Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 24 January, 2008

चर्चिल, रेजिनाल्ड कॉंग्रेसमध्ये

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी)ः कॉंग्रेसपासून गोवा वाचवण्यासाठी स्थापन केलेला "सेव्ह गोवा फ्रंट" हा पक्ष आज चर्चिल आलेमाव यांनी अखेर कॉंग्रेसमध्येच विलीन करून टाकला.
आज सकाळी कॉंग्रेस भवनमध्ये आयोजित केलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात "सेव्ह गोवा'चे आमदार चर्चिल आलेमाव व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी कॉंग्रेस सदस्यत्वाचे अर्ज भरून प्रदेशाध्यक्ष फ्रान्सिस सार्दिन यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत, वित्तमंत्री दयानंद नार्वेकर, नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव, उपसभापती माविन गुदिन्हो आदी नेते उपस्थित होते.
चर्चिल व आलेक्स यांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे पक्षाची आमदारसंख्या १८ वर पोहोचली आहे. हे सरकार आता अधिक बळकट बनले असून पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेससाठी झोकून द्यावे,असे आवाहन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केले.चर्चिल यांच्यासारखा लोकनेता कॉंग्रेसमध्ये परत आल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. कॉंग्रेसपासून फारकत घेऊन कॉंग्रेसशी दोन हात करून आपली क्षमता सिद्ध केलेल्या या बलाढ्य नेत्याचे पक्षात स्वागतच आहे, असे वित्तमंत्री नार्वेकर म्हणाले. चर्चिल कॉंग्रेसमध्ये आल्याने पुढील निवडणुकीत किमान २५ जागा कॉंग्रेस स्वबळावर जिंकेल,असा आत्मविश्वास सार्दिन यांनी व्यक्त केला. कॉंग्रेस पक्षासाठी कार्य करूनच आपली राजकीय कारकीर्द तयार झाली,आता त्याच पक्षात पुन्हा प्रवेश करताना समाधान वाटत असल्याचे आलेक्स रेजिनाल्ड म्हणाले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत सेव्ह गोवाच्या व्यासपीठावरून कॉंग्रेसची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या चर्चिल यांना आज पत्रकारांना सामोरे जाणे मात्र कठीण बनले. आपल्या कॉंग्रेस प्रवेशाच्या समर्थनार्थ त्यांनी सांगितले की आपण कॉंग्रेसमधून बाहेर पडताना काही विषय ठेवले होते. हे विषय सोडवण्यात कॉंग्रेसला अपयश आल्यानेच आपण पक्ष सोडण्याच्या थरापर्यंत पोहचलो. दाबोळी विमानतळाचा विस्तार व नूतनीकरण मंजूर झाले आहे, प्रादेशिक आराखडा रद्द झाला आहे, विशेष आर्थिक विभागही रद्द करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. आता रोमीचा राजभाषेत समावेश व पर्यटक टॅक्सी चालकांचा विषय येत्या दिवसांत सरकारबरोबर चर्चा करून सोडवला जाईल, असेही ते म्हणाले. मोपासंदर्भात आपला केव्हाच पाठिंबा असणार नाही, असेही यावेळी त्यांनी सांगून टाकले.
चर्चिल आलेमाव यांच्या कॉंग्रेस प्रवेशावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले. त्यांनी कॉंग्रेस विरोधात वेळोवेळी केलेल्या वक्तव्यांची यावेळी त्यांना जाणीव करून दिल्याने त्यांचा चेहरा पुरता उतरला. कॉंग्रेस पक्ष हा सर्वांत जास्त भ्रष्टाचारी आहे. हा पक्ष गोवा विकण्यास पुढे सरसावला आहे, या आरोपांबाबत त्यांना आता काय वाटते, असा सवाल केला असता आपण असे बोललोच नाही, असे ते म्हणाले. या प्रश्नांना उत्तरे देणे चर्चिल यांना कठीण होत असल्याचे जाणताच मुख्यमंत्र्यांनी "जुन्या गोष्टी उपस्थित करून काहीही उपयोग नाही, आता नव्या गोष्टी विचारा' असे सांगून मुख्यमंत्र्यांनी चर्चिल यांची पत्रकारांच्या तावडीतून सुटका केली.

""चर्चिलनी आम्हाला "शेव्ह" केले""


चर्चिल व रेजिनाल्ड यांनी सत्तेच्या लालसेने कॉंग्रेस प्रवेश केला असला तरी त्यांच्या कार्यकर्त्यांना मात्र हा प्रवेश अजिबात रुचला नसल्याचे यावेळी पाहावयास मिळाले. चर्चिल यांच्याबरोबर या ठिकाणी आलेल्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा संताप होता. ""चर्चिल यांनी "सेव्ह" करण्याचे सोडून आम्हाला "शेव्ह" केले"", अशी प्रतिक्रिया त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करीत होते. यावेळी काही कार्यकर्ते त्यांच्या या कृतीबद्दल बरेच नाराज असून चर्चिल यांनी विश्वासघात केल्याची भावना त्यांची बनली आहे.

कायदामंत्र्यांकडून समर्थन

गेल्यावेळी सरकार वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले कायदामंत्री दयानंद नार्वेकर यांनी यावेळीही विधानसभा संस्थगित करण्याचे समर्थन करताना, विधानसभा बोलावण्याचा अधिकार असलेल्या मंत्रिमंडळाला विधानसभा संस्थगित करण्याचा पूर्ण हक्क असल्याचे प्रतिपादन केले. १६ रोजी विधानसभा तहकूब केल्यानंतर मुख्य सचिव जे. पी. सिंग यांनी मंत्रिमंडळ बैठक बोलावली. याक्षणी सरकार अल्पमतात असल्याची कोणतीही माहिती मंत्रिमंडळाला नव्हती. राज्यपालांकडेही त्यासंबंधी काहीही संदेश नव्हता, त्यामुळे विधानसभा संस्थगित करण्याचा निर्णय घेतला, असा खुलासा नार्वेकर यांनी केला. मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसारच राज्यपालांनी हा निर्णय घेतला असे सांगून त्यांना या प्रकरणी दोष देणे चुकीचे आहे, असे नार्वेकर म्हणाले. प्रसारमाध्यमांनी श्री. जमीर यांची नाहक बदनामी करू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सरकारसमोर असलेल्या विनियोग पुरवण्या अधिसूचनेद्वारे संमत करून ३० कोटी रुपयांचा आपत्कालीन निधी २०० कोटी रुपये करण्यात आला आहे, त्यामुळे पुन्हा विधानसभा बोलावण्याची आवश्यकता नाही, असेही कायदामंत्र्यांनी बोलून दाखवले.

No comments: