पोलिस - ड्रगमाफिया, हल्लाप्रकरण
'एनएसयुआय'ची सरकारला सात दिवसांची मुदत
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): पोलिस ड्रग माफिया साटेलोटेप्रकरण आणि सुनील कवठणकर यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला ही दोन्ही प्रकरणे राज्य सरकारने केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सात दिवसांच्या आत सोपवावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आज "एनएसयुआय'ने दिला. सुनील कवठणकर यांच्या उपस्थित घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
त्याचप्रमाणे, "एनएसयुआय'च्या एका पथकाने आज दुपारी राज्यपाल एस. एस. सिद्धू व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेऊन गुन्हा अन्वेषण विभागाचे उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांना त्वरित निलंबित करून त्यांना ड्रगप्रकरणात अटक करण्याची मागणी केली. या विषयीचे एक निवेदन राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे, अशी माहिती सुनील कवठणकर यांनी दिली.
सुनील कवठणकर यांच्या पर्वरी येथील घरी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत सुनील शेट्ये, नितीन आनंदआशे, अनुप वळवईकर, गौतम भगत व वरद म्हार्दोळकर उपस्थित होते.
अंमलीपदार्थ सेवनाचे व्यसन हे महाविद्यालयांपर्यंत पोचलेले असून याला अनेक विद्यार्थी बळी पडत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आणि तुमच्या मुलांना या ड्रगपासून वाचवायचे असल्यास शिक्षक, वकील व डॉक्टर यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन श्री. कवठणकर यांनी केले.
पळपुटेपणाने हल्ले केले म्हणून ड्रग व्यवसायाच्या विरोधात सुरू केलेली सह्यांची मोहीम थांबवली जाणार नाही. म्हापसा पोलिसांतर्फे या प्रकरणाचा सुरू असलेल्या तपासकामावर आम्ही समाधानी नाही. काल मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी विधानसभा अधिवेशनात पोलिसांच्या तपासकामावर व्यक्त केलेल्या समाधानावरही "एनएसयुआय'ने नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांना तपासकामावर समाधान वाटण्यासारखे दिसले तरी काय, हे त्यांचे त्यांनाच माहीत, असेही ते म्हणाले.
पोलिस ड्रग माफिया साटेलोटेप्रकरणात उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांचाही सहभाग असून त्यांना त्वरित निलंबित करून अटक करावी, अशी जोरदार मागणी आज पुन्हा करण्यात आली. गेल्यावेळी उपअधीक्षक साळगावकर यांच्यावर तसेच ड्रग व्यवसायातील पैसे दहशतवादी कारवायांसाठी वापरले जात असल्याचा आरोप श्री. कवठणकर यांनी केल्यानंतर त्यांना "सीआयडी' विभागात पाचारण करून त्यांची जबानी नोंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावेळी श्री. कवठणकर यांनी साळगावकर हे या प्रकरणात गुंतले असल्याचा आरोप करताच त्यांची जाबांनी नोंद न करताच त्यांना जाऊ देण्यात आले, अशी माहिती त्यावेळी उघडकीस आली होती. या आरोपांवर आम्ही ठाम असल्याचे सांगून याची सखोल चौकशी करण्यासाठी श्री. साळगावकर यांना अटक करण्याची गरज असल्याचा मागणी यावेळी करण्यात आली.
Wednesday, 28 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment