Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 11 March, 2009

पर्रीकरांच्या 'त्या' वक्तव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ

पणजी, दि. १० (प्रतिनिधी): गोव्यातून कॉंग्रेसला हद्दपार करण्यासाठी भाजप व मगो पक्षाने एकत्र यावे आणि त्यासाठी आपण वैयक्तिक प्रयत्न करणार या विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या वक्तव्यामुळे आज राजकीय क्षेत्रात मोठीच खळबळ उडाली. मगोचे नेते तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी याप्रकरणी सावध पवित्रा घेतला असला तरी तसा प्रस्ताव आल्यास तो केंद्रीय समितीसमोर ठेवून त्यावर नक्कीच विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया मगोचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी "गोवादूत'शी बोलताना व्यक्त केली.
गोव्याच्या भवितव्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या दोन्ही समविचारी राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. या दोन्ही पक्षांदरम्यान दूरगामी युतीची गरज असून त्यासाठी आपण मगो पक्षाचे नेते तथा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधणार असल्याचे पर्रीकर यांनी सोमवारी एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. एवढेच नव्हे तर गोव्यातील सध्याच्या भ्रष्ट कॉंग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची विनंतीही आपण मगो पक्षाला करणार असल्याचे पर्रीकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान,वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मात्र पर्रीकर यांच्या वक्तव्याबाबत सावध पवित्रा घेतला आहे. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारात मगो हा घटक पक्ष असल्याने त्याबाबत विचार करण्याची आवश्यकताच नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आपण याबाबत काहीही सांगू शकत नाही, याबाबत पक्षाच्या केंद्रीय समितीलाच निर्णय घ्यावा लागेल, असे सांगत त्यांनी या मुद्याला बगल दिली.
विद्यमान आघाडीचा घटक असूनही मगो पक्षाने लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघांत आपले उमेदवार उतरवण्याचा निर्णय कसा काय घेतला, असे श्री.राऊत यांना विचारले असता त्यांनी आघाडी ही केवळ सरकार स्थापन करण्यासाठी स्थापन करण्यात आल्याचे सांगून एक स्वतंत्र पक्ष या नात्याने निवडणूक लढवणे हा लोकशाहीतील पक्षाचा हक्क असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाचा विकास व विस्तार करायचा असेल तर आघाडीचा विचार करून चालणार नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय केंद्रीय समितीने पूर्ण विचाराअंती घेतल्याचे ते म्हणाले. पर्रीकर यांनी संभाव्य युतीबाबत वक्तव्य केले असले तरी तसा प्रस्ताव त्यांनी अद्याप ठेवला नाही. या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार केंद्रीय समितीला असून समितीच याबाबत निर्णय घेऊ शकतील,असे ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांना या प्रस्तावाबाबत विचारले असता त्यांनीही या प्रस्तावाचे स्वागत केले. हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास गोव्याकरता ती चांगली गोष्ट ठरेल,असे त्या म्हणाल्या.
कॉंग्रेसही पक्ष मगोला विनंती करेलः शिरोडकर
विद्यमान आघाडीतील घटक पक्ष असूनही मगो पक्षाने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने कॉंग्रेस पक्षातर्फे त्यांना उमेदवार न उतरवता कॉंग्रेसला पाठिंबा देण्याची विनंती करणार असल्याची माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी "गोवादूत'शी बोलताना दिली. मगोची समजूत काढण्याचे प्रयत्न केले जातील; परंतु अंतिम निर्णय घेणे हा त्यांचा प्रश्न असल्याचे ते म्हणाले.पर्रीकर यांनी भाजप-मगो युतीबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात बोलण्यास मात्र त्यांनी स्पष्ट नकार दिला.

No comments: