Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 23 March, 2008

कामत यांची "अग्निपरीक्षा'

उद्यापासून अर्थसंकल्पी अधिवेशन, विरोधक सज्ज
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर दोन वेळा झालेल्या विधानसभा अधिवेशनात बहुमत सिद्ध करतेवेळी अडचणीत सापडलेले दिगंबर कामत आता सोमवारी २४ पासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प कसा काय मंजूर करवून घेतात याकडे तमाम गोमंतकीयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विरोधकांनी सरकारला सर्व बाजूंनी घेरण्याची जय्यत तयारी केली आहे.
केवळ चार दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात मंगळवारी २५ रोजी अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. विरोधकांनी सरकारचे अपयश विधानसभेत मांडून मुख्यमंत्री कामत यांना कोंडीत पकडण्याची दमदार तयारी केली आहे. सभापती प्रतापसिंग राणे यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठरावाची नोटीस अद्याप स्वीकारली गेली नसल्यामुळे तोही नवा वादाचा मुद्दा बनण्याची शक्यता आहे.
सत्तेवर आल्यापासून अजूनही विधानसभेत बहुमत सिद्ध न केलेले मुख्यमंत्री कामत हे सभापती प्रतापसिंग राणे व राज्यपाल एस. सी. जमीर यांच्या वरदहस्तामुळे सत्तेवर टिकून असल्याचा आरोप विरोधी भाजपने केला आहे. गेल्या जून २००७ मध्ये सत्तेवर आलेल्या या सरकारला जुलै २००७ व जानेवारी २००८ मध्ये दोन वेळा विधानसभा अधिवेशनात अस्थिरतेचे ग्रहण लागले होते. विधानसभेचे कामकाज अर्ध्यावरच सोडून सभापती प्रतापसिंग राणे यांनी विधानसभाच संस्थगित करून कामत यांना उघडपणे अभय दिल्याचीही टीका सुरू आहे. सभापतींच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिल्यास घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होत असल्याची आवई तथाकथित तज्ज्ञ उठवत आहेत. राज्यपाल जमीर यांची भूमिकाही पूर्णपणे कॉंग्रेसप्रणीत असल्याने घटना व कायदा पूर्णपणे धाब्यावर बसवून सत्तेवर कसे राहता येते, याचे "आदर्श' उदाहरण गोव्यात पाहायला मिळते, अशी टीका विरोधी भाजपने केली आहे.
आघाडी अंतर्गत अजूनही धुसफूस सुरू असताना आता अर्थसंकल्पाची अग्निपरीक्षा मुख्यमंत्री कामत यांना द्यायची आहे. वित्त खाते त्यांच्याकडे नसल्याने दयानंद नार्वेकर हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पांडुरंग मडकईकर यांचे मंत्रिपद काढून कामत यांनी सुदिन ढवळीकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लावली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आघाडीच्या या गटाला खूष केले आहे. मात्र अजूनही काही मागण्या पूर्ततेच्या वाटेवर आहेत. ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात, त्यांची पत्नी जेनिफर व त्यांचा मुलगा अमित यांच्यासह पणजीचे महापौर टोनी रॉड्रिगीस यांच्यावर पोलिस स्थानकात झालेल्या हल्ल्याचे पडसाद अधिवेशनावर उमटणार आहेत.
पांडुरंग मडकईकर यांनी उद्यापर्यंत आपल्याला परत मंत्रिपदी बसवण्यासंदर्भात निर्णय न झाल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेशी ते कितपत बांधील राहतात त्याचा फैसला उद्या होईल. त्याचा थेट परिणाम विधानसभेत जाणवणार आहे. स्कार्लेट प्रकरणी गृहमंत्री व त्यांचे पुत्र यांच्याभोवती संशयाचे ढग निर्माण झाल्याने विरोधकांनी याबाबत आक्रमक व्यूहरचना आखली आहे. खुद्द सभापतींविरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्याने यावेळीही अधिवेशन गाजण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
दरम्यान,अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री कामत यांनी केंद्राकडून आर्थिक मदत मिळवून मंत्रिमंडळातील इतर सदस्यांना आपापल्या पदावर चिकटून राहण्याचे सूचित केले आहे. यावेळी सरकार अस्थिर करण्याची तीव्रता गेल्या वेळच्या पेक्षा कमी असली तरी आघाडी अंतर्गत वाढता असंतोष कधीही उफाळून येण्याची चिन्हे असल्याचे सूत्रांकडून कळते. सरकारातील एक गट नेतृत्व बदलासाठी इच्छुक असल्याने सध्याच्या स्थितीत स्वस्थ बसणे योग्य आहे की पुन्हा एकदा कामत यांना अंतर्गत राजकारणाचा बळी देण्याचा ते प्रयत्न करतील हे येत्या आठवड्यातच स्पष्ट होणार आहे.

No comments: