Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 30 January 2010

दोन्ही संशयितांना अटक

रशियन मुलीवरील अत्याचारप्रकरण

अमनला मुंबईत पकडले, ताबडतोब ओळखपरेड होणार

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - अल्पवयीन रशियन तरुणीवर लैंगिक अत्याचार करून फरारी झालेला मुख्य संशयित अमन भारद्वाज याला आज चेंबूर मुंबई येथे अटक करण्यात आली. तर, त्याचा दुसरा साथीदार अनिल रघुवंशी आज सकाळी गोवा पोलिसांनी शरण आला. अनिल याला ताब्यात घेऊन पेडणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दुपारी त्याला न्यायालयात हजर करून सात दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळवण्यात आली. गोव्यातून गेलेल्या पोलिस पथकाने अमन याला मुंबई पोलिसांच्या मदतीने चेंबूर येथे अटक केली. उद्या (शनिवारी) सकाळी त्याला गोव्यात आणले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
अमन याला घेऊन पोलिस गोव्यात पोहोचताच दोन्ही संशयितांची ताबडतोब ओळखपरेड केली जाणार आहे. ही माहिती पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी दिली. बंगळूर येथे जात असलेला अनिल आज पहाटे गोव्यात येऊन त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिस शोधत असल्याने तो काल बंगळूर येथे पळून जाण्यासाठी निघाला होता. यावेळी पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी मोबाईलवर संपर्क साधून त्याला शरण येण्याची सूचना केली आणि पोलिसांशी सहकार्य करण्यासही सांगितले. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला होता. आज सकाळी त्याने पणजीत येऊन स्वतःला पोलिसाच्या हवाली केले. सदर रशियन मुलीवर लैंगिक अत्याचार झाले तेव्हा अमन याच्याबरोबर अनिल हाही तेथेच होता. ते दोघेही एकाच कंपनीत नोकरीला असून दोघांनी घटनेनंतर पळ काढला होता.
पीडित मुलीची आई व्यवसायाने डॉक्टर असून ती २३ जानेवारी रोजी एका महिन्याच्या पर्यटन व्हिसावर गोव्यात आली होती. दोन दिवसानंतर तिचा पती रशियाला गेल्याने आपल्या मुलीबरोबर ती गोव्यात थांबली होती. काही दिवसांत ती मायदेशी परतणार असल्याने संशयितांची ओळख परेड लवकरात लवकर केली जाणार असल्याचे श्री. यादव यांनी सांगितले.
रशियन मुलीवर झालेल्या या अत्याचारप्रकरणी उलटसुलट चर्चा ऐकायला मिळते. खुद्द एक आई आपल्या ९ वर्षीय मुलीस समुद्रात एकटीला आंघोळ करायला पाठवते व आपण स्वतः किनाऱ्यावर आराम करते, तिच्यासोबत आणखी जवळपास कुणी आंघोळ करतो की काय हे तिने कटाक्षाने का पाहिले नाही, तिला कोणी त्रास तर देत नाही ना, यावर आईने ती मुलगी पाण्यात असेपर्यंत का लक्ष ठेवले नाही, असे मुद्दे चर्चिले जात आहेत. याविषयी अधिक तपास पेडणे पोलिस करीत आहेत.

ताईंची लोकप्रियता आजही वादातीत - पवार

पणजी, दि.२९ (प्रतिनिधी) - राजकीय संघर्षाला कधीच वैयक्तिक विद्वेषाची झालर असता कामा नये.राजकारण आणि समाजकारण या दोन्हींचा एकमेकांशी अतूट असा संबंध आहे. जनताजनार्दनामुळेच आपण राजकारणात महत्त्वाची पदे भूषवीत असतो, याचा विसरही कधी पडू देता कामा नये. शशिकलाताई काकोडकर यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सामान्यांशी असलेली नाळ कायम ठेवली व त्यामुळेच सामाजिक व राजकीय इतिहासात त्यांचे नाव कायम आहे, त्यांची लोकप्रियता आजही टिकून आहे, असे उद्गार केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले.
श्रीमती शशिकलाताई काकोडकर यांच्या अमृत महोत्सव सत्कार सोहळ्यानिमित्त कांपाल येथील स्व.भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर आयोजित केलेल्या भव्य सोहळ्याला संबोधित करताना ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री दिगंबर कामत, उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक,राज्यसभा खासदार शांताराम नाईक,सत्कार समितीचे अध्यक्ष तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर,महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा,गोमंतक मराठा समाजाचे अध्यक्ष ऍड.महेश आमोणकर व माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर उपस्थित होते.अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित केलेल्या या सोहळ्यात शरद पवार यांच्याहस्ते शशिकलाताई काकोडकर यांचा हद्य सत्कार करण्यात आला.शाल,श्रीफळ,मानपत्र व श्री देवी महालसाची सुंदर व सुबक चांदीची मूर्ती प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी पारंपरिक गोमंतकीय दिवजांचे सुवासिनींकडून प्रज्वलन झाल्यानंतर खास ताईंकडूनही दिवजांप्रज्वलन झाले व त्याला दारूकामाच्या आतषबाजीची साथ मिळाल्याने हा सोहळा अवर्णनीय असाच ठरला.
या सत्कार सोहळ्यावेळी बोलताना शरद पवार यांनी गोव्याबद्दलच्या आपल्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. तत्कालीन सरकारातील नेते शंकर लाड, दयानंद नार्वेकर व दिलखूष देसाई यांनी बंड करून ताईंना सत्तेपासून दूर केले व त्यावेळपासून गोव्याला खऱ्या अर्थाने राजकीय अस्थिरतेचा शाप लागला.आज प्रत्यक्षात या सत्कार सोहळ्याला संबोधित करतानाही राज्याची राजकीय स्थिती अस्थिर असावी,याला काय म्हणावे,असाही टोला त्यांनी यावेळी हाणला.ताईंनी आपल्या समर्थ नेतृत्वाखाली गोव्याच्या भवितव्याच्या दृष्टीने अनेक दूरदृष्टीच्या निर्णयांची मालिकाच लावली. गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने इथे जगभरातील लोक प्रवेश करीत असतात पण इथे राजकारणाचेही पर्यटन करून एक पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची सवयच नेत्यांना जडली आहे. शेकडोवर्षे पोर्तुगिजांची राजवट सहन करूनही इथे भारतीय संस्कृती टिकवण्याचे काम पूर्वीच्या पिढ्यांनी केले, त्यांना आपण नमन करतो,असेही ते म्हणाले. कला व संस्कृती क्षेत्रात पुढे येणाऱ्या स्त्रिया राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही पुढे याव्यात,असे म्हणून त्यांनी ताईंच्या कर्तृत्वाचा वारसा येथील स्त्रियांनी खांद्यावर घ्यावा,असेही आवाहन केले.
यप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले की ताईंनी सक्रिय राजकारणात नसतानाही समाजाशी आपले नाते कायम राखले. चांगल्या कामाची प्रशंसा करण्याचे मोठेपणही त्यांनी जपले,असेही ते म्हणाले. खासदार श्रीपाद नाईक यांनी ताईंनी आपल्या राजवटीत ठोस निर्णय घेण्याची क्षमता सिद्ध करून दाखवली.समाजाभिमुख व भ्रष्टाचारविरहित राजकारणाचा पाठही त्यांनी दाखवून दिला,असे ते म्हणाले.राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी स्व. भाऊसाहेब बांदोडकर व त्यानंतर शशिकलाताई काकोडकर यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे विधान केले. त्यांनी खरोखरच कॉंग्रेस प्रवेश केला असता तर आज वेगळीच परिस्थिती असती,असेही ते म्हणाले. याप्रसंगी सुरुवातीला सुदिन ढवळीकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले व भाऊ तथा ताईंच्या संपूर्ण राजकीय इतिहासाचा आढावा घेतला.डॉ.अजय वैद्य यांनी मानपत्राचे वाचन केले. सुरुवातीस काही बाल कलाकारांनी सुंदर नृत्य सादर केले.आरती नायक यांनी दिवजाप्रज्वलनावेळी गणेशस्तवन सादर केले. शंभू भाऊ बांदेकर यांनी आभार प्रकट केले. या सोहळ्याला विद्यमान आमदार, आजी, माजी आमदार, मंत्री, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी व हजारोंच्या संख्येने ताईंचे चाहते,कार्यकर्ते व हितचिंतक हजर होते.

पेडणे पोलिसांच्या आश्रयानेच केरी जत्रोत्सवात जुगार जोमात

भीमसेन बस्सी व रवींद्र यादव यांना स्थानिक पोलिसांच्या वाकुल्या

पेडणे पोलिसांचा जुगाराला "उत्तम' प्रतिसाद!


पणजी, दि. २९ (प्रतिनिधी)- पेडणे तालुक्यात मोरजीतील काल २८ रोजीच्या जत्रोत्सवातील खुलेआम जुगाराच्या बाजारानंतर केरी येथील श्री देव आजोबा जत्रोत्सवातही निर्धास्तपणे जुगाराचा पट मांडून राज्यातील हा जुगार उखडून टाकण्याची भाषा करणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना जुगारवाल्यांकडून जाहीर आव्हानच दिले. या कामी पेडणेतील एका स्थानिक कॉंग्रेस नेत्याने जुगारवाल्यांना मदत केल्याची जोरदार चर्चा या भागात सुरू आहे. पेडणेचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनीही आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाकुल्या दाखवत जुगारवाल्यांना उत्तमपणे साथ दिल्याची उघड टीका येथील स्थानिकांत सुरू झाली आहे.
राज्यात विविध ठिकाणी जत्रोत्सव व इतर धार्मिक उत्सवांना खुलेआम जुगाराचा बाजार मांडला जातो. या अनिष्ट प्रथेविरोधात दै. "गोवादूत'ने सुरू केलेल्या जनचळवळीला नुकताच कुठे पाठिंबा मिळत असताना काल मोरजीतील घटना व त्यानंतर रात्री केरी येथील प्रसिद्ध श्री देव आजोबाच्या जत्रोत्सवात बेफामपणे सुरू झालेला जुगार येथील पोलिसांच्या विश्वासार्हतेला काळिमा फासणारी घटना ठरली आहे. पोलिस नियंत्रण कक्ष व पेडणे पोलिस स्थानकांत फोनवरून अनेकांनी या जुगाराबाबत तक्रारी नोंदवल्या पण पोलिसांनी पद्धतशीरपणे त्याकडे दुर्लक्ष करणेच पसंत केले. दरम्यान, पेडणे तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाच्या व विशेष करून गृहमंत्री रवी नाईक यांच्या खास मर्जीतील समजल्या जाणाऱ्या एका नेत्याने ही "सेंटीग' केल्याची जाहीर चर्चा या भागांत सुरू आहे. जुगाराविरोधात जनतेने खुलेपणाने पुढे यावे, असे आवाहन करणाऱ्या पोलिसांवर यापुढे कसा काय विश्वास ठेवावा, असा सवाल "मांद्रे सिटीझन फोरम' तर्फे करण्यात आला आहे. पोलिस हे जनतेचे रक्षक नसून जनतेचे भक्षक आहेत हेच या कृतीवरून सिद्ध झाल्याने जनताविरोधी व बेकायदा कृत्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांचा यावेळी निषेध करण्यात आला. पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी व पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांच्या पदाला काहीही महत्त्व नाही काय, असा सवाल करून ते जर जुगार उखडून टाकण्याची भाषा करतात तर मग स्थानिक पोलिस या जुगाराला पाठीशी घालतातच कसे, असाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यांना या प्रकाराबाबत खुलासा करावाच लागेल, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी व पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी काही दिवसांपूर्वी जुगाराविरोधात कडक वक्तव्य केले होते. यासंबंधी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक, उपअधीक्षकांना आदेश दिल्याचे सांगून जुगार सुरू असल्याचे उघड झाल्यास संबंधित पोलिस निरीक्षकांना जबाबदार धरणार असेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान, जत्रोत्सवातील जुगारासाठी निलंबनाची तयारी ठेवण्यापर्यंत पोलिसांनी मजल मारली आहे. या देवाच्या कार्यात जुगार बंद पाडून अडथळा आणणार नाही, अशी विचित्र भूमिका या पोलिस अधिकाऱ्यांनी घेऊन अप्रत्यक्षरीत्या या जुगाराला मान्यताच देण्याचे काम केले आहे, अशी माहिती येथील स्थानिकांनी दिली.

"गोवादूत' चे फोन खणाणले

केरी जत्रोत्सवात जुगार सुरू झाल्याचे लक्षात येताच या भागातील स्थानिकांनी ही खबर देण्यासाठी "गोवादूत'शी संपर्क साधून ही माहिती दिली. यावेळी तात्काळ पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांच्याशी संपर्क साधून ही माहिती देण्यात आली. त्यांनी लगेच आपण पेडणे निरीक्षकांकडे यासंबंधी विचारणा करतो, असे सांगितले. याप्रकरणी हरमल दूरक्षेत्रावर फोन केला असता त्यांनी यात काय नवल, इथे जुगार चालतो हे सगळ्यांनाच ठाऊक आहे,असे सांगून पोलिसांच्या निष्क्रियतेची परिसीमाच गाठली.

"हलदिराम'च्या मालकाला जन्मठेप!

चहा विकणाऱ्या गाडेवाल्याची हत्या

कोलकाता, दि. २९ - महाकाय व्यापारी संकुल उभारण्यात अडथळा ठरत असल्याच्या कारणास्तव, चहा विकणाऱ्या एका गाडेवाल्याची हत्या केल्याप्रकरणी प्रसिद्ध "हलदिराम भुजियावाला'चा मालक प्रभुशंकर अगरवाल याच्यासह एकूण पाच जणांना येथील द्रुतगती न्यायालयाने (फास्ट ट्रॅक कोर्ट) आज जन्मठेपेची सजा ठोठावली.
अरुण खंडेलवाल, गोपाळ तिवारी, मनोज शर्मा व राजू सोनकर अशी अन्य आरोपींची नावे आहेत. चौथ्या द्रुतगती न्यायालयाचे ज्येष्ठ न्या. तपन सेन यांनी हा निकाल आज येथे जाहीर केला. या चहाच्या गाड्याचा मालक सत्यनारायण शर्मा याचा पुतण्या प्रमोद शर्मा याची हत्या कट रचून ३० मार्च २००५ रोजी केल्याचा आरोप अगरवाल याच्यासह पाच जणांवर ठेवण्यात आला होता. या सर्वांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. आज अधिकृतरीत्या शिक्षेची घोषणा करण्यात आली. येथील बुर्राबझार या भागात अगरवाल याला भव्य "फूड प्लाझा' उभारायचा होता. तथापि, गेल्या पन्नास वर्षांपासून त्याच्या प्रवेशद्वारीच सत्यनारायण शर्मा हा चहाचा गाडा चालवत होता. जगमोहन मलिक लेनमधील या जागेतील बाकीच्या सर्व भाडेकरूंना तेथून बाहेर काढण्यात अगरवाल यशस्वी ठरला होता. मात्र सत्यनारायण शर्माने त्याला दाद दिली नाही. हा गाडा त्याच्या नजरेत खुपत होता. काही दिवसांपूर्वी या सर्व संशयितांनी सत्यनारायण याला धमकावले होते आणि त्याच्यावर जीवघेणा हल्ला चढवला होता. ३० मार्च रोजी भल्या पहाटे तिवारी व त्याच्या साथीदारांनी त्या चहाच्या गाड्यावर हल्ला चढवून त्यास आग लावली. त्यात प्रमोद शर्मा होरपळून गंभीर जखमी झाला. नंतर इस्पितळात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी अगरवाल हा आपल्या परदेशातील पहिल्यावहिल्या फूड प्लाझाचे उद्घाटन करण्यासाठी लंडनला गेला होता. मायदेशी परत येताच "आयजीआय' विमानतळावरच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. नंतर त्याला कोलकाता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नंतर बाकीच्या संशयितांनाही अटक झाली आणि जामिनावर त्यांना सोडण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना त्यात कोणतेही कच्चे दुवे ठेवले नाहीत. तसेच सरकारी वकिलांनीही ठोस पुरावे न्यायालयासमोर सादर केल्यामुळे अगरवाल याचा काळा चेहरा न्यायालयासमोर आला. खुनाचा प्रयत्न व कट रचला या दोन आरोपांखाली न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आणि थेट जन्मठेपेची सजा ठोठावली.

Friday, 29 January 2010

रशियन मुलीवर अत्याचारप्रकरण दोघा संशयितांची ओळख पटली

फरारी अमन व अनिलचा शोध जारी
पणजी, पेडणे दि. २८ (प्रतिनिधी): समुद्र किनाऱ्यावर आंघोळ करताना रशियन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केलेल्या संशयितांची ओळख पटली आहे. त्याचे नाव अमन भारद्वाज (२५) असून तो धारगळ येथील इंटक फार्मा प्रा. लिमिटेड या कंपनीत नोकरीस असतो, अशी माहिती आज पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी दिली. ते पोलिस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. पोलिस त्याचा शोध घेत असल्याची चाहूल अमन याला लागताच तो आज सकाळपासून फरारी झाल्याचीही माहिती श्री.यादव यांनी दिली. ज्यावेळी त्या मुलीवर अत्याचार झाला तेव्हा त्याच्याबरोबर असलेला अनिलकुमार रघुवंशी हा मध्य प्रदेश येथे राहणारा युवकही फरारी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे दोघेही एकाच कंपनीत नोकरीला आहेत. मुख्य संशयित अमन भारद्वाज याचे छायाचित्र पोलिसांनी जारी केले असून त्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीला २० हजार रुपयाचे रोख बक्षीस पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांनी जाहीर केले आहे.
अधिक माहितीनुसार दि. २६ जानेवारी रोजी या कंपनीचा एक गट हरमल येथील किनाऱ्यावर मौजमजा करण्यासाठी गेला होता. तेव्हा वरील दोघे तरुण निर्जन स्थळी विदेशी पर्यटक आंघोळ करीत असलेल्या ठिकाणी गेले, त्यापैकी एकाने त्या ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता, याची माहिती तिच्या आईला मिळाल्यावर त्याबद्दल त्याच रात्री पेडणे पोलिस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी करून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद केला होता.
पहिल्या दिवशी सदर संशयित तरुणाचे नाव अमन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, तर तो पर्यटक असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. मात्र तिच्या आईने आणि त्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार संशयिताचे रेखाचित्र काढण्यात आले होते. त्यावरून तो तरुण धारगळ येथील कंपनीत नोकरीला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आज सकाळी तो नेहमीप्रमाणे कामाला आला असता पोलिस त्याचा शोध घेत असल्याची माहिती त्याला लागली व त्याने तेथून धूम ठोकली. सदर तरुण या कंपनीत नोकरीला असल्याची माहिती मिळालेली असताना पोलिसांनी त्याठिकाणी नजर का ठेवली नाही, तसेच तो राहत असलेल्या ठिकाणी छापा का टाकला नाही, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आज या दोन्ही तरुणांच्या शोधासाठी महाराष्ट्रात आणि कर्नाटक राज्यात पोलिस पथक पाठवण्यात आले आहे, अशी माहिती श्री. यादव यांनी दिली. अमन हा २००८ सालापासून धारगळ येथील या कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून नोकरीला आहे. तर, तो धारगळ येथेच एका भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याचा दुसरा साथीदार अनिल याच्या मोबाईलवर आज पोलिसांनी संपर्क साधून त्याला पोलिस स्थानकावर येण्याची सूचना केली होती. परंतु, त्यानंतर त्याने मोबाईल बंद ठेवल्याचीही माहिती मिळाली आहे. सायंकाळी सर्व ठिकाणी अमन व अनिल याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. याविषयीचा अधिक तपास पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई करीत आहेत.

ठाणा-कुठ्ठाळी येथे दत्त मंदिरात चोरी

मूर्तीसह ६५ हजार लांबविले
वास्को, दि. २८ (प्रतिनिधी): आज सकाळी कुठ्ठाळी भागातील एका मंदिरात व एका चर्चमध्ये अज्ञात चोरट्यांनी दरवाजांची कुलुपे तोडून आत प्रवेश केल्याचे उघड झाल्याने पुन्हा एकदा येथील सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. ठाणा, कुठ्ठाळी येथे असलेल्या श्री दत्त मंदिरातील देव दत्ताची चांदीची मूर्ती, पादुका व रोख मिळून ६५ हजारांची मालमत्ता चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. सोत्रांत, कुठ्ठाळी येथील अवर लेडी ऑफ पायटी या चर्चमधून चोरट्यांना मालमत्ता लंपास करण्यास अपयश आल्याचे वेर्णा पोलिसांनी सांगितले.
ठाणा येथे असलेल्या दत्त मंदिरात प्रवेश करण्यासाठी अज्ञात चोरट्यांनी मंदिराला असलेल्या चार दरवाजांचे (गर्भ कुडीचे दरवाजे मिळून) कुलुपे तोडून आत प्रवेश केल्याचे उघडकीस आले असून येथे असलेली (अभिषेकासाठी वापरण्यात येणारी) देव दत्ताची चांदीची मूर्ती तसेच चांदीच्या देवाच्या पादुका व पाच हजाराची रोख रक्कम मिळून ६५ हजाराची मालमत्ता लंपास केल्याची माहिती वेर्णा पोलिसांनी दिली. वेर्णा पोलिसांच्या माहितीनुसार चर्चमधून अज्ञात चोरट्यांनी काहीच लंपास केले नाही. मुरगाव तालुक्यात नव्या वर्षात चार धार्मिक स्थळावर अज्ञात चोरट्यांनी चोरीसाठी मंदिराचे दरवाजांची कुलुपे तोडून आत प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे.
वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजन प्रभूदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अभिषेक गोम्स पुढील तपास करीत आहेत.

डिचोलीतून होणारी बेदरकार खनिजवाहतूक कायमची बंद

'रास्तो रोको'नंतर सरकारचा आदेश
डिचोली दि. २८(प्रतिनिधी): डिचोली नागरिक कृती समितीतर्फे सर्वपक्षीय नागरिकांनी डिचोलीतून होणारी बेदरकार खनिज वाहतूक कायमची बंद करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करून सरकारचे नाक दाबून तोंड उघडले आणि उपजिल्हाधिकारी डी. एच. केनावडेकर यांनी सदर वाहतूक बंद करण्याचा तातडीचा आदेश संबंधितांना दिल्यानंतर आंदोलनाची यशस्वी समाप्ती झाली.
डिचोली पालिका क्षेत्रातून तसेच मुळगाव, लांटबार्से आदी गावातून कळणे महाराष्ट्रातून साक्षात यमदूत बनून येणारे खनिजवाहतूक ट्रक अनेकवेळा रोखून धरण्यात आले, पण कायद्याचा धाक दाखवून व कोर्टाचा ससेमिरा मागे लावून आत्तापर्यंत ही आंदोलने चिरडून टाकण्यात शासनाला यश येत होते. पण हल्लीच स्थापन झालेल्या डिचोली नागरिक कृती समितीतर्फे शासनाला सदर धोकादायक वाहतूक कायमची बंद करण्यासाठी २६ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती व सदर धोकादायक खनिज वाहतूक न थांबल्यास आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून वाहतूक रोखून धरण्यात येईल,असा इशारा देण्यात आला होता.आमदार राजेश पाटणेकर यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष सतीश गावकर, उपनगराध्यक्ष उषा कडकडे, नगरसेवक कमलाकर तेली, भगवान हरमलकर, बाळू बिरजे, ऍड. मनोहर शिरोडकर तसेच अन्य नगरसेवक डिचोली बचाव अभियानाचे अध्यक्ष नरेश सावळ, सचिव नरेश कडकडे तसेच अन्य नागरिकांनी आज येथील पुलावर क्षमतेपेक्षा जास्त खनिजमाल घेऊन आलेला ट्रक रोखून धरला व आंदोलनाला प्रारंभ झाला.
सदर ट्रक पुलावर मधोमध आडवा ठेवून वाहतूक अडविण्यात आली. पोलिस निरीक्षक हरिष मडकईकर पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी आले. पण आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत पुलावरच ठाण मांडले. या वेळी दोन्ही बाजूंनी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. संयुक्त मामलेदार सतीश देसाई, उपजिल्हाधिकारी केनावडेकर यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण सदर धोकादायक खनिज वाहतूक कायमची बंद करण्याची मागणी घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी केली व आम्ही हा लढा जिंकू किंवा मरू या न्यायाने लढणार असल्याचे सांगितले. दुपारी बारानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक बंद करण्याचे लेखी आदेश संबंधितांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
माजी मंत्री पांडुरंग राऊत, मयेचे आमदार अनंत शेट, फातोर्ड्याचे आमदार दामू नाईक, तसेच अन्य मान्यवरांनी आंदोलनास पाठिंबा दिला.
शिवसेना राज्यप्रमुख उपेंद्र गावकर यांनी आक्रमकपणे शासकीय अधिकाऱ्यांवर शाब्दिक हल्ला चढविला.
शिवसेना डिचोली तालुकाप्रमुख गुरुदास नाईक, शिवसागर संघटनेचे आनंद नार्वेकर आदींनी या आंदोलनात सक्रिय भाग घेतला.

दोन खनिजवाहू ट्रकांची स्कूलबसला धडक; पालकांनी वाहतूक रोखली

एक विद्यार्थिनी जखमी
तिस्क-उसगाव, दि.२८ (प्रतिनिधी): टाकवाडा उसगाव येथील सेंट जोसफ स्कूलच्या मिनिबसला प्रतापनगर धारबांदोडा येथे दोन खनिज मालवाहू टिपर ट्रकांनी जोरदार धडक दिली. या अपघातात ७ वर्षाची विद्यार्थिनी जखमी झाली.अपघातानंतर प्रतापनगर धारबांदोडा येथे ग्रामस्थांनी बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्ग ४ अ वरील सर्व प्रकारची वाहतूक दीड तास रोखून धरली. टाकवाडा उसगाव येथे सेंट जोसफ स्कूलच्या विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी ४ तास खनिज मालवाहू टिपर ट्रक वाहतूक रोखून धरली. वाहतूक रोखून धरल्याबद्दल ट्रक मालकांनी स्कूलच्या महिला पालकांना, प्राचार्य फादर फेलिक्स लोबो यांना धक्काबुकी केली. फोंडा पोलिस निरीक्षकांनी स्कूलचे प्राचार्य फादर फेलिक्स लोबो यांना ताब्यात घेतले.आज सायंकाळी ४ वाजता फादर फेलिक्स लोबो यांना फोंडा पोलिस स्थानकात अटक करण्यात आली. उद्या २९ पासून बेशिस्त खनिज वाहतूक करणाऱ्या टिपर ट्रकांवर कडक कारवाई करण्याचे संबंधित सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश फोंडा पोलिसांना लिखित स्वरूपात देण्यात आले आहेत.
टाकवाडा उसगाव येथील सेंट जोसफ स्कूलची मिनिबस क्र.जीए ०१ डब्लू ४२१२ विद्यार्थ्यांना आणण्यासाठी आज सकाळी ७.२० वाजता प्रतापनगर येथे गेली होती. प्रतापनगर धारबांदोडा येथे या स्कूलबसमध्ये विद्यार्थी चढत असताना बसला एका बाजूला जीए ०५ टी ०७८३ या खनिज मालवाहू टिपर ट्रकने ठोकर दिली. याच वेळी या बसच्या दर्शनी भागाला समोरून खनिज मालवाहू टिपर ट्रक क्र.केए २४ - ४१७९ ने जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील विद्यार्थिनी फ्लेमिना मातिल्दा फर्नांडिस (वय ७ वर्षे, रा. पणसुले धारबांदोडा) जखमी झाली. तिला १०८ रुग्णवाहिकेतून फोंडा इस्पितळात दाखल करण्यात आले.
या अपघाताचे वृत्त समजताच सकाळी ७.३० वाजता प्रतापनगर,पणसुले भागातील ग्रामस्थांनी पणजी - बेळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व वाहतूक सुमारे दीड तास रोखून धरली. टाकवाडा उसगाव येथे सेट जोसफ स्कूलच्या विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांनी रस्त्यावर धरणे धरून रास्ता रोको आंदोलन छेडले. यावेळी महिला पालकांनी पुढाकार घेऊन खनिज मालवाहू टिपर ट्रक टाकवाडा येथे रोखून धरले.
खनिज मालवाहू टिपर ट्रक रोखून धरल्याबद्दल ट्रकमालक व सेंट जोसफ स्कूलच्या पालकांत बाचाबाची झाली.यावेळी ट्रक मालकांनी स्कूलचे प्राचार्य फादर फेलिक्स लोबो व महिला पालकांना धक्काबुक्की केली. या घटनेच्या वेळी पोलिस तिथे उपस्थित नव्हते.पालक व विद्यार्थ्यांनी रोखून धरलेली खनिज माल वाहतूक टिपर ट्रक मालक जबरदस्तीने सुरू करून पाहत होते.यामुळे यावेळी तंग वातावरण निर्माण झाले.दुपारी १२.५० वाजता फोंडा पोलिस उपनिरीक्षक सचिन पन्हाळकर व संजय दळवी पोलिस फौज फाट्यासह दाखल झाले.त्यांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.दुपारी १.०५ वाजता फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक सी.एल. पाटील साधा वेशात आले आणि त्यांनी स्कूलचे प्राचार्य फादर फेलिक्स लोबो यांना ताब्यात घेतले आणि फोंडा पोलीस स्थानकात नेले.त्यानंतर दुपारी १.२५ वाजता खनिज माल वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.
उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकारी आर . मिहीर वर्धन यांच्या सहीनिशी ६ जानेवारी २०१० रोजी काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी उद्या २९ जानेवारी पासून फोंडा पोलीस अधिकारी, फोंडा वाहतूक पोलीस, पणजी येथील वाहतूक संचालनालयाचे भरारी पथक करणार आहे.तिस्क उसगाव येथील केंद्रीय इस्पितळ ते उसगाव चौपदरी पुलापर्यंतचा भाग"नो पार्किंग झोन'म्हणून जाहीर करण्यात आला आहे.या भागात वाहने पार्क करून ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना विद्यालयात सुखरूप जातायेता यावे म्हणून दररोज सकाळी ७.३० ते ८.३० वाजेपर्यंत खनिज माल वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.उसगाव तिस्क इस्पितळ ते उसगाव चौपदरी पुल पर्यत ताशी ४५ किलोमीटर या गतीने खनिज माल वाहू टिपर ट्रक हाकावेत.हा भाग "नो ओव्हर टेकिंग झोन ' म्हणूनही जाहीर करण्यात आला आहे.टिपर ट्रकांच्या हौदाच्या समपातळीपर्यंत खनिज माल माती भरून वाहतूक करावी लागेल.ढिगारे करून खनिज माल वाहतूक करणाऱ्या टिपर ट्रकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या भागातील बेशिस्त खनिज मालवाहतूक करणाऱ्या टिपर ट्रकांवर कशा प्रकारे नियंत्रण आणावे, या संदर्भात सेंट जोसफ चर्चचे फादर फेलिक्स लोबो व वरिष्ठ पोलिस अधिकारी व पालक यांच्यात आज सायंकाळी चर्चा झाली.

शशिकलाताईंचा आज सत्कार

पणजी, दि. २८ : माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांनी नुकतीच वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यानिमित्त २९ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता पणजी जिमखाना मैदानावर त्यांचा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत प्रमुख पाहुणे असतील.

'कायदा सुव्यवस्थेबाबत कुणीच गंभीर नाही'

मिकी पाशेकोंनी डागली मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांवर तोफ
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): गोव्यात विदेशी पर्यटकांवर अत्याचार होण्याच्या प्रकारांबाबत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना वेळोवेळी जाणीव करून दिली आहे. पण आपल्या सूचनांकडे पद्धतशीरपणे कानाडोळा करणेच त्यांनी पसंत केले. गेल्या डिसेंबर महिन्यात याप्रकरणी मुख्यमंत्री कामत यांना खास पत्र पाठवून या प्रकारांची गंभीर दखल घेण्याची विनंती केली, पण त्यालाही काहीही प्रतिसाद मिळाला नाही. हे प्रकार असेच चालू राहणार असतील तर त्याचे गंभीर परिणाम गोव्याला भोगावे लागणार आहेत व गोवा हे एक सुरक्षित व शांत पर्यटनस्थळ म्हणून लाभलेले लौकिक धुळीस मिळेल, असा इशारा पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी दिला.
आज इथे पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते जबाब देत होते. केवळ गोव्याला बदनाम करण्यासाठीच हे प्रकार सुरू आहेत असे म्हणून हात झटकता येणार नाही तर गृहखात्याने या प्रकरणांचा बिमोड करणे गरजेचे आहे. हरमल येथील या प्रकाराबाबत मुख्यमंत्री काहीही वक्तव्य करू पाहत नाही,असे काही पत्रकारांनी विचारले असता त्याचे उत्तर तेच योग्य पद्धतीने देऊ शकतील,असे मिकी म्हणाले. कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे किंवा नाही याचे उत्तर जनताच देऊ शकते त्यामुळे हे खाते सांभाळण्यास कोण पात्र किंवा कोण अपात्र हे वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही, असेही ते ठामपणे म्हणाले.
अलीकडच्या काळात या प्रकारांत वाढ होत आहे व त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर गोव्याची बदनामी सुरू आहे. आता ही बदनामी थांबवणे ही संपूर्ण सरकारची जबाबदारी आहे. केवळ पर्यटनमंत्री या नात्याने आपण यात काहीही करू शकत नाही, असेही त्यांनी प्रांजळपणे कबूल केले. प्रत्येक घटनेवेळी विदेशी देशातील दूतावासाकडून गोव्यात न जाण्याचा फतवा काढला जातो व त्याचा फटका एकंदरीत राज्याच्या पर्यटन उद्योगावरही होतो. पर्यटन हा राज्याचा आर्थिक कणा आहे हे अजिबात विसरता येणार नाही व त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरेल. आता या गोष्टीचा सारासार विचार करणेच गोव्याच्या हिताचे ठरेल,असेही पर्यटनमंत्र्यांनी स्पष्ट केले.
येत्या ३० रोजी होणाऱ्या प्रदेश अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते गोव्यात येतील. त्यांच्यासमोर हा विषय चर्चेस येणार आहे व त्या दृष्टीने या संपूर्ण परिस्थितीचा आढावाच घेतला जाईल,अशी माहितीही त्यांनी दिली.

Thursday, 28 January 2010

राहुल गांधींची ती भेट राजकीयच

भाजयुमोने सादर केली "सीडी'

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) - कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा गोवा विद्यापीठातला कार्यक्रम राजकीय नसून तो केवळ विद्यार्थ्यांसाठी होता, असा दावा करून युवक कॉंग्रेसने भाजप युवा मोर्चाला आव्हान दिल्याने आज युवा मोर्चाचे अध्यक्ष रुपेश महात्मे यांनी राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यासमोर केलेल्या राजकीय वक्तव्याची "सीडी'च पत्रकारांसमोर सादर करून संकल्प आमोणकर यांना तोंडघशी पाडले. तसेच, गोवा विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल एस एस. सिद्धू यांची आज भेट घेऊन त्यांनाही हा पुरावा सादर करण्यात आल्याची माहिती श्री. महात्मे यांनी दिली. ते आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर मोर्चाचे उपाध्यक्ष दीपक कळंगुटकर, रुपेश हळर्णकर, दीपक नाईक, विद्यार्थी विभागाचे संकल्प चांदेलकर, सिद्धेश नाईक, आत्माराम बर्वे व सिद्धार्थ कुंकळ्ळकर उपस्थित होते.
युवक कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी युवा मोर्चाला आव्हान न देता स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावे, श्री. आमोणकर यांनी जनतेची तसेच विद्यार्थ्यांची दिशाभूल केल्याने त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, असे आव्हान श्री. महात्मे यांनी दिले. दोन दिवसांपूर्वी श्री. आमोणकर यांनी राहुल गांधी यांचा विद्यापीठातला कार्यक्रम राजकीय असल्याचे सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान भाजप युवा मोर्चाला दिले होते.
विद्यापीठातील राहुल गांधी यांचा कार्यक्रम कॉंग्रेस पक्षाने कशा पद्धतीने आयोजित केला होता, याचे सर्व पुरावे उघड करीत या कार्यक्रमाला कॉंग्रेस पक्षाने छापलेले "पासेस', त्यावर टाकलेला विद्यापीठाचा पत्ता तसेच विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या पक्षाच्या बैठकीत संकल्प आमोणकर यांनी शिक्षण मंत्र्यांची केलेली तक्रार आणि राहुल गांधी यांची राजकीय वक्तव्ये असलेली सीडी राज्यपालांना देण्यात आली आहे. आता आम्ही वाट पाहतो ती राज्यपालांच्या कारवाईची, असे श्री. महात्मे यांनी पुढे सांगितले.
"विद्यापीठात विद्यार्थ्याच्या समोर कॉंग्रेस पक्ष बळकट करण्याचे राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य निषेधार्थ असल्याचे श्री. महात्मे यांनी पत्रकारांनी केलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. त्याने विद्यापीठात राजकीय वक्तव्य करून अत्यंत चूक केली असल्याचेही ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला विद्यार्थी येणार नसल्याने विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. मोहन संागोडकर यांनी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी परिपत्रक काढले. तसेच कॉंग्रेस पक्षाच्या आदेशावरून काही महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीही अशा पद्धतीचे आदेश काढले होते, याची राज्यपालांकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
"सीडी'कशी उपलब्ध झाली?
युवक कॉंग्रेसने राहुल गांधींना रोज गोव्यात आणले म्हणून युवा मोर्चाला कोणताही त्रास होणार नाही. याची नोंद संकल्प आमोणकर यांनी युवा मोर्चावर टीका करताना घ्यावी. तसेच श्री. गांधी यांच्या सभा घेतल्या म्हणूही कॉंग्रेस पक्ष वाढणार नाही. राहुल गांधी यांनी म्हटल्याप्रमाणेच, कॉंग्रेस पक्ष आपल्याने कर्माने संपणार असल्याचे मत श्री. महात्मे यांनी श्री. आमोणकर यांच्या टीकेला उत्तर देताना व्यक्त केले. तसेच, कॉंग्रेस पक्षातील आणि खुद्द संकल्प आमोणकर यांच्या जवळच्या एका सहकाऱ्याने सदर "सीडी' उपलब्ध करून दिली असल्याचे महात्मे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

कौशल्याचा अंतर्भाव, विस्तार व उत्कृष्टता हीच देशाची ताकद

पद्मविभूषण डॉ. माशेलकर यांचा त्रिसूत्री मंत्र

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी)- काही काळापूर्वी भारत महाशक्ती बनण्यासाठी "आयटी'चा अर्थात माहिती तंत्रज्ञानाच्या मंत्राचा उद्घोष झाला होता. आता मात्र याच "आयटी' मंत्राचे रूपांतर भारतीय कौशल्य (इंडियन टेलंट्स) मध्ये करायला हवे. या भारतीय कौशल्याचे देशाच्या महाशक्तीत परिवर्तन करण्यासाठी त्रिसूत्री कार्यक्रम युद्धपातळीवर राबवण्याची नितांत गरज आहे. "विस्तार, अंतर्भाव व उत्कृष्टता' हा मंत्रच देशाला एका नव्या उच्चांकावर पोहचवू शकतो, असे प्रतिपादन गोमंतकीय सुपुत्र तथा प्रसिद्ध वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.
गोवा विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी व्याख्यानमालेनिमित्त राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या परिषदगृहात ते "भारतीय कौशल्याच्या आधारे भारतीय भवितव्याचा आकार' या विषयावर बोलत होते. ते पुढे म्हणाले की एकविसाव्या शतकाच्या अनुषंगाने भारत व चीन या देशांवर संपूर्ण जगाची नजर लागून आहे. चीनच्या तुलनेत आपण अजूनही मागे आहोत. गेल्या तीस वर्षांत आपल्या देशात आमूलाग्र बदल घडले. काही काळापूर्वी गॅस सिलिंडरसाठी रांगा लागायच्या, दूरध्वनीसाठी महिनोमहिने प्रतीक्षा यादीत थांबावे लागे, वाहन खरेदीला तर वर्षे लागायची पण आता परिस्थितीत कायापालट झाला आहे. पुढील तीस वर्षांत नेमका काय बदल होईल हे सांगता येणार नाही. देशाला महाशक्ती बनवण्यासाठी आपण या देशाच्या लोकसंख्येचा पुरेपूर लाभ उठवायचा आहे व देशातील लोकांच्या कौशल्याला फुंकर देऊन प्रगतीचे पर्वत पादाक्रांत करायचे आहेत,असे डॉ.माशेलकर म्हणाले.
आपला देश मोठा आहे, असे म्हणून क्षेत्रफळाच्या आकारात लहान असलेल्या विकसीत देशांशी तुलना करून आपले अपयश लपवण्यापेक्षा अधिक आक्रमकपणे लक्ष्याच्या दिशेने गरुडभरारी घेणेच योग्य ठरेल व त्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती हवी. देशात कौशल्याची कमी नाही पण या कौशल्याला संधी प्राप्त झाली पाहिजे. कित्येक भारतीय आज विदेशांत उच्चपदांवर आहेत ते का, याचा विचार केला तर भारत हा प्रज्ञासंपन्न देश आहे पण प्रज्ञेला संधी नाही. अमेरिकेसारख्या देशांत असंख्य संधी आहेत. भारतातही इथल्या कौशल्याला कशा संधी मिळतील याकडे लक्ष केंद्रित करायला हवे. भारतात नॅनोसारख्या कारची निर्मिती करण्यात आली व ही निर्मिती करणारा गिरीष वाघ हा कुणी मोठा अभियंताही नाही.याचा अर्थ इथे कौशल्याला कमी नाही. केवळ या कौशल्याचा योग्य प्रशिक्षण व संधी मिळायला हवी व त्याचा योग्य पद्धतीने वापर व्हायला हवा,असेही डॉ.माशेलकर म्हणाले.भारताच्या एकूण लोकसंख्येतील ५५ टक्के भाग हा ऐन पंचविशीतील आहे, त्यामुळे येत्या काळात सर्वांत युवा देश म्हणून आपण जगासमोर जाणार आहोत. पण केवळ १७ टक्के युवक हे उच्चशिक्षणापर्यंत जातात ही सत्य परिस्थिती आहे व ती बदलणे क्रमप्राप्त आहे.१.१ दशलक्षांचा आकडा पार केलेल्या या देशात हाताच्या बोटांवर मोजण्यापर्यंतच उच्चशिक्षण संस्था असणे ही गंभीर बाब आहे. शिक्षणाचा विस्तार, प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती व प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेचे लक्ष्य या मंत्राची जोपासना करून देशाला प्रगतिपथाच्या उत्तुंग टोकावर नेणे शक्य आहे,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.देशात सुमारे एक हजार विद्यापीठे,दहा हजार महाविद्यालये व दहा हजार समाज विद्यालये स्थापण्याची गरज आहे. केंद्र सरकारने त्यादृष्टीने पावले उचलली आहेत ही चांगली गोष्ट असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. माहिती तंत्रज्ञानाचा जयघोष कितीही केला तरी प्रत्यक्षात या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवणाऱ्याची संख्या अत्यल्प आहे याचा गंभीरतेने विचार व्हायला हवा.रॉयल अकादमी व इंजिनिअरिंग सोसायटी या ब्रिटनस्थीत संस्थेकडे केवळ तीनच भारतीय वैज्ञानिक संशोधकांचा समावेश का, ही संख्या वाढली पाहिजे व त्यासाठी शिक्षणाचा झपाट्याने प्रसार होऊन भारतीय कौशल्याचा विकास होणे हेच खरे आव्हान देशासमोर आहे,असे डॉ.माशेलकर म्हणाले.
व्याख्यानमालेचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ.दिलीप देवबागकर यांनी केले.याप्रसंगी मुख्यमंत्री दिगंबर कामत,सभापती प्रतापसिंग राणे,राज्य कायदा आयुक्त ऍड.रमाकांत खलप, तसेच विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी,प्राचार्य व शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते.

राष्ट्रवादीच्या अधिवेशनाने राजकीय कलाटणी?

मडगाव, दि. २७ (प्रतिनिधी) : गोव्यात सत्ताधारी कॉंग्रेसमधील असंतुष्टांनी नेतृत्व बदलासाठी पुन्हा खाल्लेल्या उचलीच्या पार्श्र्वभूमीवर येत्या शनिवारी बेताळभाटी येथे आयोजित केले गेलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाअधिवेशन हे गोव्यातील राजकारणाची दिशा निश्र्चित करणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. महसूलमंत्री जुझे फिलीप यांनी कॉंग्रेसवर डागलेली तोफ या अधिवेशनाचा एकंदर रोख कसा असेल ते दर्शवणारी आहे, असेच मानले जात आहे.
या अधिवेशनाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल,पी. ए. संगमा, तारीक अन्वर ही नेते मंडळी उपस्थित रहाणार असल्याने तसेच महागाई प्रश्र्नावरून दिल्लीत पवारांवर झालेले शरसंधान व त्यानंतरच्या राजकीय घडामोडी याचे बरेच पडसाद या अधिवेशनात उमटतील तसेच पक्षाचे गोव्यातील स्थान अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने या अधिवेशनात ठोस निर्णय घेतले जातील,अशी अपेक्षा राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत.
पवार यांचे कॉंग्रेसशी बिनसले तर त्याचे परिणाम फक्त दिल्लीतील व महाराष्ट्रातील राजकारणावरच नव्हे तर गोव्यातील राजकारणावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केवळ पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांचेच केवळ नव्हे तर राष्ट्रवादीचे मंत्रिमंडळातील दुसरे सदस्य असलेले जुझे फिलीप यांनी कॉंग्रेसवर जाहीरपणे आगपाखड करून त्याचे प्रत्यंतर आणून दिले आहे व कॉंग्रेस प्रत्येकबाबतीत राष्ट्रवादीला गृहीत धरत असल्याचा ठपका ठेवला आहे.
गोव्यात सत्ताधारी गटात सध्या जो असंतोष आहे,त्याला राष्ट्रवादीच्या या अधिवेशनामुळे आणखी खतपाणी मिळेल अशीच एकंदर चिन्हे आज दिसत आहेत. एका पाहणीनुसार संपूर्ण सासष्टीत या अधिवेशनामुळे कॉंग्रेसला गळती लागण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षावर नाराज असलेले पण दुसरा पर्याय नसल्याने कॉंग्रेसची कास धरून असलेले मोठ्या संख्येतील कार्यकर्ते या अधिवेशनाचा लाभ उपटतील,असा अंदाज खुद्द कॉंग्रेसवालेच व्यक्त करताना दिसतात.
त्यामुळेच काही सत्ताधारी नेत्यांनी या अधिवेशनाची धास्ती घेऊन या अधिवेशनाला अपशकून करण्याचे अनेक प्रयत्न केले. त्यासाठी अधिवेशनाची जागा असलेल्या ठिकाणी जाणारा रस्ता अडविण्याचा तसेच तेथील कामावर जाणाऱ्या कामगारांची वाहने अडवून त्यांना तालाव देण्याचे प्रकारही घडले असे आरोप राष्ट्रवादीतून केले जात आहेत. या अधिवेशनाचे सर्वेसर्वा मिकी पाशेको यांनी नंतर या प्रकारांची माहिती शरद पवार यांना दिली.घातपात घडविणाऱ्यांची नावे ३० जानेवारीनंतर आपण उघड करू, असेही त्यांनी सांगितले आहे.
या अधिवेशनाचा मुहुर्त साधून राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षाच्या नावाची घोषणा करताना पक्षाची राज्यातील आगामी वाटचालीची दिशा व पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार यांची घोषणाही ते करतील असे स्थानिक पक्षसूत्रांतून सांगण्यात आले.
दरम्यान, या अधिवेशनाची तयारी सध्या जोरात चालू असून मिकी पाशेको यांनी तो प्रतिष्ठेचा मुद्दा बनविला आहे. एकंदर तयारीवर ते स्वतः लक्ष देताना दिसत आहेत. हे अधिवेशन संस्मरणीय ठरावे असाच त्यांचा एकंदर कटाक्ष असल्याचे जाणवत आहे.

जुगारातून नव्हे, स्वदानातूनच मंदिर उभे राहील

केरी गावातील स्वाभिमानी ग्रामस्थांचा निर्धार

- आसगांवच्या श्रीराष्ट्रोळी देवस्थानचा जुगाराला विरोध

- वास्कोत मटकावाल्यांवर छापासत्र

- आज मोरजीतील जत्रेतही जुगार नाही ?


पणजी, दि. २७ (प्रतिनिधी)- पेडणे तालुक्यातील केरी गावचे जागृत देवस्थान असलेल्या श्री देव आजोबा मंदिराच्या नूतनीकरणाला जुगारापासून मिळणाऱ्या पैशांची गरज नाही. या गावात जर खरोखरच स्वाभिमानी व श्री देव आजोबावर श्रद्धा ठेवणारे लोक असतील तर हे मंदिर येथील नागरिकांच्या व जत्रौत्सवाला भेट देणाऱ्या भाविकांच्या दानातूनच पूर्ण होईल. यंदा जत्रौत्सवाला भेट देणाऱ्या भाविकांनी सढळहस्ते मंदिरकामाला दान करावे व जुगाराच्या पैशांच्या बळावर मंदिरे थाटण्याच्या मानसिकतेला सणसणीत चपराक द्यावी, असे जाहीर आवाहन केरी गावच्या स्वाभिमानी ग्रामस्थांनी केले व जुगारविरोधी चळवळीला आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
पेडणे केरी येथील जत्रौत्सव २९ रोजी साजरा होत आहे. तालुक्यातील शेवटची व सर्वांत मोठी जत्रा म्हणून नावलौकिक प्राप्त झालेल्या या जत्रौत्सवात दरवर्षी मोठा जुगार भरतो. यंदा मात्र दै. "गोवादूत' ने जत्रौत्सवातील तथा इतर धार्मिक उत्सवांनिमित्त आयोजित होणाऱ्या जुगाराविरोधात व्यापक जनजागृती चळवळ उभारल्याने जुगारवाल्यांत चांगलीच धडकी भरली आहे. दरम्यान, या जुगाराचे समर्थन करणारे काही लोक या जुगारापासून मंदिराच्या कामाला मिळणाऱ्या देणगीचे निमित्त पुढे करून जुगारविरोधकांना मिळणारा पाठिंबा वळवण्याचे जोरदार प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, या जत्रौत्सवानिमित्ताने पोलिसांना बाजूला सारून थेट वरिष्ठ राजकीय पातळीवर जुगार आयोजित केला जात होता. आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी जुगाराविरोधात मोहीमच उघडल्याने काही लोक गृहमंत्री रवी नाईक यांच्याकडेही पोहचल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. गृहमंत्री इस्पितळांत दाखल झाल्याने त्यांचा बेत चुकला असला तरी आता पोलिसांशी संगनमत करून जुगार थाटण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. एरवी जत्रौत्सवाच्या पंधरादिवसांपूर्वी जुगारासाठी मांडण्यात येणारे पाट आता दोन दिवस बाकी असताना अद्याप मांडण्यात आले नसल्याचीही खबर आहे. पेडणे पोलिस स्थानकाच्या अधिकाऱ्यांवरही हा जुगार सुरू करण्यासाठी काही प्रतिष्ठित मंडळींकडून दबाव टाकला जात असल्याची खबर आहे. या ठिकाणी जुगारात एकाच रात्रीला लाखो रुपयांची उलाढाल होत असते, त्यामुळे सगळे जुगारवाले एकत्रितरीत्या या जत्रौत्सवात जुगार थाटण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करीत असल्याचीही खबर मिळाली आहे.
"मांद्रे सिटीझन फोरम' आक्रमक
पेडणे तालुक्यातील जुगारविरोधी चळवळीला आता खऱ्या अर्थाने बळ प्राप्त झाले आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या हीरक महोत्सवाचे निमित्त साधून "मांद्रे सिटीझन फोरम' च्या युवा कार्यकर्त्यांनी आता जुगाराविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला. "फोरम' तर्फे मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर व माजी केंद्रीय कायदामंत्री तथा कायदा आयोगाचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांना निवेदन सादर करून या लढ्याला पाठिंबा देण्याची विनंती केली. या दोन्ही नेत्यांनी "फोरम' ला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. हा जुगार पेडणेतून हद्दपार करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहून एकत्रितरीत्या लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ऍड. खलप यांनी पोलिस महासंचालकांना पत्र पाठवून पेडणेतील जुगारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
वास्कोत मटकावाल्यांची धरपकड
आज संध्याकाळी वास्को पोलिसांनी अचानकपणे छापासत्र सुरू करून म्हायमोळे येथील एका घरातून मटका घेणाऱ्या सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून दहा हजार चारशे रुपयांची रक्कम जप्त केली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दिनेश बांदोडकर, महेंद्र धुरी, बीडू हसन, धीरज सावंत, अरुण सावंत व अशोक नारायण अशी ह्या सहा संशयितांची नावे आहेत. वास्कोचे उपनिरीक्षक वैभव नाईक, उपनिरीक्षक फिलोमिना कोस्ता तसेच पोलिस शिपाई दामू मयेकर, पुरुषोत्तम नाईक व इतरांनी मिळून हा छापा टाकला. याठिकाणी असलेले मटक्याचे साहित्यही पोलिसांनी जप्त केले.
आसगांव येथील श्री राष्ट्रोळी देवस्थानचा जुगाराला विरोध
आसगाव येथील श्री राष्ट्रोळी देवस्थानच्या २६ रोजी साजरा करण्यात आलेल्या जत्रौत्सवात जुगाराला थारा देण्यात आला नाही. सदर देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कडक पवित्रा घेतल्याने या जत्रौत्सवात जुगार पूर्णपणे बंद करण्यात आल्याची खबर मिळाली आहे. देवस्थान समितीच्या भूमिकेबाबत गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

रशियन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

हरमल किनाऱ्यावरील घटना
पणजी, हरमल दि. २७ (प्रतिनिधी) - हरमल वाघ कोळंब येथील समुद्रकिनाऱ्यावर एका नऊ वर्षीय रशियन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची घटना घडली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध पेडणे पोलिस स्थानकात बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर पिडीत मुलीच्या आईने पेडणे पोलिस स्थानकात तक्रार सादर केली आहे. त्या मुलीची वैद्यकीय चाचणी केली असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याने सिद्ध झाले असून पोलिस संशयिताचा शोध घेत असल्याची माहिती पेडणे पोलिसांनी दिली. संशयितावर भा.दं.स ३७६ ल बाल हक्क कायदा ८ (२)नुसार गुन्हा नोंद केला आहे. अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.
अधिक माहितीनुसार दि. २६ रोजी संधयाकाळी ६.३० वाजता ही घटना घडली. पिडीत मुलगी ही आपल्या आईसोबत समुद्र किनाऱ्यावर स्नानासाठी गेली होती. आई किनाऱ्यावर साधारण ३०-३५ मीटरवर असलेल्या सनबॅडवर बसली होती तर मुलगी पाण्यात आंघोळ करीत होती. यावेळी तिच्या बाजूला दोघे तरुण आंघोळ करीत होते हे तिच्या आईने पाहिले होते. मात्र काही वेळात मुलगी रडत आल्याने तिने तिची खोदून चौकशी केली. आपल्या बाजूला आंघोळ करणाऱ्या एका तरुणाने आपल्या गुप्त भागावर अत्याचार केल्याचे तिने सांगितले. तिच्या गुप्तांगावर जखम झाल्याचे वैद्यकीय चाचणी अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, काल रात्री ७.१५ वाजता या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. हवालदार म्हामल यांनी वरिष्ठांना कल्पना देताच पेडणे पोलिसांनी सातनंतर हरमल भागात नाकाबंदी केली, परंतु काहीच सापडू शकले नाही. सदर संशयितांना आपण ओळखू शकते , असा विश्वास तिच्या आईने व्यक्त केला आहे. ज्याठिकाणी ही घटना घडली आहे, त्याच्या काही अंतरावर दोघे तरुण बसले होते. त्यानंतर ते आंघोळीसाठी उतरले होते, अशी माहिती उपलब्ध झाली असून याठिकाणी सर्रासपणे असे प्रकार घडत असल्याचे त्या व्यक्तीचे म्हणणे आहे. हा भाग निर्जन असल्याने अनेक लंपट व्यक्ती विदेशी पर्यटकांना पाहण्यासाठी याठिकाणी येतात. त्यानंतर एकटी आंघोळ करणाऱ्या तरुणीच्या बाजूला जाऊन आंघोळ करतात, त्यानंतर तिच्याशी मैत्री करून त्याचा गैरफायदा उठवतात. त्यामुळे गोव्याच्या समुद्र किनाऱ्याचे नाव बदनाम होत असल्याचे येथील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
याठिकाणी पोलिस गस्त अधिक पाठवण्याची गरज असल्याचेही येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
याविषयीचा अधिक तपास पेडणे पोलिस स्थानकाचे निळू राऊत देसाई करीत आहेत.

Tuesday, 26 January 2010

दिल्लीत पवारांचे पंख छाटण्याची तयारी..!

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या विभाजनाची शिफारस
नवी दिल्ली, दि. २५ : गगनाला भिडलेल्या महागाईच्या विषयावरून कॉंग्रेस व विरोधी पक्षांच्या टीकेचे मुख्य लक्ष्य ठरलेले केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे पंख छाटण्याची तयारी नवी दिल्लीत सुरू झाली आहे. त्यासाठी कृषी मंत्रालयाच्या विभाजनाचा प्रस्ताव तयार होऊ घातल्याचे वृत्त "सीएनएन-आयबीएन' या इलेक्ट्रॉनिक वाहिनीने दिले आहे. त्यानुसार या मंत्रालयातून ग्राहक व्यवहार विभाग वेगळा काढला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
केंद्रीय कायदामंत्री एम. वीरप्पा मोईली यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकीय सुधारणा आयोगाने केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या विभाजनाची शिफारस केली आहे. मात्र या सगळ्या घडामोडींची एकहाती जबाबदारी घेण्यास पवार यांनी नकार दिला आहे. महागाईला मी एकटाच जबाबदार कसा, असा प्रश्न उपस्थित करतानाच याचे दायित्व पंतप्रधानांसह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळानेच स्वीकारले पाहिजे, असे सांगून त्यांनी आणखी गोंधळ निर्माण केला आहे. त्यांच्याकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या वादग्रस्त विधानांवरून केंद्रीय मंत्रिमंडळामध्येही असंतोष निर्माण झाल्याची वदंता आहे.
धोरणात्मक निर्णय पंतप्रधान व सारे मंत्रिमंडळच घेत असते. केवळ एकटा मंत्री ते ठरवत नसतो. कृषी मंत्रालयासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीकडून केल्या जाणाऱ्या शिफारशी आपण केंद्रीय मंत्रिमंडळापुढे ठेवतो व त्याला मान्यता दिली जाते, असे पवार यांनी स्पष्ट केले.
पवारांकडून कृषिव्यवस्थेचा बट्ट्याबोळ
या पार्श्वभूमीवर, देशातील प्रचंड वेगाने वाढत चाललेल्या महागाईला केंद्रीय कृषिमंत्री हेच जबाबदार असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. पक्षप्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले की, महागाईच्या मुद्यावर पवार हे सातत्याने दलालासारखी वक्तव्ये करत आले आहेत. एकीकडे गेल्या दोन वर्षांपासून सरकारने गव्हाचे विक्रमी उत्पन्न झाल्याचे सांगत असताना त्याच्या किंमती का वाढत आहेत याकडे कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे देशातील एकूणच अन्नधान्य व्यवस्थेतील व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची तीव्र गरज आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी साखरेच्या किंमती आटोक्यात ठेवण्यासाठी सुमारे ११ लाख टन साखरेचा साठा खुला करण्यात आल्याचा आरोपही श्री. प्रसाद यांनी केला. तसेच पवार यांच्या वक्तव्यानुसार पंतप्रधानदेखील महागाईला तेवढेच जबाबदार आहेत. कारण सत्तेवर येताच पहिल्या शंभर दिवसांत अन्नधान्याचे दर खाली आणण्याचे आश्वासन त्यांनी जाहीरनाम्यात दिले होते, याची आठवण श्री. प्रसाद यांनी करून दिली.
पंतप्रधान हे स्वतः अर्थतज्ज्ञ असताना देशातील अन्नव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला आहे. लोकांचा त्यामुळे दारूण अपेक्षाभंग झाला आहे. खोटी आकडेवारी सादर करून देशवासीयांना निव्वळ मूर्ख बनवले जात आहे. महागाईची जबाबदारी केंद्राकडून निष्कारण राज्य सरकारांवर ढकलली जात आहे. खरे म्हणजे धान्याचे दर निश्चित करणे हा केंद्राच्या धोरणाचा महत्त्वपूर्ण भाग आहे, असे श्री. प्रसाद यांनी जोर देऊन सांगितले.
मात्र, देशावर केव्हा कोणते नैसर्गिक संकट येईल याचा अंदाज कोणीच वर्तवू शकत नाही. पवारांच्या मंत्रालयाचे विभाजन होणार वगैरे गोष्टी म्हणजे निव्वळ कल्पनाविलास आहेत. दूधाच्या दरासंबंधी श्री. पवार यांनी केलेले वक्तव्य म्हणजे सत्यकथनच होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्त तारिक अन्वर यांनी आपल्या नेत्याचा बचाव केला आहे.

'ओपीडी' सोडून सर्व डॉक्टर उद्घाटन सोहळ्यात मग्न!

'गोमेकॉ'चा खास बालचिकित्सा विभाग सुरू
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात आज बालचिकित्सा विभागाच्या शुभारंभासाठी सत्तरी मतदारसंघातून खास तीन बसगाड्या भरून लोकांना आणण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सत्तरीतीलच लोकांना का आणण्यात आले, असा संतप्त सवाल विचारला जात असून आरोग्य खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी हा केवळ सत्तरीसाठीच हा खास विभाग सुरू केला आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विशेष परिपत्रक जारी करून सर्व डॉक्टरांना जातीने हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे सकाळी ११ ते १२.१५ या दरम्यान, सर्व "ओपीडी' बंद ठेवून डॉक्टर या कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते. त्यामुळे सर्व "ओपीडी'वर रुग्णांचे अतोनात हाल झाले. अनेक रुग्ण विव्हळत होते. त्यांना पाहण्यासाठी एकही डॉक्टर उपलब्ध नव्हता. गेल्या काही दिवसांपासून गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात रुग्णाचे हाल होत असल्याचे अनेक घटनांतून उघड होत असतानाच अशा कार्यक्रमांना सर्व ओपीडी डॉक्टरांना उपस्थित ठेवण्यामागील आरोग्यमंत्र्याचे काय प्रयोजन होते, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. रुग्णाबाबत डॉक्टरांना आणि आरोग्यमंत्र्यांनाही गांभीर्य नाही, हेच सुचवायचे आहे का, असा प्रश्न गोव्यातील जनतेला पडलेला आहे.

बनावट मद्यप्रकरणातील सूत्रधाराचा शोध जारी

सावंतवाडी, पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): गोव्यातून महाराष्ट्रात बनावट मद्याची वाहतूक करणाऱ्या दिनकर पाटील याच्या मोबाईलवरून या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यासाठी बांदा पोलिस कसोशीने प्रयत्न करीत आहेत. दिनकर पाटील याचा पूर्वेतिहास तपासून पाहिला असता तो अनेक नावांनी वावरत असल्याचेही स्पष्ट झाले आहे, त्यामुळे त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवर कितपत निर्भर राहावे, याबाबत आता पोलिसही संभ्रमात सापडले आहेत. दरम्यान, गोव्यातून आणले जाणारे हे मद्य केरळ व कर्नाटकातही नेले जाते व त्यात "रमेश' नामक एक व्यक्ती कार्यरत असल्याने पोलिस त्याच्याही मागावर आहेत.
गेल्या काही काळापासून गोव्यातून मोठ्या प्रमाणात बनावट मद्याची तस्करी शेजारील राज्यांत होत आहे. महाराष्ट्र पोलिसांनी गत काळात बेकायदा मद्य वाहतुकीची अनेक वाहने पकडली असली तरी अद्याप या प्रकरणी मुख्य सूत्रधारापर्यंत पोलिसांचे हात पोहचू शकलेले नाहीत. बनावट मद्याची वाहतूक करणारी वाहने गोव्याहून सुखरूपपणे बाहेर पडतात व महाराष्ट्र सीमेवर पकडली जातात हे कसे काय, असाही सवाल पडला आहे. गोव्यात या वाहनांची तपासणी होतच नसेल किंवा सरकारातीलच काही अधिकारी या प्रकरणी गुंतले असावे, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या मुळाशी अवश्य पोहचू असा विश्वास बांदा पोलिस स्थानकाचे निरीक्षक दत्तात्रय मुरादे यांनी व्यक्त केला. दिनकर पाटील याच्या मोबाईलवरील नंबरवरून महत्त्वाचे धागेदोरे सापडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
मद्य घोटाळा चौकशीचा फार्स
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी उघडकीस आणलेल्या सुमारे शंभर कोटी रुपयांची व्याप्ती असलेल्या मद्यसाठा घोटाळ्याची चौकशी हा केवळ फार्स असल्याची भावना बनत चालली आहे. कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे पर्रीकर यांनी भर विधानसभेत या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. या घोटाळ्याचा आंतरराज्यीय संबंध असल्याने "सीबीआय" मार्फत चौकशी करण्याची पर्रीकर यांची मागणी मुख्यमंत्री कामत यांनी फेटाळून लावली होती. वित्त सचिव उदीप्त रे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते व त्याप्रमाणे श्री. रे यांनी चौकशीलाही प्रारंभ केला आहे. प्राप्त माहितीनुसार या प्रकरणाची चौकशी ही केवळ धूळफेक असल्याचे समजते. वित्त सचिव उदीप्त रे यांची यापूर्वीच गोव्यातून बदली झाली आहे व ते मार्चपर्यंत इथे असतील. तो काळपर्यंत केवळ वेळ मारून नेण्यासाठी चौकशीचा आभास निर्माण केला जात आहे. वित्त सचिव व मुख्यमंत्री हे देखील या घोटाळ्याबाबत गंभीर नसल्याचेच सध्या स्पष्ट होते. बांदा येथे गेल्या आठवड्यात सापडलेला बनावट मद्य साठा गोव्यातून नेला जात होता, त्यामुळे ही तस्करी अजूनही कार्यरत आहे व त्याला राजकीय आश्रय असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
------------------------------------------------------------------------
राजापूर टाकेवाडी येथे मद्यसाठा जप्त
गोव्यातून चोरट्या पद्धतीने वाहतूक होणारा मद्यसाठा कणकवली पोलिसांनी आज पहाटे तीन वाजता पाठलाग करून राजापूर येथील टाकेवाडी येथे पकडला. ट्रक क्रमांक एमएच - ०४ बी - ८०३४ या वाहनातून अवैध मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या ट्रकचा पाठलाग सुरू केला. पोलिस मागावर असल्याचे कळताच चालत्या वाहनातून मद्याच्या बाटल्यांचे बॉक्स बाहेर फेकले गेले.या प्रकारामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांत मात्र घबराट पसरली.या ट्रकमधून २८ हजार ८०० रुपयांची गोवा बनावटीचे मद्य पोलिसांनी ताब्यात घेतले. गोवा ते रत्नागिरी यामार्गे ही वाहतूक केली जात होती,अशी माहिती कणकवली पोलिसांनी दिली.

'कोपरी'च्या पैशांचा जुगारासाठी सर्रास वापर!

- सत्तरीतील अड्ड्यांवर सरकारी कर्मचाऱ्यांची गर्दी
- आसगांव जत्रोत्सवात आज जुगार नाही !
- मांद्रे पुर्खेवाडा जत्रोत्सवात २७ रोजी जुगार थाटण्यासाठी प्रयत्न

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): महाराष्ट्रात जशी सावकारी पद्धत कार्यरत आहे, त्याच पद्धतीने गोव्यात "कोपरी' पद्धत सुरू झाली आहे. या "कोपरी' तून व्याजावर पैसे दिले जातात व त्यासाठी कुठलाही दागिना किंवा अन्य मौलिक वस्तू तारण ठेवली जाते. या एकूण प्रकारात कुठल्याही कागदावर सही किंवा हमीदार ठेवायची गरज नाही. राज्यात विविध ठिकाणी व विशेष करून पेडणे, सत्तरी भागात या "कोपरी' चा पैसा जुगारावर उधळण्याची चटक काही लोकांना लागली आहे. प्रती बॅंक म्हणून तेजीने फोफावलेल्या या "कोपरी' मुळे मिळणाऱ्या पैशांचा वापर जुगारासाठी करून हा पैसा दुप्पट करण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे अनेकजण आपले संसार उध्वस्त करण्यास पुढे सरसावलेले दिसत आहेत.
राज्यात जुगाराचा विळखा वाढत चालला आहे त्यामुळे ही खरोखरच एक सामाजिक समस्या तर बनते आहेच परंतु त्याही पलिकडे तो कायदा सुव्यवस्थेचाही विषय बनत चालला आहे. जुगार कुणीच बंद करू शकत नाही व पूर्वकाळापासून ही पद्धत रूढ आहे, असे म्हणून या अनिष्ट प्रकाराचे समर्थन करणारे लोकही आता जुगाराच्या वाढत्या प्रसारामुळे चिंतीत झाले आहेत. या बेकायदा प्रकाराला मिळणारा राजकीय आश्रय धोकादायक असून आता जुगार उखडून टाकणे हाच त्याला योग्य पर्याय ठरेल. पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी व उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी राज्यात विविध ठिकाणी फोफावलेल्या जुगाराची गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेचा जुगारवाल्यांनी बराच धसका घेतला आहे. स्थानिक पातळीवरील पोलिस अधिकारी मात्र काही प्रमाणात जुगारविरोधी कारवाई करण्यास उत्सुक दिसत नसल्याचेच चित्र आहे. पेडणे, डिचोली व सत्तरी सारख्या ठिकाणी विविध जत्रोत्सव, इतर धार्मिक उत्सव व त्यात बेकायदा जुगारी अड्ड्यांमुळे मिळणाऱ्या हप्त्याला हे अधिकारी चटावलेले आहेत व अचानक ही कमाई हातातून जात असल्याची गोष्ट त्यांच्या पचनी पडत नसल्याचीही गोष्ट समोर येत आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचीच जुगारीअड्ड्यांवर गर्दी
सत्तरी तालुक्यात सुरू असलेल्या जुगारी अड्ड्यांवर बहुतांश या भागातील सरकारी कर्मचारीच जास्त प्रमाणात दिसतात, अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. राजकीय आश्रयाने गेली कित्येक वर्षे हे कर्मचारी याठिकाणी तळ ठोकून आहेत व त्यांना जाब विचारणाराही कुणी नाही. या ठिकाणी सरकारी सेवत असलेले हे कर्मचारी सत्तरी किंवा इतर जवळील भागातीलच असल्याने जुगारी अड्ड्यांवर बैठका मारणे हा त्यांचा नित्यक्रम बनला आहे, अशाही तक्रारी समोर आल्या आहेत. सत्तरीतील विविध भागांत पाणी पुरवठा विभाग, वीज खाते किंवा अन्य सरकारी खात्यातील कर्मचाऱ्यांना या जुगाराची मोठी चटक लागली आहे. बहुतांश हे चतुर्थश्रेणी कर्मचारी असल्याने महिन्याचा पगार या जुगारावर टाकण्याचे प्रकारही घडत आहेत. सकाळी ९.३० ते सायं. ५.३० हा सरकारी कामकाजाचा वेळ असतो परंतु काही कर्मचारी या काळात स्थानिक दुकानांवर रमी किंवा अन्य जुगार खेळण्यात दंग असतात. पाणी किंवा वीज खंडीत झाल्यानंतर लोकांकडून फोनवरून केल्या जाणाऱ्या तक्रारींना अशा या कर्मचाऱ्यांमुळे प्रतिसाद मिळत नसल्याचेही उघड झाले आहे. लोकांच्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद देऊन दुरुस्ती करण्यास हे कर्मचारी अजिबात तयार नसतात व केवळ जुगारातच व्यस्त राहतात, असेही अनेक लोकांनी "गोवादूत' शी संपर्क साधून कळवले.
मांद्रे पुर्खेवाड्यावरील जत्रोत्सवात जुगारासाठी प्रयत्न
मांद्रे पुर्खेवाडा येथे २७ रोजी वार्षिक जत्रोत्सव साजरा होणार आहे. या जत्रोत्सवात जुगार चालवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. येथील एका स्थानिक पंचायत नेत्याने या जत्रोत्सवात कोण जुगार बंद करतो तेच पाहू, असे म्हणून जुगारविरोधकांना जाहीर आव्हानच दिले आहे. स्थानिक पंचायतीत महत्त्वाची भूमिका वठवणारा हा स्थानिक नेता पंचायतमंत्री बाबू आजगांवकर यांचा समर्थक समजला जातो व पेडणे पोलिस स्थानकांत बाबू आजगांवकर यांचा दबाव चालत असल्याने त्या बळावर हा जुगार आयोजित करून जुगारविरोधकांचा फज्जा उडवण्याचे त्याने ठरवले आहे. यासंबंधीची माहिती वरिष्ठ पोलिसांनाही मिळाली असून ते देखील या जत्रोत्सवाकडे नजर ठेवून आहेत. दरम्यान,बार्देश तालुक्यातील आसगांव येथे वार्षिक जत्रोत्सव २६ जानेवारी रोजी साजरा होतो.उद्या २६ रोजी या जत्रोत्सवाला जुगार आयोजित करण्यास देवस्थान समितीच्या बहुतेक पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे पण काही लोक मात्र दबाव आणून जुगार पाहीजे,असा हट्ट धरून आहेत. हा भाग हणजूण पोलिस स्थानक क्षेत्रात येत असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.

ट्रकखाली सापडून कामगार ठार

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): दगडांनी भरलेल्या ट्रकच्या खाली सापडल्याने कामगाराचा जागीच मृत्यू झाला. बांबोळी येथे सुरू असलेल्या 'आल्दिया द गोवा' प्रकल्पाच्या ठिकाणी ही घटना घडली. पोलिसांनी सदर ट्रक चालक नागेंद्र चारी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून ट्रक जप्त करण्यात आल्याची माहिती आगशी पोलिसांनी दिली. दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली. पोलिसांनी पंचनामा करून मयत अपराती बेहरा (३० राहणारा ओरिसा) या कामगाराचा मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठवून देण्यात आला आहे.
माहिती नुसार आज एक या बांधकामाच्या ठिकाणी एक ट्रक दगड घेऊन गेला होता. ज्याठिकाणी हे दगड खाली करायचे होते त्याच ठिकाणी रेतीच्या ढिगाऱ्याजवळ एक कामगार काम करीत होती. यावेळी दगड घेऊन आलेला ट्रक क्रमांक जीए ०१ टी ७६४५ मागे येत असताना सदर कामगार त्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडला. यात त्याचा डोक्याचा चेंदामेंदा झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याविषयीचा अधिक तपास आगशी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक शामराव चव्हाण करीत आहे.

पंचवाडी अपघातात १ठार, दोघे जखमी

फोंडा, दि.२५ (प्रतिनिधी): मुडाय पंचवाडी येथे आज दुपारी अडीचच्या सुमारास चिरेवाहू टिप्पर ट्रक (जीए ०९ टी ८८८९) उलटून झालेल्या अपघातात एक ठार, तर दोघे जखमी झाले आहेत.
भोला शाहू (३० वर्षे) असे ठार झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. सुरेश गावकर आणि नागेश गावकर अशी जखमी झालेल्यांची नावे असून ते किर्लपाल भागातील रहिवासी आहेत. मुडाय पंचवाडी येथील उतरणीवर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक दरीत कोसळला. त्यात ट्रकचालक भोला हा गंभीर जखमी झाला आणि ट्रकच्या केबिनमध्ये अडकून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने ट्रक चालकाचा मृतदेह केबिनमधून बाहेर काढला. निरीक्षक सी.एल.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन लोकरे, हवालदार शिवाजी मेरवा यांनी पंचनामा केला.

Monday, 25 January 2010

दक्षिण गोव्यात जुगाराविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई

मडगाव, दि. २४ (प्रतिनिधी) : राज्याच्या विविध भागात उघडपणे चालणाऱ्या जुगाराबाबत प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तांमुळे आता पोलिस यंत्रणेची धावपळ उडालेली असली तरी या जुगाराचा प्रत्यक्ष फटका बसणाऱ्या सर्वसामान्यांमध्ये समाधान पसरलेले दिसून येत आहे.
पोलिस यंत्रणेच्या डोळ्यांदेखत चालणाऱ्या या जुगाराबाबत वरिष्ठांकडून कानउघाडणी झाल्यावर आता दक्षिण गोव्यात गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांनी मोहीम सुरू करून अनेकांची धरपकड केल्याने हा व्यवसाय सध्या ठप्प झालेला आहे. दक्षिण गोव्याच्या अनेक भागात टाकल्या गेलेल्या छाप्यांत अनेकांची धरपकडही केली गेलेली आहे,मात्र हे छापासत्र डोळ्यांना पाणी लावणारे ठरू नये,अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली जात आहे. मडगाव शहरात तर बहुतांश गाडे व रस्त्याच्या कोपराकोपऱ्यांत उघडपणे मटका घेतला जातो व त्याच बरोबरीने कित्येक ठिकाणी सर्रासपणे जुगार खेळला जाताना दिसतो. गांधी मार्केट, जुन्या व नव्या रेल्वे स्टेशनजवळ, रावणफोंड, जुना बाजार, नुवे व खुद्द नगरपालिकेजवळ दुपारी व रात्रौ हे प्रकार चालू असतात. तेथे जवळपास पोलिस असतानाही त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. गांधी मार्केटात तर १० ते १५ ठिकाणी हे प्रकार चालू असतात.
स्वतः नगरसेवक राजेंद्र आजगावकर यांनी कित्येकदा नगरपालिका व पोलिसांच्या निदर्शनास हे प्रकार आणूनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. याउलट तेथील काही लोकांनी तक्रार केल्याची माहिती पोलिसांनीच संबंधितांना देण्याचा प्रकार घडला. पिंपळकट्टयाजवळ तर एका बॅंकेसमोरील एका दुकानाबाहेर मटक्याचे नंबर काळ्या फलकावर लावले जातात. तसेच पोलिस स्टेशन समोरील कित्येक गाड्यावर मटका घेतला जातो व तेथे कित्येक शाळकरी व महाविद्यालयीन मुले घुटमळताना दिसतात. पालिकेचा जुना बाजार हाही मटका व जुगाराचा अड्डा बनला आहे.त्याबाबत कित्येक तक्रारी करण्यात येऊनही तो अजून बंद झालेला नाही. नुवे येथील एका दारूच्या दुकानाजवळ व एका पडक्या घरात दिवसरात्र उघडपणे जुगार चालतो. नगरपालिकेसमोरील दुचाक्या थांब्याजवळील वऱ्हांड्यावर भर दुपारी व रविवारी जुगार खेळताना पाहायला मिळतो, काही पालिक ा कर्मचारीच त्याला संरक्षण देतात असे सांगितले जाते.
विद्यानगर येथे जुन्या चौगुले महाविद्यालयाजवळील गाड्यांवर तर परवाना असल्याप्रमाणे दिवसरात्र मटका चालतेा तर रविवारी जुगार खेळला जातो. जुन्या रेल्वे स्टेशनजवळ सकाळी व सायंकाळी कित्येकजण टेबले मांडून जुगाराचे अड्डे चालवीत असल्याचे पहायला मिळते.आके येथे वीजखाते कार्यालयाजवळ तर उघडपणे टेबले घालून मटका चालतो. तेथे सरकारी रोजगार योजनेखाली घालण्यात आलेले काही गाडे तर हाच व्यवसाय करताना दिसतात व ते राजकारण्यांचे हस्तक असल्याने त्यांच्या वाट्याला कोणी जात नसल्याचे दिसते.
स्टेशन रोड हा तर आता जुगार व रविवारी तेथे रस्त्यावर भरणाऱ्या चोर बाजारामुळे प्रसिध्द आहे. पाणंदीकर चेंबरजवळ खारेबांधपर्यंत बांधलेल्या पदपुलाखाली खारेबांधच्या बाजूने टेबले व खुर्च्या टाकून मटक्याची दुकाने थाटलेली पाहायला मिळतात. खारेबांध येथे तर कित्येक बारमध्ये उघडपणे जुगार चालत असल्याच्या तक्रारी आहेत. पोलिसांना या सर्वांची माहिती असूनही कारवाई होत नाही, याबद्दल आश्र्चर्य व्यक्त केले जात आहे.

महागाईस पंतप्रधानही तितकेच जबाबदार

"ज्योतिष्चंद्र' पवार पुन्हा अडचणीत

पुणे, दि. २४ - महागाईविषयी निरनिराळी भाकितं करणारे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आपल्या बेलगाम बोलण्यामुळे पुन्हा अडचणीत येण्याची चिन्हे दिसत असून, आता त्यांनी महागाईसाठी पंतप्रधानांनाच जबाबदार धरले आहे. महागाईचे बोल मला एकट्याला लावू नका, असे त्यांनी म्हटले आहे.
आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी महागाईसाठी पंतप्रधानही जबाबदार असल्याचे वक्तव्य केले. गेल्या काही दिवसांपासून धान्य, साखर, दूध, भाज्या यांचे भाव वाढण्याची भाकितं पवार करीत होते. असे बोलून ते अप्रत्यक्षपणे काळ्या बाजाराला प्रोत्साहनच देत असल्याची टीका होत होती. मागील आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाईबाबत आढावा घेतला. या बैठकीत खुद्द पंतप्रधानांनीही महागाईसंदर्भात भाकितं करणाऱ्या पवारांवर नाराजी व्यक्त केली होती. आता तर पवारांनी खुद्द पंतप्रधानांवर महागाईचे खापर फोडले आहे.
पवारांच्या बेलगाम बोलण्याने एकीकडे मायावती, नितीश कुमार हे मुख्यमंत्री नाराज असताना दुसरीकडे खुद्द कॉंग्रेसी नेतेही याविषयी जाहीर नाराजी व्यक्त करीत आहेत. अनेकांनी तर पवारांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी लावून धरली आहे.
यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यानी कोल्हापूर येथे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की, पवार यांनी "शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळाल्याने साखरेचे दर वाढत आहेत' अशी जी भूमिका घेतली आहे, ती पूर्णपणे फसवी आहे. कारण, साखर पंचवीस रुपये असताना जो दर शेतकऱ्यांना मिळत होता, त्यात कोठेही वाढ झालेली नाही.
पुण्यात त्यावर पवार यांना विचारले असता ते म्हणाले, जनतेने आम्हाला पूर्वीपेक्षा अधिक मते देऊन निवडून दिले आहे आणि शंका घेत बसणारांना पराभूत केले आहे.

"धर्मांतरितांना आरक्षण देणे हा मागास जातींवर अन्याय'

पणजीत अनुसूचित जातींचा मेळावा

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी)- मागासलेल्या बांधवांना पुढे नेण्यासाठी त्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी जे आंदोलन उभारले होते तेच आंदोलन पुन्हा एकदा उभारण्याची गरज या समाजावर आली आहे. धर्मांतर करून ख्रिस्ती किंवा मुस्लिम धर्म स्वीकारलेल्यांना अनुसूचित जातीत समावेश करण्याचे कटकारस्थान कॉंग्रेस सरकारने आखले आहे. आमचा कोणत्याही धर्मातील बांधवांना विरोध नाही. परंतु, त्यांच्यासाठी आमचा हक्क हिरावून घेऊ नका,असे उद्गार आज अनुसूचित जात आरक्षण बचाव मंचाचे राष्ट्रीय निमंत्रक तथा माजी राज्यसभा खासदार रामनाथ कोविंद यांनी काढले. कॉंग्रेस सरकारचा "रंगनाथ मिश्र' आयोग हा अनुसूचित जातीतील बांधवांचा हक्क हिरावून घेण्यासाठी बनवण्यात आला असून त्याला राष्ट्रीय स्तरापासून गल्लीबोळापर्यंत विरोध करण्याची गरज आहे. देशाच्या संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीसाठी दिलेले आरक्षण या देशाचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधीही हिरावून घेऊ शकत नाही, असे श्री. कोविंद म्हणाले. हवे असल्यास त्यांना वेगळे पॅकेज द्या, असाही सल्ला त्यांनी दिला.
ते आज पणजी गोमंतक मराठा समाज सभागृहात गोव्यातील अनुसूचित जातींच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक, वास्को मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्र आर्लेकर, गोवा अनुसूचित आरक्षण बचाव मंचाचे निमंत्रक विठू मोरजकर व भारतीय जनता पक्षाचे संघटनमंत्री अविनाश कोळी उपस्थित होते.

गेली साठ वर्षे या देशावर सत्ता गाजवणाऱ्या कॉंग्रेस सरकारने हिंदू, ख्रिश्चन आणि मुस्लिम बांधव का मागासलेले आहेत, याची कारणे शोधून काढण्यासाठी आयोग स्थापन करण्याची गरज आहे. केवळ निवडणुकीच्या वेळीच मुस्लिमांना खूष करण्यासाठी विविध घोषणा करायच्या आणि नंतर घाणेरडे राजकारण खेळायचे ही कॉंग्रेसची जुनी रीत आहे,असे मत यावेळी उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. या आयोगाच्या माध्यमातून कॉंग्रेस सरकार धर्मातराला पाठिंबा देऊन खतपाणी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचाही आरोप यावेळी श्री. नाईक यांनी केला. भारताची घटना ही आमची गीता आहे. त्यात जे अनुसूचित जातीला अधिकार दिले आहेत, ते मिळालेच पाहिजे. हे कॉंग्रेस सरकार जाती व्यवस्थेला खतपाणी घालून पुन्हा एकदा फाळणी करण्याचा प्रयत्न करीत आहे. यापूर्वी याच कॉंग्रेसने धर्मांच्या नावाने पाकिस्तान आणि बांगलादेशाची निर्मिती केल्याची आठवण यावेळी श्री. नाईक यांनी उपस्थितांना करून दिली.
ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मांत कोणतीही जातीव्यवस्था नाही. मग कोणत्या आधारावर त्यांचा अनुसूचित जातीत समावेश करीत आहात, असा झणझणीत सवाल श्री. आर्लेकर यांनी उपस्थित केला. यावेळी विठू मोरजकर आणि अविनाश कोळी यांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीळकंठ मोरजकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने अनुसूचित जातीचे बांधव उपस्थित होते.

विद्यापीठ अहवालाकडे आता सगळ्यांचे लक्ष

सांगोडकर व युवक कॉंग्रेसमध्ये
"तू तू मै मै' जोरात

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) - कॉंग्रेस खासदार आणि अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्या वादग्रस्त गोवा भेटीनंतर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. मोहन सांगोडकर आणि युवक कॉंग्रेस यांच्यात सुरू झालेल्या सुंदोपसुंदीमुळे आता सर्वांचे लक्ष राज्यपालांनी मागवलेल्या अहवालाकडे लागून राहिले आहे. विद्यापीठाच्या आवारात राहुल गांधी यांचा राजकीय कार्यक्रम करण्यास कुलसचिवांनी परवानगी दिल्यानंतर राज्यात उमटलेल्या संतप्त प्रतिक्रियांनंतर डॉ. सांगोडकर यांना अखेर शनिवारी राजीनामा द्यावा लागला होता. परंतु तो देताना त्यांनी युवक कॉंग्रेसने आपला विश्वासघात केल्याचा आरोप केला होता तर युवक कॉंग्रेसने हा आरोप फेटाळून लावताना राहुल गांधींचा कार्यक्रम विद्यापीठानेच आयोजित केला होता, असा उलट आरोप डॉ. सांगोडकर यांच्यावर केल्याने सध्या हा वाद चांगलाच भडकला आहे.
दरम्यान राहुल गांधी यांना विद्यापीठात कार्यक्रम करू देण्यास कुलगुरूंनी आधीपासूनच नकार दिला होता व राज्यपाल सिध्दू यांनाही त्यांनी तोच सल्ला दिला होता. मात्र डॉ. सांगोडकर यांच्या अतिउत्साहीपणामुळे सदर कार्यक्रम विद्यापीठ मैदानावर झालाच परंतु तो पूर्णपणे राजकीय इतमामानेही झाला. कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांपासून ते संत्र्यांपर्यंत या कार्यक्रमाला हजर होते. राहुल दर्शनाद्वारे त्या सगळ्यांनी आपली निष्ठा वाहून घेतली. या कार्यक्रमात राजकीय स्वरूपाचीच भाषणे झाली आणि त्याचे सविस्तर वृत्त दुसऱ्या दिवशी राज्यातील सर्व वर्तमानपत्रांमध्ये छापूनही आले. परिणामी, राहुल गांधींच्या या कार्यक्रमामुळे मोठा गहजब माजला आणि कुलसचिव डॉ. सांगोडकर खऱ्या अर्थाने संकटात सापडले.
या सगळ्या गोंधळामुळे गोवा विद्यापीठाची चांगलीच बदनामी आणि पुरती गोची झाली. राहुल गांधींच्या या कार्यक्रमाचे समर्थन विद्यापीठाला अखेरपर्यंत करता आले नाही, किंबहुना सगळ्या टीकेचा झोत त्यांच्यावरच केंद्रित झाला. कुलगुरू डॉ. देवबागकर यांनी आपली भूमिका आधीच स्पष्ट केल्याने प्रसिद्धी माध्यमानीही त्यांना या प्रकरणापासून बाजूलाच ठेवले. महत्त्वाचे म्हणजे, गोवा विद्यापीठाचे कुलपती राज्यपाल डॉ. शिवेंद्रसिंग सिध्दू कमालीचे नाराज बनले असून डॉ. सांगोडकर यांना त्यांनी भलतेच फैलावर घेतले. मुख्यमंत्री कामत यांनाही त्यांनी परखड बोल सुनावल्याचे समजते. सरकार प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांना तरी काही गोष्टींचे भान असायला हवे होते, असा त्यांच्या या नाराजीचा सुरू होता असे समजते.
दरम्यान, राज्यपाल डॉ. सिध्दू यांनी त्या (राहुल भेटीच्या वेळी) दिवशी नेमके काय झाले, याचा या पूर्वीच विद्यापीठाकडे सविस्तर जाबवजा अहवाल मागितला असल्याने या अहवालाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या संदर्भात युनिव्हर्सिटी ग्रॅंट कमिशनकडूनही विद्यापीठाकडे अहवाल मागितला जाण्याची शक्यता आहे.

मज्जाव केल्यानंतरही आगोंदमध्ये हिंदू जनजागृती समितीची सभा

सभागृहास सशस्त्र पोलिसांचा गराडा

काणकोण, दि. २४ (प्रतिनिधी) - आगोंदमध्ये गेले आठ दिवस श्रीरंजनी पाईक देवालयाच्या सभागृहात सभा घेण्याची तयारी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनेच चालली होती, असे स्पष्ट करूनही सशस्त्र पोलिसांनी आज हिंदू जनजागृतीतर्फे आयोजित सभा घेण्यास मज्जाव केला. पंचायत व संबंधितांकडून आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय सभा घेऊ दिली जाणार नाही,अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याने, पोर्तुगीज राज्यकर्त्यांच्या दडपशाहीचे स्मरण झाले,अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. अशा प्रकारे हिंदूंची सभा अडविण्याच्या या प्रकारामुळे काणकोण तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली परवानगी केवळ प्रचारासाठीच होती, असे पोलिस निरीक्षक सुरज हर्ळणकर यांनी पत्रकारांना सांगितले.
ग्रामीण विकास यंत्रणेने बांधलेल्या मंदिर सभागृहात सभा घेण्यास मनाई करण्यात आल्याने उपस्थितांनी ही सभा रस्त्याजवळ असलेल्या एका वडाच्या झाडाखाली घेतली. यावेळी मराप्रसचे अध्यक्ष रमेश नाईक, समितीचे प्रमख जयेश थळी, रणरागिणीच्या प्रमुख शोभा सावंत व स्थानिक कार्यकर्ते दयानंद फळदेसाई, ज्येष्ठ नागरिक महाबळेश्वर फळदेसाई, सदानंद देसाई, तालुका स्वयंसेवा गटाच्या अध्यक्ष छाया पै खोत, शिवसेनेच्या मिलन देसाई व अन्य नागरिक यावेळी उपस्थित होते.
राज्यात चाललेले गैरप्रकार, जुगार, मटका, कॅसिनो सरकारच्या आशीर्वादाने चालतात, मात्र हिंदूंची धार्मिक सभा परवानगी नाकारून बंद पाडण्यात येते, हा केवळ जनतेचा,आमदारांचा नव्हे तर समस्त हिंदू समाजाचा अपमान असून या अपमानाचा सूड घेण्यासाठी राज्य सरकार नेस्तनाबूत करणे स्वाभिमान्यांचे कर्तव्य ठरते,असे रमेश नाईक यांनी सांगितले. भ्याड, पळपुटे राष्ट्र म्हणून आपली गणना जगात होत आहे, हिंदूंवरील अन्याय वाढत चालले आहेत, हे असेच चालू राहिल्यास संपूर्ण गोवाच पेटून उठेल,असा इशारा त्यांनी दिला.
मोती डोंगर तलवार प्रकरण, अफजल गुरू फाशी प्रकरण व दहशतवादी हल्ले यांच्याबाबत निष्क्रिय असलेले सरकार आज पोलिसांकरवी सभा बंद पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, ही निव्वळ दडपशाही आहे,असे यावेळी फळदेसाई यांनी सांगितले.
देशभरात "लव्ह जिहाद'चा फतवा काढून कर्नाटकात ३० हजार, केरळमध्ये ४ हजार तर फोंडा शहरात ३० युवतींना मुस्लिमांनी अपहरण करून अथवा शादी करून नंतर अनैतिक मार्गाला लावल्याचा आरोप शोभा सावंत यांनी आपल्या घणाघाती भाषणात केला. हे सारे एका पाहणीत उघड झाल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदू जनजागृतीच्या देशात साडेचार हजार सभा झाल्या, गोव्यात चार मोठ्या तर १५ लहान सभा झाल्या, मात्र आता जनजागृतीमुळे हादरलेल्या सरकारने आज ही सभा सभागृहात घेण्यास मज्जाव केला, रस्त्यावर सभा घेणे भाग पाडले, तरीही स्वाभिमानी हिंदू हार मानणार नाहीत,असे जयेश थळी यांनी ठणकावून सांगितले.
सभागृहात सभा घेण्यास मनाई करण्याच्या आदेशाविरुद्ध निषेध व्यक्त करणारा ठराव यावेळी संमत करण्यात आला.
अपर्णा मराठे यांनी स्वागत केले, वंदे मातरमने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Sunday, 24 January 2010

अखेर कुलसचिवांचा राजीनामा

कॉंग्रेस व कुलगुरूंसमोर बाका पेचप्रसंग
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): कॉंग्रेसचे सरचिटणीस तथा युवा नेते राहुल गांधी यांची गोव्यातील पहिलीच भेट वादग्रस्त ठरली आहे. राहुल यांच्या राजकीय कार्यक्रमाला गोवा विद्यापीठाने दिलेली मान्यता टीकेचे लक्ष्य बनल्याने कुलसचिव डॉ. मोहन सांगोडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा कुलगुरू डॉ.दिलीप देवबागकर यांच्याकडे सादर केला. खुद्द सांगोडकर यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली. या पार्श्वभूमीवर युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कुलसचिवांची भेट घेऊन त्यांना पूर्ण पाठिंबा दिल्यानंतर या राजीनाम्याचे नेमके काय झाले हे मात्र कळू शकले नाही. तथापि, सरकार व कुलगुरू यांच्यात सदर राजीनामा स्वीकारण्यावरून मोठाच पेच निर्माण झाला आहे.
भाजप युवा मोर्चाने हे प्रकरण नेटाने लावून धरल्याने कॉंग्रेस पक्षाची भंबेरी उडाली आहे. राष्ट्रीय पातळीवरही राहुल गांधी यांच्या गोवाभेटीवरून चर्चेला उधाण आल्याचे समजते. गोव्यातील प्रदेश कॉंग्रेसच्या ढिसाळ नियोजनामुळेच हा वाद उफाळल्याची भावना या नेत्यांची बनली आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त झाल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, राहुल गांधी हे महाविद्यालय व विद्यापीठ विद्यार्थ्यांशी संवाद साधतील, त्यामुळे हा अराजकीय कार्यक्रम असे भासवून कुलसचिवांकडून परवानगी घेण्यात आली. विद्यापीठाकडूनच त्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याचा आभासही निर्माण तयार करण्यात आला. भाजप युवा मोर्चाने आवाज उठवल्यानंतर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी पक्षाचे झेंडे व फलक लावले नाहीत; पण प्रवेशव्दारावर मात्र "एनएसयुआय'चा "कटआउट्स'लावल्याने काही प्रमाणात वाद झालाच.
विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम झाल्यानंतर राहुल गांधी यांनी विद्यापीठ परिषदगृहात युवक कॉंग्रेसला मार्गदर्शन व त्यानंतर प्रदेश कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या सर्व कार्यक्रमांवेळी पत्रकारांना डावलण्यात आले व शेवटी केवळ एक मिनिटासाठी राहुल गांधी यांनी पत्रकारांसमोर बोलताना आपण "एनएसयुआय' निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आलो होतो,असे सांगून आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तोंडघशी पाडले.
कुलसचिव डॉ.सांगोडकर यांनी आपली कॉंग्रेस नेत्यांनी फसगत केल्याची कबुली दिली देऊन राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. विद्यापीठ परिसरात कोणताही राजकीय कार्यक्रम होणार नसून केवळ विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाणार असल्याची त्रोटक माहितीच त्यांना देण्यात आली होती.आता त्यांनी राजीनामा दिल्याने कॉंग्रेसची अधिकच पंचाईत झाली आहे. सदर राजीनामा मागे घेण्यासाठी त्यांची समजूत काढली जात असल्याचीही माहिती हाती आली आहे.
विद्यापीठाकडून आमंत्रण : संकल्प आमोणकर
राजकीय कार्यक्रमाला मान्यता दिल्यावरून आधीच पेचात सापडलेले कुलसचिव आता युवक कॉंग्रेसने केलेल्या वक्तव्यामुळे अधिकच गोत्यात येऊ शकतात. राहुल गांधी यांना विद्यापीठानेच आमंत्रित केले होते,असे म्हणून या कार्यक्रमात काहीही राजकारण झाले नाही,असे लंगडे समर्थनही त्यांनी दिले.यावेळी पत्रकारांनी मात्र संकल्प आमोणकर यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. या संपूर्ण कार्यक्रमाला पत्रकारांना का डावलण्यात आले,असे विचारले असता सुरक्षेच्याबाबतीत पत्रकारांना त्यांच्या कार्यक्रमात प्रवेश दिला जात नाही,असे उत्तर देण्यात आले.राहुल गांधी पत्रकारांना दहशतवादी समजतात काय,असा सवालही करण्यात आला. जर हा कार्यक्रम अराजकीय होता तर त्यात प्रदेश कॉंग्रेस व युवा कॉंग्रेसची बैठक कशी काय झाली. यावेळी मात्र ते अनुत्तरित झाले व प्रदेश कॉंग्रेसबाबत प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर हेच चांगल्या पद्धतीने सांगू शकतील,असे म्हणून त्यांना सुटका करून घेतली.गोवा विद्यापीठाने हा कार्यक्रम आयोजित केला होता तर मग कुलसचिव किंवा कुलगुरू का हजर राहिले नाहीत व त्यासाठी त्यांचा निषेध करणार काय,असा प्रश्न विचारला असता त्यालाही होकार देऊन श्री. आमोणकर यांनी कहरच केला. अखेर, "वड्याचे तेल वांग्यावर' या उक्तीनुसार त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रसिद्धीमुळे भाजपचा जळफळाट झाल्याचे सांगत पत्रकार परिषद आटोपती घेतली.
तर भाजपचे उग्र आंदोलन : रूपेश महात्मे
गोवा विद्यापीठाचे कुलसचिव या विषयावरून आपली भूमिका बदलत राहिले तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा सज्जड इशारा भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष रूपेश महात्मे यांनी दिला आहे. एकीकडे कुलसचिव म्हणतात की, हा कार्यक्रम विद्यापीठाने आयोजित केला नाही तर दुसरीकडे युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मात्र विद्यापीठानेच कार्यक्रम केल्याचे सांगतात. गोवा विद्यापीठाने याप्रकरणी आपली भूमिका तात्काळ स्पष्ट करावी,अन्यथा भाजपला आपला पवित्रा अधिक तीव्र करावा लागेल,असेही यावेळी श्री.महात्मे यांनी सांगितले.

मद्य तस्करी प्रकरणात 'रमेश'नामक मास्टरमाईंडचा वावर

बांदा पोलिसांचे शोधपथक गोव्यात
सावंतवाडी, दि. २३ (प्रतिनिधी): गोव्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बनावट अवैध मद्य निर्यात सुरू आहे व त्याचा शोध घेण्यासाठी आता महाराष्ट्र पोलिसांनी कंबर कसली आहे. बांदा पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून मुद्देमालासह अटक केलेल्या दिनकर पाटील याची मदत घेऊन थेट मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, या मद्यतस्करी प्रकरणी गोव्यातील "रमेश ' नामक व्यक्ती मुख्य सूत्रधार असल्याचा सुगावा पोलिसांना लागला असून त्याच्या शोधार्थ जोरदार मोहीम उघडण्यात आली आहे.
गोव्यातून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणात मद्याची तस्करी करणारी टोळीच कार्यरत आहे. या टोळीचा संबंध बड्या धोंड्यांशी असल्याची वदंता आहे. ही टोळी अत्यंत कल्पकतेने व प्रशासकीय यंत्रणांचा वापर करून हा माल नेते असावी, याबाबत महाराष्ट्र पोलिसांचा संशय बळावला आहे. बांद्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय मुरादे यांनी याप्रकरणी पुढाकार घेऊन या टोळीचा पर्दाफाश करण्याचा विडा उचलला आहे.
दरम्यान, या प्रकरणी बांदा पोलिसांनी अटक केलेला टेंपो चालक दिनकर पाटील हा बहुरूपी आहे व तो विविध नावांनी वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. गोव्यातही त्याच्यावर गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. रेल्वे भंगार चोरीप्रकरणीही पाटील याचा हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून विसंगत माहिती देऊन तो पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दिनकर पाटील हा कोल्हापूर शिरोळे भागांत गोव्यातील अवैध मद्याची विक्री करीत असल्याचेही चौकशीअंती स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, बांदा पोलिसांनी अद्याप या प्रकरणी गोवा पोलिसांशी संपर्क साधलेला नाही. ते आपल्या परीने या प्रकरणाचा तपास करीत आहेत. गोवा पोलिसांशी संपर्क साधल्यास या टोळीत वावरणारे लोक सावध होऊ शकतात. म्हणूनच त्यांनी स्वबळावर चौकशी आरंभली आहे.दिनकर पाटील हा नावेली येथे राहत असल्याचेही पोलिसांनी शोधून काढले आहे. हा माल त्याने नेमका कोठून उचलला व यामागे आणखी कोणाचा हात आहे, या दिशेने बांदा पोलिसांचे तपासचक्र फिरत आहे.

पणजी जिमखान्यावर २९ ला ताईंचा भव्य नागरी सत्कार

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): गोव्याच्या माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस अलीकडेच मोठ्या दिमाखात साजरा झाला. यानिमित्त त्यांचा भव्य नागरी सत्कार २९ रोजी कांपाल येथील जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आला असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे या सोहळ्याला खास उपस्थित राहणार असून त्यांच्याच हस्ते ताईंचा सत्कार होणार आहे.
आज येथे पत्रपरिषदेत शशिकलाताई काकोडकर अमृत महोत्सव सत्कार समितीचे अध्यक्ष तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी समितीचे सचिव ऍड. नारायण सावंत व खजिनदार लवू मामलेकर हजर होते.
२९ जानेवारी रोजी संध्याकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या समारंभाला अतिमहनीय व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने सुरक्षेच्या कारणात्सव ताईंचे हितचिंतक तथा चाहत्यांनी किमान १५ मिनिटे अगोदर कार्यक्रम ठिकाणी हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सत्कार सोहळ्याला मुख्यमंत्री दिगंबर कामत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच विधानसभेतील सर्व आमदार तथा खासदारांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. गोव्याचे भाग्यविधाते तथा पहिले मुख्यमंत्री स्व.भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतर मुख्यमंत्र्यांची धुरा सांभाळून त्यांनी गोव्याच्या विकासाचा रचलेला पाया ताईंनी घट्ट केला. खऱ्या अर्थाने राज्याला एक दिशा मिळवून दिली. गोवा विद्यापीठ, कला अकादमी आदी प्रकल्पांना त्यांच्या कारकिर्दीतच चालना मिळाली. प्रशासकीय सुधारणांबाबत त्या अधिक आक्रमक होत्या. त्यामुळेच त्यांना टीकेचाही सामना करावा लागला. राज्याच्या पहिल्या व एकमेव महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांची तडफदार कार्याचे दाखले आजही आवर्जून दिले जातात.
या भव्य सत्कार सोहळ्याला गोमंतकातील असंख्य ताईंच्या चाहत्यांनी व हितचिंतकांनी हजर राहून हा कार्यक्रम यशस्वी करावा,असे आवाहन सत्कार समितीने केले आहे.

सत्तरीतील जुगार 'खाशे' खपवून घेणार नाहीत!

केरी, पर्येतील जुगाराला महिलांचाही कडाडून विरोध
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): केरी-सत्तरी येथील जुगाराची प्रकरणे "गोवादूत'ने उजेडात आणल्यापासून आता जनता जागरूक झाली आहे. या जुगारामुळेच अनेक कुटुंबीयांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत व अनेकांचे त्या वाटेवर आहेत. "गोवादूत' ने बेडरपणे चालवलेल्या या मोहिमेमुळे आता तेथील महिलाही उघडपणे या गैरप्रकारांविरोधात उभ्या ठाकू लागल्या आहेत. तेथे दिवसाढवळ्या चालणारा जुगार हा सत्तरीला लागलेला कलंक आहे व खाशे हा कलंक अजिबात खपवून घेणार नाहीत. "गोवादूत' ने सत्तरीतील जुगारावर टाकलेल्या प्रकाशाची गंभीर दखल खाशांनी घ्यावी व हा जुगार निपटून काढण्याचे कडक आदेश पोलिसांना द्यावेत,अशी जोरदार मागणी येथील महिलांकडून केली जात आहे.
केरी माजीकवाडा येथे रस्त्याच्या कडेलाच या भागातील एका नेत्याचे भाट आहे. ही जागा सध्या जुगारासाठी सुरक्षित ठिकाण मानले जाते. या भाटात येण्याचे धाडस पोलिस करणार नाहीत, अशी समजूत करून तेथे जुगारी अड्डा चालवला जातो. या नेत्याच्या भाटात जुगार चालवून या जुगाराला जणू राजाश्रय मिळाल्याच्या थाटातच जुगारवाले वावरतात, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली. केरीपासून सुमारे ५ किमी अंतरावर असलेल्या पर्ये भागात जोरात जुगार चालत असे. पर्ये सत्तरी येथे मुख्य बसस्थानकाजवळ रावण रस्त्याच्या बाजूला एका नामांकित बॅंकेची इमारत आहे. या इमारतीत गेल्या कित्येक महिन्यांपासून जुगार चालत होता, अशी माहिती मिळाली आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मागच्या बाजूला खास पत्रे घालून जुगारासाठी जागा तयार करण्यात आली होती. केरीतील पायलट, रिक्षाचालक व टेंपोचालक हेच या जुगाराचे ग्राहक बनले होते.
सध्या घोलवाडा आणि सावंतवाडा या दोन ठिकाणी सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या जवळ रमी पत्त्यांचा जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असतो. यासाठी एक खास झोपडी बनवण्यात आली आहे. याच ठिकाणी मटका घेण्यात येतो. सण उत्सवाच्या वेळी कधी कधी तीन पाने, पट खेळला जातो. सकाळपासून विविध ठिकाणी कामावर गेलेले असंख्य लोक आपली रात्र या खेळात घालवतात. काहीजण सकाळपासून तेथे रममाण झालेले असतात. सदर दोन्ही जुगाराचे अड्डे घरांच्या बरोबर मध्ये असल्याने सभोवतालच्या लोकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे लहान मुलांच्या मनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कधी कधी हे लोक जुगार खेळताना तेथे लहान मुले दुकानावर येतात. त्यामुळे अशी मुले जुगारात ओढली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सदर ठिकाणापासून थोड्याच अंतरावर विद्यालय आहे. दुपारी व संध्याकाळी वर्ग सुटल्यानंतर विद्यार्थी येथे जमतात व हा अड्डाही तेथेच चालू असल्याने या विद्यार्थ्यांवरही या जुगाराचा विपरित परिणाम होण्याची शक्यता पालकांकडून व्यक्त केली जात आहे. हा भाग केरी पोलिस स्थानकाच्या हद्दीत येतो; पण जुगार हा दखल घेण्याचा प्रकारच नाही,अशा अविभार्वात पोलिस वागत असल्याने नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडत चालला आहे.
पर्ये गाव हा सभापतींच्या मतदारसंघात येतो. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अशा अवैध प्रकारांना व गैरकृत्यांना कधीच थारा दिला नाही. तथापि, त्यांच्या मतदारसंघात आता पावलोपावली जुगाराचे अड्डे सुरू झाले आहेत. याची कदाचित त्यांना याची जाणीव नसावी. "गोवादूत' ने चालवलेल्या या जनचळवळीचा एक भाग म्हणून केरी व पर्येतील जुगाराचा हा प्रकार त्यांच्या निदर्शनास येईल. त्यांनी तात्काळ या प्रकाराला आळा घालावा व अशा प्रकारचे अड्डे कायमचे बंद करून टाकण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी या भागातील महिलावर्गाने केली आहे.

'वलयांकित' मोदींना जमवले २३ कोटी

मुलींच्या जीवनात शिक्षणाचा आरसा; सावित्रीबाई फुलेंचा चालवला वारसा
अहमदाबाद, दि. २२ : गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे जणू अवलियाच. परिस्थिती अनुकूल होईल याची वाट न पाहता या पोलादी माणसाने आतापर्यंतच्या वाटचालीत परिस्थितीलाच वाकवले. त्यामुळेच त्यांचा बोलबाला "क्राऊड पुलर' (गर्दी खेचणारा नेता) असा झाला. नेमका याच संधीचा फायदा घेऊन त्यांनी गेल्या पाच वर्षांत विविध कार्यक्रमांतून आपल्या खास उपस्थितीद्वारे तब्बल २३ कोटी रुपये उभारले आहेत. तसे पाहिले तर बॉलिवूडचे तारेतारकादेखील आपल्या "स्टार व्हॅल्यू'ची किंमत वसूल करण्यासाठी प्रसिद्ध आहेतच. मात्र मोदी व त्यांच्यात एक मूलभूत फरक आहे. तो असा की, या तारेतारकांनी आपल्या उपस्थितीची सगळी रक्कम स्वतःच्या खिशात घातली; तर मोदी यांनी या कोट्यवधींच्या रकमेतून आपल्या राज्यातील उपेक्षित मुलींना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचा सपाटा लावला आहे. सार्वजनिक कार्यक्रमांत उपस्थिती लावून निधी जमा करण्याच्या त्यांच्या या कृतीवर टीकाकारांनी आसूड ओढले होते. तथापि, आता त्यामागील मोदींचा विधायक उद्देश उजेडात आल्यानंतर या तथाकथित टीकाकारांची बोलतीच बंद झाली आहे. मोदी यांना विविध कार्यक्रमांत अनेक वस्तू व रोकड मिळते. त्यातील काही वस्तूंचा लिलाव पुकारून मोठी रक्कम जमा झाली. ती त्यांनी मुख्यमंत्री रिलीफ फंडात जमा केली असून कौतुकाची गोष्ट म्हणजे यातून १०४ कोटी रुपये उभारले गेले आहेत! गुजरातेतील एका प्रसिद्ध उद्योग समूहाने मोदी यांना नुकतेच खास आमंत्रित करून मुख्यमंत्री रिलीफ फंडाला अकरा लाखांची घसघशीत रक्कम दिली. वानगीदाखल सांगायचे तर सध्या सुरू असलेल्या महिन्यातच मोदी यांनी आतापर्यंत अशा स्वरूपाच्या २० कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे. आपण "क्राऊड पुलर' आहोत याची जाणीव मोदी यांना २००६ साली खऱ्या अर्थाने झाली. मग त्यांनी मुख्यमंत्री रिलीफ फंडाला निधी देण्यासाठी त्या कार्यक्रमातच घोषणा करणे सुरू केले. अर्थात, त्यासाठी त्यांनी या घोषणेला खंडणीसारखे स्वरूप येणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली. या निधीतून त्यांनी मुलींसाठी मोठ्या प्रमाणावर शिष्यवृत्त्या जाहीर केल्या आहेत. तसेच त्यांनी एक हजार रुपयांचे खास रोखे काढले आहेत. त्यातून मुलींच्या शिक्षणावर खर्च केला जात आहे. म्हणजेच एकप्रकारे त्यांनी आपल्या राज्यात थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचाच वारसा पुढे चालवला आहे. एकीकडे देशभरातील अनेक "डीम्ड युनिव्हर्सिटीज' भलत्याच "डीम' होत चाललेल्या असताना मोदी यांनी मात्र महिला शिक्षणाच्या दीपत्काराने सारा गुजरात उजळून टाकला आहे!

गोव्यातील दुचाकी चोरणारी टोळी वेंगुर्ले येथे पकडली

पेडणे दि. २३ (प्रतिनिधी): मांद्रे व हरमल भागातून चोरीला गेलेल्या मोटरसायकली वेंगुर्ले पोलिसांनी जप्त करताना वेंगुर्ले परिसरातील ६ जणांच्या टोळीला अटक करून तब्बल २९ मोटरसायकल जप्त केल्या आहेत. त्यातील अधिकांश मोटरसायकली गोव्याच्या असल्याचे सांगण्यात आले.
१९ ते २४ वयोगटातील या टोळीतील युवक कॉलेजकुमार असल्याची माहिती मिळाली आहे. मांद्रे येथील युवा वकील ऍड. प्रसाद शहापूरकर यांची २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी श्री भगवती सप्तेश्वर मंदीरासमोर पार्क करून ठेवलेली; तर हरमल येथील कृष्णा साटेलकर यांची हरमल येथे पार्क करून ठेवलेली गाडी चोरीला गेली होती. त्याची तक्रार हरमल पोलिसांत नोंदवण्यात आली होती. पेडण्याचे पोलिस निरीक्षकउत्तम राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन नार्वेकर याप्रकरणी तपास करत होते. तथापि, आजपर्यंत त्या चोरीचा छडा लागला नव्हता.
वेंगुर्ले येथील प्रभारी पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीचा गुन्हा १४ रोजी रेडी येथील टाटा मेटॅलिक्स कपंनीसमोर घडला. तेथून हिरोहोंडा पॅशन गाडी चोरीला गेल्याची तक्रार त्याच दिवशी दाखल झाली. हा तपास सुरू असताना फिर्यादीच्या एका ओळखीच्या माणसाने वेंगुर्ल्यातील एका गॅरेजमध्ये ती गाडी पाहिली आणि त्याने ती माहिती फिर्यादी शेलटे यांना कळवली व शेलटे यांनीही ताबडतोब सदर बाब वेंगुर्ले पोलिसांच्या निदर्शनाला आणली.
मात्र पोलिस त्या गॅरेजपर्यंत पोहोचण्यापूर्वी संबंधित गाडी मालकाने गाडी गॅरेजमधून नेली होती. यावरून पोलीसांनी गॅरेज मालकाला त्या व्यक्तीबाबत विचारणा केली असता त्याने सागर पेडणेकर याचे नाव सांगितले. म्हणून पोलीसांनी सागर पेडणेकरशी संपर्क साधून गाडीबाबत विचारणा करताच पेडणेकरने वेंगुर्ले येथील युवकांकडून गाडी निम्म्या पैशात विकत घेतल्याचे सांगितले. यावेळी त्याने या युवकामधे गोपाळ उर्फ गोट्या नारायण माळकर (वय २०), राकेश भरत परब (वय२०), अनंत विठ्ठल घाटकर (वय २२) यांची नावे सांगताच तिघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
पोलिसी हिसका दाखवताच आपण सदर गाडी चोरल्याची कबुली त्यांनी दिली.
या चोरट्यांनी हॅंडल लॉक नसलेल्या गाड्या स्विच डायरेक्ट करून पळवल्याचे उघड झाले आहे. जत्रा, आठवडी बाजार, महोत्सव अशा मोक्याच्या जागी हेच तंत्र वापरून ते गाड्या पळवत होते, असे पोलिस चौकशीत उघड झाले आहे. नंतर या दुचाकी ते १० ते १५ हजारांना रुपयांत विकत असत. विशेष म्हणजे अटकेत असलेल्या पाच जणांपैकी गोट्या व घाटकर हे बारावीत, तर
राकेश हा अकरावीत आहे. वेंगुर्ल्यातील दोघा नागरिकांनी या चोरट्यांकडून घेतलेल्या गाड्या पोलिस ठाण्यात जमा केल्या आहेत.
ही कारवाई प्रभारी पोलीस अधिकारी विवेकांनद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी. जी. मोरे, हवालदार राजू उबाळे, एन्. व्ही. मोहिते, राजू जाधव , श्री. कांबळे, श्री. दळवी व संतोष जाधव यांनी ही कारवाई केली.
वाखारे यांनी सांगितले, यातील बहुतांश वाहने गोव्याच्या हद्दीत चोरल्याची शक्यता आहे. गोव्याचे मोटर रजिस्टर नंबर व बनावट नंबरप्लेट घालून वाहने विकली गेली. चोरलेली गाडी एखादा बकरा शोधून त्याला पटवायचे आणि गाडी फायनान्स् कंपनीने ओढून आणली असून अर्ध्या किमंतीत ते विकायचे. एका महीन्यानंतर कागदपत्रे देतो अशी बतावणी हे भामटे करायचे.
मात्र गाडी विकल्यानंतर ते ग्राहकाला तोंडही दाखवत नसत.
एकूण सहा आरोपींपैकी एक संशयित गॅरेजशी संबंधित, दुसरा ग्राहक मिळवण्यात पटाईत व तिसरा व्यवहार करण्यात पटाईत होता.
जप्त केलेल्या २९ दुचाकींपैकी हरमल व मांद्रे येथील दोन गाड्या २२ रोजी वेंगुर्ला पोलिस स्थानकात ओळख पटवण्यात आली आहे. त्यावेळी गोव्याच्या नंबरप्लेट असलेल्या अनेक वाहनांचा त्यात समावेश असल्याचे दिसून आले.
पेडणे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वेंगुर्ले पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांना ताब्यात घेऊन तपास केला जाईल. त्यामुळे गोव्यात चोरीस गेलेल्या दुचाकींचा छडा लागू शकेल.

फोंडा, उसगावातील अपघातांत दोघे ठार

फोंडा, दि.२३ (प्रतिनिधी): फोंडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत आज (दि.२३) झालेल्या दोन वेग वेगळ्या वाहन अपघातात दोघे जण ठार झाले आहेत.
वरचा बाजार फोंडा येथे शनिवार २३ रोजी संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास एका प्रवासी मिनी बसच्या (क्र.जीए ०२ टी - ४७९८) चाकाखाली सापडून पादचारी मारियो फर्नांडिस (४०) हा जागीच झाला आहे. तो मूळचा बेतूल येथील रहिवासी असून कामानिमित्त फोंड्यात राहात होता. ही प्रवासी मिनीबस फोंड्यातून साखळी येथे जात असताना वरचा बाजार येथे सुखटणकर बिल्डिंग जवळ पादचारी मारियो याला बसची जोरदार धडक बसल्याने मारियो खाली कोसळला आणि मिनीबसच्या चाकाखाली सापडला. या अपघातानंतर मिनीबसचा चालक आणि वाहक फरारी झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बसच्या चाकाखाली सापडलेला मारियो याचा मृतदेह बाहेर काढून विच्छेदनासाठी बांबोळी येथील सरकारी इस्पितळात पाठवला आहे. उपनिरीक्षक निखिल पालेकर यांनी पंचनामा केला.
दरम्यान, आज सकाळी ५.३५ च्या सुमारास तिस्क उसगाव येथे ट्रक आणि स्कूटर यांच्यात झालेल्या एका अपघातात स्कूटरवर मागे बसलेल्या राजेंद्र कश्यप (३०) याचा मृत्यू झाला. मयत राजेंद्र हा मूळचा छत्तीसगड येथील रहिवासी असून वड उसगाव येथे राहात होता. स्कूटरला धडक दिल्यानंतर ट्रक चालकाने ट्रकसह पलायन केले. या अपघातात स्कूटरचालक किरकोळ जखमी झाला.
याप्रकरणी ट्रकचालक हनुमंत देवबा जगताप (४५) रा. सोलापूर याला अटक केली आहे. उपनिरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी पंचनामा केला.

कुंडईतील स्फोटात कामगारजागीच ठार

बॉयलरच्या क्युअरींग चेंबरमध्ये स्फोट
फोंडा, दि.२३ (प्रतिनिधी): कुंडई औद्योगिक वसाहतीतील टेराकॉम लिमिटेड (पॉवर केबल डिव्हीजन) या केबल तयार करणाऱ्या कारखान्यात आज (दि.२३) संध्याकाळी साडे तीनच्या सुमारास स्फोट झाल्याने एक कामगार ठार झाला, तर दोघे कामगार जखमी झाले आहेत.
या कंपनीत पॉवर केबल तयार केल्या जातात. कंपनीत केबल तयार करण्याचे काम सुरू असताना अचानक साडे तीनच्या सुमारास बॉयलरच्या क्युअरींग चेंबरमध्ये स्फोट झाला. त्यात बिश्वनाथ पान (४० ) हा कामगार जागीच ठार झाला. दोघे कामगार जखमी झाले आहे. स्फोटात ठार झालेला बिश्वनाथ हा कामगार मूळचा कलकत्ता येथील रहिवासी आहे. दुर्गेश यादव (उत्तर प्रदेश) आणि मनोजकुमार गुप्ता ( पश्चिम बंगाल) अशी स्फोटांतील जखमींची नावे आहेत. कंपनीच्या बॉयलरच्या केबल क्युअरींग चेंबरमध्ये हा स्फोट झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून या स्फोटाबाबत गुप्तता पाळली जात होती. कंपनीतील कामगारांनादेखील स्फोटाची माहिती देण्यात आली नाही.घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील स्फोटासंबंधी पोलिसांनाही अंधारात ठेवण्याचा प्रयत्न झाला. अखेर पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखवल्यानंतर त्यांना स्फोटाचा तपशील देण्यात आला. ही माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. उपनिरीक्षक निखिल पालेकर, उपनिरीक्षक सचिन पन्हाळकर, साहाय्यक उपनिरीक्षक गोकुळदास मळीक यांनी पंचनामा केला. या प्रकरणी तपासकाम उपनिरीक्षक श्री. पालेकर करीत आहेत.
दरम्यान, या कारखान्याजवळ कुंडई अग्निशामक दलाचे कार्यालय आहे. मात्र, ह्या स्फोटासंबंधी कुंडई अग्निशामक दलाला कंपनीतर्फे काहीच माहिती देण्यात आली नाही, असे केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.