म्हापसा, दि. २६ (प्रतिनिधी): करासवाडा - थिवी येथे रविवारी रात्री कारने एका झाडाला जोरदार धडक दिल्याने लोबोवाडा थिवी येथील हरिश्र्चंद्र चंद्रकांत गाड (३३) व त्यांची पत्नी प्राजक्ता हरिश्र्चंद्र गाड (२८) ही दोघेही जागीच ठार झाली. रात्री ११.१५ च्या सुमारास ही घटना घडली.
म्हापसा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक तुळशीदास धावस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री सुमारे १० ते १०.३० च्या सुमारास हरिश्र्चंद्र गाड थिवी येथील आपले शांती बार अँड रेस्टॉरंट बंद करून घरी आले. आपली पत्नी प्राजक्ता हिला घेऊन ते कायसूव-हणजूण येथे राहत असलेले आपले वडील चंद्रकांत गाड यांच्याकडे जायला निघाले. हरिश्र्चंद्र यांची अडीच वर्षाची मुलगी तमन्ना ही आजोबाकडे होती. दोन दिवस मुलीला पाहिले नसल्याने दुकान बंद करून आल्यानंतर तिच्याकडे जाण्याचा बेत पती-पत्नीने आखला होता.
रात्री साडेदहाच्या सुमारास हरिश्र्चंद्र व त्यांची पत्नी जीए-०३-सी-७५४१ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर गाडीने निघाली त्यावेळी जोरदार पाऊस पडत होता. थिवीहून जात असता करासवाडा आंब्यांनी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कारची जोरदार धडक बसली. धडक एवढी जबरदस्त होती की, वाहनाचे इंजीन सुटून सुमारे २० मीटर बाहेर फेकले गेले व वाहनाचा चेंदामेंदा झाला. चालक हरिश्र्चंद्र वाहनात अडकून पडले. त्यांचे दोन्ही पाय खाली अडकले व डोक्यात काचा आणि पत्रा घुसला. तर, त्यांच्या पत्नीच्या डोक्याला पत्रा लागल्याने दोघांचे जागीच निधन झाले.
घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. लागलीच १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले, यावेळी तपासणी केली असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. हरिश्र्चंद्र वाहनात अडकल्यामुळे अग्निशामक दलाला पाचारण करून वाहनाचा पत्रा कापून प्रेत बाहेर काढण्यात आले. दोन्ही मृतदेह बांबोळी येथे शवचिकित्सेसाठी पाठवून देण्यात आले, आज दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सोमवारी संध्याकाळी चार वाजता शोकाकूल वातावरणात हरिश्र्चंद्र आणि प्राजक्ता यांच्यावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हरिश्र्चंद्र यांच्या पश्चात वडील चंद्रकांत गाड, आई चंद्रकला गाड, बहीण सुमन गाड व अडीच वर्षाची मुलगी तमन्ना असा परिवार आहे.
Tuesday, 27 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment