इस्लामाबाद, दि. २८ - पाकिस्तानच्या इस्लामाबादजवळील पर्वतरांगांमध्ये आज सकाळी एक प्रवासी विमान कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत विमानातील सर्वच्या सर्व म्हणजे १५५ प्रवासी ठार झाले आहेत.
एअरब्लू या खाजगी कंपनीचे एअरबस-३२१ जातीचे हे प्रवासी विमान आज सकाळी १० च्या सुमारास जोरदार पाऊस आणि वाईट हवामान असताना इस्लामाबादजवळच्या मरगल्ला पर्वतरांगांमध्ये कोसळले. हे विमान कोसळल्यानंतर त्याच्या इंधन टाकीचा भडका उडाल्याने मोठा स्फोट झाला आणि विमानाचे तुकडे तुकडे झाले. कराचीहून इस्लामाबादकडे निघालेल्या या अपघातग्रस्त विमानात १४७ प्रवासी आणि चालक दलाच्या ८ सदस्यांचा समावेश होता.
हे विमान इस्लामाबाद विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असतानाच विमानाचा हवाई नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला आणि काही वेळानंतर ते जवळच्या पर्वतांमध्ये कोसळले, असे पाक अधिकाऱ्यांनी सांगितले. विमानाचे अवशेष दोन पर्वतांमधील खोल दरीत कोसळल्याने बचाव आणि मदत पथकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. इस्लामाबाद आणि परिसरात गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात दाट धुके पडले होते आणि दृश्यतादेखील फारच कमी होती.
अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर काही मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. विमान कोसळले तो भाग अतिशय दुर्गम असल्याने मृतदेह विखुरले आहेत. वाईट हवामानामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, नागरी उड्डाण खात्यामार्फत चौकशी झाल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण कळू शकेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
अपघातातून वाचलेल्या संभाव्य प्रवाशांना मदत करण्यासाठी बचाव पथकातील सदस्यांनी खूप आरडाओरड केली. मात्र, खालून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. लष्कर, नौदल, वायुसेना आणि पाक निमलष्करी दलाच्या अनेक विशेष तुकड्यांना मदतकार्यात हातभार लावण्यासाठी घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. विमानातील सर्व प्रवासी आणि चालक दलाच्या सदस्यांचा या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे, अशी माहिती पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री रहमान मलिक यांनी दिली आहे. एकूण १५९ प्रवाशांनी या विमानाचे तिकीट काढले होते. मात्र, सुमारे एक डझन प्रवासी प्रवास करण्यासाठी आलेच नाही. या विमानातील प्रवाशांमध्ये ५ मुले आणि २९ महिलांचा समावेश आहे, असेही मलिक यांनी सांगितले. या अपघातातून ५ जण बचावले असल्याचे मलिक यांनी याआधी सांगितले होते.
विमान दुर्घटनेबद्दल भारताला दु:ख
पाकिस्तानात आज प्रवासी विमान कोसळून १५५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याबद्दल भारताने तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयाप्रति आम्ही तीव्र संवेदना प्रकट करतो, असे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात म्हटले असल्याचे, एका अधिकृत पत्रकात म्हटले आहे.
Thursday, 29 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment