Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 27 November, 2009

कसाबला फासावर चढवा, निषेध सभेत भाजयुमोची मागणी

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): भारताच्या आर्थिक राजधानीवर हल्ला करून शेकडो लोकांचे प्राण घेणारा दहशतवादी अजमल कसाब याला ताबडतोब फाशीवर लटकवण्याची मागणी करून कसाबच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. मुंबईवर झालेला २६/११ दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाल्याने आज निषेध दिन म्हणून पाळण्यात आला. यावेळी युवा मोर्चाचे नवनियुक्त अध्यक्ष रुपेश महात्मे बोलताना म्हणाले की, देशावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कुरवाळत बसण्याचे सोडून कॉंग्रेस सरकारने त्यांना फासावर लटकवावे.
पक्ष कार्यालयासमोर झालेल्या या निषेध सभेत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय हरमलकर म्हणाले, भारताच्या संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरु याला फाशीची शिक्षा होऊनही कॉंग्रेस सरकार त्याची सेवा करण्यात मश्गूल आहे. बॉंम्ब स्फोट प्रकरणात नाहक गुंतवलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांची कोठडीत हाल सुरू केले आहेत तर, दहशतवादी कसाब याच्यावर एका वर्षात ३१ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या हिंदुस्थानात हिंदू सुरक्षित नाही. याला कॉंग्रेस सरकार कारणीभूत असल्याचे ते म्हणाले. जोपर्यंत या देशात कॉंग्रेस सरकार सत्तेवर असणार तोपर्यंत दहशतवादी हल्ले करीत राहणार, असेही ते म्हणाले.
भारताने कोटी रुपये खर्च करून एक दहशतवादी पाळून ठेवला आहे. त्याच्या विरोधात या देशातील तरुण पेटून उठला पाहिजे, असे आवाहन यावेळी डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. भारतावर सर्वांत मोठा झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दिवस हा सर्वत्र काळा दिन आणि निषेध दिवस म्हणून पाळला जात असल्याने गोव्याचे मुख्यमंत्री मात्र आपला सत्कार करून घेण्यात गर्क असल्याची टीका यावेळी श्री. सावंत यांनी केली.
यावेळी "कसाबला फांसी दो फांसी दो' अशा घोषणांनी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आसमंत दणाणून सोडले. सभेनंतर रस्त्यावर कसाबच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस पहारा ठेवण्यात आला होता.

No comments: