Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 24 January, 2008

जमीरविरोधात भाजपचे आंदोलन - पर्रीकर

पणजी, दि. 23 (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षातर्फे येत्या १ फेब्रुवारीपासून "जमीर चले जाव" हे राज्यव्यापी आंदोलन उभारले जाणार आहे. देशाच्या संविधानाची बूज राखण्याची जबाबदारी सोडून राज्यपाल एस. सी. जमीर उघडपणे कॉंग्रेसचे दलाल म्हणून वावरत असल्याने या आंदोलनाद्वारे त्यांचा पर्दाफाश केला जाईल असा इशारा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज दिला.
पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. यावेळी माजी आमदार सदानंद शेट तानावडे व पक्ष सरचिटणीस गोविंद पर्वतकर उपस्थित होते.
येत्या १ ते १७ फेब्रुवारीपर्यंत हे आंदोलन चालणार असून त्यात भाजपचे केंद्रीय नेते सहभागी होणार आहेत. या आंदोलनाअंतर्गत प्रत्येक पंचायत पातळीवर जाहीर सभा होणार आहेत. स्थानिक पातळीवर प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, राजेंद्र आर्लेकर आदी सहभागी होणार आहेत.
राज्यपाल श्री. जमीर यांची कार्यपद्धती व त्यांच्या बडदास्तीवर सरकारी तिजोरीतून होणाऱ्या अतिरिक्त खर्चाबाबत जनतेला जागृत केले जाईल, असे पर्रीकर यावेळी म्हणाले. याच दरम्यान, त्यांना त्वरित माघारी बोलावण्यासाठी सह्यांची मोहीमही हाती घेतली जाणार असल्याचे पर्रीकर म्हणाले. हे आंदोलन संपूर्ण गोव्यात राबवून गरज भासल्यास त्याचा कालावधीही वाढवला जाईल,असेही ते म्हणाले.
भाजप युवा मोर्चातर्फे जमीर यांच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवेळी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला जाणार आहे. केवळ सुरक्षेवर साडेतीन कोटी व नागालॅण्ड दौऱ्यांवर लाखो रुपयांची उधळण करून त्याचे उपकार म्हणूनच की काय ते लोकशाहीची थट्टा मांडत असल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला. हा विषय संसदेतही मांडला जाणार असल्याचे पर्रीकर यावेळी म्हणाले.
राज्यपाल श्री. जमीर यांच्याबरोबर सभापती प्रतापसिंग राणे यांची कृतीही घटनाबाह्य असल्याची टीका पर्रीकर यांनी केली. गेल्या सात महिन्यांच्या कार्यकाळात दोन वेळा त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या बाजूने पक्षपाती भूमिका घेण्याची कृती अत्यंत दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. यावेळी १६ रोजी सभागृहासमोर ठराव न मांडता मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून विधानसभा तहकूब करण्याची कृती व १७ रोजी सरळ विनियोग पुरवण्या कामकाजासमोर असतानाही विधानसभा संस्थगित करण्याची घटना पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे ते म्हणाले. सरकार अल्पमतात असल्यानेच या पुरवण्यांना विधानसभेत मान्यता देण्याचे टाळण्यात आले असे पर्रीकर म्हणाले. विरोधी पक्ष या नात्याने लोकांच्या इच्छेविरुद्ध काम करणारे सरकार पाडणे हे कर्तव्य असल्याचे सांगून अशाप्रकारे अवैध मार्गाने सरकार वाचवून कॉंग्रेसने लोकशाहीची थट्टा चालवल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला. चर्चिल आलेमाव यांनी गोव्याच्या सुरक्षिततेच्या नावावर "सेव्ह गोवा' पक्षाची स्थापना केली होती. गोमंतकीयांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना निवडूनही आणले होते, परंतु त्यांनी त्याच कॉंग्रेस पक्षात प्रवेश करून जनतेचा पूर्णपणे विश्वासघात केल्याचे पर्रीकर म्हणाले. सेव्ह गोवाच्या विलीनीकरणामुळे कॉंग्रेसची संख्या १६ वरून १८ झाली खरी, परंतु हीच संख्या आता १६ वरून १४ होणार नाही, याची दक्षता मुख्यमंत्र्यांनी घ्यावी,असा टोलाही पर्रीकर यांनी यावेळी हाणला.

No comments: