Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 29 July 2010

गृहमंत्री रवींच्या गैरहजेरीबद्दल सरकारतर्फे अजून निवेदन नाही

- गृहखात्याच्या पुरवणी
मागण्यांवर आज चर्चा
- रवींची उपस्थिती अपेक्षित

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) - राज्याचे गृहमंत्री रवी नाईक हे विधानसभा अधिवेशन सुरू झाल्यापासून एकही दिवस सभागृहात आलेले नाहीत; तसेच त्यांच्या गैरहजेरीबद्दल सरकारतर्फे मुख्यमंत्री किंवा अन्य कोणीही कसलेच निवेदनही केलेले नाही. परिणामी त्यांच्या या गैरहजेरीबद्दल सध्या गेल्या काही दिवसांपासून राज्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
काहींच्या मते रवी नाईक आजारी असून ते मुंबईत आहेत; तर काहींच्या मते ते अन्य कोठे तरी आहेत. काहीजण ते इस्पितळात उपचार घेत असल्याचे सांगतात; तर काहींच्या मते ते नुकतेच गोव्यात परतले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा इतका घोळ सुरू असतानाही त्यांच्या गैरहजेरीबद्दल सरकार किंवा अन्य कोणातर्फेच अधिकृत खुलासा केला जात नाही. सध्या हाच चर्चेचा विषय ठरला आहे.
रवी यांच्या आजाराच्या बातम्या येण्यापूर्वी अमलीपदार्थ रॅकेट आणि त्या रॅकेटशी संबंधित पोलिस तथा राजकारण्यांची बरीच चर्चा सुरू होती. पोलिसांनी काही काळापूर्वी अटक केलेल्या अटाला या ड्रग माफियाच्या लकी फार्महाऊस नामक प्रेयसीने एका इस्त्रायली दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत रवी नाईक यांच्या सुपुत्राचे नाव घेतले होते. ही बातमी गोव्यातील बहुसंख्य वृत्तपत्रांमध्ये छापून आल्यानंतरही केवळ लपवाछपवीच सुरू आहे. लकी किंवा अटालाशी आपला संबंध नसल्याचे रॉय सांगत आहेत; मात्र त्यांचा एकत्रित फोटो आपण इंटरनेटवर पाहिल्याचे अलीकडेच विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभेत सांगितले होते.
लकी फार्महाऊसच्या खुलाशानंतर राज्यात किमान सहा सात पोलिसांना अटक झाली होती. आशिष शिरोडकर हा पोलिस निरीक्षकही त्यात होता. मात्र लकीने रॉय नाईक यांचे नाव घेतले असता त्याची साधी चौकशीही पोलिसांनी अद्याप केलेली नाही. हे प्रकरण आज ना उद्या न्यायालयात पोचण्याची शक्यता असल्याचे अनेकांकडून सांगितले जात आहे. रॉय नाईक प्रकरणात पोलिसांच्या दुटप्पी वर्तनावर अजूनही जोरदार टीका होत आहे. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीसाठी कॉंग्रेसप्रणित एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेने सरकारला सात दिवसांची मुदत दिली आहे. पुढील दोन तीन दिवसात ही मुदत संपणार आहे. विधानसभेत तर याच मागणीवरून आत्तापर्यंत किमान तीन वेळा कामकाज तहकूब झाले आहे. विरोधकांबरोबरच सत्तारूढ गटाच्या अनेक सदस्यांनीही या मागणीला उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू होऊन शुक्रवारी दोन आठवड्यांचा कालावधी संपेल; परंतु राज्याचे गृहमंत्री नेमके कोठे आहेत याचा पत्ता मात्र कोणालाचा नाही.
उद्या विधानसभेत गृह खात्याच्या पुरवणी मागण्या चर्चेला येणार असल्याने चर्चेदरम्यान उपस्थित होणारे सर्व प्रकारचे प्रश्न, शंकाकुशंका, आक्षेप, आरोप, टीका याला उत्तर देण्यासाठी गृहमंत्र्यांची उपस्थिती अत्यावश्यक ठरते. साहजिकच निदान उद्या (गुरुवारी) तरी रवी नाईक सभागृहात येणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ते हजर राहिले नाहीत तर विरोधक तोच लक्षवेधी मुद्दा ठरवतील, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उद्याच्या कामकाजाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

No comments: