Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 18 September 2010

युवक कॉंग्रेसचा घोटाळा हा माणुसकीला कलंकच

रमेश तवडकर कडाडले

पूरग्रस्त निधी गैरव्यवहाराच्या
सखोल चौकशीची मागणी


पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)- काणकोणवासीय अजूनही महापुराच्या संकटातून सावरलेले नसताना युवक कॉंग्रेसकडून काणकोणवासीयांच्या नावाने मदतनिधी गोळा करून त्याचा अपव्यय करण्याची कृती म्हणजे माणुसकीला कलंक लावण्याचा प्रकार आहे. नैसर्गिक आपत्तीवेळी समाजातील माणुसकी हीच या आपद्ग्रस्तांसाठी खरा आधार असतो, परंतु युवक कॉंग्रेसची कृती काणकोणवासीयांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार ठरला आहे. या वृत्तामुळे या लोकांचे नीतिधैर्यच खचले असून अशा गैरव्यवहाराची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी पैंगीणचे आमदार तवडकर यांनी केली आहे.
काणकोणात महापुरामुळे अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले आहेत. अशा परिस्थितीत प्रचंड आत्मबळाच्या साह्याने येथील लोक पुन्हा एकदा आपले संसार उभे करण्यासाठी धडपडत आहेत. राज्य सरकारने मदतीच्या नावाखाली तुटपुंज्या रकमेचे धनादेश लोकांच्या हातात टेकवून आपली जबाबदारी झटकली आहे. या पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा ४८ कोटी रुपयांचा असताना आत्तापर्यंत केवळ एक कोटी रुपये खर्च केल्याचे जे मुख्यमंत्री सांगतात, त्यावरून ते आपलीच निष्क्रियता उघड करीत असल्याचेही आमदार तवडकर म्हणाले. काणकोणवासीयांच्या मदतीसाठी समाजातील विविध लोकांनी आपले हात पुढे केले व वेगवेगळ्या माध्यमातून आपली मदत या लोकांपर्यंत पोचवली. यामुळे अनेकांची घरे सध्या उभी राहत आहेत. अशा परिस्थितीत युवक कॉंग्रेसकडून काणकोण पुराची संधी साधून या लोकांना मदत करण्याचे निमित्त करून निधी गोळा करण्यात आला. या निधीचा वापर न करता तो खात्यातही जमा झाला नसल्याचे त्यांच्याच सहकारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने उघडकीस आणले आहे. हा प्रकार समाजासाठी घातकच ठरला असून अशामुळे काही प्रमाणात बाकी असलेली माणुसकीही लोप पावण्याचा धोका असल्याचेही आमदार तवडकर म्हणाले. यापुढे असा प्रसंग कुणावरही ओढवला तर लोक कोणत्या विश्वासाने मदत करण्यास पुढे सरसावतील? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
कॉंग्रेसकडून जमवण्यात आलेला निधी हा काणकोणवासीयांसाठी नव्हेच, असे सांगून कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांनी कमरेचे सोडून डोक्याला बांधण्याचाच प्रकार केला आहे. लोकांकडून जमवलेला हा निधी काणकोणवासीयांसाठी नव्हे तर तो काणकोणात पूर आल्यानंतरच का जमवला? त्यासाठी कॉंग्रेसला दुसरा मुहूर्त सापडत नव्हता काय? असे प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केले. काणकोणवासीयांच्या नावाने अशा पद्धतीने कुणी गैरव्यवहार करीत असेल तर तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. राज्य सरकारने ताबडतोब या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी व सत्य काय ते जनतेसमोर आणावे. लोकांच्या भावनांची अशा पद्धतीने थट्टा करण्याचा प्रयत्न होत असेल तर तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. काणकोणवासीयांच्या नावाने पैसा गोळा करून या पैशांची चैन करण्याचा प्रकार खरोखरच घडला असेल तर या गैरव्यवहाराला जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. मुख्यमंत्री कामत यांनी तात्काळ या प्रकरणाचा छडा लावावा अन्यथा काणकोणवासीयांना निदान आपला स्वाभिमान दाखवण्यासाठी रस्त्यावर उतरणे भाग पडेल, असा खणखणीत इशाराही आमदार तवडकर यांनी दिला.

बेती येथे कॅसिनो नकोच!

आमदार दिलीप परुळेकरही कडाडले

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)- कॅसिनो जहाजे मांडवी नदीतच ठेवण्याचा निर्णय घेऊन या सरकारने बेशरमीची परिसीमाच गाठली असून या सरकारला जनतेच्या भावनांची अजिबात कदर नाही, अशी परखड प्रतिक्रिया साळगावचे आमदार दिलीप परुळेकर यांनी व्यक्त केली. बेती-वेरे भागातील लोकांना या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत कॅसिनो नको आहेत व त्यांच्या या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा असेल. या लोकांच्या आंदोलनाला भाजप पूर्ण ताकदीनिशी पाठिंबा देईल, जनतेच्या पाठिंब्यानेच कॅसिनो या ठिकाणी नांगरण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
राज्यातील विद्यमान कॉंग्रेस सरकारात दलालांचाच भरणा झाला असून जनतेच्या भावनांपेक्षा या सरकारला कॅसिनोवाल्यांचीच अधिक चिंता असल्याची टीका त्यांनी केली. विधानसभेत कॅसिनोला बहुतांश आमदारांनी कडक विरोध दर्शवला आहे. विरोधकांबरोबर सत्ताधारी पक्षातीलही आमदारांनी कॅसिनो हटवण्याची जोरदार मागणी केली आहे. पण या सरकारला सभागृहातील लोकप्रतिनिधींची कदर नसल्याचेच या निर्णयातून दिसून येत आहे. हळदोण्याचे आमदार ऍड. दयानंद नार्वेकर, सांताक्रुझच्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनी दर्शवलेल्या विरोधालाही त्यांच्याच सरकारने कचऱ्याची टोपली दाखवली आहे. आपल्या पक्षाच्या आमदारांची कदर न करणारे हे सरकार जनतेचा विचार काय करेल, असा टोलाही आमदार परुळेकर यांनी हाणला.
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी कॅसिनो व्यवहारातील भानगडी वेळोवेळी विधानसभेत उघड करून सरकारातील छुप्या दलालांचा भांडाफोड केला आहे. कोणत्याही परिस्थितीत कॅसिनो जहाजे मांडवी नदीतून हद्दपार झालीच पाहिजे व त्यासाठी भाजप येत्या काळात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचेही ते म्हणाले. भाजप विधिमंडळ गटाच्या बैठकीत या विषयावर सखोल चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोव्यातही दक्षता

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) - अयोध्याप्रकरणाचा निवाडा येत्या २४ सप्टेंबर रोजी लखनौ न्यायालयात दिला जाणार असून या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात दक्षतेचे आदेश देण्यात आले आहे. गोव्यातही दक्षता पाळली जाणार असल्याचे आज पोलिस खात्याचे प्रवक्ते तथा पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी सांगितले.
गोव्यात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नसली तरी संवेदनशील ठिकाणी पोलिस तैनात केले जाणार आहेत. यासाठी बाहेरून कोणत्याच सुरक्षा यंत्रणेला पाचारण करण्यात आले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
निकाल जाहीर झाल्यानंतर कोणताही एक गट रस्त्यावर उतरण्याची शक्यता असल्याने यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हा अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

अयोध्या प्रकरणाचा निकाल २४ तारखेलाच

लखनौ, दि. १७ - अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी दिल्या जाणाऱ्या प्रस्तावित निकालाला पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका आज अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे आता हा निकाल कोणत्याही सामोपचाराच्या चर्चेविना २४ तारखेलाच दिला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी दोन याचिका उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर दाखल झाल्या होत्या. एका याचिकेत रमेशचंद्र त्रिपाठी यांनी राष्ट्रकुल स्पर्धा असल्याने अयोध्येबाबतचा २४ सप्टेंबर रोजी येणारा निकाल पुढे ढकलण्यात यावा, अशी मागणी केली होती. या निर्णयामुळे देशात कायदा आणि सुव्यवस्थेची अडचण निर्माण होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे होते. न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकले पण, याचिका दाखल करून न घेता फेटाळून लावली. तसेच सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी त्रिपाठी यांनी अशी फालतू याचिका दाखल केल्याचा आरोप ठेवीत न्यायालयाने त्रिपाठी यांना १० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्याचे संकेत दिले. त्याविषयीचा निर्णय मात्र आज दिला नाही. न्या. एस.यू.खान, न्या. सुधीर अग्रवाल आणि न्या. धर्मवीर शर्मा यांच्या न्यायासनाने हा निकाल दिला.
निर्मोही आखाड्याची याचिका
निर्मोही आखाड्याने आज एक याचिका नव्याने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठासमोर सादर केली. कोर्टाबाहेर सामोपचाराने, चर्चेच्या माध्यमातून अयोध्या प्रश्न सोडविण्यासाठी आखाड्याचे महंत राजा रामचंद्र यांनी १० दिवसांची मुदत मागितली होती. किमान २७ सप्टेंबरपर्यंत तरी हा निकाल लांबणीवर टाकावा, अशी आखाड्याची मागणी होती. ऍड. आर.एल.वर्मा यांनी आखाड्याच्या वतीने ही याचिका दाखल केली. या चर्चेसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मध्यस्थ म्हणून बसविण्याचेही आखाड्याने याचिकेत म्हटले आहे. पण, आता या ६० वर्षे जुन्या प्रश्नाला चर्चेने सोडविण्यासाठी फारसा वाव उरलेला नाही, असे सांगून न्यायालयाने निकाल लांबणीवर टाकण्यास नकार दिला.
कोर्टाबाहेर समझोता नाही
अयोध्या प्रकरणी कोर्टाबाहेर सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना चर्चेचा प्रस्ताव दिला होता. पण, आज दोन्ही पक्षांनी यासाठी नकार दिल्याने सामोपचाराने मार्ग निघण्याची शक्यता मावळली.
या प्रकरणी अखिल भारतीय हिंदू महासभा आणि सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने कोर्टाबाहेर हा मुद्दा सोडविण्यास आज नकार दिला. त्यामुळे आता यातून सामोपचाराने मार्ग निघू शकत नाही, असे स्पष्ट झाले आहे.

मिकींचा इंडियन एक्सप्रेसवर ५० कोटी बदनामीचा दावा

मडगाव, दि.१७ (प्रतिनिधी): लोकांना बेकायदेशीरपणे विदेशात नेणे तसेच हवालाप्रकरणी सध्या सीबीआय चौकशीच्या घेऱ्यात सापडलेले माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी इंडियन एक्सप्रेस या राष्ट्रीय दैनिकाला आपली बदनामी केल्याबद्दल कायदेशीर नोटीस बजावली असून ५० कोटींच्या भरपाईचा दावा केला आहे.
आपले वकील श्रीकांत नाईक यांच्यामार्फत त्यांनी ही नोटीस बजावली असून आपली बदनामी करणाऱ्या वृत्ताबद्दल पंधरा दिवसांत ठळकपणे माफी मागावी अन्यथा ५० कोटींचा बदनामी खटला गुदरला जाईल असे म्हटले आहे. मिकींबाबत वरील प्रकरणी अमेरिकन व्हाईट हाऊसने गृहमंत्रालयाकडे चौकशी केली असून सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यानुसार सीबीआयने चौकशी सुरू केली आहे, असे वृत्त सदर दैनिकाने दिले होते. यानंतर सीबीआयने तपास सुरू केला होता.
मिकी यांच्या म्हणण्याप्रमाणे अमेरिकेतून आपल्याविरुद्ध कोणतीही चौकशी सूचना आलेली नाही. सदर दैनिकातील अतिरंजित वृत्ताची दखल घेऊन सीबीआयने ही चौकशी सुरू केली व त्यात त्यांना काहीच तथ्य सापडलेले नाही.

म्हापसा येथील अपहृत बालकाची मुंबईत सुटका

म्हापसा, दि. १७ (प्रतिनिधी)- करासवाडा म्हापसा येथून १५ सप्टेंबर रोजी अपहरण करण्यात आलेल्या आफ्रिदी शेख या चार वर्षीय बालकाची म्हापसा पोलिसांनी सुखरूप सुटका केली. आफ्रिदीसह मुंबई येथे पोचलेल्या समीर या अपहरणकर्त्याला पोलिसांनी सापळा रचून पकडले.
याविषयी आफ्रिदीचे आजोबा महमद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार १५ सप्टेंबर रोजी चॉकलेट आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या आफ्रिदीचे अज्ञाताने अपहरण केले. तर, आफ्रिदी सापडत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली. दुसऱ्या दिवशी महमद यांचा जावई समीर याने मुंबईहून फोन करून आफ्रिदी आपल्या ताब्यात असल्याचे सांगितले. तो जिवंत पाहिजे असल्यास ५० हजार रुपयांसह आपण सांगितलेल्या पत्त्यावर येण्याची सूचना त्याने केली. यानंतर त्याने पुन्हा फोन करून एका दिवसाचीच मुदत देत असल्याचे सांगितले. यानंतर म्हापसा पोलिसांनी योजना आखून अपहरणकर्त्याला ५० हजार देणार असल्याचे कळवण्याची सूचना दिली. पोलिस उपनिरीक्षक विजय राणे, हवालदार संतोष बांदोडकर व अन्य पोलिसांनी शेख यांच्या कुटुंबीयांसह मुंबई गाठली. समीर याने शेख यांच्या कुटुंबीयांना बऱ्याचदा फोन करून विविध ठिकाणी येण्याची सूचना केली. मात्र, शेवटी मुंबई पोलिसांच्या साह्याने सापळा रचून त्याला मणकूर येथे ताब्यात घेतले. यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला घेरले. समीरला पकडल्यानंतर आफ्रिदी धावत येऊन आपल्या कुटुंबीयांकडे विसावला. मुंबई येथे सोपस्कार पूर्ण करून म्हापसा पोलिस शेख कुटुंबीय व अपहरणकर्ता समीर याच्यासह गोव्यात येण्यासाठी रवाना झाले.

Friday, 17 September 2010

कॅसिनोच्या निर्णयामागे 'दलाली'

विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांची घणाघाती टीका
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): कॉंग्रेस आघाडी सरकारातील नेत्यांनी कॅसिनोवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात दलाली उकळली आहे व त्यामुळेच ही जुगारी जहाजे मांडवी नदीबाहेर काढण्याची नैतिकताच या सरकारने हरवली आहे, अशी घणाघाती टीका आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार हे पूर्णतः दिवाळखोर बनल्याचा आरोपही यावेळी पर्रीकर यांनी केला.
राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावून त्यात कॅसिनो जहाजांना मांडवीतच आपला व्यवसाय करण्याची मोकळीक देण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासाठी म्हणून हे सर्व तरंगते कॅसिनो रायबंदर, बेती व पणजी येथे मांडवी नदीत वेगवेगळ्या ठिकाणी उभे केले जाणार आहेत. मांडवी नदीतून हटवण्यासाठी सरकारने काढलेल्या आदेशाला कॅसिनोवाल्यांनी न्यायालयात आव्हान दिले. आता एक वर्ष झाले तरी न्यायालयात या प्रकरणी सरकारच्या बाजूने आदेश मिळवण्यास ऍडव्होकेट जनरल अपयशी ठरले आहेत. न्यायालयातही हे प्रकरण ज्या पद्धतीने रखडत आहे ते पाहता ऍडव्होकेट जनरलांचेही कॅसिनोवाल्यांकडे साटेलोटे असण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असेही पर्रीकर म्हणाले.
या सरकारला जनाची सोडाच स्वतःच्या मनाचीही लाज राहिलेली नाही. विधानसभेत आमदारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना कॅसिनो जहाजे मांडवी नदीतून हटवण्याचे आश्वासन दिले जाते व आता मंत्रिमंडळ बैठक बोलावून ही जहाजे मांडवी नदीतच ठेवण्याचा निर्णय घेतला जातो. या सरकारला जनतेची अजिबात कदर नाही. पूर्णतः भ्रष्ट बनलेल्या या सरकारकडून राज्याचा सत्यानाश सुरू आहे. हे सरकार नव्हे तर भस्मासुराचा अवतार आहे व त्यामुळे या भस्मासुराचा वध करण्यासाठी आता गोमंतकीयांनी पुढे सरसावणे ही काळाची गरज आहे, असेही पर्रीकर म्हणाले. आपण व आपल्या पक्षाने तरंगत्या कॅसिनोला कायम विरोध केला आहे व यापुढेही विरोध राहील. या सरकारच्या तावडीतून गोव्याला वाचवण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. गोवा वाचवण्यासाठीच्या या लढ्याचे नेतृत्व भाजप करेल व गोमंतकीय जनतेने सर्व मतभेद बाजूला सारून भाजपची साथ द्यावी, असे आवाहनही पर्रीकर यांनी यावेळी केले.

रिव्हर प्रिन्सेस काढण्यासाठी साळगावकरला प्राधान्य

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): कांदोळी किनाऱ्यावर रुतून बसलेले रिव्हर प्रिन्सेस जहाज काढून होईपर्यंत अनिल साळगावकर यांना बॅंक हमी म्हणून दहा कोटी रुपये जमा करण्यास सांगितल्याचे राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला सांगितले. तसेच, त्यांना हे जहाज हटवण्यासाठी नियम घालून दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने यावरील पुढील सुनावणी येत्या सोमवारी ठेवण्यात आली आहे. त्यावेळी साळगावकर कंपनीचे वकील यावर आपले प्रतिज्ञापत्र सादर करण्याची शक्यता आहे.
हे जहाज काढण्यासाठी बॅंक हमी म्हणून दहा कोटी रुपये जमा करावे व जहाज कापून काढे पर्यंत ही रक्कम न्यायालयाद्वारे बॅंकेत जमा राहील, अशी अट सरकारने घातली आहे. रिव्हर प्रिन्सेस जहाजाचे मूळ मालक अनिल साळगावकर यांनी हे जहाज काढण्याचा दावा केला आहे. त्यामुळे हे जहाज कशा पद्धतीने काढले जाणार आहे, त्याचा संपूर्ण आराखडा न्यायालयात सादर करावा लागणार आहे.
येत्या पावसाळ्यापर्यंत हे जहाज हटवले जाणार असल्याची खात्री करून घेण्याची सूचना राज्य सरकारला करण्यात आली आहे. तसेच, हे जहाज हटवण्याची प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. गेल्या दहा वर्षांपासून हे जहाज या ठिकाणी रुतलेले आहे. जहाजाचे मालक साळगावकर यांनी फुकटात हे जहाज हटवण्याची तयारी दाखवली असताना त्यांना सशर्त परवानगी देण्यात आल्याने या प्रकरणी काय प्रतिवाद होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सदर जहाजामुळे येथील समुद्री जीवनाला धोका निर्माण झाला आहे, असा अहवाल केंद्र सरकारच्या पृथ्वी व विज्ञान विभागाने राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकारने नव्याने निविदा काढून हे जहाज हटवण्याच्या प्रयत्न सध्या स्थगित झाला आहे. साळगावकर कंपनीने हे जहाज काढण्यासाठी तयारी दर्शविल्याने प्रथम संधी त्यांना देण्यात आली आहे. या पूर्वी जयसू या गुजरात येथील कंपनीला हे जहाज हटवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र त्यांना हे जहाज हटवण्यास अपयश आल्याने त्यांची हमीची पाच कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली होती.

सुधारगृहातून पळालेल्या अकरा तरुणींना अटक

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): मेरशी येथील सुधारगृहातून पळालेल्या ११ तरुणींनी लोकांच्या सतर्कतेमुळे पुन्हा ताब्यात घेण्यात पोलिसांनी यश आले. मात्र, एकाच वेळी ११ तरुणी पळाल्याने पुन्हा एकदा या सुधारगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी योग्य वागणूक मिळत नसल्याने आम्ही पळून जाण्याचा प्रयत्न केला असल्याचे या तरुणींचे म्हणणे आहे.
अधिक माहितीनुसार आज दुपारी ११ तरुणींनी सुधारगृहाच्या अधीक्षकांची नजर चुकवून पळून जाण्यास यश मिळवले. मेरशी येथील रस्त्यावरून चालत जाताना या तरुणींना पोलिस खबऱ्याने पाहिल्याने त्यांना पुन्हा ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. मडगाव पणजी महामार्गाच्या ठिकाणी त्यांना जुने गोवे पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्व तरुणांची तीन महिन्यांपूर्वी कळंगुट येथून सुटका करून त्यांची रवानगी या सुधारगृहात करण्यात आली होती. मात्र येथे योग्य सुविधा नाही. व्यवस्थित वागणूक मिळत नाही. कोणालाही दूरध्वनी करण्याची परवानगी दिली जात नाही तसेच, रोग जडलेल्या तरुणींनाही सर्वसामान्य तरुणींबरोबर ठेवले जाते, अशा अनेक तक्रारी या तरुणींनी केल्या आहेत.
वेश्याव्यवसायात गुंतलेल्या या तरुणींची सुटका केल्यानंतर त्यांना येथे आणून ठेवले जाते. त्यानंतर त्यांना त्यांच्या गावी नातेवाइकांच्या ताब्यात सुपूर्त करण्याची जबाबदारी ही सुधारगृह प्रशासनाची आहे. त्यासाठी योग्य निधीही सरकारतर्फे दिला जातो. परंतु, या तरुणींना वर्षानुवर्षे पाठवले जात नसल्याने येथून पळून जाण्याचा प्रयत्न केला जातो. यापूर्वी अनेक तरुणी येथून पळून गेल्या असून त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.
गुन्हा अन्वेषण विभागाने कळंगुट येथील "फिरोजडॅम' या पबवर छापा टाकून अकरा तरुणींची सुटका केली होती. तसेच, त्यानंतर कळंगुट पोलिसांनी छापा सत्र सुरू ठेवताना २२ तरुणींना ताब्यात घेतले होते. या सर्वांना याच सुधारगृहात ठेवण्यात आले होते. यातील काहींना यापूर्वी जाण्यास दिले असून काहींना येथेच ठेवण्यात आले होते. या प्रकरणाची अधिक चौकशी जुने गोवे पोलिस करीत आहेत.

...तर कोलवाळ येथे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): फर्मागुडी येथे होऊ घातलेल्या राज्यातील दुसऱ्या हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग तंत्रज्ञान व उपयोजित पोषण संस्थेच्या नियोजित जागेवरून वाद निर्माण झाल्याने ही संस्था आता बार्देश तालुक्यातील कोलवाळ येथे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. थिवीचे आमदार तथा पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी गोवा गृहनिर्माण विकास महामंडळाची कोलवाळ येथील जागा या संस्थेला देण्याची तयारी दर्शवली आहे.
गोव्यात पर्वरी येथे एक केटरिंग कॉलेज आहे व आता केंद्र सरकारने अतिरिक्त केटरिंग कॉलेजला मान्यता दिली असून हे कॉलेज फर्मागुडी येथे उभे राहणार आहे. दरम्यान, या कॉलेजसाठी निश्चित केलेली जागा ही फर्मागुडी येथील प्रसिद्ध गणपती देवस्थानाला टेकूनच येत असल्याने देवस्थान समिती तसेच स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. या लोकांनी पूर्णतः या संस्थेला विरोध न करता केवळ देवस्थानापासून काही अंतरावर नेण्याची विनंती राज्य सरकारला केली आहे. सदर केटरिंग कॉलेजात विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान शिकविले जाणार असल्याने येथील धार्मिक स्थळाचे पावित्र्य बिघडेल, अशी भीती या भक्तमंडळींनी व्यक्त केली आहे. या विरोधाच्या अनुषंगाने आता ही संस्थाच बार्देश तालुक्यात नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फोंडा शहरात इतरही शैक्षणिक संस्था आहेत व त्यामुळे एखादी बडी शैक्षणिक संस्था बार्देश तालुक्यात यावी, अशी इच्छा बार्देशचे प्रतिनिधित्व करणारे पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी व्यक्त केली आहे. गोवा गृहनिर्माण विकास महामंडळाची जागा कोलवाळ येथे आहे व ही संस्था या जागेत उभारता येणे शक्य असल्यास ती देण्याची तयारी नीळकंठ हळर्णकर यांनी दर्शवली आहे. म्हापसा येथील नियोजित रवींद्र भवनासाठीही या नियोजित जागेचा विचार सुरू होता, परंतु केटरिंग कॉलेजचा प्रस्ताव आल्यास त्याला प्राधान्य दिले जाईल, असे श्री. हळर्णकर यांनी "गोवादूत'शी बोलताना सांगितले.
या संस्थेच्या नावाने सोसायटी स्थापन करून फर्मागुडी येथे ५ एकर जमीन या सोसायटीच्या नावे करण्यात आली आहे. दोन वर्षांच्या काळात या संस्थेची इमारत उभारण्याचा मनोदय सरकारने आखल्याची माहिती शिक्षण खात्याचे सचिव डॉ. एम. मुदास्सीर यांनी दिली. गोव्यात हॉटेल व्यवस्थापन शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने केंद्राने ही संस्था राज्याला बहाल केली आहे व त्यासाठी सुमारे १२ कोटी रुपये मंजूर केल्याचे डॉ. मुदास्सीर यांनी सांगितले.

'गोमेकॉ'त पाणी टंचाई

रुग्णांसह नातेवाईकही हैराण
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाणी टंचाईमुळे रुग्ण व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाइकांची बरीच पंचाईत सुरू आहे. गेल्या आठवड्यात दोन वेळा पाणीपुरवठा पूर्ण दिवस खंडित झाल्याने लोकांचे बरेच हाल झाले. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हा विषय पोचवला असता तेही याकडे अत्यंत बेफिकीरपणे पाहत असल्याने राज्यातील सर्वांत मोठ्या सरकारी इस्पितळाला कुणीच वाली नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
गोमेकॉतील पाणी टंचाईचा विषय वारंवार डोके वर काढत असताना इस्पितळातील वरिष्ठ अधिकारी किंवा सा.बां.खातेही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे. लोकांनी तक्रारी केल्याच तर सा.बां.खाते वीज खात्यावर तोफ डागून हात झटकण्याचे काम करते. बाहेर धो धो पाऊस पडत असताना इस्पितळातील नळ मात्र पूर्णपणे कोरडे होण्याचा प्रकार हा प्रशासकीय बेशिस्तीचाच भाग असल्याचेही लोकांचे म्हणणे आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी गोमेकॉतील पाणी टंचाईला जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सुनावणी सुरू, दोघांविरुद्ध न्यायालयीन अवमान अर्ज

मडगाव, दि.१६ (प्रतिनिधी): दिवाळीच्या पूर्वसंध्येला मडगावात झालेल्या स्फोटप्रकरणाची सुनावणी आज येथील प्रधान सत्र न्यायाधीश उत्कर्ष बाक्रे यांच्या समोर सुरू झाली. यावेळी सदर स्फोटात मरण पावलेले मालगोंडा पाटील व योगेश नाईक यांची शवचिकित्सा केलेले डॉ. मंदार कंटक यांची साक्ष झाली. तर, दुसरीकडे बचावपक्षाच्या वकिलांनी या प्रकरणी एक वृत्तपत्र व त्याचे संपादक तसेच या प्रकरणातील साक्षीदार असलेले रामनाथीचे वसंत भट यांच्या विरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याचा अर्ज आज सादर केला.
डॉ. कंटक यांनी आपल्या साक्षीत उभयतांच्या कमरेखालील भागाच्या उडालेल्या चिंधड्यांवरून सदर स्फोटामुळेच ते मृत्युमुखी पडल्याचे स्पष्ट होते, असे सांगितले. त्यांची उलटतपासणी घेताना बचावपक्षाचे वकील पुनाळेकर यांनी पाटील व नाईक यांना सदर स्फोटात मरण आले हे खरे असले तरी ते या स्फोटाचे बळी ठरले, ते आरोपी नव्हते असा दावा केला. त्यानंतर न्यायमूर्तींनी पुढील सुनावणीसाठी २९ सप्टेंबरची तारीख जाहीर केली.
ही सुनावणी दैनंदिन तत्त्वावर व्हावी तसेच घरी फोन करण्यास मुभा द्यावी या संशयित आरोपींनी केलेल्या दोन अर्जांवरील निर्णय राखून ठेवण्यात आला आहे तर सर्वांना एकाच कोठडीत ठेवावे म्हणून सादर केलेला अर्ज सुरक्षिततेच्या कारणास्तव न्यायाधीशांनी फेटाळला.
दरम्यान, एक वृत्तपत्र व या प्रकरणातील साक्षीदार असलेले वसंत भट यांच्या विरुद्धच्या न्यायालयीन अवमान अर्जात ऍड. पुनाळेकर यांनी म्हटले आहे की, रामनाथी बचाव समितीच्या नावाने वसंत भट यांनी काढलेले एक पत्रक सदर वृत्तपत्राने २७-२-२००९ च्या अंकात प्रसिद्ध केले असून ते पत्रक न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप करणारे व लोकांच्या भावना कलुषित करणारे आहे. या पत्रकावर आधारून सदर वृत्तपत्राने केलेले लिखाण तर त्याहून अधिक आक्षेपार्ह आहे. अशा प्रकारे वृत्तपत्रीय माध्यमांतून निवाडे दिले गेले तर तो न्यायालयीन कामकाजात अधिक्षेप होईल असा दावा करण्यात आला आहे.
वसंत भट हे या खटल्यातील एक साक्षीदार असल्याने त्यांना अशा प्रकारची पत्रके किंवा वक्तव्ये करता येत नाही, असेही त्यांनी या अर्जात म्हटले आहे. सदर वृत्तपत्राचे संचालक हे एका राजकीय पक्षाचे समर्थक असल्याने सदर वृत्तपत्र या प्रकरणात सनातनविरुद्ध अपप्रचार करत आहेत, असेही यात नमूद केले आहे.

Thursday, 16 September 2010

सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मिरला भेट देणार

विशेषाधिकार कायद्याबाबत मतभेद कायम

नवी दिल्ली, दि. १५ - जम्मू-काश्मिरातील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी राजकीय नेत्यांचे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठविण्याचा निर्णय पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र, लष्कराला बहाल करण्यात आलेला विशेषाधिकार काढून घेण्याबाबत किंवा तो सौम्य करण्याबाबत असलेले मतभेद अजूनही कायमच आहेत.
काश्मीर मुद्यावर पंतप्रधानांनी आज बोलावलेली सर्वपक्षीय बैठक सुमारे साडेपाच तास चालली. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, संपुआ अध्यक्षा सोनिया गांधी, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपापली मते या बैठकीत व्यक्त केली. काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय घटनेच्या चौकटीत राहून अंतर्गत चर्चा करण्याबाबत आजच्या बैठकीत एकमत झाले. मात्र, लष्कराला बहाल करण्यात आलेला विशेषाधिकाच्या मुद्यावरून असलेले मतभेद बैठकीदरम्यान स्पष्टपणे समोर आले. हा कायदा रद्द करावा अशी मागणी पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या काश्मिरातील पक्षांनी केली, तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपासह इतर काही पक्षांनी हा कायदा रद्द करून लष्कराचे हात बांधण्यास आपला प्रखर विरोध असल्याचे बैठकीत सांगितले.
गेल्या तीन महिन्यांपासून काश्मीर खोऱ्यात सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत पंतप्रधान आणि उपस्थित इतर नेत्यांनी दु:ख आणि चिंता व्यक्त केली. चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून समोर आलेली कोणतेही न्यायोचित मागणी मान्य करण्यास भारतीय संविधानात मोठा वाव आहे ही बाब बैठकीस उपस्थित असलेल्या सर्वच नेत्यांनी मान्य केली, असे बैठकीनंतर सरकारतर्फे प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्या अनुषंगानेच काश्मीर खोऱ्यातील प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्याच्या दौऱ्यावर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिष्टमंडळाच्या दौऱ्याची तारीख नंतर घोषित करण्यात येणार आहे, असेही निवेदनात पुढे म्हटले आहे. या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने खोऱ्यात जाऊन समाजातील सर्व घटकांची भेट घ्यावी आणि प्रत्येकाचे मत जाणून घ्यावे असा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि राज्यसरकार संयुक्तपणे या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा दौरा आयोजित करणार आहे.
राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या पीडीपी या पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी एएफएसपीए कायदा ताबडतोब मागे घ्यावा आणि नागरी परिसरातून लष्करही माघारी बोलवावे अशी मागणी केली. राज्यात सत्तारूढ असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांनीही लष्कराचा विशेषाधिकार काही प्रमाणात काढून घेण्यात यावा किंवा या कायद्याला आणखी मानवतावादी स्वरूप देण्यात यावे, अशी मागणी केली. दोन्ही पक्षांनी केलेल्या या मागणीला डाव्या पक्षांनी आणि लोजपाने पाठिंबा व्यक्त केला. मात्र, भाजपा, शिवसेना, सपा आणि राजद या पक्षांनी या मागणीला विरोध दर्शवला. लष्कराच्या मनोबलाचे खच्चीकरण होईल असे काहीही करता कामा नये, असे मत या पक्षाच्या नेत्यांनी बैठकीत व्यक्त केले.
आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, संपुआ अध्यक्षा सोनिया गांधी, भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, अरूण जेटली, जदयु नेते शरद यादव, सपा अध्यक्ष मुलायसिंग यादव, माकपाचे सरचिटणिस प्रकाश कारत, शिवसेना नेते मनोहर जोशी, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला आणि पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती इत्यादी नेतेमंडळी हजर होती.

भविष्यनिर्वाह निधीचा व्याजदर आता ९.५ टक्के

नवी दिल्ली, दि. १५ ः २०१०-११ या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीवर ९.५ टक्के दराने व्याज देण्याचा निर्णय भविष्य निर्वाह निधीच्या विश्वस्त मंडळाने आज घेतला आहे. आतापर्यंत या निधीवर ८.५ टक्के या दराने व्याज देण्यात येत होते.
विश्वस्त मंडळाच्या या निर्णयाने सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. असंघटीत क्षेत्रातल्या सुमारे ४.७१ कामगारांच्या ठेवीवर या आर्थिक वर्षात ९.५ टक्के दराने व्याज मिळणार असून, हा गेल्या पाच वर्षातला उच्चांकी व्याजदर आहे. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संस्थेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या आज येथे झालेल्या बैठकीत व्याजदर एक टक्क्याने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
विश्वस्त मंडळाच्या या निर्णयामुळे १६०० कोटी रूपयांची तफावत निर्माण होणार आहे. ही तफावत ईपीएफओच्या व्याजातून दूर करण्यात येणार आहे. केंद्रीय श्रममंत्री मल्लिकार्जुन खडगे यांच्या अध्यक्षतेखालील विश्वस्त मंडळाने केलेल्या शिफारशी लवकरच अर्थ मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. कर्मचारी भविष्य निधीच्या व्याजदराची घोषणा करण्याचा अधिकार अर्थ मंत्रालयालाच असून, विश्वस्त मंडळाच्या शिफारशी सर्वसाधारणपणे अर्थमंत्रालय मान्य करते.

नटरंग,"थ्री इडियटस्'ची राष्ट्रीय पुरस्कारांत बाजी

अमिताभ आजही शहेनशहा

नवी दिल्ली, दि. १५ - भारतीय चित्रपट सृष्टीत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ५७ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली, त्यात मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान "नटरंग' ला मिळाला, तर सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपट म्हणून बहुचर्चित "थ्री इडियटस्' ने पुरस्कार पटकावला. "पा'मधील भूमिकेबद्दल सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवून आपण आजही चित्रपटसृष्टीचे शहेनशहा असल्याचे दाखवून दिले.
अतुल कुलकर्णीचा समर्थ अभिनय,अजय-अतुलचे अफलातून संगीत, त्यावरची तितकीच बहारदार नृत्ये आणि दमदार कथानक, या जोरावर मराठी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या "नटरंग' ने आज आपला अस्सल मराठमोळा रंग दाखवला. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा बहुमान "नटरंग' ने पटकावला आणि मराठी लोकसंगीताची तुतारी राजधानीत दुमदुमली.
बॉलिवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन यांनी यंदा तिसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. "अग्निपथ' आणि 'हम' नंतर "पा' या चित्रपटातील दणदणीत अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.याच चित्रपटातील भूमिकेसाठी अरुंधती नाग यांनी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. फारुख शेख यांच्या "लाहोर'मधील भूमिकेलाही परीक्षकांनी दाद दिली असून सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता म्हणून त्यांची निवड झाली आहे.
रॅंचो, त्याचे मित्र, चतूर आणि विरू सहस्रबुद्धे यांनी सिनेप्रेमींना हसवले, रडवले, अक्षरशः वेड लावले, त्या "थ्री इडियट्स'च्या भन्नाट लोकप्रियतेची प्रचिती राष्ट्रीय पुरस्कारांमध्येही आली. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट निर्मिती या तीन पुरस्कारांवर आपले नाव कोरले. तसेच,"बेहती हवा सा था वो'या गाण्यासाठी स्वानंद किरकिरे सर्वोत्कृष्ट गीतकार ठरले. अनुराग कश्यपच्या देव-डी या चित्रपटाचा संगीतकार अमित त्रिवेदीने इतर संगीतकारांना मागे टाकलं. श्याम बेनेगल यांचा "वेल डन अब्बा' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट ठरला, तर ओमप्रकाश मेहरांच्या "दिल्ली-६'ने राष्ट्रीय एकता पुरस्कार पटकावला.
"कुट्टी श्रांक' या मल्याळम चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारावर मोहर उमटवली. त्याशिवाय सिनेमॅटोग्राफी, पटकथा आणि वेशभूषा या गटातही त्यानेच बाजी मारली 'अबोहोमान' या बंगाली सिनेमाची नायिका अनन्या चॅटर्जी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली, तर ऋतुपर्णो घोष सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या पुरस्काराचा मानकरी ठरला. परीक्षक मंडळाचे प्रमुख रमेश सिप्पी यांनी नवी दिल्लीत या सर्व पुरस्कारांची घोषणा केली.

सर्व कॅसिनो मांडवीतच राहणार

तीन कॅसिनो आता रायबंदरला
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी) - मांडवी नदी सोडून जाण्याचा राज्य सरकारच्या आदेशाला कॅसिनोवाले नमले नसल्याने अखेर सरकारनेच नमते घेत मांडवी नदीतच या तरंगत्या कॅसिनोंना राहण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र या सात तरंगत्या कॅसिनोंपैकी ३ कॅसिनो रायबंदर या ठिकाणी तर दोन कॅसिनो पणजी व दोन बेतीच्या बाजूला ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
मांडवी नदीतच विविध ठिकाणी हे कॅसिनो आता उभे करून ठेवले जाणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले. हा निर्णय दि. १७ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला कळवला जाणार आहे. या तरंगत्या कॅसिनोबाबत त्वरित निर्णय घेऊन न्यायालयाला कळवण्याचे आदेश गोवा खंडपीठाने दिले होते. सध्या मांडवी नदीत "काराव्हेला', "रियो', अरेबियन सि किंग, "सॅम डॉमिनो', "प्राईड ऑफ गोवा', "बोआ सोर्टे' व "कॅसिनो रॉयल' हे सात तरंगते कॅसिनो नांगर टाकून आहेत.
यापूर्वी मांडवीत एकमेव तरंगते कॅसिनो जहाज होते. आता सात कॅसिनोंचा जमावडा आसपास आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारी करणारे ट्रॉलर, खनिज वाहतूक करणारी जहाजे तसेच पर्यटकांना जलसफरीवर नेणाऱ्या "क्रुझ' व प्रवासी फेरीबोटींनाही जलमार्गावरील वाहतुकीसाठी अडचण निर्माण होत आहे. े कधीही अपघात होण्याची शक्यता व्यक्त करून येथून हे जहाज हटवण्यासाठी न्यायालयात याचिका सादर करण्यात आली होती. तसेच, काही संघटनांनीही मांडवी नदीत कॅसिनो जहाज उभे करण्यास विरोध केला होता.
तरंगत्या कॅसिनोला परवाना देण्यापूर्वीच त्यांना जागा निश्चित करून दिली नसल्याने गोवा खंडपीठाने राज्य सरकारवर ताशेरे ओढल्याने मांडवी नदीत नांगरून ठेवलेल्या या तरंगत्या कॅसिनोंना आग्वाद येथील खोल समुद्रात जाण्याचे आदेश सर्व कॅसिनो कंपन्यांना सरकारने दिले होते. या आदेशाला कॅसिनो मालकांनी वाटाण्याच्या अक्षता लावून सरकारच्या या आदेशाला "एम व्ही द लीला' या कॅसिनो जहाज मालकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते.
अखेर राज्य सरकारलाच नमते घ्यावे लागले असून मंत्रिमंडळानेच हे कॅसिनो मांडवी नदीतच ठेवण्याचा निर्णयाला संमती दिली आहे. काहींची जागा बदली तरी, हे सर्व तरंगते कॅसिनो आता मांडवी नदीतच पाहायला मिळणार आहेत.

वाळवंटी नदीत बुडून दोन मुलींचा मृत्यू

वाळपई, दि. १५ (प्रतिनिधी) - वाळपई वांते येथे काल (दि.१४) संध्या. ६.३० तच्या दरम्यान श्रुती दुर्गाप्पा लमाणी (८) व सरोजा रामाप्पा लमाणी (७) या कामगारांच्या मुली वाळवंटी नदीवर आंघोळीसाठी गेल्या असता पाय घसरून नदीत पडल्या. त्यामुळे दोन्ही मुलींचा मृत्यू झाला. आज सकाळी राजेंद्र सीताराम गावकर या इसमास या मुलींचे मृतदेह तरंगताना दिसले. वाळपई पोलिसांना याची तात्काळ माहिती त्यांनी दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. निरीक्षक नारायण परवार यांनी पंचनामा केला. गोमेकॉत दोन्ही मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवण्यात आले आहेत.

ग्रामीण भागांतही आता सार्वजनिक गणेशोत्सव

- शैलैश तिवरेकर
पणजी, दि. १४ - सामाजिक विकासाकरिता सर्व धर्मातील लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रातून सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आता गोव्यातूनही मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला आहे. आता हा उत्सव शहरी भागांपुरताच मर्यादित राहिलेला नाही, तर ग्रामीण भागांतही त्याची संख्या वाढत चालली आहे.
सबंध गोव्यात एकूण १८१ सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात. त्यातील ९७ उत्तर गोव्यात, ८४ दक्षिण गोव्यात. त्यातील उत्तर गोव्यात पणजी पोलिस क्षेत्रात ६, जुने गोवा पोलिस क्षेत्रात ११, आगशी पोलिस क्षेत्रात ५, म्हापसा पोलिस क्षेत्रात ८, हणजुणे पोलिस क्षेत्रात २, पेडणे पोलिस क्षेत्रात १०, पर्वरी पोलिस क्षेत्रात ६, कळंगुट पोलिस अखत्यारीत ३, फोंडा पोलिस क्षेत्रात ३३, कुळे पोलिस क्षेत्रात १, वाळपई पोलिस क्षेत्रात ३, तर डिचोली पोलिस क्षेत्रात ९ सार्वजनिक गणपतींचा समावेश आहे, तर दक्षिण गोव्यातील मडगाव विभागात २९, केपे विभागात ३० तर वास्को विभागात २५ असे आहेत.
गोव्यातील सार्वजनिक गणेशोत्सव आता शहरांपुरतेच मर्यादित राहिले नाहीत. पणजी, मडगाव, फोंडा, म्हापसा, वास्को, डिचोली, पेडणे, काणकोण, कुडचडे, वाळपई या प्रमुख शहराव्यतिरिक्त आता फातर्पा, म्हार्दोळ, कुंडई, खोर्ली, कुठ्ठाळी, फातोर्डा, बोरी, मंडूर, नेत्रावळी, वालकिणी, भाटी, धारगळ, पालये, पर्वरी, केरी अशा ग्रामीण भागातही सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होतात.
म्हापसा शहरात मध्यवर्ती ठिकाणी होणारा सार्वजनिक गणेशोत्सव गोव्यातील सर्वांत जुना मानला जातो. सांगे, मडगाव पिंपळ कट्ट्यावरील गणेशोत्सवालाही बरीच वर्षे झाली आहेत फोंड्यातील जुन्या मामलेदार कार्यालयानजीकचा गणपती हा सर्वांत आधीचा पण आता झरेश्वर (बसस्थानक) फोंडा बाजार, ढवळी, कवळे, रथामाळ इत्यादी चारपाच ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होऊ लागले आहेत. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे तो हिंदूपुरता मर्यादित नाही. ख्रिश्चन, मुस्लिम असे इतर धर्मीयही त्यात भक्तीभावाने सहभागी होतात.
गजाननाची भक्ती गोव्यात फार पूर्वीपासून प्रचलित आहे.. तथापि त्या मानाने गणपतीच्या मंदिरांची संख्या मात्र मोजकीच म्हणावी लागेल. सर्वांत प्राचीन मंदिर आहे ते माशेलनजीक खांडोळा गावात. ते गणपती मंदिर प्रारंभी दिवाडी बेटावर नावेली येथे होते, पण पोर्तुगीज बाटाबाटीच्या काळात खांडेपार फोंडा येथे त्याचे स्थलांतर झाले. बऱ्याच वर्षानंतर हे मंदिर खांडोळ्याला नेण्यात आले. श्री गणेशाविषयी गोंयकारांच्या मनात असलेल्या भक्तीचे मोजमाप मंदिराच्या संख्येवरून होत नाही, प्रत्येक गोमंतकीयांचे हृदय हेच गणेशाचे वास्तविक मंदिर आहे.

दक्षिण आशिया चित्रपट महोत्सव उद्यापासून

आठ देशांचा सहभाग ५० चित्रपटांचे प्रदर्शन

पणजी पत्रपरिषदेत मुख्यमंत्र्यांची माहिती


पणजी, दि. १५ (सांस्कृतिक प्रतिनिधी) - दक्षिण आशिया चित्रपट महोत्सव (सॅफ) शुक्रवार दि. १७ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान गोव्यात होणार आहे. सदर महोत्सवात एकूण ५० चित्रपट कला अकादमी, मॅकॅनीझ पॅलेस येथे प्रदर्शित करण्यात येणार असून आशिया खंडातील नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, मालदीव, पाकिस्तान, भूतान आणि भारत अशा आठ देशांचा या महोत्सवात सहभाग असणार आहे. १७ रोजी संध्याकाळी ५ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आणि अफगाणिस्तानच्या "ऍन ऍपल फ्रॅाम पॅराडाइज' या चित्रपटाने महोत्सवाला सुरुवात होणार असल्याचे आज (दि.१५) पणजी येथील मेकानीझ पॅलेस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत मनोज श्रीवास्तव, दक्षिण आशिया फाऊंडेशनचे सचिव राहुल बरूआ, पेडण्याचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू, दिग्दर्शक नागेश कुकुनुर आणि रमिझा अख्तर उपस्थित होत्या.
तिसऱ्यांदा गोव्यात होणारा आणि तीन दिवस चालणारा सॅफ चित्रपट महोत्सव गोवा कला अकादमी, गोवा मनोरंजन संस्था आणि दक्षिण आशिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. देशादेशांतील सीमा नष्ट करून प्रेम आणि एकात्मतेचा संदेश जगभर पोहोचविण्याकरिता चित्रपट हे एकमेव चांगले माध्यम असल्याने तोच प्रयत्न या महोत्सवातून करण्याचे योजिले असल्याचे सचिव बरूणा यांनी सांगितले. सदर महोत्सवात शास्त्रीय चित्रपट, लघुपट, माहितीपट आणि मोठे चित्रपट असे विविध विभागातील चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असून आशिया खंडातील चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लागणार आहे. त्यात प्रामुख्याने राकेश मेहता, सुमित्रा पॅरीस, अब्दुल फताह, दाऊद वाहब, मोरशेदूल इस्लाम, म्हाहीन झीआ, नामगे रेट्टी आणि इतर कलाकार दिग्दर्शकांची उपस्थिती लाभणार आहे.
आजपर्यंत भारताबाहेरील देशांचे बाहेरील रूप आपण पाहत आहोत परंतु अशा महोत्सवातून प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटातून अफगाणिस्तान आणि इतर देशातील खरी स्थिती काय आहे हे पाहण्याची संधी मिळणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवामुळे गोवेकरांना चित्रपटांची चांगलीच मेजवानी मिळणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Wednesday, 15 September 2010

बेकायदा खाणींविरोधात पर्यावरण मंत्री आक्रमक

खाण खात्यासमोर आव्हान!
-६२ खाणमालकांना नव्याने नोटिसा
-प्रदूषण नियंत्रण खाते सक्रिय
-वन खात्याकडून असहकार्य

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): केंद्रीय पर्यावरण व वन राज्यमंत्री जयराम रमेश यांच्या पावलावर पाऊल ठेवून राज्याचे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनीही राज्यातील बेकायदा खाणीविरोधात जोरदार मोहीम सुरू करण्याचे ठरवले आहे. आलेक्स सिक्वेरा यांच्या या पवित्र्यामुळे खाणमंत्री तथा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासमोर जोरदार आव्हान उभे राहिले असून राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाविरोधात सिक्वेरा यांचा कडक पवित्रा व आता बेकायदा खाणीविरोधात त्यांनी आरंभलेली मोहीम यामुळे ते कामत यांच्यासाठी डोकेदुखी ठरत असून त्यांना आवरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील काही वरिष्ठ नेत्यांमार्फत त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न चालवल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत बेकायदा खाण व्यवसायाविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. राज्यात सध्या कार्यरत असलेल्या ११० खाणींपैकी सुमारे ६२ खाण व्यावसायिकांकडे आवश्यक परवाने नाहीत तसेच जल व वायू प्रदूषणाचे दाखलेही त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळवले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या ६२ खाण कंपनींना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अलीकडेच नव्याने नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. राज्यात खाण व्यवसायाने वनक्षेत्र व अभयारण्य क्षेत्रातही घुसखोरी चालवल्याने त्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने वन खात्याकडून स्पष्टीकरण मागितल्याचीही खबर आहे. वन खाते मात्र खाण व्यावसायिकांचे मांडलिक बनल्यागत प्रदूषण नियंत्रण मंडळाला सहकार्य करीत नसल्याची खबर वरिष्ठ सूत्रांनी दिली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डॉ. सायमन डिसोझा यांना याबाबतीत विचारले असता त्यांनी वन खात्याच्या आडमुठेपणाच्या भूमिकेला दुजोरा दिला. आत्तापर्यंत वन खात्याला पाठवलेल्या एकाही पत्राला खात्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, असे ते म्हणाले. वनक्षेत्र किंवा अभयारण्य क्षेत्रात कोणत्याही पद्धतीत खाण व्यवसायाला थारा देणार नाही, असे आश्वासन पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी विधानसभेत दिले होते. श्री.सिक्वेरा यांनी आपले आश्वासन पाळण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. वनक्षेत्र व अभयारण्य क्षेत्रात अतिक्रमण केलेल्या खाणींची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाने वन खात्याकडे मागितली आहे, परंतु ही माहिती देण्यास मात्र वन खाते चालढकलपणा करीत असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिसा पाठवलेल्या ६२ खाण कंपनीपैकी पहिल्या टप्प्यातील २६ खाण कंपन्यांनी आवश्यक कागदपत्रे मंडळाकडे सुपूर्द केली आहेत व त्यांची पडताळणी सुरू आहे. उर्वरित २६ खाण कंपन्यांची येत्या २१ रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती डॉ. डिसोझा यांनी दिली. बेकायदा खाण व्यवसायावर अंकुश ठेवायचा असल्यास त्यात वन खाते, खाण खाते व पर्यावरण खाते यांनी एकत्रितपणे काम केले तरच हे शक्य आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, गेल्या काही काळापूर्वी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी बेकायदा खाण व्यवसायावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळही खडबडून जागे झाले होते. मागील काळात एकूण १३ खाणींचे व्यवहार मंडळाने स्थगित ठेवले होते व इतर ७४ खाणींना वन संरक्षण कायद्याअंतर्गत वन व अभयारण्य दाखला सुपूर्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटिसाही जारी केल्या होत्या. या कारवाईमुळे खाण मालकांत एकच खळबळ उडाली होती. कालांतराने खाण मालकांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना पुढे करून ही कारवाई रोखली होती. आता बेकायदा खाण व्यवसायाविरोधात राष्ट्रीय स्तरावरही जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी कर्नाटक व ओरिसा राज्यातील बेकायदा खाणीविरोधात जोरदार मोहीम उघडल्याने व त्यात कॉंग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांनीही ओरिसातील आदिवासींच्या खाण विरोधी आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्याने राज्याचे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा हे देखील बेकायदा खाणीविरोधात कारवाईसाठी पुढे सरसावले आहेत. गत विधानसभा अधिवेशनात प्राप्त झालेल्या माहितीनुसार सुमारे १२ खाणी अभयारण्य क्षेत्राच्या कार्यक्षेत्रात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यात सेझा गोवा, शांतीलाल खुशालदास ब्रदर्स, दामोदर मंगलजी आदी बड्या खाण कंपन्यांचा समावेश आहे. नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील ६० लाख चौरसमीटर वनक्षेत्राची जागा सांगेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडून खाजगी जमिनीत रूपांतरित केल्याचे प्रकरणही वादात सापडले आहे. प्रधान वनपाल शशीकुमार यांनी २६ फेब्रुवारी २००९ रोजी तत्कालीन मुख्य सचिव जे. पी. सिंग यांना पाठवलेल्या पत्रांत दिलेली माहिती धक्कादायकच ठरली होती. या पत्रांत महसूल खात्याच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात सरकारी व वनक्षेत्रातील जमीन खाजगी मालमत्तेत रूपांतरित करून तिथे खाणी सुरू करण्याचे प्रकार घडत असल्याचे नमूद करण्यात आले होते. केपे तालुक्यातील नाकेरी गावातील राखीव वनक्षेत्राची जागा खाजगी जमिनीत रूपांतरित करण्याच्या प्रकाराबरोबर नेत्रावळी वनक्षेत्रातील सुमारे पंचेचाळीस लाख चौरसमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणातील वनखात्याच्या जमिनीवर "तिंबलो इरमांव प्रा.ली' या कंपनीकडून दावा करण्याचेही प्रकरण बरेच गाजत आहे.

पूरग्रस्त निधी घोटाळ्याची तक्रार राष्ट्रवादी नोंदविणार

कॉंग्रेस-राष्ट्रवादीत रंगतोय कलगीतुरा
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): युवक कॉंग्रेसकडून काणकोण पूरग्रस्तांसाठी जमवलेल्या मदतनिधीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. याप्रकरणी संबंधित अधिकारिणीकडे तक्रार दाखल करण्याचा एकमुखी ठराव आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारी समितीने संमत केला. गणेश चतुर्थीच्या काळात या घोटाळ्यासंबंधीचे पुरावे गोळा करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याने येत्या काळात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात बराच कलगीतुरा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी व कॉंग्रेस हे घटक पक्ष जरी असले तरी याचा अर्थ सहकारी पक्षाने घटक पक्षाच्या गैरव्यवहारांबाबत मौन धारण करणे असे अजिबात नाही. शेवटी सत्य काय ते चौकशीअंती उघड होईलच, अशी परखड प्रतिक्रिया पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी तथा राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश बिनसाळे यांनी "गोवादूत' शीे बोलताना व्यक्त केली. आज येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीची बैठक झाली. या बैठकीला काही मोजकेच पदाधिकारी हजर होते. युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांच्यावर केलेली बेताल टीका व वैयक्तिक आरोपांची गंभीर दखल यावेळी कार्यकारी समितीने घेतली. घटक पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांवर आघाडीतीलच सहकारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याने तोंड सोडून बोलणे ही चांगली गोष्ट नाही. संकल्प आमोणकर यांच्या जबानीला लगाम घालण्यासाठीही कॉंग्रेसकडून काहीही कृती घडली नसल्याने या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. आता ठोशास ठोसा म्हणून युवक कॉंग्रेसने काणकोण पूरग्रस्तांच्या नावे जमवलेल्या निधीतील घोटाळ्याचे कोलीत पकडून कॉंग्रेसला नामोहरम करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. युवक कॉंग्रेस ही कॉंग्रेस पक्षाचीच संघटनात्मक शाखा आहे व त्यामुळे या प्रकरणी एका दगडात दोन पक्षी मारण्याचाही राष्ट्रवादीचा होरा आहे.
दरम्यान, आज झालेल्या कार्यकारी समितीच्या या निर्णयांची माहिती पक्षाचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी दिली. राज्यात कॉंग्रेस आघाडी सरकारची सत्ता आहे व त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस हा घटक पक्ष आहे. आपल्याच सहकारी पक्षाविरोधात एखादा निर्णय घेताना त्यासंबंधी श्रेष्ठींची परवानगी घेणे सोयीस्कर ठरेल, असा विचारही या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी मांडला. यावेळी पक्षाचे प्रभारी तथा राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश बिनसाळे यांच्याशी चर्चा करून त्यांची संमती घेण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली. प्रकाश बिनसाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या निर्णयामुळे आघाडीचे संबंध बिघडण्याची शक्यता त्यांनी नाकारली. आघाडी असली म्हणून सहकारी पक्षाने केलेल्या गैरप्रकारांना पाठीशी घालणे योग्य नाही. जर खरोखरच या व्यवहारांत काहीही अयोग्य नाही तर त्याचा उलगडा चौकशीअंती होईलच, असा टोलाही यावेळी श्री. बिनसाळे यांनी हाणला.
--------------------------------------------------------
तक्रार करूनच दाखवा : संकल्प आमोणकर
काणकोण पूरग्रस्त निधीत घोटाळा झालाच नाही व यात आपला काहीच संबंध नाही, त्यामुळे याप्रकरणी अजिबात चिंता करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने युवक कॉंग्रेसविरोधात संबंधित अधिकारिणीकडे तक्रार दाखल करण्याचा ठराव घेतल्याप्रकरणी संकल्प आमोणकर यांना विचारले असता, ते यापुढे या घोटाळ्याचे पुरावे गोळा करणार आहेत पण आपणाकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या घोटाळ्यांचे यापूर्वीच पुरावे तयार आहेत,असा प्रतिटोला श्री.आमोणकर यांनी हाणला.आपल्याविरोधात तक्रार दाखल कराच,असे आव्हान देत पुढील परिणामांना सामोरे जाण्याचीही तयारी ठेवा,असा इशाराही यावेळी श्री.आमोणकर यांनी दिला.

राज्यातील घोटाळ्यांची राज्यपालांकडून दखल

मुख्यमंत्री, मुख्यसचिव, पोलिस महासंचालकांशी चर्चा
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मुख्य सचिव संजय श्रीवास्तव व पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांच्यासोबत राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांची भेट घेऊन राज्यातील काही महत्त्वाच्या घटनांबाबत त्यांना अवगत केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार मिकी पाशेको यांच्यावर अलीकडेच सीबीआय, आयकर खाते आदींनी टाकलेले छापे, तसेच मनी लॉडरिंग प्रकरणी त्यांच्या भूमिकेबाबत निर्माण झालेला संशय याबाबतीतही मुख्य सचिव व पोलिस महासंचालक यांनी राज्यपालांना माहिती दिल्याचेही कळते.या बैठकीत ड्रग प्रकरणाच्या चौकशीचा अहवालही राज्यपालांनी या व्दयींकडे मागितल्याची खबर आहे."अटाला'या ड्रग प्रकरणातील मुख्य संशयिताचे बेपत्ता होणे व त्यानंतर सरकारकडून करण्यात आलेल्या वक्तव्यांची गंभीर दखलही राज्यपालांनी घेतल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते.
या बैठकीबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री कामत यांनी ही नियमित बैठक असल्याचे सांगितले. या बैठकीतील विषयांबाबत आपण बोलणे अयोग्य ठरेल. त्याबाबत राज्यपालांचे कार्यालय किंवा मुख्यमंत्र्यांनाच विचारा, असे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्याकडून सांगण्यात आल्याने या बैठकीत काही महत्त्वाचे विषय चर्चेला आल्याचा कयास बांधला जात आहे.
दरम्यान, आज सकाळी "एनएसयुआय' या कॉंग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल डॉ.सिद्धू यांची भेट घेतली. पोलिसांच्या आशीर्वादाने व राजकीय दबावाखाली ड्रग व्यवहार प्रकरणाची चौकशी दडपण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असून त्याची चौकशी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग(सीबीआय)कडे सोपवण्याची विनंती या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली. या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री, मुख्य सचिव व पोलिस महासंचालक राजभवनवर गेल्याची वार्ता पसरल्याने ड्रग प्रकरणावरूनच राज्यपालांनी यांना पाचारण केल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. दरम्यान, मुख्यमंत्री कामत यांनी काही पत्रकारांशी बोलताना ही नियमित बैठक असल्याचे सांगितले. मुख्य सचिव व पोलिस महासंचालक हे आपल्या भेटीचा भाग नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी एका पत्रकाराला सांगितल्याने या बैठकीवरूनच संशय बळावला आहे.

सराफी दुकानाच्या भिंतीला भोक पाडले, दोघांना अटक

चोरीचा प्रयत्न विफल
मडगाव दि.१४ (प्रतिनिधी): काल रात्री उशीरा येथील नव्या बाजारातील एक सराफी दुकानाच्या भिंतीला भोक पाडून तेथे चोरी करण्याचा दोघा चोरट्याचा प्रयत्न तेथील सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे फसला व त्यामुळे दुकानातील सुमारे ८७ लाखांचे सुवर्णालंकार सुरक्षित राहिले. मडगाव पोलिसांनी त्यानंतर त्वरीत हालचाल करून दोघांना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल उत्तररात्री पवन रायकर यांच्या "विपारी वर्ल्ड ऑफ गोल्ड 'या सराफी दुकानाबाहेर काही आक्षेपार्ह सामान पाहून व आवाज ऐकून तेथील सुरक्षा रक्षकाला संशय आला व त्याने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस उपनिरीक्षक वळवईकर व रवी देसाई हे त्वरीत आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावून आले व त्यांनी शोधाशोध केली असता दोघे जण सदर दुकानाबाहेरील भिंतीला भोक पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांना आढळून आले. पोलिसांना पाहून एकटा पळून जाण्यास यशस्वी ठरला तर दुसऱ्याला पोलिसांनी पकडले.
नंतर त्याला उचलून पोलिस स्टेशनवर आणले असता, आपले नाव राजकुमार चौधरी असून तो मूळ बिहारमधील पण सध्या मुंबईत असल्याचे सांगितले. त्याला वदविले असता त्याने कोलवा येथील एका हॉटेलकडे बोट दाखविले. पोलिसांनी लगेच आपला मोर्चा तिकडे वळविला व तेथील खोलीत लपून बसलेल्या विजयसिंग याला ताब्यात घेतले. तो वाराणसीतील आहे पण सध्या मुंबईत होता. ते उभयता गणेशचतुर्थीचा मोका साधून चोरी करण्याच्या मिषाने गोव्यात आले होते व कोलवा येथील हॉटेलांत उतरले होते. पोलिसांनी उभयतांना कोर्टात उभे करून ७ दिवसांच्या रिमांडवर घेतले आहे.
कालच पोलिसांनी यंदांची गणेशचतुर्थी निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल सुस्कारा सोडला होता व त्या पाठोपाठ काल रात्री चोरीचा हा बेत सफल झाला असता तर पोलिस खात्यासाठी तो मोठा हादरा ठरला असता.

कायदेशीर संरक्षणाची सशस्त्र दलांना गरज

वायुसेनाप्रमुखांनी बजावले
नवी दिल्ली, दि. १४ : जम्मू-काश्मिरात लष्कराला दिलेला विशेषाधिकार काढून घेण्याच्या मुद्यावर केंद्र सरकार संभ्रमात पडले असतानाच, देशात सशस्त्र दलांना कायदेशीर संरक्षणाची नितांत गरज आहे, असे वायुसेनाप्रमुख पी. व्ही. नाईक यांनी आज स्पष्टपणे सांगितले आहे.
एखाद्या जवानाने प्रभावीपणे आपले कर्तव्य पार पाडावे असे वाटत असेल तर त्याला कायद्याचे पूर्ण संरक्षण प्राप्त झाले पाहिजे. आमच्या या भावनांची सरकारला जाणीव आहे आणि सरकार यासंबंधी योग्य तो निर्णय करेल, असा विश्वास चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष असलेल्या नाईक यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. लष्कराला दिलेला विशेषाधिकार पूर्णपणे मागे घेणे किंवा सौम्य करणे याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. मात्र, या मुद्यावर केंद्रीय मंत्रिमंडळात एकमत नसल्याने कालच्या मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होऊ शकला नाही.
याबाबत कालच्या बैठकीत सरकार अंतिम निर्णय का घेऊ शकले नाही, असे याच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या संरक्षणमंत्री ए. के. ऍण्टोनी यांना विचारले असता, अशाप्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय सर्व बाबींचा योग्य तो विचार केल्यानंतरच घेतले जात असतात, असे त्यांनी सांगितले.

केंद्रातील संपुआ सरकार कणाहीन आणि निष्क्रिय

काश्मिरप्रश्नी अडवाणी कडाडले
नवी दिल्ली, दि. १४ : काश्मीरमधील वाढत्या हिंसेवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले असतानाच, आज भाजपने आपली भूमिका स्पष्ट करताना, कणाहीन आणि निष्क्रिय संपुआ सरकारमुळे आजची स्थिती निर्माण झाल्याचे म्हटले आहे. आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट या कायद्यात कोणतीही दुरुस्ती करून तो शिथिल करण्याला भाजप कडाडून विरोध करील, असे आज स्पष्ट करण्यात आले.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज पक्षप्रवक्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षाची ठोस भूमिका जनतेपर्यंत नेण्याचे आवाहन केले. सध्या देशातील स्थिती खालावली असून, काश्मिरात तर कायदा व सुव्यवस्था रसातळाला गेल्याचे सांगून, अडवाणी यांनी काश्मीरमध्ये सरकार नावाची चीजच राहिलेली नाही, अशी टीका केली. फुटीरतावाद्यांसमोर राज्य सरकारने लोटांगण घातल्याचे चित्र सध्या दिसते आहे, असे ते म्हणाले. पाकपुरस्कृत दहशतवाद्यांपुढे केंद्र सरकार नांगी टाकेल, असा भाजपचा कयास खरा ठरत असल्याचे सांगून, फुटीरतावाद्यांना धडा शिकविण्याऐवजी "राजकीय तोडग्या'ची भाषा बोलली जात आहे. सशस्त्र दलांना अधिकार देणारा कायदा मागे घेणे अथवा त्यात दुरुस्ती करणे म्हणजे पाकिस्तानच्या कटाला बळी पडण्यासारखे आहे, असे ते म्हणाले. भाजपच्या प्रयत्नांमुळेच तेथील सशस्त्र दलांना १९५३ पासून अधिक अधिकार मिळत गेले. आता त्याबाबत माघार घेणे अनुचित आहे, असे अडवाणी यांनी सांगितले.

Tuesday, 14 September 2010

शिवोली, पणजीतही ते घालणार होते दरोडे!

टोळीच्या म्होरक्याकडून धक्कादायक माहिती उघड
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): संपूर्ण गोव्यात दहशत माजवण्यासाठीच मायकल फर्नांडिस याने "गॅंग' बनवली होती. ऐन चतुर्थीच्या काळात शिवोली, तसेच पणजीतील काही बंगल्यांवर दरोडे टाकून करोडो रुपयांची मालमत्ता चोरण्याचा त्यांचा डाव होता. त्यासाठी त्यांनी काही बंगल्यांचे रीतसर सर्वेक्षण करून आराखडाही आखला होता. गरज पडल्यास विरोध करणाऱ्यांची हत्या करून हे दरोडे सफल करायचे, याच उद्देशाने इंदूर येथे जाऊन रिव्हॉल्वरची खरेदीही केली होती. मात्र, त्यांचे हे मनसुबे पूर्ण होण्यापूर्वीच ही टोळी गजाआड झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
चार महिन्यांपूर्वी ही "गॅंग' बनवण्यासाठी मायकल यांनी प्रयत्न सुरू केले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. एका राजकीय व्यक्तीचा नातलग असलेला मायकल हा गुन्हेगारी वृत्तीचा असल्याने काही वर्षापूर्वी त्याला घरातून हाकलण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या अट्टल गुन्हेगाराचे डाव उघडकीस आल्याने त्यांच्याकडून मिळत असलेली माहिती ऐकून पोलिसही थक्क झाले आहेत. शिवोली येथील अनेक बंगले त्यांच्या निशाण्यांवर होते. त्यासाठी त्यांनी गेल्या काही दिवसापासून शिवोली येथे मुक्काम ठोकला होता.
चतुर्थीचा लाभ उठविण्याचा इरादा!
गणेश चतुर्थीला काही लोक आपले घर बंद ठेवून अन्य ठिकाणी जात असल्याने त्याचाच फायदा उठवून हे दरोडे टाकण्याचा बेत आखला होता, अशी माहिती मायकल याच्याकडून पोलिसांना मिळाली आहे. आतापर्यंत या टोळीने एक खून आणि चार दरोडे टाकले असल्याची माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तीन रिव्हॉल्वर आणि २३ राऊंड बुलेट जप्त केले आहे. यातील दोन राऊंड बुलेट त्यांनी गोळी झाडण्याची प्रात्यक्षिक करण्यासाठी वापरले आहेत. वास्को येथील बोगमाळो किनाऱ्यावर त्यांनी "सुलेमान' या तरुणाकडून गोळ्या झाडण्याचे प्रशिक्षण घेतल्याचेही तपासात उघड झाले आहे.
न्यायालयीन कोठडीत एकत्र आल्यावर तयार झालेल्या या टोळीसाठी लागणारी हत्यारे, रिव्हॉल्वर घेण्यासाठी त्यांना पैशांची गरज भासत होती. त्यामुळे पहाटे व सायंकाळच्यावेळी एकटे दुकट्या आढळून येणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी हिसकावण्याचे सत्र त्यांनी सुरू केले होते. त्याचप्रमाणे, बेळगाव येथील एका मित्राला हाताशी धरून दरोडा टाकला. यात त्यांच्या हाती आठ लाख रुपये लागले. येथून ते मौजमजा करण्यासाठी हैदराबाद येथे गेले. येथून गोव्यात परतत असताना भाड्याने क्वालीस गाडी केली. अंकोला येथे पोचल्यावर त्याचा वाहन चालकाचा गळा दाबून व डोक्यावर मोठा दगड घालून त्याला खून करण्यात आला. ती क्वालीस गाडी त्यांनी बेळगाव येथे एकाला ३५ हजार रुपयांना विकली असल्याची माहिती त्यांच्या तपासात बाहेर आली आहे.
----------------------------------------------------------
सोळा जणांची टोळी...
विविध गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असलेल्या तरुण गुन्हेगारांना बरोबर घेऊन ही टोळी बनवण्यात आली होती. सर्वांची गाठभेट ही न्यायालयीन कोठडीतच झाली होती. तेथेच सोळा जणांनी अशा प्रकारची टोळी बनवण्याचा निर्णय घेऊन बाहेर पडल्यावर ते या कामाला लागले होते. या टोळीद्वारे खून, धमक्या, खंडणी अशा प्रकारचे गुन्हे करण्याचा आराखडा त्यांनी आखला होता.

काश्मीरमध्ये हिंसेत १२ ठार; १० जखमी

श्रीनगर, दि. १३ : काश्मीर खोऱ्यात आज अनेक ठिकाणी संतप्त जमावाने हिंसक घटना घडवून आणल्या. जमावाने एका खाजगी शाळेला आग लावून दिली तसेच रेल्वेेसंपत्तीचे नुकसान केले.
श्रीनगर येथून ४५ किमी अंतरावरील बांदिपोरा जिल्ह्यातील अजास येथे सुरक्षा दलांवर जबर दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना नाईलाजाने गोळीबार करावा लागला. त्यात निसार अहमद भट नावाचा युवक ठार झाला, तर तीन जण जखमी झाले, असे पोलिस प्रवक्त्याने सांगितले. भटच्या मृत्यूने गेल्या ९५ दिवसांपासून खोऱ्यात सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ७२ लोक मृत्युमुखी पडले आहेत. आज एकाच दिवशी १२ जण मृत्युमुखी पडले.
सुरक्षा जवानांवर जबर दगडफेक करण्यापूर्वी प्रक्षुब्ध जमावाने रेल्वेची एक छोटी इमारत तसेच एका विशिष्ट समुदायाचे रिकामे घर जाळून टाकले. अनंतनाग जिल्ह्यातील खन्नाबल येथे दगडफेक करणाऱ्या जमावाचा पाठलाग करताना सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले तर अशाप्रकारची घटना पारिपोरा पोलिस ठाण्याजवळ घडली असता पोलिस गोळीबारात तेथे तीन जण जखमी झाले.
आणखी काही भागांत संचारबंदी लागू
दरम्यान, आज खोऱ्यातील काही भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्याने तसेच फुटीरतावाद्यांनी निषेध मोर्चाचे आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातील आणखी काही भागांत संचारबंदी लावण्यात आली आहे.
बडगाम जिल्ह्यातील काही भागांत तसेच पुलवामा जिल्ह्यातील तीन शहरांत खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी लावण्यात आली आहे, असे पोलिस प्रवक्त्याने सांगितले. बारामुल्ला जिल्ह्यातील संचारबंदीत आज सकाळी काही काळासाठी शिथिलता देण्यात आली परंतु त्यासाठी फार कडक निर्बंध लावण्यात आले. अशाच प्रकारचे निर्बंध पट्टान, गंदेरबाल व कुपवाडा शहरातही लावण्यात आले आहेत. सोनावार येथील संयुक्त राष्ट्र लष्करी निरीक्षक गटाच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याची योजना हुरियत नेत्यांनी आखली आहे. त्याकडे बघता या भागात जारी करण्यात आलेल्या संचारबंदीची अंमलबजावणी ही अतिशय कठोरतेेने केली जात आहे.

निवडणूक युती राहणार नसल्यानेच केंद्राकडून सीबीआयचा ससेमिरा : मिकी

मडगाव, दि. १३ (प्रतिनिधी): विदेशात बेकायदा पद्धतीने माणसे पाठविणे तसेच हवाला व्यवहाराच्या कथित आरोप प्रकरणी सीबीआय चौकशी सुरू झाल्याने त्रस्त बनलेले माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी, आपणामागे सीबीआय चौकशीचा ससेमिरा लावून देण्यामागे केंद्र सरकार असल्याचा आरोप केला असून आगामी निवडणुकात गोव्यातील सत्ताधारी युती टिकण्याची शक्यता नाही, असा अहवाल आयबीने सादर केल्यानंतरच हे चौकशीचे आदेश दिले गेले आहेत,असा दावा केला आहे.
गेल्या आठवड्यातील अमेरिकेतील व्हाईटहाऊसमधील सूत्रांचा हवाला देऊन प्रसिद्ध झालेली वृत्ते व त्यानंतर सीबीआय व नंतर आयकर अधिकाऱ्यांनी निवास व कार्यालयांवर छापे टाकून केलेल्या चैाकशीनंतर प्रथमच जाहीर कार्यक्रमात सहभागी झालेल्या माजी पर्यटनमंत्र्यांनी आपले सर्व व्यवहार कायदेशीर व पारदर्शी आहेत व त्याबाबतची सारी माहिती आपण संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे. सत्य काय ते बाहेर आल्यावर आपला या कथित प्रकरणाशी काहीच संबंध नाही ते दिसून येईल. आपणास त्रासदायक ठरणाऱ्याला खिंडीत पकडून त्याची, सतावणूक करायची ही कॉंग्रेसची जुनी कार्यपद्धत आहे व तिचा वापर सध्या आपणाविरुद्ध चालू आहे, ते म्हणाले.
कोलवा येथे आयोजित केलेल्या प्लास्टिकविरोधी मोहिमेला बावटा दाखवून त्यांनी प्रथम शुभारंभ केला व नंतर बाणावली येथे एका आंतरप्रभाग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे बाणावलीतील संभाव्य उमेदवार डॉ. ह्युबर्ट गोमीश, सरपंच कार्मेलीना फर्नांडिस,मॅथ्यू दिनीज, नावेलीतील संभाव्य उमेदवार आवर्तानो फर्नांडिस हेही उपस्थित होते.
गोव्यातील राजकीय स्थितीबाबतचा आयबी अहवाल दिल्लीत पोचल्यापासून केंद्र आपणास लक्ष्य बनवू लागलेले आहे व सदर सीबीआय चौकशीचे आदेश हा त्याचाच एक भाग आहे, असा आरोप माजी पर्यटनमंत्र्यांनी केला व म्हटले की पण अशा चौकशीची आपणास पर्वा नाही कारण शेवटी गोव्यातील लोकांनाच काय तो निर्णय घ्यावयाचा आहे. याप्रकरणी कोणाकडूनही तक्रार आलेली नसताना चौकशीच्या नावाखाली चाललेली सतावणूक कुणालाही कळण्यासारखी आहे. यास्तव लोकांनीच शेवटी आमदार व सरकार याबाबत काय तो निर्णय घ्यावयाचा आहे. सीबीआय चौकशीबाबत काहीही सांगण्याचे त्यांनी टाळले व सांगितले आपण स्वच्छ असल्याचे आपणास ठाऊक आहे.आपण अमेरिकेत २३ वर्षे घालवलेली आहेत व आर्थिक बाबीसंदर्भात आपण कोणतेच गैरकृत्य केलेले नाही. शेकडो गोमंतकीयांना आपण तेथे रोजगारासाठी पाठवले ते देखील संपूर्ण कायदेशीरपणे, पण त्यांना जर आपण काही बेकायदेशीर केले आहे, असे वाटत असेल तर परिणामांना तोंड देण्याची आपली तयारी आहे असे त्यांनी आव्हान दिले.

प्रियोळ येथे अपघात, वाहनचालक ठार

फोंडा, दि. १३ (प्रतिनिधी): फोंडा ते पणजी महामार्गावर कोने प्रियोळ येथे आज (दि.१३) संध्याकाळी सातच्या सुमारास मोटर सायकलला झालेल्या अपघातात मोटरसायकल चालक सुकोरो आगोस्तीन मिनेझीस (४२) याचे जागीच निधन झाले आहे.
मयत मोटर सायकल चालक सुकोरो मिनेझीस हा सांन्तइस्तेव येथील रहिवासी असून फोंडा येथून घरी जात असताना वाटेत कोने प्रियोळ येथे मारुती मंदिराजवळ अपघात झाला. मयत सुकोरो याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने जागीच निधन झाले. त्यांच्या जवळ सापडलेल्या कागदपत्रांवरून तसेच मोबाईलवरून पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. तो आखातात कामाला होता. अलीकडेच घरी परतला होता, अशी माहिती मिळाली आहे.
हा अपघात नेमका कसा झाला? याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नाही. अपघात मोटर सायकल घसरून झाली की मोटर सायकलला एखाद्या अज्ञात वाहनाने धडक दिली याबाबत अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही. अपघाताच्या वेळी पाऊस पडत असल्याने मोटर सायकल घसरून अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निरीक्षक सी.एल.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन लोकरे व उपनिरीक्षक लक्षी आमोणकर तपास करीत आहेत.

प्रदेश कॉंग्रेसचा ठराव ठरणार राहुल गांधींनाच चपराक!

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): कॉंग्रेसचे महासचिव राहुल गांधी कॉंग्रेस समित्यांची निवड लोकशाही पद्धतीनेच व्हावी, असा आग्रह एका बाजूला धरत असतानाच, गोवा प्रदेशचे अध्यक्ष कोण याचा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घ्यावा, असा ठराव प्रदेश कॉंग्रेस घेणार असल्याने राहुल गांधी यांच्या संघटनात्मक सुधारणांना चपराकच मिळाल्याचे दिसत आहे. गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक येत्या १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. या पदासाठी पक्षांतर्गत बरीच चुरस निर्माण झाल्याने प्रदेश कॉंग्रेस समितीने प्रदेशाध्यक्षपदाची निवड पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनीच करावी, असा एकमुखी ठराव संमत करण्याचा अलीकडेच घेतलेला निर्णय नव्या वादाला तोंड फोडणाराच ठरला आहे.
विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनाच प्रदेशाध्यक्षपदी ठेवण्यासाठी पक्षाचा एक गट सध्या बराच सक्रिय बनला आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही शिरोडकर यांच्यासाठी काही दिवसांपूर्वी दिल्लीत आपला शब्द घातल्याची माहिती प्राप्त झाल्याने शिरोडकर विरोध गटानेही प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक प्रतिष्ठेची बनवण्याचा चंगच बांधला आहे. पक्षातील हा गट प्रदेशाध्यक्षपद हे अल्पसंख्याक नेतृत्वाकडेच यायला हवे, असा हट्ट धरून शिरोडकर यांना अद्दल घडवण्यासाठी पुढे सरसावला आहे. या गटाने चालवलेल्या या प्रयत्नांमुळे शिरोडकर गटांत बरीच अस्वस्थता पसरली आहे. "धरले तर चावते व सोडले तर पळते', अशी केविलवाणी अवस्था त्यांची बनली आहे. अल्पसंख्याक नेत्याची प्रदेशाध्यक्षपदी निवड होण्यास विरोध दर्शवला तर हा गट दुखावेल व त्याचा थेट परिणाम पक्षाच्या वोटबॅंकेवर पडेल, यासाठी हा वाद थेट श्रीमती सोनिया गांधी यांच्याकडेच टोलवून सोनियांचा आदेश शिरसावंद्य मानण्याची नामुष्की शिरोडकर गटावर ओढवली आहे. दरम्यान, प्रदेश कॉंग्रेसचा हा ठराव मात्र सध्या बराच चर्चेचा विषय बनला आहे. राष्ट्रीय कॉंग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांनी पक्षाअंतर्गत सर्व संघटनात्मक नेमणुका निवडणूक पद्धतीने होणार असल्याची घोषणा केली होती. "एनएसयुआय' या कॉंग्रेसकृत विद्यार्थी संघटनेच्या अलीकडेच निवडणुका घेण्यात आल्या व त्यात निवडणूक पद्धतीने या संघटनेच्या प्रमुखांची निवडही करण्यात आली. कॉंग्रेस पक्षात युवकांना प्रवेश करण्याचे आवाहन करून इथे कुणीही नेता बनू शकतो, असा भूलभुलैयाही त्यांच्याकडून सुरू आहे. गोवा प्रदेश कॉंग्रेस पक्षाने घेतलेल्या या कथित ठरावामुळे मात्र पक्षावर गांधी घराण्याचीच हुकमत चालते व या घराण्याच्या इशाऱ्यावरच हा पक्ष चालतो, यालाच पुष्टी मिळाल्याने राही नेत्यांनी या ठरावाला आक्षेप घेत त्याबाबत राहुल गांधी यांच्याकडे तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे.
प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांना आपल्या इच्छेला मुरड घालणे शक्य होत नसल्यानेच त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीचे अधिकार सोनिया गांधी यांना बहाल करण्याचा ठराव संमत केला,असा टोलाही पक्षाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने हाणला. सुभाष शिरोडकर यांना खरोखरच या पदाची आसक्ती नसती तर त्यांनीच खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या नावाची शिफारस दिल्लीत केली असती, परंतु प्रदेशाध्यक्षपद निवडीचे अधिकारी सोनिया गांधी यांच्याकडे दिल्याचे सांगून दिल्लीत मुख्यमंत्री कामत यांना घेऊन लॉबिंग करून हे पद परत मिळवण्यासाठी ते धडपडत आहेत, अशीही टीकाही या पदाधिकाऱ्याने केली. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पक्षाच्या राष्ट्रीय गोटात आपले जबरदस्त वजन प्राप्त केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात गोव्याला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी कामत यांनी आपले वजन वापरले तर सार्दिन यांची नक्कीच वर्णी लागणे शक्य आहे, अशी भावना पक्षातील काही पदाधिकाऱ्यांची बनली आहे. कामत हे जाणीवपूर्वक सार्दिन यांच्यासाठी प्रयत्न करीत नाही, अशी नाराजीही या गटात पसरल्याने त्याचा वचपा काढण्यासाठीच प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीत सुभाष शिरोडकर व मुख्यमंत्री कामत यांना खो देण्याचा कट या गटाने आखला आहे.

२-जी स्पेक्ट्रम घोटाळा

सुप्रीम कोर्टाची केंद्र, ए.राजा व सीबीआयला नोटीस
नवी दिल्ली, दि. १३ : २००८ मध्ये २-जी स्पेक्ट्रमच्या परवाना वाटपात झालेल्या कोट्यवधींच्या भ्रष्टाचार प्रकरणी सध्या सुरू असलेल्या सीबीआय चौकशीवर देखरेख ठेवण्याची मागणी करणाऱ्या एका याचिकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकार, केंद्रीय दूरसंचारमंत्री ए. राजा आणि सीबीआयला नोटीस बजावली आहे.
न्या. जी. एस. सिंघवी आणि न्या. ए. के. गांगुली यांच्या खंडपीठाने आज दूरसंचार मंत्रालय आणि ए. राजा यांना नोटीस बजावली असून, नोटिसीचे उत्तर देण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी दिला आहे. यासोबतच खंडपीठाने सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय आणि आयकर खात्यालाही नोटीस बजावली आहे. सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटीगेशन(सीपीआयएल) या सामाजिक संस्थेने याबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे.
२००८ मध्ये २-जी स्पेक्ट्रमच्या परवाना वाटपात झ्रालेल्या घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या सीबीआयमार्फत होत असलेल्या चौकशीवर देखरेख करावी, अशी मागणी करणारी या संस्थेने दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने २५ मे रोजी फेटाळून लावली होती.या घोटाळ्यात ए. राजा आणि इतरांचे साटंलोटं असल्याचे सिद्ध करणारे कागदपत्रं सादर केल्यानंतरही सीबीआय याची चौकशी करत नाही, असे प्रशांत भूषण यांनी सीपीआयएलतर्फे युक्तिवाद करताना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. ए. राजा मंत्री असलेल्या दूरसंचार खात्याने जानेवारी २००८ मध्ये २-जी स्पेक्ट्रमचे परवाने १२२ कंपन्यांना केवळ १६५८ कोटी एवढ्या कवडीमोल भावात दिले, असा आरोप या संघटनेने आपल्या याचिकेत केला आहे. ए. राजा यांनी जाहीर लिलाव करून २-जी स्पेक्ट्रमचे परवाने वाटणे अपेक्षित होते, असेही सीपीआयएलने आपल्या याचिकेत म्हटले होते.

Monday, 13 September 2010

'सरकार अस्थिर करणाऱ्या आमोणकरांना आता आवरा'

राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांचे कॉंग्रेसला साकडे
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संकल्प आमोणकर हे युतीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना त्वरित लगाम घालावा, अशी मागणी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री जुझे फिलीप डिसोझा यांनी केली. त्याचप्रमाणे, युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या खुर्चीवरून त्यांची त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणीही डिसोझा यांनी केली.
आज ते पणजीतील पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो, उल्हास नाईक व ऍड.अविनाश भोसले उपस्थित होते.
संकल्प आमोणकर यांनी चालवलेल्या प्रकारांची सर्व माहिती कॉंग्रेस पक्षाचे प्रभारी हरिप्रसाद, मुख्यमंत्री दिगंबर कामत व त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांना देण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यांचीही मागणीही केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दिल्लीतील श्रेष्ठींच्या अनेक चर्चेनंतर युतीचे सरकार बनले आहे. त्यावर कोणीही टीका करू शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले. महसूल मंत्री भ्रष्टाचारी असून त्यांच्या आशीर्वादाने वास्को येथे अनेक बेकायदा कामे चालतात. तसेच, महसूलमंत्री लोकांकडून पैसे घेऊन सरकारी नोकऱ्या देतात, असा आरोप श्री. आमोणकर यांनी केला आहे. तसेच, या सर्वांचा पुराव्यासह भांडाफोड केला जाणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला होता.
युवक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या आरोपप्रत्यारोप युद्धात आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी उडी घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेस चाळीसही मतदारसंघांत निवडणूक लढवेल, असे कधीही म्हटले नव्हते, आम्ही चाळीसही मतदारसंघांत पक्ष बळकट करणार आहोत, असे म्हटले होते. मात्र कॉंग्रेस पक्षाने त्याचा चुकीचा अर्थ काढला. या विषयावर आपण मुख्यमंत्री कामत आणि कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शिरोडकर यांच्याशीे चर्चा केली आहे. तसेच, गोव्याचे प्रभारी हरिप्रसाद यांच्याशी संकल्प यांच्याविरोधात तक्रार केली असल्याचे श्री. डिसोझा यांनी सांगितले.
"काणकोण रिलीफ फंड'च्या नावाने युवक कॉंग्रेसने प्रचंड मोठा घोटाळा केला आहे. ते दहा लाख रुपये कुठल्याच बॅंक खात्यात जमा झालेले नाहीत, असे स्पष्टीकरण खुद्द पक्षाचे उपाध्यक्ष एम के. शेख यांनी दिलेले आहे. त्यामुळे ते पैसे कुठे आहेत, असा प्रश्न जुझे डिसोझा यांनीही उपस्थित केला. या पैशांचे वाटप करण्यासाठी युवक कॉंग्रेस गोव्यावर आणखी आपत्ती येण्याची वाट पाहत आहेत का, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. कॉंग्रेस पक्षाने संकल्प आमोणकर यांना लगाम घातला नाही,तर तो मग आम्ही घालू, असेही ते यावेळी म्हणाले.
युवक कॉंग्रेसने काणकोण पूरग्रस्तांच्या नावाने केलेल्या घोटाळ्याची नक्कीच पोलिस तक्रार केली जाणार असून त्यांनी निधी गोळा करण्यासाठी छापलेली कुपने सध्या गोळा केली जात आहेत, कारण, केवळ कुपनेच हीच या घोटाळ्याचा पुरावा असल्याचे ट्रॉजन यांनी सांगितले.
-------------------------------------------------------------
ड्रगप्रकरणी राष्ट्रवादी नरम!
पोलिस-ड्रग माफिया साटेलोटे प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने नांगी टाकल्याचे आज उघड झाले. एक महिन्यापूर्वी केलेली त्या पक्षनेत्यांची वल्गना ही वाऱ्यातच विरली आहे. पोलिस ड्रग माफिया प्रकरण "सीबीआय'कडे देण्याची मागणी घेऊन राज्याचे तथा त्यांच्याच सरकारचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीने पत्रकार परिषदेत दिली होती. परंतु, एक महिना उलटला तरी अद्याप अशा प्रकारचे कोणतेही निवेदन राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांनी दिलेले नाही. याविषयी राष्ट्रवादीचे अध्यक्ष जुझे डिसोझा यांना विचारले असता, सध्या चतुर्थी असल्याने मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही. काही दिवसांत आम्ही त्यांची भेट घेणार आहोत, असे थातूरमातूर उत्तर त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे एका महिन्यापूर्वी याप्रकरणी ताठर भूमिका घेतल्याचा आव आणणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निवेदन सादर करण्यासाठी चतुर्थीपर्यंत थांबल्याने उपस्थित पत्रकारही अवाक झाले.

खड्ड्यात दुचाकी पडून तरूण ठार

म्हापसा, दि. १२ (प्रतिनिधी): चावडीवाडा, मार्ना शिवोली येथील रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी पडल्याने प्रेमानंद गोविंद आगरवाडेकर (३२) हा तरुण ठार झाला. ही घटना संध्याकाळी ७.३० च्या सुमारास घडली. आगरवाडेकर याला तातडीने आझिलोत नेण्यात आले,तथापि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
शिवोलीचे पोलिस हवालदार प्रताप देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमानंद हा ओशेल चौकी येथून आपली पत्नी व दीड वर्षाच्या मुलासह गणपती पाहायला निघाला होता. संध्याकाळी तो घरी परतत असताना, चावडी मार्ना क्लबजवळ रस्त्यावरील एक खड्ड्यात त्याची एक्टिव्हा क्रमांक जीए-०३-बी-८५८४ पडल्याने त्याचा तोल गेला. पत्नी व मुलगा फेकली गेली, तरी सुदैवाने बाचली मात्र प्रेमानंदचा त्या खड्ड्यानेच बळी घेतला. हा खड्डा दीड मीटर लांब व एक मीटर रुंद आहे. जिल्हा पंचायत सदस्य दीपक धारगळकर यांनी आपल्या गाडीतून प्रेमानंदला आझिलोत नेले, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. स्थानिक पंचायत आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे अनेक रस्ते मृत्युचे सापळे बनले आहेत.

'सीबीआय'कडून साराचीही चौकशी

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): बनावट "व्हिसा' द्वारे लोकांना विदेशात पाठवण्याच्या प्रकरणावरून माजी मंत्री मिकी पाशेको यांच्यानंतर त्यांची पहिली पत्नी सारा हिची काल तीन तास केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने चौकशी केली.
बांबोळी येथे सीबीआयच्या गोवा शाखा कार्यालयात दिल्लीतील सीबीआय अधिकाऱ्यांनी ही चौकशी केली. या चौकशीनंतर तीन तासांनी बाहेर आलेल्या सारा हिने आपल्याला काहीही बोलायचे नाही, असे सांगून पत्रकारांना टाळले. यावेळी तिच्याबरोबर महिला संघटनेच्या आवडा व्हिएगस हजर होत्या.
सारा ही कोणतेही कागदपत्रे न घेता आली होती. त्यामुळे तिला ज्या काही गोष्टी आठवत होत्या, त्या तिने आम्हाला सांगितलेल्या आहेत. आम्हाला गरज भासल्यास तिची पुन्हा चौकशी केली जाईल, असे यावेळी "सीबीआय'च्या सूत्रांनी सांगितले. दि. १० सप्टेंबर रोजी या प्रकरणातील मुख्य संशयित मिकी पाशेको यांची चार तास चौकशी करण्यात आली होती. यावेळी त्यांनी "ॅमॅनपावर रिक्रूटमेंट एजन्सी' ही सारा चालवत होता. तिचे आणि माझे संबंध बिनसल्यानंतर आपण त्या संस्थेत लक्ष घातलेले नाही. २००३ पासून या एजन्सीशी आपला कोणताही संबंध नाही, असे मिकी यांनी सीबीआयला सांगितले होते.
त्या अनुषंगाने काल सीबीआयने याविषयी अन्य कोणते पुरावे हाती लागतात का, हे पाहण्यासाठी सारा हिला बोलावून तिची चौकशी केली. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या अहवाल नंतर मिकी पाशेको यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. अमेरिकेत गेल्या काही वर्षात अनेकांनी बनावट कागदपत्रांसह आणि व्हिसासह अटक केल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. यावेळी पकडण्यात आलेल्याशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे गोव्याचे माजी मंत्री मिकी पाशेको संबंध असल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाला माहिती लागल्यानंतर याची केंद्र सरकारकडे तक्रार करण्यात आली होती. त्याचप्रमाणे, हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे ही चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.
१९९८मध्ये स्थापन झालेल्या या एजन्सीद्वारे आतापर्यंत २००च्या आसपास लोकांना विदेशात नोकरीसाठी पाठवण्यात आले आहे. सीबीआयने या प्रकरणात मिकी पाशेको सह अन्य दोघांवर फसवणूक आणि लुबाडणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.

झारखंडसंबंधी मतभेद नाहीत

गडकरींचे स्पष्टीकरण
नागपूर, दि. १२ : झारखंडमधील सत्ता स्थापनेवरून पक्षात कुठलेही मतभेद नसल्याचे आज (रविवार) भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. झारखंडचे मुख्यमंत्री अर्जुन मुंडा, झारखंड मुक्ती मोर्चाचे सर्वेसर्वा शिबू सोरेन यांचा मुलगा हेमंत आणि सुदेश महातो यांनी नागपुरात गडकरींची भेट घेतली. या वेळी गडकरी म्हणाले,"झारखंडमधील सत्ता स्थापनेवरून भाजपमधील काही वरिष्ठ नेते नाराज असल्याचे वृत्त काही वर्तमानपत्रांनी दिले आहे. ते सर्वथा चुकीचे आहे. भाजपच्या संसदीय समितीने प्रस्ताव दिल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हा निर्णय एकमताने झाल्याचे म्हणता येईल. २००३ मध्ये झारखंडमध्ये भाजपच्या सरकारचा शपथविधी झाला होता, तेव्हाही भाजपचे काही वरिष्ठ नेते उपस्थित नव्हते.'
मुंडा म्हणाले,"झारखंडमध्ये सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. अशावेळी लोकांना पुन्हा निवडणुकांना सामोरे जायचे नाही. राज्याला स्थिर सरकारची गरज आहे. त्यामुळे आम्ही सरकार स्थापनेचा निर्णय घेतला.'

दीड दिवसाच्या गणेशाला निरोप

पणजी, दि. १२ (सांस्कृतिक प्रतिनिधी): "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशा जयघोषात ढोलताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी अशा भारलेल्या वातावरणात आज दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. प्रत्येक घर कालपासून आरत्या भजनांच्या स्वरात न्हाऊन गेले होते. लहानांपासून थोरापर्यंत मिरवणुकीतील ढोलताशांच्या तालावर बेधुंदपणे नाचताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाबरोबरच श्रीला निरोप देताना, घरातीलच कोणी चालल्याचे भाव दिसत होते. या वर्षी वरुणराजाने गणेश भक्तांवर चांगलीच कृपा केल्याने मिरवणुकीचा आनंद त्यांना घेता आला.
दीड दिवसाबरोबरच पाच, सात, नऊ व अकरा दिवसांचा गणेशोत्सव राज्यात मोठ्या उत्सवात सुरू आहे. सार्वजनिक गणेशोत्सव नऊ व अकरा दिवसापर्यंत चालतात व घरातील गणेशोत्सव सात दिवसापर्यंत चालतात. सार्वजनिक उत्सवात दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून स्थानिक कलाकारांसह पुणे, मुंबईचे कलाकारही आपली कला सादर करणार आहेत. राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह सध्या ओसंडून वाहत असून भाविक गणेशाच्या भक्तीत न्हाऊन निघाले आहेत.

मुंबई हल्ल्यासंबंधात आक्षेपार्ह मुलाखत

सलमानने मागितली माफी
मुंबई, दि. २६ / ११ च्या मुंबई दहशतवादी हल्याप्रकरणी बेताल वक्तव्य करणारा सिनेस्टार सलमान खान याने आज अखेर माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो, अशा शब्दांत सलमान खानने आज दिलगिरी व्यक्त केली.
सलमान खानने पाकिस्तानी मिडियाला नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत श्रीमंतांवर हल्ला झाल्यानेच मुंबईवरील २६ नोंव्हेंबरच्या त्या हल्ल्याला अवास्तव महत्त्व देण्यात आले, असे विधान केले होते. याआधी भारतात अनेक हल्ले झाले, त्यातले अनेक दहशतवादी हल्ले होते. मुंबईवर झालेल्या २६ / ११च्या हल्ल्यात छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशन आणि कामा हॉस्पिटल देखिल टार्गेट होते. पण हल्ल्याचा विषय निघाला की नेहमी चर्चा होते फक्त ताज या पंचतारांकित हॉटेलचीच. तिथे काही बड्या असामी अडकल्या म्हणून २६ / ११च्या हल्ल्याला भारतात खूप महत्त्व दिले जात आहे, असे सलमान म्हणाला होता.
सलमान खानच्या या मुलाखतीवरून नवा वांदग निर्माण झाला. दिल्लीत भाजप नेते शाहनवाझ हुसेन यांनी सलमानवर टीका करताना, "पोटा' अस्तित्वात असता तर त्याला गजाआड पाठवता आले असते, या शब्दात आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. सलमानने माफी मागावी, अशी मागणी केली होती. सलमानने केलेले विधान हा भारताचा आणि भारतीयांचा अपमान असल्याचे ते म्हणाले. सलमानने केलेले वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे. २६ / ११चा हल्ला म्हणजे भारताविरुद्ध पुकारण्यात आलेले एक प्रकारचे युद्ध होते , असे सांगून ते पुढे म्हणाले की, पाकमध्ये अनेक भारतीय चॅनेल्सवर बंदी आहे. ही बंदी लागू असताना सलमान पाकिस्तानी चॅनेलसाठी विशेष मुलाखत कशी देऊ शकतो ?
सलमान खानच्या वक्तव्याबाबत विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी नाराजी व्यक्त केली होती. सिनेस्टारने दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्यावर परदेशी मिडियापुढे वक्तव्य करण्याची आवश्यकताच नाही , असे निकम म्हणाले.
मात्र आता सलमानने या प्रकरणी माफी मागितल्याने हा वाद संपण्याची चिन्हे आहेत. सलमानचा दबंग हा नवा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर रिलीज झाला आहे. हा चित्रपट चालावा, यासाठीच तर हा वाद सुरू करण्यात आला नाही ना, अशीही शंका घेतली जात आहे.

पाण्याच्या टाकीत चिमुरडीचा अंत

वास्को, दि. १२ (प्रतिनिधी): सिमेंटच्या विटा व इतर सामग्री बनविण्यासाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकीत तीन वर्षाची रोशनी खान ही चिमुरडी आज संध्याकाळी पडल्याने तिचे दुर्दैवी निधन झाले. आल्तो - दाबोळी येथे राहत असलेला आसिफ खान हा या टाकीजवळ पाणी काढण्यासाठी गेला असता त्याला त्याची मुलगी आत पडल्याचे दिसून आल्यावर त्याच्यावर दुःखाचा पहाडच कोसळला. रोशनी हिला इस्पितळात नेले असता तिचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी ३.१५ च्या सुमारास सदर घटना घडली. उत्तर प्रदेश येथील मूळ आसिफ खान याचा आल्तो - दाबोळी येथे सिमेंटाच्या विटा व इतर सामुग्री बनवण्याचा व्यवसाय आहे व येथेच तो आपल्या पत्नी व परिवारासह वास्तव्य करतो. संध्याकाळी काम करण्याच्या वेळी आसीफ येथे बांधलेल्या टाकीतील पाणी काढण्यासाठी गेला असता त्याला त्याची लहान (तीन वर्षाची) मुलगी टाकीतील पाण्यात बुडत असल्याचे दिसून आले. आसीफने यावेळी त्वरित आपली मुलगी रोशनी हिला पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी चिखलीच्या एका खासगी इस्पितळात नेले असता, आणण्यापूर्वीच तिचे निधन झाल्याचे डॉक्टरकडून घोषित करण्यात आले. तीन वर्षाची रोशनी खेळत असताना या टाकीत पडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चार जणांचे वडील असलेले आसिफ यांना सर्वात लहान मुलीच्या या दुर्दैवी अंत पाहून धक्काच बसला.
दुर्दैवी रोशनी हिचा मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात पाठवला आहे. रोशनी हिचा मृत्यू केव्हा व कसा झाला याबाबत तपास चालू असल्याची माहिती वेर्णा पोलिसांनी दिली असून पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अभिषेक गोम्स पुढील तपास करीत आहेत.