Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 8 November 2008

"संभवामि...'चा आजपासून शुभारंभ


फोंडा, दि.७ (प्रतिनिधी) - गोमंतकीय, कोकणवासीय गेल्या कित्येक महिन्यापासून उत्सुकतेने वाट पाहात असलेल्या केरी फोंडा श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळाने निर्मित केलेल्या "संभवामि युगे युगे...' या श्रीकृष्ण जीवनावरील महानाट्याच्या शुभारंभाची घटिका जवळ येऊन ठेपली आहे. या महानाट्याचे उद्घाटन "जाणता राजा'चे शिल्पकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते उद्या शनिवार ८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पठारावर होत आहे.
या महानाट्याचे शुभारंभी प्रयोग ८ ते १४ नोव्हेंबरपर्यत चालणार असून उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे् म्हणून मुख्यमंत्री दिंगबर कामत, वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर, विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर, शिरोड्याचे आमदार महादेव नाईक, प्रियोळचे आमदार दीपक ढवळीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अरूण देसाई यांनी दिली आहे.
या महानाट्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या महानाट्यासाठी समर्पक रंगमंच उभारणे हे मोठे आव्हान होते. हे आव्हान गोव्यातील प्रसिध्द चित्रकार दयानंद भगत यांनी स्वीकारले. श्री. भगत यांनी महानाट्यासाठी समर्पक रंगमंच उभारला आहे. या महानाट्याचे लेखन डॉ. नारायण देसाई यांनी केले. संगीत दिग्दर्शन अशोक पत्की, दिग्दर्शन दिलीप देसाई, नृत्य दिग्दर्शन मयूर वैद्य, प्रकाश योजना सतीश गावंस, वेषभूषा दिगंबर सिंगबाळ यांची आहे. भव्य रंगमंचावर कलाकारांच्या तालिमीसुध्दा घेण्यात आल्या आहेत. महानाट्याला येणाऱ्या लोकांना वाहने ठेवण्यासाठी पार्किंगची खास सोय करण्यात आली आहे.
या महानाट्याला येणाऱ्या प्रेक्षकांच्या सोयीसाठी काही सूचना मंडळाकडून करण्यात आल्या आहेत. या सूचनांचे योग्य पालन महानाट्य पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांनी करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. सर्व प्रवेशद्वारे संध्याकाळी ५ वाजता उघडतील. महानाट्याच्या प्रयोगाला ठिक ७ वाजता प्रारंभ होईल. प्रवेशद्वारावर स्त्री आणि पुरूष अशा स्वतंत्र रांगा कराव्यात. २०० रूपये आणि १०० रूपयांच्या प्रवेशिकांना आसन क्रमांक नाहीत. या मुल्यांच्या प्रवेशिका धारकांना प्रथम येणाऱ्यास प्रथम या तत्वावर आसन व्यवस्था असेल. आयोजकांतर्फे प्रयोगासाठी कोणतीही वाहतूक व्यवस्था करण्यात आली नाही. प्रेक्षागृहात प्रयोगादरम्यान कोणत्याही प्रकारच्या ध्वनी मुद्रणास सक्त मनाई आहे. कोणीही व्हीडिओ कॅमेरा आणू नये. प्रेक्षकांनी कमीत कमी सामान सोबत आणावे. प्रेक्षक व त्यांच्या सामानाची तपासणी केली जाईल, असे कळविण्यात आले आहे.
दहीहंडी, कालिया मर्दन, रासलीला, पूतनावध, कंसवध, शिशुपालवध, रूक्मिणीहरण, द्वारकानिर्माण, भगवद्गीता हे महानाट्यातील वैशिट्यपूर्ण प्रसंग आहेत. या महानाट्याचा शेवटही प्रेक्षकांच्या दीर्घ स्मरणात राहावा, यासाठी खास प्रयत्न करण्यात आले आहेत. महानाट्याच्या शेवटी नवीन गीताची रचना करण्यात आली आहे. यावेळी रंगमंचावर श्रीकृष्णाची प्रतिमा प्रेक्षकांच्या समोर उभी ठाकते. या महानाट्यातून एक वेगळा अनुभव गोमंतकीय आणि कलाकारांना मिळणार आहे. या महानाट्यात लढाईसाठी मणिपुरी युवकांना समावून घेण्यात आले आहे.
घोडे, हत्तींचा रंगमंचावर वावर
या महानाट्यात २५० गोमंतकीय कलाकार काम करीत आहेत. ८० स्त्री -पुरूष नर्तक कलाकार आहेत. घोडे, हत्ती, गाई-गुरे, रथ याचा रंगमंचावर प्रत्यक्ष वावर आहे. ६५०० प्रेक्षक हे महानाट्य पाहू शकतात अशी भव्य आसन क्षमता आहे. तसेच या महानाट्यासाठी भव्य रंगमंच उभारण्यात आला आहे. १८ मीटर उंचीचा आणि २४ मीटर लांबीचा भव्य, दिव्य व सुंदर रंगमंच आहे. रंगमंच फिरता, सरकता, उचलला जाणारा अशा प्रकारचा आहे.

करोडपती होऊ शकतात "रोडपती'

सायबर गुन्हेगारांपासून सावधान!
प्रीतेश देसाई
पणजी, दि. ७ - "तुम्ही बसल्या ठिकाणीच करोडपतीचे "रोडपती' होऊ शकता, तुमच्या नावाने अज्ञात व्यक्ती अतिमहनीय व्यक्तीला धमकीचा ई-मेल किंवा "एसएमएस' पाठवू शकते किंवा इंटरनेटवर सुटाबुटात असलेला तुमचा फोटो नको त्या अवस्थेत आढळू शकतो'. या गोष्टी आज एखादा व्हाईट कॉलरचा गुन्हेगार घरबसल्या करू शकतो. यावर वेळीच वचक न ठेवल्यास आणि अशा गुन्हेगारांना कोठडीत टाकण्यासाठी आपले पोलिस खाते तयार व तेवढेच सक्षम नसल्यास येत्या तीन वर्षांत हाहाकार माजेल, अशी भीती इंटेलिजंट कोशंट सिस्टमचे संचालक डॉ. हेरॉल्ड डिसोझा यांनी व्यक्त केली आहे.
जगात भारत "सायबर क्राईम'मध्ये चौथ्या क्रमांकावर असून देश पातळीवर महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्याच जोडीला गोवा राज्यही असल्याचे डॉ. डिसोझा यांनी यावेळी सांगितले. ते आज आल्तिनो येथील पोलिस सभागृहात सरकारी वकील व पोलिस अधिकाऱ्यांसाठी खास आयोजित केलेल्या "सायबर गुन्हे आणि तपास' या कार्यशाळेत मार्गदर्शनप्रसंगी बोलत होते. खासदार श्रीपाद नाईक यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर माहिती आयोगाचे जे.जे. कांबळी, प्रॉसिक्युशन संचालिका सौ. शोभा धुमसकर उपस्थित होत्या.
सायबर क्राईमची उदाहरणे पाहिल्यास या गुन्ह्यात व्हाईट कॉलरवाली मंडळी गुंतल्याचे स्पष्ट होत आहे. जे लाखो रुपये वेतन घेत आहेत असेच काही लोक आपल्या ज्ञानाचा फायदा इंटरनेटद्वारे इतरांना लुटण्यासाठी करतात, असे डॉ. डिसोझा म्हणाले. अशा प्रकारच्या पोलिस तक्रारी दाखल होत नाहीत. कारण "आयटी'बद्दल बऱ्याच राज्यांतील पोलिस आणि वकिलांनाही माहिती नसते. तशी अनेक उदाहरणेही असल्याचे ते म्हणाले.
गोव्यातही "सायबर क्राईम'ची संख्या वाढत असल्याने येथे स्वतंत्र "सायबर लॅब'ची अत्यंत गरज आहे. अन्यथा सायबर गुन्ह्यांचा तपास लावणे पोलिसांना कठीण होऊन बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
केवळ लॅपटॉपमार्फत कोणीही भयंकर स्वरूपाचा गुन्हा करूशकतो. लाखो रुपये खर्च करून अनेक सरकारी कार्यालयांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. तथापि, एखाद्या मोठ्या आमिषापायी त्यातील माहिती सुरक्षित ठेवली जात नाही. त्यामुळे कोणीही त्या संगणकातील अतिमहत्त्वाची माहिती चोरू शकतो. भारतातील सरकारी कार्यालयातील ९५ टक्के संगणकांना कोणतीही सुरक्षा नसल्याचे आढळून आल्याचे डॉ. डिसोझा म्हणाले. याच्या उलट पाकिस्तान आणि मलेशिया सरकारची संगणक व्यवस्था अत्यंत सुरक्षित असल्याचे ते म्हणाले.
अनेक सरकारी संकेतस्थळांचे सर्व्हर अमेरिकेत असून हे धोकादायक आहे. येणाऱ्या काळात आर्थिक गुन्हे वाढणार आहेत. कारण केवळ पाच रुपये खर्च करून इंटरनेटच्या माध्यमाने करोडो रुपयांचा घोटाळा करणे शक्य आहे. ६० कोटी संकेतस्थळे इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यातील तब्बल ४२ हजार संकेतस्थळे ही अश्लीलतेचे दर्शन करणारी असल्याची माहिती त्यांनी दिली. भारत हा इंटरनेट वापरणारा चौथ्या क्रमांकावरील देश आहे.
त्यामुळे ई बॅंकिंग व्यवहार करताना सतर्क राहणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे. संकेतस्थळाची सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत तुमचा बॅंक खाते क्रमांक किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक देऊ नका. "ऑर्कुट'सारख्या संकेतस्थळावर तुमचे छायाचित्र प्रसिद्ध करू नका, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. "कॉपी, पेस्ट, प्रिंन्ट, सेव्ह' या सर्व गोष्टी "डिझेबल'(करता येत नाही) अशा प्रकारचे असल्यानंतरच तुमचा फोटो त्यावर टाका.
जम्मू आणि काश्मीरसारख्या राज्यात इंटरनेटद्वारे हत्यारांची विक्री केली जाते. त्यासाठी खास संकेतस्थळे उपलब्ध आहेत. "हनी' या नावाने त्यांची विक्री केली जाते. इंटरनेट किंवा "चेक मेल' "एटीएम'चा वापर केल्यानंतर "लॉग आउट' करायला विसरू नका. तुमच्या मोबाईला "ब्लुटूथ' असल्यास तो वापराच्या वेळीच सुरू करा; अन्यथा तो कायम बंद ठेवा. कितीही जवळच्या मित्राला तुमचा "पासवर्ड' देऊ नका, असा कानमंत्र डॉ. डिसोझा यांनी नेटधारकांना दिला आहे.

फोंड्यात भीषण आग

तीन दुकाने खाक, २५ लाखांची हानी
फोंडा, दि.७ (प्रतिनिधी) - पंडितवाडा फोंडा येथील राम शिलकर यांच्या इमारतीमधील तीन दुकानांना आज (दि.७) दुपारी २ च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत तीन दुकानातील सामान आगीच्या भक्षस्थानी पडले असून सुमारे पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या जवानांनी व्यक्त केला आहे. दलाच्या जवानांनी सुमारे पाच लाखांची मालमत्ता वाचविण्यात यश मिळविले.
या आगीत तीन दुकानांतील सामानाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. घाऊक प्रिंटिंग कागद विक्रीच्या दुकानातून आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. याच इमारतीत मागच्या बाजूला असलेले राम शिलकर यांचे घर मात्र या आगी पासून सुदैवाने बचावले.
तीन दुकानातील संपूर्ण सामान आगीच खाक झाले. एबीटी पार्सल हे दुकान मात्र सुरक्षित राहिले. लोकांनी दुरूस्तीसाठी दिलेल्या वस्तू आगीत जळाल्याने एक दुकानदाराला अश्रु आवरता आले नाही. या दुकानातील सामानाने एकदम पेट घेतल्याने आगीने रौद्र स्वरूप धारण केल्याने खळबळ माजली. प्रथम श्री. शिलकर यांना दुकानांना आग लागल्याचे आढळून आले. त्यानी पुढच्या बाजूला येऊन पाहणी केली असता सर्व दुकाने बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर फोंडा अग्निशामक दल, फोंडा पोलीस यांना आगीची माहिती देण्यात आली. पंडितवाड्यावरील स्थानिक युवकांनी आग विझविण्यासाठी पुढाकार घेतला. दुकानातील सामानाने पेट घेतलेला असताना काही युवकांनी शेजारच्या दुकानातील सामान स्वतःचा जीव धोक्यात घालून सुरक्षित स्थळी हालविले. फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे तास दीड तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी सात पाण्याचे बंब पाणी वापरावे लागले. ही आग विझविण्यासाठी ओल्ड गोवा आणि मडगाव येथील अग्निशामक दलाच्या जवानांचे सहकार्य लाभले.
स्थानिक नागरिकांनी व फोंडा पालिकेच्या कामगारांनी आग लागलेल्या दुकानातील सामान बाहेर काढण्यास फोंडा अग्निशमन दलाला मदत केली.
फोंडा पोलीस उपअधीक्षक महेश गावकर, पोलीस निरीक्षक मंजूनाथ देसाई, फोंडा उपजिल्हाधिकारी जयंत तारी, मामलेदार चंद्रकांत शेटकर व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
या आगीच्या घटनेची माहिती मिळताच आमदार तथा गृहमंत्री रवी नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संबंधित दुकानदारांना सरकारतर्फे नुकसान भरपाई देण्यासाठी त्वरित सोपस्कार पूर्ण करण्याचे आदेश श्री. नाईक यांनी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना आदेश दिला.
केंद्राचे वरिष्ठ अधिकारी डी.डी.रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी के.एस. कोमरपंत, डी. एम. गावस, शैलेश गावडे, पी. जी. प्रभू, सी.आर. म्हाळशेकर, एस.आर. गांवकर, जी. आर. परब, एम.व्ही. नाईक, एम.एम. डिकॉस्टा, पी.जी.देसाई, जे.व्ही. गावडे, सय्यद अफझर, विशांत गावडे, एस.जी. सावंत, जी.डी. पावणे यांना आग विझविण्याचे काम केले. ओल्ड गोवा केंद्राचे मायकल ब्रागांझा, एम.एच. वेर्णेकर, डी. प्रभू, सी. मडकईकर, मडगाव केंद्राचे एस.एन. साळुंखे, जी.आर. भट, डी.सी. मांद्रेकर, पी.पी. पिळर्णकर, पी.के. नाईक यांनी आग विझविण्याचे काम केले.
दरम्यान, या आगीची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी येण्यास अग्निशामक दलाच्या जवानांना थोडा उशीर झाल्याने स्थानिक लोकांनी नापसंती व्यक्त केली. येथील अग्निशामक दलाकडे तीन बंब आहेत. मात्र, हे तीन बंब चालविण्यासाठी एकच चालक असल्याने गैरसोय झाली. दलाच्या चालकाने एक बंद त्वरित घटनास्थळी नेऊन ठेवला. त्यानंतर एका दुचाकी वाहनावरून केंद्रात परत जाऊन दुसरा बंब घटनास्थळी घेऊन नेला. दलाकडे वाहने आहेत. मात्र. वाहनाच्या नुसार चालक नसल्याने गैरसोय झाली. वरिष्ठ सरकारी अधिकारी याकडे लक्ष द्यावे, अशी लोकांची मागणी आहे.

१० नोव्हेंबरपासूनच शाळा सुरू होणार

पणजी, दि.७ (प्रतिनिधी) - राज्यातील शाळांना असलेली दिवाळीची सुट्टी दोन दिवसांनी पुढे ढकलण्याची मागणी आचारसंहितेमुळे मान्य होऊ न शकल्याने सर्व शाळा येत्या १० नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहेत.
दरम्यान,सध्या दिवाळीची सुट्टी सुरू आहे. येत्या १० रोजी तुलसी विवाह असल्याने व हा उत्सव राज्यात मोठी दिवाळी म्हणून साजरा होतो त्यामुळे ही सुट्टी दोन दिवस पुढे ढकलण्याची मागणी अनेकांनी शिक्षण खात्याला केली होती. हा प्रस्ताव खात्याकडून सरकारला पाठवण्यात आला होता परंतु राज्यात पाळी पोटनिवडणुकीनिमित्ताने आचारसंहिता लागू झाल्याने हा निर्णय घेणे शक्य नसल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. दिवाळीची सुट्टी जाहीर करतेवेळीच या गोष्टीचा विचार होण्याची गरज होती. कोणताही निर्णय घेताना सविस्तर विचार करण्याची तसदी कुणीही घेत नसल्याने तसेच वरिष्ठांचेही याकडे लक्ष नसल्याने असा गोंधळ होतो,असे मत काहींनी व्यक्त केले आहे.

रोहितच्या कोठडीत वाढ

बाल न्यायालयाचा आदेश
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - अल्पवयीन जर्मन मुलीवरील बलात्कार आणि अश्लील "एसएमएस' पाठवल्याप्रकरणी अटक झालेल्या रोहित मोन्सेरातच्या जामीन अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी जास्त वेळ हवा अशी मागणी दोन्ही बाजूच्या वकिलांनी केल्याने बाल न्यायालयाचा तात्पुरता ताबा सांभाळणारे जलद न्यायालयाचे न्या. प्रमोद कामत यांनी रोहितला तीन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली. तसेच येत्या सोमवारी दि. १० नोव्हेंबरपासून रोहित याला नियमितपणे बाल न्यायालयात हजर करण्याचे आदेश कळंगुट पोलिसांना न्या. कामत यांनी दिले.
दुपारी २.३० वाजता कळंगुट पोलिस स्थानकाचे निरीक्षक तुषार वेर्णेकर व उपनिरीक्षक सेराफीन जाकीस व अन्य पोलिस पथक रोहितला घेऊन "वेलोफेलो बिल्डिंग'मधील जलद न्यायालयात हजर झाले. यावेळी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या समर्थकांनी न्यायालयात आणि न्यायालयाच्या बाहेर गर्दी केली होती. न्यायालयाचा आवार भरले होता. रोहितचे वडील व राज्याचे शिक्षणमंत्री बाबूश हेही न्यायालयाच्या आवारात खुर्चीवर इजिदोर फर्नांडिस यांच्यासह बसले होते.
पोलिस कोठडीत वाढ करण्याचा आदेश दिल्यानंतर न्या. कामत यांनी रोहितला "तुम्हाला काही त्रास आहे का,' असा प्रश्न केला. त्यावेळी रोहित याने नकारार्थी उत्तर दिले.
संशयिताच्या वतीने ऍड. अरुण ब्रास डिसा तर सरकारतर्फे सौ. पौर्णिमा भरणे यांनी युक्तिवाद केला. "रोहितविरोधात कोणतेही वैद्यकीय पुरावे नाहीत, जामीन मिळाला तर सर्व अटी मान्य करू,' असा युक्तिवाद ऍड. डिसा यांनी केला; तर "या प्रकरणात अजून अनेक पुरावे गोळा करायचे आहेत, त्यामुळे संशयिताची पोलिसांना गरज आहे,' अशी मागणी सौ. भरणे यांनी केली.
रोहितला पुन्हा तुरुंगात घेऊन जाण्यासाठी न्यायालयाबाहेर आणले असता, जेनिफर यांनी त्याला जवळ घेऊन प्रेमाने कुरवाळले; तर वडील बाबूश एक शब्दही बोलले नाहीत. आपल्या मुलाला जामीन मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्याने बाबूश उठून बाहेर निघाले. त्याबरोबर न्यायालयात बसलेले त्यांचे सर्व समर्थकही बाहेर गेले. समर्थकांच्या या गर्दीत पणजीचे महापौर टोनी रॉड्रिगीस, कॉंग्रेस नेते विजय सरदेसाई, उपमहापौर यतीन पारेख, नगरसेवक उदय मडकईकर, कॅरोलिना पो, सौ. उमा नाईक, मिनिन डिक्रुज, नागेश करिशेट्टी यांच्यासह रोहितची आई जेनिफर मोन्सेरात व अनेक महिलांचा समावेश होता.

रणधुमाळीला सुरूवात

पाळी पोटनिवडणुकीसाठी सहा अर्ज दाखल
डिचोली, दि. ७ (प्रतिनिधी) - पाळी पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला आज (शुक्रवारी) खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत उद्या (शनिवारी) संपत असून आज एकूण सहा उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले. कॉंग्रेसचे उमेदवार प्रताप गावस, अपक्ष उमेदवार राजेंद्र राणे यांच्यासह माजी आरोग्यमंत्री डॉ.सुरेश आमोणकर यांनीही अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. सौ.गीता प्रताप गावस व सेव्ह गोवा फ्रंटतर्फे जुझे लोबो यांनीही आपला अर्ज सादर केला आहे. भाजपतर्फे डॉ.प्रमोद सावंत उद्या ८ रोजी आपला अर्ज सादर करणार आहेत.
येत्या २६ नोव्हेंबर रोजी पाळी पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज सादर करण्याचा सहावा दिवस होता. उद्या शेवटचा दिवस असल्याने रिंगणात एकूण किती उमेदवार राहणार हे त्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या डॉ.आमोणकर यांच्या या निर्णयामुळे भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले असून डॉ.आमोणकरांचा हा निर्णय पूर्ण चुकीचा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. शेवटपर्यंत डॉ.आमोणकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाईल,असेही भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले.
कॉंग्रेसतर्फे प्रताप गावस यांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री दिगंबर कामत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी, पाळी मतदारसंघाच्या विकासाबाबत केवळ आश्वासने दिली जातात प्रत्यक्षात मात्र काहीही होत नाही, असा सवाल केला असता पाळीसाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात येणार असून त्यांची सुरुवात झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान,मगो पक्षाने आपला उमेदवार रिंगणात उतरवला नसला तरी अद्याप कॉंग्रेसला जाहीर पाठिंब्याबाबत मौन धारण केल्यानेही कॉंग्रेस कार्यकर्त्यांत नाराजी पसरली आहे.
भाजपतर्फे आज उमेदवारी
भाजपचे युवा उमेदवार डॉ.प्रमोद सावंत हे उद्या ८ रोजी आपला अर्ज सादर करतील. भाजपने पाळी मतदारसंघावर पुन्हा एकदा आपला ताबा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. डॉ.आमोणकर यांनी घेतलेल्या भूमिकेवरही तोडगा निघेल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला. राज्यात सध्या सुरू असलेली राजकीय हाणामारी व कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा यामुळे लोक या सरकारवर खवळले आहेत. विकासकामांसाठी सरकारकडे पैसा नसून केवळ आश्वासनांच्या खैरातही करून जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचे प्रकार प्रचारावेळी उघड केले जातील,अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

कळसई दाभाळ येथे तणाव

सातेरी पिसानी देवस्थानातील सहा मूर्ती व घुमटीची तोडफोड
- संशयावरून चौघे पोलिसांच्या ताब्यात
- खवळलेल्या ग्रामस्थांकडून रास्ता रोको
- छडा लावण्यासाठी ४८ तासांची मुदत
- स्थानिक आमदारांचा कडाडून निषेध

कुडचडे, दि.७ (प्रतिनिधी)- कळसई दाभाळ येथील सात गावांची ग्रामदेवता असलेल्या सातेरी पिसानी देवस्थानात काल रात्री सुमारे २ वाजता अज्ञातांनी देवस्थानाच्या सभामंडपात असलेल्या देवाच्या सहा मूर्ती व घुमटीची मोडतोड केली. यावेळी आरोपी देवालयाच्या मुख्य गेटचे कुलूप तोडण्याच्या प्रयत्नात असताना घटनास्थळी रात्रीच्या वेळी पहारा देणारी पोलिसांची गाडी पोहोचल्याने अज्ञातांनी मोडतोडीसाठी वापरलेले हातोडा व छिन्नी (घण व शेणे) तेथेच टाकून पलायन केले. या घटनेच्या निषेधार्थ सुमारे १००० लोकांनी सावर्डे ते धारबांदोडा रस्ता अडवून वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली. आरोपींना पकडण्यासाठी ग्रामस्थांनी पोलिसांना ४८ तासांची मुदत दिली असून यात ते असफल ठरल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. दरम्यान, याप्रकरणी चौघांना संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
यासंबंधी उपअधीक्षक पत्रे यांनी सांगितले की, येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने शोध मोहीम सुरू करून चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
देवळाच्या सुरक्षेसाठी खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करावेत किंवा ग्रामस्थांनी रोज देवळांमध्ये मुक्काम करून पहारा ठेवण्याची गरज पत्रे यांनी व्यक्त केली.
काल मध्यरात्री अज्ञातांनी देवस्थानाच्या आवारात व सभागृहात असलेल्या जल्मी देवाच्या मूर्ती व देवचाराची मूर्तीसह तुळस, घुमटीची वृंदावनाची तोडफोड करण्यात आली. यानंतर संशयितांनी देवस्थानाच्या मुख्य लोखंडी गेटच्या कुलुपाला पेट्रोलच्या साहाय्याने आग लावून ते तोडले. याच दरम्यान पोलिसांचे गस्तीवाहन घटनास्थळी दाखल झाले असता संशयितांनी पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्यात अपयश आले. मुख्य म्हणजे यावेळी पोलिसांकडे पुरेशी यंत्र सामग्री नसल्याने अज्ञातांना पलायन करता आले.
पोलिसांनी भटजींना या घटनेची कल्पना दिली. त्यानंतर हे वृत्त सर्वत्र फैलावले व पहाटे ४ वाजेपर्यंत ग्रामस्थांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. यावेळी पोलिसांनी ग्रामस्थांसह शोधमोहीम सुरू केली मात्र त्यांचा पत्ता लागली नाही. सदर देवस्थान किर्लपाल, वाघोण, सादगळ, कामरखंड, कळसई, कोडली, दाभाळ, या गावांचे ग्रामस्थान असल्याने मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते.
सावर्डे धारबांदोडा रस्ता पूर्ण बंद
मूर्तींच्या मोडतोडीच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी पहाटे ४.३० वाजल्यापासून सावर्डे दाभाळ धारबांदोडा रस्ता पूर्णपणे बंद केला होता. सावरगाळ ते दाभाळ पर्यंतच्या मुख्य रस्त्यावर सुमारे २ मीटरच्या अंतरावर दगडी कुंपण व जेसीबीच्या साहाय्याने भले मोठे वृक्ष रस्त्यावर टाकून संपूर्ण रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. टायरना आग लावल्याने दुचाकी वाहनांसह सर्व प्रकारची वाहने अडवून ठेवण्यात आली. यामुळे अनेक प्रवाशांना याचा फटका बसला.
घटनेची माहिती मिळताच दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी गोकुळदास नाईक, पोलिस अधीक्षक ऍलन डिसा, केप्याचे उपजिल्हाधिकारी वेनान्सियो फुर्तादो, उपअधीक्षक रोहिदास पत्रे, कुडचडे पोलिस निरीक्षक नीलेश राणे, सांग्याचे निरीक्षक राजू राऊत देसाई, केप्याचे निरीक्षक संतोष राणे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. सांगे मामलेदार पराग नगर्सेकर हेही तेथे उपस्थित होते. यावेळी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले; पण त्यांना कोणतेच धागेदोरे सापडू शकले नाहीत.
सामूहिक गाऱ्हाणे
यावेळी सात गावच्या हजारो ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावकरी व भटजीसह देवीला सामूहिक गाऱ्हाणे घातले. या घटनेला कारणीभूत असलेल्यांना लवकरच जनतेसमोर उघड कर, असे साकडे देवाला घालण्यात आले.
स्थानिक आमदारांचा निषेध
सावर्डे मतदारसंघात प्रथम अशी घटना घडूनही स्थानिक आमदार अनिल साळगावकर दिवसभर घटनास्थळी न फिरकल्याने ग्रामस्थांत संतापाची लाट पसरली असून इतर कामांसाठी ते फारसे भेटत नाहीतच पण निदान याप्रसंगी तरी त्यांनी घटनास्थळी लोकांना भेटणे गरजेचे होते, असे मत जनतेतून व्यक्त करण्यात आले. दुपारी उशिरा आमदारांचे सुपुत्र अर्जुन साळगावकर घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी लोकांना सहानुभूती दाखवण्याचे प्रयत्न केले; मात्र आमदार न फिरकल्याने जनतेकडून याचा निषेध करण्यात आला.
या घटनेचा निषेध करताना बजरंग दलाचे सावर्डे प्रमुख भानुदास मामलेकर यांनी हिंदू जनांनी एकत्र येऊन याचा विरोध करावा, असे आवाहन केले. यामागे मोठ्या टोळीचा हात असून राज्यातील सर्व देवालयांमध्ये छुपे कॅमेरे सरकारकडून बसविण्याची गरज आहे. मंत्र्यांसाठी वापरण्यात येणारी "झेड' सुरक्षा कमी करून ती देवालयामध्ये ठेवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
भाजप मंडल समितीचे पंचायत प्रमुख सागर तेंडुलकर यांनी कुचकामी ठरलेल्या सरकारी यंत्रणेला जबाबदार ठरवून आमदारांचा निषेध केला. देवस्थानचे प्रमुख बाबूराव गावकर यांनी हा प्रकार म्हणजे जातीय सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न असून सरकारने देवळांच्या सुरक्षेसाठी खास सुरक्षा रक्षक देण्याची मागणी केली.
कळसईचे पंच दामोदर बांदेकर यांनी ही घटना म्हणजे व्यापक षडयंत्राचा भाग असल्याचे सांगून स्थानिक आमदारांचा निषेध केला. आम्ही आमदारांना अजून पाहिलेच नसल्याचे ते म्हणाले. सरपंच रामा गावकर यांनीही या घटनेचा निषेध केला.
यानंतर घेण्यात आलेल्या निषेध सभेत जयेश थळी, बजरंग दलाचे दक्षिण गोवा प्रमुख जयेश नाईक, समीर साळगावकर व इतरांनी आपले विचार मांडले.
केप्याचे उपजिल्हाधिकारी वेनान्सियो फुर्तादो म्हणाले, दाभाळ परिसरात असलेल्या सेझा गोवा खाण कंपनीला या भागातील देवस्थानांना सुरक्षा पुरवण्याचा प्रस्ताव सेझासमोर मांडण्यात आला असता कंपनीने त्याला होकार दिला आहे. यासंबंधी ग्रामस्थांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांसोबत दक्षिण गोव्यातील सर्व २३८ देवस्थानांच्या प्रमुखांची तातडीची बैठक घेऊन संबंधित ठिकाणी असलेल्या खाण कंपन्यांशी सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. या प्रकणामध्ये आम्हाला काही धागेदोरे सापडले असून लवकरच आरोपीला पकडण्यात यश मिळेल.

Friday, 7 November 2008

'वंडरबॉय'ची करामत, सचिनने ठोकले चाळीसावे कसोटी शतक

जामठा, दि. ६ : ऍडलेड (ऑस्ट्रेलिया) कसोटीनंतर सात सामने खेळलो, पण शतक काढू शकलो नाही. आज संघाला गरज असताना शतक लागले याचा आनंद आगळा असल्याचे "वंडरबॉय' सचिन तेंडुलकरने पत्रपरिषदेत सांगितले. येथील जामठा स्टेडियमवर पाहुण्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशीच्या खेळानंतर तो उत्साहात पत्रकारांशी बोलत होता. एकूण ४० कसोटी शतके त्याच्या नावावर लागली असून हा विक्रम मोडण्याची क्षमता सध्याच्या कोणत्याही खेळाडूंत नसल्याचे दिसून येते.तसेच सतत निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या माध्यमांना आणि समीक्षकांना त्याने आपल्या या बहारदार कामगिरीद्वारे सणसणीत चपराक लगावली आहे.
पहिल्या दिवशी तीन गडी बाद व्हावयाला हवे होते. मात्र, पाच गडी बाद झाले. तीन गडी बाद झाल्यानंतर माझ्यावर फलंदाजीचे दडपण आले. मात्र, लक्ष्मणसोबत चांगली भागीदारी झाल्यामुळे ते दूर झाले. शतकांच्या आनंदापेक्षा संघासाठी काही केल्याबद्दल जास्त आनंद झाला, असे त्याने यावेळी सांगितले.
शतकाच्या जवळ असताना दोन झेल सुटले त्यावेळी एकाग्रता भंग झाली नव्हती. मात्र, दडपण वाढले होते, अशी कबुलीही त्याने यावेळी दिली. मुरली विजय याने चांगली फलंदाजी केली. तो एक चांगला फलंदाज आहे, असे सचिन म्हणाला.
जामठा व्हीसीएची खेळपट्टी चांगली आहे. दोन दिवसानंतर खेळपट्टी फिरकीला अनुकूल होईल. आज क्रेझा याने चांगली गोलंदाजी केली. परंतु, तो "अनलकी' राहिला. आम्हाला मोठी धावसंख्या केल्यानंतर त्यांचे गडीही बाद करण्याची गरज आहे, असे त्याने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. सौरभचे भावनावर नियंत्रण आहे. तो शेवटची कसोटी म्हणून खेळत नाही तर त्याने खेळावर लक्ष केंद्रित केले आहे, याकडेही सचिनने लक्ष वेधले.
जगातील एक उत्कृष्ट असे जामठ्याचे व्हीसीए स्टेडियम आहे. सुविधा उत्तम आहेत. जिम व खेळाडूंचा कक्ष चांगला आहे, असेही त्याने सांगितले.
कर्णधाराचा विश्वास कमावला : क्रेझा
दरम्यान, कसोटी पदार्पणातच पहिल्या दिवशी तीन गडी बाद करीत कर्णधाराचा विश्वास कमावला, असे ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर क्रेझा याने सामन्यानंतर एका पत्रपरिषदेत सांगितले. सामन्यापूर्वी मी नर्व्हस होतो. पॉन्टिंग व हेडन याने शांत करीत मला "रिलॅक्स' केले.
सहा आठवड्यापासून संघासोबत होतो. शेवटी चवथ्या कसोटी सामन्यात संधी मिळाली त्याचेच मी चीज केले, असे क्रेझा पत्रकारांना म्हणाला.
भारतीय खेळपट्टीवर संयमाची आवश्यकता असते तो मी ठेवला व भारताचे तीन गडी घेण्यात यशस्वी झालो, असे त्याने सांगितले.
प्रथम मी मध्यमगती गोलंदाज होतो. मात्र, पाठीच्या दुखण्यामुळे मी फिरकी गोलंदाज झालो. मार्क वॉ हा माझा आदर्श आहे असे सांगून म्हणाला, ऑस्ट्रेलियात ऑफ स्पिनर कमी आहेत. तीनच असे ऑफ स्पिनर गोलंदाज आहेत की, ज्यांच्या नावावर शंभरापेक्षा अधिक कसोटी बळी आहेत.
बिशनसिंग बेदींनी दिलेल्या टिप्सचा फायदा मला झाला. त्यांनी गोलंदाजी करताना क्रीजवर रिलॅक्स होऊन गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. त्याचा आज फायदा झाला, असे शेवटी क्रेझाने सांगितले.

'इफ्फी'साठी बड्या कलाकारांची नामनिश्चिती

पणजी,दि. ६ (प्रतिनिधी): 'इफ्फी' (आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव) निमित्ताने गोव्यात येणाऱ्या कलाकारांची नामावली हळूहळू निश्चित होत आहे. यासंबंधी गोवा मनोरंजन संस्थेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रणजीत, अनिल कपूर, रणधीर कपूर, झीनत अमान, सुरेश ओबेरॉय, नितीन मुकेश, सोनल चौहान, जॅकी श्रॉफ, पूजा भट, अपर्णा सेन आदींची गोवा भेट निश्चित झाली आहे.
"इफ्फी'निमित्त प्रत्येक दिवशी "रेड कार्पेट' कार्यक्रम होणार असून त्यासाठी विविध कलाकारांना आमंत्रित केले जाणार असल्याची माहितीही देण्यात आली.
यंदा "इफ्फी' दरम्यान, कला अकादमी,आयनॉक्स व मॅकनिज पॅलेस सिनेमागृहांचा वापर करण्यात येईल. सिने अशोक व सम्राट या सिनेमाग्रहांना प्रतिनिधींकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ते रद्द करण्यात आले आहेत. मडगाव येथील रवींद्र भवनात सिनेमा प्रदर्शित करण्याबाबतही चर्चा सुरू आहे. यंदा पहिल्यांदाच "इफ्फी'साठी "फिल्म खरेदीदार भेट देणार असून त्यांच्याकडून काही चांगल्या फिल्मस खरेदी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या महोत्सवाला अर्थ प्राप्त होईल. महोत्सवात एकूण १८० चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यंदा गोव्याचे तीन चित्रपट इंडियन पॅनोरमासाठी पाठवण्यात आले होते; परंतु त्यातील एकही पात्र ठरला नाही, अशी माहिती हाती आली आहे.
एकीकडे राजकीय सुंदोपसुंदी तर दुसरीकडे पाळी पोटनिवडणुकीचे वारे अशा स्थितीत "इफ्फी'आयोजनाला मात्र अजूनही जोर चढला नसल्याचे चित्र दिसत आहे. पाळी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उत्तर गोव्यात आचारसंहिता लागू झाल्याने "इफ्फी'च्या विविध कामांत मोठे अडथळे निर्माण झाले असून या कामांत गुंतलेल्या अधिकाऱ्यांची बरीच दमछाक होत असल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यात "इफ्फी'मय वातावरण निर्मितीसाठी जो खर्च व्हायचा तो खर्च या आचारसंहितेमुळे वाचला खरा; परंतु त्यामुळे आंतरराष्ट्रीय चित्रपटासारखा मोठा उत्सव गोव्यात साजरा होणार असल्याने त्यासाठी पत्रकार परिषदा व विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या फलक लावण्यावरही निर्बंध आले आहेत.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा
खजिना रसिकांसाठी खुला

दरम्यान,"इफ्फी'च्या रसिकांना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील निवडक चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. त्याअंतर्गत चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचा "कालिया मर्दन' हा अप्रतिम मूकपट प्रत्यक्ष संगीताच्या साथीसह पाहता येणार आहे. १९१९ साली तयार केलेला हा चित्रपट येत्या २३ नोव्हेंबर २००८ रोजी "इफ्फी'मध्ये दाखवला जाणार आहे.
भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक विजय जाधव यांनी मुंबईत याबाबत अधिक माहिती दिली. इफ्फीमध्ये "संग्रहालयातील खजिना' या शिर्षकांतर्गत १९५० सालापूर्वी तयार केलेले आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दखलपात्र ठरलेले भारतीय चित्रपट दाखले जाणार आहे. हिमांशू राय यांनी पहिली आंतरराष्ट्रीय निर्मिती असलेल्या "कर्मा'सह, संत तुकाराम, जर्नी ऑफ डॉ.कोटणीस, नीचा, नगर या चित्रपटांचा यात समावेश आहे. समाजाचे मनोरंजन करतानाच प्रबोधन करण्याची चित्रपटांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी "देश निर्माण' या विषयावर आधारित भित्तीपत्रकांचे आणि छायाचित्रांचे प्रदर्शनही यावेळी भरवले जाणार आहे. तसेच यातील निवडक भित्तीचित्रांचा संग्रह असणारे पुस्तकही इफ्फीच्या कालावधीत प्रकाशित केले जाणार आहे.
भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची भूमिका विजय जाधव यांनी स्पष्ट केली. चित्रपट संस्कृतीचे महत्त्व जाणून ती जपण्यासाठी चित्रपट रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवण्याच्या दृष्टीने भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय प्रयत्नशील असून त्यादृष्टीने हे कार्यक्रम आखण्यात आल्याचे ते म्हणाले.

पाळी पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज सादर, डॉ. आमोणकर यांचा भाजपचा राजीनामा? कॉंग्रेसला पाठिंब्यासंदर्भात म.गो.चे मौन!

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): पाळी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या उद्या (शुक्रवारी) भाजप व कॉंग्रेसचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. आज सहाव्या दिवशी एकही अर्ज सादर झाला नसल्याची माहिती उपजिल्हाधिकारी अरविंद बुगडे यांनी दिली. माजी आरोग्यमंत्री तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ.सुरेश आमोणकर यांना उमेदवारी नाकारल्याने आज त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा फॅक्सव्दारे भाजप मुख्यालयात पाठवल्याची चर्चा आहे. त्यांनी पाळी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी सादर करण्याचे ठरवल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत असले तरी त्यांची समजूत काढण्यात यश मिळेल,असा विश्वास भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.
भाजपतर्फे काल युवा नेते डॉ. प्रमोद सावंत यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज कॉंग्रेसकडून प्रताप गावस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा आघाडीतील घटक असल्याने त्यांनी यावेळी आपला उमेदवार रिंगणात न उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पक्षाचा पाठींबा कॉंग्रेसचे उमेदवार प्रताप गावस यांना जाहीर करण्याबाबत त्यांनी सावध पवित्रा घेतला आहे.
गोवा राज्य शिवसेना प्रमुख उपेंद्र गावकर यांनी अद्याप भाजपला पाठिंबा देण्याबाबत अंतिम निर्णय झाला नसून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानंतरच शिवसेना आपली भूमिका जाहीर करेल, असे म्हटले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. आमोणकर यांना कॉंग्रेसचे उमेदवार प्रा. गुरूदास गावस यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. तथापि, त्यापूर्वी डॉ. आमोणकर यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या डॉ. प्रमोद सावंत या नव्या दमाच्या युवकाला उमेदवारी बहाल करून भाजपने येथील कार्यकर्त्यांत चैतन्याचे वातावरण निर्माण केले आहे. डॉ.आमोणकर यांनी सार्दिन सरकारात व त्यानंतर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली आरोग्यमंत्रीपद सांभाळले होते. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ.आमोणकर यांच्याकडून बंडाची भूमिका घेतली जाणार नाही,असा विश्वास पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला. आज माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर व राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांची भेट घेतली व समजूत काढण्याचे प्रयत्न केले, अशी माहिती मिळाली आहे.

मडगावात पुन्हा दुकानफोडी, २.४४ लाखांचा माल पळवला; पोलिस हवालदिल

मडगाव, दि. ६ (प्रतिनिधी): मडगावात काल रात्री चोरट्यांनी एक दुकान फोडून सुमारे २.४४ लाखांचा ऐवज पळवल्याने शहरात पुन्हा चोऱ्यांचे सत्र सुरू झाले आहे. परिणाणी लोकांत घबराटीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी याप्रकरणी संशयावरून एकाला ताब्यात घेतले आहे.
येथील वर्देवालावलकर रोडवरील "बांदेकर प्रिंटर्स' या दुकानात चोरटे शटर वाकवून आत शिरले व त्यांनी चोरी केली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला.चोरट्यांनी दुकानातून सोनीचे दोन डिजिटल तर एक निकोमचा कॅमेरा व रोख ७० हजार रु. ची रक्कम लांबवली. सोनी कॅमेऱ्यांची किंमत १.६० लाख, तर निकोमची किंमत १४ हजार रु. आहे. त्यामुळे चोरीस गेलेल्या मालाची किंमत २.४४ लाख रु. होते.
पोलिसांनी आज सकाळी जाऊन पंचनामा केला. त्यांना कोणताच धागादोरा सापडलेला नाही. त्यांनी संशयावरून एकाला ताब्यात घेतलेले असले तरी त्याच्याकडूनही ठोस अशी माहिती मिळालेली नसल्याचे सांगण्यात आले.
शटर वाकवून चोरी करण्यात वाकबगार असलेले एक टोळके हल्लीच शिक्षा भोगून तुरुंगातून सुटले आहे व त्यांनीच हे काम पूर्ववत सुरू केले आहे की काय त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

पोलिस जीपवर आदळून मोटरसायकलस्वार ठार

मडगाव, दि. ६ (प्रतिनिधी): धर्मापूर येथे आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या अपघातात पोलिस जीपला आदळून बेंजामिन सांतान फर्नांडिस (५०) हा वार्का-सालसेत येथील इसम जागीच मरण पावला; तर अन्य दोघे जखमी झाले. एकूण तीन वाहनांचा हा अपघात होता.
कुंकळ्ळी हून येणाऱ्या जीए०८ डी १८२२ या पल्सर मोटरसायकलची व मडगावहून उलट दिशेने जाणाऱ्या जीए०१पी ९०१९ या स्प्लेंडरची आमने-सामने टक्कर झाली व त्यात श्री. कुतिन्हो व एरीक कार्दोज हे रस्त्यावर पडले व जखमी झाले. नेमकी त्याचवेळी मडगावहून कुंकळ्ळीकडे परतणारी कुंकळ्ळी पोलिसांची जीए०१ जी १०८४ ही जीप त्यांच्यामागून तेथे पोहोचली व रस्त्यावर पडलेल्या जखमींना चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाने जीप उजव्या बाजूने घेतली. त्याचवेळी कुंकळ्ळीहून मडगावकडे जीए ८ बी ४११७ या दुचाकीवरून येणारा वार्का येथील बेंजामिन तेथे पोहोचला तो या जीपवर आदळला आणि टायरवर डोके आदळून जागीच मरण पावला.
पोलिसांनी पंचनामा करून जखमींना हॉस्पिसियूत तर मृतदेह शवागारात पाठविला आहे. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे या रस्त्यावर बराच काळ वाहतूक ठप्प झाली होती.

रोहितच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): अल्पवयीन जर्मन मुलीवरील बलात्कार प्रकरणी तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळालेला मुख्य संशयित रोहित मोन्सेरात याने जामिनासाठी बाल न्यायालयात अर्ज दाखल केला असून उद्या (शुक्रवारी) त्यावर सुनावणी होणार आहे. न्यायालयाने या अर्जावर कळंगुट पोलिसांचे मत मागितले असून त्यानंतरच रोहितच्या जामीनाबाबत निर्णय होणार आहे.
पोलिसांनी अद्याप या प्रकरणातील सहआरोपींना ताब्यात घेतलेले नाही. त्याप्रमाणे अजून अनेक पुरावे पोलिसांना गोळा करावयाचे आहेत, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. उद्या सायंकाळी ५ वाजता या जामीन अर्जावर पोलिस आपले म्हणणे बाल न्यायालयात सादर करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
रोहितला कळंगुट पोलिस स्थानकाच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले असून झोपण्यासाठी चटई व कांबळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याला कोणत्याही परिस्थिती जामीन मिळवून देण्यासाठी त्याचे वडील तथा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी प्रयत्न चालवले आहेत.
दरम्यान, त्या पीडित मुलीने आपल्या जबानीत वॉरन आलेमाव (मंत्री चर्चिल आलेमाव यांचा पुतण्या) याचे नाव घेतले नसल्याने पोलिसांनी त्यादृष्टीने तपास करायचा नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्याचप्रमाणे पोलिसांना वॉरन आलेमाव याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. २४ ऑक्टोबर रोजी त्या मुलीच्या आईने वॉरनविरोधात तक्रार दाखल केली होती.

...महानाट्याचे स्वप्न साकारणार

फोंडा, दि.६ (प्रतिनिधी): गोव्यातील कलाकार, तंत्रज्ञांना घेऊन एक महानाट्य साकारण्याचे केरी फोंडा येथील श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळाने चार वर्षापूर्वी पाहिलेले एक स्वप्न येत्या शनिवार ८ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्षात उतरणार आहे.
"जाणता राजा' या महानाट्याचे यशस्वी आयोजन केल्यानंतर श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळाने एक महानाट्य साकारण्याचे स्वप्न पाहिले होते. महानाट्याच्या निर्मितीसाठी गेली चार वर्षे जिद्द, चिकाटीने प्रयत्न सुरू होते. महानाट्यासाठी विषय, संहिता लेखन ह्यानंतर महानाट्यासाठी रंगभूषा, वेषभूषा, रंगमंच इतर साधन सुविधा याबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न केल्यानंतर आता "संभवामि युगे युगे' हे श्रीकृष्ण जीवनावरील महानाट्य साकारले आहे. या महानाट्याच्या निर्मितीसाठी आत्तापर्यंत सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महानाट्याची निर्मिती ही काही छोटी गोष्ट नव्हे. कुठल्याही गोष्टीच्या निर्मितीसाठी आर्थिक मदत गरजेची असते. महानाट्य तयार करण्यासाठी निधी कसा जमा करावा ? असा प्रश्न मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पडला. ह्याच विषयावर चर्चा करताना मुंबई येथील जयंतराव साळगावकर यांनी निधी गोळा करण्याची एक वेगळीच संकल्पना मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांकडे मांडली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा ही योजना आवडली. त्यानुसार मंडळाने लोकांकडून परत फेडीचे वचन देऊन देणग्या स्वीकारण्यास सुरुवात केली, अनेकांनी याला सहकार्य दिले. दोन वर्षात संबंधितांची रक्कम व्याजासह परत केली जाणार आहेत. या पद्धतीने आज मंडळाकडे निधी जमा झालेला आहे, लोकांकडून जमा झालेला निधी विविध साधन सुविधा उभारणीसाठी खर्च केला जात आहे. त्यामुळे या महानाट्यावर खर्च झालेला निधी भरून काढण्यासाठी या महानाट्याचे पन्नास पेक्षा जास्त प्रयोग झाले पाहिजेत. मंडळाचे कार्यकर्ते आशावादी आहेत आणि त्यामुळे एवढे प्रयोग निश्चित होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच ह्या महानाट्याचे हिंदीत भाषान्तर केले जाणार आहे. त्यामुळे उत्तर भारतात ह्या महानाट्याचे प्रयोग सादर केले जाऊ शकतात. कन्नड व इतर प्रादेशिक भाषांत सुद्धा या महानाट्याचे भाषान्तर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
हे महानाट्य म्हणजेच गोमंतकीय कलाकृती आहे. केवळ संगीत दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शनाची बाजू गोव्याबाहेरील माणसांनी हाताळली आहेत. लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, वेषभूषा, प्रकाश योजना या प्रमुख बाजू गोमंतकीय कलाकारांनी हातळल्या आहेत. गोमंतकीय कलाकार आणि तंत्रज्ञांना घेऊन साकारण्यात येणारे हे महानाट्य सर्वार्थाने आगळे आणि वेगळे ठरणार आहे.
या महानाट्यासाठी रंगमंच तयार करण्यासाठी दोन महिने दरदिवशी सुमारे चाळीसच्या आसपास कामगार काम करीत होते. त्यांना साहाय्य करण्यासाठी मंडळाशी संबंधित पंधरा ते पंचवीस स्थापत्यविशारद (आर्कीटेक्ट) व इतर वावरत होते. आकर्षक असा सहा मजली इमारतीचे स्वरूप असलेला फिरता, सरकता, उचलता रंगमंच तयार करण्यात आला. नेपथ्यकार प्रसिद्ध चित्रकार दयानंद भगत यांचे कलाकौशल्य कौतुकाला पात्र ठरते.
या महानाट्याची तयारी पूर्ण झाली असून दिग्दर्शक दिलीप देसाई, नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्य, नेपथ्यकार दयानंद भगत, वेषभूषाकार दिगंबर सिंगबाळ, प्रकाश योजनाकार सतीश गावस महानाट्याच्या तयारीवर शेवटचा हात फिरवत आहेत. मंडळाचे अध्यक्ष अरुण देसाई आणि बरेच पदाधिकारी गेले कित्येक दिवस बिन पगारी रजा घेऊन महानाट्याच्या यशस्वी आयोजनासाठी झटत आहेत.

Thursday, 6 November 2008

ओबामांनी घडवला इतिहास व्हाईट हाऊसमध्ये प्रथमच 'ब्लॅक बॉस'; २० जानेवारीला शपथविधी

- कृष्णवर्णीय नेता प्रथमच राष्ट्राध्यक्ष
- अमेरिकी इतिहासात नवा अध्याय
- जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव
- भारताकडून निवडीचे स्वागत
- भाजपतर्फे खास शुभेच्छा

वॉशिंग्टन, ५ नोव्हेंबर : अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या रिपब्लिकन पार्टीचे नेते जॉन मॅकेन यांना पराभूत करीत डेमोक्रॅटिक पार्टीचे तरुण, तडफदार नेते बराक ओबामा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले असून व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश मिळविणारे ते पहिलेच कृष्णवर्णीय ठरले आहेत. त्यांच्या या विजयाने केनिया या त्यांच्या पैतृक देशासह संपूर्ण जगात आनंदाची लाट उसळली आहे. भारतानेही ओबामा यांच्या निवडीचे स्वागत केले असून ओबामा यांचा विजय भारत-अमेरिका संबंधांना नवे आयाम देणारा ठरणार असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने व्यक्त केली आहे.
डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार बराक ओबामा यांनी अध्यक्षपदासाठी आवश्यक असणाऱ्या २७० इलेक्ट्रोल कॉलेज वोट्सचा टप्पा ओलांडून २९७ निर्णायक मते मिळविली तर त्यांचेे प्रतिस्पर्धी जॉन मॅकेन यांना १३९ मतांवरच समाधान मानावे लागले. जगातील महासत्ता असणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ऐतिहासिक ठरेल, असे चित्र पहिलेपासूनच गृहित धरले जात होते. कारण सुरुवातीपासूनच बराक ओबामा आणि त्यांच्याच पक्षाच्या हिलरी क्लिंटन या पदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार ठरले होते. हिलरी विजयी झाल्या असत्या तर अमेरिकेला पहिली महिला राष्ट्राध्यक्ष मिळाली असती आणि ओबामांचा विजय हा पहिल्या कृष्णवर्णीय व्यक्तीचा विजय ठरला असता. दोन्ही बाजुने विचार केला असता अमेरिकेत यंदा इतिहास रचला जाणार हे निश्चितच होते. बुश यांच्या रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार जॉन मॅकेन यांनी ओबामा यांना चांगली टक्कर दिली. अध्यक्षपदाच्या मतदानास मंगळवारी सुरुवात झाली. मतदानानंतर सुरुवातीला आलेल्या काही राज्यांच्या निकालांमध्ये ओबामा यांनी आघाडी घेतल्याचे चित्र होते. अमेरिकी निवडणुकीच्या इतिहासात इतके उत्कंठावर्धक चित्र यापूर्वी कधीही दिसले नव्हते.
मंगळवारी उशिरापर्यंत बहुतेक राज्यात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि सायंकाळपासूनच निकाल येण्यास सुरुवात झाली. मतदारांनी १९६० नंतर मोठ्या संख्येने प्रथमच मतदानात भाग घेतला, हे यंदाच्या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. अमेरिकेत सर्वप्रथम मतदानाचा मान मिळालेल्या न्यू हॅम्पशायरमधील काही केंद्रांवर बराक ओबामा यांना आघाडी मिळाली. या ठिकाणी ओबामा यांना ३२ तर मॅकेन यांना १६ मते मिळाली.
या मतदानाला कृष्णवर्णीय विरुद्ध श्वेतवर्णीय असा रंग देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कृष्णवर्णीयबहुल राज्यात मतदारांनी विशेष गर्दी केली, हेही अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या इतिहासातील महत्त्वाचे पर्व होते. पूर्व किनाऱ्यावरील पेनसिल्व्हानिया, वर्जिनिया आणि नॉर्थ कॅरोलिना या राज्यातील केंद्रांवर कृष्णवर्णीय नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केली होती. येथील मतदानाचे प्रमाण पाहता ओबामा यांना अधिकाधिक मते मिळणार, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तो अगदी खरा ठरला आणि ओबामा हे अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यासोबतच अमेरिकेत समानतेचे नवे युग अवतरल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली जात आहे. आज अमेरिकेतील ओबामा समर्थकांसह कृष्णवर्णीय प्रचंड आनंदात वावरत होते. ठिकठिकाणी ओबामांचा विजय साजरा केला जात होता. युवा वर्गाने कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात यंदा मतदान केल्यानेही मतांची टक्केवारी वाढली.
रिपब्लिकन पार्टीचे जॉर्ज डब्ल्यू. बुश हे गेल्या आठ वर्षांपासून अध्यक्षपदावर आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील परराष्ट्र आणि आर्थिक धोरणांवर सातत्याने अमेरिकेत टीका होत आहे. त्याचा फायदाही ओबामा यांना मतदानात मिळाला असावा, असे बोलले जात आहे. येत्या २० जानेवारीला ओबामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
मॅक्केन यांनी पराभव स्वीकारला
अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार जॉन मॅक्केन यांनी आपला पराभव स्वीकारला असून विजयी ओबामांना शुभेच्छा दिल्या आहेत. एरिझोना राज्यात आपल्या हजारो कार्यकर्त्यांसमोर बोलताना मॅकेन अतिशय भावूक झाले. ते म्हणाले की, सध्या देशासमोर बरीच मोठी आव्हाने आहेत. ती पेलण्याकरिता ओबामा यांना यथाशक्ती पूर्ण मदत करण्याचे आश्वासन मी देतो. देशातील नागरिकांनीही त्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
माझ्या उत्तराधिकाऱ्याला यश मिळो : बुश
आपल्या कारकिर्दीत कायम वादाच्या भोवऱ्यात आणि निंदेत अडकलेले जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी ओबामा यांना विजयाच्या शुभेच्छा देतानाच आपल्या या उत्तराधिकाऱ्याला परमेश्वर यश प्रदान करो, अशी प्रार्थनाही केली आहे.
मंगळवारी अमेरिकेच्या प्रथम महिला लॉरा बुश यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने बुश यांनी काही आप्तांसाठी एका मेजवानीचे आयोजन केले होते. त्यानंतर थोड्याच वेळात ओबामा यांच्या विजयाचे वृत्त येऊन धडकले. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना बुश यांनी आपल्या या उत्तराधिकाऱ्याकरिता शुभेच्छा व्यक्त केल्या.
भाजपकडून अभिनंदन
अमेरिकेच्या ४४ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या बराक ओबामा यांचे भारतातील प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने अभिनंदन केले आहे. पक्षाचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे की, ओबामा यांनी प्रचारादरम्यान आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्याचे म्हटले होते. त्यांनी आपले आश्वासन पाळावे आणि अधिक यशस्वीपणे आपला कार्यकाळ घालवावा, अशीच आमची सदिच्छा आहे.

भाजपचा पाळीसाठी खास आर्थिक पॅकेजचा प्रस्ताव

डॉ. प्रमोद सावंत आज उमेदवारी अर्ज भरणार
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आर्थिक मंदीचे सावट पडल्याने त्याचा मोठा फटका खाण उद्योगाला बसला आहे. पाळी मतदारसंघातील बहुसंख्य जनता खाण उद्योगाशी संबंधित व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे या मंदीचा परिणाम त्यांच्या चरितार्थावर पडणार असल्याने या लोकांसाठी खास आर्थिक पॅकेजचा प्रस्ताव तयार करणार असल्याची घोषणा आज भाजपतर्फे करण्यात आली.
येथील भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी ही घोषणा केली. यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर,आमदार दामोदर नाईक,दयानंद सोपटे, अनंत शेट, राजेश पाटणेकर, लक्ष्मीकांत पार्सेकर आदी नेते उपस्थित होते. पाळी पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे नवोदित युवा व तडफदार नेते डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करून ते उद्या ६ रोजी आपला उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याचे श्री.नाईक म्हणाले. पाळी मतदारसंघातील उमेदवारीवरून नाराज झालेल्या नेत्यांशी चर्चा झाली असून सर्व मतभेद विसरून भाजप कार्यकर्ते श्री. सावंत यांच्या प्रचारकार्यात झोकून देतील व पाळीत पुन्हा भाजपचे कमळ फुलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्याचा विकास पूर्ण ठप्प झाला असून मंत्रीच सरकाराअंतर्गत एकमेकांचे पाय ओढण्यातच मग्न आहेत. हे सरकार जनतेला अजिबात नको असून म्हणूनच ते बरखास्त करण्याची मागणी भाजपतर्फे राज्यपाल एस.एस.सिद्धू यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेकडून भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगून उर्वरित नेत्यांशीही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाळी पोटनिवडणुकीव्दारे जनता सरकाराविरोधातील आपला रोष व्यक्त करेल, असा विश्वास श्री. नाईक यांनी व्यक्त केला. विद्यमान परिस्थितीत पर्यायी सरकार स्थापन न करता थेट निवडणुकांना सामोरे जाण्याची भाजपने जय्यत तयारी ठेवल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान,डॉ. प्रमोद सावंत यांनी आपण पाळी मतदारसंघातील धूळ प्रदूषण, बेकारी आदी प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पाळी मतदारसंघातील रस्त्यांचे रुंदीकरण ही सध्याची गरज असून खाण वाहतुकीवर नियंत्रण ठेवून या भागात होणाऱ्या धूळ प्रदूषणाबाबत ठोस उपाययोजना आखण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.समाज कार्याच्या निमित्ताने या मतदारसंघातील विविध भागात कार्य केल्याचे सांगून मतदारांनी दिलेल्या प्रतिसादावरून ही जागा भाजपला नक्कीच मिळेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
----
समाजकार्याची ओढ असलेला उमेदवार
प्रमोद पांडुरंग सावंत हे पेशाने डॉक्टर असून ते ३५ वर्षीय आहेत. पाळीचे जिल्हा पंचायत सदस्य पांडुरंग सावंत यांचे ते पुत्र आहेत. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून वैद्यकीय पदवी मिळाल्यानंतर आता ते पुणे येथे समाजकार्य पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. भामई-पाळी येथे साई क्लिनिक येथे ते आपला व्यवसाय करतात. साखळी व डिचोली येथे सरकारी इस्पितळात आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून ते सेवेत होते व ही नोकरी त्यांनी सप्टेंबर २००८ मध्ये सोडली. "साई लाइफ केअर' या बिगर सरकारी संस्थेचे अध्यक्ष असलेल्या डॉ.सावंत यांनी युवा,महिला यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले असून "एड्स' जागृती कार्यक्रमातही त्यांच्या संस्थेचे कार्य जोमाने सुरू आहे.धेंपो समूहाने पुरस्कृत केलेला मंथन प्रकल्प, ग्रामीण माहिती तंत्रज्ञान युवा विकास केंद्र, पाळणा घर आदी विविध प्रकल्प त्यांच्या विविध संस्थांमार्फत सुरू असून एक प्रामाणिक व सक्रिय समाज कार्यकर्ते म्हणून ते परिचित आहेत. नेहरू युवा केंद्राच्या विविध उपक्रमातही त्यांची संस्था सहभागी होत असून २००२ साली त्यांच्या संस्थेला राज्य युवा संस्था पुरस्कार तर १९९९ साली त्यांना वैयक्तिक राज्य युवा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. गेल्या १९९६ सालापासून भाजपचे एक सक्रिय कार्यकर्ते म्हणून ते वावरत आहेत. भाजप युवा मोर्चाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. पाळी मतदारसंघातील मतदारांना डॉ. सावंत यांच्या रूपाने एक युवा, तडफदार, हुशार व समाज कार्याची ओढ असलेला उमेदवार भाजपने दिला असून येथील जनता या उमेदवाराला पसंती देईल, यात तिळमात्र शंका नाही, अशी प्रतिक्रिया भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे.

बी.आर.चोपडा काळाच्या पडद्याआड

मुंबई, दि. ५ : प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि छोट्या पडद्यावरील "महाभारत' या महामालिकेद्वारे लोकांच्या मनात घर करणारे बलदेव राज उर्फ बी. आर. चोपडा यांचे आज बुधवारी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ९४ वर्षे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते आणि आजारपणातच जुहू येथील निवासस्थानी सकाळी ८.१५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही करण्यात आले.
भारतीय चित्रपट उद्योगातील प्रतिष्ठितांमध्ये चोपडा परिवाराचे नाव घेतले जाते. बी. आर. यांच्या पश्चात चित्रपट निर्माता असलेले त्यांचे पुत्र रवी चोपडा, शशी व निना या दोन मुली आहेत. चित्रपट निर्माते यश चोपडा यांचे ते मोठे बंधू होत.
धूल का फुल (१९५९), वक्त (१९६५), नया दौर (१९५७), कानून (१९५८), हमराज (१९६७), इन्साफ का तराजू (१९८०) आणि निकाह (१९८२) असे एकापेक्षा एक सरस चित्रपट त्यांनी त्या त्या काळात दिले आहेत. भारतीय चित्रपटातील भरीव योगदानाबद्दल भारत सरकारने १९९८ साली बी. आर. चोपडा यांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान केला होता. त्याआधी त्यांना १९६० साली कानून चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून फिल्मफेअर आणि १९९८ साली फिल्मफेअर जीवनव्रती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
मोठ्या पडद्यावरील यशानंतर बी. आर. यांनी आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवून "महाभारत' महामालिका तयार करून ती दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घराघरात पोहोचविली होती. या मालिकेनेही लोकप्रियतेचे शिखर गाठले होते.
लुधियाना, पंजाबमध्ये २२ एप्रिल १९१४ रोजी जन्मलेल्या बी. आर. चोपडा यांनी आपल्या कारकीर्दीचा प्रारंभ चित्रपट पत्रकारितेपासून सुरू केला होता. तेथूनच त्यांना चित्रपटाची आवड निर्माण झाली. फाळणीनंतर ते आधी दिल्लीला आले आणि नंतर मुंबईला येऊन स्थायिक झाले. त्यांनी "सिने हेरॉल्ड' मध्ये चित्रपटांची समीक्षा लिहिणे आणि संपादन करण्यापासून या चित्रपट कारकीर्दीला सुरुवात केली. १९४९ साली त्यांची निर्मिती असलेल्या चित्रपट "करवात' सपशेल कोसळला. त्यानंतर चोपडा यांनी १९५१ साली "अफसाना' चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करून आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट राहिला. चरित्र अभिनेता अशोक कुमार यांची दुहेरी भूमिका असलेल्या या चित्रपटाने सिल्व्हर ज्युबिली साजरी केली होती. नंतर त्यांनी १९५५ साली स्वत:च्या बी. आर. फिल्मस या प्रॉडक्शन हाऊसची स्थापना केली. या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली त्यांनी काढलेल्या "नया दौर' चित्रपटाला भरघोस प्रसिद्धी मिळाली. या यशानंतर त्यांनी मोठ्या उत्साहात १९५६ साली "एक ही रास्ता' या चित्रपटाची निर्मिती केली. विधवा पुनर्विवाहावर आधारित या चित्रपटानंतर त्यांनी अनेक दर्जेदार व लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली.
त्यांनी आपला लहान भाऊ यश चोपडाला "धूल का फूल'च्या निमित्ताने पहिल्यांदा दिग्दर्शन करण्याची संधी दिली. गायक महेंद्र कपूर यांच्या कारकीर्दीला वाढविण्यात बी. आर. चोपडा यांचे योगदान मोठे होते. आपल्या जास्तीत जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी महेंद्र कपूर यांना संधी दिली होती, हे येथे उल्लेखनीय.

'संभवामि...' युवकांच्या दृष्टिकोनातून

पणजी, दि. ५ (प्रा. रमेश सप्रे): एखादी साहित्यकृती वैश्विक असते, पण तिला भाषेची मर्यादा पडते, रामायण, महाभारत, एलिएड, ओडेसी या सारखी महाकाव्ये ग्रंथरुपात अन्य भाषा समजणाऱ्यांना "अनाकलनीय' असतात. प्रख्यात रशियन साहित्यिक लीओ टॉलस्टॉयच्या "वॉर अँड पीस'ची तऱ्हा अशीच असते. तथापि, दृकश्राव्य किंवा चित्रनाट्य रुपात ती सर्वांना पूर्ण समजली नाहीत तरी मनाचा कोपरा ती नकळत व्यापतेच.
"संभवामि युगे युगे..' सारख्या महानाट्याचे हेच सामर्थ्य असते. मराठीतील प्रयोगाच्या यशस्वितेनंतरच अन्य भारतीय वा परकीय भाषांतून हे महानाट्य सादर करण्याची प्रेरणा योगेश्वर कृष्ण निर्मात्यांना देईलही. भाषेच्या मर्यादा ओलांडून विविध भावभावनांना आवाहन करत सध्याचा प्रयोगही सर्वांच्या ह्रदयाच्या तारा छेडत राहील. आदर्श युवक युवतीचे हेच खरे लक्षण आहे. धर्म, वंश. जाती, भाषा, देश ही कुंपणे ओलांडून "विश्वात्मक देवाची' आराधना करत राहायचे. हे सारे भेदायचे, वेधायचे कसे तर श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रासारखे. खरेतर ही काळाची गरज आहे. विज्ञान- विज्ञानाचे जर एक "सीमाशून्य जग (बॉर्डरलेस वर्ल्ड) तयार केले असेल, नव्हे केले आहेच, तर तत्त्वज्ञान आत्मज्ञानाने चे एकत्र (इंटिग्रेटेड) गुंफले, विणले गेले पाहिजे.
हाच खरा श्रीकृष्णाच्या जीवनाचा अन् म्हणूनच संभवामि युगे युगे...' या महानाट्याचाही संदेश आहे. विशेषतः युवा वर्गाला कृष्णजन्माची अद्भुतता, त्यांतील बाललीलांची ह्रदयता, रासलीलेची दिव्यता सारे सुंदरच आहे. पण त्याने आयुष्यभर केलेला आसुरी शक्तीचा नाश आणि सत्य शिवाची केलेली संस्थापना आजच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रेरक आहे. या महानाट्यातील "पूतनावधाचे' प्रतिकात्मक दृश्य सध्याच्या मायावी पण मोहक "मार्केट सृष्टी'चा वेध घ्यायला युवाशक्तीचा प्रेरित करील. राजकीय क्षेत्रातील नेत्यांना मिळालेले "सर्वेसर्वा' महत्त्व कमी करून चरित्र व नेतृत्व यांची सांगड घालून नव्या उमद्या नेत्यांच्या मांदियाळीचा उदय "कंसवधा'च्या प्रसंगातून स्फूर्ती घेऊन होऊ शकेल. आज युवाशक्तीला परस्परांतील स्पर्धा, हेवेदावे, मत्सर यांनी ग्रासले आहे. अगदी शैक्षणिक संस्थांतील निवडणुका, उपक्रम, प्रकल्प यातही हे दिसून येते. त्या आत्मघातकी वृत्तींचा संहार करण्यासाठी मार्गदर्शन "शिशुपालवधा'च्या घटनाक्रमातून होईल. गोकुळातील बाळ-गोपाळ-किशोर कृष्णाने केलेल्या असुरवधांना काही अतिमानवी सामर्थ्याचे वलय असेल; पण मथुरा-द्वारका-कुरुक्षेत्रातील कृष्णाने ज्या आसुरी प्रवृत्तीता विनाश केले व तो ज्या निरनिराळ्या पध्दतीने-तंत्राने केला, याचे या महानाट्यातील दर्शन युवावर्गाला कार्यप्रेरणा देईल, असा विश्वास वाटतो.
कालियावर त्याची शेपटी एका हातात धरून दुसऱ्या हाताने बासरी वाजवणारा किशोर कृष्ण कालियाच्या फणांवर नर्तन करणारा कृष्ण केवळ गोकुळवासीयासाठी संकट विमोचक नव्हता तर यमुनेच्या काठावर जमलेल्या युवागोपाळांना संदेश देत होता. "कालजयी व्हा!' कालिया हे काळाचे प्रतीक, प्रत्येक युगात, प्रत्येक काळात विषारी शक्ती असतात, पण त्यावर मात करणाऱ्या अमृतशक्तीही असतातच. त्यासाठी सामर्थ्याबरोबरच संघटित शक्तीचीही गरज असते. गोवर्धन पर्वत उचलणे, त्याला आपली करंगळी लावणे, पण प्रत्येक गोपाळाला आपली काठीही लावायला संंागून त्यांना शक्तीचा आत्मप्रत्यय् घडवणं हे कार्य केवळ कृष्णच करू जाणे. याचा अनुभव अशा कृष्णलीलांतून व चरित्रप्रसंगातून युवावर्गाला मिळेल. युवाशक्ती म्हणजे नृत्यातील "दांडिया' नव्हे तर गोवर्धन उद्धारातील "काठ्या' ही आहेत. "संभवामि युगे युगे..' सारख्या महानाट्याचं आवाहन (अपील) समाजातील सर्व गटांसाठी असते. जीवनाभिमुखता हा अशा महाकृतींच्या विशेष असतो. असा महाप्रयोगांच्या सर्व अंगांना, सर्व तंत्रांना एक सर्वस्पर्शी पैलू असतो. म्हणून केवळ पाहणे, "वाहव्वा' करणे आणि विसरून जाणे यासाठी असे प्रयोग सादर केले जात नाहीत. त्याच्याशी संबंधित सर्व बाबी झपाटलेल्या असतात. सर्वांच्या अंतर्यामी "समष्टी' म्हणजे "समाजा'चा, त्याच्या कल्याणाचा विचार असतो. केवळ मनोरंजन हा हेतू नसतो. हा या मंडळीचा उद्देश प्रत्यक्षात आणण्याचे उत्तरदायित्व अर्थातच युवा वर्गावर असते. प्रत्येक युवक- युवतीने हे महानाट्य पाहावे,. अनुभवावे व थोडे का होईना स्वतःच्या जीवनात उतरवावे; तरच या अभूतपूर्व प्रयोगाचे सार्थक होईल. सध्याची युवापिढी "चंद्रमुखी' होण्याचा प्रयत्न करतेय. म्हणजे काव्यातील चंद्राप्रमाणे सुंदर दिसण्याचा प्रयत्न अधिक करतेय. या युवावर्गाने "सूर्यमुखी' बनण्याचा, प्रखर ज्ञानप्राप्तीचा, प्रज्ञाविकसनाचा ध्यास घेण्याचा प्रयत्नही केला पाहिजे. आवश्यक असेल तेव्हा आसुरीवृत्तीचा (केवळ व्यक्तींचा नव्हे!) संहार करण्यासाठी "ज्वालामुखी'चा उद्रेक करायलाही शिकले पाहिजे. "संभवामि युगे युगे..' या महानाट्याचा महानायक श्रीकृष्ण सुंदर तर होताच, चंद्रमुखी तसाच " अहम वैश्वनरो भूत्वा' म्हणणारी सूर्यमुखीही होता, तर गीताप्रसंगातील विश्वरुपदर्शनात प्रलयकारी ज्वालामुखीही होता. दिव्यसूर्य सहस्त्रस्य' म्हणजे हजारो सूर्यांचे तेज घेऊन तळपणारा हा "विश्वरूप महानायक' युवापिढीचा सर्वार्थाने त्राता ("हिरो') आहे. अन् तोही सर्व युगांसाठी! त्याच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी सर्वांची पावले वळलीच पाहिजेत, या भव्य अन्‌ दिव्य महानाट्याकडे.......

Wednesday, 5 November 2008

हल्लाप्रकरणी आयरिशचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): 'आमच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे महासूत्रधार राज्याचे मुख्यमंत्री आहेत' असा खळबळजनक आरोप करून त्यांनी त्वरित मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आज ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी केली.
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात हे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप ऍड. आयरिश यांनी यापूर्वीच केला आहे. पोलिसांनी मुख्यमंत्र्यांची "ब्रेन मॅपिंग' चाचणी करावी आणि या प्रकरणात सहआरोपी म्हणून त्यांची चौकशी करावी, अशी मागणीही ऍड. आयरिश यांनी येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत केली. याविषयीची संपूर्ण माहिती कॉंग्रेसचे गोवा प्रभारी हरिप्रसाद यांना देण्यात आली असून त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन आपल्याला दिल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेची माहिती येत्या दोन दिवसांत राज्यपाल एस. एस. सिद्धू यांची भेट घेऊन त्यांच्या कानी घातली जाणार आहे. १३ ऑक्टोबरच्या रात्री आमच्यावर प्राणघातक हल्ला होण्यापूर्वी दोन दिवस अगोदर आल्तिनो येथे मुख्यमंत्री निवासावर एक गुप्त बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, आरोग्य मंत्री, कळंगुटचे आमदार व उत्तर गोवा पोलिस अधीक्षक उपस्थित असल्याचा दावा करून या बैठकीत पोलिस अधीक्षक वेगळ्या कामानिमित्त गेले होते, असे ऍड. रॉड्रिगीस यांनी सांगितले. याच बैठकीत आपल्यावर हल्ला करण्याचा विषय आला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाबूशना याकामी "ग्रीन सिग्नल' दिल्याचा दावाही ऍड. आयरिश यांनी केला. याबाबत बॉस्को जॉर्ज यांना विचारले असता, अशा "बेजबाबदार आरोपांवर आपण प्रतिक्रीया देणार नाही,' असे ते म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनीही ऍड. आयरिश यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

रोहित पोलिसांना शरण, आज बाल न्यायालयापुढे हजर करणार

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): तब्बल २१ दिवसांनी आज जर्मन अल्पवयीन मुलीवरील "बलात्कार आणि अश्लील एसएमएस' प्रकरणातील मुख्य संशयित रोहित बाबूश मोन्सेरात हा कळंगुट पोलिस स्थानकात पोलिसांना शरण आला. दुपारी त्याला भारतीय दंड संहितेच्या २९३ (मुलीचे अश्लील छायाचित्र विक्री किंवा प्रसिद्ध करणे, शिक्षाः ३ वर्षे कैद व दोन हजार रुपये दंड), ३५४ (जबरदस्तीने तरुणीचे पावित्र्य भंग करणे, शिक्षाः २ वर्षे कैद किंवा दंड), ३७६ (बलात्कार, शिक्षाः ७ किंवा १० वर्षापर्यंत कैद) व बाल कायद्याच्या ८ (अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, शिक्षाः जन्मठेप किंवा दहा वर्षे कैद आणि एक लाख रुपये दंड) या कलमांखाली अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी झाली. उद्या (बुधवारी) सकाळी त्याला पोलिस कोठडी मिळवण्यासाठी बाल न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी सांगितले.
आज रात्री काही पुरावे गोळा करण्यासाठी कळंगुट पोलिसांनी ताळगाव येथील बाबूश मोन्सेरात यांच्या बंगल्यावर छापा टाकला. यावेळी त्यांनी रोहित मोन्सेरात वापरत असलेल्या काही वस्तू व संगणकाची तपासणी केली. तसेच एक अलिशान वाहनही जप्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दुपारी १२.३० वाजता खुद्द शिक्षणमंत्री तथा संशयिताचे वडील बाबूश मोन्सेरात, त्यांचे वकील हरुण ब्राझ डिसा व रोहित पोलिस स्थानकावर आले. रोहित शरण येणार असल्याची माहिती पूर्वीच पत्रकारांना मिळाल्याने तेथे पत्रकारांनीही गर्दी केली होती. तथापि, कोणाशीही काहीही न बोलता बाबूश मोन्सेरात आपल्या मुलाला घेऊन पोलिस स्थानकात गेले. त्यानंतर काही मिनिटात बाबूश निघाले आणि आपल्या वाहनात बसून पणजीला आले. यावेळी त्यांना पत्रकारांनी अडवून बोलते केले. ते म्हणाले की, माझा मुलगा निर्दोष आहे. त्याला या प्रकरणात फसवण्यात आले आहे.
तो निष्पाप असल्याचे सिद्ध करण्यासाठी आपण काहीही करण्यास तयार आहोत.
त्यानंतर पोलिसांनी एक तास रोहित याची जबानी नोंदवून घेतली. तोपर्यंत त्यांचे वकील ब्राझ डिसा उपस्थित होते. ते १.४५ वाजता एकटेच पोलिस स्थानकाबाहेर पडले. यावेळी त्यांना पत्रकारांनी घेरले असता, प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने आपण काहीही बोलणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. रोहितला पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या माहितीला त्यांनी पुष्टी दिली.
कालचा संपूर्ण दिवस रोहितच्या अटकेच्या अफवेने गाजला होता. रोहितला अटक करण्यासाठी पोलिसांनी पंधरा दिवसांत दोनदा बाबूश मोन्सेरात यांच्या दोन्ही अलिशान बंगल्यावर छापे टाकले होते. त्यानंतर "लूक आऊट' नोटीस काढण्यात आली होती. तथापि, त्यास कोणतीच दाद दिली गेली नाही. उद्या ५ नोव्हेंबर रोजी सकाळी हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठापुढे येणार आहे. पीडित जर्मन मुलीने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर दिलेली जबानी आणि तिचा वैद्यकीय चाचणीचा अहवाल खंडपीठासमोर त्याचवेळी सादर करण्यात येणार आहे.

रोहितवरील कारवाई; सारे कसे ठरल्यानुसार!

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): जर्मन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकूण चौकशीबाबतच सध्या उलटसुलट चर्चा सुरू झाली असून हे प्रकरण 'फुस्स' करण्याचे जवळजवळ निश्चित झाल्याचे राजकीय मानले जात आहे. रोहित मोन्सेरात याची या प्रकरणातून सुटका करण्यासाठी जोरदार राजकीय विचारमंथन सुरू असून उद्या (बुधवारी) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात हे प्रकरण सुनावणीस येणार असल्याने त्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
रोहित मोन्सेरातविरोधात सदर जर्मन महिलेने तक्रार नोंदवल्यानंतर त्या मुलीची जबानी किंवा वैद्यकीय चाचणी न करताच गुन्हा नोंद करून घेण्याची पोलिसांनी केलेली घिसाडघाई व त्यानंतर घडलेल्या राजकीय वादळानंतर सध्या चौकशीची वाहवत चाललेली दिशा यावरून हे प्रकरण "सेटल' होण्याचीच जास्त शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांनी रोहितविरोधात काढलेल्या "लूकआऊट' नोटिशीनंतर त्याची जबानी नोंदवून घेतल्याचा गौप्यस्फोट बाबूश यांनी केला. त्यामुळे पोलिसांचा जणू भांडाफोडच झाला आहे. काल पोलिसांनी रोहितच्या शोधार्थ ताळगावातील "काझा मोन्सेरात' बंगल्याला दिलेली भेट व त्यानंतर बाबूश यांनी रोहीतला आज (मंगळवारी) दुपारपर्यंत सादर करण्याचे दिलेले आश्वासन हा सारा प्रकार म्हणजे पूर्वनियोजित "नाटका'चा भाग असल्याचे काही राजकीय नेतेच सांगत आहेत. काल संध्याकाळी सचिवालयातील एका मंत्र्यांच्या दालनात महत्त्वाची गुप्त बैठक झाली. या बैठकीस शिक्षणमंत्री मोन्सेरात, राज्याचे ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक, उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज आदी हजर होते,अशी माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, याप्रकरणाचा गाजावाजा झाल्यानंतर कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद यांच्या भेटीनंतर पोलिसांनी आपल्या कडक पवित्र्यात बदल केल्याचे स्पष्टपणे जाणवल्याचेही काही निरीक्षकांचे म्हणणे आहे. सर्व काही कायद्याप्रमाणे होईल, असे विधान करून गृहमंत्री रवी नाईक यांनीही याप्रकरणी बोलणे टाळल्याने संशय आणखी बळावला आहे.
दरम्यान,बाबूश यांनी अचानकपणे प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून या प्रकरणी भाजपच्या एका आमदाराच्या मुलाची जबानी नोंदवल्याचे विधान करून याप्रकरणी विरोधकांची बोलती बंद करण्याचा डावही या "सेटलमेंट'चा भाग असल्याचीही चर्चा सुरू आहे. यासंदर्भात आता मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांकडे चौकशी अहवाल मागवल्याने न्यायालय काय आदेश देते त्यावर पुढील भवितव्य ठरणार आहे. सदर अल्पवयीन मुलीने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेली जबानी, वैद्यकीय चाचणीचा अहवाल आदी पोलिसांकडून न्यायालयाला सादर केला जाणार असल्याने या प्रकरणाची पूर्ण मदार मुंबई उच्च न्यायालयावर अवलंबून आहे. रोहित मोन्सेरात याने सध्या पोलिसांना शरण येणे जरी सुरक्षित मानले असले तरी न्यायालयाच्या आदेशावरच त्याचे भवितव्य ठरणार आहे.

गृहनिर्माण मंडळाची जमीन विक्री घोटाळा, सरकारला सहा कोटींचा फटका

सीआयडीमार्फत चौकशी
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): गोवा गृहनिर्माण मंडळाने रेइश मागूस येथील जमीन विकताना केलेल्या व्यवहारापोटी सरकारचे सुमारे सहा कोटी रुपये बुडाल्याने आता या प्रकरणाची सखोल चौकशी गुन्हा अन्वेषण विभागातर्फे करण्याचा निर्णय गृहनिर्माण मंत्री मिकी पाशेको यांनी घेतला आहे. गेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधी भाजपने हा मुद्दा लक्षात आणून दिल्यानंतर त्यांना दिलेल्या आश्वासनानुसार ही चौकशी केली जाईल, अशी पुस्तीही पाशेको यांनी जोडली.
रेइश मागूस येथील जमिनीचे २००६ मधील दर १५०० रु. प्रती चौरस मीटर असताना ती केवळ ४५० रु. प्रती चौरस मीटर दराने लाटण्यात आली होती. या व्यवहारात सुमारे सहा कोटी रुपयांचा जमीनविक्री घोटाळा गोवा गृहनिर्माण मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व संचालक मंडळाने केल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केला होता. याबाबत महालेखापालांनीही आपल्या अहवालात ताशेरे ओढल्याने या संपूर्ण प्रकरणाची गुन्हा अन्वेषण विभागाद्वारे (सीआयडी) चौकशी करावी,अशी मागणी विरोधकांनी विधानसभेत केली होती. गोवा गृहनिर्माण मंडळाने रेइश मागूस येथील ६७,०९० चौरस मीटर खाजगी वनक्षेत्र म्हणून अधिसूचित केलेली जमीन एका खाजगी व्यक्तीला २००७ साली ३ कोटी,३६ लाख,१२ हजार,०९० रुपयांना विकली. या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करून या प्रकरणाच्या खोलात जाण्याची गरज विरोधकांनी वर्तवली. पैंगीणचे आमदार रमेश तवडकर यांनी विचारलेल्या एका तारांकित प्रश्नाद्वारे जमीन घोटाळ्याचा हा विषय सभागृहासमोर आला होता. महालेखापालांनी आपल्या अहवालात गृहनिर्माण मंडळाने ही जमीन विकून सरकारचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवला आहे. दरम्यान, या अहवालानुसार एकाच व्यक्तीकडून ही जमीन विकण्यासाठी वेगवेगळ्या नावाने निविदा भरून घेतल्याचे म्हटले आहे. रेइश मागूस येथील जमिनीचे दर सप्टेंबर २००३ मध्ये १००० रु. प्रती चौरस मीटर आणि जुलै २००६ मध्ये १५०० रु. प्रती चौरस मीटर असे होते. ही जमीन गृहनिर्माण मंडळ वन कायद्याच्या २(३) कलमाखाली केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय विकू शकत नव्हते. वन मंत्रालयाच्या सल्लागार मंडळासमोर ही जमीन खाजगी वनक्षेत्रातून वगळण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती व त्यावर एप्रिल २००७ मध्ये निर्णय घेण्यात येणार होता. मात्र तत्पूर्वीच मार्च २००७ मध्ये घाईगडबडीने ही जमीन मंडळाने विकून टाकली. गृह निर्माण मंडळाने केलेली ही घाई अवाक करणारी असून त्यामुळे सरकारी तिजोरीला मोठाच फटका बसला. हे प्रकरण म्हणजे महाघोटाळाच असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला होता. सभापती प्रतापसिंह राणे यांनीही पर्रीकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना महालेखापालांच्या अहवालामुळे बळकटी मिळाल्याचे सांगून हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचा सल्ला मंत्र्यांना दिला होता. दरम्यान, अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार आता लवकरच हे प्रकरण "सीआयडी' कडे सोपवले जाईल,असे पाशेको म्हणाले.

Monday, 3 November 2008

रोहित व जेनिफर यांचीही जबानी नोंद

पणजी, दि. २ (प्रतिनिधी) : पिडीत जर्मन मुलगी न्यायाधीशासमोर जबानी नोंद करण्याच्या एका दिवसापूर्वी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आपल्या मुलाला व पत्नीला पोलिसांसमोर हजर करून जबानी नोंद करवून घेतली. याविषयी आज उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी विचारले असता, त्यांनी याला पुष्टी दिली, मात्र त्यावर अधिक बोलणे कटाक्षाने टाळले. त्यामुळे रोहित यांनी आपल्या जबानीत नेमके काय सांगितले आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
त्या पिडीत मुलीची जबानी नोंद झाल्यानंतर आणि वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर संशयितांना शंभर टक्के अटक होण्याची शक्यता असल्यानेच मंत्री मोन्सेरात यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. रोहित मोन्सेरात व माझी पत्नी जेनिफर यांनी पोलिस जबानी दिल्याचे आज खुद्द बाबूश मोन्सेरात यांनी सरकारी "लेटरहेड'वर पत्रक काढून प्रसिद्ध केले आहे. "माझा आणि माझ्या कुटुंबीयाचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास असून मला न्याय मिळेल व सत्य बाहेर येईल' असे श्री. मोन्सेरात पत्रकात नमूद करून "आपला मुलगा प्रौढ असून तो त्याच्या कृत्यासाठी जबाबदार आहे, त्याने कायद्याविरोधात जाऊन गुन्हा केला असेल तर, त्याचे परिणाम त्याला भोगावेच लागतील'' असेही श्री. मोन्सेरात यांनी या पत्रकात म्हटले आहे.
त्याचप्रमाणे राजकारणासाठी काही व्यक्ती राजकीय दबाव वापरून आपल्याच कुटुंबाला लक्ष्य बनवत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. रोहित पूर्णपणे पोलिस तपासाला सहकार्य करणार असल्याचीही मोन्सेरात यांनी हमी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून गप्प बसलेल्या श्री. मोन्सेरात यांनी पत्रक काढून चक्क सारवासारव चालविली आहे तसेच आपला मुलगा कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा केला आहे.
पोलिसांनी दि. १४ ऑक्टोबर रोजी जर्मन अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा गुन्हा नोंद करून या प्रकरणातील संशयित रोहित मोन्सेरात याचा शोध घेण्यासाठी त्याच्या ताळगाव येथील दोन्ही बंगल्यावर छापे टाकले होते. परंतु, यावेळी तो दोन्ही बंगल्यावर आढळून आला नसल्याने त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा १६० नुसार नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीत त्याला ताबडतोब पोलिस चौकशीला कळंगूट पोलिस स्थानकावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, या नोटिशीला त्याने दाद दिली नसल्याने काही दिवसांत त्याच्याविरोधात "लूक आऊट' नोटीस जाहीर केली होती.
अखेर दि. ३१ ऑक्टोबर रोजी पोलिसांसमोर हजर राहून आपली जबानी नोंद करून घेतली.
ही जबानी नक्की कधी आणि कुठे नोंदविण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी ज्या संशयिताच्या विरोधात "लूक आऊट' नोटीस काढलेली असताना पोलिसांनी त्याला ताब्यात का घेतले नाही, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

त्या जर्मन मुलीवर बलात्कार झाल्याचे तपासणीत उघड, रोहितला कोणत्याही क्षणी अटक?

चौघांची नावे सांगितल्याचा आयरिश यांचा दावा
पणजी, दि. २ (प्रतिनिधी) : एका महिन्याचे मौन सोडून काल म्हापसा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी दिलेल्या आणि चोवीस तासाच्या आत आज वैद्यकीय चाचणीला सामोरे गेलेल्या त्या अल्पवयीन जर्मन मुलीशी शारीरिक संबंध (बलात्कार) ठेवले गेल्याचे स्पष्ट झाले आहे, असे तिचे वकील आयरिश रॉड्रिगीस यांनी सांगितले. या माहितीला तपासणी केलेल्या पथकातील एका डॉक्टरने पुष्टी दिली आहे. यामुळे बलात्काराचा आरोप असलेल्या रोहित मोन्सेरातला कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
आज दुपारी त्या अल्पवयीन जर्मन मुलीची गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील एका डॉक्टरांच्या पथकाने वैद्यकीय चाचणी पूर्ण केली. दोन तास तिची तपासणी करण्यात आल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत तर काही जणांना पळता भुई थोडी झाली आहे. सकाळी चाचणीसाठी आलेल्या त्या मुलीबरोबर तिची आई व ऍड. रॉड्रिगीस उपस्थित होते.
काल कॅमेराच्या समोर न्यायाधीशांनी घेतलेल्या जबानीत त्या जर्मन अल्पवयीन मुलीने दोन तरुणांची नावे ठळकपणे सांगितली आहेत, त्याशिवाय अन्य दोघा तरुणांची नावे उघड केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्या दोघा तरुणांवर तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे. हे दोन्ही तरुण दक्षिण गोव्यातील असल्याचेही माहिती उपलब्ध झाली आहे. यापूर्वी त्या मुलीच्या आईने शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचे सुपुत्र रोहित मोन्सेरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव याचे पुतणे वॉरन आलेमाव यांच्या विरोधात कळंगूट पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
त्या मुलीची आज केलेल्या वैद्यकीय चाचणीत बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाल्याने आता कोणत्याही क्षणी या प्रकरणात गुंतलेल्या चौघा संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे. तपासणी करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकात एका महिला डॉक्टरचाही समावेश होता. अशा घटनेत केवळ एकच डॉक्टर तपासणी करतो. परंतु, सदर प्रकरण संवेदनशील आणि यात राजकीय व्यक्तींचे नातलग गुंतल्याने डॉक्टरांच्या एका खास पथकाने ही तपासणी केली असल्याचे एका वरिष्ठ डॉक्टराने सांगितले.
""गोवा बाल कायद्यानुसार अल्पवयीन मुलीच्या संमतीनेही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यासही तो बलात्कार ठरतो'' असे यावेळी ऍड. आयरिश रॉड्र्रिगीस यांनी सांगितले. त्या मुलीने आता संशयितांची नावे उघड केलेली आहेत आणि वैद्यकीय चाचणीतही तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे संशयितांना ताबडतोब अटक केली जावी, असे ते म्हणाले.
वैद्यकीय तपासणीचा अंतिम अहवाल सायंकाळी पाचच्या दरम्यान पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. परंतु, पोलिसांनी अद्याप त्या मुलीने अन्य कोणाची नावे घेतली आहे, हे स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे अनेक राजकीय व्यक्ती अद्याप बुचकळ्यात आहेत.
दि. ५ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात दे दोन्ही अहवाल सादर केले जाणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश स्वतंत्रकुमार व न्या. एस.ए. बोबडे यांनी या गाजत असलेल्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन "सुमोटो' जनहित याचिका दाखल करून घेतली होती. त्यावेळी त्या मुलीची जबानी आणि तिची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश राज्य पोलिसांना दिले होते. त्याप्रमाणे न्यायालयाने पोलिसांनी आत्तापर्यंत या प्रकरणात काय तपासकाम केले आहे, याचाही अहवाल मागवून घेतला आहे.

रिहाझ शेख याचा संबंध मोती डोंगरापर्यंत...

पणजी, दि. २ (प्रतिनिधी) : केपे पारोडा येथील मंदिर तोडफोड प्रकरणात काल शिरवई केपे येथून अटक करण्यात आलेला रिहाझ शेख याचे थेट संबंध मडगाव येथील मोती डोंगरापर्यंत असल्याचे पोलिसांच्या आत्तापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे.
याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक मंगलदास देसाई यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. मंदिर तोडफोड प्रकरणातील संशयित रिहाझ याचे मोती डोंगरावरील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी घनिष्ठ संबंध असल्याचे उघड झाल्याने हे प्रकरण दाबण्यासाठी आता जोरदार राजकीय प्रयत्न सुरू झाल्याचेही केपे परिसरातील लोकांचे म्हणणे आहे. परवा या मंदिराच्या परिसरात साफसफाई सुरू असताना त्याठिकाणी रिहाझ याचा वाहन परवाना मिळाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. आज दुपारी मडगाव येथे त्याची जबानी नोंदवून घेण्यात आली.
रिहाझ हा "सौदी अरेबिया' या आखाती देशात जाऊन आल्यानेही त्यावर अधिक संशय बळावला आहे. तसेच त्याचे अन्य कोणी साथीदार आहेत का, याचाही तपास घेतला जात आहे. आज रविवार असल्याने उद्यापर्यंत रिहाझ याचे "कॉल डिटेल' उपलब्ध होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. त्याच्या या "कॉल डिटेल'मुळे अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. दक्षिण गोव्यात मंदिरांची आणि मूर्तींची तोडफोड करून संशयितास काय साध्य करावयाचे होते, याचाही तपास लावणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे.
त्याचप्रमाणे रिहाझ याचा सिमी किंवा अन्य कोणत्याही दहशतवादी संघटनांशी संबंध नाही ना, याबद्दलही तपास लावला जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
-------------------------------------------------------------
धमकीमुळे वास्कोत खळबळ
वास्को, दि. २ (प्रतिनिधी) : जुवारीनगर येथील दोन मंदिरे ५ रोजी बॉम्बस्फोटाने उडविण्याचे धमकीचे पत्र हनुमान मंदिर, मराठवाडाच्या नावाने आल्याने पोलिसांची तारांबळ उडाली आहे. या पत्रावर "सिमी' "७८६' व "इंडियन मुजाहिद्दीन' असा पाठविणाऱ्यांचा उल्लेख आहे. वेर्णा पोलिसांनी याबाबत तपास चालविला आहे. मंदिर सुरक्षा समिती, विहिंपनेही याबाबत जागरूकतेचे आवाहन केले आहे.

कोलवाळच्या ग्रामसभेत ग्रामस्थांचा रुद्रावतार!

..सरपंच व पोलिसांनाही सभागृहात कोंडले
..सरपंचासह तिघा पंचांच्या राजीनाम्याची मागणी
..येत्या रविवारी पुन्हा ग्रामसभा बोलावली

मोरजी, दि. २ (प्रतिनिधी): पंधरा दिवस पाण्याचा पुरवठा होत नसल्याच्या कारणावरून कोलवाळच्या ग्रामसभेत आज ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत सरपंच विठू वेंगुर्लेकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करतानाच, ग्रामसभा अर्ध्यावर सोडून गेलेल्या तीन पंचांनीही राजीमाना द्यावा असा आग्रह धरला. ही ग्रामसभा तब्बल साडेसहा तास चालली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ग्रामसभा संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत चालू होती. पुढील ग्रामसभा येत्या रविवारी ९ रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले.
सकाळी ग्रामसभा सुरू होताच, सरपंच विठू वेंगुर्लेकर यांच्यावर उपस्थितांनी प्रश्नांचा भडिमार केला. सरपंच समाधानकारक उत्तरे न देऊ शकल्याने संतप्त बनलेल्या युवकांनी दरवाजे बंद करून सरपंच व पंचांना सभागृहातच कोंडून ठेवले व राजीनाम्याची मागणी केली. यावेळी खुर्च्या फेकण्याचे व शिव्या देण्याचे प्रकारही घडले. यावेळी सभागृहात पोलिस आल्याने उपस्थितांनी त्यांना हरकत घेतली व पोलिसांना बोलावण्याची गरज काय, असा प्रश्न विचारला.
संध्याकाळी ४.३० वाजता सरपंचांनी ग्रामसभा आटोपती घेण्याचा प्रयत्न केल्याने उपस्थित संतप्त झाले. सरपंचांना सुखरूप जाता यावे यासाठी पोलिस प्रयत्न करीत असताना ग्रामस्थांनी पुन्हा आक्षेप घेत सरपंच व पोलिसांना कोंडून ठेवण्यासाठी दरवाजे बंद केले. अखेर म्हापसा पोलिस उपअधीक्षक सुभाष गोलतेकर यांनी सभागृहात प्रवेश करून सरपंचांची सुटका केली व त्यांना पोलिस वाहनातून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लोकांनी पुन्हा गडबड केली व ग्रामसभा न संपविता सरपंच कसे काय जाऊ शकतात, असे विचारत आरडाओरड केली. गोलतेकर यांनी सर्वांना समजाविण्याचा प्रयत्न केला, तरीही युवकांनी पोलिस वाहने एक तास अडवून ठेवली. जे विकास करू शकत नाहीत, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी एकच मागणी लोकांनी लावून धरली. पंच ज्योती पेडणेकर, देवीदास वारखंडकर, झेवियर डिसोझा व देवानंद नाईक या चार सदस्यांनी आपले प्रभाग दुर्लक्षित असल्याचे ठासून सांगितले. ग्रामसभा अर्धवट टाकून गेलेले उपसरपंच फोरिन्हा एस्ट्राईस, संतोष आसोलकर व आशा चोडणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करणारा ठराव संमत करून येत्या रविवारी पुन्हा ग्रामसभा आयोजित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. सरपंच व अन्य पंचांना निष्क्रियतेच्या निषेधार्थ बांगड्या देण्याचाही प्रयत्न झाला. जो कोणी बोलविता धनी असेल, त्याच्याकडून कामे करून घ्या, असेही ग्रामस्थांनी सरपंचांना सुनावले व गेल्या २० वर्षात कोणती समस्या सोडविली, अशी विचारणा केली. निराधार महिलेचा हलविण्यात आलेला चहाचा गाडा, औद्योगिक वसाहतीत स्थानिकांना रोजगार देण्याचा प्रश्न, सुलभ शौचालये आदी मुद्यांवर खडाजंगी झाली. बाबनी साळगावकर, सुभाष आरोंदेकर, बाबली गावकर, मॅथ्यू परेरा आदींनी चर्चेत भाग घेतला.

Sunday, 2 November 2008

जर्मन मुलीची जबानी 'इनकॅमेरा' बंदिस्त, आज वैद्यकीय चाचणी? पोलिस चौकशीस वेग गती

म्हापसा, दि. १ (प्रतिनिधी): शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा पुत्र रोहित, बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांचा पुतण्या वॉरन व इतरही काही नेत्यांच्या मुलांचा समावेश असल्याचा आरोप असलेल्या अल्पवयीन जर्मन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आज प्रत्यक्ष पीडित मुलीची जबानी बंदिस्त जागेत "इन कॅमेरा' नोंदवण्यात आली. म्हापसा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बेला नाईक यांच्या उपस्थितीत तब्बल दीड तास चाललेल्या या जबानीत सदर मुलीने कोणाची नावे उघड केली व नेमकी काय माहिती दिली याबाबत कमालीची गुप्तता राखण्यात आली आहे. सदर मुलीने आरोग्य चाचणीसाठीही सहमती दर्शवल्याने आता लवकरच या प्रकरणाचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या गोव्यासह सर्वत्र गाजत असलेल्या या प्रकरणी सदर जर्मन मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीत रोहित मोन्सेरात याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी पोलिसांनीही गुन्हा नोंद केला असून पोलिस रोहीतच्या मागावर आहेत. या प्रकरणात मंत्री चर्चिल आलेमाव यांचा पुतण्या वॉरन आलेमाव याच्याविरोधातही अन्य एक तक्रार नोंद करण्यात आली असली तरी वॉरनने पोलिसांना दिलेल्या जबानीत आपला यात सहभागी नसल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणी सदर मुलीची जबानी नोंदवण्यावरून गेले कित्येक दिवस सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर आज यश मिळाले. आज दुपारी २.२० वाजता सदर जर्मन मुलगी आपली आई व ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांच्यासोबत जीए-०१-टी-९२६१ या पर्यटन वाहनातून न्यायालयात हजर झाली.
म्हापसा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बेला नाईक यांनी सुरुवातीस असलेली काही प्रकरणे सुनावणीस घेऊन त्यांना पुढील तारखा दिल्यानंतर हे प्रकरण हाती घेतले. यावेळी फिर्यादीचे वकील आयरिश रॉड्रिगीस यांनी न्यायाधीशांना विनंती अर्ज सादर करून सदर मुलगी अल्पवयीन असल्याने तिची "इन कॅमेरा' जबानी नोंदवून घेण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करून न्यायाधीश बेला नाईक यांनी सदर मुलीला आपल्या चेंबरमध्ये बोलावून घेतले व संगणक ऑपरेटरच्या साहाय्याने तिची जबानी नोंदवून घेतली. ही जबानी सुमारे दीड तास सुरू होती. अत्यंत गुप्त ठेवण्यात आलेली ही जबानी कोकणी व इंग्रजीत नोंदवल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, सदर मुलीने आरोग्य चाचणीसाठी तयारी दर्शवली असून त्याची उद्या (रविवारी) त्याबाबतची सुविधा उपलब्ध करण्याची विनंती पोलिसांना केल्याची माहिती ऍड.आयरिश यांनी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुओमोटो दाखल करून पोलिसांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने आता पोलिसांसमोरही बिकट स्थिती निर्माण झाली आहे. रोहित याचा शोध घेण्यातही पोलिस अपयशी ठरल्याने येत्या दोन दिवसांत सदर मुलीने दिलेल्या जबानीच्या अनुषंगाने पोलिस आपली कारवाईला वेग देतील, असे संकेत मिळाले आहेत.

मानवी शिकारीची वाट पाहता काय?

गावठी बॉंबप्रकरणी संतप्त मांद्रेवासीयांचा पोलिसांना सवाल
पणजी, दि. १ (प्रतिनिधी): पेडणे तालुक्यात अलीकडील काळात रानडुकरांची शिकार करण्यासाठी गावठी बॉंब पेरण्याचे प्रकार वाढीस लागले असून त्यात लोकांची दुभती जनावरे बळी पडत असल्याने याबाबत ठोस कारवाई होण्याची तीव्र आवश्यकता असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. तसेच पोलिस आणि वनाधिकारी अशा घटनांतून जीवितहानी होण्याची प्रतीक्षा करत आहेत काय, असा संतप्त सवालही स्थानिकांकडून विचारला जात आहे.
मांद्रे देऊळवाडा येथील शिवा शेट मांद्रेकर यांच्या दुभत्या गाईचा अशाच रानडुकरांच्या शिकारीसाठी ठेवण्यात आलेला गावठी बॉंब खाल्ल्यामुळे उडालेला जबडा व या अपघातामुळे ती मृत्युमुखी पडण्याची घटना यामुळे आता स्थानिक जनतेतही तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावठी बॉंब पेरणाऱ्या लोकांकडून संबंधित पोलिस व सरकारी अधिकाऱ्यांना "बावळी'चे आमिष दाखवण्यात येत असल्याने या प्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापुढे रानात लाकडांसाठी भटकणाऱ्या लोकांनाही धोका निर्माण झाला आहे. आतापर्यंत एकट्या पेडणे तालुक्यात घडलेली ही तिसरी घटना आहे. मुळातच हे गावठी बॉंब एखाद्या पदार्थासारखे पेरल्याने रानडुकरांकडून तो तोंडात घातला की लगेच त्याचा स्फोट होतो व रानडुकरे मरण पावतात.
दरम्यान, हे बॉंब पेरल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावणे गरजेचे असते; परंतु अलीकडे ते तसेच सोडून जाण्याची बेदरकार वृत्ती वाढत चालल्याने आता मानवी शिकार होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
अशी शिकार कोणाकडून केली जाते याची इंत्यभूत माहिती पोलिस व वनाधिकाऱ्यांना असते; परंतु या शिकारींची "चव' त्यांनाही चाखायला मिळत असल्याने ते या गोष्टींकडे कानाडोळा करतात, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. दरम्यान, आता अशा लोकांना चोप देण्याची तयारी काही लोक करीत असून पोलिसांनी तात्काळ यात लक्ष घालून अशा शिकारीत गुंतलेल्या लोकांना समज देण्याची गरज असल्याची जोरदार मागणी केली जात आहे.

पाव व दुधाच्या दरवाढीचे प्रयत्न, कॉंग्रेस सरकार सुस्त, जनता तप्त

पाव उत्पादकांच्या मागण्या
- राज्यातील सर्व पाव उत्पादकांना इंधन व कच्चा माल सार्वजनिक वितरण सेवेमार्फत पुरवावा
- नोंदणीकृत पाव उत्पादकांना वन खात्यातर्फे माफक दरात भट्टीसाठी लाकूड पुरवावे
- सर्व पाव उत्पादकांना अन्न व औषध प्रशासनाअंतर्गत जोडून व पावाचे वजन व दर्जाची तपासणी व्हावी
- विविध दुकानांवर पाव व दुधासाठी ग्राहकांकडून सरकारने निश्चित केलेले दरच आकारले जावे
- पाव उत्पादकांना "पीडीएस'मार्फत गहू पुरवावेत

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): रोजच्या वापराचा पाव व दुधाच्या किमती वाढवण्याचे प्रयत्न सुरू असताना मुख्यमंत्री स्वस्थ बसून आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच त्यातून मार्ग काढण्यासाठी विद्यमान कॉंग्रेस सरकारकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याने जगायचे कसे, असा यक्षप्रश्न लोकांपुढे निर्माण झाला आहे. तेव्हा ही स्थिती अशीच कायम राहिल्यास राज्यात अराजक माजेल, असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या गोवा शाखेचे सचिव तथा "आयटक' या कामगार संघटनेचे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिला.
आज येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाच्या युवक विभागाचे प्रमुख ऍड. सुहास नाईक हजर होते. सध्या दोन रुपयांना मिळणाऱ्या पावाचे दर तीन रुपयांवर नेण्याचे प्रयत्न सुरू असून गेल्या सहा महिन्यात दुधाची तीन वेळा दरवाढ करण्यात आली. हा प्रकार पाहता प्रत्यक्षात सामान्य जनतेशी निगडित गोष्टींवर नियंत्रण ठेवणेही या सरकारला जमत नसल्याने मुख्यमंत्री आपले सरकार "आम आदमी'चे असल्याचा दावा कोणत्या तोंडाने करतात, असा खडा सवालही यावेळी करण्यात आला.
एकीकडे आर्थिक मंदीचे वारे वाहत असताना अनेकांवर बेकारी ओढवली आहे तर दुसरीकडे अत्यावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडत चालल्या आहेत. विविध सरकारी खात्यांत रोजंदारी तथा कंत्राटी सेवेत असलेल्या सुमारे पाच हजार कामगारांना किमान वेतन देणे सरकारला परवडत नाही; परंतु आपल्या पाहुण्यांना जेवणावळी देण्याचा खर्च साडेतीनशे रुपयांवरून एक हजार रुपयांवर नेणे सहज जमते, असा टोला फोन्सेका यांनी हाणला.
दरम्यान,याप्रकरणी पक्षातर्फे मुख्यमंत्री कामत व नागरी पुरवठामंत्री जुझे फिलिप डिसोझा यांना पत्र पाठवण्यात आले आहे. पाव व दूध या जीवनावश्यक वस्तू असल्याने त्यावर सरकारचे नियंत्रण असणे अत्यावश्यक आहे. याबाबत सरकारला काही सूचना करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व पाव उत्पादकांना इंधन व कच्चा माल सार्वजनिक वितरण सेवेमार्फत देण्यात यावे, नोंदणीकृत पाव उत्पादकांना वन खात्यातर्फे माफक दरात भट्टीसाठी लाकूड पुरवण्यात यावे, सर्व पाव उत्पादकांना अन्न व औषध प्रशासनाअंतर्गत जोडण्यात यावे व पावांचे वजन व दर्जाची तपासणी व्हावी, विविध दुकानांवर पाव व दुधासाठी ग्राहकांकडून सरकारने निश्चित केलेले दरच आकारावे व पाव उत्पादकांना सार्वजनिक वितरण सेवेमार्फत गहू वितरित करावेत अशा काही सूचनाही पक्षाने केल्या आहेत.
दरम्यान,भारतीय संचार निगम लिमिटेड कंपनीतर्फे आजच सुमारे २०० कंत्राटी कामगारांना घरी पाठवण्यात आले आहे, "आयएफबी'कंपनीतर्फे सुमारे दीडशे लोकांना खाली करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तुये येथील गोवा अँटिबायोटिक्स कंपनीच्या कामगारांकडेही पूर्ण दुर्लक्ष होत असल्याने आता त्यांनी येत्या २५ नोव्हेंबर रोजी पणजीत कुटुंबीय व हितचिंतकांचा मोर्चा काढण्याचे ठरवले आहे. विविध औद्योगिक वसाहतींमध्ये सुमारे ८० टक्के कामगार कंत्राटी पद्धतीवर अत्यंत अल्प पगारात काम करीत आहेत. या सर्व गोष्टींबाबत सरकारचे कामगार खाते काहीच करीत नसून जनतेची उघडपणे थट्टाच सुरू असल्याची टीकाही फोन्सेका यांनी केली. जनतेच्या सहनशीलतेचा अंत होण्यापूर्वी राज्य सरकारने याबाबतीत त्वरित कार्यवाही सुरू केली नाही तर मात्र परिस्थिती आटोक्याबाहेर जाण्याची शक्यताही यावेळी वर्तविण्यात आली. एवढे करूनही राज्य सरकार झोपा काढत असेल तर सरकारविरोधात राज्यव्यापी पदयात्रा काढली जाईल, असेही फोन्सेका यांनी घोषित केले.

'रेपो' दरात कपात, बॅंकांचे व्याजदर घटण्याची शक्यता

नवी दिल्ली, दि. १ : रिझर्व्ह बॅंकेने आज रोख राखीव निधीच्या(सीआरआर) दरात आणखी एक टक्का कपात केली असून, अल्पकालीन कर्जाच्या("रेपो' दर) दरातही ०.५ टक्के कपात केली आहे. यामुळे बॅंकांच्या व्याजदरातही कपात होण्याची शक्यता आहे. विकासाला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
सीआरआरमध्ये एक टक्का कपात झाल्याने आता सीआरआरचा दर ५.५ टक्के झाला असून, रेपो दरातील अर्धा टक्का कपातीमुळे हा दर आता ७.५ टक्के झाला आहे. सीआरआरमधील कपातीमुळे बॅंकिंग प्रणालीमध्ये आणखी ४० हजार कोटी रुपयांच्या रोखीची भर पडणार आहे.
सीआरआरमधील कपात दोन टप्प्यात लागू केली जाणार आहे. .५ टक्क्याची पहिली कपात २५ ऑक्टोबरपासून लागू होईल, तर .५ टक्क्याची दुसरी कपात ८ नोव्हेंबरपासून अंमलात येईल, असे रिझर्व्ह बॅंकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रिझर्व्ह बॅंक बॅंकांना ज्या व्याजदराने अल्पकालीन कर्ज उपलब्ध करून देते त्या दरात (रेपो रेट) रिझर्व्ह बॅंकेने ०.५ टक्क्याची कपात केली आहे. त्यामुळे रेपो दर आता ७.५ टक्के झाला असून, नवा दर ३ नोव्हेंबरपासून अंमलात येईल. रिझर्व्ह बॅंकेने एसएलआरमध्येही कपात केली असून, तो २४ टक्के करण्यात आला आहे. बॅंका अनिवार्यपणे सरकारी रोख्यांमध्ये जी गुंतवणूक करतात, त्या गुंतवणुकीची रक्कम म्हणजे एसएलआर होय.
रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयाचे आयसीआयसीआय बॅंकेने स्वागत केले आहे. या निर्णयामुळे बाजारात ४० हजार कोटी रुपयांची रोख येईल आणि त्यामुळे व्याज दरातही कपात होईल असे बॅंकेच्या संयुक्त प्रबंध संचालिका चंदा कोचर यांनी म्हटले आहे.
एसएलआरमधील कपातीमुळे बॅंकिंग प्रणालीमध्ये ४० हजार कोटी रुपये रोख प्रवाहित होतील. बॅंकांना रोखीची समस्या भेडसावणार नाही यासाठीच रिझर्व्ह बॅंकेने हे पाऊल उचलले आहे. याआधीही दोन वेळा रिझर्व्ह बॅंकेने सीआरआर आणि रेपो दरात कपात केली आहे.

बाबूश दहावी पास, पण पुरावा नाही

पोलिस चौकशी अहवाल सादर, पुढील सुनावणी २० डिसेंबरला
पणजी, दि.१ (प्रतिनिधी): शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याविरोधात शैक्षणिक पात्रतेबाबत खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी ऍड.आयरिश रॉड्रिगीस यांनी दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीबाबत आज मुख्य न्यायदंडाधिकारी क्रिस्तीयानो फर्नांडिस यांच्यासमोर सुनावणी झाली असता पणजी पोलिसांनी चौकशी अहवाल न्यायालयापुढे सादर केला. आता पुढील सुनावणी २० डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.
या चौकशी अहवालात पोलिसांनी बरीच कसरत केल्याचे स्पष्ट झाले आहे. चौकशीकरिता पोलिसांनी वांद्रे मुंबई येथील सेंट तेरेझा हायस्कूलला ८ ऑक्टोबर २००८ रोजी भेट दिली. तेव्हा तेथील प्राचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार बाबूश मोन्सेरात यांनी १९ जून १९७५ साली इयत्ता सहावीत या हायस्कूलात प्रवेश मिळवला व ७ सप्टेंबर १९७८ साली इयत्ता आठवीत असताना त्यांनी हे हायस्कूल सोडले. या अहवालात बाबूश यांच्याकडून पोलिस चौकशीला प्रतिसाद देण्यात आला नसल्याचेही सांगण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी त्यांना पोलिस स्थानकावर जबानीकरता उपस्थित राहण्यासाठी १६ व २१ ऑक्टोबर २००८ रोजी दोन पत्रे पाठवली होती. मात्र ते फिरकले नाहीत. दरम्यान, बाबूश यांनी २३ ऑक्टोबर २००८ रोजी पोलिसांना दिलेल्या लेखी खुलाशात आपण कोणतेही खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले नसल्याचा दावा करून सेंट तेरेझा हायस्कूलमधून बाहेर पडल्यावर इतर हायस्कूलांमध्ये आपण शिक्षण घेतल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, बाबूश यांनी याप्रकरणी आपल्या विरोधात केवळ सरकारी सेवक तक्रार दाखल करू शकतो, असे सांगून ऍड. आयरिश हे सरकारी सेवक नसल्याचा पवित्रा घेतला आहे. पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात बाबूश यांनी आपण दहावी उत्तीर्ण झाल्याचा दावा केला असला तरी तो सिद्ध करण्यासाठी अद्याप कोणताही पुरावा सादर केला नसल्याचेही म्हटले आहे.