Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 30 July 2010

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे वास्कोतील तरुणीचा मृत्यू

गोमेकॉतील डॉक्टराकडून खासगी इस्पितळात शस्त्रक्रिया
दुसरी शस्त्रक्रिया कुटुंबीयांच्या परवानगीविना

वास्को, दि. २९ (प्रतिनिधी): गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) इस्पितळातील डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे वेर्णा येथील एका सोळा वर्षीय तरुणीला आपला जीव गमावावा लागला. "अपेंडिक्स'ची तक्रार घेऊन एका खासगी इस्पितळात दाखल झालेल्या रवीना रॉड्रिगीस या तरुणीवर त्या ठिकाणी पहिली शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय गोमेकॉत दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आल्याने तिचे आज सकाळी दहा वाजता गोवा वैद्यकीय इस्पितळात निधन झाले.
मयत रवीना हिच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आल्याने तिची बहीण रवीका रॉड्रिगीस हिने वास्को येथील "पै नर्सिंग होम' व गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. आमोणकर यांच्या विरोधात रीतसर तक्रार पोलिस स्थानकात सादर केली आहे.
अधिक माहितीनुसार रवीना हिला "अपेंडिक्स'चा त्रास असल्याने तिला वास्को येथील "पै नर्सिंग होम' येथे दि. ३ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. यावेळी तिच्यावर गोमेकॉतील डॉ. आमोणकर यांनी शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर तिला सहा दिवस नर्सिंग होममध्ये दाखल करून ठेवण्यात आले होते. दरम्यान, अचानक सातव्या दिवशी कोणतीही माहिती न देता रवीना हिला पुढील उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात हालवण्यात आले. यावेळी तिला पुन्हा शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. या विषयी डॉक्टरांना विचारले असता ""प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितलीच पाहिजे असे नाही. आम्हाला माहिती आहे आम्ही काय करीत आहोत ते'' असे उत्तर देऊन तिच्यावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी डॉ. राजेश पाटील यांनी अत्यंत हीन वागणूक दिली असल्याचा दावा मयत रवीनाची बहीण रवीका हिने आपल्या तक्रारीत केला आहे.
"पै नर्सिंग होम'मधील डॉक्टर आणि गोमेकॉतील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच आपल्या बहिणीचा मृत्यू झाल्याचा दावा रवीका हिने केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. "पै नर्सिंग होम'मधून रवीनाला गोमेकॉत का हालवण्यात आले आणि आमची सहमती न घेता गोमेकॉत तिच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया का करण्यात आली, असे प्रश्न रवीनाच्या कुटुंबीयांनी उपस्थित केले आहेत.
या घटनेमुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील डॉक्टर खासगी इस्पितळातही सेवा बजावत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. आरोग्यमंत्री राज्यातील इस्पितळांचा दर्जा वाढवण्याच्या बाता मारीत असले तरी, गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचा बेजबाबदारपणा दिवसेंदिवस वाढत चालल्याची प्रकरणे समोर येत आहेत.

No comments: