Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 15 July, 2011

कॉंग्रेसला अपशकून - मिकींचा एककलमी कार्यक्रम

कॉंग्रेसला धडा शिकवणे हाच
मिकींचा एककलमी कार्यक्रम

मडगाव, दि. १४ (प्रतिनिधी): इंग्रजी माध्यमाचा मिकी पाशेको यांनी उपस्थित केलेला मुद्दा ‘हायजॅक’ करून सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लोकमत आपल्या बाजूने वळविण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्याच अंगलट यावा यासाठी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी बनलेल्या मिकी पाशेकोंनी पावले उचलल्याचे दिसून येत असून तसे झाले तर कॉंग्रेसची व चर्चिल यांचीही राजकीय स्वप्ने उध्वस्त होण्याची शक्यता राजकीय निरीक्षक वर्तवत आहेत.
मिकी पाशेको यांनी या आठवड्याच्या सुरुवातीस आपल्या आगामी राजकीय पवित्र्याबद्दल दिलेले संकेत राज्यातील राजकीय शक्तींच्या ध्रुवीकरणास प्रारंभ झाल्याचेच दर्शवणारे आहेत. त्यांनी विधानसभेच्या सर्व चाळीसही जागा लढवण्याचे संकेत दिलेले असले तरी प्रत्यक्षात ते ३० जागा लढवतील व त्यासाठीचे उमेदवारही त्यांनी निश्‍चित केले आहेत. त्यांनी दिलेले संकेत पाहिले तर, ते ही निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवणार नाहीत हे उघड आहे. मात्र, ते नवा पक्ष स्थापन करतील की, एखादा स्थानिक पक्ष त्यांच्या मदतीस जाईल हे अजून स्पष्ट झालेले नाही. तरीही मिकी स्वतंत्रपणे आखाड्यात असतील व त्यांची ही उपस्थिती सत्ताधारी कॉंग्रेस व विशेषतः कॉंग्रेसवर वर्चस्व प्रस्थापित करू पाहणार्‍या चर्चिलसाठी बरीच अडचणीची ठरणारी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार व आजवरच्या मतदानाचा आढावा घेतला तर ज्या मतदारसंघात कॉंग्रेस आमदार निवडून आले आहेत तिथे मिकींच्या उमेदवाराने पाचशे ते हजार मते जरी मिळविली तर तेथील निकाल उलटेपालटे होऊ शकतात. मुख्य म्हणजे तेवढी मते त्यांचे उमेदवार निश्‍चितच मिळवू शकणारे असतील. सासष्टीतील अवघ्याच मतदारसंघांतही जर असे घडले तर सत्ताधार्‍यांची धडगत राहणार नाही. खुद्द चर्चिल यांच्या नावेली मतदारसंघात जबरदस्त उलटफेर होणेही शक्य आहे. मिकींचा सारा प्रयत्न विजयासाठी नसेल तर कॉंग्रेसला धडा शिकविण्यासाठीच असेल व त्यासाठीच त्यांनी गेल्या वर्षभरापासून नियोजनबद्धरीत्या पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे.
त्यांनी आपला मोर्चा बाणावलीतून नुवेमध्ये वळवून वीजमंत्री आलेक्स सिकेरा यांच्या पोटात भीतीचा गोळा उठविला आहे. गतवर्षी झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत तेथून तसेच राय येथून आपले उमेदवार निवडून आणून त्यांनी अनेकांना धक्का दिला आहे. खुद्द बाणावलीत त्यांनी चर्चिल यांना दणका दिला आहेच पण, नगरपालिका निवडणुकीत महसूल मंत्री जुझे फिलिप यांनाही त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. याच प्रकारे वास्को, कुठ्ठाळी व दाबोळी या मतदारसंघांत त्यांच्या उमेदवारांनी जास्त नसली तरी ५०० ते १००० मते घेतली तरी निवडणुकीचे पारडे विद्यमान आमदारांवर उलटू शकते व तीच मिकींची चाल असेल असेच सध्या तरी दिसते.
ते कुडतरीतही आलेक्स रेजिनाल्ड यांच्यासाठी अडचण उभी करू शकतात. त्यांचे तेथील उमेदवार आंतोन गावकर यांनी यापूर्वीच मोर्चेबांधणी केलेली असून दुसरीकडे खासदार सार्दिन यांचे पुत्रही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचे संकेत मिळत आहेत. यूरी आलेमाव जर अन्य पक्षाच्या तिकिटावर निवडणुकीत उतरू शकतात तर आपण काय घोडे मारले आहे असा म्हणे त्यांचा सवाल आहे.
उत्तर गोव्यात कळंगुट येथे प्रदीर्घ काळ सरपंचपद उपभोगलेले जोजेफ सिकेरा हे मिकींचे उमेदवार असतील अशी चिन्हे दिसत असून तसे झाले तर एकेकाळी मिकींचे जिवलग मित्र व आत्ताचे कडवे शत्रू आग्नेल फर्नांडिस यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. थिवी तसेच शिवोलीसाठी त्यांचे वेगळे पवित्रे आहेत. विशेषतः मंत्रिमंडळात आपली जागा घेतलेल्या नीळकंठ हळर्णकर यांना कुठल्याही परिस्थितीत स्वस्थ बसू द्यावयाचे नाही, असा चंग त्यांनी बांधला आहे. पण अन्यत्र नसले तरी सासष्टीतील सर्व मतदारसंघांतील त्यांचे बहुतेक उमेदवार पक्के झालेले आहेत व कोणत्याही प्रकारे कॉंग्रेसला अपशकून करणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम राहील असेच दिसते आहे.

No comments: