवहार अत्यंत गुप्ततेत करण्यात आला आहे. भाजपने येत्या पावसाळी अधिवेशनात कॅसिनोविरोधात खाजगी विधेयक मांडण्याची यापूर्वीच घोषणा केली आहे. सध्याच्या जुगार प्रतिबंध व नियंत्रण कायद्यातील कॅसिनो जुगाराला देण्यात येणाऱ्या परवानगीची अटच रद्द करण्याची शिफारस या विधेयकात केली जाणार असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले होते.
राज्यात कॅसिनोविरोधात अलीकडेच स्वयंसेवी संस्थाही पुढे सरसावल्या आहेत. पणजी येथे यासंबंधी जाहीर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते व त्याला संपूर्ण गोव्यातून अनेकांनी आपला पाठिंबा दर्शवला होता. भाजपने सुरू केलेल्या या आंदोलनाला आता अन्य संस्थांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता असून "सेझ' पाठोपाठ "कॅसिनो' प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान सभापती प्रतापसिंग राणे टीकेचे लक्ष्य बनणार आहेत.
आजच्या आंदोलनात पर्रीकर यांच्यासह आमदार दयानंद मांद्रेकर, वासुदेव मेंग गावकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, युवा मोर्चा अध्यक्ष आशिष शिरोडकर, भाजप उपाध्यक्ष कुंदा चोडणकर, दक्षिण गोवा युवा मोर्चा अध्यक्ष रूपेश महात्मे आदींची भाषणे झाली.
...आणि शटर बंद झाले
भाजपने अचानकपणे "काराव्हेला' कॅसिनो कार्यालयावर धडक दिल्याने येथील कर्मचाऱ्यांची बोबडीच वळली. भाजपचा मोर्चा तिथे पोहचण्यापूर्वीच हे जहाज मांडवीत सुटले होते. त्यामुळे तिथे या जहाजावर जाण्यासाठी लोकांची गर्दी नव्हती. काही पर्यटक मात्र मोर्चामुळे घाबरून बाहेर पडण्यासाठी "काराव्हेला' च्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालताना दिसत होते. गोव्यातील लोकांचा या कॅसिनो जुगाराला विरोध आहे हा संदेश त्यांच्यापर्यंत या मोर्चाव्दारे पोहोचला तरी खूप आहे, असे मत आंदोलकांनी व्यक्त केले.

No comments: