Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 27 March, 2008

आयडी इस्पितळ "बि'घडतंय!

---------------------------------------------
यायचं कसं बोला?
आयडी इस्पितळात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी जुनी इमारत पाडून नूतन इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. यामुळे सदर इस्पितळ मडकई येथील आरोग्य केंद्रात हलविले. पण, या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी वाहनांची मोठी अडचण जाणवते. परिणामी, रुग्ण मडकई येथे जाण्यापेक्षा बांबोळी येथेच जाणे पसंत करतात.
---------------------------------------------
प्रमोद ठाकूर
फोंडा, दि. २७: राज्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फोंडा शहरात सर्व सोयी आणि सुविधांनी सुसज्ज २२५ खाटांचे इस्पितळ बांधण्याचे काम युद्धपातळीवर आहे, ही एक चांगली बाब आहे. मात्र, नवीन इस्पितळ बांधण्यासाठी जुन्या आय. डी. इस्पितळाची इमारत मोडण्यापूर्वी येथील आरोग्य सेवेसाठी योग्य पर्यायी व्यवस्था करण्यात न आल्याने शहर आणि आसपासच्या भागातील सरकारी आरोग्य सेवेचा लाभ घेणाऱ्यांची आबाळ होत आहे. सध्या फोंड्याच्या पर्यायी इस्पितळात केवळ बाह्यरुग्ण सेवा उपलब्ध आहे.
आय. डी. इस्पितळातील यंत्रसामग्री मडकई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हालविण्यात आली असून तेथे पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. या मडकई आरोग्य केंद्रात जाण्यासाठी रुग्णांना भरपूर त्रास सहन करावे लागत आहेत. मडकईला जाण्यासाठी ठरावीक वेळीच बसगाड्या असतात. त्यामुळे मडकईला जाण्यापेक्षा रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक बांबोळी किंवा मडगाव येथील सरकारी इस्पितळात जाणे पसंत करतात. फोंड्यातील नवीन इस्पितळ एप्रिल - मे २००९ सालांत पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नवीन इस्पितळाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी एका वर्षापेक्षा जास्त काळ लागणार आहे. त्यामुळे फोंड्यात योग्य पर्यायी व्यवस्थेसाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे.
फोंडा येथे आय. डी. इस्पितळ कार्यरत असताना मोठ्या प्रमाणात रुग्ण इस्पितळात येत होते. त्यात गरोदर महिलांचा सुध्दा मोठ्या भरणा होता. या भागातील सर्वसामान्य लोक सरकारी आरोग्य सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत होते. आज येथील परिस्थितीत बदल झालेला आहे. फोंडा येथील सध्याची पर्यायी व्यवस्था तिस्क - फोंडा येथे आरोग्य विभागाच्या कार्यालयाच्या आवारात करण्यात आली आहे. ही जागा अपुरी आहे. याच जागेत रक्त तपासणी, औषध व इतर विभाग कार्यरत आहेत. याठिकाणी चोवीस तास वैद्यकीय अधिकारी कार्यरत असतो. आठवड्यातून दोन दिवस सर्जन या ठिकाणी रुग्णांची तपासणी करतात. शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना मडकई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात येते. फोंडा येथील प्रसूती विभाग मडकई येथे हालविण्यात आलेला आहे. त्यामुळे सरकारी सेवेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या गरोदर महिलांना बरेच त्रास सहन करावे लागत आहेत. येथील प्रसूती व स्त्री रोग तज्ज्ञांना मडकई येथे पाठविण्यात आले आहे. फोंडा येथे सध्या पाच खाटा आपत्कालीन सेवेसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. या भागात अपघात किंवा मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीवर केवळ प्रथमोपचार करून त्यांना पुढील सेवेसाठी बांबोळी येथील सरकारी इस्पितळात पाठविण्यात येते. याठिकाणी रुग्णांना दाखल करून घेण्यात येत नाही. केवळ बाह्यरुग्ण विभाग सेवा दिली जाते. या ठिकाणी पर्यायी आरोग्य सेवा उपलब्ध करताना खाटांची सोय करण्यात न आल्याने भाजपच्या फोंडा शाखेने येथील आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून खाटांची व्यवस्था करण्याची मागणी केली. त्यानंतर पाच खाटांची सोय करण्यात आली आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील लोक सरकारी वैद्यकीय सुविधेसाठी फोंड्यात येतात. मात्र, सध्या योग्य प्रकारे सेवा मिळत नसल्याने खासगी दवाखान्यात धाव घ्यावी लागत आहे. फोंडा येथे नवीन इस्पितळ सुरू होण्यासाठी आणखी एक वर्षापेक्षा जास्त काळ लागणार असल्याने फोंडा भागात पर्यायी आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करण्याची गरज आहे. तिस्क पिळ्ये येथील केंद्रीय इस्पितळ बंद आहे. त्याठिकाणी तात्पुरते इस्पितळ सुरू करण्यासाठी जागा व इतर सुविधा उपलब्ध आहेत. फोंड्यातील पर्यायी सुविधा मडकईला करण्यात आल्याने तेथे जाण्यासाठी वाहतूक समस्या मोठी असल्याने अनेक लोक त्याठिकाणी जात नाही. तिस्क पिळये येथे जाण्यासाठी भरपूर प्रवासी बसगाड्या उपलब्ध आहेत. त्यामुळे लोक त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा घेण्यासाठी जाऊ शकतात. तिस्क पिळये येथे पूर्वी इस्पितळ कार्यरत होते. त्यामुळे तेथे काही काळासाठी इस्पितळ सुरू करण्यात काहीच अडचणी येऊ शकत नाहीत. आरोग्य खात्याने या पर्यायावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. फोंडा शहर आणि आसपासच्या भागातील लोकांची वैद्यकीय सुविधेसाठी आबाळ होत असल्याने या भागातील मंत्री, आमदारांनी या पर्यायावर विचार करण्याची नितांत गरज आहे.

No comments: