नवी दिल्ली, दि. २४ - सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणात सीबीआयने समन्स बजावलेले गुजरातचे गृहराज्यमंत्री अमित शाह यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. विशेष सीबीआय न्यायालयाने शाह यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर शहा यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीसाठी आज सकाळी नवी दिल्लीत दाखल झालेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी विमानतळावरच शाह यांच्या राजीनाम्याचा वृत्ताला दुजोरा दिला. "मी दिल्ली विमानतळावर उतरत असतानाच शाह यांनी आपला राजीनामा माझ्या बंगल्यावर पाठविल्याची सूचना मला मिळाली आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारणार असून राष्ट्रीय विकास परिषदेची बैठक संपल्यानंतर परत जाऊन राजीनाम्यासंबंधीची औपचारिकता पूर्ण करीन', असे मोदी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अमित शाह पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा मोदी यांनी यावेळी केला. महागाई, अंतर्गत सुरक्षा, नक्षलवाद, भारत-पाक चर्चेत बसलेली चपराक आणि महागाईविरोधातल्या भारत बंदला मिळालेला जबरदस्त प्रतिसाद बघून गोेंधळलेल्या केंद्र सरकारने या सगळ्या मुद्यांवरून जनतेचे लक्ष इतरत्र वेधण्यासाठी सीबीआयमार्फत जाणूनबूजून विरोधकांना लक्ष्य करण्याचा केलेला हा प्रयत्न आहे. अमित शाह आपल्यावरील आरोपांना उत्तर देण्यासाठी कायदेशी लढाई लढतील आणि आमचा विश्वास असलेली न्यायव्यवस्था त्यांना न्याय देईल, असा आत्मविश्वाही मोदी यांनी व्यक्त केला.
२००५ मध्ये झालेल्या सोहराबुद्दीन आणि त्याची पत्नी कौसर बी यांचे अपहरण आणि हत्या केल्याचा आरोप सीबीआयने शाह यांच्यावर ठेवला आहे. याप्रकरणी शुक्रवारी सीबीआयने स्थानिक न्यायालयात शाह यांच्यासह एकूण १५ जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. इतर आरोपींमध्ये माजी पोलिस महानिरीक्षक डी. बी. वंजारा, अभय चुडासामा, दिनेश एम. एन. आणि राजकुमार पांडियन हे आयपीएस अधिकारी आणि इतरांचा समावेश आहे. सीबीआयने अमित शाह यांना उपस्थित राहाण्यासाठी दोन वेळा समन्स बजावले होते. त्यानंतरही ते उपस्थित राहिले नाही आणि आपल्या कार्यालयात व निवासस्थानीदेखील आढळले नाहीत.
Sunday, 25 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment