Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 1 February, 2008

इंधन दरवाढ निर्णय
पुढील आठवड्यात

नवी दिल्ली, दि. ३१ - आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशांतर्गत इंधनाच्या किंमतींची फेररचना करण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकार पुढील आठवड्यात घेणार असल्याचे आज स्पष्ट करण्यात आले.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले की, केंद्र सरकारने इंधन दरवाढीच्या संदर्भात एका मंत्रिस्तरीय समितीची स्थापना केली आहे. या समितीचे अध्यक्ष परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रणव मुखर्जी असून त्यांची बैठक आज सकाळीच झाली. या समितीने अंतिम निर्णय मंत्रिमंडळावर सोडला आहे. अर्थात, या बैठकीत किंमतींच्या फेररचनेवर बरीच चर्चा झाली. पण, शेवटचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाचाच राहणार आहे. त्यामुळे आगामी ४ ते ५ फेब्रुवारीला याविषयीचा निर्णय येण्याची शक्यता आहे.
आज सकाळी झालेल्या बैठकीबाबत माहिती देताना ते म्हणाले की, आम्ही सरकारसमोर वाढत्या किंमतीबाबत दोन पर्याय ठेवले आहेत. एक म्हणजे पेट्रोल ४ किंवा २ रुपयांनी वाढविणे आणि डिझेल २ किंवा १ रुपयांनी वाढविणे. पण, सध्याच ही शिफारस आम्ही सरकारकडे पाठविलेली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ यापैकी एक निर्णयच घेईल, असे मी आज ठामपणे म्हणून शकत नाही. केंद्राला शिफारसी पाठविण्यासाठी मंत्रिस्तरीय समितीला पुन्हा एकदा बैठक घ्यावी लागणार असल्याचेही देवरा यांनी सांगितले.
प्रणव मुखर्जी, मुरली देवरा यांच्यासह या समितीत अर्थमंत्री पी. चिदम्बरम आणि कृषिमंत्री शरद पवार यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने सध्या इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांना प्रति लिटरमागे बरेच नुकसान सहन करावे लागत आहे. त्यांना एक लिटर पेट्रोलमागे १०.६ रुपये, डिझेलमागे ११.६ रुपये, एलपीजी सिलेंडरमागे ३३१.४ रुपये आणि केरोसिनमागे १९.८९ रुपये इतका तोटा होत आहे. त्यामुळे या कंपन्यांनी केंद्र सरकारकडे इंधनाच्या किंमती वाढविण्यासाठी तगादा लावला आहे.

No comments: