Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 27 July 2010

उत्कर्षाच्या मृत्युप्रकरणी पोलिसांची चौकशी होणार

दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या
पणजी, दि.२६ (प्रतिनिधी): वाळपई येथील उत्कर्षा परब या अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू होण्यामागे पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरला काय, याची सखोल चौकशी पोलिस महासंचालकांमार्फत करण्यात येईल. वाळपईचे पोलिस निरीक्षक शिवराम वायंगणकर व डिचोलीचे उपनिरीक्षक तेरेंस वाझ यांच्यावर होणाऱ्या आरोपांचाही तपास केला जाणार असून तोपर्यंत या दोघाही अधिकाऱ्यांची अन्यत्र बदली करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिले.
आज विधानसभेत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी याविषयावरून सरकारला चांगलेच फैलावर घेतले. मुळात या प्रकरणी पोलिसांची भूमिका अत्यंत आक्षेपार्ह ठरल्याची टीका पर्रीकर यांनी केली. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला रॅटोल पाजण्यापर्यंत मजल गेलेल्या या प्रकरणाचा वेळीच सुगावा लागला असता तर कदाचित ही दुर्घटना टळलीही असती,असेही पर्रीकर म्हणाले. पोलिस खोटारडेपणा करीत असल्याचा आरोपही पर्रीकर यांनी केला. यापूर्वी पर्वरी येथे घरकाम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी अजूनही आरोपपत्र दाखल होत नाही. शिवराम वायंगणकर हे खुद्द बेकायदा खनिज व्यवसायात गुंतले आहेत,असा आरोप केला असता त्याचीही चौकशी झाली नाही. डिचोलीच्या उपनिरीक्षकांनी तर एकाला एनकाऊंटर करण्याची धमकी दिली होती, त्याचे काय झाले,असाही सवाल त्यांनी यावेळी केला.
उत्कर्षाच्या मृत्यूला पोलिसांचा बेजबाबदारपणाही कारणीभूत ठरला आहे व त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी. ही चौकशी सुरू असताना या अधिकाऱ्यांना त्या पदावर ठेवण्यात येऊ नये,अशी मागणीही पर्रीकर यांनी केली. मुख्यमंत्री कामत यांना अखेर ही मागणी मान्य करणे भाग पडली. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची इतरत्र बदली करण्याचे आश्वासन कामत यांनी सभागृहाला दिले.

No comments: