Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 26 July 2010

गुजरातचे माजी राज्यमंत्री अमित शाह यांना अटक

१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
गांधीनगर, दि. २५ - गुजरातचे माजी गृह राज्यमंत्री अमित शाह येथील सीबीआय कार्यालयात उपस्थित झाल्यानंतर सीबीआयने त्यांना सोहराबुद्दीन बनावट चकमकप्रकरणी अखेर अटक केली. सीबीआयने त्यांना समन्स पाठविल्यानंतर चार दिवसांनी ते आज या चौकशी संस्थेसमोर हजर झाले.
सीबीआयच्या सूत्रांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, आज न्यायालयाला सुटी असल्याने शाह यांना न्यायाधीशांच्या निवासस्थानी नेण्यात आलेे. २००५ साली कुख्यात गॅंगस्टर सोहराबुद्दीन व त्याची पत्नी कौसर बी यांचे अपहरण करणे व त्यांची हत्या करणे अशासारखे आरोप सीबीआयने शाह यांच्याविरोधात लावले आहेत.
शाह यांच्या पोलिस कोठडीसाठी सीबीआयने आग्रह धरला नाही, हे येथे उल्लेखनीय.
येथील भाजपाच्या प्रदेश मुख्यालयात पत्रकारांशी बोलल्यानंतर अमित शाह आपल्या सहकाऱ्यांसह सीबीआयच्या कार्यालयात दुपारी दोन वाजता पोहोचले. सीबीआय कार्यालयात पोहोचल्यानंतर तेथे उपस्थित भाजपा कार्यकर्ते तसेच पत्रकारांकडे वळून त्यांनी हात हलविला. अमित शाह सीबीआय कार्यालयात हजर होणार, असे कळताच सीबीआय अधिकारी आधीच कार्यालयात दाखल झाले होते. अमित शाह सीबीआय अधिकाऱ्यांसमोर उपस्थित होताच अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली.
शाह यांच्यासोबत गेलेले भाजपा नेेते विजय रुपानी यांनी सांगितले की, सीबीआय अधिकाऱ्यांनी शाह यांना म्हटले की, आता आम्ही तुम्हाला थेट न्यायालयात नेत आहोत. त्यासाठी अमित शाह राजी झाले. पोलिस महानिरीक्षक कांदास्वामी यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी त्यांना एका कारमध्येे बसवून सीबीआय कार्यालयातून अति. मुख्य महानगर दंडाधिकारी ए. वाय. दवे यांच्या निवासस्थानी घेऊन गेले. तेथे न्यायाधीशांनी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

No comments: