Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 18 March, 2010

कामत सरकार धोक्यात

'जी-७' गटाने नाड्या आवळल्या
मडगाव, दि. १७ (प्रतिनिधी): मुख्यमंत्री दिगंबर कामत सरकारच्या अकार्यक्षम आणि गचाळ नेतृत्वाबद्दल नाराज असलेल्या आणि कॉंग्रेसमधील सहकारी मंत्र्यांच्या दादागिरीने सहनशक्ती गमावून बसलेल्या "जी-७' गटाने आता अतिशय आक्रमक भूमिका घेतली असून सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा विचार या गटात बळावत चालल्याची स्पष्ट चिन्हे दिसून लागली आहेत. आज रात्री या गटाने विद्यमान सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे वृत्त राज्यात वाऱ्यासारखे पसरल्याने सर्वच भागांतून वृत्तपत्र कार्यालयांना दूरध्वनी येत होते. तथापि, अद्याप असे काही झालेले नसले तरी कोणत्याही क्षणी सरकार अल्पमतात येऊ शकते, असे राजकीय निरीक्षकांना वाटते आहे.
कॉंग्रेस व "जी ७' गटाकडील संबंध आता सुधारण्यापलीकडे पोहोचले असून आज सकाळी जेव्हा या गटाने मडगावात येऊन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची त्यांच्या मालभाट येथील निवासस्थानी भेट घेतली तेव्हा या बिघडलेल्या संबंधांची पुरेपूर प्रचिती आली. काल या गटाने पुण्यात जाऊन गोव्यातील एकूणच परिस्थितीबाबत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना इत्थंभूत माहिती दिली होती. तिथे शरद पवार यांनी "जी-७' गटाला जो संदेश दिला होता तो संदेश आज या गटाने मुख्यमंत्र्यांना पोहोचता केला.
नंतर या मंडळींनी पत्रकारांशी बोलण्याचे टाळले तर त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडलेले मुख्यमंत्रीही पत्रकारांना टाळून लगेचच निघून गेले. मात्र, मुख्यमंत्री व "जी - ७'मधील सर्वांचे दुर्मुखलेले चेहरे "ऑल इज वेल' नसल्याचेच दर्शवत होते.
मुख्यमंत्र्यांच्या निवासातून सर्वांत अगोदर बाहेर आलेले पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी सवयीनुसार उलट पत्रकारांनाच तुम्ही कशासाठी इथे जमला आहात, असा सवाल केला तर त्यांच्या पाठोपाठ बाहेर आलेले सुदिन ढवळीकर व बाबूश मोन्सेरात यांनी आपण कामत यांची भेट घेऊन पवारांनी दिलेला संदेश त्यांच्याकडे पोहोचता केल्याचे सांगितले. तो संदेश काय होता, युती तोडणार का, सरकारचा पाठिंबा काढून घेणार का, या प्रश्र्नांना उत्तरे देण्याचे त्यांनी टाळले. सर्वांत शेवटी बाहेर आले ते आरोग्यमंत्री विश्वजित राणे. त्यांनी यावेळी, आम्ही सातही जण संघटित असून जो काही निर्णय घ्यायचा असेल तो एकमतानेच घेऊ , हे रोजचेच वाक्य पत्रकारांसमोर फेकले. नंतर ही सर्व मंडळी तीन गाड्यांत बसून निघून गेली.
तथापि, मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसशी असलेल्या युतीबाबत काढलेल्या अपशब्दांची गंभीर दखल राष्ट्रवादीच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतली असून त्याबाबत आजच्या भेटीत मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सदर उद्गारांबाबत चर्चिल यांनी जाहीर माफी मागावी किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून वगळावे, असा निर्वाणीचा इशारा "जी -७' गटाकडून मुख्यमंत्र्यांना दिला गेला आहे. या मुदतीत मुख्यमंत्र्यांकडून योग्य ती पावले उचलली गेली नाहीत तर पुढील कृती करण्यास "जी -७' मोकळा असेल व त्यासाठी शरद पवार यांनी या गटाला मोकळीक दिली आहे.
आलेमाव बंधूंनी काल कुंकळ्ळी व नावेली येथील दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांत राष्ट्रवादीचा उल्लेख करून मध्यावधी निवडणुकांबाबत जी निवेदने केली आहेत त्याला प्रत्युत्तर देताना आपली केव्हाही लोकांसमोर जाण्याची तयारी आहे, असे या गटाने स्पष्ट केल्याचे कळते.
आज सकाळी ९ वा. मुख्यमंत्र्यांबरोबर या गटाची भेट ठरली होती. पण त्यापूर्वीच हा गट घोळक्याने मालभाटात दाखल झाला. ढवळीकर बंधू व त्यापाठोपाठ मिकी पाशेको, त्यानंतर जुझे फिलिप व नीळकंठ हळर्णकर व सर्वांत शेवटी बाबूश मोन्सेरात व विश्वजित राणे आले. त्यांची मुख्यमंत्र्यांशी खलबते साधारण अर्धा तास चालली. खाली प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी व पोलिसांनी गर्दी केली होती. बाहेर येताना मिकी पाशेको सर्वप्रथम तर सर्वांत शेवटी विश्वजित राणे आले. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री आले व कोणाशीही न बोलता गाडीत बसून निघून गेले. त्यावेळी पत्रकार सुदिन ढवळीकर व विश्वजित राणे यांच्याशी बोलण्यात गुंग असल्याने मुख्यमंत्र्यांकडे कोणाचेच लक्ष गेले नाही.
नंतर "जी - ७' गटही एकत्रितपणे निघून गेला. पण त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, मडगावलगत असलेल्या एका हॉटेलात बसून त्या सर्वांनी चहा घेतला व आपला पुढील पवित्रा पक्का केला. दरम्यान, मिळत असलेल्या संकेतानुसार सोमवारी सुरू होत असलेल्या विधानसभा अधिवेशनापूर्वी राज्यात महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी अपेक्षित आहेत.

No comments: