Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 23 October 2010

धुवाधार पावसामुळे क्रिकेटप्रेमी धास्तावले

उद्याचा सामना होणार?
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): फातोर्डा स्टेडियमवर भारत-ऑॅस्ट्रोलियादरम्यान खेळल्या जाणाऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्याला ३८ तास बाकी असताना राज्यात धुवाधार पावसाने हजेरी लावल्याने क्रिकेट प्रेमींना धडकी भरली आहे. दोन्ही संघाचे खेळाडू कालच गोव्यात दाखल झाले आहेत. आज दिवसभर त्यांनी मैदानावर सरावही केला. मात्र, सायंकाळी ७ वाजता पावसाने जोरदार धडक दिल्याने आयोजकांसह सामन्याची तिकीट घेतलेल्या प्रेक्षकांच्या ह्रदयाचे ठोके चुकायला लागले आहेत.
या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत आयोजकांची बैठक सुरू होती. मात्र सामन्याबाबत नेमका कोणता निर्णय घेण्यात आला हे कळू शकले नाही. यावेळी गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा आमदार दयानंद नार्वेकर यांच्यासी संपर्क साधला असता "आपल्याला काहीही सांगू शकत नाही' असे उत्तर त्यांनी दिले. परंतु, उद्या दुपारी २ पर्यंत पावसाने आपली उपस्थिती न दाखवल्यास सामना नक्कीच खेळवू असा विश्वास आयोजकांनी बाळगला आहे. दरम्यान, या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याला कोणताही अडथळा येऊ नये यासाठी मडगावचे श्रद्धास्थान असलेले "दामबाब'ला दोनवेळा "गाऱ्हाणे'ही घालण्यात आले आहे.
दुपारपासूनच पावसाचे काळे ढग आकाशात पाहायला मिळत होते. मात्र, सायंकाळी जोरदार गडगडाटासह पावसाने पूर्ण राज्यात हजेरी लावली. अनेक ठिकाणी रस्त्यावर तुडुंब पाणी भरले होते. त्यामुळे रस्त्यावर वाहनेही हाकणे मुश्कील बनले होते. त्यातच रविवारी खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचा आनंद लुटण्यासाठी राज्याबाहेरील तरुणतरुणींचे लोंढे गोव्यात यायला सुरुवात झाली आहे. उद्या शनिवार तसा सुट्टीचाच दिवस असल्याने अनेकांनी आजच गोवा गाठले आहे. आज आणि उद्या गोव्यातील समुद्र किनाऱ्यांचा आनंद लुटून रविवारी सामन्याचा मनमुराद आनंद लुटण्याचा या तरुण क्रिकेटप्रेमींचा बेत आहे.
पावसामुळे आत्तापर्यंत गोव्यात खेळला जाणारा सामान रद्द होण्याचा कटू अनुभव गोमंतकीयांनी घेतला आहे. त्यामुळे यावेळीही असे काही होऊ नये यासाठी अनेकांनी वरुण राजाला साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. तर, आयोजकांनी "खेळपट्टी'ला कोणतीही हानी होऊ नये यासाठी पूर्ण काळजी घेतली आहे. सायंकाळी पावसाची चाहूल लागताच संपूर्ण खेळपट्टी प्लॅस्टिक आच्छादन टाकून झाकण्यात आली होती.
-----------------------------------------------------------
पणजीत वाहतुकीची कोंडी
दरम्यान पावसामुळे राजधानीत वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती. ठिकठिकाणी रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे तळे साचल्याने वाहने हाकणेही मुश्कील बनले होते. पणजी शहरापासून पर्वरी पर्यंत वाहनांची रांग लागली होती. शहरात येणारी पर्यटकांची वाहने आणि सरकारी कार्यालये सुटून शहरातून बाहेर जाणारी वाहने पावसामुळे कोंडीत अडकली.

‘इफ्फी' समितीवरील लाभार्थी पदाधिकाऱ्यांना तात्काळ हटवा

ऑगी डिमेलो यांची मुख्य सचिवांकडे तक्रार
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): 'इफ्फी' आयोजनाच्या विविध कंत्राटांत प्रत्यक्ष लाभार्थी व्यक्तीचीच गोवा मनोरंजन संस्थेच्या प्रशासकीय समितीवर नेमणूक करणे व त्यात निविदा समितीवरही त्यांचा सहभाग असणे म्हणजे केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उघडपणे उल्लंघन ठरते. रंजना साळगावकर, अंजू तिंबलो व फ्रान्सिस्को मार्टिन्स हे प्रत्यक्ष "इफ्फी' आयोजन कंत्राटात लाभार्थी असून त्यांनी तात्काळ आपल्या पदांचा राजीनामा द्यावा अन्यथा या व्यक्तीशी संबंधित हॉटेल व इतर उद्योगांना निविदा प्रक्रियेत सहभागी करून घेऊ नये, अशी मागणी गोमंतकीय चित्रपट निर्माते व तियात्र कलाकार ऑगी डिमेलो यांनी मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांना केलेल्या लेखी निवेदनात केली आहे.
ऑगी डिमेलो यांनी आपल्या निवेदनात केंद्रीय दक्षता आयोगाने ७-१२-२००५ साली जारी केलेल्या आदेशाची प्रत सादर करून एखाद्या उद्योगात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हित असलेल्या व्यक्तीने निविदा समितीत सहभागी न होण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याचेच दाखवून दिले आहे. तशा प्रकारचे प्रतिज्ञापत्रही या सदस्यांना द्यावे लागते. "इफ्फी' मुळे गोव्यातील चित्रपट निर्मिती उद्योगाला चालना मिळेल अशी अपेक्षा होती परंतु या महोत्सवाचा उपयोग आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी काही लोक करीत असून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या खास मर्जीतील या लोकांना ते राजकीय अभय देत असल्याची टिकाही यावेळी डिमेलो यांनी केली.पूर्वीच्या समितीच्या सदस्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावावर घोटाळा केला व सध्याचे सदस्य हॉटेल उद्योजक असल्याने त्यांनीही कंत्राटे मिळवण्यासाठी क्लृप्त्या लढवल्या आहेत."इफ्फी'आयोजनात चित्रपट उद्योगाशी संबंधित लोकांना डावलण्यात येते.लक्ष्मीकांत शेटगावकर यांना केंद्र सरकारच्या समितीत स्थान मिळते पण राज्य सरकार मात्र त्याचा विचार करू शकत नाही हे दुर्दैव असल्याचेही श्री.डिमेलो यांनी म्हटले आहे.संपूर्ण प्रशासकीय समितीचे पुनर्गठण करून मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांचीही उचलबांगडी करावी,अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान,माहिती हक्क कायद्याखाली मिळवलेल्या माहितीनुसार २००४ ते २००९ या काळात न वापरलेल्या खोल्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. त्यात एका "सिदाद दी गोवा' या हॉटेलवर एक कोटी रुपयांहून जास्त खर्च करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.प्रशासकीय समितीच्या सदस्य अंजू तिंबलो या "सिदाद दी गोवा' च्या व्यवस्थापकीय संचालक आहेत तर आयोजन समितीच्या अध्यक्ष रंजना साळगावकर या हॉटेल मेरियटच्या मालक असल्याचे सांगण्यात आले आहे. सजावटीचे कंत्राट मिळवणारे फ्रान्सिस मार्टीन्स हे देखील प्रशासकीय समितीचे सदस्य असल्याचेही श्री.डिमेलो यांनी म्हटले आहे.
या दिल्ली भेटीचे प्रयोजन काय?
गोवा मनोरंजन संस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या खात्रीलायक माहितीनुसार संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव व संस्थेच्या अध्यक्षांचे विशेषाधिकारी श्रीपाद नाईक हे आज तात्काळ दिल्लीला रवाना झाले आहेत. हॉटेल निविदेवरून निर्माण झालेला घोळ व ऐनवेळी सामंजस्य करारात किनारी हॉटेलाची अट लादण्यात आल्याने सर्वत्र टीकेची झोड उडाल्याने ही अट काढून टाकण्याच्या हेतूने हे दोघे अधिकारी दिल्लीत गेल्याची चर्चा सुरू आहे.दरम्यान, दिल्लीत सध्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा बराच गाजत असताना यापुढे "इफ्फी'आयोजनातील घोटाळ्यांचाही बराच गाजावाजा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

खनिज 'रॉयल्टी'तून यंदा ५०० कोटी महसूल शक्य

बेकायदा खाण विस्ताराचा परिणाम?
पणजी, दि.२२ (प्रतिनिधी): राज्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदा खनिज निर्यात होत असल्याने सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याची बाब विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत उघड करून दिल्यानंतर आता त्याचे सकारात्मक निकाल दिसायला लागले आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षांत खनिज निर्यात "रॉयल्टी' च्या रुपात सुमारे ५०० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे, अशी अपेक्षा खाण संचालक अरविंद लोलयेकर यांनी व्यक्त केली आहे. राज्यात जिकडेतिकडे खाण व्यवसाय फोफावल्यामुळे निर्यातीत वाढ होऊन महसूल वाढला की मालाची किंमत परदेशात वाढल्याने महसूल जास्त मिळाला, हा मात्र चर्चेचा विषय ठरला आहे.
राज्यातून मोठ्या प्रमाणात खनिजाची निर्यात केली जाते परंतु प्रत्यक्षात खनिज निर्यातीचा आकडा व महसूल प्राप्तीची रक्कम यात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे पर्रीकरांनी वारंवार विधानसभेत उघड करून दाखवले आहे. राज्य खाण खात्याकडील खनिज निर्यातीची आकडेवारी व "एमपीटी'ची आकडेवारी यातही फरक असल्याचे पर्रीकरांनी सप्रमाण दाखवून देत मोठ्या प्रमाणात बेकायदा खनिज निर्यातीचा हा घोटाळा उघड केला होता. गेल्या तीन वर्षांत सुमारे चार हजार कोटी रुपयांचे खनिज बेकायदा निर्यात झाल्याची आकडेवारीही पर्रीकरांनी समोर आणली होती. पर्रीकरांनी केलेल्या या भांडाफोडीनंतर खनिज निर्यातीसंबंधी संपूर्ण प्रक्रियाच सुटसुटीत करून त्यात आवश्यक बदल करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी विधानसभेत दिले होते."एमपीटी' तसेच विविध खाण कंपनीला खनिज निर्यातीची आकडेवारी वेळोवेळी सादर करूनच व खाण खात्याचा ना हरकत दाखला प्राप्त करूनच खनिज निर्यात करण्याचे बंधन घालण्यात आल्याने त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.यंदाच्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या दोन टप्प्यात ३७५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला व वर्ष अखेरपर्यंत हा आकडा ५०० कोटी रुपयांचा पल्ला नक्कीच गाठेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.गेल्या २००९-१० या आर्थिक वर्षांत केवळ २९२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता यावरून हा फरक ठळकपणे दिसून येतो,असेही ते म्हणाले. यापूर्वी खनिज निर्यातीवरील रॉयल्टी ८ रुपये प्रति टन अशी निश्चित होती परंतु आता त्यात बदल करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिजाच्या दरांवरून हा कर गोळा केला जात असल्याने त्यात वाढ झाली,असा कयासही बांधण्यात आला.
महसूल गळतीचे सर्व मार्ग बंद करून ही संपूर्ण प्रक्रियाच एका नियोजनबद्ध पद्धतीने आखण्यात आली आहे. प्रत्येक खाण कंपनीला महिन्याच्या १० तारखेपर्यंत रॉयल्टी भरावी लागते व १५ तारखेपर्यंत आपला करविषयक कागदपत्रे सादर करावी लागतात,अशी माहितीही श्री.लोलयेकर यांनी दिली.

राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण अहवाल ही निव्वळ धूळफेक असल्याचे उघड

१६८ बांधकामांवर नांगर फिरणार!
पणजी, दि.२२ (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण प्रकल्प राबवताना राज्य सरकारकडून जनतेला अंधारात ठेवले गेल्याचे उघड झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणासाठी यापूर्वी तयार केलेला अहवाल हा केवळ इंटरनेटच्या साहाय्याने बनवण्यात आला होता. महामार्गाचे आरेखन करताना प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा न घेता "गुगल' संकेतस्थळाच्या मदतीनेच आराखडा बनवण्यात आला होता याचा उलगडाच पुर्नसर्वेक्षणाच्या निमित्ताने आला आहे. प्रत्यक्ष नियोजित रस्त्याची पाहणी करून तयार केलेल्या नव्या अहवालात ५६९ प्रकल्पग्रस्त बांधकामांचा आकडा केवळ १६८ वर पोहचल्याने या निमित्ताने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची बेफिकिरीच समोर आली आहे. कमीतकमी बांधकामे पाडली जातील, असा दावा करणाऱ्या राज्य सरकारने आता सुमारे २०० बांधकामावर नांगर फिरविण्याचे ठरविल्याने जनतेमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
केंद्रीय रस्ता परिवहन आणि महामार्गमंत्री कमलनाथ हे पुढील आठवड्यात गोव्यात येत असल्याने नव्या सर्वेक्षणाचे सादरीकरण त्यांच्यासमोर केले जाईल,अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंते जे.जे.एस.रेगो यांनी दिली.राष्ट्रीय महामार्ग १७ चा अहवाल २५ रोजी तयार होणार आहे व त्याचेही सादरीकरण केंद्रीय मंत्र्यांसमोर करण्यात येईल,असे ते म्हणाले."एनएचएआय', भूसर्वेक्षण खाते व सार्वजनिक बांधकाम खाते यांनी संयुक्तपणे प्रत्यक्ष नियोजित महामार्गाची पाहणी करून फेरसर्वेक्षण केले. जुने गोवे ते खोर्ली येथे ३५ मीटर रुंदी,भोमा येथील नियोजित रस्त्याचे पुर्नसर्वेक्षण,चिंबल येथील क्रॉसचे संरक्षण, तसेच फोंडा भागात सध्याच्या रस्त्याचेच रुंदीकरण आदी अनेक उपाय सुचवून ५६९ बांधकामांवरील गंडांतराचा आकडा १६८ वर आणण्यात आला. या नव्या फेरसर्वेक्षण अहवालाचे सादरीकरण मुख्यमंत्री दिगंबर कामत, सा.बां.खात्याचेमंत्री चर्चिल आलेमाव व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्यासमोर केल्याची माहिती श्री.रेगो यांनी दिली. पर्रीकर यांनी हे सादरीकरण महामार्ग विरोधी समितीसमोर करून त्यांनाही याबाबतीत विश्वासात घेण्याची अट घातली आहे व त्याप्रमाणे हे सादरीकरण करण्याची तयारी खात्याने ठेवली आहे,अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग १७ च्या आरेखनाबाबत विशेष अडचणी नाहीत. फक्त कुठ्ठाळी व पर्वरी भागातील लोकांच्या काही तक्रारी असून त्याबाबत तोडगा काढला जाईल. पर्वरी भागात महामार्गाची रुंदी ३५ मीटरवर आणली गेल्यास बहुतेक बांधकामे वाचू शकतील व हा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहितीही श्री.रेगो यांनी दिली.

कुचेली येथे अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

म्हापसा, दि. २२ (प्रतिनिधी): कामुर्लीहून नेरूल येथे जाणाऱ्या दुचाकीवरील लिकोलीन आल्मेदा (३५) नियंत्रण गेल्याने पडून जागीच ठार झाला. तो निर्ला-पोर्तवाडा येथील रहिवासी आहे. हा अपघात काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास झाला.
एमएच-जे-८०१६ क्रमांकाच्या यामाहा मोटरसायकलवरून जात असताना लिकोलीन हा कुचेली येथे वळणावर कालव्यात पडला. म्हापसा पोलिसांनी याबाबत माहिती मिळताच, उपनिरीक्षक तुळशीदास धावस्कर यांनी अन्य पोलिसांह तेथे धाव घेतली. पंचनामा केल्यावर त्याचा मृतदेह बांबोळी येथे विच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

Friday, 22 October 2010

विश्वजित राणे यांचा मोठा विजय

-ही तर धनशक्तीची सरशी : हळदणकर
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): सत्तरी तालुक्यावर प्रतापसिंह राणे कुटुंबाचीच सत्ता चालते याचा पुनःप्रत्यय वाळपई पोटनिवडणुकीच्या निकालाने स्पष्ट झाला आहे. कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ११, ६४२ मते प्राप्त करून आपले प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार संतोष हळदणकर यांच्यावर ८४०५ मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला. भाजपचे संतोष हळदणकर यांना केवळ ३,२३७ मते मिळाली. भाजप उमेदवाराची अनामत जप्त करण्याचा विश्वजित राणे यांचा बेत फोल ठरलाच पण त्याचबरोबर गेल्यावेळच्या तुलनेत जास्त मते मिळवून विश्वजित राणे यांचे मताधिक्य कमी करण्याचा भाजपचा प्रयत्नही यशस्वी झाला नाही. राणेंचा विजय हा धनशक्तीचा विजय असल्याची कडवट प्रतिक्रिया संतोष हळदणकर यांनी यावेळी व्यक्त केली, तर उत्तर गोव्यातील भाजपच्या जागा बळकाविण्याचा दावा विश्वजित राणे यांनी यावेळी केला.
वाळपई मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजता गोवा गृहविज्ञान महाविद्यालयात सुरू झाली. अवघ्या एका तासाच्या आत निकाल स्पष्ट झाला. एकूण चार टप्प्यात झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच विश्वजित राणे यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. पहिल्या टप्प्यात ३६१२, दुसऱ्या टप्प्यात ४६०५, तिसऱ्या टप्प्यात ३१४२ व चौथ्या टप्प्यात २८३ मते मिळवत विश्वजित राणे यांनी संतोषहळदणकर यांच्यावर ८४०५ मतांची आघाडी घेतली. भाजपला केवळ दुसऱ्या टप्प्यात १६६१ मते मिळाली. उर्वरित सर्व टप्प्यात संतोष हळदणकर यांना एक हजाराच्या आत मते मिळाली. एकूण १४, ८८४ मतांपैकी विश्वजित राणे यांनी ११,६४२ मते मिळवत ७८ टक्के मतांच्या फरकाने ही बाजी मारली.
सत्तरी तालुक्याकडे राणेंचे दुर्लक्ष तथा सत्तरीतील बेकायदा खाणींना विश्वजित राणेंचे अभय आदी विषयावरून विरोधी भाजपने रण पेटवूनही वाळपईवासीयांनी विश्वजित राणेंनाच मतदान केले असल्याचे स्पष्ट झाले. सत्तरी व डिचोली तालुक्यात यापुढे भाजपला एकही जागा मिळणार नाही. वाळपई, पर्ये, डिचोली, मये, साखळी, शिवोली व मांद्रे मतदारसंघात यापुढे जनता भाजपला अजिबात थारा देणार नाही,असेही यावेळी विश्वजित म्हणाले. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर हे हुशार आहेतच पण त्यांच्यापेक्षा आपण हुशार असल्याची मल्लिनाथी त्यांनी केली. भाजपने आपल्याविरोधात खालच्या पातळीवर अपप्रचार केला पण वाळपईवासीयांनी त्याला भीक घातली नाही,असेही ते म्हणाले. या विजयाचे सारे श्रेय वाळपईतील जनता,आपले वडील प्रतापसिंह राणे, मुख्यमंत्री दिगंबर कामत व आपली पत्नी दीव्या राणे यांना देत असल्याचेही ते म्हणाले.राणेंनी सत्तरीचा विकास केला नाही,असा दावा करणाऱ्या भाजपला सत्तरीतील जनतेने चोख प्रत्युत्तर दिले,असा टोमणाही त्यांनी हाणला.
वाळपईतील खाणी आपणच सुरू केल्याचा आव आणून आपली बदनामी करणाऱ्यांनाही जनतेने योग्य धडा शिकवला,असे सांगून विश्वजित राणे म्हणाले की खाण प्रभावित क्षेत्रातील जनतेने आपल्यामागेच राहून विरोधकांना फटकारले. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या काळापासून राज्यात खाणी सुरू आहेत व खाण व्यवसाय हाच राज्याचा आर्थिक कणा आहे व त्यामुळे लोकांनाच हा उद्योग हवा असेल तर आपण त्याला विरोध का करावा,असा पुनर्उच्चारही यावेळी श्री.राणे यांनी केला.आपण या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी वडिलांना नेले नाहीच परंतु खुद्द मुख्यमंत्री किंवा अन्य नेत्यांनाही आमंत्रित केले नाही.आपल्याला या निवडणुकीच्या निमित्ताने आपली पात्रता सिद्ध करावयाची होती,असेही ते यावेळी म्हणाले.
यापुढे उत्तरेत चमत्कार : मुख्यमंत्री
यापुढे उत्तर गोव्यात चमत्कार घडला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नसेल,असे मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले.विश्वजित राणे यांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे या पक्षाची ताकद वाढली आहे व त्याचे परिणाम येत्या काळात सर्वांना पाहावयाला मिळतील,असेही ते म्हणाले. याप्रसंगी सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, पाळीचे आमदार प्रताप गावस व कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्स हजर होते. विश्वजित राणे यांचे असंख्य कार्यकर्ते याठिकाणी हजर होते व विश्वजित राणे यांच्या समर्थनार्थ घोषणांनी संपूर्ण परिसरच दणाणून सोडला.
हा तर पैशांचाच खेळः संतोष हळदणकर
वाळपई पोटनिवडणुकीत विश्वजित राणे यांनी मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर करून हे मताधिक्य मिळवले असा आरोप भाजपचे उमेदवार संतोष हळदणकर यांनी केला. विविध प्रलोभने व आमिषे दाखवून मतदारांना भुलवण्यात त्यांनी यश मिळवले असले तरी या विजयामुळे हुरळून जाऊन सत्तरीची सारी सूत्रे आपल्याच हातात असल्याच्या तोऱ्यात त्यांनी वागू नये,असा सल्लाही यावेळी श्री.हळदणकर यांनी दिला. विश्वजित राणे हे कितपत सत्तरीवासीयांच्या भल्यासाठी वावरतात याचे दर्शन लोकांना लवकरच होणार आहे,असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला.

रसिकाविरुद्ध अखेर शंभर पानी आरोपपत्र

गाडगीळ आत्महत्याप्रकरण
पणजी, वाळपई दि. २१ (प्रतिनिधी): ब्लॅकमेल करून पोस्टमास्तर प्रकाश गाडगीळ यांना आत्महत्या करण्यास भाग पाडलेल्या रसिगंधा ऊर्फ रसिका शेटये या तरुणीवर वाळपई पोलिसांनी शंभर पानी आरोपपत्र सादर केले. "दै. गोवादूत' ने हे प्रकरण सातत्याने लावून धरले होते. त्यानंतर गेल्या विधानसभा अधिवेशनात विरोधकांनी या प्रश्नावर आवाज उठवल्यानंतर संशयित रसिगंधा हिला अटक करण्यात आली होती.
रसिका हिच्यावर भा.दं.सं. ३८४ (धमकावून पैसे उकळणे), ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) व २०१ (पुरावे नष्ट करणे) या कलमाखाली तिच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. सध्या संशयित आरोपी रसिगंधा ही आग्वाद तुरुंगात आहे.
वाळपईचे पोस्टमास्टर प्रकाश गाडगीळ हिचे मोबाईलवर चित्रीकरण करुन त्यांना ब्लॅकमेल केले जात होते. तसेच, त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जात होती. सुमारे १ लाख रुपये त्यांच्याकडून उकळण्यात आले होते. तरीही त्यांच्याकडे आणखी पैशांची मागणी केल्यानेे गाडगीळ यांनी घरी कोणी नसल्याची संधी साधून गळफास लावून घेतला होता.
या घटनेनंतर गाडगीळ यांच्या पत्नीने संशयित रसिगंधा हिच्यावर संशय व्यक्त केला होता. तसेच, तिच्याबरोबर आणखी काही व्यक्तींचा समावेश होता, असाही दावा केला होता. परंतु, दोघा पुरुषांची चौकशी पोलिसांनी केली होती. विधानसभा अधिवेशनात आवाज उठवल्यानंतर रसिगंधा हिला अटक करण्यात आली होती. अटक करून तिचा न्यायालयात हजर केल्यानंतर तिला जामीन नाकारण्यात आला होता. अद्याप तिला जामीन मंजूर करण्यात आलेला नाही. सध्या ती न्यायालयीन कोठडीत असून आग्वाद मधील महिलांच्या तुरुंगात तिला ठेवण्यात आले आहे.

कर्नाटकात कॉंग्रेसला पुन्हा जबरदस्त दणका

बंगलोर, दि. २१ ः कर्नाटकमध्ये बांगरपेटचे आमदार नारायणस्वामी यांनीही तडकाफडकी आपला राजीनामा दिल्यामुळे विरोधी कॉंग्रेस पक्षाला जोरदार दणका बसला आहे. त्यांचा राजीनामा विधानसभेचे सभापती के. जी. बोपय्या यांनी स्वीकारला असल्याचे सांगण्यात आले. कालच जगालुरचे आमदार एस. व्ही. रामचंद्र यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. गेल्या शुक्रवारी चेन्नापठनाचे आमदार एम. सी. अश्वथ (जेडी एस) यांनी राजीनामा दिला तेव्हापासून हे नवे सत्रच सुरू झाले आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि जेडी एसचे नेते अत्यंत हैराण झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या निवासस्थानी धाव घेऊन तीव्र निषेध नोंदवला; तथापि, मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सर्व आरोप व आक्षेप फेटाळून लावले आहेत. कॉंग्रेसच्या आमदारांची संख्या आता ७३ वरून ७१ अशी खाली आहे. तसेच जेडी एसच्या आमदारांची संख्या २२४ सदस्यांच्या सभागृहात २७ झाली आहे.
निकाल राखून ठेवला
दरम्यान, सभापती बोपय्या यांनी भाजपच्या ११ व ५ अपक्ष आमदारांना अपात्र ठरवले असून त्यांनी या निर्णयाला कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याविषयीचा निवाडा उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. दोघा न्यायमूर्तींमध्ये मतभेद निर्माण झाल्याने यासंदर्भात आता येत्या २ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

बिहारमध्ये ५४ टक्के मतदान

पाटणा, दि. २१ : बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आज कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात शांततेत पार पडले. पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीत मतदारांनी उत्साह दाखविल्याने एकूण ५४ टक्के मतदान झाले. मतदानात बाधा टाकण्याच्या किरकोळ घटनांमध्ये एकूण १५० जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
विधानसभेच्या एकूण २४३ जागांपैकी पहिल्या टप्प्यात आज ४७ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. लोकनिर्वाचित राज्य सरकार निवडून देण्यासाठी जवळपास १.०७ कोटी मतदारांनी आज मतदानाचे कर्तव्य बजावले. चोख सुरक्षा व्यवस्थेत सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत ३६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यानंतर मतदारांनी पुन्हा उत्साह दाखविल्याने मतदान केंद्रांसमोर रांगा लागल्या होत्या. दिवसअखेर ५४ टक्के मतदानाची नोंद झाली. पहिल्या टप्प्यात ५४ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगानेही स्पष्ट केले आहे.
मतदानात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दीडशे जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे. मोटारसायकलसह अनेक वाहने जप्त करण्यात आलेली आहे. मतदानाला मात्र बाधा पोहोचू दिली गेली नाही, अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक नीलमणी यांनी दिली.
माधेपुरा जिल्ह्यातून आलेल्या अधिकृत वृत्तानुसार, स्थानिक लोकांनी आणि बीपीएल कार्डधारकांनी दोन मतदान केंद्रांवर दगडफेक केली. मधुबनी जिल्ह्यातील लौखा येथे मतदान केंद्राबाहेर बॉम्बस्फोट झाला. मात्र, या स्फोटात कोणालाही इजा झाली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जोडे भिरकावून गिलानींचा निषेध

नवी दिल्ली, दि. २१ : फुटीरवादी हुरियत कॉन्फरन्सचे जहालमतवादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्यावर एका कार्यक्रमाप्रसंगी अपमानास्पद प्रसंग ओढवला. या कार्यक्रमात गिलानी उपस्थित असल्याचे पाहून काश्मिरी पंडितांसह उपस्थित जनसमुदाय खवळला व त्यांनी गिलानींवर जोडे भिरकावून निषेध केला.
यावेळी गिलानींचा निषेध करणाऱ्या निदर्शकांनी हाती तिरंगा घेऊन "भारत माता की जय,' "वंदे मातरम्' अशा घोषणा दिल्या. "आझादी-द ओन्ली वे' या कार्यक्रमात काश्मिरी फुटीरवादी आणि नक्षल्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गिलानी हे बोलायला उभे राहण्यापूर्वीच ७० जणांच्या एका समूहाने त्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देताना त्यांना तात्काळ निघून जाण्यास सांगितले. यावेळी काही निदर्शकांनी त्यांच्या दिशेने जोडेही भिरकावले. मात्र, गिलानी यांनी स्वत:ला सावरत जोड्यांचा नेम चुकवला. यानंतर गिलानींभोवती मानवी साखळी तयार करून त्यांना संरक्षण देण्यात देण्यात आले.

Thursday, 21 October 2010

वाळपईचा निकाल आज

विश्वजित राणे की संतोष हळदणकर?
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): वाळपई मतदारसंघासाठी १८ रोजी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी उद्या गुरुवार २१ रोजी पणजीत "गोवा गृहविज्ञान महाविद्यालय ' सभागृहात सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. कॉंग्रेसचे उमेदवार आरोग्यमंत्री विश्वजित राणे व भाजपचे उमेदवार संतोष हळदणकर यांच्यातील लक्षवेधक लढतीच्या या निकालाकडे तमाम गोमंतकीय जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. वाळपईत भाजपचे नामोनिशाण मिटवण्याची विश्वजित राणे यांची वाणी खरी ठरते की गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळवून राणेंच्या लोकप्रियतेला खिंडार पाडण्याचा भाजपचा संकल्प सत्यात उतरतो, याचाही उलगडा उद्याच्या निकालाअंती स्पष्ट होणार आहे.
वाळपई मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत १७,९२० मतदारांपैकी १४, ८८४ मतदारांनी (८३.१० टक्के) आपला मतदानाचा हक्क बजावला. ७,६६४ पुरुष व ७,२२० महिलांनी मतदानात भाग घेतला. उपजिल्हाधिकारी अँथनी डिसोझा यांच्या देखरेखीखाली ही मतमोजणी होणार असून या मतदानासाठी यंत्रांचा वापर झाल्याने एका तासाच्या आत निकाल घोषित होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल वा कॅमेरा वापरावर बंदी असेल. उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी एस.पी. सिग्नापूरकर हे प्रसिद्धी माध्यमांना वेळोवेळी मतमोजणीची माहिती देणार आहेत. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.

फोंड्याच्या युवतीचे महिलांकडून अपहरण

तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ
-नातेवाईकांची परवड

वास्को, दि. २० (प्रतिनिधी): फोंडा तालुक्यातील आडपई येथील एका २३ वर्षाच्या युवतीचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार आज उशिरा संध्याकाळी वेर्णा पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली. या युवतीचे अपहरण चार महिलांनी केल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. घरातून पैशांच्या कामासाठी बाहेर गेलेल्या सदर युवतीचा सकाळी ११.३० वाजता तिच्या वास्को येथे कामाला असलेल्या चुलत बहिणीला "फोन' आला व तिने आपले बसस्थानकावरून अपहरण करण्यात आल्याचे सांगितल्यानंतर त्या अपह्रत युवतीच्या भावांनी फोंडा येथे जाऊन याबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता येथे त्यांची तक्रार घेण्यात आली नसल्याने पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशाच प्रकारे पोलिसांच्या निष्काळजीपणाने यापूर्वी याच तालुक्यात राज्यभर गाजलेले "सीरियल किलर' प्रकरण घडले होते.त्यावेळीही गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातील पोलिसांची निष्क्रियता चव्हाट्यावर आली होती.
आज सकाळी आडपई येथे राहणारी २३ वर्षीय युवती पणजी येथे पैशांच्या कामासाठी घरातून बाहेर निघाल्यानंतर ११.३० च्या सुमारास तिने तिच्या वास्को येथे कामाला असलेल्या चुलत बहिणीला (राः फोंडा) मोबाईलवरून संपर्क साधून आपले चार महिलांनी अपहरण करून त्यांनी आपल्याला बायणा, वास्को येथील एका खोलीत ठेवल्याचे सांगितले. तिचे अपहरण झाल्याची माहिती तिच्या दोन्ही भावांना तातडीने कळविण्यात आली.मात्र कुठल्या बसस्थानकावरून अपहरण झाले आहे याबाबत तिने सांगितले नसल्याने त्या युवतीच्या दोन्ही भावांनी फोंडा पोलिस स्थानकावर जाऊन (दुपारी एक वाजण्याच्या सुमारास) या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली तसेच वास्को येथे कामाला असलेल्या त्या युवतीच्या चुलत बहिणीने वास्को पोलिसांशी संपर्क साधून आपल्या बहिणीचे अपहरण करून तिला बायणा येथे ठेवण्यात आल्याचे सांगितले. एका तरुणीचे अपहरण करण्यात आल्याचे फोंडा तसेच वास्को पोलिसांना कळूनही याबाबत त्यांनी दखल न घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. अपहरण झालेल्या युवतीच्या नातेवाइकांना उशिरा संध्याकाळपर्यंत बरीच धावाधाव करावी लागली.
दरम्यान, अपहरण झालेली सदर युवती वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीतील एका व्यवस्थापनात कामाला असल्याची माहिती सूत्रांनी देऊन तिच्या परिवाराची पोलिसांनी परवड केल्याचे दिसून आले. उशिरा रात्री वेर्णा पोलिस स्थानकात याबाबत तक्रार नोंद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सदर प्रकाराबाबत अधिक माहिती घेण्यासाठी मुरगावचे पोलिस उपअधीक्षक रोहिदास पत्रे यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता आडपई, फोंडा येथील एका युवतीच्या अपहरणाबाबत वेर्णा पोलिस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सदर तक्रार फोंडा येथील पोलिस स्थानकात कशासाठी घेतली नाही, असा प्रश्न त्यांना केला असता याबाबत त्यांनी काहीच उत्तर न देता कुठल्या बसस्थानकावरून त्या युवतीचे अपहरण झालेले आहे हे कळले नसल्याने ही तक्रार (कारण ती घरातून निघाल्यानंतर फोंड्याच्या बसस्थानकावर गेली असावी असे गृहीत धरून) फोंडा येथेच नोंद व्हायला हवी होती, असे मत व्यक्त केले. अपहरण झालेल्या युवतीच्या चुलत बहिणीला तिचे चार महिलांनी अपहरण करून तिला बायणा, वास्को येथे ठेवल्याचे कळल्याचे तक्रारीत नोंद करण्यात आल्याची माहिती उपअधीक्षक पत्रे यांनी दिली. त्या युवतीच्या मोबाईलवरून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ती मडगाव, घोगळ येथे असल्याचे समजले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.अपहरण झाल्यानंतर सकाळपासून आपल्या बहिणीच्या शोधासाठी दोन्ही भावांनी फोंडा तसेच वास्को पोलिस स्थानक असे हेलपाटे घातल्यानंतर शेवटी उशिरा रात्री वेर्णा पोलिस स्थानकात तक्रार नोंद झाली असली तरी तिच्या शोधासाठी पोलिसांनी लावलेल्या विलंबामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुरगावचे पोलिस उपअधीक्षक पत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या या शोधमोहिमेत त्या युवतीची सुटका केली जाईल का, हे उद्याच स्पष्ट होणार आहे. अशा प्रकरणाची नोंद तातडीने घेण्यात यावी, अशावेळी कार्यक्षेत्र कोणाचा हा विचार पोलिसांनी करू नये, असा उच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश असताना, गोवा पोलिसांनी याबाबत केलेली कुचराई त्या युवतीच्या सुरक्षिततेबाबत शंका निर्माण करीत आहे.

बिहारात आज पहिल्या टप्प्यातील मतदान

लालूंचा 'दुहेरी मुखभंग'
पाटणा, दि. २० : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील ४७ जागांसाठी उद्या गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रचाराची रणधुमाळी मंगळवार संध्याकाळपासून थंडावली. त्यामुळे उमेदवारांनी दबक्या आवाजात वैयक्तिक पातळीवर कोणताही झेंडा, बॅनरशिवाय दबक्या आवाजात प्रचार सुरूच ठेवला आहे. दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना आरंभीच "दुहेरी दणका' बसला आणि त्यांचा दारुण "मुखभंग' झाला.
सरण जिल्ह्यातील सोनेपूर मतदारसंघातून लालूप्रसाद यांची पत्नी राबडीदेवी निवडणूक लढवत असून सिकारपूर येथे लालू व राबडीदेवी यांना हेलिकॉप्टरमधून उतरताच काळे झेंडे दाखवण्यात आले. आम्हाला वीज मिळत नाही, पाणी मिळत नाही, लालू - राबडी चले जाव अशा जोरदार घोषणा तेथे उपस्थित मतदारांनी दिल्या. त्यामुळे हे दोघेही कमालीचे अस्वस्थ झाले. हे कमी म्हणून काय जाहीर सभेसाठी उभारण्यात आलेले व्यासपीठच कोसळले. लालूंबरोबर आपली छबीही झळकावी यासाठी धडपडणाऱ्या राजदच्या उत्साही कार्यकर्त्यांना स्थळ काळाचे भानच उरले नाही. सुदैवाने हे व्यासपीठ कोसळल्याच्या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. अखेर एक पलंग मागवण्यात आला आणि त्याचा वापर व्यासपीठासारखा करून ही सभा अक्षरशः उरकण्यात आली. "तुम्ही जर मला संधी दिलीत तर मी तुम्हाला वीज आणि पाणी मिळवून देईन', असे आश्वासन लालूप्रसाद यांनी उपस्थित जनतेला दिले. त्याचा त्यांनी वारंवार पुनरुच्चारही केला. मात्र त्यांच्या या भुलभलय्यापासून लोकांनी स्वतःला दूर ठेवणेच पसंत केले. राबडीदेवी राघोपूर मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत.
यावेळीही मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी (भाजप) या दोन्ही नेत्यांना मतदारांकडून भरभरून पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या गोटात कमालीचा उत्साह दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यातील ४७ पैकी किमान ३७ जागांवर जदयु आणि भाजपचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास नितीशकुमार व सुशीलकुमार मोदी यांनी व्यक्त केला आहे.
पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय, प्रादेशिक, स्थानिक असे मिळून ४७ पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील या निवडणुकीत कॉंग्रेसने ४६ जागांवर उमेदवार उभे केलेले आहेत. अपवाद केवळ आलमनगरचा. त्यापाठोपाठ बहुजन समाजवादी पक्ष सर्वाधिक म्हणजे ४५ जागांवर निवडणूक लढवत आहे. बहादूरगंज आणि मनिहारी हे मतदारसंघ त्यांनी वगळले आहेत. पहिल्या टप्प्यात केवळ आठ जागांवर सुरक्षितरित्या निवडणूक लढविली जात आहे. डाव्यांनी ३६ जागांसाठी दावा केला आहे.
बिहारबाहेरील अनेक पक्ष या निवडणुकीत सहभागी झाले आहेत. त्यात झारखंड मुक्ती मोर्चा, जम्मू काश्मीर नॅशनल पॅंथर्स पक्ष, मुस्लिम लीग केरळ स्टेट कमिटी, भारत विकास मोर्चा, शिवसेना, झारखंड दिशोम आदी पक्षांचा समावेश आहे.

पणजीत दोन लाखांची चोरी

पणजी, दि. २० (प्रतिनिधी): पणजीत आज दोन ठिकाणी झालेल्या चोऱ्यांत दोन लाखांवर किमतीचा सामान चोरीस गेला. आल्तिनो येथे परेरा अपार्टमेंट मध्ये असलेल्या सुरक्षा रक्षकानेच तीन लॅपटॉप, एक पेनड्राव्ह व एक युएसबी घेऊन पळ काढल्याची तक्रार पणजी पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. याची किंमत सुमारे १ लाख ४२ हजार ७४४ रुपये होत असल्याचे तक्रारदार मिथुन खांडोळकर यांनी म्हटले आहे. पोलिसांनी अमित के. आर. सिंग याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. एका हॉटेलमध्ये पुण्याच्या पर्यटकाचे ८० हजारांचे सामान चोरीस गेले आहे.
अधिक माहितीनुसार दि. १८ ते १९ च्या रात्री आल्तिनो येथील आकाशवाणीच्या समोर असलेल्या परेरा अपार्टमेंटमध्ये अमित सिंग हा सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला होता. दि. १९ रोजी मिथुन याने लॅपटॉप ठेवण्यात आलेल्या खोलीत प्रवेश केला असता त्याला तीन लॅपटॉप गायब असल्याचे लक्षात आले. यावेळी त्याने सुरक्षा रक्षकाची शोध घेतला असता तोही बेपत्ता असल्याचे दिसून आले. याची तक्रार पोलिस स्थानकात केल्यानंतर सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या त्या कंपनीशी संपर्क साधण्यात आला आहे. सदर सुरक्षा रक्षक आसाम येथील असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. याविषयीचा अधिक तपास पणजी पोलिस करीत आहे.
पर्यटकाची रोकड चोरली
शहरातील एका हॉटेलमधून पर्यटकाचे ८० हजार रुपये चोरीला गेल्याची तक्रार पणजी पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. रात्री झोपलेला असताना अज्ञात व्यक्तीने खोलीत प्रवेश करून ही चोरी केली असल्याची तक्रार पुणे येथील सचिन नारायण विचे यांनी केली आहे. पोलिसांनी गुन्हा भा.द.स २७६ व ३८० कलमानुसार गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार सचिन हा पणजी येथील हॉटेल "पार्क प्लाझा'च्या खोली क्रमांक ४०१ मध्ये उतरला होता. रात्री जेवण झाल्यानंतर झोपी गेला असता अज्ञात व्यक्तीने खोलीत प्रवेश करून त्याठिकाणी ठेवलेल्या रकमेची चोरी केली. यात ५०० रुपयांचा १५५ नोटा तर, १०० रुपयांचा १७ नोटा होत्या, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. सकाळी उठवल्यावर ही घटना त्याच्या लक्षात आली. तसेच, गॅलरीचा दरवाजाही खुला असल्याचे त्याच्या लक्षात आले. या घटनेची त्यांनी पणजी पोलिस स्थानकात तक्रार केली असून त्याने हॉटेलमधील व्यक्तीवर संशय व्यक्त केला आहे. याविषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक बबन पवार करीत आहे.

ध्वनिप्रदूषणावर कारवाईचा अधिकार नेमका कोणाला?

उच्च न्यायालयाने मागितली यादी
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): ध्वनिप्रदूषण विरोधी तक्रारीवर कारवाई करण्याचा अधिकार निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला नाही, अशी माहिती आज न्यायालयात दिल्यानंतर कोणत्या दर्जाच्या अधिकाऱ्यांना यावर कारवाई करण्याचे अधिकार आहेत, असा प्रश्न करून त्या सर्व अधिकाऱ्यांची नावे, त्यांचे अधिकार, मोबाईल क्रमांक व अन्य माहिती येत्या आठ दिवसात न्यायालयात सदर करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले.
आज कळंगुट पोलिस स्थानकाचे निरीक्षक नॉलास्को रापोझ यांनी न्यायालयात हजेरी लावून आपल्याला या तक्रारीवर कारवाई करण्याचा अधिकार नसल्यानेच कारवाई झाली नसल्याचे सांगितले. गेल्यावेळी ध्वनी प्रदूषण विरोधात दाखल झालेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे "सिटीझन कमिटी ऑन नॉईस पोल्यूशन'ने न्यायालयात अर्ज सादर केल्यानंतर निरीक्षक रापोझ यांना नोटीस बजावून न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रापोझ हे आज गोवा खंडपीठात हजर होऊन त्यांनी नोटिशीला उत्तर सादर केले.
अनेकदा तक्रारी करूनही कळंगुट पोलिस त्याची दखल घेतली जात नाही, तसेच दोषींवर कारवाईही केली जात नाही, असा दावा "सिटीझन कमिटी ऑन नॉईस पोल्यूशन'ने केला होता. त्याची गंभीर दखल गोवा खंडपीठाने घेतली होती. हा प्रकार दक्षिण गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवरही सुरू दि. १८ ऑगस्ट, २६ सप्टेंबर अशा तारखांना तक्रारी करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी या तक्रारींची अजिबात दखल घेतली नाही व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली नाही, असे समितीने सांगितले.
किनाऱ्यांवर पार्ट्यांचे आयोजन करून रात्री अपरात्री त्या ठिकाणी कर्णकर्कश संगीत लावले जाते. याचा लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यावर अंकुश ठेवण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक ठिकाणी समितीही स्थापन करण्यात आली आहे. मात्र त्या समितीकडून केलेल्या तक्रारींना अनुसरून कोणतीही कारवाई होत नसल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे.

खलीचे जड झालेय ओझे!

'बिग बॉस'ला आर्थिक फटका
मुंबई, दि. २०: डब्ल्यूडब्ल्यूईचा चॅम्पियन ठरलेला खली हा सध्या "बिग बॉस'मधील सर्वात महागडा पाहुणा ठरतो आहे. वाईल्ड कार्डद्वारे या घरात प्रवेश घेतलेला खली एक दिवसासाठी ५ लाख रुपये घेत आहे.
शोमध्ये येण्यासाठी इतकी प्रचंड मोठी रक्कम घेणारा "बिग बॉस'मधील हा पहिलाच ऐतिहासिक पाहुणा ठरला आहे. या शोच्या प्रसारणकर्त्यांनी खलीला देण्यात येणाऱ्या रकमेची अधिकृत पुष्टी केली नसली तरी खलीने या शोमध्ये येण्यासाठी दर आठवड्याला ४० ते ५० लाख रुपये घेतल्याचे बोलले जात आहे.
या शोमध्ये भाग घेणाऱ्यांना साईनिंग अमाऊन्टव्यतिरिक्त बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी दर आठवड्याला वेगळी रक्कम दिली जाते. ही रक्कम त्या-त्या कलाकाराच्या बाजारभावानुसार २ लाख ते २५ लाखापर्यंत असते. याशिवाय स्पर्धकाला आठवडाभरासाठी १ ते ३ लाख रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते. मनोज तिवारी आणि श्वेता तिवारीसारख्या कलावंतांना दर आठवड्याला ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळते. खलीवर होणारा खर्च लक्षात घेता त्याचा बिग बॉसच्या घरात जास्त दिवसांचा मुक्काम राहणार नाही, असे विश्वसनीय वृत्त आहे.

'सेझ'निकालाच्या विलंबामुळे रहस्य वाढले!

अडीच महिना उलटला तरी निकाल न्यायालयात बंदिस्त
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात विशेष आर्थिक विभाग (सेझ) प्रकरणी अंतिम सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखीव ठेवण्याच्या घटनेला आता अडीच महिने होत आले तरीही अद्याप निकाल जाहीर होत नसल्याने "सेझ' विरोधकांत काहीसे चिंतेचे वातावरण पसरले आहे. एकीकडे केंद्र सरकारकडून राज्यातील अधिसूचित "सेझ' रद्द करण्यास चालढकलपणा केला जात आहे तर दुसरीकडे न्यायालयाकडूनही निकालाला विलंब लावला जात असल्याने हा नेमका काय प्रकार आहे, असाच सवाल उपस्थित केला जात आहे.
गोवा औद्योगिक विकास महामंडळाकडून एकूण सात "सेझ' स्थापन करण्यासाठी सुमारे ३२ लाख चौरसमीटर जागा विविध कंपन्यांना देण्यात आली आहे. राज्यात "सेझ'विरोधात व्यापक जनक्षोभ उठल्यानंतर हे सर्व "सेझ' रद्द करणे राज्य सरकारला भाग पडले. या "सेझ'साठी देण्यात आलेली जमीन ताब्यात घेण्यास मात्र आता अनेक अडथळे निर्माण होत आहेत.एकूण सात "सेझ' पैकी तीन "सेझ'प्रकल्प अधिसूचित झाले आहेत व त्यांची अधिसूचना रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या विनंतीला केंद्राकडूनही विशेष दाद दिली जात नसल्याचेच पाहणीत आले आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडून वारंवार दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते, परंतु राज्य सरकारने विनंती करूनही अधिसूचित "सेझ' रद्द करण्यास केंद्राकडून का विलंब केला जातो याचे समर्पक उत्तर त्यांनाही देणे शक्य होत नाही, अशी नाराजीच "सेझ' विरोधक व्यक्त करीत आहेत.
हा चालढकलपणा संशयाच्या घेऱ्यात सापडला असून विरोधी भाजपकडून "सेझ' प्रकरणी घोटाळा झाल्याचा जो आरोप होतो आहे, त्यात तथ्य असल्याचेच यातून निष्पन्न होते, अशी प्रतिक्रिया "सेझ'विरोधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. लोकांच्या जमिनी कवडीमोल दरांत विकत घेऊन "सेझ' कंपन्यांच्या घशात घालण्याच्या या व्यवहारांत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असून त्यामुळेच या प्रकरणी केवळ वेळ मारून नेण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, अशी टिका भाजपने केली आहे.
दरम्यान, न्यायालयाचा निवाडा काय लागेल याकडे राज्य सरकारचे डोळे खिळून आहेत.अधिसूचित झालेल्या तिन्ही "सेझ'कंपन्यांकडून प्रत्येकी पाचशे रुपयांची नुकसान भरपाई मिळावी,असा दावा केला आहे. "सेझ'साठी दिलेल्या जमिनीव्दारे गोवा औद्योगिक विकास महामंडळाला केवळ ६० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत व आता निकाल "सेझ'कंपन्यांच्या बाजूने लागल्यास दीड हजार कोटी रुपये कुठून देणार, असा यक्षप्रश्न राज्य सरकारला पडला आहे. अधिसूचित झालेल्या "सेझ' कंपनीत "मेडिटेब स्पेशलिटीज प्रा.लि',"पेनिन्सूला फार्मा रिसर्च प्रा.लि' व "के.रहेजा कॉर्पोरेशन प्रा.लि'या कंपनींचा समावेश आहे.
याप्रकरणी "जीआयडीसी'चे व्यवस्थापकीय संचालक अजित नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही न्यायालयाच्या निवाड्याची प्रतीक्षा करीत असल्याचे सांगितले.न्यायालयाच्या निवाड्यानंतरच पुढील कृती ठरवण्यात येईल.या निवाड्याच्या विलंबाबाबत त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.

Wednesday, 20 October 2010

केंद्राकडून कॉमन 'वेल्थ'ची सामूहिक लूट

पंतप्रधानांचे कार्यालयही गुंतल्याचा भाजपचा आरोप
भाजप पक्षाध्यक्ष नितीन गडकरींचे टीकास्त्र
-महाघोटाळ्‌याची"जेपीसी'मार्फत चौकशी करा!
-संपूर्ण मंत्रिमंडळच भ्रष्टाचाराच्या छायेत
-बजेटची "कोटीच्या कोटी' उड्डाणे कशी?
-पंतप्रधानांच्या डोळे झाकून स्वाक्षऱ्या?
-घोटाळ्‌याचा पैसा स्वीस बॅंकेत जमा
-भ्रष्ट मंत्र्यांबद्दल पंतप्रधानांचे विचार कळावेत

नवी दिल्ली, १९ (प्रतिनिधी): "राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धे'च्या आयोजनात, पायाभूत सोयी-सुविधा उभारण्यात महाघोटाळा झाला. या महाघोटाळ्यात पंतप्रधान कार्यालय आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळच गुंतलेले आहे. कोट्यवधी रुपयांच्या या महाघोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत(जॉईट पार्लमेंटरी कमिटी­-जेपीसी) चौकशी करायलाच पाहिजे,' अशी जोरदार मागणी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली. ११, अशोका मार्गावरील पक्षाच्या मुख्यालयात आयोजित या भरगच्च पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. या महाघोटाळ्यातील कथित राजकीय व्यक्तींच्या सहभागाची चौकशी होणे गरजेचे आहे. कोणताही उशीर न करता या घोटाळ्यातील दोषींना शिक्षा होणे आवश्यक आहे, असेही गडकरी म्हणाले.
"राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात जो महाभ्रष्टाचार झाला, त्याला थेट पंतप्रधान जबाबदार नाहीत? राष्ट्रकुलसंबंधी निधी देताना ज्या दस्तावेजांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, त्याची शहानिशा पंतप्रधानांनी केली होती?' असे प्रश्न उपस्थित करत गडकरी यांनी या स्पर्धेच्या आयोजनात थेट पंतप्रधान कार्यालय आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळच गुंतले असल्याचा आरोप केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात प्रारंभी १८९९ कोटी रुपयांचे बजेट होते. मात्र, हे बजेट शेवटी ७० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. आयोजन समितीला स्पर्धेसाठी पैसा जारी करताना पंतप्रधान ज्या दस्तावेजांवर स्वाक्षऱ्या करत गेले, त्या दस्तावेजांच्या वास्तविकतेची शहानिशा त्यांनी स्वाक्षऱ्या करण्यापूर्वी केली होती का? असा सवाल करीत गडकरी यांनी या महाघोटाळ्यातील तथ्यं उजेडात आणण्यासाठी मंत्रिमंडळ सचिवांच्या नेतृत्वात एका उच्चाधिकार समन्वय समितीची नियुक्ती करावी, अशी मागणीही केली.
""राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील भ्रष्टाचारात गुंतलेल्या राजकारण्यांची, तसेच सर्वच मंत्र्यांची चौकशी व्हायला पाहिजे व महाघोटाळ्याची सर्वांगीण चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करायला पाहिजे. या महाघोटाळ्याशी संबंधित जे ठोस पुरावे भाजपाने गोळा केलेले आहेत, ते संयुक्त संसदीय समितीसमोर ठेवले जातील,'' असे गडकरी म्हणाले. "या चौकशीत पंतप्रधान कार्यालयाचीही चौकशी व्हायला पाहिजे का,' या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले, "स्पर्धेशी संबंधित पैसा देण्याच्या कागदपत्रांवर पंतप्रधान कार्यालयानेच स्वाक्षऱ्या केल्या असल्याने स्वाभाविकपणे पंतप्रधान कार्यालयाचीही चौकशी व्हायलाच पाहिजे. कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, कपिल सिब्बल, अजय माकन, जितीन प्रसाद हे आयोजन समितीचे सदस्य असल्याने ते सुद्धा जबाबदार आहेत, असेही गडकरी म्हणाले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांची विश्वसनीयता संपूर्ण देशालाच माहीत आहे. सुरेश कलमाडी हे काय आहेत आणि त्यांनी काय काम केले आहे, हे कॉंग्रेस पक्षातील प्रत्येकालाच माहीत आहे. कलमाडींच्या सल्ल्याने, सांगण्याने पंतप्रधानांनी निधी जारी केला का? आणि निधी जारी करण्यापूर्वी नियमांची पूर्तता केली गेली का? पंतप्रधानांनी याची शहानिशा केली होती का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे, अशी मागणी गडकरी यांनी केली.
यावेळी गडकरी यांनी पंतप्रधानांनाच थेट सवाल केले. "राष्ट्रकुलमधील या महाघोटाळ्याला तुम्ही जबाबदार नाही? तुम्ही खर्च आणि अंदाजाची योग्य शहानिशा न करताच आयोजन समितीच्या सांगण्यानुसार अतिरिक्त बजेट वाढवून दिले. तुम्ही जर असे केले नसते तर भ्रष्टाचाराला वेसण बसले असते. आता तुमचे मंत्री, कॉंग्रेसचे नेते, दिल्लीच्या मुख्यमंत्री भ्रष्ट अधिकाऱ्यांविषयी बोलत आहेत. परंतु, भ्रष्ट मंत्र्यांबद्दल तुमचे काय विचार आहेत? हे जरा कळू द्या,' असे गडकरी म्हणाले.
राष्ट्रकुल स्पर्धांमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्याची आमची मागणी पंतप्रधान मान्य करतील, असा विश्वास आणि आशा आम्हाला आहे. मात्र, आमची ही मागणी मान्य न केल्यास भाजपा ९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वादळ निर्माण करेल, असा इशाराही गडकरी यांनी यावेळी दिला.
राष्ट्रकुलमधील भ्रष्टाचार मॉरिशसमार्गेही झाला आणि ओळख उघडकीस येऊ नये, यासाठी पैसा स्वीस बॅंकेत जमा झाला, हे पंतप्रधानांना ठाऊक आहे का? भ्रष्टाचाराचा पैसा स्वीस बॅंकेत जमा होण्याचा हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. आणि पंतप्रधान आपल्याला जणू काहीच माहीत नसल्याचे भासवत आहेत, असा प्रहारही गडकरी यांनी केला.
...आणि मनीष तिवारी भडकले
कॉंग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन गडकरींवर पलटवार करण्याचा प्रयत्न केला. आपल्या पक्षाचे कार्यकर्ते यात अडकण्याची शक्यता असल्यामुळेच गडकरींनी पंतप्रधानांवर आरोप केले, असेही तिवारी म्हणाले. दरम्यान, एका पत्रकाराने, चौकशीची सुरुवात भाजपाचे मित्तल यांच्यापासूनच का? कलमाडी किंवा शीला दीक्षितांपासून का नाही? असे प्रश्न विचारताच तिवारी संतप्त झाले आणि ते पुन्हा भाजप कार्यकर्त्यांवर घसरले.

कसाबचा उद्यामपणा!

मुंबई, दि. १९ : मुंबई हल्ल्याच्या खटल्यादरम्यान आपले वेगवेगळे रंग दाखविणाऱ्या कसाबने आज हायकोर्टातील सुनावणीदरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या कॅमेऱ्यावरच थुंकण्याचा प्रताप केला.
कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्याच्या याचिकेवर सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. उच्च न्यायालयात कसाबला हजर करणे सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय जिकरीचे असल्याने त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोर्टात सादर केले जात आहे. कालपासून ही सुनावणी सुरू झाली. काल कसाब कॅमेऱ्यावर सातत्याने स्मितहास्य करताना झळकला. पण, आज मात्र त्याचा मूड काही वेगळाच होता. त्याने कोर्टात जातीने हजर राहण्याची इच्छा न्यायमूर्तींसमोर व्यक्त केली. त्याची चिडचीड स्पष्टपणे दिसून येत होती. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान आवाजही नीट ऐकू येत नव्हता. त्यामुळे तो तेथे असणाऱ्या पोलिसावर चिडला आणि कॅमेऱ्यावरच थुंकला, हे दिसले. पण, तो नेमके काय बोलत होता, हे लक्षात आले नाही.
'मला अमेरिकेला पाठवून द्या'
दरम्यान, न्या. रंजना देसाई आणि न्या. आर. व्ही. मोरे भोजनासाठी निघून गेले. नंतर पुन्हा सुनावणी सुरू होताच कसाबने पोलिसांसोबत बाचाबाची सुरू केली. तो म्हणाला की, मला अमेरिकेला पाठवून द्या. मला बाहेरचे जग पाहायचे आहे. तुम्ही मला येथे का ठेवले आहे?
त्यावर न्यायमूर्ती म्हणाले की, अमेरिकेला जाण्याच्या आग्रहाविषयी तू आपल्या वकिलांशी बोल. नंतर कसाब पुन्हा चिडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सोडून जाताना दिसला. त्यावेळी न्यायमूर्तींनी कायद्यानुसार कसाब न्यायालयात उपस्थित राहणे गरजेचे नसल्याचे स्पष्ट केले.
जेवणाच्या सुटीदरम्यान कसाब कॅमेऱ्यावर थुंकल्याचे सांगताच न्यायमूर्ती म्हणाले की, त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. आता तो स्वत:हूनच निघून गेला तर त्यावर न्यायालय काहीही करू शकत नाही. आपल्या कृत्याचा काही पश्चात्ताप असल्याचे त्याचे कृतीवरून अजीबात दिसत नसल्याचेही न्यायमूर्ती म्हणाले.

वाळपईची मतमोजणी उद्या सकाळी पणजीत

निकाल ९ वाजेपर्यंतशक्य
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): दि. १८ रोजी झालेल्या वाळपई पोटनिवडणुकीची मतमोजणी परवा गुरुवार दि.२१ रोजी पणजी येथील "गोवा कॉलेज ऑफ होम सायन्स'च्या सभागृहात सकाळी ८ वाजता एक नंबरच्या कक्षात होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संतोष हळदणकर व कॉंग्रेसचे उमेदवार आरोग्यमंत्री विश्र्वजित राणे यांच्यात ही लक्षवेधक लढत झाली असून दोन बलाढ्य पक्षातीत समोरासमोर झालेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे तमाम जनतेचे लक्ष लागले आहे.
वाळपई मतदार संघातील एकूण २७ मतदान केंद्रावर १७,९२० मतदारांपैकी १४,८८४ मतदारांनी (८३.०८ टक्के) मतदान केले आहे.यात ७,६६४ पुरुष व ७,२२० महिलांनी मतदान केले आहे.दि.२१ रोजी उपजिल्हाधिकारी अँथनी डिसोझा यांच्या देखरेखीखाली ही मतमोजणी होणार असून मतदान यंत्राद्वारे मतदान झाले असल्याने मतमोजणी लवकर पूर्ण होऊन निकाल एका तासाभरातच मिळण्याची शक्यता आहे.पणजीतील गोवा कॉलेज ऑफ होम सायन्सच्या सभागृहात मतमोजणीच्या वेळी मोबाईल वा कॅमेरा वापरावर बंदी असून उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी एस.पी. सिग्नापूरकर हे प्रसिद्धी माध्यमांना वेळोवेळी मतदानाबद्दल वृत्त देणार आहेत. मतमोजणी पणजीत होत असल्याने पणजी शहरातील दारू दुकाने दि.२१ रोजी बंद राहणार आहेत. बार व रेस्टॉरंट मालकांना आपल्या दुकानात फक्त खाद्य पदार्थ विकता येथील. मतमोजणीसाठी कडक सुरक्षा ठेवण्यात आली असून परिसरात मोठा पोलिसफाटा तैनात करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्गातील खाण परवान्यांचा फेरआढावा घ्या : जयराम रमेश

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सूचना
मुंबई, दि. १९ : निसर्गसंपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोह व बॉक्साईटच्या खाणींसाठी ४९ लीज परवाने देण्याच्या निर्णयाचा राज्य सरकारने फेरविचार करावा, अशी सूचना केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री जयराम रमेश यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना केली आहे. या ४९ खाणींना जर खरोखरच अनुमती देण्यात आली तर त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनसंपदा आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतात. ज्या ठिकाणी या खाणी होऊ घातल्या आहेत तेथील स्थानिकांनी यापूर्वीच अशा स्वरूपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मंत्री रमेश यांनी या मुद्याची गंभीर दखल घेतली आहे. एकदा का या खाणींचा विषारी विळखा सिंधुदुर्ग जिल्ह्याला पडला की, त्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे तेथील भूमिपुत्रांना केवळ अशक्य होणार आहे. कारण, खाणींचे मालक जरी आरंभी पर्यावरणाचा तोल सांभाळण्याचे नाटक करून तसे आश्वासन देतात, तरी एकदा खाणीतून प्रचंड पैसा मिळू लागला की, त्यांना या आश्वासनांचा विसर पडतो. वृक्षारोपणासारखे कार्यक्रम फक्त नावापुरतेच केले जातात. अनेकदा जाहिरातींद्वारे अमूक एका क्षेत्रात प्रचंड वृक्षलागवड केल्याचे दावे करण्यात येतात. प्रत्यक्षातील अनुभव मात्र अत्यंत विदारक असतो. शिवाय या खाणींमुळे तेथील लोकवस्त्या जवळपास उद्ध्वस्त होतात. लोकांच्या आरोग्यावर भयंकर परिणाम होतात. पुढच्या पिढ्यांनाही त्याचे भयावह परिणाम सोसावे लागतात. गोव्यात वर्षानुवर्षे हेच चित्र दिसून येत आहे. आता त्या दिशेने सिंधुदुर्गची वाटचाल सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळेच तेथील जनतेत कमालीची अस्वस्थता जाणवू लागली आहे. यातून सुटका होण्यासाठीच सिंधुदुर्गवासीयांनी थेट केंद्र सरकारलाच साकडे घातले आहे.

नितीशकुमार सर्वांत 'समर्थ' मुख्यमंत्री

अडवाणींनी उधळली स्तुतिसुमने
बिहार विधानसभा निवडणूक

पाटणा, दि. १९ : बिहारला लाभलेला आतापर्यंतचा "सर्वांत समर्थ' मुख्यमंत्री अशी स्तुतिसुमने नितीशकुमार यांच्यावर उधळतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज एका प्रचार रॅलीत "युपीए'च्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर टीकेचा भडिमार केला. दरम्यान, आज पहिल्या टप्प्यातील जाहीर प्रचार समाप्त झाला.
बिहारी जनतेनेच नितीशकुमार यांना सर्वाधिक पसंती दिलेली असतानाच नितीशकुमार यांनी केंद्राच्या योजना राज्यात पूर्ण ताकदीनिशी राबवल्या नाहीत, असा आरोप डॉ. सिंग यांनी १६ ऑक्टोबर रोजी सीमाचल येथे केला होता. तसेच बिहारचा जो विकास झाला तो प्रामुख्याने केंद्राच्या विविध योजनांमुळेच, अशी पुस्तीदेखील डॉ. सिंग यांनी जोडली होती. श्रीमती सोनिया गांधी यांनीही पंतप्रधानांच्याच आरोपांची री ओढली होती. त्या आरोपांचा श्री. अडवाणी यांनी चांगलाच समाचार घेतला.
गेल्या पंधरा वर्षांत बिहारमध्ये जंगलराज राबवलेल्या मंडळींना जनता कधीच माफ करणार नाही, असे श्री. अडवाणी यांनी लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान या जोडगोळीचे नाव न घेता सांगितले. कॉंग्रेसचे तर कोठेच नामोनिशाणही दिसून येत नाही. याच्या उलट नितीशकुमार आणि सुशीलकुमार मोदी यांनी बिहारला विकासाच्या एका नव्या वळणावर आणून ठेवले आहे. त्यामुळेच यापूर्वी जातीची समीकरणे मांडणाऱ्या मंडळींना आता विकासाच्या मुद्यावर बोलण्याची पाळी आली आहे, असा त्यांनी शालजोडीतून लगावला.
तसेच लोकसभेच्या निवडणुकांबरोबरच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकाही घेतल्या जाव्यात, या आपल्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. त्यामुळे जनतेचे कोट्यवधी रुपये वाचतील आणि हा पैसा विकासाच्या कामांकडे वळवता येईल, असे ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या वादग्रस्त वक्तव्याला श्री. अडवाणी यांनी तीव्र आक्षेप घेतला. "एक देश मे दो विधान, दो प्रधान नही चलेंगे,' असे त्यांनी निक्षून सांगितले. परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी ओमर अब्दुल्ला यांच्या विधानांचे समर्थन केल्याबद्दल अडवाणी यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला
दरम्यान, २४३ विधानसभा जागांपैकी पहिल्या टप्प्यात येत्या २१ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठीचा प्रचार आज समाप्त झाला. या टप्प्यात ४७ जागांकरिता होणाऱ्या निवडणुकीत ६३५ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. त्यामध्ये सत्तारुढ जनता दल युनायटेड २६ तर भारतीय जनता पक्ष २१ जागा लढवत आहे. १.०६ कोटी मतदार मतदान करणार असून त्यासाठी १०४५४ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. बिहारमध्ये निवडणुका म्हटल्या की, प्रामुख्याने नक्षल्यांकडून हिंसाचार उफाळतोच. तसा तो यावेळी उफाळू नये यास्तव कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
------------------------------------------
पुन्हा जेडीयु -भाजपच
या निवडणुकीसंबंधी विविध वाहिन्यांनी घेतलेल्या मतदानपूर्व चाचणीत नितीशकुमार यांनाच सर्वोच्च पसंती दिली आहे. बिहारमध्ये पुन्हा "एनडीए'चेच (जेडीयु आणि भाजप) सरकार स्थापन होणार, असा निष्कर्ष या वाहिन्यांनी काढला आहे.

Tuesday, 19 October 2010

वाळपईत विक्रमी ८३.१० टक्के मतदान

-हळदणकर व राणेंचे भवितव्य सीलबंद
-निकालाबाबत वेगवेगळे तर्कवितर्क
२१ रोजी निकाल

पणजी, वाळपई दि. १८ (प्रतिनिधी): वाळपई मतदारसंघासाठी आज झालेल्या पोटनिवडणुकीत ८३.१० टक्के मतदान झाले असून कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेस उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून त्याचा निकाल येत्या २१ ऑक्टोबर रोजी लागणार आहे. आज सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत झालेल्या या मतदानात मुरमूणे या मतदान केंद्रात सर्वांत जास्त म्हणजे ९३.४४टक्के तर, वाळपई ५(अ) या मतदान केंद्रावर सर्वांत कमी ६४.३७ टक्के एवढे मतदान झाल्याची नोंद झाली आहे.
एकूण १७ हजार ९२० मतदारापैंकी १४ हजार ८८४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क यावेळी बजावला. यात ७ हजार ६६४ पुरुष तर, ७ हजार २२० महिलांनी मतदान केले.
सकाळी ८वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या मतदानासाठी काही मतदान केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासूनच रांगा लागल्याचे पाहायला मिळत होते. यात महिला मतदारांच्या रांगा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होत्या. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात बंदूकधारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा जवानांना तैनात करण्यात आले होते.
अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विश्वजित राणे यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी २७ जुलै रोजी राजीनामा दिल्याने आज घेण्यात आलेल्या या पोट निवडणुकीत अनेकांनी या प्रकाराचा धिक्कार करून मतदान केले. ब्रम्हकरमळी या भागात मतदान करण्यासाठी रांगेत उभे राहिलेल्या लोकांना प्रतिक्रिया विचारली असता खाणीचे समर्थन करणाऱ्या उमेदवाराला आम्ही कदापिही मतदान करणार नाही, असेच अनेकांनी सांगितले. ही निवडणूक एकतर्फी होणार नसल्याचेही अनेकांचे म्हणणे होते. त्यामुळे येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणी वेळीच धक्कादायक चित्र स्पष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मतदान करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदाराचे संगणकाद्वारे छायाचित्र घेतले जात होते. त्यानंतर अंगठ्याचा ठसा घेऊनच मतदान करण्याची परवानगी दिली जात होती. बोगस मतदान टाळण्यासाठी अशा प्रकारची पहिल्यांदाच काळजी घेण्यात आली होती. एका मतदाराचे छायाचित्र आणि अंगठ्याचा ठसा घेण्यासाठी एका मिनिटाचा अवधी लागत होता. सकाळपासूनच वाळपईत पावसाची रिपरिप सुरू होती. तरीही मोठ्या संख्येने मतदार मतदानासाठी बाहेर पडले होते. अनेक मतदान केंद्रावर मतदारांना आणण्यासाठी वाहनांचीही सोय ठेवण्यात आली होती. सकाळपासूनच दोन्ही उमेदवार मतदान केंद्रावर फिरताना दिसत होते. अनेक मतदान केंद्रावर दुपारी २.३० पर्यंत ५० टक्के मतदानाची नोंद झाली होती.
धावे प्राथमिक विद्यालयात मतदान केंद्रावर दुपारी जेवणाचा वेळ असूनही महिला मतदारांची मोठ्या संख्येने रांग पाहायला मिळत होती. सत्तरी युवा मोर्चाचे अध्यक्ष तसेच अन्य पदाधिकारीही गाड्या घेऊन मतदान केंद्राच्या आसपास फिरत असल्याचे दिसत होते. ""विश्वजित राणे यांनी मंदिरे बांधण्यासाठी पैसे दिले आहेत. मुलांना नोकऱ्या दिल्या आहेत. खाणींना आमचा विरोध नसला तरी, बेकायदेशीर सुरू असलेल्या खाणी बंद झाल्या पाहिजेत'' अशी प्रतिक्रिया गुळेलीचे जिल्हा पंच सदस्य हुमलो टी. गावडे यांनी व्यक्त केली. या मतदान केंद्रावर दुपारी १२ पर्यंत ५९० मतदारांपैकी ३३६ मतदारांनी मतदान केले होते.
उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहिर वर्धन, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस हे जातीने याठिकाणी लक्ष ठेऊन होते. सायंकाळी मतदानानंतर मतदान यंत्र कडक पोलिस पहाऱ्यात पणजी येथील होम सायन्स महाविद्यालयात हलवण्यात आल्या.
ज्येष्ठ मतदार यशवंत रामकृष्ण गाडगीळ
परवान्याचे नूतनीकरण करण्यांसाठीच लादलेली ही निवडणूक आहे. या देशात लोकशाही राहिलेली नाही. लोकांचा पाठिंबा पैशांना आहे. लोक पैसे घेऊन मतदान करीत आहेत. पैशांच्या बळामुळे सत्ताधारी पार्टीचाच जोर पाहायला मिळतो. वडील चांगले होते पण, विश्वजित राणेंचे हे राजकारण खतरनाक असून यापूर्वी असा प्रकार वाळपईत कधीच पाहिला नव्हता, अशी प्रतिक्रिया १९५१ पासून मतदानात मतदान करणारे श्री. गाडगीळ यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील नारायण राणेंचा मुलगा काय आणि या राणेंचा मुलगा काय सर्व एकच, अशी तिखट टिपणीही त्यांनी यावेळी केली.
विश्वजित राणेंची सावध भूमिका
प्रचार न करता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची आपण अनामत रक्कम जप्त करणार असल्याची डरकाळी फोडणारे कॉंग्रेस उमेदवार विश्वजित राणे यांना भाजप उमेदवार संतोष हळदणकर यांनी अक्षरशः घाम काढला. मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना विश्वजित राणे यांनी आपणास विजयाची खात्री असल्याचा दावा करताना, निश्चित किती मताधिक्याने जिंकू हे सांगण्यास नकार दिला.
खाणीचा मुद्दा प्रभावी ः संतोष हळदणकर
मतदान यंत्रात सर्व काही बंद झालेले आहे. त्यामुळे येत्या २१ रोजी चित्र स्पष्ट होणार आहे. लोकांनी मला उदंड प्रतिसाद दिला. खाण विरोधाचा मुद्दा बराच प्रभावी ठरला असल्याचेही यावेळी श्री. हळदणकर यांनी सांगितले. खाणीला विरोध करणाऱ्याबरोबर आपण सतत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

वास्कोत दोन अपघातांत विवाहितेसह दोघे ठार

वास्को, दि. १८ (प्रतिनिधी): आज संध्याकाळी वास्को शहरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात मंागोरहिल येथील २३ वर्षीय नाझिया सय्यद नावाच्या विवाहित युवतीला व बिर्ला येथील चाळीस वर्षाच्या हरिश्चंद्र लमाणी यांना आपले प्राण गमवावे लागले. अपघातात मरण पावलेला लमाणी व नाझिया दुचाकीच्या मागे बसल्याचे उघड झाले असून दोन्ही अपघातांत दुचाकींना टेंपोने धडक दिली.
आज संध्याकाळी ६.३० च्या सुमारास सेंट अँन्ड्रु चर्चसमोर झालेल्या अपघातात हरिश्चंद्र लमाणी मरण पावला, तर रात्री ८.३० वाजता मंगोरहील येथील सेंट तेरेझा विद्यालयासमोर झालेल्या अपघातात नाझिया सय्यद ही तरुणी जागीच ठार झाली. हरिश्चंद्र लमाणी हा बिर्ला येथे राहणारा इसम दिलखूष मोरजकर (कुंकळ्ळी) याच्या " हिरो होंडा पॅशन' या दुचाकीमागे बसून येत असताना त्याच बाजूने येणाऱ्या टेंपोने त्यांना धडक देऊन झालेल्या अपघातात हरिश्चंद्र व त्याचा साथीदार रस्त्यावर फेकले गेले. सदर अपघातात हरिश्चंद्र गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यास त्वरित चिखलीच्या एका खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र येथे तो मरण पावला. या अपघातानंतर दोन तासांनी मंगोरहिल येथे दुचाकी व टेंपो यांच्यात झालेल्या अपघातात नाझिया ही २३ वर्षीय युवती जागीच ठार झाल्याची माहिती वास्को पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन अपघाताचा पंचनामा केला. पोलिसांनी माहितीनुसार नाझिया ही विवाहित युवती नझरुद्दीन शेख याच्या दुचाकीवर (होंडा ट्विस्टर क्रः जीए ०६ एच २२७८) मागे बसून मंगोरहिलच्या दिशेने जात होती. यावेळी याच दिशेने जाणाऱ्या "स्वराज माझदा' टेंपोने (क्रः जीए ०२ व्ही ७२८५) त्यांना मागून जबर धडक दिल्याने दुचाकीवरील अझरुद्दीन व नाझिया रस्त्यावर फेकली गेली व नाझिया जागीच ठार झाली.नाझिया विवाहित असून, तिला दोन मुले आहेत.
दोन्ही मृतदेह चिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसीयो इस्पितळात पाठविण्यात आले आहेत. वास्को पोलीस निरीक्षक ब्राज मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फिलोमीना कॉस्ता दोन्ही अपघातांबाबत तपास करीत आहेत. दोन्ही वाहनांचे चालक सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आमोणा प्रकल्पास परवानगी हा न्यायालयाचा अवमान

सरकारला नोटीस जारी
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): सेझा गोवा कंपनीला मांडवी नदीच्या काठावर आमोणा येथे "पिग आर्यन प्लांट' सुरू करण्यासाठी मान्यता दिल्याने राज्याचे मुख्य सचिव, उद्योग संचालनालयाचे संचालक व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवाविरुद्ध अवमान याचिका का दाखल करू नये, याची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नदी काठावर उद्योग स्थापन करण्यास निश्चित झालेली मार्गदर्शकतत्त्वे अधिसूचित केल्याशिवाय कोणालाही परवानगी दिली जाणार नाही, अशी हमी राज्य सरकारने गेल्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिली होती.
मात्र, याविषयीची याचिका न्यायालयात सुरू असतानाच सरकारने सेझा गोवा या खाण कंपनीला आमोणा येथे पिग आर्यन प्लांट नदीकाठावर सुरू करण्यास मान्यता दिल्याचा दावा करून ऍड. नॉर्मा आल्वरिस यांनी अवमान याचिका सादर केली. याची दखल घेऊन न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच, ही याचिका दाखल करून घेत याची सुनावणी एक सदस्यीय खंडपीठासमोर घेतली जाणार असल्याचेही न्यायालयाने आज दिलेल्या आदेशात नमूद केले.
नदीकाठावर कोणते उद्योग स्थापावे याचे निश्चित धोरण आखावे, असा आदेश यापूर्वी गोवा खंडपीठाने दिला होता. या आदेशानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण मंडळ तसेच तसेच, या खटल्यातील आमेक्युस क्युरी यांच्या सूचनेप्रमाणे मार्गदर्शकतत्त्वे निश्चित करण्यात आली होती. ती तत्त्वे अद्याप अधिसूचित करण्यात आलेली नाही, हेही यावेळी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. ही मार्गदर्शन तत्त्वे का अधिसूचित करण्यात आली नाही, असा प्रश्न यावेळी राज्य सरकारला करण्यात आली त्यावेळी प्रादेशिक आराखडा २०२१ मध्ये त्याचा समावेश असून त्यात त्याचा समावेश केला जाणार असल्याचे यावेळी सरकारी वकिलाने सांगितले. तसेच, नदीकाठावर उद्योग स्थापन करण्यासाठी अर्ज आल्यास तुम्ही काय करणार, असाही प्रश्न खंडपीठाने राज्य सरकारला केला होता. त्यावेळी ही मार्गदर्शकतत्त्वे निश्चित झाल्या व्यतिरिक्त कोणत्याही कंपनीला उद्योग स्थापन करण्याची परवानगी दिली जाणार नाही, अशी स्पष्ट हमी ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांनी दिल्यानंतर या विषयीची याचिका निकालात काढण्यात आली होती.
तरही, सेझा गोवा कंपनीला परवानगी का देण्यात आली, असा प्रश्न आज न्यायालयाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला केला असता ती हमी ऍडव्होकेट जनरल यांनी दिली होती. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्याची माहिती नव्हती, असा युक्तिवाद यावेळी ऍड. आत्माराम नाडकर्णी यांनी केला.
मात्र, ज्यावेळी न्यायालयाला राज्य सरकारने हमी दिली होती त्याच काळात सरकारने न्यायालयापासून माहिती लपवून या कंपनीला आमोणा येथे पीक आर्यन प्लांट सुरू करण्यास परवानगी दिल्याचे ऍड. आल्वरिस यांनी खंडपीठाच्या नजरेस आणून दिले. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने अवमान याचिका दाखल करून घेत राज्य सरकारला नोटीस बजावली.

११ बंडखोरांचे भवितव्य अधांतरी

-हायकोर्ट न्यायमूर्तींमध्ये मतभेद
-उद्या दुसऱ्या न्यायासनासमोर सुनावणी
-५ अपक्षांचा निकाल २ नोव्हेंबरला

कर्नाटक प्रकरण
बंगलोर, दि. १८ : कर्नाटकमधील ११ भाजप बंडखोरांसह ५ अपक्षांच्या अपात्रतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर बहुप्रतीक्षित निकाल अधांतरीच राहिला. ११ भाजप आमदारांच्या याचिकेवर उच्च न्यायालयातील दोन सदस्यीय न्यायासनाचे एकमत होऊ न शकल्याने आता यावर दुसरे न्यायासन २० ऑक्टोबरला सुनावणी करणार असल्याचे वृत्त आहे. सोबतच ५ अपक्षांच्या याचिकेवर २ नोव्हेंबर रोजी सुनावणी होईल.
भाजपच्या ११ बंडखोर आमदारांसह १६ जणांना कर्नाटक विधानसभाध्यक्ष के.जी. बोपय्या यांनी अपात्र ठरविले होते. या त्यांच्या निर्णयाला आव्हान देणारी वेगवेळी याचिका १६ जणांनी कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल केली होती. तत्पूर्वी राज्यपालांच्या आदेशानुसार येदीयुरप्पा सरकारने या १६ सदस्यांच्या अनुपस्थितीतच विश्वासमत प्राप्त केले. पण, तरीही १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय होईपर्यंत विश्वासमताला अर्थ नाही, असे बोलले जात होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष आजच्या या निर्णयाकडे लागले होते. आजची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती केहर सिंग आणि न्या. एन. कुमार यांच्या दोन सदस्यीय न्यायासनासमोर झाली. त्यात मुख्य न्यायमूर्तींनी विधानसभाध्यक्षांच्या निर्णयाला योग्य मानले. पण, न्या. एन.कुमार यांनी मात्र यावर असहमती व्यक्त केली. दोघांचेही या विषयावर एकमत न झाल्याने ही याचिका सुनावणीसाठी अन्य न्यायासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. आता हायकोर्टात दुसऱ्या न्यायासनासमोर याची सुनावणी २० ऑक्टोबर रोजी होणार आहे.
दरम्यान, पाच अपक्ष आमदारांविषयीदेखील दुसऱ्या न्यायासनासमोर सुनावणी घेण्याचा निर्णय हायकोर्टाने दिला. त्यांच्या याचिकेवर २ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. अपात्र ठरविण्यात आलेले भाजपा आमदार आणि अपक्ष यांनी वेगवेगळी याचिका दाखल केली होती. या दोहोंची सुनावणी आजच होणार होती. मात्र, आज निकाल न लागल्याने सर्वांचीच घोर निराशा झाली.
कॉंग्रेसचा आरोप
कर्नाटक उच्च न्यायालयात आज कोणताही निकाल न लागल्याने विरोधी पक्षांच्या कंपूत निराशेचे वातावरण होते. त्यातच कॉंग्रेसने सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर आमदारांची खरेदी करण्याचा आरोप लावला आहे. भाजपने आमचे आमदार विकत घेण्यासाठी ५० कोटी रुपये आणि मंत्रिपदाची लालूच दाखविल्याचा आरोप कर्नाटक कॉंग्रेसने केला आहे.

लादेनला आयएसआयचा पाहुणचार !

काबुल, दि. १८ : अमेरिका तसेच पाश्चिमात्य देशांविरुद्ध "यल्गार' करणाऱ्या ओसामा बिन लादेनला पाकिस्तानातील गुप्तहेर संघटना आयएसआयने आश्रय दिला असून, त्याची विशेष बडदास्त ठेवली जात असल्याची माहिती नाटो सेनेच्या एका कमांडरने समोर आणली आहे.
दहशतवादाला खतपाणी देण्याविषयी नेहमीच पाकिस्तान भारतासह संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाशी खोटे बोलला आहे. सध्या अतिरेक्यांविरुद्ध कारवाईच्या नावाखाली पाकिस्तान अमेरिकेकडून आर्थिक तसेच सर्व प्रकारची मदत घेत आहे. पण, प्रत्यक्षात मात्र पाकने दहशतवादाला खतपाणी घालण्याचे कार्यक्रम सुरूच ठेवले आहे. अफगाणिस्तानात तैनात असणाऱ्या नाटो लष्कराच्या एका मुख्य कमाण्डरने दिलेल्या माहितीनुसार, लादेनला सुरक्षितपणे ठेवण्याचा प्रकार आयएसआयच करीत आहे. एवढेच नव्हे तर त्याची एखाद्या पाहुण्याप्रमाणे बडदास्त ठेवली जात आहे. पाकिस्तानच्या वायव्य प्रांतात आयएसआयने लादेनला लपवून ठेवले असल्याचेही या कमांडरचे म्हणणे आहे.
केवळ लादेनच नव्हे तर तालिबानी नेता मुल्ला उमर, अल जवाहिरी यांनीही आयएसआयकडेच आश्रय घेतला आहे. पाकिस्तान या सर्व अतिरेकी संघटनांना सर्वतोपरी सहकार्य करीत असतानाच लादेसारख्या अतिरेक्याला लपविण्याचेही काम करीत आहे. लादेन चिनी सीमेनजीकच्या चितरालपासून अफगाणिस्तानला लागून असणाऱ्या खुर्रम या डोंगराळ भागात लपून बसला होता. पण, आता तर तो पाकिस्तानातच आहे. हा भाग आदिवासीबहुल आहे. तेथे पाकिस्तानी सरकारचा कोणताही अंमल नाही. मुल्ला उमर मात्र कोणत्याही एका ठिकाणी लपत नाही. तो क्वेटा आणि कराची दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी लपून असतो, अशीही माहिती उघडकीस आली आहे.

Monday, 18 October 2010

विश्वजित धास्तावले, डाव अंगलट येणार?

स्थानिक स्वाभिमान व खाणविरोधी मुद्यांवर आजच्या निवडणुकीचे भवितव्य ठरणार
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): वाळपईवासीयांना गृहीत धरून आमदारकीचा राजीनामा दिलेले आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना उद्याची पोटनिवडणूक चांगलीच जड जाणार असल्याची चिन्हे दिसत आहे. कारण नसताना लादलेल्या या पोटनिवडणुकीमुळे काहीशा अस्वस्थ बनलेल्या वाळपईच्या जनतेसाठी विश्वजित यांनी विकास हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा बनवला असला तरी लोकांची पूर्वीप्रमाणे समजूत घालताना त्यांची प्रचंड दमछाक झाल्याचेच यावेळी दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर उद्या सोमवारी होणारे मतदान महत्त्वाचे ठरणार आहे. कदाचित अतिमहत्त्वाकांक्षीपणा त्यांना महाग पडण्याचीही शक्यता आहे. भाजपने या निवडणुकीत उपस्थित केलेले स्वाभिमानजागृती व निसर्गसंपन्न सत्तरीच्या रक्षणासाठी खाण विरोध हे मुद्दे परिणामकारक ठरू लागल्याचेही प्रचारादरम्यान स्पष्ट झाले. साहजिकच संतोष हळदणकर व विश्वजित यांच्यात रंगणारा हा सामना अत्यंत चुरशीचा होईल, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
वाळपई मतदारसंघात सुरुवातीला भाजप उमेदवार संतोष हळदणकर यांचा प्रभाव कमी जाणवत होता. मात्र विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व खासदार श्रीपाद नाईक यांनी प्रचारात हिरिरीने भाग घेतला. घरोघरी प्रचार केला. मतदारांच्या मनावरील दडपण कमी केले. त्यांना निर्भय बनवले. भाजपचे अन्य राज्यस्तरीय नेते दरम्यानच्या काळात अनेक दिवस वाळपईत ठाण मांडून होते. राजकीय दबावाविरोधात स्वाभिमान असा नारा पक्षाकडून दिला गेल्याने कधी नव्हे इतके कार्यकर्तेही सक्रिय झाले होते. त्यातच हळदणकर यांचा साधेपणा आणि स्वच्छ प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू ठरल्याचेही प्रचारादरम्यान दिसून आले. सत्तरीच्या विनाशाला कारणीभूत ठरणाऱ्या खाणींना विश्र्वजित राणे यांचाच पाठिंबा आहे ही गोष्ट मतदारांच्या मनावर ठसवण्याचा भाजप नेत्यांनी सातत्याने प्रयत्न केला. या उलट विश्वजित या प्रचाराविरोधात ठोस भूमिका घेऊ शकले नाहीत. किंबहुना लोकांना हव्या असतील तर सत्तरीत खाणी येतील वगैरे स्वतःलाच अधिक अडचणीत आणतील अशी विधाने करून ते मोकळे झाले. त्यामुळे प्रस्थापित विश्वजित विरुद्ध साधे आणि सरळमार्गी संतोष हळदणकर असे या निवडणुकीचे स्वरूप बनले आहे.
विश्वजित यांच्यासाठी कॉंग्रेस पक्ष किंवा नेते म्हणावे तेवढ्या ताकदीने प्रचारात उतरल्याचे पाहायला मिळाले नाही. कदाचित आपण एकहाती हा सामना जिंकू, असा अतिआत्मविश्वास त्यांना असावा. आरोग्यमंत्र्यांच्या २०० कोटींच्या विकासातील फोलपणा दाखवून देण्यात भाजप नेते यशस्वी ठरल्याचेही चित्र दरम्यानच्या काळात पाहायला मिळाले. गेली २९ वर्षे हा भाग विकासापासून का मागास राहिला, या कालावधीत मतदारसंघाचा विकास का झाला नाही हे कळीचे मुद्दे भाजपने उपस्थित केले. आहे. विश्वजित भासवतात तो विकास केवळ कागदावरच झाला असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.
वाळपई मतदारसंघातील नगरगाव, खोतोडे, सावर्डे, गुळेली व भिरोंडा या पंचायतीबरोबरच वाळपई नगरपालिका क्षेत्रातील मतदारांचा कानोसा घेतला असता यापूर्वी राजकारण किंवा निवडणुकीसंदर्भात खुलेआम न बोलणारे मतदार आता उघडपणे आपली प्रतिक्रिया देताना दिसत होते. हळदणकर हे स्थानिक म्हणून ही निवडणूक लढवत असल्याने त्याचाही त्यांना फायदा होईल, असे या लोकांचे म्हणणे पडले. भाजपच्या "स्थानिक उमेदवाराला मतदान करा' या मुद्यालाही लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
मतांचा झोका महत्त्वाचा
वाळपई मतदारसंघाच्या या निवडणुकीत १७९१२ जणांना मतदानाचा अधिकार असून २७ केंद्रांत मतदान होईल. २००७ च्या विधानसभा निवडणुकीत विश्वजित यांना ८५९० तर भाजपचे पुती गावकर यांना ५०४१ मते मिळाली होती. या निवडणुकीत खुद्द वाळपई शहराबरोबरच ग्रामीण भागातील मते निर्णायक ठरणार आहेत. प्रामुख्याने विरोधकांचा खाणीचा मुद्दा मतदार किती उचलून धरतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
चार केंद्रे संवेदनशील
आजच्या मतदानासाठी १५० जणांना निवडणूक कामासाठी पाठवण्यात आले आहे. कडक बंदोबस्तासाठी ४५० पोलिस आणि "सीआयएसएफ'च्या दोन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. वापळई मतदारसंघातील केंद्र क्रमांक २, ३, ४ आणि ५ संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तसेच, कोणत्याही खाजगी वाहनातून मतदारांना मतदान केंद्रावर न आणण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. त्याचप्रमाणे, मतदान केंद्रात मोबाईलच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.

'राष्ट्र भक्कम होण्यासाठी धार्मिक सलोखा महत्त्वाचा'

पद्मश्री मुजफ्फर हुसेन यांचे प्रतिपादन; राष्ट्रहित मंचची दिमाखात स्थापना
म्हापसा, दि. १७ (प्रतिनिधी): सध्याच्या दोलायमान परिस्थितीत आपला देश भक्कम होणे गरजेचे आहे. त्यासाठी धार्मिक सलोखा राखणे सर्वांत महत्त्वाचे ठरावे. हिंदू आणि इस्लामी संस्कृतीत अनेक साम्यस्थळे आहेत. तोच धागा पकडून ही वीण आणखी घट्ट करत नेली तर आपल्या राष्ट्राकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही, असे प्रतिपादन पद्मश्री मुजफ्फर हुसेन यांनी आज येथे केले.
येथील मयुरा हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या एका शानदार कार्यक्रमात "राष्ट्रहित मंच'ची स्थापना करण्यात आली. त्याप्रसंगी श्री. हुसेन बोलत होते. व्यासपीठावर जगन्नाथ उर्फ सद्गुरू मणेरकर, इबादुल्ला खान, नुरुद्दीन खान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह संजय वालावलकर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. खास कार्यक्रमास खासदार श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार ऍड. फ्रान्सिस डिसोझा, माजी सभापती सुरेंद्र सिरसाट, संदीप फळारी, मिलिंद अणवेकर, सुधीर कांदोळकर, स्नेहा भोबे, गुरुदास वायंगणकर आणि आजी - माजी नगरसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. हुसेन म्हणाले, राष्ट्रीयताच राष्ट्राचे रक्षण करते. राष्ट्रीयतेचा भार देशाच्या नागरिकांवर आहे. त्यामुळे राष्ट्राच्या ऐक्यासाठी प्रत्येकाने आपल्या मनात आणि काळजात राष्ट्रीयता बाळगली पाहिजे. सध्या पेटत्या मेणबत्या विझवून वाढदिवस साजरा करण्याची प्रथा आहे. याच्या उलट आपल्या संस्कृतीत दीपप्रज्वलन करून नवी प्रभा, नवी ज्योत लावून नवजीवन सुरू केले जाते. हिंदुस्थानची संस्कृती काळोखाकडून प्रकाशाकडे नेणारी आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या देशात "मनीप्लांट'सारखी संस्कृती रुजत चालली आहे.ती घातक आहे.
त्यापेक्षा घरासमोर तुळस आणि पिंपळाची झाडे लावा. ही वृक्षवल्ली सुरक्षित राहिली तर आपले भवितव्य सुरक्षित होईल.
ते म्हणाले, देश राजकारण्यांच्या कचाट्यात सापडला आहे. मतपेढीची संस्कृती रुजत चालली आहे. हे प्रकार थोपवले पाहिजेत. लोकशाहीच्या वाढीसाठी देशात मतदान सक्तीचे व्हायला पाहिजे. राज्यकर्त्यांनी याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे.
हिंदू आणि मुसलमान हे दोन धर्म हे हिंदुस्थानचे प्रमुख धर्म आहेत. या दोन्ही धर्मांनी एकोपा राखला आहे. त्याद्वारे राष्ट्रीय एकात्मता जोपासायला हवी. कित्येक वर्षे या भूमीत दोन्ही धर्मांचे अनुयायी गुण्यागोविंदाने नांदत आहेत, असे विचार श्री. नुरुद्दीन यांनी मांडले. संजय वालावलकर स्वागतपर भाषणात "राष्ट्रहित मंच' या संघटनेच्या स्थापनेमागील उद्देश व अनुषंगिक माहिती दिली.
व्यासपीठावरील मान्यवरांनी परस्परांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले. पद्मश्री हुसेन यांनी खासदार श्रीपाद नाईक यांना राखी बांधून देशाच्या सुरक्षेततेसाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन केले. सलीम खान यांनी श्री. हुसेन यांचा परिचय करून दिला. जगन्नाथ मणेरकर यांच्या हस्ते श्री. हुसेन यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आली. प्रा. दिलीप बेतकेकर यांनी सूत्रनिवेदन केले. प्रा. अनिल सामंत यांनी आभार मानले. राष्ट्रीयगीताने कार्यक्रमाची सुरुवात होऊन राष्ट्रीगीताने सांगता झाली.

कुडचडे येथे एका रात्रीत आठ दुकाने फोडली

कुडचडे, दि. १७ (प्रतिनिधी): येथील बसस्थानकापाशी परस्परांना खेटून असलेल्या चार इमारतींच्या तळमजल्यावरील एकूण आठ दुकाने अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्री आठच्या सुमारास फोडून रोकड व इतर ऐवज पळवला.
गुरूदेव मॅन्शन, विश्वनाथ मॅन्शन, आत्मदर्शनी व अनू अपार्टमेंट या चार इमारतींमधील दुकानांत ही चोरी झाली असून यात एका औषधालयाचाही (फार्मसीचा) समावेश आहे. सावईकर एंटरप्रायझेस या दुकानातून चोरट्यांनी लॅपटॉप पळवला आहे. गुरू मेडिकल स्टोअर्समधून पाच हजारांचे साहित्य व रोख एक हजार, रवी देसाई यांच्या हेअर कटिंग सलूनमधून रोख पाचशे रुपये लांबवण्यात आले.
गुरूदेव मॅन्शनमधील एकाच रांगेत असलेली चार दुकाने फोडण्यात आली आहेत. यात दोन मोबाईल फोन दुरूस्ती तसेच एक रेडिमेड कपड्याच्या दुकानाचा समावेश आहे. तसेच अनू अपार्टमेंटमधील सुमारे वर्षभर बंद असलेल्या किचन किंग हे आईस्क्रीम विक्रीचे दुकानही चोरट्यांनी फोडले. मात्र तेथे चोरट्यांच्या हाती फार काही लागले नाही.
सर्व दुकानांची शटरे जॅकच्या सहाय्याने वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांची मदत घेतली. त्याचा विशेष फायदा झाला नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पोलिस स्थानकापासून अवघ्या ५० मीटरवर असलेल्या या भागात दुकाने बंद करताच अंधार पसरतो. तेथे रस्त्यावर काही मोजकेच दिवे लागतात. रस्ता सोडल्यास इतर परिसरात संपूर्ण काळोख पसरलेला आसतो. चोरट्यांनी या काळोखाचा फायदा उठवत चोरी केल्याचा संशय आहे. चोरटे परप्रांतीय असावेत, असा पोलिसांचा कयास आहे.
सायंकाळी पाचच्या दरम्यान येणाऱ्या दिल्ली एक्सप्रेस रेल्वेतून चोरटे पळाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी हवालदार श्री. फडणीस तपास करीत आहेत. एकूण आठ दुकाने फोडल्याने पोलिस रात्री योग्य प्रकारे गस्त घालत नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. चोरीच्या या प्रकारामुळे पोलिसांची झोप उडाली आहे.

भाजप-जेडीयु युती भक्कमच : नितीशकुमार

पाटणा, दि. १७ : कोणी कितीही कोल्हेकुई केली तरी जनता दल युनायटेड आणि भारतीय जनता पक्ष यांची युती भक्कम असल्याचा निर्वाळा आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिला. काही प्रसारमाध्यमांनी या दोन्ही पक्षांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाल्याची आवई उठवल्यासंदर्भात नितीशकुमार यांनी हे स्पष्टीकरण दिले.
पत्रकारांशी आज येथे बोलताना नितीशकुमार यांनी सांगितले, जेडीयु आणि भाजप यांच्यात वाद उत्पन्न होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अगदी तळागाळापर्यंत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते उत्साहाने आणि हातात हात गुंफून कार्यरत आहेत. उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि मी स्वतः त्यांना मार्गदर्शन करत आहोत. पहिल्या चार टप्प्यांत एकूण १८२ मतदारसंघांत मतदान होणार असून त्यासाठी केवळ आठ - नऊ दिवस प्रचाराकरिता पुरेसे नाहीत. यास्तव आम्ही प्रचाराचेही सुयोग्य नियोजन केले आहेत. समाधानाची बाब म्हणजे येत्या २० तारखेपासून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि "जेडीयु'चे अध्यक्ष शरद यादव यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अन्य नेतेही प्रचारात जोमाने भाग घेणार आहेत. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान यांच्या युतीचे तीनतेरा वाजणार आहेत यात शंकाच नाही. कॉंग्रेसची तर कितव्या क्रमांकावर घसरण होईल हे सांगणेही कठीण आहे.
आम्ही या निवडणुकीत बिहारचा सर्वतोपरी विकास हाच मुख्य मुद्दा बनवला आहे. त्याला बिहारी जनतेकडून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालील वाळू घसरत चालली आहे. आता भाजप व जेडीयु यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या त्यांना पेराव्या लागत आहेत. मतदारांनी यावरूनच काय ते ओळखावे, असा शालजोडीतील "मखमली प्रहार' नितीशकुमार यांनी केला.
पाकमध्ये ड्रोन हल्ल्यात १० ठार
इस्लामाबाद, दि. १७ : पाकिस्तानच्या कबायली भागात अमेरिकी विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यात दहा जण ठार झाले. वजिरिस्तानच्या मीर अली शहरावर हा हल्ला करण्यात आला. ड्रोन विमानांनी या भागात सहा क्षेपणास्त्र डागल्याचे पाक सैन्याने म्हटले आहे. या भागात तालिबानी व अलकायदाचे दहशतवादी मोठ्या प्रमाणावर लपल्याचे बोलले जाते. या भागात मागील काही दिवसांपासून पाक सैन्यानेही अभियान राबवण्यास सुरुवात केली असून, मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले जात असतात.

सर्वात महागडे घर अंबानींचे!
वॉशिंग्टन, १७ : जगभरातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर नंबर लागतो तो अंबानी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा. आता त्यांचे घरही महागड्यांच्या यादीत आले आहे. मुकेश अंबानी यांचे घर सर्वात महागडे घर आहे. फोर्ब्सने त्यांच्या घणाचा समावेश आपल्या यादीत केला आहे. मुकेश अंबानी यांचे मुंबईत ऐल्टा माउंट रोडवर मोठे घर आहे. फोर्ब्सने त्यांच्या या घराचा समावेश आपल्या यादीत केला आहे.
फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार या घराची किंमत ६३ कोटी पाऊंडच्या घरात आहे. भारतीय चलनात याची किंमत एक अब्ज डॉलरच्यावर आहे.

सोने आणखी महागले..!
नवी दिल्ली, दि. १७ : सणासुदीमुळे मागणी वाढल्याने राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव काल प्रतितोळा २० हजारांवर गेला. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव १७५ रुपयांनी चमकत प्रतितोळा २०,१२० रुपये तर चांदीचा भाव प्रतिकिलो ३७ हजार रुपयांवर गेला. नवरात्रोत्सवामुळे बाजारात सोने आणि चांदीची जोरदार खरेदी होत आहे. विदेशी बाजारातील तेजीचाही स्थानिक बाजारावर परिणाम झाल्याचे दिसते.

'एसबीआय'चे कर्ज महागणार
मुंबई, दि. १७ : स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे (एसबीआय) कर्ज महागणार असल्याचे संकेत बॅंकेचे चेअरमन ओ. पी. भट्ट यांनी दिले आहेत. तरलतेची स्थिती कठीणच होत नाही तर यात अधिक चढ-उतार होत आहे. त्यामुळे कर्जावरील व्याजदर वाढविले जातील, असे त्यांनी सांगितले. एसबीआयने आपला आधार दर वाढवला आहे. ठेवींचा ओघ कमी होत असल्याने हे पाऊल उचलावे लागणार आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेना दम देणारी, दम खाणारी नव्हे..

बाळासाहेब ठाकरे गरजले
मुंबई, दि. १७ : शिवसेना ही दम देणारी आहे दम खाणारी नाही. शिवसेनेच्या ढाण्या वाघाचा आवाज ५० डेसिबलच्या आत मावणारा नाही. ब्रह्मदेव जरी आला तरी शिवसैनिकांचा हा आवाज कमी करू शकणार नाही, असे सांगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आज येथील शिवाजी पार्क मैदानावर विराट जनसमुदायाकडून जबरदस्त टाळ्या घेतल्या. शिवसेनाप्रमुखांनी आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात ठाकरे शैलीत सगळ्यांची खरडपट्टी काढली. "युपीए'च्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, मंत्री नारायण राणे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली.
दसरा मेळाव्यात बाळासाहेब बोलणार म्हणून मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी गर्दी केली होती. ठणठणीत बाळासाहेबांना पाहून जमलेल्या जनसागरात एक नवचैतन्य निर्माण झाले. बाळासाहेब व्यासपीठावर आल्यावर प्रचंड टाळ्या आणि घोषणांनी त्यांचे स्वागत झाले. बाळासाहेबांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ वाहून सभेला सुरूवात केली. यावेळी आदित्य ठाकरे यांना बाळासाहेबांनी तलवार देऊन त्यांच्या युवा सेनेचे उद्घाटन केले. "भावोजी' आदेश बांदेकर यांची शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचीही घोषणा यावेळी करण्यात आली.
गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर तोंडसुख घेत बाळासाहेब म्हणाले, त्यांना भगवा दहशतवाद दिसतो. अन्य रंगांचा दहशतवाद दिसत नाही. हिंदूंचा रंग भगवा आहे. शिवरायांच्या झेंड्याचा रंग भगवा आहे. या भगव्याच्या नादाला लागलात तर तुम्हाला परवडणार नाही.
माणिकरावांबद्दल का बोलायचं, चांगले माणिक पैदा झाले आहेत. या गुळगुळीत माणिकरावांच्या टकलावरून घसरून कॉंग्रेसचं सरकार पडतं की नाही ते पहा, असा खुसखुशीत टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
माय नेम इज खान, बिग बॉस या कार्यक्रमांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संरक्षण देताते. का बिग बॉसमध्ये दोन पाकिस्तानी आणले आहे. भारतात काय गायक, कलाकारांची कमी आहे. कशाला लाचारासारखे जगतात, असा घणाघाणी वार त्यांनी यावेळी केला.
श्रीमती सोनिया गांधीचा समाचार घेताना आपल्या नेहमीच्या शैली बाळासाहेब म्हणाले, मोगलांनी तुमच्यावर २०० वर्ष राज्य केले. ब्रिटिशांनी १५० वर्ष आणि आता इटलीची गुलामी हे कॉंग्रेसचं सरकार करीत आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आम्हीच ठरवणार, असे म्हणणारे कुठे आहेत आणि त्यांचा मुख्यमंत्री कुठे आहे? कल्याण-डोंबिवली महापालिकाचा महापौर आमचाच होणार, अरे बाबा सर्व तुमचच होणार असे म्हटला तर आम्हालाही काही तरी ठेव. ४५ वर्षे आम्हीही काही तरी केलं आहे, असा चिमटा राज ठाकरे यांचं नाव न घेता बाळासाहेबांनी काढला.
शिवसेनेत घराणेशाही बिल्कुल नाही, असे सांगत बाळासाहेब म्हणाले, उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष त्या कृष्णकुंजवाल्यांनी केलं. मला समजल्यावर मी भडकलो. मी म्हटलं शिवसैनिकांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि मी ठरविल्याशिवाय हे होता कामा नये. त्यानंतर शिवसैनिकांनी स्वतः उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदावर नियुक्ती केली, असेही आवर्जुन सांगितले. आमच्याकडे घऱाणेशाही नाही. मंत्र्याचा पोरगा कोणी आमदार होतोय, कोणी खासदार होतोय. कोणी गोळ्या घातलोय, पण या गोळ्या घालणाऱ्यांना क्लीन चीट दिली जाते, तुमच्याकडे किती क्लीन चीट आहे मला सांगा. प्रत्येकाला क्लीन चीट देत बसले आहेत.
अशोकराव मंत्रालयाच्या भिंती काय मजबूत करताहेत, देशाच्या भिंती मजबूत करा. पाकिस्तानी - चिनी देशात घुसताहेत तरी आपण गप्प बसून आहोत, असे म्हणून अशोक चव्हाण यांचाही त्यांनी समाचार घेतला.
काही वृत्तपत्रावर बाळासाहेबांनी एकांगी वृत्त देत असल्याचा आरोप केला. मनसेने ते वृत्तपत्र विकत घेतल्यासारख्या बातम्या त्यात प्रसिद्ध होत आहेत. उद्या त्या वृत्तपत्रात बातम्या येतील बाळासाहेबांची सभेला पूर्वीसारखी गर्दी नव्हती, जोश नव्हता. त्यांना मी एवढचं सांगू इच्छितो, ही पत्रकारिता आम्हालाही जमते, पण ती आम्ही करत नाही.

Sunday, 17 October 2010

राणे यांनी २९ वर्षांत काय केले याचे उत्तर आधी द्यावे

मगच २९ महिन्यांत आम्ही काय केले ते सांगू : पर्रीकर
वाळपई, दि. १६ (प्रतिनिधी): प्रतापसिंह राणे २९ वर्षे सत्तरीवर सत्ता गाजवत आहेत. असे असूनही विश्वजित राणे यांना सत्तरी मागासलेली वाटत असेल तर त्यांनी २९ वर्षे त्यांचे वडील मंत्री असूनदेखील सत्तरीचा विकास का झाला नाही? विश्वजित यांनी याचे उत्तर आधी भाजपला द्यावे. नंतर आम्ही २९ महिन्यांत कोणता विकास केला हे सांगू, असे सवाल करून विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी विश्वजित राणेंना आज प्रतिआव्हान दिले. वाळपई पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप उमेदवार संतोष हळदणकर खासदार श्रीपाद नाईक, उल्हास अस्नोडकर, गोविंद पर्वतकर, नरहरी हळदणकर, नारायण गावस आदी नेते तसेच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते
श्री. पर्रीकर म्हणाले, आजपर्यंत आमच्या कार्यकर्त्यांनी योग्य नियोजनाद्वारे प्रचार केला आहे. प्रचार करताना घरोघरी वैयक्तिक संपर्क साधण्यावर जास्त भर दिला.
आज वाळपई मतदारसंघातील लोक निर्भय बनले आहेत. याआधी लोक भीतीपोटी गप्प बसायचे. त्यांना धमकीचे, पैशाचे भय होते. या पोटनिवडणुकीत मात्र तसे नाही. चित्र बदलत चालले आहे. विश्वजित यांनी तरीसुद्धा "अर्थ'पूर्ण व्यवहार सुरूच ठेवले आहेत. जे एकूण स्वयंसाहाय्य गट तयार केले आहेत त्यांना पैसे देऊन लाचार बनविले. हल्लीच खडकी वेळगे येथे पैशांवरून कॉंग्रेसच्या गटांत मारामारी झाली. हे खेदजनक आहे. याला सर्वस्वी विश्वजितच जबाबदार आहेत. याआधी विश्वजित सांगत होते की, भाजपच्या बाहेरील आमदारांनी वाळपईत येऊन प्रचार करू नये. मग असे असताना आज विश्वजित राणे वाळपईतील आहेत काय? ते कोणत्या आधारावर भाजपवर टीका करीत आहे. संतोष हा स्थानिक लोकप्रतिनिधी आहे. म्हणून त्यालाच या मतदारसंघातील समस्या ठाऊक आहेत. जनतेने भाजप उमेदवारालाच निवडून आणावे आणि सत्तरीतील मक्तेदारी मोडीत काढावी.
दाबोस प्रकल्प रस्ते आमच्या काळातील आहेत. विश्वजित यांनी पूल बांधून खाणींची तयारी सुरू केली आहे. वाळपईत हॉस्पिटल पीपीपी तत्त्वावर सुरू करून भंगसाळ करण्याची उपाययोजना त्यांनी केली आहे. १६० खाटांचे हॉस्पिटल बांधून व्यवस्थापन योग्य पद्धतीने होणार काय? विश्वजित हे १८० दिवसांपैकी १२० दिवस परदेशांत होते. त्यांना परदेश दौरे करण्यात रस आहे. दोनापावला बंगल्यावर बसून सहज जिंकून येईन, असे सांगणारे विश्वजित आज सहकुटुंब प्रचार का करीत आहेत, असा खडा सवाल पर्रीकरांनी केला.
आमच्या काळात १४ सरकारी शाळा, पाणी प्रकल्प सुरू झाले. जी कामे अपूर्णच आहेत ती पूर्ण झाली अशा बाता राणेंनी मारू नयेत व स्वतःचा उदोउदो करू घेऊ नये. सावर्डे पंचायतीतील बुद्रुक करमळी येथील ३८.५६५ हे जमीन (सर्व्हे क्र ११/१) राखीव जंगल करण्याचे कारस्थान शिजत असून दि. ३०/९/२०१० रोजी आचारसंहिता असताना तशी नोटीस पंचायतीला आली आहे. त्याची प्रतच पर्रीकरांनी सादर केली. या जमिनीत वनस्पती काजू लागवड केली जाते. त्यामुळे या निवडणुकीनंतर ही ३८ हे जमीन राखीव जंगल होणार आहे. साहजिकच १०० हून अधिक शेतकरी संकटात येणार असल्याची माहिती पर्रीकरांनी यावेळी दिली. ही माहिती विश्वजित यांना नाही काय? डोळे मिटून दूध पिण्याचे काम ते करत आहेत, असा आरोप पर्रीकरांनी केला.
विश्वजित यांना शेतकऱ्यांबद्दल ना सोयर ना सुतक. त्यांनी नोकऱ्या दिल्या त्या स्वीपर, पेशंट ऍटेंडंट अशा स्वरूपाच्या. शिवाय त्याही तात्पुरत्या. सत्तरीत अनेक उच्चशिक्षित आहे त्यांना मोठ्या हुद्याच्या नोकऱ्या का दिल्या नाहीत? आमच्या काळात पोलिस निरीक्षक, मामलेदार अशा नोकऱ्या आम्ही सत्तरीवासीयांना दिल्या. विश्वजित यांना हे जमत नाही काय, असे पर्रीकर शेवटी म्हणाले.
भ्रष्टासुराला खाली खेचा : श्रीपाद नाईक
श्रीपाद नाईक म्हणाले, मी खासदार या नात्याने काहीच केले नाही; फक्त पाट्या लावल्या ,असे कॉंग्रेसकडून सांगितले जात आहे. ते खोटे असून मी विविध २२ प्रकल्प ११ हॉल पर्येत, ५ हॉल वाळपईत, शाळांना मदत अशी अनेक कामे पूर्ण केली आहे. पालहिरवे येथे टेंडर काढलेले असताना विश्वजितांनी हॉलचे बांधकाम बंद करण्यात भाग पाडले. अशा व्यक्तीला पराभूत करण्यातच लोकांचे कल्याण आहे. या पोटनिवडणुकीत सत्तरीवासीयांना भ्रष्टासुराला नव्हे तर भाजपला मते देऊन विजयी करावे.

बार्देश बझार मडगावात १.३० लाखांची चोरी

मडगाव, दि. १७ (प्रतिनिधी): येथील बार्देश बझार आस्थापनातून काल रात्री अज्ञात चोरट्यांनी सुमारे १.३० लाखांचा ऐवज पळविला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खिडकीचे गज कापून चोरटे आत शिरले व त्यांनी ६० हजारांची रोकड आणि सुमारे ७० हजारांचा माल हातोहात लांबवला.
आज सकाळी नेहमीप्रमाणे आस्थापन उघडण्यात आल्यावर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांनी श्र्वानपथकास आणून चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा काहीच उपयोग झाला नाही. सदर संस्थेची मडगाव शाखा येत्या मंगळवारी येथील वर्षपूर्ती साजरी करीत असून त्यापूर्वीच चोरट्यांनी तिला अशाप्रकारे हिसका दाखवला आहे.

'गोमेकॉ' कॅंटीनमध्ये कूपनच्या नावाखाली लूट

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या ("गोमेकॉ') कॅन्टीनमध्ये सुट्टे पैसे नसल्याच्या नावाखाली १ रुपयापासून ८ रुपयांपर्यंत छापील कुपने देऊन गरीब रुग्ण आणि त्यांच्या नातेवईकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याने लोकात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
"गोमेकॉ'मध्ये प्रामुख्याने गरीब आणि मध्यमवर्गीय लोकच जात असतात. त्यामुळे आधीच पैशांची मारामार सहन करणाऱ्या या लोकांना ही कुपनची झंजट परवडेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केवळ गोव्यातूनच नव्हे तर गोव्याबाहेरूनही दररोज हजारो रुग्ण या इस्पितळात येत असतात. त्यातील काही दोन चार दिवसांकरिता इस्पितळात भरती होतात. काहीजण औषधोपचार करून त्याच दिवशी आपल्या घरी जातात. त्याच दिवशी घरी जाणाऱ्या रुग्णांनी या कॅन्टीनमध्ये काही गरज म्हणून घेतले आणि राहिलेले पैसे सुट्टे नाहीत असे सांगून त्याला कुपन देण्यात आले तर त्याने त्या कुपनचे पैसे आणण्यासाठी पुन्हा बांबोळीला जायचे का? अडचण म्हणून येणाऱ्या सामान्य लोकांची ही एकप्रकारे पिळवणूकच केली जात आहे. एक वेळ तिथल्या कर्मचाऱ्यांनाही कुपनची गोष्ट परवडण्यासारखी असू शकते; कारण ते रोज तिथे जात असतात. मात्र रुग्णांनी १२ रुपयांचे पदार्थ खरेदी केल्यास आठ रुपयांचे कुपन देण्यात येते. अशावेळी दूरवरून आलेला रुग्ण केवळ ८ रुपये आणण्यासाठी परत जाईल का? परिणामी ते आठ रुपये कॅन्टीन मालकाच्या खिशात जातात. अशा पद्धतीने लोकांना लुटणे कितपत योग्य आहे, असा सवाल विचारून याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सत्तरीच्या अस्तित्वासाठी खाणींविरोधात लढणार

विश्वेश परोब यांनी स्थापला
सत्तरी जागृत युवा मोर्चा

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): शेती, बागायती आणि जलस्त्रोतांनी संपन्न असलेल्या सत्तरीचे काजू हे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. या निसर्गसंपन्न सत्तरीवर खाणीसारखे संकट आणणाऱ्या राजकारण्यांना व सत्तरीची अस्मिता नष्ट करणाऱ्या खाणींना आपली संस्था प्रखरपणे विरोध करणार असल्याचे प्रतिपादन आज वाळपई येथे पत्रपरिषदेत माजी आमदार अशोक परोब (प्रभू) यांचे पुत्र विश्वेश परोब यांनी केली.
उभरते नेतृत्व म्हणून पुढे येत असलेल्या विश्वेश परोब यांनी सत्तरीची विल्हेवाट लावण्यास कारणीभूत ठरणाऱ्या खाण प्रकल्पांना विरोध करण्यासाठी व सत्तरीतील दबलेल्या लोकांना न्याय देण्यासाठी आज वाळपईत सत्तरी जागृत युवा मोर्चाची स्थापना केल्याची घोषणा केली. यावेळी युवा कार्यकर्ते तथा पत्रकार अविनाश जाधव व इतर नागरिक त्यांच्यासोबत उपस्थित होते.
श्री. परोब म्हणाले, सत्तरीत दबावाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे अनेकांचा खाणींना व अन्य गैरकृत्यांना विरोध असूनही दबावामुळे ते बोलू शकत नाहीत. आपली संस्था अशा दबलेल्या लोकांचा आवाज बनून त्यांच्या सहकार्याने खाणींविरुद्ध लढणार आहे. पिसुर्ले सारख्या कृषिसंपन्न गावाची खाणींमुळे काय अवस्था झाली आहे त्याचा विचार लोकांनी करावा. खाणींमुळे राजकारण्यांचे व खाणमालकांचे खिसे भरतील; पण त्यामुळे सारी सत्तरी उद्ध्वस्त होईल. त्यासाठी लोकांनी खाणींचे दुप्षरिणाम ओळखून खाणींना विरोध करावा.
त्यांनी सांगितले की, सत्तरीचा नको त्या पद्धतीने विकास होतोय. होंडा येथील बसस्थानक त्याचे चांगले उदाहरण म्हणता येईल. लोकप्रतिनिधींनी लोकांच्या मतांचा सन्मान करावयाचा असतो. त्यांच्यावर दबाव टाकून आपणास हवे ते करून घ्यायचे नसते. काजूच्या बागा, बागायती व शेती तसेच दाबोस येथील पाणीप्रकल्प यांना घातक ठरणाऱ्या खाणी एकदा का वाळपईच्या ग्रामीण भागात घुसल्या की सत्तरीचे सौंदर्य संपलेच म्हणायचे.
खाणींना कुणाचाही पाठिंबा नाही; पण आरोग्यमंत्री खाणींचे समर्थन करतात म्हणून कुणीही जाहीरपणे विरोध करत नाहीत. तथापि, आपली संस्था या सर्व लोकांना खाणींचे दुप्षरिणाम सांगून खाणविरोधी लढ्यासाठी सज्ज करणार आहे. लोकांनी वाळपईतील निसर्गाच्या जतनासाठी, काजूंच्या व कुळागरांच्या तसेच शेतीच्या रक्षणासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे ते म्हणाले.
आपली संघटना कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही. मात्र "खाण समर्थकांना घरी बसवा,' असा प्रचार करणार असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

प्रचार संपला, प्रथमच 'पोल मॅनेजमेंट'चा वापर

वाळपई, दि. १६ (प्रतिनिधी): वाळपई मतदारसंघाच्या १८ रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रचार समाप्त झाला असून यावेळी प्रथमच "पोल मॅनेजमेंट' पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे बोगस मतदानाला आळा बसेल, अशी माहिती निवडणूक अधिकारी जयंत तारी यांनी आज येथे पत्रपरिषदेत दिली. या नव्या पद्धतीअंतर्गत मतदाराचा फोटो काढला जाईल आणि त्याच्या अंगठ्याचा ठसा घेतला जाईल.
पोटनिवडणुकीत १७९२० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात ९१०७ पुरुष व ८८०५ महिला मतदार आहेत. एकूण ३१ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. ज्या मतदान केंद्रांवर एक हजारापेक्षा जास्त मतदार आहेत त्याचे दोन भाग करण्यात आले आहेत. मतदारांना ओळखपत्र सक्तीचे करण्यात आलेले नाही. पासपोर्ट, वाहन परवाना, पॅन कार्ड, पोस्ट कार्यालयातील मुदतठेव पुस्तक, स्वातंत्र्यसैनिक असल्याचे प्रमाणपत्र, पेन्शनची कागदपत्रे, बंदुकीचा परवाना, अपंगत्वाचा दाखला, नोकरीचे कार्ड यापैकी कोणताही दस्तऐवज सोबत आणला तरी त्यास मतदानाची अनुमती दिली जाणार आहे. निवडणुकीसाठी प्रथमच केंद्रीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. त्यांना विविध मतदान केंद्रांवर तैनात केले जाईल. त्याखेरीज चारशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात एक मतदान केंद्र अधिकारी, साहाय्यक अधिकारी, खास निरीक्षक आदींचा समावेश आहे. एका अधिकाऱ्याची नेमणूक मतदारांची ओळख पटवण्यासाठी करण्यात आली आहे. काही मतदान केंद्रांसमोर मतदार सुविधा केंद्राची उभारणी केली जाणार आहे. सर्व मतदार केंद्रांवर ध्वनिचित्रमुद्रण केले जाईल. उमेदवार व त्याचा प्रतिनिधी असा दोनच गाड्या वापरता येतील. त्यापेक्षा जास्त गाड्या दिसल्यास त्वरित कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मतदारांची ने-आण करण्यासाठी गाड्यांचा वापर करता येणार नाही, असेही श्री. तारी यांनी नमूद केले.