Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 27 December, 2009

ऍड.जनरलवरील अमर्याद खर्चाला माहिती हक्क अधिकाराने दिली पुष्टी

- पाच वर्षांत ४ कोटी २० लाख रुपये शुल्क
- तीन वर्षांत १.३८ लाख वाहन दुरुस्ती खर्च


पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) - राज्याचे ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांना सरकारने जून २००५ ते जुलै २००९ या पाच वर्षांच्या कालावधीत चार कोटी २० लाख १८ हजार सातशे पन्नास रुपये शुल्कापोटी अदा केले आहेत. त्यांच्या सरकारी वाहनाला गेल्या तीन वर्षांत तीन वेळा अपघात झाला व त्यामुळे एक लाख ३८ हजार दोनशे छपन्न रुपयांचा अतिरिक्त खर्चही सरकारी तिजोरीतूनच करण्यात आला, असे उघड झाले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून विविध जनहित याचिका प्रकरणी राज्य सरकारची खरडपट्टी सुरू असताना राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऍडव्होकेट जनरल यांच्यावर होणारा अमर्याद खर्च खरोखरच सरकारला परवडणारा आहे काय, याचा आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ सरकारवर आली आहे.
ऍड.आयरिश रॉड्रिगीस यांनी ऍड. कंटक यांच्यावर होणाऱ्या अमाप खर्चाच्या विषयाला सातत्याने वाचा फोडली असून हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहचले आहे. तरीही सरकार दरबारी मात्र याची काहीही दखल घेतली जात नाही. ऍड.रॉड्रिगीस करीत असलेल्या आरोपांबाबत खुलासा किंवा आरोपांचे खंडनही सरकार अथवा खुद्द ऍड. जनरल यांच्याकडूनही होत नाही. त्यामुळे सरकार आणखी किती काळ ही नामुष्की सहन करणार याचेच अनेकांना आश्चर्य वाटते.
माहिती हक्क कायद्याअंतर्गत ऍड.जनरलांवर होणाऱ्या खर्चाचा तपशीलच समोर आला आहे. पाच वर्षांत चार कोटी रुपयांहून अधिक व त्यात ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर २००९ या महिन्यांच्या शुल्काचा या रकमेत समावेश नाही. महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरातसारख्या बड्या राज्यांच्या ऍडव्होकेट जनरलना सरासरी दरमहा ५० हजार रुपयांपेक्षा अधिक शुल्क मिळत नाही. मात्र गोव्याच्या बाबतीत ही नेमकी उलटी परिस्थिती नेमकी का,असा सवाल विचारला जात आहे. ऍड. जनरलांच्या वाढीव शुल्काबाबत चिंता व नाराजी व्यक्त होत असली तरी मुख्यमंत्री दिगंबर कामत याबाबतीत फेरविचार करण्याच्या मनःस्थितीत नाहीत. अनेकांना हे कोडे उलगडलेले नाही.
नारळ व भटक्या कुत्र्यांमुळे
हजारो रुपयांना फटका
ऍड. रॉड्रिगीस यांनी ऍड. जनरलांच्या सरकारी वाहनावर झालेल्या खर्चाची माहिती मिळवली आहे. ही माहितीही तेवढीच धक्कादायक व अचंबित करणारी आहे. आतापर्यंत तीन वेळा ऍड.जनरलांच्या सरकारी वाहनाला अपघात झाला. त्यावर एकूण १,३८,२५६ रुपये सरकारी तिजोरीतून खर्च करण्यात आले. या अपघातांचे कारण काय, याची सरकार दरबारी झालेली नोंद विचित्रच आहे. पहिला अपघात २२ जुलै २००६ रोजी झाला. बांबोळी येथील त्यांच्या निवासस्थानासमोर उभे करून ठेवलेल्या वाहनाच्या समोरच्या बॉनेटवर नारळ पडला व त्यावर ८,१९९ रुपये खर्च करण्यात आला. दुसरा अपघात २० एप्रिल २००८ रोजी सांताक्रझ येथे भटका कुत्रा वाहनासमोर अकस्मात आल्याने झाला. या अपघातामुळे वाहन दुरुस्तीवर १,०७,४६९ रुपये खर्च झाला. तिसरा अपघात आल्तिनो येथे भटका कुत्रा अचानक समोरील बंपरला आपटल्याने झाला व त्यासाठी २२,८५८ रुपये खर्च करण्यात आला. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांमुळेच सरकारला एकूण १,३०,३२७ रुपये भुर्दंड सोसावा लागला. याबाबतीत शेवटच्या दोन अपघातांत वाहन चालकाच्या नावाची नोंदच सरकारदरबारी नसल्याचे उघड झाले आहे.
ऍड.रॉड्रिगीस यांनी केलेल्या आरोपानुसार त्यांचे स्वीय सचिव हेच त्यांचे वाहन चालवतात व सरकारने दिलेल्या माहितीनुसार सदर वाहन चालवण्याची परवानगी सरकारने त्यांना दिली नसल्याचेही उघड करण्यात आले आहे. ऍड.जनरल यांनी तरी आपले व्यवहार कायदेशीर व नियमांना धरून करावेत,अशी अपेक्षा असते; पण ते स्वतःच नियम पाळत नाहीत तिथे सरकारला नियम पाळण्याची शिकवण ते काय देणार, असा टोला ऍड. रॉड्रिगीस यांनी हाणला आहे.

No comments: