Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 30 July 2010

वाळवंटी नदीत महिला बुडाली

वाळपई व साखळी, दि. २९ (प्रतिनिधी): पर्ये केरी सत्तरी येथील शिरोली वाळवंटी नदीत बुडून सरस्वती बाबूसो गावस (५०) या महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सरस्वती कपडे धुण्यासाठी गेली असता पाय घसरून नदीत पडली व वाहून गेली. घटनास्थळावरून अंदाजे २ किमी अंतरावर भायलावाडा मठ येथे तिचा मृतदेह झाडाला अडकून असलेल्या स्थितीत सापडला.
सदर घटना घडली तेव्हा नदीकाठी असलेल्या सुरेखा शेटकर, शिल्पा गावस व विद्या शेटकर यांनी सरस्वती हिला नदीत पडून वाहत जाताना पाहिले व आरडाओरड करून गावातील लोकांना बोलावून घेतले. यानंतर वाळपई अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांना अडीच तासानंतर म्हणजे दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास मृतदेह सापडला. अग्निशामक दलाचे अधिकारी लक्ष्मण माजिक यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी काम केले. सदर घटनेचा पंचनामा वाळपई पोलिस निरीक्षक हरीष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत नाईक यांनी केला.
दरम्यान, वाळवंटी नदीवर गेल्या दोन वर्षांपूर्वी पूर नियंत्रण योजनेखाली संरक्षक भिंतीच्या उभारणीवेळी येथील दगडी पायऱ्या काढून झाडांची कत्तल करण्यात आली होती. या प्रकारामुळे येथे धोका निर्माण झाला असून झाडे असल्यास कदाचित सरस्वतीला आधार मिळाला असता, अशी चर्चा येथे सुरू होती.

No comments: