Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 1 February, 2008

vachta column

कामतसाहेब,
मुद्याचे बोला!
गोव्याचा विकास हवा की नको, असा प्रश्न विचारून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सर्व गोमंतकीयांना सुन्न करणारा प्रश्न विचारला आहे! हो, असे सुरुवातीला सर्वांनाच वाटले. विकास नको, असे कसे म्हणणार? त्यासाठीच तर सरकारची गरज आहे. विकास हवा तर त्याबरोबरच दुष्परिणामही सहन करण्याची तयारी ठेवा, असेही त्यांनी सुनावले. मुख्यमंत्री अनेक दिवसांनी एवढे मनमोकळे बोलले, त्याअर्थी त्यांच्यावरील दडपण दूर झाले असा आपला समज होणे साहजिकच आहे. ते तणावमुक्त होऊन एवढे सरळपणे बोलते झाले, असे वाटले! यात नेमका तथ्यांश किती? ते काय बोलले, जनता काय समजली आणि त्यांना काय सांगायचे होते हे तीन वेगवेगळे मुद्दे आहेत. कामत यांनी सांगितलेल्यांमध्ये त्यांनी महत्त्वाचा मुद्दाच टाळला आहे. विकास हवा याचा अर्थ गोव्यात आणखी उद्योग हवेत असे त्यांना म्हणायचे आहे. उद्योग येतील तर त्यासोबत प्रदूषणही येईल, असे त्यांना सुचवायचे आहे! आता उद्योग येतील तर ते कुठे येतील? त्यासाठी जागा लागेल आणि या जागेची तरतूद सरकारने केलेली आहेच! यात आश्चर्य वाटायचे कारण नाही. आपले सरकार फार दूरचा विचार करते. "सेझ'नको असतील तर रद्द करू, जनतेची मागणी शंभर टक्के मान्य! त्यासाठी गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीकडून अभिनंदनाचा वर्षावही झाला. "सेझ'कशासाठी नकोत याचे उत्तर जनतेने दिले आहे, त्यानुसार लोकांच्या जमिनी स्वस्त दरात घेऊन दलाली खाऊन त्या उद्योजकांच्या घशात घालायचा बेत आहे. या जमिनीत काही सुपीक जमिनीही आहेतच. याला जनतेचा विरोध आहे. "सेझ'रद्द केले, तरी या जमिनी अद्याप सरकारच्या ताब्यात आहेत आणि आता.....विकासासाठी जे उद्योग उभारले जातील ते याच जागेत! बोला, उद्योग हवेत की नकोत? विकास हवा की नको? हवा असेल तर मग "सेझ'च्या जमिनी वापरल्या जाणार आहेत. आंदोलन केले म्हणून "सेझ'रद्द केले पण त्या जमिनी मात्र उद्योगांना देण्याचा नवा डाव खेळला जात आहे. त्या ठिकाणी तेच उद्योग सुरू करून या राज्याचा विकास केला जाणार आहे! म्हणे औद्योगिक वसाहती स्थापन केल्या जातील. गोव्यात सध्या असलेल्या वसाहतींमधील किती उद्योग चालू आहेत? किती आजारी आहेत, किती अनुदान लाटून टाळे लावून निघून गेले? यामागची कारणे काय? वीज, पाणी अथवा बाजारपेठ नसल्याने ते गेले का? सरकारने यासंबंधीची सध्यस्थिती जनतेसमोर ठेवावी आणि मगच नव्या उद्योगांसंबंधी बोलावे. मुख्यमंत्रीसाहेब, मुख्य मुद्दा बाजूला ठेवू नका! स्वस्त दरात संपादन केलेल्या जागा उद्योगांना देताना ज्यांनी दलाली घेतली, त्यांना वाचविण्यासाठी जनतेचा रोष ओढवून घेऊ नका! त्यांचे दडपण किती काळ सोसणार? जनआंदोलनाला पुन्हा आमंत्रण देणे किती धोकादायक आहे, याची जाण ठेवा. त्याची थोडीफार कल्पना आपल्याला आली असेलच म्हणा. त्यासाठी तुम्ही "सेझ'रद्दची घोषणाही केली. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा आंदोलनाची प्रतीक्षा करू नका! त्या जागा मूळ मालकांना देण्यासाठी काय करणार आहात, हाच आज कळीचा मुद्दा आहे. जनतेला त्याचे उत्तर हवे आहे. तेथे औद्योगिक वसाहती उभारण्याचा विचारही करू नका. तसा डाव जनतेच्या लक्षात आला आहेच, त्यामुळे तो यशस्वी होणार नाही, एवढे निश्चित. नवे उद्योग कसले आणणार, कुठे उभारणार, किती रोजगार देणार ही माहिती जनतेसाठी उघड करा, नपेक्षा...जनता पुन्हा लोहिया मैदान गाजवेल, आझाद मैदानावर लक्तरे टांगली जातील! जागृत जनता, स्वाभिमानी गोमंतकीय हाच आपला प्रमुख विरोधक आहे.
जाता जाता एवढेच सांगायचे आहे की, सरकार पाडण्याचा डाव खेळल्याबद्दल विनाकारण भाजपला दोष देणे सोडून द्या. आपलेच विश्वासू सहकारी याकामी पुढे होते, त्यांनीच राजीनामे दिले! तसे पाहाता बैठका घेणे, डावपेच आखणे (गोव्यात असो किंवा मुंबईत) हे तर विरोधी पक्षाचे कामच आहे. त्यासाठी आगपाखड करणे कितपत योग्य? सत्तेसाठीच राजकीय पक्ष या क्षेत्रात आहेत, याचा विसर न पडावा. कधीही बहुमतात नसलेल्या, राज्यपाल व सभापतींच्या कृपेवर तगलेल्या सरकारने फार बढाया न मारलेल्या उत्तम!
एस.के.प्रभू

1 comment:

Anonymous said...

Hello. And Bye.