Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 18 August, 2009

भारतावर पुन्हा हल्ल्याची शक्यता - पंतप्रधान

नवी दिल्ली, दि. १७ - भारतात नव्याने अतिरेकी हल्ला करण्याची योजना दहशतवादी गट आखत आहेत तसेच यावर्षी घुसखोरीच्या घटनांमध्ये झालेली वाढ हाही चिंतेचा विषय आहे, असे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आज येथे सांगितले.
देशांतर्गत सुरक्षेसंदर्भात येथे आमंत्रित केलेल्या विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत पंतप्रधान बोलत होते. आतापर्यंत जम्मू-काश्मीरपर्यंत घुसखोरीची मर्यादा होती, परंतु घुसखोरांनी आता संपूर्ण देशात सर्वत्र पाय पसरलेले आहेत, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
भारतात नव्याने अतिरेकी हल्ले घडवून आणण्याच्या योजना पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना आखत असल्याची आमची खात्रीलायक माहिती आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या परिषदेला केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरमही उपस्थित होते. जम्मू-काश्मीरमधील सोपियान, सोपोर व बारामुल्ला येथील घटनांचा फायदा उचलत अतिरेकी भारतद्वेष पसरविण्याची संधी शोधत असतात. यासर्व बाबींकडे बघता असे दिसून येते की गोंधळाची स्थिती सदैव कशी कायम राहील हेच अतिरेकी बघत असतात. सुदैवाने यंदाची अमरनाथ यात्रा कोणतीही अनुचित घटना न घडता पार पडली. याचे श्रेय जम्मू-काश्मीरमधील धर्मनिरपेक्षतेला देता येईल. गेल्या काही वर्षांपासून जम्मू-काश्मीरमधील स्थितीत सुधारणा दिसून येत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला आता अधिक अत्याधुनिक बनावे लागेल तसेच आपल्या क्षमताही वाढवाव्या लागतील, अशी अपेक्षा व्यक्त करून पंतप्रधान मनमोहनसिंग पुढे म्हणाले, मागील वर्षी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता आपल्याला सदैव सावध राहावे लागेल. आपल्या समुद्र किनाऱ्यांचे संरक्षणही आपल्याला अधिक मजबुतीने करावे लागेल. देशभरातील दहशतवादाशी संबंधित घटनांचा मुकाबला करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नव्या राष्ट्रीय चौकशी संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेेेेेळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले. मुंबई, चेन्नई, हैद्राबाद व कोलकाता येथे राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (एनएसजी)ची चार केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
नक्षलग्रस्त राज्यांची वेगळी बैठक
नक्षलवादाने सर्वाधिक ग्रस्त सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक वेेेेगळी बैठक घेऊन त्यांच्याशी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम चर्चा करणार आहेत. या सात राज्यांत झारखंड, छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व प. बंगाल यांचा समावेश आहे. या राज्यांतच नक्षल्यांनी मागील एक वर्षात सुरक्षा जवानांना तसेच राज्य पोलिसांना मोठ्या प्रमाणावर आपले लक्ष्य बनविलेले आहे. या बैठकीत देशाच्या समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या भागाची सुरक्षा व्यवस्था कडक करणे, तेथे पोलिस चौक्या उभारणे व त्यांची संख्या वाढविले याबाबींवर जोर देण्यात येणार आहे.
०००००००००
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची धमकी
केंद्राच्या प्रतिक्रियेला फार उशीर
भाजपाचा आरोप
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १७ ऑगस्ट
पाकिस्तानमधील दहशतवादी गट भारताला ज्या धमक्या देत आहे, त्यावर केंद्र सरकारने फार उशिरा प्रतिक्रिया दिली, असा आरोप भाजपाने आज केला आहे. आपल्या भूमीवरून भारतविरोधात कारवाया करणाऱ्या व दहशतवादी शिबिरे चालविणाऱ्या दहशतवादी संघटना व त्यांच्या नेत्यांविरोधात आपण कारवाई करू तसेच त्यांची प्रशिक्षण शिबिरे नष्ट करू, असे आश्वासन पाकिस्तानने दिलेले आहे. या आश्वासनांची जोपर्यंत पूर्ती होत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा करू नये, असे भाजपाने म्हटले आहे.
ज्याकाही घडामोडी होतात त्यावर सरकार नेहमीच फार उशिरा प्रतिक्रिया व्यक्त करीत असते. भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या आमच्या देशातील दहशतवादी संघटनांची प्रशिक्षण शिबिरे आम्ही नष्ट करू, असे आश्वासन पाकिस्तानने जानेवारी २००४ मध्ये दिले होते, याकडे लक्ष वेधून जोपर्यंत पाकिस्तान या वचनांची पूर्तता करीत नाही तोपर्यंत त्याच्याशी चर्चा करू नये, असे भाजपाध्यक्ष राजनाथसिंग यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. पाकिस्तानमधील दहशतवादी गट भारतावर पुन्हा हल्ला करण्याची योजना आखत आहेत, या पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या आजच्या वक्तव्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता राजनाथसिंग बोलत होते.
भारताला लक्ष्य करून अतिरेकी कारवाया करणाऱ्या दहशतवादी गटांविरुध्द पाकिस्तान जोपर्यंत ठोस भूमिका घेऊन कारवाई करत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारची बोलणी करू नये, असे राजनाथसिंग म्हणाले. पाकिस्तानशी आम्हालाही चांगले संबंध हवे आहेत. इजिप्तमध्ये पाकिस्तानबरोबर संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी केल्याबद्दलही राजनाथसिंग यांनी संपुआ सरकारवर टीका केली. आपण जे काय मिळविले होते ते सर्व यामुळे गमावले, अशी प्रतिक्रिया भाजपाध्यक्षांनी व्यक्त केली.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys