जेम्स लिहितो - In no early text is Shivaji clearly related to either Vaishnavism generally or specifically to the saint tradition of Pandharpur' (पृ ११)
ऐतिहासिक व्यक्तींवर पुस्तक कसे लिहू नये याचा धडा जेम्स लेनच्या लिखाणात मिळतो. त्याचे वरचे वाक्य त्याच्या अज्ञानाची खोली दाखविते. अगाध अज्ञान! शिवचरित्राचे व त्याला निगडीत पुराव्यांचे वरवर अध्ययन केले तरी शिवाजी महाराज केवळ शंभुमहादेव व तुळजा भवानीचेच उपासक होते, त्यांना इतर भक्ती सांप्रदायांशी काही संबंध ठेवायचा नव्हता असे दिसत नाहीच उलट ज्या ज्या ठिकाणी मराठ्यांनी आपला राज्यकारभार सुरू केला त्या त्या ठिकाणच्या देवतांना त्यांनी सनदा दिल्या, वर्षासने दिली. इथे शिवाजी महाराजानी वैष्णव देवतांच्या संदर्भात काय केले त्याचा मागोवा घेऊ. शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या संबंधावर प्रकाश टाकणारी अनेक साधने व संदर्भ उपलब्ध आहेत. १३ फेब्रु. १६५९च्या आसपास महाराजांनी समर्थ शिष्य भास्कर गोसावी यांच्याकडे समर्थांविषयी चौकशी केली. २४ पेब्रु. १६६० रोजी महाराजांना दुसरा पुत्र झाला त्याचे नाव महाराजांनी "राम' ठेवले आहे. भोसले वंशावळीत हे नाव कुठेच आढळत नाही. समर्थांच्या सहवासात महाराज पूर्वीच आले असावेत हे उघड आहे. १९६६ साली आग्र्यास जाताना महाराजांनी एक रामदासी ब्राह्मण सोबत घेतल्याचा उल्लेख समकालीन पोर्तुगीज लेखक कॉस्म-द-गार्द्र याने केला आहे. समर्थांचे एक शिष्य कण्हेरी मठपती श्री वासुदेव अनंत यांना महाराजांनी इस १६७१ साली पुष्पवाटिकेसाठी व बाग करायला अकरा बिघे जमीन इनाम दिली (श. शि. पृ ३१९) प्रस्तुत लेखनात शिवचरित्रांचे दिलेले संदर्भ श्री. विजय देशमुख यांनी लिहिलेल्या "शककर्ते शिवराय' पूर्वार्ध (१९८०) आणि उत्तरार्ध (१९८२) या पुस्तकातून दिले आहेत. महाराजांनी कारतलब खानाचा पराभव केला आणि लगेच तळकोकण मुलखावर स्वारी केली. ते साल १६६१ होते. त्यांनी दाभोळ रत्नागिरी हा भाग काबीज केला. त्या मोहिमे दरम्यान महाराज परशुराम क्षेत्री (चिपळूणजवळ) दर्शनास गेले होते. त्यावेळी त्यांना पूजा सांगणाऱ्या गोविंद जोशी बिन अनंत जोशी परशुरामकर यांना सालीना पाऊणशे होनांचे वर्षासन करून दिले. परशुराम ही वैष्णव देवता आहे. (श. शि. पृ ४२६)
श्री ज्ञानेश्र्वरांची आळंदी आणि सोपानदेवाचे सासवड या दोन्ही वारकरी पंथाच्या अग्रगण्य संताच्या क्षेत्राच्या दीप - नैवेद्याची व्यवस्था करण्यासाठी महाराजांनी खुर्दखते दिली. (श. शि. पृ ७६९)
शिवचरित्रात इतरही अनेक देवतांची दर्शने महाराजांनी घेतल्याचे व त्या ठिकाणी दानधर्म केल्याचे उल्लेख मिळतात. अनेक संत व सत्पुरुषांची दर्शने घेण्यासाठी ते स्वतः जात. त्यात मुस्लिम संतांचाही समावेश होता. या सर्व गोष्टी पाहता वैष्णव देवतांना महाराज मानत नव्हते किंवा वारकरी संप्रदायाचा आदर करत नव्हते हे जेम्स लेनचे विधान निराधार आहे.
जाता जाता जेम्स लेन एक महत्त्वाचे विधान करून जातो. 'In his own quest of legitimation, Shivaji thus employed classical, pan Indian symbols, not regional ones : (पृ १२) खरेच होते. महाराजाची दृष्टी स्वतःचे राज्य, महाराष्ट्र इतक्या पुरतीच मर्यादित नसून अखिल भारतीय दृष्टिकोनातून विचार करणारी होती. त्याशिवाय का त्यांनी काशी विश्वेश्र्वराचे देऊळ फोडले, मथुरेचे देऊळ फोडले याबद्दल औरंगजेबाची कान उघाडणी करणारे पत्र पाठविले? (श. शि. पृ १००२)
हिंदू। हिंदुत्व - हिंदूचा इस्लाम विजय
इस १२०० ते १७०० या पाचशे वर्षांच्या दरम्यान भारतात अनेक ठिकाणी मुसलमानांची राज्ये होती तर राजस्थानमधील हिंदू रजपूतांची राज्ये त्यांच्या आधिपत्याखाली होती. मुस्लीम राज्यकर्त्यांना स्थानिक हिंदू जनतेनेच नव्हे तर छळाबळाने मुस्लीम झालेल्या समाजानेही परकेच मानले. शिवाजी महाराजांच्या काळातही वैमनस्य होते. दोन्ही पक्ष, एकाच धर्माचे अनुयायी असूनही एकमेकांच्याकडे शत्रुत्वाच्या दृष्टीनेच पहात. जेम्स लेनने ही या विरोधाची नोंद घेतली आहे. तो लिहतो की, Persianized nobles ruling India in the medieval period were elitest aristocrates who would neither dine with nor intermarry with indigenous muslims. (पृ १३). शिवाजी महाराजांच्या काळातच दक्षिणेत राज्य करणाऱ्या शाह्यांमध्ये मुस्लिमांच्या अंतर्गत वैमनस्य होते. महाराजांनी परकीय मुस्लिमांविरुद्ध स्थानिकांची फळी उभारण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग म्हणून राज्याभिषेकानंतर महाराजांनी कर्नाटकमध्ये मोहीम काढली आणि ते भागानगर - हैदराबादला कुत्बशहाच्या स्वतः भेटीला गेले.
जगात इतरच जेथे जेथे इस्लाम गेला तेथे स्थानिक संस्कृती नष्ट करून इस्लामची स्थापना करण्यात आली. मात्र या इस्लामी वावटळीला भारतात पायबंद बसला. इतकेच नव्हे तर अनेक शतके राज्य कारभार, सत्ता हाती असूनही इस्लाम धर्म आणि संस्कृती हिंदूंवर लादण्यात ते अयशस्वी ठरले. त्याच्या पुढे जाऊन असे दिसते की सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात हिंदूंनी मुस्लिमांवर विजय मिळविला. हिंदूचा इस्लाम विजय यावर मी इस २००२ मध्ये ह्युस्टन येथे एका चर्चासत्रात जो इंग्रजी निबंध वाचला होता तो विषय वेगळ्या प्रकरणात देता येईल. १८५७ नंतर इस्लामी अलगतेला इंग्रजांनी खतपाणी घातले आणि फोडा व झोडा नीतीचा अवलंब करून भारताची फाळणी घडवून आणली.
शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास चुकीची गृहीते धरून जेम्स लेनने केला आहे. हे पानोपानी जाणवते. त्याचा अंतस्थ हेतू शिवचरित्राच्या आधारे हिंदूंचा इतिहास नाकारण्याचा आहे. त्याची त्याने पानोपानी पराकाष्ठा केली आहे.
Saturday, 31 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment