Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 18 June, 2009

महापालिकेच्या मदतीला
आता संजित रॉड्रिगीस
बायंगिणी अधिसूचित करण्याचा
महापालिकेचा एकमुखी ठराव

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)- पणजी महानगरपालिकेचा ढासळता कारभार आपल्या कार्यकाळात बऱ्यापैकी रुळावर आणण्यात यशस्वी ठरलेले व विशेष करून कचऱ्याची समस्या सोडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचललेले गोवा नागरी सेवेतील अधिकारी संजित रॉड्रिगीस यांना पुन्हा एकदा महापालिकेच्या आयुक्तपदी पाचारण करण्यात आले आहे. महापालिकेच्या अनेक निर्णयांत वादग्रस्त भूमिका घेणारे आयुक्त मेल्विन वाझ यांची आज आयुक्तपदावरून तात्काळ बदली करून श्री. रॉड्रिगीस यांना या पदावर नेमण्याचे आदेश जारी करण्यात आले.
गेल्या दोन आठवड्यांपासून प्रलंबित असलेल्या आणि पणजी शहरात साचलेल्या कचऱ्याच्या विषयावरून पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे. कचरा टाकण्यासाठी महापालिकेकडे एकही जागा नसल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग पसरले आहेत व दुर्गंधीमुळे नागरिकांचे जिणे असह्य झाले आहे. विद्यमान आयुक्त मेल्विन वाझ हा विषय हाताळण्यास पूर्णपणे अपयशी ठरल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. विरोधी पक्षनेते तथा पणजीचे आमदार मनोहर पर्रीकर यांनी नगर विकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांनी बोलावलेल्या बैठकीत श्री.वाझ यांच्या बदलीची जोरदार मागणी केली होती. नगर विकास खात्याने महापालिकेसाठी बायंगिणीची जागा निश्चित करून सात महिने उलटले तरी अद्याप ही जागा ताब्यात घेण्यास महापालिकेला अपयश आल्याने ज्योकीम आलेमाव यांनीही महापालिका आयुक्तांना खडसावून काढले होते. दरम्यान, पणजी महानगरपालिकेत निर्माण झालेल्या या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व हा कारभार व्यवस्थित रुळावर आणण्यासाठी संजित रॉड्रिगीस हेच योग्य अधिकारी आहेत, असा सूर या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याने नगर विकास मंत्री ज्योकिम आलेमाव यांनी रॉड्रिगीस यांची महापालिका आयुक्तपदी नेमणूक केली आहे. त्यांना महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

बायंगिणीची जागा औद्योगिक विभाग घोषित करा
बायंगिणीची जागा ही सध्या रहिवासी विभागाअंतर्गत येते तेव्हा राज्य सरकारने ताबडतोब ही जागा औद्योगिक विभाग क्षेत्रात अधिसूचित करावी व या जागेचा ताबा महापालिकेकडे सुपूर्द करावा, असा एकमुखी ठराव आज महापालिका मंडळाने संमत केला. महापौर कॅरोलिना पो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विरोधी गटासह बहुसंख्य नगरसेवक उपस्थित होते. बायंगिणी येथे कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येणार आहे व येथे वैज्ञानिक पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा कोणताही प्रश्न उपस्थित होणार नाही, असेही यावेळी महापौर पो यांनी स्पष्ट केले. पणजीचा कचरा अन्यत्र कशासाठी? असा विरोध करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे पणजी ही राजधानी आहे व येथे राज्यभरातून लोक, पर्यटक येतात. त्या सर्वांचा कचरा येथे साठतो. त्यामुळे हा कचरा पणजीचाच कशावरून? असा प्रश्न उपस्थित करून जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेव्हियर पवित्र शव प्रदर्शनावेळी पणजी महापालिकेकडूनच कचरा उचलला जात होता, याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. सरकारकडून वारंवार आपल्या निर्णयात फेरफार केला जातो, त्यामुळेच हा विषय अजूनही ताटकळत असल्याचेही महापौर पो म्हणाल्या.
दोन दिवसांत पणजी चकाचक
शहरात साठलेला कचरा उचलण्याचे काम सुरू झाले असून येत्या दोन दिवसांत पणजी शहर चकाचक होईल, असा विश्वास कॅरोलिना पो यांनी व्यक्त केला. शिक्षणमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी दोना पावला येथील पठारावर तात्पुरती सोय करण्यासाठी जागा उपलब्ध केल्याने सध्या हा कचरा तिथे टाकण्यात येणार आहे व तो वेगळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. बायंगिणीची जागा ताब्यात घेतल्यानंतर ही जागा रद्द करून नंतर संपूर्ण कचऱ्याची प्रक्रिया बायंगिणीत होणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

No comments: