Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 31 July 2010

"शांती' कोण?

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी)- स्कार्लेटच्या खुनाची पहिल्यांदा माहिती मिळाली त्यावेळी आम्हाला "शांती' या इस्रायली तरुणाचा संशय आला. तो आम्हाला त्रास देत होता. एकदा त्याने आमच्या दिशेने दगडफेकही केली होती, अशी माहिती आज स्कार्लेटची आई फियोना मेकओवन हिने आपल्या जबानीत दिली. तसेच, सुरुवातीला उपनिरीक्षक नेर्लोन आल्बुकर्क यांनी दिशाभूल केली असल्याचेही तिने न्यायालयाला सांगितले. दरम्यान, या प्रकरणात "शांती' हे नाव पहिल्यांदाच आल्याने या प्रकरणाला नवीन कलाटणी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्कार्लेट खून प्रकरणाची सुनावणी गेल्या एप्रिल महिन्यापासून सुरू झाली आहे. यावेळी तिची आई आपली जबानी नोंदवण्यासाठी गोव्यात उपस्थित झाली आहे. आज दुपारी बाल न्यायालयात "सीबीआय'चे वकील एस. ए. रिवणकर यांनी तिची जबानी घेतली. यावेळी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच स्थानिक पत्रकारांनी गर्दी केली होती. सुमारे अडीच तास फियोना हिची जबानी नोंद करून घेण्याचे काम सुरू होते.
स्कार्लेटचा समुद्रात बुडून मृत्यू झाला अशी माहिती देऊन उपनिरीक्षक आल्बुकर्क यांनी आमची दिशाभूल केली. परंतु, दुसऱ्या दिवशी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागारात ठेवलेला स्कार्लेटचा मृतदेह व तिच्या चेहऱ्यावरील जखमा पाहिल्या तेव्हा हा खुनाचा प्रकार असल्याचा दावा करून त्या दिशेने तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलिसांना पत्र लिहिल्याचे यावेळी फियोना हिने सांगितले.
दि. २१ फेब्रुवारी सकाळी ८ वाजता मी "लुईस शॅकवर' चौकशीसाठी गेली असता दोन बारांच्या मधोमध मला स्कार्लेटचे "सॅंडल' आणि "निकर' दिसून आली. ते सॅंडल मीच तिला गोकर्ण येथून आणले होते. तर तिची "निकर' मी अनेक वेळा धुतल्याने लगेच ओळखली. या वस्तू घेऊन हणजूण पोलिस स्थानक गाठले व त्या पोलिसांच्या स्वाधीन केल्या. पोलिसांनाही या वस्तू पाहून धक्का बसला, असे तिने आपल्या जबानीत म्हटले.
ज्युलियो लोबो हा स्कार्लेटचा चांगला मित्र होता. ज्युलियोला घेऊन ती फिनलॅंड येथे जाणार होती. त्याच्याबरोबरच ती शिवोली येथे राहत होती. तसेच, ज्युलियो हा व्यवसायाने गाईड असल्याने त्याला किनाऱ्यावर ग्राहक मिळवून देण्याचेही काम स्कार्लेट करीत होती. मृत्यूच्या काही तासांपूर्वी मी तिच्याशी गोकर्ण येथून ज्युलियोच्या मोबाईलवरून संपर्क साधला होता. यावेळी ती रुबी (स्पॅनिश मैत्रीण) व ज्युलियोबरोबर "कर्लीस' या शॅकवर होती. काही दिवसांनी ती इंग्लंडला जाणार असल्याने ती फार खूष होती, असेही तिने नमूद केले. मात्र १८ तारखेला दुपारी ३ वाजता ज्युलियो याने मला मोबाइलवर संपर्क साधून स्कार्लेटचा खून झाल्याची माहिती दिली.
ज्युलियो लोबोशी आमची कर्लीस या शॅकवर ओळख झाली होती. तो बराच वेळ याच शॅकवर असायचा. येथेच तो अनेकवेळा "पूल' खेळण्यात रमत होता. त्याच्याबरोबर स्कार्लेटही तेथे असायची. दोघेही कधी कधी बिअर घेत होती. पण स्कार्लेट ड्रग्स घेत नव्हती, असा दावा फियोनाने यावेळी केला. ज्युलियो ड्रग्स घेत होता की नाही हे आपल्याला माहीत नाही. पण तो सिगरेट ओढत होता. स्कार्लेटचा खून झाला त्यावेळी ती १५ वर्षांची होती व बारावीत शिकत होती, अशी माहिती फियोनाने दिली.

No comments: