Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 12 July, 2011

मळा प्रकल्पामुळे स्थानिकांत असंतोष

नगरसेवक शुभम चोडणकर यांची चिंता
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): ‘एनजीपीडीए’कडून मळा मार्केट व तलाव प्रकल्पाच्या मूळ आराखड्याला बगल देऊन हा प्रकल्प ‘पीपीपी’ धर्तीवर ‘मेसर्स कनका इन्फ्राटेक कंपनी’ ला देण्याचा निर्णय घेताना स्थानिकांना अजिबात विश्‍वासात घेतले गेले नाही. या प्रकल्पामुळे स्थानिकांना होणारा त्रास तसेच इथे निर्माण होणार्‍या अडचणी याबाबत स्पष्टीकरण हवे, अशी मागणी मळा येथील नगरसेवक शुभम चोडणकर यांनी केली.
मळा येथील ‘एनजीपीडीए’चा मूळ प्रकल्प हा स्थानिक व्यापारी व लोकांना नजरेसमोर ठेवून तयार केला होता. या मार्केट प्रकल्पात पणजी व आसपासच्या परिसरातील व्यापार्‍यांना संधी मिळणार असल्याचेही सांगण्यात आले होते. परंतु, आता या प्रकल्पाच्या ‘पीपीपी’करणामुळे स्थानिक बाहेर फेकले जाणार असून हा तारांकित प्रकल्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मळा भागातील स्थानिकांना सध्याच अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पाटो वगळता पणजी शहरात प्रवेश करण्यासाठी दुसरा एकमेव पर्याय म्हणून रूआ दे ओरेम या रस्त्याचा वापर होतो. हा रस्ता आधीच वाहतुकीसाठी अपुरा पडतो व त्यात हा प्रकल्प उभा राहिल्यास इथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होणार असल्याचे श्री. चोडणकर म्हणाले. एका बड्या प्रकल्पासाठी रूआ दे ओरेम रस्ताच आराखड्यात दाखवण्यात आला आहे. मळा येथील अंतर्गत रस्त्यांचाही वापर या प्रकल्पासाठी होणार असल्याने स्थानिकांची कोंडी होण्याचीच जास्त शक्यता आहे. मळा भागात पाण्याची टंचाई, मलनिस्सारण प्रक्रियेचा अभाव व त्याचबरोबर येथे पावसाळ्यात पाणी भरण्याचा प्रकार याबाबत काहीच विचार करण्यात आला नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. मुळात ‘एनजीपीडीए’ची ही जागा ‘रूआ दे ओरेम’ खाडीशी संबंधित आहे. या खाडीला भरती ओहोटीचा प्रभाव जाणवत असल्याने या प्रकल्पामुळे या भागांत पुराची समस्या जाणवेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. पणजीत कचर्‍याची समस्या आधीच बिकट बनली आहे व त्यामुळे या नव्या प्रकल्पात कचरा विल्हेवाटीची काय सोय असेल, याचाही उलगडा झालेला नाही, असेही ते म्हणाले.
या ठिकाणी पाच विद्यालये, लहानमोठी हॉटेल्स व इतर व्यापारी संकुले असल्याने या प्रकल्पामुळे निर्माण होणारा अतिरिक्त ताण रूआ दे ओरेम रस्ता कसा पेलेल, याचीही चिंता या भागातील लोकांना लागून राहिली आहे. या प्रकल्पाचा स्थानिकांना कोणताच लाभ होणार नसेल तर त्याचा उपयोग काय, असा सवालही त्यांनी यावेळी केला. येथील हस्तकला महामंडळाचा ‘शिल्पग्राम’ हा प्रकल्पही ‘पीपीपी’ पद्धतीवर उभारण्यात येणार आहे व त्यामुळे मळावासीयांना घरातून बाहेर पडणेच मुश्कील होईल, असेही श्री. चोडणकर म्हणाले. येत्या १८ रोजी बोलावण्यात आलेल्या बैठकीत या सर्व विषयांवर सखोल चर्चा होणार असून या बैठकीला मळा तसेच पणजी भागांतील स्थानिकांनी मोठ्या संख्येने हजर राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

No comments: