Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 15 March 2008

२४ पर्यंत मंत्रिपद न मिळाल्यास आमदारकीचा राजीनामा

पांडुरंग मडकईकर यांची घोषणा
जुने गोवे, दि. १५ (वार्ताहर): मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी २४ मार्चपर्यंत आपल्याला सन्मानाने पुन्हा मंत्रिपदी बसविले नाही तर विधानसभा भरण्यापूर्वीच आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊ, अशी जाहीर घोषणा कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मकईकर यांनी केली.
जुने गोवे येथील गांधी चौकाजवळ झालेल्या कुंभारजुवे मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या मदतीला विद्यमान सरकारातील एकही आमदार किंवा मंत्री उपस्थित नव्हता, ही गोष्ट अनेकांसाठी खटकणारी होती. व्यासपीठावर माजी मंत्री काशिनाथ जल्मी, माजी आमदार कृष्णा कुट्टीकर, माजी आमदार धर्मा चोडणकर, ऍड. आयरिश रॉड्रिगिज, ऍड. नरेंद्र नाईक, कुंभारजुवा गट कॉंग्रेस अध्यक्ष अवधूत नाईक, एन. शिवदास, सरपंच विलियम वालादारिस, मारियो पिंटो, कांता गावडे तसेच मतदारसंघातील अनेक सरपंच व पंच उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी काहीही कारण नसताना आपले मंत्रिपद काढून घेणे ही निष्ठावंताच्या पाठीत खंजीर खुपसण्याची कृती असल्याची टीका मडकईकर यांनी केली. आपल्यावरील अन्याय हा राज्यातील तमान अनुसुचित जमाती व बहुजन समाजाचा विश्वासघात असल्याचेही ते म्हणाले.
समाजकल्याण खाते ढवळीकर यांच्याकडे सोपवून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बहुजन समाजाची चेष्टाच केल्याचे सांगून अशा मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली वावरल्याबद्दल आपल्याला आता शरम वाटू लागल्याचे उद्गार त्यांनी काढले. एका घरातील वडील-पुत्र, भाऊ-भाऊ आमदार, मंत्री बनू शकतात, तर गावडा समाजातील एकमेव मंत्री मंत्रिमंडळात राहू शकत नाही हे दुदैव! , असे ते म्हणाले.
सुमारे चार हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अत्यंत आक्रमक भाषणात मडकईकर यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. आपली खुर्ची सांभाळण्यासाठी हे महाशय कोणत्याही थराला जातील व कुणाचाही बळी घेतली. आपल्या वरील अन्याय हा त्यांच्या आमआदमीबाबतच्या बेगडी प्रेमाचे उघड प्रदर्शन ठरले, अशी मल्लिनाथी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांचे आमआदमी हे मोतीडोंगरावरील बिगर गोमंतकीय आहेत, असा ठपकाही यावेळी त्यांनी ठेवला.
याप्रसंगी विविध वक्त्यांनी मडकईकर यांच्या समर्थनार्थ आपले विचार मांडले. अवधूत नाईक यांनी स्वागत केले तर मारियो पिंटो यांनी आभार मानले.
सभेच्या शेवटी मडकईकर यांच्या सभेला आघाडी सरकारातील एकही आमदार किंवा मंत्री उपस्थित राहिला नाही याबाबतची कुजबुज कार्यकर्त्यांत सुरु होती.

रवी व ब्रार यांचेच माफियांशी साटेलोटे!

स्कार्लेटच्या आईचा सनसनाटी आरोप
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): राज्याचे गृहमंत्री रवी नाईक व पोलिस महासंचालक बी. एस. ब्रार यांचे अमलीपदार्थ माफियांशी साटेलोटे असल्याची ठोस माहिती आपल्याकडे आहे, असा सनसनाटी आरोप स्कार्लेटची आई फियोना मॅकेवॉन हिने करून खळबळ माजवली आहे.
स्कार्लेटच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत लावलेला छडा हे हिमनगाचे टोक आहे, असा दावा फियोनाने केला. राज्यातील काही पोलिस अधिकारी व राजकीय नेत्यांना येथील अमलीपदार्थ व्यवहारांची पूर्ण कल्पना आहे. त्यांचेच अशा व्यवहारांना अभय आहे, असा आरोपही फियोना हिने करून या प्रकरणाला वेगळीच कलाटणी दिली आहे. दरम्यान, फियोनाच्या या वक्तव्यांमुळे हैराण झालेले पोलिस प्रसारमाध्यमांकडे सनसनाटी वक्तव्ये करून ती सर्वांचे लक्ष वेधू पाहत असल्याचे सांगत आहेत. पोलिसांनंतर आता थेट गृहमंत्र्यांवरच आरोप करून ती जाणीवपूर्वक या प्रकरणी दिशाभूल करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
दरम्यान, फियोनाने वयाच्या अठराव्या वर्षी मेजवानीप्रसंगी एका इसमाचा गळा चिरला होता व त्यासाठी तिला एका वर्षाची कैदही झाली होती, अशी माहिती तिचा पुत्र हाल (१९) याने उघड केली आहे. त्यामुळे फियोनाच्या विश्वासार्हतेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तिचे गोव्यातील वास्तव्य व एकूण राहणीमान पाहिल्यास ती फक्त पर्यटनासाठीचं गोव्यात आली असावी, असे म्हणणे धाडसाचे ठरेल या शक्यतेप्रत पोलिस आले आहेत.
आज फियोना हिला येथील खास महिला व बालसंरक्षण विभागात पोलिसांनी हजर राहण्याचे आदेश दिले असता ती आपले वकील विक्रम वर्मा यांच्यासोबत आली. यावेळी पत्रकारांशी बोलताना तिने दिलेल्या एका लेखी तक्रारीत हा आरोपांचा तपशील पुरवला.
काल रात्री १०.०५ च्या सुमारास दोघे पुरुष पोलिस अधिकारी आपल्या घरी आले व त्यांनी शनिवारी (दि. १५) सकाळी बालसंरक्षण विभागात हजर राहण्याचे आदेश जारी केले. तेव्हा त्यांच्याबरोबर महिला पोलिस अधिकारी हजर नव्हती, असा आक्षेप तिने घेतला. आपल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यापुरती हा प्रकार मर्यादित नाही. पोलिसांनी ज्याप्रकारे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला त्यावरून या पोलिसांची चौकशी केल्यास अनेक दबलेली प्रकरणे उघडकीस येतील, असा दावा तिने केला.
पोलिसांना या भागात सुरू असलेल्या सर्व गुन्हेगारी प्रकरणांची माहिती आहे. तथापि, त्यांच्याकडून जाणीवपूर्वक त्याकडे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप तिने केला. येथील अमलीपदार्थ माफियांना पोलिस व राजकीय नेत्यांचा वरदहस्त आहे त्यामुळे हे जाळे शोधून ते उद्ध्वस्त करणे कठीण असल्याची माहिती तिने दिली. आपण सत्य उघडकीला आणू व न्याय मिळवल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही, असे तिने नमूद केले.
फियोनाकडून केले जाणारे आरोप व अमलीपदार्थ व्यवहाराबाबत तिच्याकडून प्रसारमाध्यमांना देण्यात येत असलेली माहिती प्रत्यक्षात या प्रकरणाच्या चौकशीसाठी कितपत फायदेशीर ठरेल किंवा तिच्याकडे जर अशी कोणती माहिती असेल तर या प्रकरणाच्या तळाशी जाणे सोपे होईल असा विचार करूनच तिला बोलावण्यात आले होते, अशी माहिती पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी दिली. तिची चौकशी किंवा उलट तपासणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगून प्रत्यक्षात स्कार्लेट मृत्यू प्रकरणात तिची कशी काय मदत घेता येईल, या उद्देशाने तिला बोलावल्याचे ते म्हणाले.
फियोना यांनी मात्र पोलिसांवर संशय व्यक्त करून पोलिस आपल्याकडे आरोपी म्हणूनच पाहत असल्याचे सांगितले. तसेच फियोनाला समन्स जारी करताना कोणीही महिला पोलिस नव्हती. हा प्रकार कायद्याला धरून नाही. त्यामुळे याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती तिचे वकील विक्रम वर्मा यांनी दिली.
सुकुमार देसरकर कोण?
स्कार्लेटप्रकरणी आज (शनिवारी): आणखी "मनोरंजक' माहिती उघडकीस आली. हणजूण पोलिस स्थानकात ९ मार्च रोजी नोंद झालेल्या २१ - २००८ या प्राथमिक चौकशी अहवालात फियोना हिच्या वडिलांचे नाव सुकुमार देसरकर असे नोंदवण्यात आले आहे. याबाबत फियोनाला विचारताच तिने आपण या व्यक्तीला ओळखत नसल्याचे म्हटले आहे. पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी ही कदाचित संगणकीय चूक असावी, अशी शक्यता व्यक्त केली. त्याबाबत चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. या प्रकरणाचे चौकशी अधिकारी निरीक्षक ब्राझ मिनेझिस यांनीही या नावाबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले. पोलिसांच्या अजब कारभाराची छोटी (शी) झलक...

फियोनाचे बोलावते धनी वेगळेच

रवींचे स्पष्टीकरण
पणजी,दि.१५ (प्रतिनिधी): "स्कार्लेटची आई फियोना मॅकेवॉन ही आपण आणि ब्रार यांना केव्हापासून ओळखते," असा खडा सवाल गृहमंत्री रवी नाईक यांनी केला. प्रत्यक्षात तिला आपल्या मुलीच्या खुनाचे सोयरसुतक नाही. उलट ती वेगळ्याच कारणांस्तव बेताल वक्तव्ये करत आहे. यामागे तिचे बोलावते धनी वेगळेच आहेत, असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी "गोवादूत'शी बोलताना केले.
गृहमंत्री नाईक व पोलिस महासंचालक बी. एस. ब्रार यांचे अमलीपदार्थ माफियांशी साटेलोटे असल्याचा आरोप फियानो हिने केला आहे. त्याबाबत विचारले असता गृहमंत्री म्हणाले, स्वतःच्या किशोरवयीन मुलीला अनोळखी लोकांच्या हाती सोपवून ही महिला फिरायला जाते. तिने जर स्कार्लेटची जबाबदारी विश्वासातील व्यक्तीवर सोपवली होती तर पहाटेपर्यंत स्कार्लेट तेथील युवकांबरोबर शॅक्सवर काय करत होती? फियोनाचा स्कार्लेटवर वचकच नव्हता. तिने मुलीला मोकळे सोडले होते यातून उघड झाले आहे.
आता तिने प्रसारमाध्यमांकडे धाव घेऊन सुरू केलेली आरोपांची मालिका पाहता यामागे गोव्यातील व गोव्याबाहेरील काही राजकीय व्यक्ती तथा गोव्याच्या पर्यटनाला नख लावणाऱ्या शक्ती वावरत असल्याचा संशय गृहमंत्र्यांनी व्यक्त करतानाच तिचीदेखील चौकशी होऊ शकते, असे स्पष्ट संकेत दिले. तिने जाणीवपूर्वक या प्रकरणी दिशाभूल चालवली आहे. त्याद्वारे तपासकामात अडथळा निर्माण करण्याचे प्रयत्न ती करत असल्याचा आरोप नाईक यांनी केला.
स्कार्लेटप्रकरणाचा तपास कर्तबगार अधिकारी करत आहेत. यासंदर्भात दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात हयगय केल्याने संबंधित उपनिरीक्षक नेर्लन अल्बूकर्क यांनाही निलंबित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
याप्रकरणी पोलिसांकडून झालेली हयगय, गोमेकॉच्या दोन्ही शवचिकित्सा अहवालातील नेमक्या बदलाची कारणे, हणजूण येथील शॅक्सवर अमलीपदार्थाचा झालेला वापर याबाबत चौकशी सुरू असून ती उघड करण्याची आवश्यकता नाही, असे ते म्हणाले.
अमलीपदार्थ व्यवहारांबाबत पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. राज्यात रेव्ह पार्ट्या बंद करण्यात आल्या आहेत. अमलीपदार्थ विरोधी पथके विविध ठिकाणी छापे घालत आहेत. स्कार्लेट प्रकरणात अमलीपदार्थ माफियांचा सहभाग आहे काय, असा सवाल केला असता तेही लवकरच उघड होईल, असे त्यांनी सूचित केले. गोव्यात पर्यटकांना संरक्षण देण्यात सरकार कोठेही कमतरता ठेवलेली नाही, असा निर्वाळा गृहमंत्र्यांनी दिला. जागतिक पातळीवर गोवा उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आल्याने गोव्याची बदनामी करून येथील पर्यटकांना भीती घालण्याकरताच राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पातळीवर काही लोकांनी अपप्रचार चालवला असावा, अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली.

...तर फियोनाचीही चौकशी
फियोनाने सनसनाटी वक्तव्ये करून पोलिसांची दिशाभूल चालवली आहे. मात्र, तिची एकूणच पार्श्वभूमी वादग्रस्त असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. फियोनाला एका हल्ला प्रकरणात वर्षभराच्या कारावासाची शिक्षा झाल्याचे खुद्द तिच्या मुलानेच उघड केले आहे. त्यामुळे तिच्यासंदर्भातील सर्व तपशील आम्ही ब्रिटिश पोलिसांकडून मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यानंतर फियोनाचीही चौकशी होऊ शकते, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

शाब्दिक चकमकीतून सहकाऱ्याचा खून

एकास अटक
फोंडा, दि. १५ (प्रतिनिधी): कुंभारवाडा - साकोर्डा येथील एका फार्म हाऊसवर काम करणाऱ्या दोन कामगारांमध्ये शुल्लक कारणावरून शुक्रवारी (दि.१४) रात्री ८.४५ च्या सुमारास झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संशयित सुरेश गुडप्पा वडनूर (३६) याला कुळे पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे.
मारहाणीमुळे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव विठ्ठल झुंजारी (५०) असे आहे. विठ्ठल व सुरेश हे दोघेही मूळचे बैलहंगल कर्नाटक येथील रहिवासी असून एकाच हार्म हाऊसवर कामाला होते. विठ्ठल हा गेल्या दोन - तीन वर्षांपासून अधूनमधून कामाला येत होता. तर सुरेश हा महिनाभरापूर्वी कामाला आला होता. काही कारणांवरून त्यांच्यात शाब्दिक चकमकी होत होत्या, अशी माहिती मिळाली आहे.
शुक्रवारी रात्री सुरेश आणि विठ्ठल यांच्यात भांडण झाले. यावेळी सुरेश याने रागाच्या भरात दंडुक्याने विठ्ठल याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याने विठ्ठल गंभीर जखमी झाला. त्याला ताबडतोब फोंडा येथील सरकारी इस्पितळात नेण्यात आले. तेथे "तो' मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच कुळे पोलिस स्थानकाचा ताबा असलेले फोंड्याचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ देसाई यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन संशयित सुरेश याला ताब्यात घेतला. मारहाण करण्यासाठी वापरण्यात आलेला दंडुका पोलिसांनी जप्त केला असून अधिक तपास निरीक्षक मंजुनाथ देसाई करीत आहेत.

सरकारला धोका नाही : मुख्यमंत्री

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): सध्याच्या स्थितीत कोणीही आमदारकीचा राजीनामा देण्याचे धाडस करणार नाही. त्यामुळे विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारला अजिबात धोका नसल्याचा दावा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या गोटातून केला जात आहे.
पांडुरंग मडकईकर यांना डच्चू दिल्यानंतर केंद्रीय समन्वय समितीने मुख्यमंत्र्यांसमोर ठेवलेल्या अन्य दोन मागण्या मंजूर केल्या जाणार नाहीत, असा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय समन्वय समितीच्या आदेशावरून मडकईकर यांना डच्चू देऊन मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांना मंत्रिपद बहाल करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारच्या स्थिरतेवर काही परिणाम होणार काय, असा सवाल केला असता उलट सरकार अधिक स्थिर झाल्याची माहिती या गोटातील नेत्यांनी दिली. सध्याच्या राजकीय परिस्थितीत आपल्या आमदारकीचा राजीनामा बहाल करून नव्याने मतदारांना सामोरे जाण्याची धमक कुणातही राहिली नाही. मडकईकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यास ती त्यांच्यासाठी राजकीय आत्महत्याच ठरेल, असा दावा या नेत्यांनी केला आहे. सध्या आघाडी सरकारची ताकद २६ वर आली आहे. त्यात कॉंग्रेस १८, राष्ट्रवादी-३, मगोप-२, अपक्ष-१ यांच्यासह ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात व सावर्डेचे अनिल साळगावकर यांचाही सरकारला पाठिंबा आहे. विरोधी भाजपकडे केवळ १४ आमदार असल्याने सत्तास्थापनेसाठी त्यांना आणखी ७ आमदारांची गरज भासेल. हा आकडा खूप मोठा आहे. अशावेळी हातचे सोडून पळत्याच्या मागे लागण्याची दुर्बुंद्धी कुणाला सुचली तर ते त्यांचे दुर्भाग्य म्हणावे लागेल, असा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, मतदारसंघ फेररचनेमुळेही काही नेत्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. ही फेररचना नव्या राजकीय समीकरणांसाठी कारणीभूत ठरणारी असल्याने सरकार बरखास्त होणेही काही आमदारांसाठी नुकसानीचे ठरेल. दिगंबर कामत यांनी प्रत्यक्ष घटनेला वेठीस धरून दोन वेळा अवैध्यरीत्या आपले सरकार टिकवले,त्यामुळे येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अपशकून करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांच्याकडून विधानसभा बरखास्तीची शिफारस करण्याची शक्यता अधिक असल्याने काहीही संभव आहे, अशी चर्चा आमदारांत आहे. केंद्रीय पातळीवर सध्या मध्यावधी लोकसभा निवडणुकीचे वारे घोंगावते आहे. या काळात गोव्यात काही राजकीय उलथापालथी झाल्यास विधानसभा बरखास्त करून लोकसभा निवडणुकीबरोबर गोव्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याचा विचारही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Friday, 14 March 2008

सभापतींचा पर्दाफाश करणार : पर्रीकर

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): सभापती प्रतापसिंग राणे यांनी गेल्या ९ महिन्यांत चालवलेल्या गैरप्रकारांचा पर्दाफाश येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केला जाईल, असा सूचक इशारा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिला आहे. आज येथील भाजप मुख्यालयात बोलावलेल्या खास पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सदानंद शेट तानावडे उपस्थित होते.
विधानसभेचा कारभार सध्या कला अकादमीच्या कारभाराप्रमाणे हाकण्याचा प्रकार सभापती राणे करीत असल्याचा ठपका पर्रीकर यांनी ठेवला. ७ मार्च २००८ रोजी सभापतींविरोधात दाखल केलेली अविश्वास ठरावाची नोटीस स्वीकारण्यास खुद्द सभापतींनीच हरकत घेतल्याचे पर्रीकर यांनी उघड केले. या नोटिशीवर तारीख लिहिली नसल्याचे कारण पुढे करत त्यांनी ही नोटीस फेटाळून आपल्या गुर्मीचे दर्शन घडवल्याचे पर्रीकर म्हणाले. कायदेशीर दृष्ट्या अधिवेशनाच्या १४ दिवसांपूर्वी नोटीस जारी करणे बंधनकारक असते त्यामुळे ७ मार्च रोजी जारी केलेली नोटीस योग्य होती. सभापतींविरोधात दाखल केलेल्या अविश्वास नोटिशीला ते स्वतःच हरकत घेत असल्याचे हे उदाहरण म्हणजेच त्यांच्या एकतर्फी निर्णयाची ओळख असल्याची माहिती पर्रीकर यांनी दिली.
राणे स्वतःला विधानसभेचे कायमस्वरूपी सभापती समजतात की काय, असा खडा सवाल पर्रीकर यांनी उपस्थित केला. यासंबंधी राज्यपाल एस. सी. जमीर यांच्याकडे दाद मागणार असून तेथेही न्याय न मिळाल्यास आपण न्यायालयात जाऊ, असा निश्चय पर्रीकर यांनी केला आहे.
दरम्यान, आज पुन्हा नव्याने सभापती व उपसभापती यांच्याविरोधात नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. विधानसभा सचिवालय कार्यालयाकडून त्या स्वीकारण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे आपणाला प्रत्यक्ष तेथे जाऊन त्या नोटिसा संबंधितांना घेण्यास भाग पाडावे लागले. एका लोकप्रतिनिधीला अशा प्रकारची हरकत घेणे हा हक्कभंग ठरू शकतो, याची जाणीव या कर्मचाऱ्यांना नव्हती, अशी माहिती त्यांनी दिली.
सभापती प्रतापसिंग राणे यांनी गेल्या ९ महिन्यांत चालवलेला गैरप्रकार व बेकायदा कृत्यांचा पाढा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाचला जाईल. त्यांनी आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीला गेल्या ९ महिन्यांत पूर्णपणे कलंकित केल्याचा आरोपही पर्रीकर यांनी केला. दोन वेळा विधानसभा केवळ मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून तहकूब करण्यात आली. दोन वेळा अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाला मान्यता देण्यातही हे सरकार अपयशी ठरले. राणे यांची कार्यपद्धत लोकशाहीसाठी घातक आहे. यापुढे देशात इतर राज्यांतही ती अवलंबिली जाण्याचा धोका निर्माण झाल्याचे पर्रीकर म्हणाले. मगोपचे आमदार सुदिन व दीपक ढवळीकर अपात्रता प्रकरणी त्यांनी दिलेला निकाल हाच मुळी त्यांच्या पूर्वीच्या निर्णयाला उघडा पाडणारा आहे. व्हिक्टोरीया फर्नांडिस यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली अपात्रता याचिका ही फसवणुकीने स्वीकारण्यात आल्याचे ते म्हणाले. दस्तऐवज व कामकाजात मोठ्याप्रमाणात फेरफार झाल्याचा आरोप करून सचिवालय प्रशासनात मोठ्या प्रमाणात गोलमाल झाल्याचा आरोप करून हा हिशेब विधानसभेत सादर केला जाईल, असा इशाराही पर्रीकर यांनी दिला.
-----------------------------
सरकारी कारभाराचा अजब नमुना
सरकारने १४ फेब्रुवारी २००८ रोजी एका खास आदेशाव्दारे उच्च न्यायालयाच्या सरकारी वकील श्रीमती विनी कुतिन्हो यांची सेवा जनहितार्थ कारणांवरून तात्काळ निलंबित करण्याचा आदेश जारी केला होता. नंतर त्याच दिवशी हा आदेश स्थगित ठेवण्याचा दुसरा आदेश जारी करून प्रशासकीय बेशिस्तीचेच दर्शन सरकारने घडवले. थेट जनतेशी संबंधित असलेल्या सरकारी वकिलाचे निलंबन हे काही गंभीर आरोपांमुळेच केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आदेशाला स्थगिती देण्यामागे काही आर्थिक घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा संशय त्यांनी व्यक्त केला. मुळात निलंबित केलेला आदेश स्थगित ठेवता येतो काय, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

शिक्षण मंडळाच्या बैठकीत अध्यक्षांवर प्रश्नांचा भडिमार

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): गुणवाढ प्रकरणात गुंतलेले गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष एल.एम.टी.फर्नांडिस यांनी केलेल्या तथाकथित गैरप्रचारामुळे आज कार्यकारी मंडळाच्या बैठकीत फर्नांडिस यांना बरेच धारेवर धरण्यात आले. यावेळी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. त्यांनी केलेल्या गैरप्रकाराचा यावेळी खुलासा करण्याची मागणी केल्यानंतर ते कोणत्याही प्रश्नाला उत्तर देऊ शकले नाहीत. यावेळी त्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपण त्यावर काहीच बोलू शकत नसल्याचे सांगितले. परंतु यावेळी हे प्रकरण कोणत्या न्यायालयात आहे, असा प्रश्न केल्यानंतर त्यांनी सदर विद्यार्थ्याने ग्राहक मंचात धाव घेतल्याची माहिती त्यांनी दिली. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्यानुसार शिक्षण क्षेत्रातील कोणतेही गैरप्रकार ग्राहक मंचात जाऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. ही बाब यावेळी उपस्थित सदस्यांनी निदर्शनास आणून दिली.
हा प्रश्न विद्यार्थ्याच्या भविष्याचा असल्याने प्राचार्य संघटना सुरू होणाऱ्या परीक्षेवर कोणताही परिणाम होईल अशी कृती करणार नसल्याचे नारायण देसाई यांनी म्हटले आहे. मात्र सोमवारपर्यंत यावर तोडगा काढला नसल्यास दहावी तसेच बारावी विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांना हातही लावणार नसल्याचा इशारा पुन्हा एकदा दिला आहे. त्यामुळे होणाऱ्या परिणामांना पूर्णपणे शिक्षण मंत्री जबाबदार असणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या सात महिन्यांत या प्रकरणावर तोडगा काढण्यात मुख्यमंत्री दिगंबर कामत व शिक्षण सचिवांना अपयश आल्याने त्यांच्यावरील विश्वास उडाल्याचे ते यावेळी म्हणाले.
मंडळाचे अध्यक्ष फर्नांडिस यांना निलंबित करून त्यांनी केलेल्या गैरप्रकारांची व मंडळात केलेल्या गैरकृत्यांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी कायम असल्याचे श्री. देसाई सांगितले. तसेच गुणवाढ प्रकरण पालकांना गंभीर दिसत असल्यास त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन उच्च माध्यमिक प्राचार्य संघटनेचे केले आहे.

आलिंगन देणे गुन्हा नाही

गेरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा
नवी दिल्ली, दि.१४ : शिल्पा शेट्टीला आलिंगन देऊन चुंबन घेणारा हॉलीवूडचा अभिनेता रिचर्ड गेरला सर्वोच्च न्यायालयाने आज दिलासा दिला.आलिंगन देणे हा मुळीच गुन्हा नाही, असे स्पष्ट करताना न्यायालयाने जयपूर न्यायालयाच्या गेरविरोधातील अटक वॉरंटला स्थगिती दिली.
गेरने जयपूर न्यायालयात हजर राहण्याची मुळीच गरज नाही. तो देशात कुठेही जाऊ शकतो आणि देश सोडूनही जाऊ शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
गेरविरोधातील तक्रार केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठीच होती. या आधारावर अटक वॉरंट जारी करण्याची काहीच गरज नव्हती, असेही सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे.
शिवाय, या अटक वॉरंटमध्ये गेर याचा पत्तादेखील नमूद नाही. तक्रारीत ज्या व्यक्तीचा पत्ता नमूद नाही त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्याचा अधिकार न्याय दंडाधिकाऱ्याला आहे काय, असा सवाल करीत अशा निरर्थक प्रकरणांमध्ये तक्रार दाखल करणे आणि न्यायालयाने त्याची दखल घेऊन अटक वॉरंट जारी करणे यामुळे देशाचे नाव खराब होत आहे, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.

शाणाचा जामीन अर्ज फेटाळला

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): अल्पवयीन स्कार्लेटला ड्रग्जचा तीव्र डोस देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी अटक केलेल्या प्लासिदो कार्व्हालो ऊर्फ "शाणाबॉय' याचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. तसेच स्कार्लेटाचा मित्र ज्युलियो लोबो याला अटक करायची असल्यास त्याला ४८ तासांची आगाऊ नोटीस द्यावी, असा आदेश बाल न्यायालयाने आज दिला. लोबो याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
१८ फेब्रुवारी रोजी पहाटे स्कार्लेट जेव्हा "लुई' या शॅकमध्ये आली त्यावेळी त्या ठिकाणी शाणाबॉय आणि सॅमसन असे दोघे उपस्थित होते. यावेळी शाणा हा शॅकच्या स्वयंपाकघरात कोकेनचे सेवन करत होता अशी माहिती लोबो याने पोलिसांना दिली आहे. त्यावेळी स्कार्लेटला घेऊन सॅमसन आत आला. स्कार्लेट अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही यावेळी शाणा याने तिला आपण घेत असलेले कोकेन व एक्स्टसीच्या टॅबलेट दिल्या. नंतर सॅमसनने तिच्यावर अत्याचार केल्याचे प्राथमिक पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यानंतर शाणा याला दि. १० फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होता.
एक्स्टसी टॅबलेट स्कार्लेटला शाणा याने हेतुपूर्वक दिल्याचा युक्तिवाद सरकारी वकील पौर्णिमा भरणे यांनी केला. शाणाने हे अमलीपदार्थ कोठून आणले, त्याचे हात अशा व्यवहारांत कोठपर्यंत पोहोचले आहेत, त्याच्या अन्य साथीदारांचाही शोध घेणे गरजेचे आहे, असे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले.
स्कार्लेट ही १७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री ३ वाजता आधीच नशेच्या आहारी गेलेल्या स्थितीत "लुई' नामक शॅकवर आली होती. ती रात्री ८ ते पहाटे ३ या कालावधीत कोठे आणि कोणाबरोबर होती, याचा शोध घेणे गरजेचे आहे. तसेच स्कार्लेटपाशी कोणतेही पैशांचे पाकीट नव्हते. मग आधीच नशेत असलेल्या स्कार्लेटने शाणाकडूनच अमली पदार्थ घेतले, याचा कोणता पुरावा पोलिसांकडे आहे, असे मुद्दे संशयिताचे वकील पीटर डिसोझा यांनी उपस्थित केले.
शाणाने आपण अमलीपदार्थांची विक्री करत असल्याची जबानी यापूर्वी पोलिसांना दिली असल्याने त्याच्याकडून अमलीपदार्थ जप्त करायचे आहेत. तसेच या प्रकरणात अनेक साक्षीदार असल्याने शाणा याला सोडल्यास कोणीही साक्षीदार साक्ष देण्यास पुढे येणार नाही. त्यामुळे त्याला जामीन मंजूर करू नये, असा जोरदार युक्तिवाद सरकारी वकील सौ. भरणे यांनी केला.
त्यानंतर हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याचे मत नोंदवून न्यायालयाने शाणा याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

चुकीच्या हाताळणीमुळे गोव्याची जगभर बदनामी

स्कार्लेट मृत्यूप्रकरणी पर्रीकर यांची टीका
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): ब्रिटिश युवती स्कार्लेट हिचे मृत्यू प्रकरण सरकारने चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे गोव्याची जगभर बदनामी झाल्याची टीका विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली. या प्रकरणाचा छडा लावण्याची पोलिसांची कृती प्रशंसनीय आहेच, परंतु सुरवातीस पोलिसांनी हा केवळ बुडून मृत्यू झाल्याचा दावा करून हे प्रकरण दाबण्याचा जो प्रयत्न केला त्याबाबत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
पोलिस व "गोमेकॉ'चे डॉक्टर यांच्या संगनमताने एखाद्या हत्येची नोंद नैसर्गिक मृत्यू अशी करून लोकांच्या डोळ्यांत धूळफेक केली जाण्याची ही उजेडात आलेली दुसरी घटना आहे. वादग्रस्त ठरलेले पोलिस उपनिरीक्षक नेर्लन आल्बुकर्क हेच तेव्हाही तपास अधिकारी होते, याची आठवण त्यांनी करून दिली. हा प्रकार पाहिल्यास गोव्यात अशा प्रकारच्या अनेक संशयास्पद मृत्यूंची नोंद चुकीच्या पद्धतीने करून पोलिसांकडून प्रकरणे दाबली जातात, हे स्पष्ट झाल्याचा दावा त्यांनी केला.
उत्तर गोव्यातील किनारपट्टी म्हणजे अमलीपदार्थ तस्करीचा केंद्रबिंदू ठरण्याची भीती व्यक्त करून रात्री उशिरापर्यंत तेथे शॅक्स उघडे असणे ही गंभीर बाब असल्याचे पर्रीकर यांनी निदर्शनाला आणून दिले. रात्री उशिरा अमलीपदार्थांचा वापर केला जातो याकडे कोणाचेही लक्ष नाही. याबाबतचा खुलासा अमलीपदार्थविरोधी पथकाने करावा, असे ते म्हणाले. अबकारी आयुक्तालयाकडून आठवड्यातून केवळ एकदा तेथे तपासणी केली जाते. मात्र त्यातून काहीही साध्य होणार नाही, असे पर्रीकर म्हणाले.

आत्महत्या केलेले ते जोडपे आसामचे

मडगाव, दि. १४ (प्रतिनिधी): आसामातील सिलीगुडी येथील सपन व पूनम दत्ता या अवघ्या अकरा महिन्यांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या जोडप्याने दोन महिनेपर्यंत साऱ्या भारतभर मनसोक्त हिंडून घेतले व शेवटचे दोन दिवस निसर्गरम्य गोव्यात घालवून येथेच आपल्या जीवनाचा शेवट केला .मंगळवारी रावणफोंड येथील हॉटेलात विष घेऊन आत्महत्या केलेल्या जोडप्याची ओळख पटलेली असून ते आसाममधील असल्याचा संदेश तेथील पोलिसांकडून मडगाव पोलिसांकडे येऊन थडकला आहे.
त्यंचे नातेवाईक उद्या संध्याकाळपर्यंत येथे दाखल होतील असा अंदाज आहे.सपन दत्ता व पूनम दत्ता अशी त्यांची नावे आहेत व अकरा महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाल्याची माहिती मिळाली आहे.
शवचिकित्सा करण्यासाठी पोलिस त्यांचे नातेवाईक येण्याची प्रतीक्षा करीत आहेत. ते येथे दाखल झाल्यानंतर रीतसर ओळख पटल्यावर मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवले जातील व तो अहवाल मिळाल्यावर ते नातेवाईकांच्या स्वाधीन केले जातील असे सूत्रांनी सांगितले.
पुन्हा शवचिकित्सा टाळण्यासाठी
हणजूण व अन्य काही प्रकरणात नातेवाईकांनी घेतलेल्या हरकतीमुळे दुसऱ्यांदा शवचिकित्सा करण्याचे जे प्रकार घडले तसे या प्रकरणातही होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली गेलेली आहे. पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी देशव्यापी संपर्क साधला होता व त्यांतून ही माहिती मिळाली परंतु अधिक तपशील नातेवाईक येथे दाखल झाल्यावरच मिळेल असे निरीक्षक संतोष देसाई यांनी सांगितले. उभयतांनी हॉटेल रजिस्टरवर दत्ता असे आडनाव दिले होते पण पत्ता कोलकोता असा दिला होता . पोलिसांनी त्या पत्त्यावर संपर्क साधला होता पण काहीच उपयोग झाला नव्हता.त्यांच्या बॅगेत पणजीतील हॉटेल नेपच्यूनची जी तिकिटे सापडली त्यावरून पोलिसांनी नेपच्यून हॉटेलात संपर्क साधला असता तेथे त्यांची खरी नावे व पत्ता सापडला व त्या आधारे आसाम पोलिसांशी संपर्क साधल्यावर सारे दुवे जुळून आलेे.
मिळालेल्या माहितीनुसार सपनचा पूनमशी अकरा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता व वैवाहिक जीवन सुरळीत चाललेले असतानाच साधारण तीन महिन्यांपूर्वी सिलीगुडी येथील त्याच्या चांगल्या चालणाऱ्या कॉझमेटीक्सच्या दुकानाला अकस्मात आग लागली व ते संपूर्ण खाक झाले .या प्रकाराने सैरभैर झालेल्या सपनने हाय खाल्ली व काही दिवस तेथे थांबून तो पत्नीला घेऊन घरांतून बेपत्ता झाला. घरच्या लोकांनी त्याच्या शोधाचे अनेक प्रयत्न करूनही काहीच उपयोग झाला नव्हता.दोन महिने इतस्ततः भटकूनही चित्त स्थिर न झालेल्या त्याने आपल्या पत्नीसह गोव्यात येऊन जीवनाचा शेवट केलेला असावा.

Thursday, 13 March 2008

"ड्रग्ज'च्या अतिसेवनानेच स्कार्लेट हिचा मृत्यू

बलात्कारप्रकरणी आणखी एकास अटक
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): आईच्या बेपर्वाईचा बळी ठरलेली पंधरा वर्षीय स्कार्लेट हिचा मृत्यू अमली पदार्थाचे अतिसेवन आणि बलात्कारामुळे झाल्याचा खुलासा आज पोलिस महानिरीक्षक किशनकुमार यांनी केला. स्कार्लेटचा खून आणि बलात्कार प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी प्लासादो कार्व्हालो ऊर्फ शाणा याला अटक केली आहे. शाणा याने तिला अमली पदार्थाचा अतिडोस दिला, तर सेमसन डिसोझा याने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याने स्कार्लेटचा मृत्यू झाल्याचे सध्याच्या पोलिस तपासात उघड झाल्याचे पोलिस महानिरीक्षक किशनकुमार यांनी सांगितले. पोलिसांनी शाणा याला भा.दं.सं ३७६, ३०२ व फौजदारी गुन्हा ३४ तर सेमसन याला ३०२, ३७६, ३२८ व फौजदारी गुन्हा ३४ नुसार अचानक केली आहे.
या प्रकरणाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिल्याने स्वतः पोलिस महानिरीक्षक किशनकुमार आणि उत्तर गोवा अधीक्षक बॉस्को जॉर्ज या प्रकरणात लक्ष घालून तपासकाम करीत आहे.
प्राथमिक तपासात उघड झालेल्या माहितीनुसार दि. १८ रोजी पहाटे ३ वाजता स्कार्लेट दारूच्या नशेत हणजूण येथे समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या 'लुई' या शॅक्सवर आली होती. यावेळी शॅक्सच्या पायऱ्या चढतानाच ती खाली कोसळली. यावेळी शॅक्समध्ये सुमारे दहा व्यक्ती उपस्थित होते. खाली पडलेली स्कार्लेट तशीच उभी राहिली. यावेळी शॅक्सच्या काऊंटरवर सेमसन डिसोझा होता. तर तेथेच शाणाही होता. यावेळी ती सेमसनकडे बोलायला लागली. सेमसनने तिच्याशी लैंगिक चाळे करण्यास सुरुवात केल्याने अनेकांनी त्याला अडवले होते. परंतु सेमसन आणि शाणा तिला शॅक्सच्या स्वयंपाकघरात घेऊन गेले. तेथे त्यांनी तिला "एलएसडी', "एक्स्टसी' आणि "कोकेन' या तीन अमली पदार्थाचे "कॉकटेल' करून सेवन करायला दिले. त्यानंतर सेमसन तिला घेऊन शॅक्सच्या मागे गेला. यावेळी शाणा व सेमसमने तिच्याशी संभोग केला. त्यानंतर शाणा निघून गेला. पहाटे ४ पर्यंत सेमसन तिच्याबरोबर शॅक्सच्या मागे होता. त्यानंतर तो तिला घेऊन जवळच असलेल्या एका "सन बॅड'वर गेला. त्यावेळी स्कार्लेट पूर्णपणे बेशुद्ध झाली होता. त्या बॅडवर असताना तिने थोडे डोळे उघडले होते. परंतु पुन्हा बेशुद्ध झाल्याने सेमसन घाबरला. त्यावेळी काही अंतरावरून एक व्यक्ती टॉर्च हातात घेऊन येत असल्याचे पाहिल्याने त्याने तिला तेथून टाकून पळ काढला. यावेळी स्कार्लेट तोंडाने खाली कोसळली. सकाळी समुद्राला भरती आल्याने मृत्यूची शेवटची घटका मोजणाऱ्या स्कार्लेटच्या नाकात आणि तोंडात पाणी गेल्याने तिला मृत्यू आला, अशी माहिती किशनकुमार यांनी दिली. या संपूर्ण प्रकरणात "मसाला' नावाने ओळखला जाणारी व्यक्ती महत्त्वाची असून येत्या काही दिवसांत त्याला ताब्यात घेतले जाणार असल्याचे श्री. कुमार म्हणाले.
या प्रकरणात सुरुवातीला हलगर्जीपणा केल्याच्या सबबीखाली आज दुपारी उपनिरीक्षक नेर्लोन आर्ल्बुकर्क याला निलंबित करण्यात आल्याचे पोलिस महानिरीक्षक किशनकुमार यांनी सांगितले. ते आज पोलिस मुख्यालयात घेतलेल्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच स्थानिक पत्रकारांसमोर बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर पोलिस अधिकारी रवींद्र यादव व उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज उपस्थित होते.
यापूर्वी संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या सेमसन डिसोझा यांनी त्या रात्री तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याची कबुली दिल्यानंतर आणि या घटनेची अन्य गुप्त माहिती उघड केल्याने काल रात्री शाणा वकिलाला भेटायला गेला असता त्या ठिकाणाहून पोलिसांनी ताब्यात घेतले.
स्कार्लेट हिचा खून झाल्याचा गुन्हा नोंद केल्यानंतर संशयित म्हणून सेमसन डिसोझा याला ताब्यात घेण्यात आले होते. डिसोझा याला अटक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर स्कार्लेटचा मित्र गाइड ज्युलीयो लोबो व प्लासादो कार्व्हालो ऊर्फ शाणा याने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु काल हे दोन्ही अर्ज फेटाळून लावल्याने शाणाबॉय याला अटक करण्यात आली होती. स्कार्लेटच्या "व्हिसेरा'ची उद्या गुरुवारी मुंबई येथील कलिना प्रयोग शाळेत चाचणी होणार आहे. या अहवालानंतर अन्य अनेक पुरावे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
कोण हा शाणाबॉय ?
प्लासादो कार्व्हालो हा हणजूण समुद्र किनाऱ्यावर विदेशी पर्यटकांना अमली पदार्थ उपलब्ध करून देण्याचे काम करतो. तसेच विदेशी तरुणींना पटवून त्यांना आपल्या जाळ्यात फसवून त्यांच्याबरोबर मौजमजा करण्याचाही त्याला छंद आहे. दि. १८ फेब्रुवारी स्कार्लेटबरोबर त्या शॅकमध्ये शाणासोबत होता. त्यानेच त्याला "एलएसडी', "एक्स्टसी' आणि "कोकेन' या तीन अमली पदार्थाचे "कॉकटेल' करून सेवन करायला दिले होते. शाणाबॉय याचे अनेक पोलिस अधिकाऱ्यांशीही जवळचे संबंध असल्याचे बोलले जात आहे.
साक्षीदाराशी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार दि. १८ फेब्रुवारीच्या पहाटे शाणाबॉय याने तिला अमली पदार्थ दिले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिला किनाऱ्यावरच सोडून निघून गेला.
सेमसन डिसोझाचा सहभाग
मृत्यूच्या काही तासांपूर्वी सेमसन हा स्कार्लेटसोबत होता. "आपण तिच्यावर बलात्कार केलेला नाही, तर सहमतीने शारीरिक संबंध ठेवले होते. त्या पहाटेही तिच्याशी शारीरिक संबंध आले होते. परंतु मी किनाऱ्यावरून जाईपर्यंत ती जिवंत होती' असे सेमसन याने पोलिसांना सांगितले आहे. हणजूण येथे राहणारा २९ वर्षीय सेमसॉन हा विवाहित असून त्याला दोन मुलेही असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी सेमसनची चप्पल सापडल्या. तो सर्वांत आधी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
हणजूण ड्रग्ज माफियांच्या कबज्यात
या घटनेमुळे हणजूण समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची विक्री केली जात असल्याची माहिती उघडकीस आली आहे. सुरुवातीला या खुनामागे ड्रग्ज माफियांचा हात असल्याने त्या दृष्टीने तपासकाम सुरू करण्यात आले होते. परंतु अचानक ही दिशा बदलून वेगळ्या दिशेने तपासकाम केल्याचा आरोप फियोना मेकहॉन हिचे वकील विक्रम वर्मा यांनी केला आहे.

सकारात्मक बातम्यांवर भर द्याः ब्रह्मेशानंदाचार्य

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): वृत्तपत्रांनी सकारात्मक बातम्या द्याव्यात आणि निकोप समाजमन घडवावे,अशी अपेक्षा कुंडई येथील तपोभूमीचे पीठाधीश श्रीब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांनी "गोवादूत'शी बोलताना व्यक्त केली. आजकाल भडक व गुन्हेगारीच्या बातम्यांना प्राधान्य देण्याकडे वृत्तपत्रांचा कल दिसतो. "गोवादूत'याला अपवाद ठरत असल्याचे सांगून या नव्या वृत्तपत्राची वाटचाल एखाद्या प्रस्थापित वृत्तपत्राच्या तोडीची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संस्कृती संवर्धन व नीतिमत्ता यांना प्राधान्य देणारे एकमेव वृत्तपत्र असा त्यांनी "गोवादूत'चा गौरव केला. आज वाढदिनी त्यांना "गोवादूत'परिवाराच्यावतीने शुभेच्छा देण्यासाठी व्यवस्थापन मंडळाने त्यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी आपली प्रांजळ मते व्यक्त करून आपल्या शुभेच्छा दिल्या.

पंडित प्रभूदेव सरदार यांचे निधन

शास्त्रीय संगीत परंपरेतील तारा निखळला
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): "विलोपले मधूमिलनात या' हे नाट्यगीत अजरामर करणारे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायक पंडित प्रभूदेव सरदार यांचे आज (गुरुवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांच्या घरी ह्रदयविकाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.
आपल्या घरी एका विद्यार्थ्याला हार्मोनियम घेऊन राग "मियॉं मल्हार' शिकवत असताना त्यांचे अंग दुखू लागले. त्यामुळे ते आतील खोलीत गेले ते पुन्हा बाहेर आलेच नाहीत. पं. सरदार यांनी आपल्या मृत्यूनंतर देहदान करण्याची इच्छा व्यक्त केल्याने उद्या (शुक्रवारी) सकाळी ९.३० पर्यंत त्यांचा पार्थिव राहत्या घरी शेवटच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पंडितजींच्या इच्छेनुसार सोलापूर येथील एका इस्पितळात त्यांचे देहदान केले जाणार आहे, अशी माहिती त्यांची पत्नी निर्मला सरदार यांनी दिली. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले व सुना असा परिवार आहे. त्यांचा देशविदेशात मोठा रसिकवर्ग आणि शिष्यवर्ग आहे.
२००० साली पं. सरदार कला अकादमीच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विभागाचे संचालक म्हणून रुजू झाले. या काळात त्यांनी गोव्यात अनेकांना गायन कलेत निपुण केले.
१९६२ मध्ये प्रभुदेवांची बदली ज्यावेळी मुंबईला झाली त्यावेळी त्यांनी प्रसिद्ध आग्रा घराण्यातून जगन्नाथबुवा पुरोहित ज्यांनी जोग कंस आणि स्वानंदासारख्या रागांची निर्मिती केली अशा महान गुरूंकडून संगीताचे धडे गिरवण्यास सुरवात केली. त्यांच्याकडे पाच वर्षे संगीताचे धडे गिरवल्यावर पं. प्रभूदेव आपल्या संगीताचा सराव करण्यासाठी पंडित निवृत्तीबुवा सरनाईक (जयपूर) यांच्या नेतृत्वाखाली रियाज करू लागले. वेगवेगवेळ्य संगीत विद्यालयातून संगीत घेतल्यानंतर पंडितजींनी आपली अशी वेगळी गायनशैली निर्माण केली होती.
पं.सरदार आपल्या या गायकीला आग्रा-जयपूर आणि किराणा शैलीची गायकी असे म्हणत. आपल्या गुरूंनी आपल्यावर कोणताही गायकी न लादता कोणतीही गायकीचा अभ्यास स्वतंत्र दिल्याचेही अनेक वेळा ते सांगत होते. त्यांना नेहमीच "कलाकाराने श्रोत्यांना जे आवडले त्याप्रमाणे आपले असे वेगळेपण करावे' असे त्यांना वाटत होते. शेवटी कलाकार हा फक्त रसिकांना आनंद देत असतो.
दरबारी कानडा, मियॉे की मल्हार, मालकंस, ललित आणि तोडी हे त्यांचे आवडीचे राग तर उस्ताद अमीर खान, कुमार गंधर्व, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, हिराबाई बडोदेकर आणि रोशनतारा बेगम या त्यांच्या आवडीचे गायक. उपाशी पोटी कोणतीही साधना होऊ शकत नसल्याने पंडितजींनी संगीताची व्रत म्हणून उपासना केली. त्यांच्या अनेक शिष्यापैंकी श्रीकृष्ण खाडिलकर, सुजन साळकर, श्याम गुंडावर आणि आश्विनी वार्संकर ही मंडळी नावारुपाला आली आहेत.
_________________________________________
मरणोत्तर देहदान
पं. सरदार यांनी आपल्या मृत्यूनंतर देहदान करण्याची इच्छा व्यक्त केल्याने उद्या (शुक्रवारी) सकाळी ९.३० पर्यंत त्यांचा पार्थिव राहत्या घरी शेवटच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पंडितजींच्या इच्छेनुसार सोलापूर येथील एका इस्पितळात त्यांचे देहदान केले जाणार आहे, अशी माहिती त्यांची पत्नी निर्मला सरदार यांनी दिली.
_________________________________________

प्रतिक्रिया
डॉ. पांडुरंग फळदेसाई (कला अकादमी सदस्य सचिव)
पंडितजींच्या निधनामुळे अकादमीचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. अकादमीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य म्हटले पाहिजे. हिंदुस्थानी संगीत विभागाचे संचालक पद सांभाळल्यानंतर त्यांनी अनेक कलाकार घडवले. ते कलाकार म्हणून उत्कृष्ट होते तसेच गुरु म्हणूनही चांगले होते.
------------------
प्रा. कमलाकर नाईक (संगीत महाविद्यालय)
पंडितजी हे हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातील एका चांगले उपासक तसेच अभ्यासक होते. त्यामुळे संगीताची हानी झाली आहे. ठुमरी आणि दादरा या गायन प्रकारावर त्यांचा चांगला अधिकार होता. तसेच या गायनशैलीचा त्यांचा दांडगा व्यासंग होता.
--------
पद्मभूषण पं. प्रसाद सावकार
पंडितजी गुणी कलाकार होते. अनेक वर्षे सरकारी वकील म्हणून काम पाहूनही त्यांनी गाणे आत्मसात केले. आम्ही पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडे त्यांच्या साथीत संगीताचे धडे घेत होतो. त्यांचा आवाज अत्यंत गोड होता, तो त्यांनी शेवट पर्यंत टिकवून ठेवला होता. "विलोपले मधूमिलनात या'या नाट्य गीतामुळे ते अधिक प्रसिद्धीस आले.

...तर सरकार टिकणार नाही

मडकईकरांच्या कार्यकर्त्यांचा इशारा
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): बहुजन समाजाला डिवचून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपली खुर्ची सांभाळण्याचा जर प्रयत्न चालवला असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत. पांडुरंग मडकईकर यांना पुन्हा सन्मानाने मंत्रिपदी बसवले नाही तर हे सरकार अजिबात टिकणार नाही,असा गर्भित इशारा कुंभारजुवे मतदारसंघातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत देण्यात आला.
आज जुने गोवे पंचायत सभागृहात आयोजित खास जाहीर सभेत कुंभारजुवे मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी पांडुरंग मडकईकर यांचे मंत्रिपद काढून घेतल्याबद्दल मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा निषेध केला. जोपर्यंत ते मडकईकर यांना पुन्हा मंत्रिपदी आरूढ करीत नाहीत तोपर्यंत त्यांनी या मतदारसंघात पाय ठेवू नये. यापुढे त्यांना राज्यात सर्वत्र काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
येत्या शनिवार १५ रोजी जुने गोवे येथील गांधी चौकाजवळ भव्य जाहीर सभा आयोजित केली जाणार आहे. मडकईकर यांचे राज्यभरातील सर्व समर्थक तथा हितचिंतक या बैठकीला उपस्थित राहणार असून शक्तीप्रदर्शनच घडवून आणणार असल्याची घोषणा पक्षाचे पदाधिकारी तथा प्रदेश कॉंग्रेसचे सदस्य मारीयो पिंटो यांनी जाहीर केले. भाजप सरकार सत्तेवर असताना माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कॉंग्रेसच्या एका नेत्याला तुरुंगात टाकण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. यावेळी सदर नेत्याने खटपटीवरून पर्रीकर यांचे सरकार पाडले. याकाळात मडकईकर निःस्वार्थीपणाने कॉंग्रेसमध्ये गेले परंतु "पेटी" च्या आशेने कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले दिगंबर कामत यांना कॉंग्रेसच्या तत्त्वांची काहीही माहिती नाही, असा ठपका श्री.पिंटो यांनी ठेवला. आपली खुर्ची सांभाळण्यासाठी त्यांनी जो खेळ चालवला आहे, तो कोणताही स्वाभिमानी नेता खपवून घेणार नव्हता. मडकईकरांचे मंत्रिपद काढून घेणे ही फक्त सुरुवात आहे. यापुढे अर्थसंकल्पानंतर वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांच्याकडील वित्त खाते काढून घेणे, रवी नाईक यांना संपवणे आदी अनेक डाव आघाडीतील तथाकथित गटाने आखल्याचा आरोप त्यांनी केला. दोन वेळा दिगंबर कामत यांना पाडण्यासाठी पुढे सरसावलेल्या सुदिन ढवळीकर यांना अशाप्रकारे आपल्या पक्षाच्या नेत्याचा बळी देऊन सन्मानाने खुर्चीवर बसवण्याची कृती हा निर्लज्जपणाचा कळस आहे, असा आरोप करून दिगंबर यांना खरोखरच स्वाभिमान असेल तर ते सरकारच बरखास्त करून नव्याने निवडणुकीला सामोरे जाणार, अशीही पुस्ती जोडण्यात आली.
राज्यातील कॉंग्रेस नेते पक्षाच्या नावावर धंदा करीत आहेत. भाजपवर जातीयवादाचे आरोप करून लोकांना फसवून कॉंग्रेस नेते आपली पोळी भाजून घेत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. प्रत्येक गोष्टीवर "हायकमांड' असा उल्लेख करणाऱ्या कामत यांनी ही जबाबदारी श्रेष्ठींवरच सोपवावी असाही टोमणा श्री.पिंटो यांनी हाणला.
दिगंबर कामत यांच्याकडे निर्णय क्षमता अजिबात नाही हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. गृह व वित्त खाते त्यांना न देण्यामागचे हेच मुख्य कारण असल्याचे सांगून असा मुख्यमंत्री अजिबात नको,अशी टीका विल्सन फर्नांडिस यांनी केली. कॉंग्रेसचे काही नेते सध्या पक्ष संपवण्यास पुढे सरसावलेले असून त्यांना वेळीच ठेचण्याची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त झाले. सभेला मतदारसंघातील अनेक प्रमुख कार्यकर्ते तथा पदाधिकारी हजर होते. त्यात माजी आमदार कृष्णा कुट्टीकर, कुंभारजुवा मतदारसंघ गटाध्यक्ष अवधूत नाईक,चोडणचे सरपंच प्रसाद चोडणकर,प्रदेश कॉंग्रेस सदस्य बॅनी,सेवा दलाचे प्रसाद धुळापकर आदी उपस्थित होते.

विकासकामांबाबत जनता समाधानीः मुख्यमंत्री

तीन पुलांची पायाभरणी
मडगाव, दि. १३ (प्रतिनिधी): आपल्या सरकारने गेल्या नऊ महिन्यांत या राज्याचा जो विकास केला आहे, त्याबद्दल जनतेमध्ये समाधानाची भावना असून तातडीने निवडणूक झाल्यास २५ ते ३० जागा जिंकून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पुन्हा सत्तेवर येईल, असा दावा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज येथे केला. केळशी ते असोळणा, वार्का ते सिकेरी व वार्का ते तळावली या तीन पुलांच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते.
कॉंग्रेस व राष्ट्रवादीची युती भक्कम असून, अन्य कोणाचाही पाठिंबा सरकारला गरज नसल्याचे ठाम निवेदन यावेळी कॉंग्रेस नेत्यांनी केले.
आपण निवडणुकीवेळी दिलेले आश्वासन पाळल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी यावेळी सांगितले.
राज्याची आर्थिक स्थिती मजबूत असून, प्रथमच १२०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे अर्थमंत्री दयानंद नार्वेकर यांनी सांगितले. पालिका मंत्री जोकीम आलेमाव, गृहमंत्री रवी नाईक, जुझे फिलीप डिसोझा, फिलीप नेरी आदी मंत्री यावेळी उपस्थित होते.

Wednesday, 12 March 2008

मडकईकरांना डच्चू, ढवळीकरांना मंत्रिपद

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज अखेर वाहतूक व समाजकल्याणमंत्री पांडुरंग मडकईकर यांचा पत्ता काटून मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लावली. आज अचानक गतिमान बनलेल्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल एस.सी.जमीर यांनी सुदिन ढवळीकर यांना मंत्रिपदाची शपथ दिली.
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री तथा भाग्यविधाते स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जयंतीदिनी मगोपच्या आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या संपूर्ण राजकीय नाट्यात बळी ठरलेले मंत्रिमंडळातील एकमेव अनुसूचित जमातीचे सदस्य तथा तिसवाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्यावरील अन्यायामुळे त्यांचे कार्यकर्ते तथा अनुसूचित जमातीचे नेते भडकले असून त्यांनी कॉंग्रेस विरोधात बंडाचा झेंडा उगारला आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लावून अखेर "फार्म्यूल्या"ची पहिली अट मान्य केली. सार्वजनिक बांधकाम खाते राष्ट्रवादीकडे देणे व दयानंद नार्वेकर यांच्याकडून वित्त खाते काढून घेणे आदी निर्णयांबाबत मात्र मुख्यमंत्री कामत यांनी मौन पाळले आहे.
आघाडी सरकारच्या समन्वय समितीने तयार केलेल्या "फॉर्म्यूला"ची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्लीहून घेऊन आज सकाळीच गोव्यात परतलेल्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब हा आदेश अमलात आणला. आज संध्याकाळी साडेपाच वाजता राजभवनवर झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभात राज्यपाल एस.सी.जमीर यांनी श्री.ढवळीकर यांना मंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी राष्ट्रवादीचे महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा, थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर व मगोपचे आमदार दीपक ढवळीकर वगळता एकही मंत्री किंवा आमदार उपस्थित नव्हता. आरोग्यमंत्री विश्वजित राणे व पर्यटनमंत्री मिकी पाशेको हे राज्याबाहेर असल्याने गैरहजर होते, अशी माहिती देण्यात आली. कॉंग्रेसमध्ये मात्र या निर्णयाविरोधात वातावरण बरेच तापले आहे. पक्षातील अनुसूचित जमातीच्या नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी आपापली पदे सोडण्याचा निर्णय घेतल्याची खबर आहे. सत्ता टिकवण्यासाठी जर ढवळीकरांना मंत्रिपद देण्यात येते तर आम्हाला का नाही, असा सवाल उपस्थित करून कॉंग्रेस पक्षातील मंत्रिपदापासून वंचित असलेल्या आमदारांनी बंडाची तयारी केल्याचीही खबर आहे.
हा निर्णय समन्वय समितीने घेतल्याने त्याबाबत केवळ कार्यवाही करण्याची जबाबदारी आपली होती, असे सांगून सरकारच्या स्थिरतेसाठी या गोष्टी आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सुदिन ढवळीकर यांनी आपण मंत्री या नात्याने संपूर्ण गोव्याच्या विकासाला चालना मिळवून देणार व खास करून ग्रामीण भागांतील लोकांपर्यंत सरकारच्या योजना पोहचवणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री जी जबाबदारी देतील ती स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणी त्यांनी आपले नेते शरद पवार यांच्या इच्छेनुसार हे घडल्याची माहिती दिली.
सासष्टीचे प्राबल्य
सध्या मंत्रिमंडळाचा समतोल पूर्णपणे बिघडला आहे. मंत्रिमंडळात केवळ सासष्टी तालुक्यातील मंत्र्यांची संख्या एकूण पाच आहे. पेडणे-१, बार्देश-१,केपे-१,मुरगाव-१,सत्तरी-१,फोंडा-२ अशी बनली आहे.

मडकईकरांची तीव्र नाराजी

तीन वर्षापूर्वी भाजपची आमदारकी व मंत्रिपद सोडून केवळ कॉंग्रेसचे सरकार बनवण्यासाठी आपण केलेल्या त्यागाची पावती आज कॉंग्रेसने पाठीत खंजीर खुपसून दिली, अशी टीका पांडुरंग मडकईकर यांनी केली. सरकारच्या स्थिरतेसाठी केलेला हा बदल अस्थिरता वाढवण्यास कारणीभूत ठरेल, असे ते म्हणाले.
आजच्या निर्णयाची कोणतीही माहिती न देता सरळ आपल्या जागी मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांची वर्णी लावल्याची खबर मिळाल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी शेवटपर्यंत आपल्याला गाफील ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. उद्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली असून ते काय निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल,अशी माहिती त्यांनी दिली. शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री वगळता एकही कॉंग्रेस मंत्री किंवा आमदार हजर नव्हता हीच पुढील कृतीची नांदी आहे,असा गर्भित इशाराही त्यांनी दिला. कॉंग्रेसचे सर्व आमदार व मंत्री आपल्या पाठींशी असून हा डाव खेळलेल्यांना येत्या दिवसांत योग्य धडा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गोव्याच्या संपूर्ण इतिहासात बहुजन समाजाची गळचेपी करणाऱ्या दोन ते तीन टक्के लोकसंख्या असलेल्या समाजातील लोकांनी ३० टक्के लोकसंख्या असलेल्या लोकांचा अशा प्रकारे गळा कापण्याऱ्यांना वेळ येताच योग्य धडा शिकवू असा इशाराही त्यांनी दिला. आपल्यावरील अन्यायाबाबत मोर्चा काढून निषेध नोंदवण्याची अनेकांनी तयार केली असता त्यांना आपण रोखल्याचे ते म्हणाले. अनुसूचित जमातीच्या लोकांपर्यंत सरकारच्या विविध योजना पोचवण्यापासून ते या समाजाला पुढे येण्यासाठी घेतलेला पुढाकार विरोधकांना खुपला व त्याचमुळे आपला नाहक बळी दिल्याचे ते म्हणाले. अनुसूचित जमात विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा उद्या सरकारला सादर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

भरधाव टिपरखाली विद्यार्थिनी ठार

रावणफोंड येथील अपघात
मडगाव, दि.१२ (प्रतिनिधी): रावणफोंड येथे आज भरधाव टिपरखाली सापडून जेसिला कार्व्हालोे (१६) ही शाळकरी मुलगी जागीच ठार झाली व पुन्हा एकदा राज्यातील अंदाधुंद सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्र्न ऐरणीवर आला.
मयत जेसिला ही दहावीत शिकणारी मुलगी वार्षिक परीक्षा जवळ आल्याने शिकवणीवर्गाला सायकलवरून जाताना हा अपघात झाला. रावणफोंड-नावेली रस्त्यावर नाल्याजवळच्या अरुंद रस्त्यावर मागून येणाऱ्या जीए०२ -टी -७४३४ या टिपरने तिला ओव्हरटेक करून जाताना धडक दिली असता ती खाली पडली व टिपरच्या मागच्या टायरखाली सापडली . तिला जागीच मृत्यू आला. लगेच तिला हॉस्पिसियोत दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पोलिसांनी पंचनामा करून टिपरचालकाविरुध्द निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदविला आहे. सदर रस्ता अत्यंत अरूंद असूनही राजकीय हस्तक्षेपामुळे त्याचे रुंदीकरण केले जात नाही असा आरोप होत आहे.

सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्यांच्या वाढदिनी आज विशेष कार्यक्रम

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): कुंडई तपोभूमीचे पीठाधीश श्रीमत् सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांचा वाढदिवस गुरुवार दि. १३ रोजी साजरा केला जात असून, सकाळी ११ ते १ व नंतर संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी १० वाजता पाद्यपूजा, १ते २ महाप्रसाद व संध्याकाळी ५ वाजल्यापासून सांस्कृतिक कार्यक्रम होतील, यात सांप्रदायिक प्रार्थना, हरिपाठ (कुडका संतसमाज), श्रीब्रह्मानंद संगीत विद्यालयातर्फे भजन, श्रीब्रह्मानंद कीर्तन विद्यालयातर्फे कीर्तन, संप्रदाय आद्यस्तंभाचा गौरव समारंभ व बाबांचे आशीर्वचन, आरती, दर्शनसोहळा व महाप्रसादाने सांगता असे कार्यक्रम होतील.

स्कार्लेट खून प्रकरणाचा दोन दिवसांत उलगडा

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): येत्या ४८ तासांत स्कार्लेट खून प्रकरणाचे गूढ उलगडण्यात येणार असल्याचा दावा आज पोलिस महानिरीक्षक किशनकुमार यांनी केला आहे. तर मयत स्कार्लेटची आई फियोना मेकहॉन हिने आरोपीला पकडून आपल्याला न्याय द्यावा,अशी याचना करणारे एक पत्र पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना केले आहे. तसेच त्याची एकप्रत केंद्रीय गृहखात्यालाही पाठवण्यात आली आहे. पोलिसांनी या रहस्यमय खुनाचे सर्व धागेदोरे हाती लागले असून त्यांची फक्त जुळवा जुळव करण्याचे काम सुरू असून या प्रकरणाचा पूर्ण भांडाफोड केला जाणार असल्याचे श्री. कुमार म्हणाले. फियोना हिने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना केलेल्या पत्रात आरोपी, पोलिस व काही राजकारण्याचे गठबंधन असल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणाचा जलद गतीने तपास काम सुरू असून येत्या काही तासात त्याचा उलगडा होणार असल्याचा दावा महानिरीक्षक कुमार यांनी केला. अद्याप स्कार्लेट खून प्रकरणात कोणालाच अटक करण्यात आलेली नाही. परंतु काल रात्री आपल्या अल्पवयीन मुलीला परक्या देशात अनोळखी व्यक्तीकडे सोडून गेलेल्या फियोना या स्कार्लेटच्या आईची पोलिसांनी उलट तपासणी घेतली आहे. परंतु या तपासणीत काय उघड झाले आहे, त्याची वाच्यता पोलिसांनी केलेली नाही.
सध्या पोलिस "मसाला' या विदेशी व्यक्तीच्या शोधात आहे. त्याने एका इंग्रजी वृत्तपत्राला आपण स्कार्लेटचा खून होताना पाहिल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी या व्यक्तीने पोलिसांची परवानगी न घेता भारत सोडून नये, असा आदेश काढला आहे. त्यामुळे हा व्यक्ती पोलिसांच्या हाती लागल्यावर या खुनाचा उलगडा होण्याची शक्यता आहे. "मसाला' या व्यक्तीची या प्रकरणाचा उलगडा होण्यासाठी महत्त्वाची भूमिका ठरणार असून त्याला कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घेतले जाणार असल्याचे उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी म्हटले आहे.
पोलिसांनी यापूर्वी सेमसन डिसोझा या व्यक्तीला यापूर्वी बलात्कार प्रकरणात ताब्यात घेतलेला आहे. आपण तिच्यावर बलात्कार केल्याचे डिसोझा याने अमान्य केले असून आपले तिच्या बरोबर शारीरिक संबंध होते, अशी माहिती पोलिसांना दिली आहे. तसेच आपण तिला समुद्रावर पहाटे सोडून गेलो होतो, त्यावेळी ती जिवंत होती, असेही सांगितले आहे.
-----------------------------------
स्कार्लेट खून प्रकरणात काही राष्ट्रीय वृत्त वाहिनी मातृभूमीचे नाव बदनाम कण्याचा प्रयत्न करीत असून ही लाजिरवाणी बाब असल्याची टिका अखिल गोवा विद्यार्थी मंचाचे निमंत्रक दुर्गादास कामत यांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपीला शोधून त्याला शिक्षा देई पर्यंत मंचाचा गोवा पोलिसाला पूर्ण पाठिंबा असणार असल्याचे श्री. कामत यांनी म्हटले आहे. परंतु काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्त वाहिनी याचा फायदा उठवून गोव्यावर चिखल फेक करण्याचा प्रयत्न करत असून हे गोव्यासाठी आणि पर्यटन व्यवसायासाठी हानिकारक असल्याचे श्री. कामत यांनी म्हटले आहे. गोव्यातील बिन सरकारी संस्थानी आणि सर्व पक्षाने गोव्याच्या नाव बदनाम करणाऱ्या रोखण्याचे आवाहन श्री. कामत यांनी शेवटी केले आहे.

सेमसनचा जामीनअर्ज फेटाळला

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): अल्पवयीन स्कार्लेट बलात्कार प्रकरण बाल न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याने या प्रकरणातील सेमसन डिसोझा याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला, तर पोलिसांनी दुसऱ्या शवचिकित्सेनंतर बाल कायदा कलम ८(१)(२) नुसार गुन्ह्याची नोंद केल्याने आम्ही हे प्रकरण बाल न्यायालयात दाखल करत असल्याचे सांगितल्याने आज सत्र न्यायालयाने त्याला अनुमती दिली. त्यामुळे बलात्कार प्रकरणातील संशयित सेमसन डिसोझा यांनी सादर केलेला जामीन अर्ज तसेच प्लासिदो सिरील कार्व्हालो व गाइड जुलियो लोबो यांनी न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
येत्या दोन दिवसांत बाल न्यायालयात हा अर्ज दाखल होण्याची शक्यता असल्याने येत्या शुक्रवारी किंवा सोमवारी या अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी या प्रकरणात प्लासीदो सिरील कार्व्हालो, लुईस कुदिनो, चंद्रू चव्हाण, चंद्रकांत माद्रेकर, विकास तमंग, रमेश शब्कोता व मुरलीसागर बोलोजो यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. दि. १८ फेब्रुवारीच्या पहाटे "लुई' या शॅकमध्ये स्कार्लेट ही नशेत धुंद होऊन सेमसॉन आणि "मसाला' या टोपण नावाने ओळखला जाणारा एका विदेशी व्यक्तीकडे बोलत होती. त्यानंतर सकाळी उठल्यावर आपण त्या तरुणीचा मृतदेह शॅकच्या बाजूला समुद्र किनारी पाहिल्याचे चंद्रू यांनी पोलिसांना दिलेल्या आपल्या जबानीत म्हटले आहे. त्यानंतर सकाळी सेमसन यांनी छोटू या नावाने ओळखला जाणाऱ्या एका मुलाला आपली त्या मृतदेहाकडे पडलेली चप्पल आणायला लावल्याचेही त्यांनी जबानीत म्हटले आहे. तसेच मसाला आणि सेमसॉन हे दोघेही स्कार्लेटच्या मृत्यूमुळे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत असल्याचे त्यांनी एैकल्याचे म्हटले आहे.
सध्या "मसाला' हा या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरला असून पोलिस त्याच्या शोधात आहे. ही व्यक्ती पोलिसांच्या हाती लागल्यानंतर अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे.

गुणवाढप्रकरणी अंतिम मुदत

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): गुणवाढ प्रकरणात गुंतलेले गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष एल.एम.टी. फर्नांडिस यांना निलंबित करण्यासाठी सरकारला आजची शेवटची मुदत देऊनही कारवाई करण्यात आली नसल्याने आज शिक्षण खात्याचे सचिवांची भेट घेऊन ४८ तासांचा दुसरा इशारा देण्यात आला आहे, ही मुदत दि. १४ मार्च रोजी संपत असून त्यानंतर प्रत्यक्ष कृती करण्यात येणार असल्याचे उच्च माध्यमिक प्राचार्य संघटनेचे माजी अध्यक्ष नारायण देसाई यांनी सांगितले. गेल्या सात महिन्यांत या प्रकरणावर तोडगा काढण्यात मुख्यमंत्री दिगंबर कामत व शिक्षण सचिवांना अपयश आल्याने त्यांच्यावरील विश्वास उडाल्याचे ते यावेळी म्हणाले. उद्या दि. १३ रोजी शिक्षण खात्याचे सचिवांनी या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आंदोलनकर्त्यांना बोलावले असल्याची माहिती मिळाली आहे.
मंडळाचे अध्यक्ष फर्नांडिस यांना निलंबित करून त्यांनी केलेल्या गैरप्रकारांची व मंडळात केलेल्या गैरकृत्यांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी कायम असल्याचे श्री. देसाई म्हणाले. तसेच गुणवाढ प्रकरण पालकांना गंभीर दिसत असल्यास त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन उच्च माध्यमिक प्राचार्य संघटनेचे केले आहे.
या गुणवाढ प्रकरणात अध्यक्षांबरोबर अन्य एकाचा हात असून सध्या त्याला बारावीच्या परीक्षा केंद्राच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु याविषयीचा कोणताही आदेश शालान्त मंडळाने काढलेला नाही. तरीही या अधिकाऱ्याने विद्यालयात जाऊन परीक्षा घेतली असून ते बेकायदेशीर असल्याचे आरोप करण्यात आला आहे.

Tuesday, 11 March 2008

स्कार्लेटच्या आईचे वास्तव्य संशयास्पद

पोलिसांकडून चौकशी सुरु
सीबीआय तपास नाही : कामत
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) : स्कार्लेट खून प्रकरणात गोवा पोलिस योग्य दिशेने तपास करीत असून दोन दिवसांत या प्रकरणाची कोंडी फोडली जाणार असल्याने "सीबीआय'मार्फत चौकशी करण्याची कोणताही गरज नसल्याचा दावा आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केला आहे तर पोलिसांनी स्कार्लेट हिच्या आईच्या वास्तव्याबाबत चौकशी करण्यावर भर दिला आहे. सहा महिन्यांच्या पर्यटन व्हिसावर आठ मुलांसह गोव्यात आल्यावर स्कार्लेटला येथेच ठेवून ही महिला अचानक गोकर्णला का निघून गेली व तिचा नेमका व्यवसाय काय, याचा शोध घेतला जात आहे.
मृत स्कार्लेट हिच्या वयाचा नेमका शोध लावण्यासाठी तिच्या हाडांची वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिस महानिरीक्षक किशनकुमार यांनी आज सांगितले. पोलिसांनी तिची आई फियोना हिचीही चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज रात्री तिला चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले होते.
आपल्या एका मित्राबरोबर आठ मुलांना बरोबर घेऊन गोव्यात आलेल्या फियोनाच्या भोवती संशयाचे वलय निर्माण झाले आहे. या प्रकरणामुळे काही व्यक्ती गोव्याचे नाव बदनाम करून पर्यटन व्यावयाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान या प्रकरणामुळे समुद्र किनाऱ्यावर पहाटेपर्यत शॅक्स खुली असल्याची माहिती उघडकीस आल्याने अशा शॅक्सवर कारवाई करण्याचा निर्णय पर्यटन महामंडळाने घेतला आहे.
गोव्याचे मुख्य सचिव जे.पी.सिंग यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मयत स्कार्लेट हिला अमली पदार्थ सेवनाची सवय असल्याचे उघड झाल्याचे म्हटले आहे.
मृत्यू होण्याच्या काही तासांपूर्वी स्कार्लेट ५ ते ६ तरुणांबरोबर होती. तसेच तिने त्यांच्याबरोबर हशीष व कोकेनचेही सेवन केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. पहाटे चारपर्यंत ती लुईस याच्या शॅक्सवर होती. त्यानंतर तिने एका व्यक्तीला आपल्याला खोलीवर सोडण्याची विनंती केली होती. त्यावेळी सध्या अटक करण्यात आलेला सेमसन डिसोझा हा तिच्या बरोबर गेला होता, अशी माहिती मिळाली आहे.
या प्रकरणातील संशयित सेमसन यांनी आपण या प्रकरणात दोषी नसून आपल्याला सोडून द्यावे, अशी मागणी करून सत्र न्यायालयात जामीन अर्ज सादर केला आहे. उद्या दुपारी या अर्जावर सुनावणी होणार आहे.
विदेशात आपल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीकडे सोडून जाणारी स्कार्लेटची आई तिच्या मृत्यूला तेवढीच जबाबदार असल्याचे श्री. दिगंबर कामत यांनी एका राष्ट्रीय वृत्तपत्राला मुलाखत देताना म्हटले आहे. आईने आपल्या मुलांची काळजी घेणे महत्त्वाची असते. फिरायला येणाऱ्या पर्यटकांनी काही बाबतीत दक्ष असायला हवे. पोलिसांनी प्रत्येक पर्यटकांवर नजर ठेवणे, हे आम्ही अपेक्षीत धरू शकत नसल्याचे श्री. कामत यांनी पुढे म्हटले आहे.

ही बाब अल्पवयीन न्यायालयाच्या कक्षेत!
अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयिताने जामिनासाठी सत्र न्यायालयात केलेला अर्जावर पोलिस आक्षेप घेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या तक्रारी कलम ३० नुसार सत्र न्यायालयात चालवता येत नसून ती कायद्यानुसार बाल न्यायालयातच चालवावी लागते. त्यामुळे याच मुद्यावर उद्या पोलिस आक्षेप घेणार आहेत.

पर्वरीची जागेबाबत निर्णय रखडला

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी)ः गोव्याचे भाग्यविधाते व राज्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नावाने पर्वरी येथे प्रकल्प उभारण्यासाठी देण्यात आलेली जागा त्यांच्या जयंतीपूर्वी परत मिळवण्याची प्रतिष्ठानची घोषणा हवेत विरली आहे. कोमुनिदाद प्रशासकांनी या जागेचे विभाजन करून त्याचे दोन भाग करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल खात्याकडे पाठवून दिला असून आता याबाबतचा निर्णय महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा घेणार आहेत.
केवळ तीस हजार रुपये शुल्क कोमुनिदादला फेडण्यात प्रतिष्ठानला अपयश आल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप कोमुनिदादकडून केला जात आहे. भाऊसाहेबांच्या पुण्याईवर आपली राजकीय कारकीर्द घडवणाऱ्या नेत्यांनी त्यांच्या नावाने अनेक योजना व प्रकल्प जाहीर केले परंतु केवळ आपला विचार करण्यातच दंग राहिलेल्या या नेत्यांना सत्तेच्या धुंदीत मात्र भाऊंचा विसर पडला. पर्वरी येथील या नियोजित प्रकल्पावरून हे नेते उघड पडले आहेत. पर्वरी येथील संजय स्कूलच्या मागे सरकारने सुमारे २ हजार चौरस मीटर जागा कै. भाऊसाहेब बांदोडकर प्रतिष्ठानला दान केली होती. तत्कालीन मगोपचे नेते तथा माजी सभापती सुरेंद्र सिरसाट यांच्या ५० व्या वाढदिनानिमित्ताने १९ नोव्हेंबर १९९६ रोजी या ठिकाणी पायाभरणीही झाली होती. ही पायाभरणी ब्रह्मानंदस्वामींच्या हस्ते करण्यात आली होती व त्यावेळी ऍड. रमाकांत खलप हे केंद्रीय कायदामंत्रीपदी होते. भाऊसाहेबांच्या नावाने या ठिकाणी प्रकल्प उभारून वाचनालय, तसेच विधानसभा कामकाजाचे प्रशिक्षण देण्यासाठी सभागृह उभारण्याची योजना आखण्यात आली होती. परंतु आपल्या राजकीय सोयीनुसार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या घेण्यात व्यस्त राहिलेल्या नेत्यांना या प्रकल्पाचा विसर पडला व आता ही जागा कोमुनिदादने पुन्हा ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष म्हणजे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सुरेंद्र सिरसाट हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आहेत तर माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड.रमाकांत खलप, माजी कायदामंत्री डॉ.काशीनाथ जल्मी, माजी आमदार धर्मा चोडणकर, आदी कॉंग्रेसमध्ये आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते सध्याच्या सरकार पक्षात असूनही ही "फाईल" अजून खात्याअंतर्गत रेंगाळत असल्याने या नेत्यांना आता त्याचे काहीही सोयरसुतक नसल्याची भावना मगोप्रेमींची बनली आहे.
दरम्यान, या प्रकरणी सेरूला कोमुनिदादच्या लोकांना पाठीशी धरून सरकारातील एक मंत्री ही जागा प्रतिष्ठानकडून परत घेण्याच्या प्रयत्नात असल्याचीही चर्चा सुरू आहे. म्हापसा येथील भाऊप्रेमींनी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रतिष्ठान जागा बचाव समिती स्थापन करून ही जागा साफ करण्याचे ठरवले होते मात्र त्यासाठीही कुणी पुढाकार घेतला नाही. सध्या विद्यमान सरकारात मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी धडपडत असलेल्या मगो पक्षानेही या प्रकरणी रस्त्यावर उतरण्याच्या आपल्या घोषित निर्णयाला विराम दिल्याने ही जागा गमावून बसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या जागेप्रकरणी सोपस्कार करणारे ऍड. देवेंद्र गवंडळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला २४ ऑक्टोबर १९९६ रोजी सेरूला कोमुनिदादकडून भूखंड देण्याबाबत पत्र प्रतिष्ठानला मिळाले. त्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी "फाईल" प्रक्रिया करण्यासाठी अडीच हजार रुपये भरून हे सोपस्कार सुरू करण्यात आले होते. ३१ ऑक्टोबर १९९६ रोजी या जागेसंबंधीची अधिसूचनाही सरकारी राजपत्रातही प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर १५ नोव्हेंबर १९९६ रोजी सेरूला पंचायतीने ही जागा प्रतिष्ठानला दिल्याचे पत्र पाठवले होते व या जागेवर कुंपण बांधण्याची परवानगीही दिली होती. या सर्व प्रकारानंतर १६ मे १९९७ रोजी या जागेची उपविभागणी करून १०६ - १ हा भूखंड प्रतिष्ठानच्या ताब्यात देण्यात आला होता. दरम्यानच्या काळात सेरूला कोमुनिदादने सुमारे ३० हजार रुपये भरून या जागेचा अंतिम ताबा घेण्याचे पत्र प्रतिष्ठानला पाठवले होते. प्रतिष्ठानच्या सदस्यांचे म्हणणे आहे की हे पत्र त्यांना पोहोचलेच नाही, तर काही सदस्यांचे म्हणणे आहे की हे पैसे भरण्यासाठी कोणीही पुढे आला नसल्यानेच ही जागा रद्द करण्याचा निर्णय घेतला अशी भूमिका कोमुनिदादने घेतली आहे. या जागेसंबंधी सर्वांत प्रथम दै."गोवादूत" मधून वृत्त प्रसिद्ध झाले असता काही लोकांनी हे विनाकारण पिल्लू सोडल्याचा प्रचार सुरू करून या छुप्या डावाला पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु श्री. लोबो यांच्या खुलाशानंतर हा कट उघडकीस आला व विरोधकांची बोलतीच बंद झाली होती.
याप्रकरणी या जागेवर कॉंग्रेसने अचानक दावा कोणत्या आधारावर केला याबाबत अधिक माहिती मिळवली असता कॉंग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सुलोचना काटकर यांनी १९८८-८९ या काळात सदर भूखंड कॉंग्रेसला देण्यासाठी अर्ज केला होता, अशी माहिती मिळाली. यानंतर १९९०-९२ या काळात कै. भाऊसाहेब बांदोडकर प्रतिष्ठानकडून सदर भूखंडासाठी अर्ज आला असता तत्कालीन कोमुनिदाद प्रशासनाने या भूखंडाचा कोणताही अभ्यास न करता ती प्रतिष्ठानला देण्याचे ठरवले, अशी तक्रार कोमुनिदादच्या सध्याच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी एन.बी.नार्वेकर यांनी उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासकांना २४ जानेवारी २००८ रोजी पाठवलेल्या नोटिशीत कै.भाऊसाहेब बांदोडकर स्मृती प्रतिष्ठानसाठी देण्यात आलेल्या जागेची नक्की काय परिस्थिती आहे, याबाबत ३१ जानेवारी पूर्वी सखोल अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. मगोपचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांच्या नेतृत्वाखालील भाऊसाहेब बांदोडकर प्रतिष्ठान संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री कामत यांची त्यांच्या सरकारी बंगल्यावर भेट
घेऊन यासंबंधी निवेदनही सादर केले होते. यावेळी प्रतिष्ठानला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिले होते.

भाऊंच्या पुतळ्याचे आज अनावरण

म्हापसा येथे स्व.भाऊसाहेब बांदोडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण उद्या म्हापसा येथील हनुमान मंदिरासमोर होणार आहे. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्याहस्ते अनावरण होणाऱ्या या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर व म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा उपस्थित राहणार आहेत.
म्हापशात स्व.भाऊंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती व त्या समितीच्या अध्यक्षपदी प्रा. सुरेंद्र सिरसाट हेच होते. केवळ समिती स्थापन करून प्रत्यक्षात या कामाला काहीही चालना मिळत नसल्याने अखेर नगरसेवक तथा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी पुढाकार घेऊन अखेर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. आशिष शिरोडकर यांच्या या निर्णयाचे म्हापशातील मगोप्रेमींनी स्वागत केले आहे.

पणजीतील हॉटेलात तरुणीचा खून

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) : गोव्यात स्कार्लेटचे खून प्रकरण गाजत असतानाच आज पणजी येथील "हॉटेल सपना' खोली क्रमांक १०७ मधे एका अज्ञात तरुणीचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आले आहे. दोन दिवसांपूर्वी एक जोडपे या हॉटेलमध्ये उतरली होते.
आज सकाळी नऊ वाजता खोली न उघडल्याने बनावट चावी वापरून खोली उघडल्यानंतर सदर घटना उघडकीस आली. हॉटेलच्या बाथरूममध्ये दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून करण्यात आल्याचे पणजी पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी पंचनामा करून शवचिकित्सा करण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठवून दिला आहे. हिंदी भाषेत लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्याशिवाय अन्य कोणताही पुरावा खुन्याने मागे सोडलेला नाही.
शहरातील हॉटेलमालकांना पोलिसांनी यापूर्वी अनेक विनवण्या करूनही या हॉटेलमालकाने या जोडप्याचा ठोस ओळखीचा पुरावा घेतला नसल्याने पोलिस महानिरीक्षक किशनकुमार यांनी सदर हॉटेलचा परवाना रद्द करण्यासाठी मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे.
प्राप्त माहितीनुसार दि. ९ फेब्रुवारी ०८ रोजी दुपारी ३ वाजता अंदाजे २३ वर्षीय तरुणी व ३० वर्षीय तरुण या हॉटेलमध्ये उतरली होती. यावेळी त्यांनी हॉटेलच्या नोंद वहीत जन्नत डी. सोदा व हेमा डी. सोदा अशी नावाची नोंद केली. तसेच साईनगर महापालिकेच्या समोर, सुरत गुजरात असा पत्ता दिला आहे. तसेच एक दूरध्वनी क्रमांकही दिला होती. आज पोलिसांनी तो क्रमांक लावला असता तो अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. तसेच हा पत्ता त्यांनी खोटा नोंद केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
त्यांनी एका दिवसासाठी खोली आरक्षित केली होती. सोमवारी सकाळी ९ वाजता ती खोली सोडणार होती. परंतु ९ वाजता त्या तरुणांनी आम्ही अजून एक दिवस राहणार असल्याचे सांगून त्या दिवसाचे पैसेही त्यांनी हॉटेलमधील स्वागतकक्षात भरले आणि तो निघून गेला. त्याला सकाळी ११ पर्यंत हॉटेलमध्ये अखेरचे पाहण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या अहवालानुसार तरुणीचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी खोलीची झडती घेतल्यावर पोलिसांनी चार मीटर लांबीच्या नायलॉनच्या दोन दोऱ्या सापडल्या. तर त्या तरुणाचे कपडे मिळाले. तरुणीने अंगावर घातलेल्या कपड्याशिवाय जास्त कपडे नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे हे लग्न झालेले जोडपे असण्याची शक्यता पोलिसांनी नाकारली आहे. तसेच त्या ठिकाणी सापडलेल्या चिठ्ठीत "बेवफा सनम. बेवफाई करने वालोंका येही अंजाम होता है' असा मजकूर लिहिण्यात आला आहे.
हॉटेलमालकाचा हलगर्जीपणा हीच समस्या ः किशन कुमार
गोव्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट आखणारे दहशतवादी पणजीतील एका हॉटेलमध्ये राहून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पणजीतील सर्व हॉटेलमालकांची खास बैठक घेऊन हॉटेलमध्ये उतरणाऱ्या लोकांचा पूर्ण पत्ता, दूरध्वनी क्रमांक तसेच क्रमांक तपासून पाहण्याची विनंती तसेच सूचनाही करण्यात आली होती. परंतु या सूचनेचे पालन होत नसल्याने गंभीर महानिरीक्षक कुमार यांनी चिंत्ता व्यक्त केली आहे. दहशतवादी शहरात राहून गेल्याचे उघड झाल्यानंतर मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि गृहमंत्री रवी नाईक यांनी हॉटेलची पाहणी करण्याचे अधिकार पोलिसांना दिले होते. तसेच या सूचनांचे पालन न करणाऱ्या या हॉटेलवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश दिले होते. गेल्या डिसेंबर महिन्यात वास्को येथे अशा पद्धतीने एका महिलेचा हॉटेलमधील खोलीत खून करण्यात आला होता. त्याही ठिकाणी पूर्ण पत्ता घेतला नसल्याने आणि मृतदेहाची ओळख पटली नसल्याने अद्याप तो खुनी समाजात मोकळा फिरत आहे. तसेच प्रत्येक हॉटेलच्या स्वागतकक्षात "सीसी टीव्ही' लावण्याचीही सूचना करण्यात आली होती. यापुढे अशा प्रकारची हलगर्जी करणाऱ्या हॉटेलमालकांवर कठोर कारवाई केली जाणार त्यांनी म्हटले आहे.

मारहाण व तोडफोडीच्या सीबीआय चौकशीचा आदेश सरकारला द्या

बाबुश यांची उच्च न्यायालयात याचिका
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) ः पोलिसांनी दि. १९ फेब्रुवारी रोजी तुरुंगात झालेली मारहाणीची व तोडफोडीची चौकशी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग(सीबीआय) तर्फे करण्यासाठी सरकाराला आदेश देण्याची विनंती करणारी याचिका बाबूश व जेनिफर मोन्सेरात यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केली. तसेच या प्रकरणाला जबाबदार असलेले पोलिस अधीक्षक निरज ठाकूर, उपअधीक्षक मोहन नाईक व निरीक्षक सुदेश नाईक यांना निलंबित करण्यांचीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसेच पणजी महापालिकेचे महापौर टोनी रोड्रीगीस यांची पत्नी उबार्लिना लॉपीस रोड्रिगीस यांनीही एक स्वतंत्र याचिका सादर केली आहे. येत्या बुधवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
ताळगावचे आमदार बाबूश व जेनिफर मोन्सेरात यांनी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निरज ठाकूर, उपअधीक्षक मोहन नाईक व निरीक्षक सुदेश नाईक यांच्यावर अपहरण, दरोडा व हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दि. २२ फेब्रुवारी रोजी पणजी पोलिस स्थानकात दाखल केली होती. परंतु याची कोणतीही दखल घेतली गेले नसल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दाद मागण्यात आली होती. यावेळी न्यायदंडाधिकाऱ्यांनी मोन्सेरात यांची तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. परंतु तक्रार अद्याप दाखल केली नसल्याचे त्यांनी या याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणाला जबाबदार असलेल्या तिन्ही पोलिस अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करून चौकशी सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती.
पोलिसांनी तुरुंगात मारहाण करून मानवाधिकार नियमांचे उल्लंघन केले आहे. जेनिफर मोन्सेरात यांना तुरुंगात जबर मारहाण झाल्याचे उघड झाल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे. जेनिफर यांना झालेल्या जखमांची फोरेन्सीक चाचणी करण्याचे आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले होते. याचा अहवाल आला असून तो सत्र न्यायालयात कारवाईसाठी पाठवण्यात आला आहे.
तसेच आपल्या निष्पाप मुलाला मारहाण करण्यासाठी दि. १९ रोजी अधीक्षक निरज ठाकूर हे अन्य पोलिस अधिकारी व सशस्त्र पन्नास पोलिसांना घेऊन मिरामार येथील माझ्या बंगल्यात घुसले. तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकाला मारहाण करून चार वाहनांची नासधूस केली, तसेच पहिल्या मजल्यावरील टीव्ही, डीव्हीडी, पियानो, अन्य वस्तूंची तोडफोड केली. त्यांनी धार्मिक क्रॉसही सोडला नाही, आपल्या पत्नीचे दागिने, पैशांनी भरलेले आपले पाकीट, क्रेडिट कार्ड व आमदारकीचे ओळखपत्र चोरीला गेल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पोलिस माझ्या ताळगाव येथील दुसऱ्या बंगल्यावर गेले. येथे अभ्यासाला बसलेला माझा मुलगा अमित याला जबरदस्तीने उचलून पोलिस स्थानकावर आणले. त्याचा कोणत्याही प्रकारे या मोर्चात सहभाग नव्हता. ज्यावेळी माझी पत्नी त्यांची विचारपूस करण्यासाठी पोलिस स्थानकावर गेली, त्यावेळी तिला शिवीगाळ करून जबर मारहाण करण्यात आली. मला कोणतीही माहिती न देता त्यांना अटक करण्यात आली. परंतु माझ्या मुलाला अटक न करता, रात्री ८.३० ते १.३० पर्यंत बेकायदेशीररीत्या पोलिस स्थानकात ठेवून मारहाण करण्यात आली. त्याची चौकशी करण्यासाठी मी पोलिस स्थानकावर गेलो असता, मलाही मारहाण केली गेली आणि तुरुंगात डांबण्यात आले. त्यानंतरही तुरुंगात मारहाण झाल्याचे बाबूश यांनी पुढे म्हटले आहे.
मोर्चानंतर आमच्या चौकशीसाठी आलेले पणजीचे महापौर टोनी रोड्रिगीस यांना पकडून लाथाबुक्क्यांनी, लाठीने जबर मारहाण केल्याचे रोड्रिगीस यांनी सादर केलेल्या याचिकेत म्हटले आहे.

Monday, 10 March 2008

"फॉर्म्युला"अपयशी ठरल्यास विधानसभा बरखास्त?

सभापती व उपसभापती विरोधात भाजपचा अविश्वास ठराव
पणजी, दि. १० (प्रतिनिधी)ः अर्थसंकल्प अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळातील बदलाचे आव्हान स्वीकारणे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना टाळणे सर्वस्वी अशक्य बनले आहे. सुदिन ढवळीकर यांच्यासाठी जागा खाली करून देण्यासाठी चर्चेत असलेल्या नेत्यांत कमालीची अस्वस्थता पसरली असताना भाजपने सभापती प्रतापसिंग राणे व उपसभापती मावीन गुदिन्हो यांच्याविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दिल्याने पेचप्रसंग अधिकच वाढला आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिल्लीत कॉंग्रेस श्रेष्ठींना गोव्यातील राजकीय अस्थिरतेवरील फॉर्म्युल्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनाही दिल्लीतून तसे संकेत मिळाल्याने त्यांनी सध्या पक्षातील नेत्यांबरोबर चर्चा सुरू करून त्यासाठीची तयारी सुरू केली आहे.
श्री.पवार यांचे आदेश धुडकावणे कॉंग्रेसला शक्य नसल्याने नियोजित "फॉर्म्युला" अमलात आणावाच लागणार, अशी परिस्थिती बनली आहे त्यामुळे मुख्यमंत्री कामत कोणत्याही क्षणी डच्चू देण्यात येणाऱ्या मंत्र्याचे नाव जाहीर करू शकतात, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, ढवळीकर यांच्यासाठी कॉंग्रेसच्या एका मंत्र्याला डच्चू देण्यास अजूनही विधिमंडळाची तयारी नसून तसे झाल्यास विधानसभाच बरखास्त करणे योग्य असल्याचे मत काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्याची खबर आहे.
याप्रकरणी जर सदर फॉर्म्युलाची अंमलबजावणी केल्यानंतर आघाडीतील कुणी बंड केले किंवा विरोधकांशी संधान बांधण्याचा प्रयत्न केला तर विधानसभा सरळच बरखास्त करण्याचा विचार अंतर्गत चर्चेत पुढे येत असल्याने राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत हे दिल्लीला गेल्याचे वृत्त पसरवण्यात आले असले तरी ते गोव्यातच असून या निर्णयाबाबत त्यांनी सध्या आपल्या पक्षातील नेत्यांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न सुरू केल्याने त्यानंतरच ते दिल्लीत जाणार असल्याची खबर मिळाली आहे.
राणे व गुदिन्होंच्या विरोधात अविश्वास ठराव
अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपकडून सभापती प्रतापसिंग राणे व उपसभापती मावीन गुदिन्हो यांच्याविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस आज दिली. गेल्या दोनही अधिवेशनकाळात सभापती प्रतापसिंग राणे यांची कार्यपध्दती पूर्णपणे पक्षपाती ठरल्याचा आरोप भाजपने केला आहे. सभापती राणे यांनी आपल्या पदाचा वापर केवळ सत्ताधारी पक्षाचे सरकार वाचवण्यासाठी करण्याचा विडाच उचलला असून त्यामुळे त्यांच्याकडून विरोधी पक्षाला न्याय मिळण्याचा कोणताच आधार नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले. विद्यमान आघाडी सरकारच्या कार्यकाळात दोनदा विधानसभा अधिवेशन बोलावण्यात आले होते परंतु केवळ सत्ताधारी गटातीलच धुसफुशीमुळे अल्पमतातील सरकार वाचवण्यासाठी सभापती राणे यांनी विधानसभा तहकूब करून लोकशाही यंत्रणाच वेठीस धरल्याने विधानसभा कामकाजाला काहीच अर्थ राहिला नसल्याची टीका भाजपने केली आहे. उपसभापती मावीन गुदिन्हो हे उघडपणे पक्षाच्या कार्यक्रमांत सहभागी होत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्याकडून विरोधी पक्षाला न्यायाची अपेक्षा ठेवणे कठीण असल्याचे मत भाजपने व्यक्त केले आहे.

स्कार्लेटच्या खुनामागे अमली पदार्थ टोळी?

...सॅमसन याला १४ दिवसांची कोठडी
...उपनिरीक्षक आल्बुकर्कचे अधिकार काढले

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) ः अल्पवयीन स्कार्लेटशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेल्या संशयित सेमसन डिसोझा याला म्हापसा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे करून १४ दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे. तर या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले हणजूण पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक नेर्लोन आल्बुक र्क यांचे सर्व अधिकार आज सायंकाळी काढून घेण्यात आल्याचे पोलिस महानिरीक्षक किशनकुमार यांनी सांगितले. या प्रकरणाचा पूर्ण तपास लागत नाही, तोपर्यंत त्यांना बिनअधिकाराचे उपनिरीक्षक म्हणून ठेवले जाणार आहे.
स्कार्लेटच्या खुनामागे समुद्री भागातील अमली पदार्थ व्यवहारातील मोठ्या रॅकेटचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांना स्कार्लेट खून प्रकरणाचे काही ठोस पुरावे हाती लागले असून एका मोठ्या रॅकेटचा भांडाफोड केला जाणार असल्याचा दावा किशनकुमार यांनी केला आहे. परंतु दुसऱ्या शवचिकित्सा अहवालामुळे गोत्यात सापडलेल्या डॉक्टरांनी आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी धडपड सुरू केली आहे.
पोलिसांनी स्कार्लेट हिच्या मृत्यूपूर्वी पोटातील द्रव्याचा शोध घेण्यासाठी "व्हिसेरा' अहवालाची लवकरात लवकर गरज असल्याने तो मुंबईत पाठवण्यासाठी पत्र देण्याची विनंती डॉक्टरांकडे करण्यात आली होती. या पत्रात डॉक्टरांनी अशा घटनेत व्हिसेरा पाठवण्यात उशीर करू नये, तसेच यात घातपात असल्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यावेळी हा व्हिसेरा मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी त्यावरील पत्ता बदलून देण्यात आला होता. व्हिसेरा उशिरा पाठवल्यास त्यातील अमली पदार्थाचे द्रव्य नष्ट होण्याची शक्यता अधिक असते, असे मत डॉक्टरांनी त्या पत्रात व्यक्त केले आहे. पत्रामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सीबीआय चौकशीची कुटुंबाची मागणी

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) ः गोवा पोलिसांवरील विश्वास उडाल्याने स्कार्लेट खून प्रकरण केंद्रीय गुन्हा अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे देण्याची मागणी स्कार्लेटच्या कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात सुरुवातीलाच वादग्रस्त ठरलेले उपनिरीक्षक नेर्लोन आल्बुकर्क यांचे सर्व अधिकार काढून घेण्यात आल्याचे पोलिस महानिरीक्षक किशनकुमार यांनी सांगितले.
सुरुवातीपासून हणजूण पोलिस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप झाल्याने फियोनाने ही मागणी केल्याचे तिचे वकील विक्रम वर्मा यांनी म्हटले आहे. या प्रकरणात किती भ्रष्टाचार झाला आहे, हे सांगता येत नसल्याने याची "सीबीआय'मार्फतच चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे एक पत्र फियोना हिने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना पाठवल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पोलिस हे प्रकरण गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचा आरोप ऍड. वर्मा यांनी केली आहे. स्कार्लेट ही आपल्या कुटुंबीयाबरोबर सुट्टी घालवण्यासाठी गोव्यात आली होती. यावेळी दि. १८ फेब्रुवारी हणजूण समुद्रकिनाऱ्यावर अर्धनग्न अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला होता. यावेळी तिच्या कुटुंबीयांनी हा खुनाचा प्रकार असल्याचा दावा करून दुसऱ्या शवचिकित्सेची मागणी केली होती. दुसऱ्या शवचिकित्सेच्या अहवालात स्कार्लेटच्या अंगावर पन्नास किरकोळ जखमा आढळून आल्याने शेवटी पोलिसांना हा खुनाचा प्रकार असल्याचा गुन्हा नोंद करून घेण्यास भाग पाडले होते.
त्यानंतर पोलिसांनी काल रात्री सेमसन डिसोझा या २९ वर्षीय तरुणाला अटक केली होती. तसेच अन्य तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात अजून एकाला एकाला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अफरातफरीमुळे महाविद्यालयाच्या लौकिकाला तडा

फोंडा दि. १० (प्रतिनिधी) ः खंाडोळा महाविद्यालयाचे एकेकाळी मोठे नाव होते. गोवा विद्यापीठाचे विद्यमान कुलसचिव डॉ. मोहन सांगोडकरांसारख्या लोकांनी महाविद्यालयाला चांगला लौकिक मिळवून दिला होता, परंतु सध्या या महाविद्यालयाची स्थिती चिंताजनक असून अनेक अर्थांनी हे महाविद्यालय सध्या अडचणींच्या आणि वादांच्या भोवऱ्यात सापडले आहे. महाविद्यालयाच्या गेल्या बऱ्याच काळापासून चाललेल्या अनियंत्रित कारभाराचा फायदा उठवत तिथल्याच एका कारकुनाने प्रयोगशाळेतील सामान खरेदी प्रकरणात मोठा गैरव्यवहार केल्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर तर महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेलाच तडा गेला आहे. सामान खरेदी प्रकरणातला भ्रष्टाचार सुमारे ७.५ लाख रुपयांच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत असले तरी बांधकाम आणि इतर बाबींवरील गैरव्यवहार तब्बल ४० ते ४५ लाख रुपयांच्या आसपास असल्याचा संशय आहे.
प्रयोगशाळेतील सामान खरेदी प्रकरणात सुमारे ७ लाख ४० हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. परंतु हा आकडा त्यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित असलेला महाविद्यालयाच्या लेखा विभागाचा कारकून प्रदीप कृष्णराव पाटील याला फोंडा पोलिसांनी अटक केली होती. नंतर न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली असली तरी व्यवस्थापनाकडून त्याच्यावर निलंबनाचा बडगा उचलण्यात आलेला आहे.
विद्येच्या मंदिरातील या भ्रष्टाचारामुळे विद्यार्थी व पालकांना धक्काच बसला असून या गोष्टीचा संताप त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. संशयित कारकून प्रदीप पाटील याने गैरव्यवहार केल्याची कबुली दिली आहे. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य लुकास मिरांडा यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत सुमारे ७ लाख ४० हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. हा आकडा पाटील याच्याकडे व त्याच्या घरात सापडलेल्या वस्तू खरेदी बिलावरून ठरविण्यात आला आहे. पोलिसांनी कारकून प्रदीप पाटील याच्याविरुद्ध भा.दं.सं.च्या ४६७ व ४६८ या कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
हा प्रकार नेमका कधीपासून सुरू झाला याची निश्चित माहिती नाही. मात्र राज्यातील दुसऱ्या एका महाविद्यालयाने आपले सुमारे आठ लाख रुपयांचे एक बिल वित्त खात्याला सादर केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्याचे सांगितले जाते. प्राप्त माहितीनुसार, पैसे नसल्याचे कारण पुढे करून सदर महाविद्यालयाचे ते बिल फेटाळण्यात आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. हा घोटाळा सुमारे ४० ते ४५ लाख रुपयांचा असण्याची शक्यता आहे. वस्तू खरेदी केल्याची बिले एवढ्या चतुराईने तयार केली जायची, की त्याचा कोणाला यत्किंचितही संशय येत नव्हता. परंतु वस्तू खरेदी न करता, संशयित पाटील याला ही बिले कुणाकडून उपलब्ध होत होती, याचाही शोध घेणे गरजेचे आहे.
कोणत्याही महाविद्यालयाने वस्तूची खरेदी केल्यानंतर त्याची किंमत टाकून महाविद्यालयात एका वहीत त्याची नोंद ठेवली जाते. तसेच ते बिल वित्त विभागात सादर केल्यानंतर त्याचे धनादेशाद्वारे पैसे महाविद्यालयाला दिले जातात. तसेच त्या धनादेशाची नोंद विद्या विभागात एका वहीत नोंद केली जाते. दर महिन्याला या दोन्ही वह्यांचा तपशील उच्च शिक्षण खात्याकडे पाठवला जातो. त्यावेळी महाविद्यालयाने वस्तू खरेदी करण्यात आलेला खर्च आणि सादर करण्यात आलेली बिले तसेच वित्त खात्यातून त्यांना दिलेले धनादेश याचा तपशील पडताळून पाहिला जातो. अशी ही मोठी प्रक्रिया आहे. त्यामुळे महाविद्यालय येवढा खर्च का करते, लाखो रुपये खर्च करून कोणती उपकरणे घेते, याची शोध घेण्याची किंवा माहिती मिळवण्याची तसदी उच्च शिक्षण खात्याने का घेतली नाही, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.
या गैरव्यवहार प्रकरणात आणखीही काही लोक गुंतले असण्याची शक्यता असून महाविद्यालयातही तशी कुजबुज ऐकायला मिळते. या प्रकाराची सखोल चौकशी झाल्यास आणखी बरीच माहिती बाहेर येऊ शकेल. इतकी मोठी अफरातफर एकटा कारकून करू शकेल यावर कोणाचा विश्वासच विश्र्वास बसत नाही. केवळ कारकुनाला तर बळीचा बकरा बनविण्यात येत नाही ना, अशी शंका महाविद्यालयात व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी या प्रकरणी विविध प्रकारचे पुरावे जमा करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी तक्रार नोंद करण्यात आल्यानंतर गैरव्यवहार करण्यात आलेले पैसे भरण्यासाठी प्रयत्न सुरू झाला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. फोंडा पोलिस स्टेशनचे निरीक्षक मंजुनाथ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक उपनिरीक्षक गोकुळदास मळीक तपास करीत आहेत.

अर्ज न आल्याने धनगर समाजासाठीचे २५ लाख पडून

पणजी, दि. १० (प्रतिनिधी)ः गावडा, कुणबी, वेळीप व धनगर (गाकुवेध) संघटनेत केवळ केंद्र सरकारच्या काही तांत्रिक अडचणींमुळे धनगर समाजाचा समावेश होऊ शकला नाही. या समाजापर्यंत सरकारच्या योजना पोहोचाव्यात यासाठी राज्य सरकारने खास २५ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य समाज कल्याण खात्याकडे सुपूर्द केले होते. आत्तापर्यंत एकही अर्ज या समाजातील लोकांकडून सादर न झाल्याने हे पैसे खात्याकडे तसेच पडून असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
धनगर किंवा गवळी या समाजाचा समावेश अनुसूचित जमात गटात होऊ शकला नाही. दरम्यान, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या या समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या समाजावर अन्याय होऊ नसे यासाठी राज्य सरकारकडून गेल्या अर्थसंकल्पात २५ लाख रुपये निधी समाज कल्याण खात्याकडे सोपवला होता. आश्चर्य म्हणजे हा निधी तसाच पडून असून अर्थसाहाय्यासाठी एकही अर्ज सरकारकडे दाखल झाला नाही, अशी माहिती समाज कल्याण खात्याचे संचालक श्री.प्रकाश वेळीप काणकर यांनी दिली.
केपेचे आमदार चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांच्याकडून दर विधानसभा अधिवेशनात गवळी समाजासंबंधी प्रश्न उपस्थित केला जातो. गोव्यात या समाजातील अनेक लोक सुधारीत,सुशिक्षित व उच्च पदांवरही आहेत. परंतु जे खेडेगावात राहतात ते लोक मात्र अत्यंत मागास आहेत. अनेक गावात या लोकांची वस्तीच दूर असल्याने त्यांचा अधिक संबंध बाकी लोकांकडे येेत नसल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. या समाजातील सुशिक्षित व उच्चपदांवर असलेल्या लोकांना आपल्याच ज्ञातीबांधवातील गरीब लोकांपर्यंत या योजना पोहचाव्यात असे वाटत नसल्यानेच ही परिस्थिती उद्भवल्याचे मत येथील एका अधिकाऱ्याने दिले.
गोव्यात घनगर व गवळी समाजातील सुमारे ७५८३ लोक वास्तव्य करतात अशी माहिती गेल्या एप्रिल २००३ साली तयार केलेल्या अहवालात दिली आहे. डॉ.बर्नाडेट गोम्स यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीवर अनेक सदस्य होते. त्यात डॉ.नंदकुमार कामत, कला अकादमीचे सदस्य सचिव पांडुरंग फळदेसाई, पर्यावरणप्रेमी प्रा.राजेंद्र केरकर, जयंती नाईक,सुशांत नाईक,लक्ष्मण कवळेकर,डॉ.एस.एन.सुर्मे व समाज कल्याणमंत्री आदींचा समावेश आहे.
दरम्यान, गोव्यातील या समाजाचा संपूर्ण आढावा या अहवालात दिला असला तरी केंद्र सरकारने घालून दिलेल्या काही निर्देशांप्रमाणे ही माहिती अपुरी असल्याने आता नव्याने अहवाल सादर करणे गरजेचे असल्याची माहिती दिली. यासाठी सध्या हंगामी तत्त्वावर दोन अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून त्यांच्याकडून आढावा घेणे सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या प्रकरणी मिळवलेल्या अधिक माहितीनुसार २००३ साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १४०० या लोकांची घरे असून एकूण ७५८३ लोक राहतात असे आढळून आले आहे. त्यात पेडणे(३४०), बार्देश(३२०), डिचोली(७६८), सत्तरी(१८२७), फोंडा(५३७), केपे(६३९), काणकोण(२६७), सांगे(२५१९), मुरगांव(१०७) व सासष्टी(२५९) लोकांचा समावेश आहे.
मुळात हे लोक संपूर्ण राज्यात पसरल्याने व त्यांची संख्याही परिणामकारक नसल्यानेच कुणीही राजकीय नेता या लोकांना कुरवाळताना दिसत नाही,अशी कडवट प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने दिली. या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे केपेचे आमदार बाबू कवळेकर हे सध्या सत्ताधारी पक्षात असूनही त्यांच्याकडूनही या विषयाकडे तेवढे गांभीर्य दिले जात नसल्याचे कळते. बहुतेक शेळ्या-मेंढऱ्या व गायी,म्हशींच्या सहवासात रमणाऱ्या या लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजातील ज्ञातीबांधवांनीच पुढाकार घेण्याची गरज असून हे काम सरकारकडून केले जाईल, ही अपेक्षा चुकीची ठरणार आहे हे सध्याच्या परिस्थितीवरून स्पष्ट झाले आहे.

Sunday, 9 March 2008

स्कार्लेटच्या मृत्यूमागे दहशतवादी?

पणजी, दि. 8 (प्रतिनिधी)ः गोव्यातील विदेशी पर्यटक हे आमचे लक्ष्य होते, अशी कबुली गोव्यात घातपात घडवून आणण्याच्या प्रयत्नात असताना अटक केलेल्या दोघा दहशतवाद्यांनी केंद्रीय गुप्तहेर यंत्रणेला दिली आहे. यामुळे स्कार्लेट किलींग या ब्रिटिश युवतीच्या मृत्यू मागे दहशतवाद्यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गोव्यात घातपात घडवून आणण्याच्या मार्गावरील एका दहशतवाद्याला कर्नाटक पोलिसांनी नुकतीच अटक केली. या संशयिताने गोव्यातील विदेशी पर्यटकांना आम्ही प्रामुख्याने लक्ष्य बनवले होते, अशी उघड केलेली माहिती किलींगच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी दहशतवादी कारवायांकडे अंगुलिनिर्देश करत आहे.
कर्नाटकच्या गुप्तहेर पोलिसांनी ही माहिती गोवा पोलिसांना दिली असून केंद्रीय गुप्तहेर संस्थेलाही आता आतंकवाद्यांचे कट प्रत्यक्षात उतरत असून गोवा हे दहशतवाद्यांचे मुख्य लक्ष्य असल्याची खात्री पटली आहे. अटकेतील रियाझुद्दीन नासिरने त्याच्या नार्को एनालिसिस चाचणीत काही धक्कादायक माहिती उघड करताना त्याने गोव्यात घातपात घडवून आणण्यासाठी आखण्यात आलेल्या योजनांचा गौप्यस्फोट केला.
एका हॉटेलात स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या नासिरला असदुल्ला नावाच्या दुसऱ्या एका वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यासमवेत वाहन चोरीप्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतरच त्यांच्या दहशतवादी कृत्यांच्या योजना उघड झाल्या होत्या. नार्को चाचणीत नासिरने उघड केलेली माहिती धक्कादायक असून त्याच्या म्हणण्यानुसार ज्या ठिकाणी विदेशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे, अशा पाच ठिकाणी पाच वाहनाव्दारे गोव्यात स्फोट घडवून आणण्याचा त्यांचा इरादा होता.
या वाहनात आरडीएक्सची स्फोटके पेरून स्फोट घडवून आणायचे व गोव्यातील पर्यटकांना आपले लक्ष्य करताना बॉम्बस्फोट मालिकांव्दारे येथे खळबळ उडवून देण्याची त्यांची योजना होती. नासिरच्या म्हणण्यानुसार, मोठ्या प्रमाणात पर्यटकांची हत्या केल्याने भारत व इतर देशांचे संबंध यात दरी निर्माण झाली असती व व्दिपक्षीय करारांवरही त्याचा बराच परिणाम झाला असता. मात्र, गोव्यातील पर्यटकांच्या संख्येत कमालीची घट झाली असून गोव्याच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला आहे.
गोव्यात सरासरी 2.2 दशलक्ष विदेशी पर्यटक वर्षाकाठी येतात. त्यात प्रामुख्याने ग्रेट ब्रिटनच्या नागरिकांचा अधिकतर भरणा असतो. गोवा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या एकंदर प्रकरणी ते तपास करीत असून एक अधिकारीही चौकशीच्या निमित्ताने कर्नाटकात जाऊन आला आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे गोव्यातील दहशतवाद्यांचा कट उजेडात आल्यानंतरही अद्याप येथील समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्थेत नेहमीप्रमाणेच ढिलाई आहे. आपण एखादी बॅग घेऊन किंवा वाहनातून आरामात आजही मुक्तपणे फिरू शकत नाही. दहशतवाद्यांच्या योजना उजेडात आल्यानंतरही सुरक्षा व्यवस्था सांभाळणारे पोलिस सुस्त आहेत. सार्वजनिक जागेत एखादी संशयित व्यक्ती वावरत असल्यास त्याला जाब विचारणारा कोणीही नाही. याचाच अर्थ दहशतवादी गोव्यात खुलेआम आपल्या योजना यशस्वी करू शकतात. किलींग मृत्यू प्रकरण हे त्यांचीच योजना नसावी कशावरून, असा प्रश्न त्यामुळेच तर निर्माण झाला आहे.

आणखी तीन खाणींना टाळे

मडगाव, दि. 8 (प्रतिनिधी)ः मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार सासष्टी मामलेदार परेश फळदेसाई यांनी आज आणखी तीन बेकायदा पाषाणी दगडांच्या खाणींना टाळे ठोकले. आतापर्यंत 20 क्रशरांसह 14 पाषाणी दगडांच्या खाणींवर त्यांनी कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी जी. पी. नाईक यांनी सासष्टी मामलेदारांना येथील क्रशर व दगडांच्या खाणींची तपासणी करून बेकायदा खाणींवर कारवाई करण्याचे सांगितले होते. गेल्या तीन दिवसांपासून ही मोहीम सुरू असून मामलेदार परेश फळदेसाई, वीज खात्याचे अभियंते व पोलिस ही कारवाई करीत आहेत.
सांजुझे आरियाल, नेसाय, गुडी पारोडा व सारझोरा येथील क्रशर व पाषाणी दगडांच्या खाणी मिळून 58 खाणींना टाळे ठोकण्यात येणार आहे. सदर कारवाई चार दिवसांच्या आत करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

वाहतूकदार आपल्या भूमिकेशी ठाम

सोमवारचा लाक्षणिक बंद निश्चित
तिस्क उसगाव, दि. 8 (प्रतिनिधी)ः वेगनियंत्रक यंत्रणेची सक्ती कायमस्वरूपी रद्द करावी, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अवजड मोटरवाहन महासंघातर्फे सोमवारी दि. 10 मार्च रोजी एक दिवसीय लाक्षणिक बंद आंदोलन होणारच, अशी घोषणा माजी आमदार तथा वाहतूकदार विष्णू रामा नाईक यांनी केली आहे.
वेगनियंत्रक यंत्रणेच्या सक्तीविरोधात विविध वाहतूक संघटनांतर्फे पुकारण्यात आलेला बंद हाणून पाडण्यासाठी सरकारने जोरदार तयारी दर्शवली असताना या संपावरून बसमालक संघटनेत फूट पडल्याचीही चर्चा आहे. आता अ. गो. व्यावसायिक वाहतूकदारांनी या संपातून माघार घेतल्याचे कळवून संपाबाबत अधिकच संभ्रम निर्माण केला आहे. सोमवारी होणाऱ्या संपात प्रवासी बसेस, मालवाहू ट्रक, खनिज वाहू टिप्पर, पिकअप आदी वाहतूकदार सहभागी होणार असल्याची माहिती श्री. नाईक यांनी दिली. आज बाये - सुर्ल येथील सातेरी मंदिराच्या सभागृहात सुमारे 400 वाहतूकदारांच्या सभेत हा निर्णय घोषित करण्यात आला.
महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेतली असता, येत्या 12 मार्चपर्यंत थांबा व नंतर आंदोलनाचा निर्णय घ्या, अशी विनंती त्यांनी केली होती, असे सांगण्यात आले. वेगनियंत्रकामुळे वाहनमालकांना सामोरे जावे लागणाऱ्या अनेक दुष्परिणामांची माहिती श्री. नाईक यांनी वाहतूकदारांना कथन केली. राज्यात जास्त अपघात हे नवीनच वाहन शिकलेल्या युवा दुचाकीस्वारांच्या बेदरकार वाहन हाकण्यामुळे होतात, असा दावा यावेळी करण्यात आला. 80 टक्के अपघात हे दुचाकीचे होतात, असे सांगून खनिज माल वाहू टिप्पर ट्रक हे रांगेत हाकावे लागत असल्याने ते गतीने हाकता येत नसल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात सर्व ग्रामीण भागातील खनिज पट्ट्यातील रस्ते हे गेल्या 50 वर्षांपूर्वीचेच आहेत. राज्य सरकारला अवजड वाहनांकडून दर वर्षी 80 कोटी रुपये रस्ताकर प्राप्त होतो. परंतु या भागातील रस्त्यांची सुधारणा व रुंदीकरण मात्र केले जात नाही, असा आरोपही यावेळी करण्यात आला. बस व ट्रक मालकांवर विविध प्रकारच्या करांचा बोजा सरकारकडून लादला जातो. 12 मार्च रोजी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या यासंदर्भातील याचिकेवरील निकाल घोषित होणार असल्याने त्यानंतर परिषदेतर्फे पुढील कृती ठरविण्यात येईल, असेही श्री. नाईक पुढे म्हणाले.
वेगनियंत्रक यंत्रणेच्या सक्तीविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी यावेळी महेश गावस यांनी दर्शवली. बसमालक संघटनेत फूट पडल्याच्या आरोपांचे खंडन करीत सर्व बसमालक संघटना एकत्रित असल्याचा दावा यावेळी करण्यात आला असून त्यांचाही या वेगनियंत्रक सक्तीच्या निर्णयाला ठाम विरोध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, या आंदोलनासंदर्भात विविध आमदारांना देण्यासाठी तयार केलेल्या निवेदनाचे वाचन प्रदीप तिरोडकर यांनी केले. प्रकाश गावस यांचेही यावेळी भाषण झाले. सभेचे सूत्रसंचालन अनिल घाडी यांनी केले.
व्यावसायिक वाहतूकदारांची माघार
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी उपसभापती मावीन गुदीन्हो यांच्या उपस्थितीत वाहतूकदारांशी चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत त्यांनी वेगनियंत्रक सक्तीच्या निर्णयाबाबत सखोल चौकशी केल्याची माहिती अ. गो. व्यावसायिक वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष मान्यूयल रॉड्रिगिस यांनी दिली. मुख्यमंत्री कामत यांनी संघटनेच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या. त्यांनी अशाप्रकारे संप पुकारून जनतेची गैरसोय न करण्याची विनंती केल्याने संघटनेतर्फे हा संप पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याचे श्री.रॉड्रिगीस म्हणाले. यावेळी गेलेल्या शिष्टमंडळात मॅन्यूयल रॉड्रिगिस, डेरील न्यून्स, निलेश काब्राल, साल्वादोर पॅरेरा, फैजल शेख, ऍडी तावारीस व सत्यवान गावकर यांचा समावेश होता.

नुवेत भीषण अपघात: दोन ठार, सहा जखमी

वास्को व मडगाव, दि. 8 (प्रतिनिधी): मडगाव - पणजी महामार्गावर नुवे येथे आज संध्याकाळी सुमो जीप व पावलू ट्रॅव्हल्सच्या मिनिबस दरम्यान समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर सहा जण जखमी झाले आहेत.
हा अपघात सुमारे सव्वा सातच्या सुमारास पाद्री कोसेसाव महाविद्यालय ते नुवे चर्च दरम्यानच्या भागात झाला. टीएन - 51 सी 4537 क्रमांकाची तामिळनाडूतील सुमो जीप मडगावहून पणजीच्या दिशेने निघाली होती. याचदरम्यान उलट मार्गाने मडगावकडे येणाऱ्या जीए - 02 - टी 4837 क्रमांकाच्या पावलू ट्रॅव्हल्सच्या मिनिबसने या जीपला समोरासमोर धडक दिली. ही मिनिबस पिलार येथून दोन पाद्री व दहा कलाकारांना घेऊन सुरावली येथे एका कार्यक्रमासाठी रवाना होत होती.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धडक एवढी भीषण होती की, सुमो गाडीचा चालक व बाजूने बसलेला प्रवासी यांचे त्यात जागीच निधन झाले. प्रसाद पाटील (वय 42 नावेली - गोवा) व अरुणप्रकाश संघराज (वय 21, तामिळनाडू) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातानंतर या महामार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली. मृत पाटील हा सदर जीपगाडीत पर्यटक मार्गदर्शक म्हणून गेला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.
जखमींपैकी पाच जणांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात तर एकाला मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. मायणा कुडतरी पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास चालू आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनिबसच्या चालकाने निष्काळजीपणे वाहन हाकून चुकीच्या दिशेने जीपगाडीला धडक दिली आहे. त्यामुळे मिनिबसच्या चालकावर निष्काळजीपणे वाहन हाकून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात येईल.

स्कार्लेटचा मृत्यू बुडूनच

घातपाताचा संशय
पणजी, दि. 8 (प्रतिनिधी): हणजूण येथे संशयास्पदरीत्या मृतावस्थेत सापडलेल्या स्कार्लेट किलींग या युवतीचा मृत्यू बुडूनच झाल्याचे नव्याने केलेल्या उत्तरीय तपासणीत उघड झाल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. हा मृत्यू खोल पाण्यात झाला नाही, यावरही या अहवालात शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त असून तिच्या शरीरावरील जखमांवरून घातपाताची शक्यता व्यक्त होत आहे.
आता स्कार्लेट हिचा पोहताना बुडून मृत्यू झाला की, तिला घातपाताने पाण्यात बुडवण्यात आले, याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे. आत्तापर्यंत हा बुडून मृत्यू झाल्याचे सांगून ताबडतोब प्रकरण मिटवण्याच्या घाईत असलेले हणजूण पोलिस नव्या उत्तरीय तपासणीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी हणजूण पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मात्र टीकेची झोड उडाल्याने हे प्रकरण त्यांच्यावर शेकण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
दरम्यान, गोमेकॉत आज संध्याकाळी उशिरापर्यंत उत्तरीय तपासणी करून अहवाल सादर करण्यात आला. हा अहवाल सीलबंद करून उपअधीक्षक बॉस्को जॉर्ज व या प्रकरणाची चौकशी करणारे निरीक्षक ब्राझ मिनेझिस यांना सुपूर्द केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. नवीन उत्तरीय तपासणी अहवालात सत्य समोर येईल व आपल्याला न्याय मिळेल, असा विश्वास मयत मुलीची आई फियोना मॅकेहोन यांनी व्यक्त केली. दरम्यान, सदर मुलीच्या आईने उपस्थित केलेल्या हरकतींचा विचार करून या प्रकरणाची चौकशी घातपाताच्या दिशेनेच केली जाईल, अशी माहिती उपअधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी दिली.
दरम्यान, स्कार्लेटच्या मृतदेहाच्या दुसऱ्या उत्तरीय तपासणीचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील कृती ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. मॅकेहोन यांनी यापूर्वीच पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात असताना आता उत्तरीय तपासणीत त्या दृष्टीने काही शंका उपस्थित झाल्यास पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार दाखल होण्याच्या शक्यतेचे स्पष्ट संकेत त्यांच्याकडून मिळाले आहेत.
स्कार्लेट हिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय तिच्या आईने व्यक्त केला असला, तरी त्याबाबतचा अहवाल हैदराबाद येथून मागवण्यासाठी अद्याप काहीही हालचाली झाल्या नसल्याने संशयाचे वातावरण पसरले आहे.

प्रश्नपत्रिकेबाबतही मनमानी

गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष एल. एम. टी. फर्नांडिस यांनी यंदा दहावी व बारावी परीक्षेत मोठ्याप्रमाणात होणाऱ्या "कॉपी"ला कात्री लावण्यासाठी एकाच विषयाच्या तीन वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्याचा एकतर्फी निर्णय घेतल्याची माहिती प्राचार्य मंचतर्फे आज उघड करण्यात आली.
या निर्णयास कोणतीही हरकत नसली तरी अचानक लागू केलेल्या नव्या पद्धतीमुळे विद्यार्थी गोंधळण्याची शक्यता असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शालान्त मंडळ बैठकीतही या निर्णयाबाबत ठोस चर्चा झाली नाही किंवा उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालयांनाही तो कळविण्यात आला नसल्याने परीक्षाकाळात घोळ होण्याचा धोका निर्माण झाल्याचे मत श्री. नाईक यांनी व्यक्त केले आहे.
या नवीन पद्धतीनुसार परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत. यामुळे "कॉपी" करणे किंवा एकमेकांना खुणा करून उत्तरे सांगणे आदी प्रकार बंद होणार असल्याचा श्री. फर्नांडिस यांचा दावा आहे. ही पद्धत सध्या जवाहर नवोदय विद्यालय तसेच महाराष्ट्रातही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या पद्धतीबाबत हरकत नसली तरी त्याबाबत निदान शिक्षक व विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना असणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. यंदा पहिल्यांदाच दहावी व बारावी इयत्तेला नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे, त्यात ही नवीन पद्धत त्यामुळे परीक्षाकाळात गोंधळ माजण्याची शक्यता प्राचार्य मंचतर्फे वर्तविण्यात आली आहे.

शालान्त मंडळाच्या अध्यक्षांना निलंबित करा

शैक्षणिक संस्थांकडून न्यायालयीन चौकशीचीही मागणी
पणजी, दि. 8 (प्रतिनिधी)ः गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष एल. एम. टी. फर्नांडिस यांनी निकालपत्रात फेरफार करून केलेल्या कथित गुणवाढ प्रकरणाने विश्वासार्हतेला काळिमा फासला आहे. या प्रकरणी त्यांनी स्वतः अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांना तात्काळ निलंबित करून घरी बसवावे, अशी मागणी विविध शैक्षणिक संस्थांनी केली आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याची आग्रही मागणीही या संस्थाकडून करण्यात आली आहे.
पणजी येथील अ. गो. उच्च माध्यमिक प्राचार्य मंचच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंचचे अध्यक्ष प्रा. सदानंद हिंदे यांनी ही मागणी केली. यावेळी मंचचे सचिव श्री. दलामी, गोवा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष गोविंद देव, माजी अध्यक्ष चंद्रकांत हेदे, गोवा शिक्षक परिषदेचे अध्यक्ष उदय तळवडकर, गोवा माध्यमिक विद्यालय शिक्षण संघटनेचे अध्यक्ष उमेश नाईक व शालांत मंडळाचे कार्यकारी सदस्य एन. डी. नाईक उपस्थित होते.
प्राचार्य मंचतर्फे चालवलेल्या या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर करून शिक्षणाचे पावित्र्य जपण्यासाठी अशा लोकांना दूर केलेच पाहिजे, अशी मागणी गोवा पीपल्स फोरमचे निमंत्रक ऍड. सतीश सोनक यांनी यावेळी केली. श्री. फर्नांडिस यांनी आरोपांबाबत खुलासा करून स्वतःचेच पितळ उघडे पाडले आहे. एका नापास विद्यार्थ्याला उत्तीर्ण करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा व कायदे धाब्यावर बसविल्यास इतर नापास विद्यार्थ्यांचे काय, असा सवाल उपस्थित करून या प्रकरणाची मुकाट्याने पाठराखण करणाऱ्या सरकारने या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
दरम्यान, यावेळी श्री. फर्नांडिस यांच्या बेदरकारपणाचा आणखी एक नमुना सादर करताना श्री. हिंदे यांनी स्पष्ट केले की, गोवा शालान्त मंडळाचे सचिव डी. आर. भगत यांनी सदर वादग्रस्त विद्यार्थ्याने नव्याने प्रवेश घेतलेल्या रोझरी उच्च माध्यमिक विद्यालयाला 29 डिसेंबर 07 रोजी पत्र पाठवून अकरावीत नापास झालेल्या विद्यार्थ्याला बारावी परीक्षेत प्रवेश देण्याचे काम केल्याने बारावीच्या अंतिम परीक्षेला या विद्यार्थ्याला आसन क्रमांक देता येणार नसल्याचे कळवले होते.
सचिवांच्या या पत्रामुळे हादरलेल्या श्री. फर्नांडिस यांनी लगेच 31 जानेवारी रोजी स्वतःहून रोझरी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र पाठवून सचिवांनी पाठवलेले पत्र रद्द करण्यात यावे, असे आदेश दिले. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रकरणात श्री. फर्नांडिस यांनी सदर विद्यार्थ्यासाठी जो पत्रव्यवहार केला आहे, तोच मुळी गैर आहे. एवढे होऊनही सरकार केवळ मूग गिळून गप्प आहे ही शरमेची गोष्ट असून या प्रकरणामुळे शैक्षणिक धोरणाचा बोजवारा उडाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
या प्रकरणाची खबर मुख्यमंत्री दिगंबर कामत, मुख्य सचिव जे. पी. सिंग, शिक्षण सचिव, शिक्षण संचालिका आदींना देण्यात आली आहे. मुख्यमंत्री कामत यांनी तर श्री. फर्नांडिस हे येत्या 25 मे रोजी निवृत्त होत असल्याने त्यांच्यावर कारवाई करून काय प्राप्त होणार, असा केलेला सवाल हास्यास्पद असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. अशाप्रकारे शिक्षण क्षेत्राला कलंक ठरणाऱ्या गोष्टींना जर सरकारकडून अभय मिळाले तर शैक्षणिक धोरणाचे भवितव्य धोक्यात असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
बारावी परीक्षा जवळ येत असल्याने सदर वादग्रस्त विद्यार्थ्याला आसन क्रमांक देण्यात आला आहे. सरकारने या प्रकरणी ताबडतोब कृती केली नाही तर शिक्षणाचे पावित्र्य जपण्यासाठी सर्व शिक्षकांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा कडकडीत इशाराही यावेळी देण्यात आला.

शिक्षकांची विश्वासार्हता जपावी -ऍड. सोनक
समाजात आदराचे स्थान असलेले शिक्षकच जेव्हा एखाद्या प्रकरणी मागणी करतात त्याची ताबडतोब दखल सरकारने घेण्याची गरज आहे. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास त्यांची प्रतिष्ठा व आदराला धक्का पोहोचेल अशी भीती ऍड. सोनक यांनी व्यक्त केली.

पाटो कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित

यशस्वी ठरल्यास इतर पालिकेत सोय
पणजी, दि. 8 (प्रतिनिधी)ः पणजी महानगरपालिकेच्या बहुचर्चित ओला कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे आज नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमावं यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पामुळे पणजीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. पण, या प्रकल्पाची सक्षमता येत्या सहा महिन्यांत सिद्ध होईल. त्यानंतरच प्रकल्पाचे भवितव्य ठरणार आहे.
'एनाऍरोबिक डायजेस्टर सिस्टीम' पद्धतीद्वारे बंद टाकीत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज किंवा गॅस तयार करणाऱ्या पाटो प्लाझा येथील या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, महापालिकेचे उपमहापौर यतीन पारेख, महापालिकेचे आयुक्त संजीव गडकर, महापालिका प्रशासन संचालक एल्वीस गोम्स, कंपनीचे प्रतिनिधी डॉ. माळे, संचालक एच. बी. सिंग व श्रीमती सिंग आदी उपस्थित होते.
पणजी शहरात दरदिवशी जमा होणाऱ्या दहा टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास प्रत्येक पालिका पातळीवर तो राबविण्यात येणार असल्याचे श्री. आलेमाव म्हणाले. या प्रक्रियेमुळे पाटो, मळा व इतर भागांत दुर्गंधी पसरण्याची साशंकता येथील नागरिक उपस्थित करत असल्याचे श्री. पर्रीकर यांनी स्पष्ट केले. सदर प्रकल्प उभारण्यामागील उद्देश साध्य होईल. मात्र, प्रकल्पाच्या देखरेख व सेवेकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे विपरीत परिणाम होणार नाहीत, याची काळजी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर दुर्गंधी पसरणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त करीत सहा महिन्यानंतरच या प्रकल्पाची क्षमता सिद्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमहापौर यतीन पारेख यांनी कचऱ्याची समस्या ही महापालिकेसमोरील सर्वांत मोठी समस्या असल्याचे सांगितले. महापालिकेसाठी सरकारने नियोजित केलेल्या बायंगिणी प्रकल्पाचे काम ताबडतोब मार्गी लावावे, असे आवाहन त्यांनी केले. कंपनीचे प्रतिनिधी डॉ. माळे यांनी हा प्रकल्प नक्कीच यशस्वी होईल, असा दावा केला. दुर्गंधीवर उपाययोजना करण्यात आल्याचे सांगून या प्रकल्पापासून तयार होणारा गॅस किंवा वीज या भागांतील खाजगी वितरकांना देणे शक्य होणार असल्याचे ते म्हणाले. पालिका कामगारांना याप्रकरणी हाताळणीचे पूर्ण प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खाटीकखाना, मासळीबाजार व भाजीबाजार अशा तीनही ठिकाणचा ओला कचरा दरदिवशी या प्रकल्पात नेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक ऍड. अविनाश भोसले यांनी केले. आभार कंपनीचे संचालक एच. बी. सिंग यांनी व्यक्त केले.