Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 10 June, 2010

'खबऱ्या'चा खून झाल्याचे उघड

पणजी व पेडणे, दि. ९ (प्रतिनिधी): हरमल येथील परशुराम टेकडीवर जाणाऱ्या पायवाटेवर मृतावस्थेत सापडलेल्या त्या तरुणाची ओळख पटली असून शवचिकित्सा अहवालात त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पेडणे पोलिसांनी आज रात्री येथील तिघा स्थानिक व्यक्तींच्या विरोधात ३०२ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. प्रसिद्धी माध्यमांनी या प्रकरणाला वाचा फोडल्याने अखेर पेडणे पोलिसांना हा खुनाचा गुन्हा नोंद करण्यास भाग पाडले. मयत तरुणाचे नाव सनी ऊर्फ संदीप असे असून तो मूळ उत्तर प्रदेश येथे राहणारा असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणावरून आज सायंकाळी पोलिसांनी मंगेश खोर्जे (४९) या संशयिताला ताब्यात घेतले असून पोलिस अजून दोघांच्या शोधात आहेत. येत्या काही तासात अटक करण्यात येईल असा दावा पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी केला. मयत सनी याची मान मोडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. तसेच, त्याच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचेही आढळून आले आहे. सुरुवातीला पेडणे पोलिसांनी नैसर्गिक मृत्यू अशी नोंद केली होती.
मयत सनी हा मागच्या पर्यटक हंगामाच्या सुरुवातीपासून विदेशी नागरिकांच्या सोबत असायचा व कोळंब डोंगरमाथ्यावर एक सुप्रसिद्ध पुरातन वटवृक्षाचे झाड आहे, त्याठिकाणी तो काही विदेशी नागरिकांसोबत राहायचा. अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांना त्याठिकाणी नेऊन त्यांच्यासोबतच रानात राहत असे, अशी खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दि. ७ जून रोजी मंगेश खोर्जे याच्या गाड्यावर चोरी झाली होती. त्या चोरीचा संशय सनी याच्यावर व्यक्ती करून मंगेश याने त्याला जबर मारहाण केली होती. तसेच सनीनेच आपल्या गाड्यावर चोरी केली असल्याची माहिती त्याने लुडू नाईक याच्या मुलाला दिली होती. त्यानंतर त्याच्या मुलानेही त्याला मारहाण केली होती, अशी माहिती निरीक्षक राऊत देसाई यांनी दिली. सध्या संशयित गावातून गायब झाले असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, येथील काही स्थानिक नागरिकांनी आपली नावे प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर माहिती देताना सांगितले की, त्यानेे स्थानिक व्यापाऱ्यांना अनेक टोप्या घातल्या आहेत. उसने पैसे मागून पुढच्या वेळेला देतो असे सांगून फसवत होता. काही शॅक्स हॉटेल रेस्टॉरण्टमध्ये जाऊन जेवण जेवायचा, थोडे पैसे द्यायचा थोडे द्यायचा नाही व दुसऱ्या वेळेला त्या हॉटेलात यायचा नाही हा त्याचा नित्य दिनक्रम होता.
रात्री काही स्थानिक नागरिकांना पोलिस स्टेशनवर आणून या खुनाविषयी काही धागेदोरे मिळतात की काय याची चाचपणी केली जात होती. पेडणे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ताराम राऊत तपास करीत आहेत.
-------------------------------------------------------------
तो माझा खबऱ्या नव्हता...
सनी हा ड्रगमाफियांशी संबंधित होता तसेच तो ड्रगविषयी माहिती पोलिसांना पुरवत असे, त्यामुळे तो पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आजपर्यंत एकदाही त्याने पोलिसांना ड्रगविषयी माहिती पुरवली नाही, तो माझा खबऱ्या नव्हता, असा दावा निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी केला. उलट त्याने अनेक वेळा आपल्याकडून उसने पैसेही मागून नेल्याचे सांगितले.

No comments: