वास्को, दि. २४ (प्रतिनिधी) - "माहेरी जाते' असे कॉलेजला जाणाऱ्या मुलीला आपल्या मुलीला दोन दिवसांपूर्वी सांगून निघालेली ३५ वर्षीय नूतन साळकर ही विवाहित महिला बेपत्ता झाल्यानंतर आज सकाळी तिचा मृतदेह आगशी पोलिसांनी
शिरदोना समुद्रातून ताब्यात घेतला. चिखली - वास्को येथे राहणाऱ्या नूतनचा मृत्यू कसा झाला आहे याचे गूढ अजून उकलले नसून पोलिस त्या दृष्टिकोनातून तपास करत आहेत.
आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी (९.३० वाजता) शिरदोना समुद्रात एका अज्ञात महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढून ताब्यात घेतला. यानंतर पोलिसांना वास्कोतील एक महिला बेपत्ता असल्याचे समजताच त्यांनी त्या दिशेने तपास केला असता सदर मृतदेह वास्कोतील बेपत्ता असलेल्या ३५ वर्षीय नूतन साळकरचा असल्याचे आढळून आले. नूतनचा पती सुनील साळकर ह्याने आपल्या पत्नीची ओळख पटवली आहे.
आज आगशी पोलिसांना शिरदोना समुद्रात सापडलेला मृतदेह वास्कोतील विवाहित महिलेचा असून दोन दिवसांपूर्वी तिने आपल्या मुलीला आपण दोडामार्ग येथे माहेरी जात असल्याचे सांगून निघाल्यानंतर ती बेपत्ता झाली होती. नूतनच्या नातेवाइकांनी काल संध्याकाळपर्यंत शोध घेतल्यानंतर तिचा थांगपत्ता न लागल्याने नंतर याबाबत वास्को पोलिसात तिच्या पतीने तक्रार नोंद केली होती. मयत नूतन हिला एक मुलगी व एक मुलगा आहे. तिचा पती ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याची माहिती आगशी पोलिसांनी दिली आहे. नूतनच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शवचिकित्सेनंतरच तिच्या मृत्यूमागचे नेमके कारण स्पष्ट होईल. आगशी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून शवचिकित्सेसाठी तो बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात पाठवून दिला आहे. आगशीचे पोलिस निरीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शामराव चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
गीत मदारचा छडा लागला
दरम्यान काल सकाळी मंगोरहील, वास्को येथील बेपत्ता झालेली १९ वर्षीय गीता महादेव मदार हिचा शोध लागलेला असून तिच्या नातेवाइकांनीच तिला दाबोळी विमानतळाच्या भागातून शोधल्याचे वास्को पोलिसांनी सांगितले. मूकबधिर असलेली गीता काल रात्री एकटीच दाबोळीच्या भागातून चालत जात असताना तिच्या नातेवाइकांना सापडली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment