Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 20 August, 2009

पेडण्यातील भूमिपुत्रांना पोलिसांकडून धमक्या

आंदोलन चिरडण्याचा सरकारी खाक्या; शेतकरी खवळले

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)- धारगळ येथील नियोजित क्रीडानगरीतून आपली शेतजमीन वगळावी यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या शेतकऱ्यांना आता पोलिसांकरवी धमकावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. आपल्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसी हिसका दाखवून त्यांचे आंदोलन दडपणे हा निंदनीय प्रकार असून त्यास सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा पेडण्याच्या शेतकऱ्यांनी दिला आहे.
पेडण्याचे पोलिस स्थानकाचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्याकरवी या आंदोलनाच्या पुढाऱ्यांना फौजदारी गुन्ह्याच्या कलम १४९ अंतर्गत नोटिसा पाठवून फेरसर्वेक्षणावेळी हजर राहण्यापासून परावृत्त करण्याच्या प्रकाराचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.
धारगळ येथील नियोजित क्रीडानगरीच्या जागेचे फेरसर्वेक्षण काल १८ रोजी हाती घेण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच जाहीर केला होता. या फेरसर्वेक्षणाला तेथील शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला होता. सध्या चतुर्थीचा सण तोंडावर आल्याने शेतकरी शेतीकामात व्यस्त आहेत. त्यामुळे हे फेरसर्वेक्षण पुढे ढकलण्याचे रीतसर निवेदनही त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केले होते. असे असूनही सरकारने जाणीवपूर्वक फेरसर्वेक्षण पार पाडले. मुख्य म्हणजे या फेरसर्वेक्षणापूर्वी पोलिस निरीक्षक राऊत देसाई यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या काही पुढाऱ्यांना फौजदारी गुन्ह्या अंतर्गत नोटिसा पाठवण्याची कृती केली. क्रीडानगरीला विरोध करून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न झाल्यास दखलपात्र गुन्हा दाखल करू असा इशाराच या नोटिसांद्वारे देण्यात आला आहे. क्रीडानगरीला विरोध करून याठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास कायदेशीर कारवाई करू, असे या नोटिसांत बजावण्यात आले आहे. मुळात एकीकडे शेतकऱ्यांना फेरसर्वेक्षणासाठी बोलावणे व दुसरीकडे पोलिसांकरवी नोटिसा पाठवून तेथे येण्यास परावृत्त करणे ही कृती हास्यास्पद आहे.
क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांच्याकडून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प उभारण्याची भाषा केली जात असली तरी आता त्यांनी थेट पोलिसांमार्फत शेतकऱ्यांचा आवाजच बंद करण्याचा प्रयत्न चालवला आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. फेरसर्वेक्षणासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या तोंडाला कुलूप लावून तेथील अधिकारी काय करतात ते मुकाट्याने बघत राहावे, अशी अपेक्षा जर क्रीडामंत्री करत असल्यास ते चुकत आहेत. क्रीडानगरीला कोणाचाही विरोध नाही, याचे स्मरण करून देताना बाबू आजगावकर आपल्या हट्टापायी शेतकऱ्यांची छळणूक करत असतील तर ते प्रयत्न हाणून पाडण्यास आम्ही समर्थ आहोत, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना डिवचू नका
क्रीडानगरीच्या नियोजित जागेतून आपली शेतजमीन वगळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न झाल्यास ते सरकारला महागात पडेल,असा इशारा येथील शेतकरी श्रीपाद परब यांनी दिला. पोलिसांनी सरसकट शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटिसा हा घृणास्पद प्रकार असल्याचे ते म्हणाले. विर्नोडा येथील शेतकरी प्रतिष्ठित नागरिक असून त्यांचा कसल्याही गुन्हेगारी प्रकरणांत सहभाग नाही. असे असताना त्यांना अशा प्रकारच्या नोटिसा पाठवून गुन्हेगारांप्रमाणे वागवण्याची कृती निंदनीय असल्याचे ते म्हणाले. श्रीपाद परब यांचे आजोबा अर्जुन परब हे स्वातंत्रसैनिक होते; पण त्यांनी स्वतंत्रसैनिकांसाठी असलेल्या योजनांची किंवा मदतीची कधी अपेक्षा केली नाही. त्यांचे वडील सोनू अर्जुन परब हे सतत सतरा वर्षे विर्नोड्याचे सरपंच होते. खुद्द श्रीपाद परब हे गेली अठरा वर्षे सहकार चळवळ तथा सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. आणखी एक शेतकरी दुर्गादास परब एलआयसीमध्ये अधिकारपदावर आहेत. गिर्यारोहक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. गुणाजी परब हे माजी पोलिस अधिकारी आहेत. अशा काही लोकांना नोटिसा पाठवून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न झाल्यास कारवाई करण्याची धमकी सरकारकडून दिली जाणे हे लज्जास्पद आहे. अस्सल गुन्हेगारांनाही अशी वागणूक मिळत नाही, असेही श्री.परब म्हणाले.एवढेच नाही तर काही शेतकरी मृत झाले आहेत व ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीच कोणता गुन्हा केला नाही त्यांनाही सरसकट नोटिसा पाठवून पोलिसांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत, असे झणझणीत कोरडे सरकारवर ओढण्यात आले.
पोलिस निरीक्षकांवर तातडीने
कारवाई कराः आमदार सोपटे
धारगळ येथील नियोजित क्रीडानगरीला कोणाचाच विरोध नाही. तेथील शेतकरी आपली शेतजमीन व बागायती त्यातून वगळण्याची मागणी करीत आहेत. या शेतकऱ्यांना पोलिसांमार्फत नोटिसा पाठवून त्यांचा आवाज बंद करण्याची कृती निषेधार्ह आहे. या नोटिसा पाठवलेले निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी घटनास्थळी काही गडबड केली असती तर हे उचित म्हणता आले असते. मात्र लोकशाही पद्धतीने लढा देणाऱ्या या शेतकऱ्यांना पोलिसी हिसका दाखवण्याचा हा प्रकार नेमका कुणाच्या इशाऱ्यावरून सुरू आहे हे उघड झालेच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडून एकीकडे शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची भाषा केली जाते तर दुसरीकडे क्रीडामंत्र्यांकडून पोलिसांकरवी शेतकऱ्यांना धमकावण्याची कृती केली जाते हे दुर्दैवी असून आपण त्याचा निषेध करीत असल्याचे श्री. सोपटे म्हणाले.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys