Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 15 August, 2009

मांगिरीष मंदिरातून मूर्तीची चोरी


कुठ्ठाळी परिसरात तीव्र संताप

सोन्यांच्या ऐवजासह लाखाची लूट



वास्को, दि. १४ (प्रतिनिधी)- राज्यात मूर्तिभंजन प्रकरणांची संख्या वाढत असतानाच आता थेट मूर्ती चोरून नेण्याची घटना घडली आहे. व्होळांत, कुठ्ठाळी येथील श्री मांगिरीष मंदिरातून अज्ञातांनी देवाची (पालखीतील) मूर्ती व सोन्याचे ऐवज मिळून सुमारे एका लाखाची मालमत्ता लंपास केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री सदर घटना घडली. व्होळांत, कुठ्ठाळी येथे असलेल्या मांगिरीष कुशस्थ ग्रामस्थ संस्थान मंदिराच्या बाजूच्या दरवाजाचे कुलूप अज्ञातांनी तोडून आत असलेली श्री देव मांगिरीषाची पालखीत घालण्यात येणारी चांदीची मूर्ती तसेच मंदिरामध्ये ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या ऐवजासह पोबारा केला.
यात कर्णफुले, सोनसाखळी आदींचा समावेश आहे. आज सकाळी सदर घटनेची माहिती येथील ग्रामस्थांना मिळताच येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. देवस्थानचे खजिनदार दिलीप बांदोडकर यांनी मंदिरामध्ये झालेल्या चोरीबाबत वेर्णा पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन श्वानपथक व ठसेतज्ज्ञांच्या मदतीने पंचनामा केला.
अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाख पाच हजार आठशे रुपयांची मालमत्ता या मंदिरातून लंपास केल्याची माहिती वेर्णा पोलिसांनी दिली. चोरट्यांबाबत अद्याप कोणतीच माहिती उपलब्ध झालेली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. मुरगाव तालुक्यातील वास्को व आसपासच्या परिसरात गेल्या काही काळापासून चोरीच्या प्रकारांमध्ये वाढ होत असतानाच आता वेर्णा भागातही यात प्रगती होत असल्याचे दिसून येत आहे. या महिन्यातील हे तिसरे चोरीचे प्रकरण येथे नोंद करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी येथील पोलिसांकडून कडक गस्त घालण्यात येत असताना सुद्धा भर रस्त्यांवरील ठिकाणी चोऱ्या कशा प्रकारे होत आहेत, असा प्रश्न उपस्थित होते आहे. मुरगाव तालुक्यातील जनतेमध्ये सध्या असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रसन्ना भगत पुढील तपास करीत आहेत.

No comments: