Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 30 July 2010

ड्रगप्रकरण 'सीबीआय'कडे सोपवाच!

विरोधकांबरोबर सत्तारूढ पुन्हा आक्रमक
गृहखात्याच्या पुरवणी मागण्यांवेळी
अनेकांची मंत्र्यांवर कडाडून टीका

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): गृहखात्यात माजलेल्या भ्रष्टाचाराचा, अनागोंदी कारभाराचा आणि निर्नायकी अवस्थेचा खरपूस समाचार घेतल्यानंतर विरोधकांनी आज पुन्हा एकदा पोलिस - राजकारणी आणि ड्रग माफिया प्रकरण "सीबीआय'कडेच सोपवले जावे, अशी जोरदार मागणी केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणेच या बाबतीत मौन पाळून अन्य विषयावर बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर संतप्त झालेल्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सभापतींच्या आसनासमोर धाव घेतली. त्यामुळे उडालेल्या प्रचंड गदारोळातच गृहखात्याच्या मागण्यांना मंजुरी मिळवण्यात आली.
पोलिस, राजकारणी व ड्रग माफिया साटेलोटे प्रकरणाची "सीबीआय' चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांनी या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच केली आहे. आज खुद्द गृहखात्याच्या मागण्यांवरील चर्चा असल्यामुळे विरोधकांच्या आक्रमणाला अधिकच धार चढली होती. त्यांनी विविध पुरावे व आकडेवारी सादर करून पोलिसांची आणि पर्यायाने गृहखात्याची लक्तरे वेशीवर टांगली. महत्त्वाची बाब म्हणजे विरोधकांनी केलेल्या "सीबीआय' चौकशीच्या मागणीला सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांनीही अप्रत्यक्ष अनुमोदन देण्याचा अपवादात्मक प्रकार आज विधानसभेत दिसून आला. सत्ताधारी आमदारांनी आज "सीबीआय चौकशी' असा सरळसरळ उल्लेख केलेला नसला तरी या गंभीर प्रकरणाची "एनआयए'सारख्या स्वतंत्र संस्थेमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी मात्र जोरदारपणे केली.
विरोधी गटातील ऍड. फ्रान्सिस डिसोझा, दामोदर नाईक, दयानंद मांद्रेकर, विजय पै खोत, राजेश पाटणेकर, अनंत शेट या आमदारांनी गृहखात्यात माजलेल्या अनागोंदी कारभारावर भरपूर तोंडसुख घेतले. पोलिस व राजकारण्यांचे ड्रग माफियांशी असलेले साटेलोटे हे अत्यंत गंभीर प्रकरण असून या प्रकरणाची पोलिसांमार्फतच चौकशी करणे म्हणजे स्वतः केलेल्या भ्रष्टाचाराची स्वतःच चौकशी करण्यासारखा प्रकार असल्याचा सूर त्यांनी व्यक्त केला. असे केल्याने या प्रकरणाला न्याय मिळू शकणार नाही व सत्य कधीच जनतेसमोर येणार नाही असे ते म्हणाले. त्यामुळे ज्या प्रकरणामुळे गोव्याची सुरक्षा व अस्मिता पणाला लागलेली आहे ते प्रकरण "सीबीआय'कडेच सोपवले जावे असा जोरदार मुद्दा त्यांनी मांडला.
विरोधकांनी केलेल्या या मागणीला सत्ताधारी आमदारांनीही अप्रत्यक्ष अनुमोदनच दिले. यावेळी ऍड. दयानंद नार्वेकर, आग्नेल फर्नांडिस, दीपक ढवळीकर, पांडुरंग मडकईकर, व्हिक्टोरिया फर्नांडिस व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी पोलिसांच्या नाकर्तेपणाचा उदाहरणांसहित पाढाच वाचला. पोलिसांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. हप्तेखोरी प्रचंड वाढलेली आहे. सामान्यांना पोलिसांचा आधार न वाटता त्यांची भीती वाटते आहे. हे सर्व अतिशय गंभीर असल्याने या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन दोषींवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे सत्ताधारी आमदारांनी सांगितले.

No comments: