Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 23 November 2009

"इफ्फी'चा चंदेरी पडदा आज उघडणार..

तारेतारकांचे आगमन, आयोजकांची लगीनघाई, पणजी नगरी साज लेवून सज्ज

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) - मस्त गुलाबी थंडी, मांडवीचा मोहरलेला तीर, तारेतारकांचे आगमन, झगमगलेली पणजी नगरी, आकर्षक विद्युत रोषणाई, आयोजकांची व प्रतिनिधींची लगीनघाई आणि पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले गोवेकर अशा भारलेल्या वातावरणात उद्या सोमवारी कला अकादमीच्या भव्य वास्तूत "इफ्फी'चा "चंदेरी' पडदा दिमाखात उघडणार आहे.
चीनमध्ये किन आणि झाओ यांच्यातील रक्तरंजित संघर्षावर आधारीत "व्हिट" या चित्रपटाच्या सादरीकरणाने "४० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' "इफ्फी-०९' चा शुभारंभ होईल. संध्याकाळी ५.३० वाजता कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात हा उद्घाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्याला सदाबहार अभिनेत्री वहिदा रेहमान प्रमुख पाहुण्या या नात्याने उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री दिगंबर कामत, राज्यपाल डॉ.एस.एस.सिद्धू, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अंबीका सोनी, केंद्रीय चित्रपट संचालनालयाचे संचालक एस. एम. खान हे मान्यवरही उपस्थित असतील.
या महोत्सवासाठी पणजी शहर नववधूसारखे नटले आहे. गोव्यातील हा सहावा महोत्सव होय. "इफ्फी'साठी कला अकादमी, आयनॉक्स व मॅकनिज पॅलेसचा परिसर झगमगून गेला आहे. या महोत्सवाला "चार चॉंद' लावण्यासाठी येणाऱ्या अतिमहनीय व्यक्तींना आणि सिनेतारकांची ने-आण करण्याकरिता आलिशान वाहनांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
दरम्यान, आज सायंकाळी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी हवेत फुगे सोडून हॉटेल फिदाल्गोच्या समोर इफ्फी बाजार महोत्सवाचे थाटत शुभारंभ केला. यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, अभिनेते आणि इफ्फीचे सूत्रसंचालक कबीर बेदी, दिव्या दत्त उपस्थित होत्या. या शुभारंभानंतर पणजी शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या "१८ जून' रस्त्यावरून एक फेरफटकाही या महनीय व्यक्तींनी मारला. पहिल्यांदाच हा महोत्सव व्यापाराशी जोडण्यात आला असून सुमारे ६४ व्यापाऱ्यांनी खरेदीवर ५ ते ५० टक्के सूट घोषित केली आहे. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या व्यक्तींना कुपन्स देण्यात येणार असून त्याद्वारे ही सूट ते घेऊ शकतात. त्यामुळे १८ जून रस्त्यावरील सर्व दुकाने आकर्षकरीत्या सजवण्यात आली आहेत. त्यामुळे प्रामुख्याने पर्यटकांसाठी ती अनोखे आकर्षण ठरली आहेत.
देशाच्या विविध राज्यांबरोबरच विदेशी प्रतिनिधींचे आगमनही राजधानीत होऊ लागले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महोत्सवाची वातावरणनिर्मिती झाली आहे. मांडवी नदीचा काठ या प्रतिनिधींचे स्वागत करण्यासाठी यजमानासारखा नटला आहे. महावीर बाल उद्यानात रंगीबेरंगी आणि तेवढीच मनोहारी सजावट करण्यात आली आहे. ती येणाऱ्याजाणाऱ्यांचे लक्ष वेधत आहे.
महोत्सवासाठी येणाऱ्या कलाकारांत आशा पारेख, सुनील शेट्टी, समीरा रेड्डी, स्वामी चटर्जी, शर्मिला टागोर, फरिदा जलाल, प्रेम चोप्रा अशा दिग्गजांचा समावेश आहे. याशिवाय अन्य मातब्बर कलाकारांची उपस्थितीही असेल असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
कडेकोट सुरक्षा
महोत्सवानिमित्ताने सुरक्षेचे कडेकोट उपाय करण्यात आले आहे. महोत्सव परिसरात ठिकठिकाणी "क्लोज्ड सर्किट कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याखेरीज केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या तीन कंपन्या खास "इफ्फी' साठी तैनात करण्यात आल्या आहेत. जोडीला गोवा पोलिस खात्याच्या "आयआरबी'ची तुकड्या, साध्या वेशातील आयआरबीच्या महिला पोलिस आणि आयनॉक्सच्या प्रत्येक द्वारावर पोलिस तथा सुरक्षा रक्षक डोळ्यांत तेल घालून पहारा करत आहेत.
नाना-पर्रीकर गळाभेट
"इफ्फी' बाजार महोत्सवाच्या शुभारंभावेळी नाना पाटेकर हे सर्वांचे आकर्षणाचे केंद्र बनले होते. आपल्या मोबाईलवर त्यांची एक झलक टिपण्यासाठी अनेकांनी आपले मोबाईल उंचावून धरले होते. मुख्यमंत्र्याबरोबर हवेत फुगे सोडल्यावर विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांना पाहताच एखादा दुरावलेला मित्र अनेक वर्षांनी भेटावा अशा आवेशात नानाने पर्रीकराना मिठी मारून आपला आनंद व्यक्त केला!

No comments: