Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 1 February, 2008

लोकायुक्तांचे कर्नाटकात छापे
११ अधिकाऱ्यांकडे कोटयावधींची बेहिशेबी मालमत्ता
बेळगावचे पोलिस उपअधीक्षक जाळ्यात

बेळगाव, दि. ३१ (प्रतिनिधी)- कर्नाटकातील ११ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरावर एकाचवेळी छापे टाकून आज कर्नाटकच्या लोकायुक्तांनी कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली. त्या ११ जणामध्ये बेळगावचे पोलिस उपअधीक्षक पंढरीनाथ जी. वांडकर यांचा समावेश असून त्याच्याकडे उत्पन्नापेक्षा ७०० पटीने अधिक मालमत्ता सापडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
लोकायुक्त न्यायमूर्ती संतोष हेगडे यांच्या मार्गदर्शनावरून म्हैसुरचे लोकायुक्त अधिकारी सुंदराजन यांनी आठ अधिकाऱ्यांसमवेत आज पहाटे ५ वाजता वांडकर यांच्या सहा अलिशान बंगल्यांचा ताबा घेऊन छापा टाकला. त्यामध्ये लक्ष्मीनगर येथील बंगला, गांधीनगर येथील फार्म हाऊस, गुडसशेड रोड बेळगाव येथील एका अपार्टमेंटमधील प्लॅट आदी ठिकाणांचा समावेश असून त्यांचे बॅंक लॉकर्स तपासले असता त्यांच्याकडे पाच कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचा पत्ता लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
या मालमत्तेत सोने, चांदी व इतर मालमत्तेचा समावेश असून हंस टॉकिजसमोर बांधलेल्या भव्य कमर्शिअल कॉम्पलेक्समधील भागीदारीची कागदपत्रेही लोकायुक्तांच्या हाती लागली आहेत. मूळचा बेळगावचाच असलेल्या वांडकर यांनी अनेक वर्षे बेळगावातच मुक्काम ठोकला आहे. त्यांच्या मालमत्तेची ही मोजदाद उद्या सायंकाळपर्यंत चालणार असल्याचे कळते.
दरम्यान, राज्यातील इतर अन्य अधिकारीही लोकायुक्तांच्या जाळ्यात सापडले असून त्यामध्ये बेल्लारीचे राजण्णा, दावणगिरीचे सर्कल पोलीस निरीक्षक रेवाण्णा, धारवाडचे एस. बी. कोळार आदींचा समावेश आहे. बेळगाव, धारवाड, मंड्या, शिमोगा, दावणगिरी, बंगलोर अशा १० ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आल्याचे कळते. गुलबर्गा येथील नागरिक हक्क संचालनालयाचे पोलीस अधीक्षक श्री पीतांबर हेराजे हे आज सायंकाळी सेवेतून निवृत्त होणार होते व त्यांच्या सत्काराचा कार्यक्रमही ठरला होता पण त्या अगोदरच त्याला पोलिस कोठडीची हवा खावी लागली.

No comments: