Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 6 November, 2008

भाजपचा पाळीसाठी खास आर्थिक पॅकेजचा प्रस्ताव

डॉ. प्रमोद सावंत आज उमेदवारी अर्ज भरणार
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आर्थिक मंदीचे सावट पडल्याने त्याचा मोठा फटका खाण उद्योगाला बसला आहे. पाळी मतदारसंघातील बहुसंख्य जनता खाण उद्योगाशी संबंधित व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे या मंदीचा परिणाम त्यांच्या चरितार्थावर पडणार असल्याने या लोकांसाठी खास आर्थिक पॅकेजचा प्रस्ताव तयार करणार असल्याची घोषणा आज भाजपतर्फे करण्यात आली.
येथील भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी ही घोषणा केली. यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर,आमदार दामोदर नाईक,दयानंद सोपटे, अनंत शेट, राजेश पाटणेकर, लक्ष्मीकांत पार्सेकर आदी नेते उपस्थित होते. पाळी पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे नवोदित युवा व तडफदार नेते डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करून ते उद्या ६ रोजी आपला उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याचे श्री.नाईक म्हणाले. पाळी मतदारसंघातील उमेदवारीवरून नाराज झालेल्या नेत्यांशी चर्चा झाली असून सर्व मतभेद विसरून भाजप कार्यकर्ते श्री. सावंत यांच्या प्रचारकार्यात झोकून देतील व पाळीत पुन्हा भाजपचे कमळ फुलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्याचा विकास पूर्ण ठप्प झाला असून मंत्रीच सरकाराअंतर्गत एकमेकांचे पाय ओढण्यातच मग्न आहेत. हे सरकार जनतेला अजिबात नको असून म्हणूनच ते बरखास्त करण्याची मागणी भाजपतर्फे राज्यपाल एस.एस.सिद्धू यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेकडून भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगून उर्वरित नेत्यांशीही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाळी पोटनिवडणुकीव्दारे जनता सरकाराविरोधातील आपला रोष व्यक्त करेल, असा विश्वास श्री. नाईक यांनी व्यक्त केला. विद्यमान परिस्थितीत पर्यायी सरकार स्थापन न करता थेट निवडणुकांना सामोरे जाण्याची भाजपने जय्यत तयारी ठेवल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान,डॉ. प्रमोद सावंत यांनी आपण पाळी मतदारसंघातील धूळ प्रदूषण, बेकारी आदी प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पाळी मतदारसंघातील रस्त्यांचे रुंदीकरण ही सध्याची गरज असून खाण वाहतुकीवर नियंत्रण ठेवून या भागात होणाऱ्या धूळ प्रदूषणाबाबत ठोस उपाययोजना आखण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.समाज कार्याच्या निमित्ताने या मतदारसंघातील विविध भागात कार्य केल्याचे सांगून मतदारांनी दिलेल्या प्रतिसादावरून ही जागा भाजपला नक्कीच मिळेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
----
समाजकार्याची ओढ असलेला उमेदवार
प्रमोद पांडुरंग सावंत हे पेशाने डॉक्टर असून ते ३५ वर्षीय आहेत. पाळीचे जिल्हा पंचायत सदस्य पांडुरंग सावंत यांचे ते पुत्र आहेत. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून वैद्यकीय पदवी मिळाल्यानंतर आता ते पुणे येथे समाजकार्य पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. भामई-पाळी येथे साई क्लिनिक येथे ते आपला व्यवसाय करतात. साखळी व डिचोली येथे सरकारी इस्पितळात आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून ते सेवेत होते व ही नोकरी त्यांनी सप्टेंबर २००८ मध्ये सोडली. "साई लाइफ केअर' या बिगर सरकारी संस्थेचे अध्यक्ष असलेल्या डॉ.सावंत यांनी युवा,महिला यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले असून "एड्स' जागृती कार्यक्रमातही त्यांच्या संस्थेचे कार्य जोमाने सुरू आहे.धेंपो समूहाने पुरस्कृत केलेला मंथन प्रकल्प, ग्रामीण माहिती तंत्रज्ञान युवा विकास केंद्र, पाळणा घर आदी विविध प्रकल्प त्यांच्या विविध संस्थांमार्फत सुरू असून एक प्रामाणिक व सक्रिय समाज कार्यकर्ते म्हणून ते परिचित आहेत. नेहरू युवा केंद्राच्या विविध उपक्रमातही त्यांची संस्था सहभागी होत असून २००२ साली त्यांच्या संस्थेला राज्य युवा संस्था पुरस्कार तर १९९९ साली त्यांना वैयक्तिक राज्य युवा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. गेल्या १९९६ सालापासून भाजपचे एक सक्रिय कार्यकर्ते म्हणून ते वावरत आहेत. भाजप युवा मोर्चाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. पाळी मतदारसंघातील मतदारांना डॉ. सावंत यांच्या रूपाने एक युवा, तडफदार, हुशार व समाज कार्याची ओढ असलेला उमेदवार भाजपने दिला असून येथील जनता या उमेदवाराला पसंती देईल, यात तिळमात्र शंका नाही, अशी प्रतिक्रिया भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे.

No comments: