Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 16 June, 2009

कचरा विल्हेवाटीसाठी धारगळ व धारबांदोडा?

सभागृह समितीचा लवकरच अहवाल
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): कचऱ्यावर तोडगा काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या सभागृह समितीच्या बैठकींना आपण हजर राहत होतो, बाकी कोणीही येत नव्हते, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज केला. सभागृह समितीने उत्तरेत धारगळ व दक्षिणेत धारबांदोडा येथे जागेची पाहणी केली असून लवकरच समितीचा अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. सभागृह समितीने जागा शोधण्याचे काम केले तरी स्थानिक लोकांचा विरोध होत असल्याने त्याचा काहीही उपयोग होत नाही, असे खुद्द मुख्यमंत्री कामत यांनी मान्य केले. यापूर्वी आपण नगरविकासमंत्री असताना सभागृह समितीने कोलवाळ व बेंदुर्ले येथे जागेची पाहणी केली होती. पण, त्यालाही विरोध झाल्याने त्या जागा रद्द करण्यात आल्या होत्या. आता धारगळ व धारबांदोडा येथील जागेलाही विरोध होईल, त्यामुळे जोपर्यंत खरोखरच प्रामाणिकपणे हा विषय हाताळला जाणार नाही तोपर्यंत ही परिस्थिती अशीच कायम राहील, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
नगरविकासमंत्र्यांची आज बैठक
पणजीतील कचऱ्यावर तोडगा काढण्यासाठी उद्या दि. १६ रोजी नगरविकासमंत्री ज्योकिम आलेमाव यांनी पर्वरी येथे आपल्या दालनात महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, शिक्षणमंत्री बाबुश मोन्सेरात, महापालिका आयुक्त मेल्विन वाझ, महापौर कॅरोलिना पो आदी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत या विषयावर गरमागरम चर्चा होण्याचे संकेत मिळत आहेत. मनोहर पर्रीकर यांनी महापालिका आयुक्त मेल्विन वाझ यांची हकालपट्टी करण्याची मागणी करण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. महापालिकेत विरोधी गटाला कोणत्याही प्रकारे प्रतिनिधित्व देण्यास टाळाटाळ केली जात आहे. याबाबत पालिका सचिवांचे आदेश असूनही त्याची पूर्तता आयुक्तांकडून केली जात नसल्याने याचा जाबही या बैठकीत ते विचारणार आहेत.
दरम्यान, राजधानीत निर्माण झालेल्या कचरा समस्येबाबत आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मुख्य सचिव हौजूल हौकुम, शिक्षणमंत्री बाबुश मोन्सेरात, पालिका संचालक दौलत हवालदार आदींशी चर्चा केली. महापालिकेने आजपासून कचरा उचलण्यास आरंभ केल्याची माहिती मुख्यमंत्री कामत यांनी यावेळी दिली. महापौर कॅरोलिना पो यांनी मात्र अद्याप काहीही तोडगा निघाला नाही, चर्चा सुरू आहे, अशी माहिती दिली आहे.

No comments: