साखळी, दि. २४ (प्रतिनिधी) - दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे हैराण झालेल्या साखळीतील व्यापाऱ्यांना यंदाही सुखाची झोप मिळणे महाकठीण बनले आहे. अंजुणे धरणातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे साखळीवरील पुराची टांगती तलवार कायम आहे. सध्या धरणातील पाण्याची पातळी ८७ मीटरपेक्षा जास्त असून धोक्याची पातळी गाठण्यास केवळ पाच मीटर अंतर उरले आहे. अंजुणे धरणावरील सुरक्षा कर्मचारी डोळ्यांत तेल घालून दर अर्ध्या तासाने पाण्याच्या पातळीची पाहणी करत आहेत.
दरम्यान, गुरूवारी संध्याकाळी धरणाचे पाणी सोडल्याच्या अफवेने व्यापारी आणि साखळीवासीयांची विलक्षण तारांबळ उडाली. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्या दिवशी पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी धरणाचे पाणी सोडण्यात आल्याची माहिती दिली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तातडीने सामानाची आवराआवर करायला सुरुवात केली. दरम्यान काही व्यापाऱ्यांनी धरणाच्या अभियंत्यांना फोन करून माहिती घेतली असता धरणातून पाणी सोडले नसल्याचे सांगण्यात आले. त्या दिवशीच पाण्याची पातळी ८५ मीटरपर्यंत वाढली होती. साखळीतील पूरनियंत्रण योजनेचे तीनतेरा वाजल्यानंतर आता व्यापाऱ्यांना डोक्यावर हात मारून घेण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. "लांडगा आला रे आला' या उक्तीनुसार पाणी सोडले रे सोडले या अफवेने लोकांना निष्कारण त्रास सोसावा लागला.
Sunday, 25 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment