Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 27 November, 2009

हेरॉईनसह २१ लाखांचा माल कळंगुट येथे जप्त

पोलिसांचा छापा, एका संशयिताला अटक
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): कळंगुट खोबरावाडो येथे काल रात्री ९.३० च्या सुमारास कळंगुट पोलिसांनी दिलीप सीमेपुरुषकर या संशयिताच्या घरावर छापा टाकून १८ ग्रॅम हेरॉईन (किंमत २१ हजार ६००रु.), १२ ग्रॅम चरस (किंमत ७ हजार ५३०रु), १८५ ग्रॅम सोने, २० लाख ५ हजार ३०० रुपये व ८० हजार रुपयाचे विदेशी चलन असा सुमारे २१ लाखांचा माल जप्त केला. सीमेपुरुषकर हा अमली पदार्थांच्या व्यवहारांत असल्याच्या संशयावरून हा छापा टाकण्यात आल्याची माहिती आज पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून सीमेपुरुषकर हा अमली पदार्थ तस्करीच्या व्यवहारांत गुंतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दोन वर्षांपूर्वी एका प्रकरणात त्याला अटकही झाली होती. सध्या पर्यटन मौसम सुरू झाल्याने आणि अमली पदार्थांची "मागणी' वाढल्याने या भागात अशा पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर कळंगुटचे निरीक्षक नॉलास्को रापोझ यांनी आपल्या पोलिस फौजफाट्यासह हा छापा टाकला.
संशयिताच्या घरात एवढी मोठी रक्कम आणि अमली पदार्थ सापडल्याने त्याला अटक करून चौकशी सुरू झाली आहे. तसेच एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. ही रक्कम कुठून आली, याचे स्पष्टीकरणही त्याला देता आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे अमली पदार्थांच्या विक्रीचे हे पैसे असावेत, असा दावा पोलिसांनी केला आहे.
या छाप्यात पोलिसांना सोन्याच्या पाच बांगड्या, १ मंगळसूत्र व कर्णफुलांची एक जोडी सापडली आहे. निरीक्षक रापोझ यांनी टाकलेल्या या छाप्यात पोलिस हवालदार गौरीश परब, पोलिस शिपाई सुभाष मालवणकर, लुईस परेरा व राजू शिरोडकर यांच्या समावेश होता. पुढील तपास निरीक्षक रापोझ करीत आहेत.
-----------------------------------------------------------------
अमली पदार्थाची तस्करी आणि विक्री करणाऱ्यावर लक्ष ठेवून कारवाई करण्यासाठी खास स्थापलेल्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या डोळ्यांदेखत अमली पदार्थाची विक्री आणि तस्करी सुरू असल्याने अखेर कळंगुट पोलिसांनी छापा टाकून या भागात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थाची विक्री होत असल्याचे उघड केले आहे. पर्यटन हंगाम सुरू झालेला असून या पथकातील पोलिसांना मात्र "इफ्फी'च्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे.

No comments: