Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 18 August, 2009

फेरसर्वेक्षणावरून आज धारगळात तणाव शक्य

क्रीडामंत्र्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल - दयानंद सोपटे

पेडणे, दि. १७ (प्रतिनिधी) - धारगळ येथील नियोजित क्रीडानगरीबाबत क्रीडामंत्री बाबू आजगांवकर यांच्याकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नियोजित क्रीडानगरीतील सुके-कुळण येथील शेतजमीन या प्रकल्पातून वगळल्याची क्रीडामंत्र्यांची घोषणा हा निव्वळ फार्स आहे, अशीही टीका यावेळी करण्यात आली. या प्रकल्पातून नेमका कोणता सर्वे क्रमांक वगळला व त्याचबरोबर नियोजित क्रीडानगरीतील कोणता प्रकल्प गाळला हे त्यांनी उघड करावे, असे आव्हान पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी दिले.
दरम्यान, उद्या १८ रोजी क्रीडा खात्यातर्फे पुन्हा जागेचे फेरसर्वेक्षण करण्याचे ठरले होते. या फेरसर्वेक्षणाला शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे व हे सर्वेक्षण चतुर्थीनंतर करण्यात यावे, असे लेखी निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. सध्या सगळे शेतकरी चतुर्थीच्या तयारीत व्यस्त आहेत, त्यामुळे हे फेरसर्वेक्षण नंतरच घेणे सोयीचे ठरेल, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. सरकारने मात्र हे फेरसर्वेक्षण पुढे नेण्याची भूमिका घेतली आहे. याप्रकरणी प्राप्त झालेल्या अधिक माहितीनुसार या फेरसर्वेक्षणासाठी पोलिसांनी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्याची माहिती मिळाली आहे. फेरसर्वेक्षणावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठीच ही काळजी घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. या नादात पोलिसांनी काही मृत शेतकऱ्यांनाही नोटिसा पाठवल्याची माहिती मिळाली आहे. शेतकऱ्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी ही शक्कल लढवण्यात आल्याचे काही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. यावेळी काही शेतकऱ्यांनी इथे फेरसर्वेक्षण सुरू झाल्यास निदर्शने करण्याची घोषणा केली. क्रीडानगरी जमीन बचाव समितीचे निलेश पटेकर यांनी ही माहिती दिली.या फेरसर्वेक्षणावेळी आमदार दयानंद सोपटे, लक्ष्मीकांत पार्सेकर, आमदार दिलीप परूळेकर तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनाही आमंत्रण देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
नियोजन आयोगापर्यंत शेतकऱ्यांची हाक
दरम्यान, धारगळ येथील क्रीडानगरीमुळे आपली शेतजमीन गमावण्याची चिंता लागलेल्या शेतकऱ्यांनी थेट नियोजन आयोगापर्यंत आपली हाक पोहचवली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नियोजन आयोगाचे सदस्य नरेंद्र जाधव यांच्याकडे या शेतकऱ्यांनी आपले म्हणणे मांडले होते. त्यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती देणारी कागदपत्रेही सोपवली आहेत,अशी माहितीही यावेळी श्री.परब यांनी दिली.
पंतप्रधान व सोनिया गांधीच्या भेटीसाठी झोळी फिरवणार
शेतजमिनीवर बुलडोझर फिरवून क्रीडानगरीच्या नावाखाली पंचतारांकित प्रकल्प उभारण्याचा हा डाव अजिबात साध्य होऊ देणार नाही. शेतकऱ्यांचा क्रीडानगरीला अजिबात विरोध नाही व या भागात खडकाळ जमीन असलेली जागा भरपूर आहे तिथे हा प्रकल्प अवश्य उभारावा.पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणांत देशात पुन्हा एकदा हरित क्रांती व्हावी,असे मत व्यक्त करून या शेतकऱ्यांना बळच दिले आहे.डॉ.मनमोहनसिंग यांनी केलेल्या या वक्तव्यात त्यांचा दूरदृष्टीपणा स्पष्टपणे दिसतो.इथे मात्र त्याच कॉंग्रेसच्या सरकारकडून शेतकऱ्यांचा गळा आवळण्याचे कृत्य सुरू आहे.आता या शेतकऱ्यांनी थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग व कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्याचे ठरवले आहे. येत्या गणेशोत्सव काळात त्यासाठी पेडण्यात झोळी फिरवून मदत गोळा केली जाईल, अशी माहितीही श्री.परब यांनी यावेळी दिली.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys