Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 8 December, 2010

पर्यटन हंगाम बहरलेला असतानाच जीवरक्षकांचे आंदोलन चिघळले

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): पर्यटन हंगाम बहरलेला असतानाच मिरामार ते बागापर्यंतच्या किनारी भागातील जीवरक्षकांनी पुकारलेल्या संपाची व्याप्ती वाढली असून आता काणकोण भागातील जीवरक्षकही संपात सहभागी झाले आहेत. ‘दृष्टी’ व्यवस्थापनाने या जीवरक्षकांची नियुक्ती केली आहे. समुद्रात गटांगळ्या खाणार्‍या पर्यटकांना वाचवणार कोण, असा बाका पेच या पार्श्‍वभूमीवर निर्माण झाला आहे.
आज आणखी २५० जीवरक्षक या संपात सहभागी झाले. वेतनवाढ मिळावी आणि जीवरक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यास निलंबित करावे या मुख्य मागण्यांसाठी जीवरक्षक कालपासून संपावर गेले आहेत. मात्र, सुमारे शंभर जीवरक्षक सध्या किनारी भागात कार्यरत आहेत.
कोणकोण तालुक्यातील पाळोळे, गालजीबाग, पाटणे व राजबाग किनार्‍यांवरील ६० जीवरक्षक आज दुपारपासून काम बंद करून संपात सहभागी झाले. सरकारच्या सूचनेनुसार या जीवरक्षकांशी केलेल्या कंत्राटानुसार त्यांना साडेसहा हजार रुपये वेतन देण्याचे नक्की झाले होते. आता या रक्षकांनी १० हजार रुपये वेतन देण्याची मागणी केली आहे. तसेच, कामाचे तास १२ ऐवजी ८ करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या मागण्या आम्ही सरकारपर्यंत नेणार असल्याचे ‘दृष्टी’ व्यवस्थापनाचे व्ही के. कन्वर यांनी सांगितले. उद्यापर्यंत या जीवरक्षकांचा प्रश्‍न मिटू शकतो, असा दावा त्यांनी केला.
पर्यटन हंगामामुळे उत्तर गोव्यातील किनारे पर्यटकांनी गजबजले असताना जीवरक्षक संपावर गेल्याने एखादा बाका प्रसंग उद्भवल्यास काय होणार, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. समुद्रात मौजमजेसाठी उतरणार्‍या पर्यटकांवर नजर ठेवण्याची आणि पाण्यात गटांगळ्या खाणार्‍या व्यक्तीला त्वरित मदत पोचवून त्यांचा प्राण वाचवण्याची जबाबदारी जीवरक्षकांवर आहे. राज्य पर्यटन खात्यामार्फत दृष्टी किनारा व्यवस्थापन कंपनीने या जीवरक्षकांना नियुक्त केले आहे.
दोन दिवसांपूर्वी रात्री गस्तीवर असताना मिरामार येथील एका जीव रक्षकाला वरिष्ठ अधिकार्‍याने थोबाडीत मारली होती. त्यातून हा वाद चिघळला. त्या अधिकार्‍याला त्वरित निलंबित करण्याची मागणी जीवरक्षकांनी केली आहे. ‘दृष्टी’ व्यवस्थापनाने ही मागणी धुडकावून लावली आहे. तसेच, वेतनवाढीबाबतही व्यवस्थापनाने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. तथापि, आम्हाला वेतनवाढ देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले होते, असा दावा जीवरक्षकांनी केला आहे.

No comments: