Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 28 July 2010

उत्कर्षाची जबानी नोंदवलीच नाही!

पोलिसांकडून हलगर्जीपणाचा कळस
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): वाळपई तालुक्यात गाजत असलेल्या उत्कर्षा मृत्युप्रकरणी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात तिच्यावर शेवटचा उपचार सुरू असतानाही वाळपई पोलिसांनी तिची जबानी नोंद करून घेतली नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. वाळपई पोलिसांनी केलेल्या या हलगर्जीपणामुळे निरीक्षक शिवराम वायंगणकर गोत्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आज उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांच्या कार्यालयात सुमारे ३० मिनिटे चाललेल्या बैठकीत यावर कोणता तोडगा काढावा यासाठी चर्चा करण्यात आली. मात्र, निरीक्षक वायंगणकर यांना यातून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी जोरदार प्रयत्नही चालल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, काल रात्री उशिरा निरीक्षक वायंगणकर व डिचोली पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक तेरेंस वाझ यांची बदल करून त्यांना पोलिस मुख्यालयात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, या दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध खात्याअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली असून परवा याचा अहवाल सादर केला जाणार आहे. ही चौकशी डिचोली उपविभागीय पोलिस उपअधीक्षक बोसुयट सिल्वा करीत आहेत. या चौकशीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक गावस यांनी दिली.
सध्या या प्रकरणात अटकेत असलेली उत्कर्षाची मामी स्नेहल गावकर हिने पोलिसांना कोणतेही सहकार्य न करण्याचे ठरवले असून गेल्या दोन दिवसापासून तिने "मौन व्रत' धारण केल्याची माहिती मिळाली आहे. ती कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत नसल्याचे यावेळी सूत्रांनी सांगितले. स्नेहल ही अत्यंत शांत स्वभावाची असल्याने सध्या तिच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे ती कायद्याच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

No comments: