Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 9 December, 2010

बाळ्ळीत साकारतेय ‘पोर्तुगीज ग्राम’

• पंचायतीचा २ वर्षांपूर्वीच ना हरकत दाखला
• प्रकल्पाला ग्रामसभेत तीव्र विरोध होणार
• शांतता नष्ट होण्याची ग्रामस्थांकडून भीती

कुकळ्ळी, दि. ८ (प्रतिनिधी): पोर्तुगिजांची गोव्यावरील पाशवी राजवट उलथून लावण्यासाठी जेथे पहिला संग्राम झाला त्या बाळ्ळीतच ‘पोर्तुगीज ग्राम’ साकारणार असून त्यामुळे स्थानिक जनतेत कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. या प्रकल्पाला कडाडून विरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यादृष्टीने आगामी ग्रामसभा वादळी ठरेल, असे संकेत मिळू लागले आहेत.
गोव्याची संपूर्ण किनारपट्टी व शहरी भाग घशाखाली घातल्यानंतर बिल्डर लॉबीने आपला मोर्चा आता गोव्यातील निसर्गरम्य अशा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना हाताशी धरून या लॉबीने गोव्याची संपूर्ण हिरवीगार डोंगरपट्टी मेगा प्रकल्पांच्या नावाखाली पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचा जणू विडाच उचलला आहे.
बाळ्ळी पंचायतीच्या अडणे विभागातील चेडवा पाटो येथील हिरवीगार डोंगरपट्टी सध्या या बिल्डर लॉबीने दोन वर्षांपूर्वी स्थानिक पंचायतीला हाताशी धरून आपल्या कब्जात घेतली आहे. बिल्डरांनी सध्या १ लाख २० हजार चौरस मीटर जागेवर पंचायतीचा कोणताही परवाना न घेता वनराई नष्ट करून १५० भूखंड निर्माण केल्याचा आरोप स्थानिकांकडून होऊ लागला आहे. हे भूखंड प्रामुख्याने परप्रांतीय आणि विदेशांतील धनदांडग्यांनी खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येथील हिरवाईबरोबरच, संस्कृती व शांतता धोक्यात येऊ शकते, अशी भीतीही अनेकांनी व्यक्त केली आहे.
असाच दुसरा अवाढव्य गृहनिर्माण प्रकल्प ब्रह्मा पेडाजवळील हमरस्त्यालगतच्या सावरीमळ भागात उभा राहात असून तेथील लाखो चौरस मीटर जागेत सुमारे २०० भूखंड बनवण्याची योजना बिल्डरनी हाती घेतली आहे. विशेष म्हणजे स्थानिक पंचायतीनेही तेथे भूखंड निर्माण करण्यास ‘ना हरकत’ दाखलाही दिला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
सहा हजार लोकसंख्या असलेल्या निसर्गरम्य बाळ्ळी गावात मोठ्या प्रमाणात भूखंडांची निर्मिती करून मोठ्या प्रमाणात निवासी इमारती उभ्या राहिल्यास बाळ्ळी परिसराची लोकसंख्या अतोनात वाढणार असून त्यामुळे वीज, पाणी व अन्य पायाभूत सुविधांवर विलक्षण ताण पडणार आहे. कारण आधीच अपुरा पाणीपुरवठा व वीजटंचाईमुळे बाळ्ळीवासीय मेटाकुटीला आले आहेत. त्यात या वाढत्या बोजामुळे या लोकांचे कंबरडेच मोडणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
या दोन्ही प्रकल्पांच्या विरोधात स्थानिक जनता एकवटणार असून पंचायतीच्या मासिक बैठकीत या प्रकरणी पंचायतीला खडसावून जाब विचारण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे.
याविषयी बाळ्ळीचे सरपंच गोकुळदास गावकर यांची भेट घेतली असता सावरीमळ प्रकल्पाबाबत त्यांनी दुजोरा दिला. मात्र चेडवा पाटो येथील प्रकल्प तीन वर्षांपूर्वीचा असल्याने त्याबद्दल काहीही सांगण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली.

No comments: