पणजी, दि. ३० (प्रतिनिधी) - म्हापशातील जिल्हा इस्पितळात "ओपीडी' (बाह्यरुग्ण विभाग) सुरू करण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे. याच मुद्यावरून भारतीय जनता पक्षाने आपले आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा सरकारला दिला होता हे येथे उल्लेखनीय.
"गोमेकॉ'तील डॉक्टरांची दोन पथके लवकरच या जिल्हा इस्पितळाची पाहणी करणार असून आझिलो इस्पितळातील "मेडिसीन' व लहान मुलांची "ओपीडी' प्राधान्यक्रमाने नव्या जागेत हलवण्याची तयारी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दर्शवली आहे. आज म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी यासंबंधीचा खाजगी ठराव सभागृहात मांडला. पेडे येथील नव्या जिल्हा इस्पितळाची इमारत पूर्ण होऊन दोन वर्षे लोटली तरी अजून हे इस्पितळ सुरू होत नाही आणि तिथे आझिलो इस्पितळात रुग्णांची मोठ्या प्रमाणात परवड सुरू आहे. आझिलो इस्पितळाची दैना झाल्याने लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे निदान "ओपीडी' व शवागर नव्या इस्पितळात हालविण्यात यावे, असेही ते म्हणाले.
भाजपने सरकारला नवे इस्पितळ सुरू करण्यासाठी १५ ऑगस्टची मुदत दिली आहे हे जरी खरे असले, तरी आरोग्यमंत्र्यांनी हा विषय प्रतिष्ठेचा किंवा अहंकाराचा न बनवता वस्तुस्थिती जाणून घ्यावी व या रुग्णांचे हाल पाहून स्वतःच निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही आमदार डिसोझांच्या मागणीला पाठिंबा देत सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी केली.
Saturday, 31 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment