चेहरा सोलवटला, पोलिसांचे मात्र मौन
मुंबई, दि. २४ - येथील आर्थर रोड कारागृहात आज सकाळी दाऊद गॅंगचा गुंड मुस्तफा डोसा याने दुसरा कुप्रसिद्ध गुंड अबू सालेमवर हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. मुस्तफाने सालेमवर चमच्याने वार केले असून त्याच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. तुरुंगातील या टोळीयुद्धानंतर आता सालेम याला ठाणे येथील कारागृहात हलवले जाण्याची शक्यता आहे.
दोघे अट्टल गुंड एकाच कारागृहामध्ये आल्यावर त्यांच्यात जो ताणतणाव निर्माण होतो तसाच काहीसा प्रकार सालेम आणि डोसा यांच्यात झाल्याचे कळते. १९९३ च्या मुंबई बॉंबस्फोट प्रकरणात मुस्तफा डोसा आरोपी आहे, तर सालेमवर बॉंबस्फोटासह गुलशन कुमार हत्येसह इतर खटले सुरू आहेत. त्यामुळे त्यांचा मुक्काम आर्थर रोल जेलमधल्या १० क्रमांकाच्या कोठडीत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात छोटे - मोठे खटके उडत होतेच, त्या वादाने आज उग्र रूप धारण केले.
मुस्तफा डोसाला जास्त सुविधा-सवलती दिल्या जातात, अशी तक्रार सालेमने केली होती. तेव्हापासून तो राग डोसाच्या डोक्यात भिनला होता. गुलशन कुमार हत्येवरूनच सालेम आणि दाऊद इब्राहिम यांच्यात वितुष्ट आले होते. तेथेच दाऊद आणि सालेम यांच्यातील टोळ्यांत वादाची ठिणगी पडली होती. त्यामुळे सकाळी नाश्त्याच्या वेळी सालेम मुस्तफासमोर आला, तेव्हा त्याने कसलाही विचार न करता त्याच्यावर हल्ला केला. हातातील चमच्याने त्याने सालेमच्या चेहऱ्यावर वार केल्याचे सूत्रांनी सांगितले. सालेमचा चेहरा त्यामुळे सोलवटून निघाला आहे.
जेलमधल्या पोलिस शिपायांनी डोसा - सालेम यांना एकमेकांपासून ताबडतोब दूर केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेने कारागृहातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. पोलिसांनी डोसाविरुद्ध मारहाणीचा तक्रार दाखल केली असून दोघांनाही एकमेकांपासून दूर ठेवण्यात आले आहे. या खळबळजनक प्रकारानंतर सालेमची रवानगी ठाणे कोर्टात होण्याची चिन्हे दिसत आहेत. या संपूर्ण प्रकाराबद्दल पोलिसांनी कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
"मिग २७' विमान
कोसळून एक ठार
कोलकाता, दि. २४ ः भारतीय हवाई दलाचे "मिग २७' हे लढाऊ विमान आज सकाळी पश्चिम बंगालमधल्या जलपायगुडी जिल्ह्यात भोटपुट्टी गावात कोसळून या
दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. २५ जण जखमी झाले आहेत. त्यातील पाच जणांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
हाशिमारा हवाई तळावरून सकाळी साडेदहाच्या सुमारास उड्डाण केलेल्या मिग २७ विमान तेथून फक्त २५ किलोमीटरवर पोहोचले असतानाच हा अपघात झाला. ज्या जागी विमान कोसळले, त्या शेतात काही मजूर काम करत होते. त्यातील बी. राय या शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. विमानाचा पायलट साकेत वर्मा याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र तोही जखमी आहे. एकूण २५ जखमींपैकी ५ जणांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हा अपघात नेमका कशामुळे झाला, हे कळू शकलेलं नाही. दरम्यान, याआधी फेब्रुवारी महिन्यात सिलिगुडी इथं मिग विमानाला अपघात झाला होता.
Sunday, 25 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment