Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 2 May 2009

"सिरियल किलर'च्या घराला अज्ञाताकडून आग

फोंडा, दि.१ (प्रतिनिधी) - फोंडा भागातील दोन युवतींचा खून केल्याची कबुली देणाऱ्या तरवळे शिरोडा येथील महानंद रामनाथ नाईक याचे घर आज रात्री अज्ञाताकडून लावण्यात आलेल्या आगीच्या भक्षस्थानी पडले.
शिरोडा येथील एका युवतीवरील बलात्कार प्रकरणातील संशयित महानंद नाईक याने दोन युवतीच्या खुनाची कबुली दिली. त्याने खून केलेली एक युवती तरवळे आणि दुसरी कुर्टी फोंडा गावातील आहे. सध्या संशयित महानंद नाईक याच्या संबंधी उलटसुलट चर्चा सुरू आहे. आणखी काही प्रकरणामध्ये संशयिताचा सहभाग असल्याची शक्यता लोकांकडून वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणामुळे महानंद नाईक याच्याविरोधात काहींच्या मनात चीड निर्माण झाली असून त्यातूनच त्याच्या घराला आग लावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महानंद नाईक याच्या घराला आग लागल्याची माहिती रात्री ८.२० च्या सुमारास फोंडा अग्निशामक दलाला मिळाली. फोंडा अग्निशामक दलाचा बंब केरी फोंडा येथे आग विझवण्यासाठी गेल्याने मडगाव येथील अग्निशामक दलाला या आगीची माहिती देण्यात आली. मडगाव, वेर्णा येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे काम सुरू केले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. मडगाव व वेर्णा येथील अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्याचे काम सुरू असताना फोंडा अग्निशामक दलाचे जवान बंबासह घटनास्थळी पोहोचले.
या आगीत संपूर्ण घर खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची झळ शेजारच्या एका घरालासुद्धा बसली आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी फोंडा पोलिस तपास करीत आहेत.

राज्यात तीव्र पाणीटंचाई

पणजी, फोंडा व काणकोण, दि.१ (प्रतिनिधी)ः राज्यात विविध ठिकाणी सध्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष्य मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने येत्या काही दिवसांत पाण्याचे महासंकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे उष्माघाताची शक्यता वर्तवून सरकार लोकांना सतर्क करत आहे व जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आवाहन करत आहे तर दुसरीकडे नळ कोरडे पडत चालल्याने लोकांचे घसे कोरडे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साळावली धरणातील पाण्याची पातळी खालावत चालल्याने ही समस्या अधिक गंभीर बनण्याची शक्यता असून दक्षिण गोव्यात येत्या काळात पाण्यासाठी वणवण करण्याची पाळी जनतेवर येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मे महिन्याला नुकतीच सुरुवात झाली असून राज्यात पाण्याच्या टंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विविध ठिकाणी असलेल्या जलाशयातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. विविध तालुक्यातील अनेक भागांत नळ कोरडे पडल्याच्या तक्रारी असून लोकांना कित्येक अंतर चालत जाऊन विहिरींचे पाणी आणावे लागत असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष करून दक्षिण गोवा हा पूर्णपणे साळावली धरणावर अवलंबून असल्याने व साळावली धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने येत्या काही दिवसांत दक्षिणेत लोकांना पाण्यासाठी तळमळ करावी लागणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाने मात्र ही शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. राज्यात उन्हाळ्यात पुरेसे पाणी विविध जलाशयात असून लोकांनी चिंता करण्याची गरज नाही, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
निर्बंधामुळे फोंड्यात पाण्याची कमतरता
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागातर्फे ओपा पाणी प्रकल्पातून येथील फोंडा शहर आणि तालुक्याला पाण्याचा पुरवठा करण्यात येत असला तरी खांडेपार नदीतील पाणी खेचण्यावर निर्बंध घालण्यात आल्याने पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. प्रतिदिन सुमारे २० एमएलडी पाणी कमी खेचण्यात येत असल्याने फोंडा विभागात नियंत्रित पाण्याचा पुरवठा होत असून शहराबरोबर शिरोडा, उसगाव, प्रियोळ, मडकई, आगापूर आदी अनेक भागातील लोकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कारकिर्दीत खांडेपार नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधून नदीचे पाणी अडवून ठेवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. या योजनेमुळे उन्हाळ्याच्या दिवसात ओपा पाणी प्रकल्पाला भेडसावणारी पाण्याची समस्या आता दूर झाली आहे. ओपा प्रकल्पातील पाण्याची सध्याची पातळी सुमारे सव्वा दोन मीटर आहे. गांजे येथील बंधाऱ्यातील म्हादई नदीचे पाणीसुध्दा खांडेपार नदीकडे वळवण्यात आले आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खांडेपार नदीतील पाण्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम जलस्रोत खात्यातर्फे करण्यात येत आहे. याच खात्यातर्फे नदीतील पाण्याचा साठा करण्यासाठी बंधारे बांधण्यात आले आहेत. ओपा पाणी प्रकल्पाला आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जलस्रोत खात्याची असल्याने ओपा खांडेपार येथील नदीतील पाणी खेचण्यावर जलस्रोत खात्याने जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निर्बंध घातले आहे. परिणामी पाणी पुरवठा विभागातर्फे नदीतून कमी प्रमाणात पाणी खेचण्यात येत आहे. ओपा प्रकल्पातून फोंडा व तिसवाडी या दोन तालुक्यांना पाण्याचा पुरवठा केला जातो. फोंडा पाणी पुरवठा विभागाला दर दिवशी २० एमएलडी पाणी कमी मिळत असल्यामुळे संध्याकाळी ४ ते सकाळी ८ (१६ तास) यावेळेत लोकांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे. शहरात समपातळीवर पाण्याची टाकी असलेल्या लोकांना पाण्याचा पुरवठा होत असला तरी उंच भागात असलेल्या लोकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे.
फोंडा, शिरोडा, मडकई आणि प्रियोळ या चारही मतदारसंघात विविध भागात टॅंकर्सद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. ओपा पाणी प्रकल्पातून शिरोडा बोरी भागात पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पंचवाडी येथील म्हैसाळ धरणातून पंचवाडी भागात पाण्याचा पुरवठा केला जात आहे. हा पाण्याचा पुरवठा अपुरा असल्याने दुर्गम भागातील लोकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही. त्यामुळे अनेक भागात टॅंकर्सद्वारे पाण्याची पुरवठा केला जात आहे. बेतोडा निरंकाल या भागातसुध्दा अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मडकई मतदारसंघात अनेक भागात मुबलक प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नसल्याने टॅंकर्सद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तिस्क उसगाव भागात सुद्धा लोकांना पाण्यासाठी त्रास सहन करावे लागत आहेत.
सावईवेरे, वळवई, केरी या भागामध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची टंचाई निर्माण होते. या भागात अनेक कारणांमुळे ओपा पाणी प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा होत नाही. त्या भागात विहिरी आणि कूपनलिका खोदून पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातो. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत विहिरी आणि कूपनलिकांना योग्य प्रकल्पात पाणी मिळत नसल्याने पाणी टंचाई निर्माण होते. या भागातील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. माजी आमदार विश्र्वास सतरकर यांनी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सुजल प्रकल्प आपल्या कारकिर्दीत कार्यान्वित केला होता. स्थानिक विहिरी, पारंपरिक तळी यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याची ही योजना होती. मात्र, या योजनेकडे दुर्लक्ष झाल्याने पाणी समस्या कायम आहे. या भागात होणाऱ्या पाणी टंचाईचा अभ्यास करून योग्य योजना कार्यान्वित करण्याची गरज आहे.
काणकोणातही पाणी टंचाई
मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून काणकोण तालुक्यात तीव्र पाणी टंचाई भासू लागली असून पाळोळे भागात आजही पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला नव्हता, अशी माहिती काणकोणचे माजी उपनगराध्यक्ष दयानंद पागी यांनी दिली.
पाळोळे भागात अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ पाळोळे येथील सुमारे शंभर नागरिकांनी सकाळी माजी उपनगराध्यक्ष दयानंद पागी यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चा नेऊन साहाय्यक अभियंते श्री. कायरो यांना निवेदन सादर केले होते. परंतु, याचा पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांवर कोणताच परिणाम झाला नसल्याचे श्री. पागी यांनी आज येथे बोलताना सांगितले.
गावडोंगरी व खोतीगाव पंचायत क्षेत्रातील नागरिकांना पाण्यासाठी दोन-दोन किलोमीटर पायी चालत जावे लागत आहे. काही नागरिक ओहोळात खड्डे खणून पाणी करवंटीने मडक्यात भरून दिवस काढत असल्याची माहिती खोतीगावचे शांताराम देसाई यांनी दिली. गावडोंगरी पंचायत क्षेत्रात खाजगी पिकअपद्वारे पाणी पुरवठा केला जात असला तरी तो अनियमित असल्याने नागरिकांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे गावडोंगरी येथील प्रवीण नागेश देसाई यांनी सांगितले. काणकोण पालिका क्षेत्रातील पाणयेफोंड येथील नळांना रात्रीच्या वेळी पाणी येत असल्याने महिलांना अहोरात्र जागे राहावे लागत आहे, अशी माहिती तेथील गोपाळ मोखर्डकर यांनी दिली.
पैंगीण पंचायत क्षेत्रातील वेलवाडा, गाळये, खावट या भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती येथील नागरिक जनार्दन भंडारी यांनी दिली. वाहनांद्वारेही नियमितपणे पुरवठा होत नसल्याची त्या भागातील महिलांची तक्रार आहे. खाजगी वाहने भाडेपट्टीवर घेऊन पाणीपुरवठा केला जात असला तरी पंपाद्वारे खेचण्यात येणाऱ्या विहिरींचे पाणी आटल्याने भयंकर समस्या निर्माण झाल्याची माहिती साहाय्यक अभियंता आशिष कायरो यांनी दिली आहे.
चापोली लघू धरण तसेच अर्धफोंड ओहोळाचे पाणी संपूर्ण काणकोण तालुक्यात वितरित करण्यात येत असल्याने हा प्रसंग ओढवला असल्याचे पाणीपुरवठा खात्याच्या एका कनिष्ठ अभियंत्याने मान्य केले. काणकोण तालुक्यात सुमारे चौदा खाजगी पिकअप तसेच खात्याचे दोन टॅंकरही पाणीपुरवठा करत आहेत. दरम्यान, चापोली लघू धरणातील पाण्याची पातळी बरीच खाली गेली असली तरी धरणात मुबलक पाणी असल्याचे जलस्रोत खात्याचे साहाय्यक अभियंता गोपीनाथ देसाई यांचे म्हणणे आहे. काणकोण तालुक्यात यंदा सुमारे १३० इंच पाऊस पडला होता. ८ ऑगस्ट २००८ रोजी चापोली धरण पाण्याने पूर्ण भरून वाहत होते. चापोली धरणाची पातळी ३६.५ मिलीयन क्युबिक मीटर तर क्षमता ३८. २५ मिलीयन क्युबिक मीटर एवढी आहे. असे असतानाही पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याने काणकोण तालुक्यातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

... तर २५ मे पासून राज्याचा पाणीपुरवठा बंद
सार्वजनिक बांधकाम खात्यातील सुमारे दोन हजार कंत्राटी कामगारांच्या मागण्यांविषयी कामगार आयुक्तांकडून सुरू असलेली चालढकल संपली नाही तर येत्या २५ मे रोजी बेमुदत संपावर जाणार, असा इशारा कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिला आहे. सुमारे दोन हजार कामगार गेली दहा ते पंधरा वर्षे सा.बां.खा.त कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत. या कामगारांना डावलून नव्या कामगारांची थेट व नियमित भरती केली जात आहे. यापूर्वी संपाची नोटीस दिली असता सरकारने चर्चेची तयारी दर्शवली व त्यामुळे संपाचा निर्णय स्थगित करण्यात आला. आता चर्चेचे निमित्त साधून कामगार आयुक्तांकडून वेळकाढू धोरण अवलंबले जात आहे. सरकारकडून या कामगारांप्रति सुरू असलेली थट्टा यापुढे अजिबात सहन करणार नाही. हे सर्व कामगार राज्यातील विविध पाणी पुरवठा प्रकल्पांवर कार्यरत आहेत, ते २५ मे पासून संपावर गेल्यास संपूर्ण राज्याचा पाणी पुरवठा बंद होणार आहे. सरकारने तात्काळ या कामगारांचा प्रश्न सोडवावा, अन्यथा परिणामांना हे सरकार जबाबदार असेल, असेही फोन्सेका यांनी यावेळी स्पष्ट केले.

धर्मद्रोह्यांविरुद्ध एकत्र या - ब्रह्मेशानंदाचार्य


श्री सातेरी व पाईकदेव मूर्तिप्रतिष्ठापना सोहळा


सांगे, दि. १ (प्रतिनिधी)- पाईकदेव म्हणजे रक्षण करणारा देव, शेवटी आपली आशा देवावरच असते. पूर्वजांनी याच कारणास्तव मठ-मंदिरांची निर्मिती करून ठेवली आहे. २००४ साली घडलेल्या मूर्तिभंजनानंतर सांगेवासीयांनी उचललेले पाऊल उल्लेखनीय आहे. हिंदू समाजाला संपवण्याच्या हेतूने धर्मद्रोह्यांनी केलेल्या प्रकारातून उलट समाज एकत्र आला आहे, हाच अशा प्रकारांवर योग्य उपाय आहे, असे प्रतिपादन कुंडई पीठाचे पीठाधीश प.पू.ब्रह्मेशानंदाचार्य यांनी केले.
व्हाळशे सांगे येथे २००४ साली उद्ध्वस्त करण्यात आलेल्या श्री सातेरी व पाईकदेव मंदिराच्या मूर्तिप्रतिष्ठापना व जीर्णोद्धार कार्यक्रमात आशीर्वचनात त्यांनी वरील उद्गार काढले. यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, आमदार वासुदेव मेंग गावकर, राजेंद्र सुभाष वेलिंगकर, माजी आमदार पांडू वासू नाईक, दीपक मराठे, दीपक नाईक, जयेश थळी, जयेश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. मंदिर जीर्णोद्धार व मूर्तिप्रतिष्ठापना सोहळा भक्तगणांच्या अपूर्व उत्साहात ऐतिहासिक स्वरूपात पार पडला. स्वामीजींच्या उपस्थितीत प्रथम श्री सातेरी देवी व नंतर श्री पाईकदेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक विधी तसेच सामूहिक गाऱ्हाणे घालण्यात आले.
व्यासपीठावरील कार्यक्रमापूर्वी प.पू. ब्रह्मेशानंदाचार्यांचे स्वागत करण्यात आले. श्री. व सौ. दीपक राघोबा नाईक यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली.
आशीर्वचनपर भाषणात बोलताना प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य पुढे म्हणाले की, मंदिरे हिंदू समाजाचा प्राणवायू आहे, त्यावर आघात होता कामा नये. हिंदू समाजावर अत्याचारानंतर आता मंदिरे उद्ध्वस्त करणारी शक्ती प्रबळ झाली आहे. हिंदूंची श्रद्धास्थाने उद्ध्वस्त केल्यावर हा समाज संपणार असा दुष्ट हेतू यामागे आहे, हा डाव कधीच सफल होणार नाही, असेही स्वामीजींनी सांगितले.
स्वामीजी पुढे म्हणाले की, देवाचे कार्य हेच आपले कार्य असे मानून पुढे येणाऱ्यांना धार्मिक असे म्हटले जाते. राजकारण्यांवर अंकुश ठेवण्यासाठी मंदिरातून प्रयत्न झाले पाहिजेत. हिंदूंच्या हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या राजकारण्याला धडा शिकवला पाहिजे. हिंदू धर्माचे प्रत्येक शास्त्र महत्त्वाचे आहे. योगशास्त्र, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र हे जीवनात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे आहे. मंदिरनिर्मिती अभिमानाची गोष्ट असून त्यातून सुरक्षा व जागृतीसाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे स्वामीजींनी शेवटी सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना राजेंद्र वेलिंगकर यांनी भारतीय जीवन पद्धती मार्गदर्शक असल्याचे सांगितले. भारतावर पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण रोखण्यासाठी मंदिरे, शाळा व्यवस्थित चालल्या पाहिजेत. हिंदुत्व टिकले तरच जगाचे सामर्थ्य टिकेल असे सांगताना केवळ मंदिरनिर्मिती करून हे साध्य होणार नाही तर सतत सुरक्षा, सेवा व संस्कार त्याद्वारे निर्माण करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
आमदार वासुदेव गावकर यांनी स्वागत केले. मनोहर पर्रीकर, जयेश नाईक, दीपक मराठे, चंद्रकांत गावकर यांनी आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन सुरेश भंडारी यांनी केले.

---क्षणचित्रे----

मूर्तिभंजनानंतर आयोजित जीर्णोद्धार व मूर्तिप्रतिष्ठापना सोहळ्याला जनसागर लोटला होता.
२००४ साली घडलेल्या प्रकारानंतर सांगेवासीयांनी दाखवलेल्या धाडसाचे अनेकांनी कौतुक केले.
भाविकांच्या स्वागतासाठी १४ किमी अंतरापासून नाक्यानाक्यावर कमानी उभारण्यात आल्या होत्या.
विशेष उपस्थितांमध्ये भाजपचे दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार ऍड. नरेंद्र सावईकर, माजी आमदार विनय तेंडुलकर, आमदार महादेव नाईक आदींचा समावेश होता.
देवदर्शनासाठी दुपारपासून लांब रांगा लागल्या होत्या.
शहनाईस्वरात नगाड्याच्या तालावर वाजणारे भारतीय संगीत सर्वांसाठी आकर्षण ठरले होते.
भाविकांद्वारे परिसराची सुरेख सजावट करण्यात आली होती.

वरुण गांधी यांना १४ मेपर्यंत पॅरोल

नवी दिल्ली, दि. १ ः प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी रासुकाखाली कारवाईच्या कक्षेत असणारे भाजप नेते वरुण गांधी यांच्या पॅरोलची मुदत सर्वोच्च न्यायालयाने १४ मेपर्यंत वाढवून दिली आहे.
सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील न्यायासनाने ही मुदत वाढवून दिली. या न्यायासनासमोर उत्तरप्रदेश सरकारने आज दाखल केलेल्या याचिकेत म्हटले की, वरुण गांधी यांनी जामीन मिळवण्यासाठी जे शपथपत्र दिले त्यातील वचनांचे पालन केले नाही. राज्य सरकारतर्फे ऍड. हरीष साळवे यांनी म्हटले की, शपथपत्रातील अटीनुसार वरुण गांधी यांना पॅरोलदरम्यानच्या सर्व हालचालींची माहिती पिलीभीत प्रशासनाला द्यायची होती. पण, त्यांनी १६ ते २० आणि २३ ते २५ एप्रिलदरम्यान आपल्या एकूणच हालचालींविषयी प्रशासनाला कोणतीही माहिती दिलेली नाही. या कालावधीत वरुण उत्तरप्रदेशात होते. पण, त्यांनी पिलीभीतमध्ये अधिकाऱ्यांना सूचित केले नाही.
वरुण गांधी यांचे वकील ऍड. मुकुल रोहतगी यांनी मात्र या आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार दोघांचाही उद्देश वरुण गांधी यांना कारागृहात ठेवणे हाच आहे. त्यासाठी त्यांच्यावर रासुका लावण्यात आला आणि अनावश्यक कारवाई करण्यात आली.
वरुण गांधी हे पिलीभीत येथून भाजपचे उमेदवार आहेत. येत्या १३ मे रोजी अखेरच्या टप्प्यात येथे मतदान होणार आहे. किमान तोवर वरुण गांधी यांना पॅरोलवर मोकळे ठेवले जावे, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती. ही मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने वरुणच्या पॅरोलमध्ये १४ मे पर्यंत वाढ केली.

Friday, 1 May 2009

खाणींमुळे भूमिपुत्रांवरच संक्रांत

"गाकुवेध'चे न्यायमंडळ सरकारला अहवाल देणार

तब्बल साठ निवेदने सादर
सरकारकडून सतत उपेक्षाच
विशेष कायद्याची मागणी

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी) - राज्यात विविध ठिकाणी खाण मालकांनी येथील भूमिपुत्रांच्या अस्तित्वावरच घाला घातला आहे. खाण उद्योगासाठी सरकारकडे परवान्यांसाठी दाखल केलेल्या जमिनींचा ताबा गेल्या कित्येक वर्षांपासून आदिवासींकडे आहे. या जमिनींवरच या आदिवासींचा उदरनिर्वाह चालतो. मात्र,असे असूनही या जमिनी खाण उद्योजकांना देण्यात आल्याने आदिवासी जमातीच्या लोकांवर संक्रांत आली आहे, त्यामुळे सरकारने असे खाण करार ताबडतोब रद्द करावे,अशी शिफारस "गाकुवेध' लोकअदालतीच्या न्यायमंडळ समितीकडून राज्य सरकारला करण्यात येणार आहे.
"गावडा,कुणबी,वेळीप,धनगर संघटना'(गाकुवेध) यांच्यातर्फे ३० व ३१ रोजी असे दोन दिवस येथील मिनेझीस ब्रागांझा सभागृहात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.येथील आदिवासी अर्थात भूमिपुत्रांना त्यांच्या जमिनींचे हक्क मिळवून देण्यासंदर्भात त्यांच्या विविध समस्या तथा अडचणी एकूण घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे व या अडचणींबाबत सरकारला अहवाल सादर करणे हा या लोकअदालतीमागचा उद्देश होता. ही माहिती न्यायमंडळाचे प्रमुख न्यायमूर्ती हॉस्बेट सुरेश यांनी दिली. यावेळी न्यायमंडळाचे इतर सदस्य ऍड.कॅरोलिना कुलासो,डॉ.वंदना सोनालकर व ऍड.अल्बर्टिना आल्मेदा आदी हजर होते.
आपल्याच भूमीत परागंदा होण्याची वेळ आदिवासी लोकांवर ओढवली आहे व मोठ्या प्रमाणात या लोकांना विस्थापित व्हावे लागत आहे,अशी माहिती या लोकअदालतीच्या निमित्ताने पुढे आली आहे. या लोकांना केवळ त्यांच्या जमिनींच्या हक्कांपासून वंचित ठेवले जात नसून त्यांचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतला जात असल्याची गोष्ट या लोकअदालतीच्या निमित्ताने पुढे आली आहे. राज्य सरकारने प्रादेशिक आराखडा २०२१ साठी लोकांकडून हरकती व सूचना मागितल्या आहेत. विविध ठिकाणी ग्रामसभांची मान्यता या आराखड्याला मिळवून देण्याचीही अट आहे. मुळात राज्यातील आदिवासी भागांत वन खात्यातर्फे विशेष ग्रामसभांचे आयोजन करून या आदिवासी लोकांचे म्हणणे एकूण घेण्याची गरज आहे. तसे न झाल्यास ही प्रक्रिया अपूर्ण राहील,अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या लोकअदालतीच्या निमित्ताने सुमारे ६० निवेदने सादर करण्यात आली आहे. यावेळी या लोकांनी मांडलेल्या समस्या व अडचणी पाहता सरकारने या लोकांना वाऱ्यावर सोडल्यातच जमा असल्याचे सिद्ध झाले आहे. या लोकांना प्रशासकीय खात्यांकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही तसेच आपल्या हक्कांबाबत आवाज काढल्यास पोलिसांकडून हा आवाज दाबला जातो,अशी माहितीही उघड झाली आहे.
मुळात गोव्यात सुरुवातीला केलेल्या भूसर्वेक्षणावेळी आदिवासींच्या ताब्यातील या जमिनींवर भलत्याचीच नावे टाकण्यात आली होती. या लोकांना या सर्वेक्षणात सहभागी करून घेतले नसल्याने आता ही परिस्थिती ओढवल्याचा निष्कर्षही यावेळी काढण्यात आला. या लोकांची या जमिनींच्या कागदपत्रांवर नावे नसल्याने त्यांना सहजपणे इथून हाकलणे हे मानवी हक्कांच्या विरोधात आहे.संविधानात दिलेल्या हक्कांप्रमाणे या लोकांनाही या जागेवर पूर्ण हक्क आहे व त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन या लोकांचा प्रश्न सोडवायला हवा,असेही यावेळी न्यायमूर्ती सुरेश म्हणाले. हे लोक राहत असलेली जागा ही मुख्यत्वे वन क्षेत्रात येत असल्याने वन खात्याकडूनही त्यांची मोठ्या प्रमाणात सतावणूक होते. काही ठिकाणी वन खात्याने या जागांवर आपला अधिकार सांगून या लोकांची सतावणूक सुरू केली आहे. या लोकांना त्यांच्या जमिनींचे हक्क मिळवून देणे ही गरज आहे अन्यथा या लोकांना त्यांच्या मानवी हक्कांपासून वंचित ठेवण्याचाच प्रकार होईल,अशी माहिती देण्यात आली.
वन हक्क कायदा-२००६ ची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे,असा निष्कर्षही यावेळी काढण्यात आला आहे..या कायद्याअंतर्गत वन क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या मूलभूत हक्कांचा अधिकार देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या लोकांच्या सुरक्षेखातर खास कायदा तयार करण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.या आदिवासींवर ओढवलेल्या या संकटाचे सर्वांत जास्त परिणाम हे महिलांवर होत असून आपल्या अस्तित्वाच्या या लढ्यात महिला आघाडीवर आहेत,असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.

तिसऱ्या टप्प्यात ५० टक्के मतदान


जम्मू-काश्मिरात २५ टक्के मतदान


नवी दिल्ली, दि. ३० - देशातील पंधराव्या लोकसभेसाठी ९ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशांतील १०७ मतदारसंघांत आज तिसऱ्या टप्प्यात सुमारे ५० टक्के मतदान झाल्याची माहिती साहाय्यक निवडणूक आयुक्त आर. बालकृष्णन यांनी दिली. काही तुरळक घटना वगळता देशातील सर्वच भागांत आज मतदान सुरळीतपणे व शांततेत पार पडले, असेही त्यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग मतदारसंघात आज तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर फुटीरवादी संघटनांच्या नेत्यांनी ५० तासांच्या बंदचे आवाहन केले होते. हे बंदचे आवाहन झुगारून असंख्य मतदारांनी या संवेदनशील मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावल्यामुळे तेथे आज २५ टक्के मतदानाची नोंद झाली. आज तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानात सर्वांत कमी मतदान जम्मू-काश्मीरमध्ये तर सर्वाधिक ६५ टक्के मतदान सिक्कीममध्ये नोंदवले गेले. पहिल्या दोन टप्प्यांच्या पाठोपाठ आज बिहारमध्ये पुन्हा एकदा कमी मतदान झाले. बिहारमध्ये ४८ टक्के मतदान झाले.
गुजरातमधील सर्वच्या सर्व म्हणजे २६ मतदारसंघांत आज मतदान झाले आणि राज्यात एकूण ५० टक्के मतदान नोंदवले गेले. गुजरातपाठोपाठ भाजपचे शासन असलेल्या कर्नाटक राज्यातही आज भरपूर मतदान होऊन तेथे ५७ टक्के मतदानाची नोंद झाली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशात प्रत्येकी ४५ टक्के, तर दादरा-नगर हवेली व दमण-दीव या दोन्ही केंद्रशासित प्रदेशात प्रत्येकी ६० टक्के मतदान झाले. देशातील इतरत्र उष्णतेच्या लाटेमुळे कमी मतदान झाले असले तरी पश्चिम बंगालमध्ये मात्र लोकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले. त्यामुळेच डाव्यांचे राज्य असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ६४ टक्के मतदान झाले.
कॉंग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह एकूण १५६७ उमेदवारांचे भाग्य आज तिसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर मशीनबंद झाले. आज तिसऱ्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने १,६५,००० मतदान केंद्रे स्थापन केली होती. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ६ लाख मतदान अधिकारी तैनात करण्यात आले होते.
तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर आता अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, दादरा-नगर हवेली, दमण-दीव, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मेघालय, मिझोराम, नागालॅण्ड, सिक्कीम, त्रिपुरा, आंध्र प्रदेश, आसाम, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, ओरिसा, महाराष्ट्र या सर्व राज्यांमधील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्वांचे लक्ष आता १६ मे रोजी होणाऱ्या निकालाकडे लागले आहे. शनिवार १६ मे रोजी या निवडणुकीची एकत्रित मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी, चौथ्या व पाचव्या टप्प्याचे मतदान अनुक्रमे ७ व १३ मे रोजी होणार आहे.

पर्रीकर इस्पितळातून घरी

पंधरा दिवस सक्त विश्रांतीचा सल्ला

मडगाव, दि. ३१ (प्रतिनिधी) : गेल्या आठवड्यात येथील अपोलो व्हिक्टर इस्पितळात दाखल करण्यात आलेले विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांना आज इस्पितळातून घरी जाऊ देण्यात आले. मंगळवारी त्यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली होती व नंतर शुक्रवारी इस्पितळातील अतिदक्षता विभागातून त्यांना पहिल्या मजल्यावर हलवण्यात आले होते.
अतिदक्षता विभागातून हलविण्यात आल्यानंतर गेले दोन दिवस पर्रीकर डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली होते. त्यांच्या प्रकृतीत झालेली लक्षणीय सुधारणा पाहून सकाळी प्रकृतीच्या तपासणीनंतर त्यांना घरी देण्यात आले. पर्रीकरांवर अँजियोप्लास्टी करणारे डॉ. उदय खानेालकर यांनी त्यांची प्रकृती उत्तम असल्याचा हवाला दिला. गेल्या मंगळवारपासून हॉस्पितळात तळ ठोकून असलेले पर्रीकर यांचे थोरले बंधू अवधूत पर्रीकर व वडिलांच्या प्रकृतीची माहिती मिळताच अमेरिकेहून तातडीने गोव्यात दाखल झालेले पर्रीकरांचे ज्येष्ठ पुत्र उत्पल हे पर्रीकर यांना घेऊन सकाळी ११ वाजता घरी निघाले. यावेळी इस्पितळाजवळ भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. मडगाव भाजप मंडलाचे अध्यक्ष नवनाथ खांडेपारकर, युवा मोर्चा नेते रुपेश महात्मे, सिध्दनाथ बुयांव, विलास साखरकर आदींचा त्यात समावेश होता.
पर्रीकरांना इस्पितळात दाखल केल्यापासून समाजाच्या विविध थरांतील लोकांची त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी अपोलोत गर्दी केली होती. तथापि पर्रीकर यांना भेटण्यास लोकांना मनाई केल्याने निदान त्यांना दूरन तरी पाहता येईल या उद्देशाने त्यांचे मित्र, पक्षाचे कार्यकर्ते, आप्तेष्ट तसेच कुटुंबीय इस्पितळात जमत होते. आम्हाला त्यांना निदान दूरवरून तरी पाहू द्या अशी विनंती त्यांचे कार्यकर्ते करताना दिसत होते. गेल्या आठवडाभरांत मुख्यमंत्र्यांसह कित्येक आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार तसेच समाजाच्या विविध थरांतील मान्यवरांनी अपोलोत येऊन त्यांच्या प्रकृतीची आपुलकीने विचारपूस केली.
मडगावमधील भाजपा नेते व कार्यकर्त्यांसाठी तर पर्रीकर यांना अपोलोंत दाखल केल्यापासून सदर हॉस्पितळ हे दुसरे घरच झाले होते. पहिल्या दिवसापासून ते आजच्या दिवशीपर्यंत ही मंडळी आळी पाळीने इस्पितळात हजर राहून पहारा देत होती. भाजपाच्या विविध समित्यांतील कार्यकर्त्यांचा समावेश होता.
पंधरा दिवस विक्षांतीचा सल्ला
मडगावः पर्रीकर यांच्यावर उपचार करणारे डॉ. खानोलकर यांनी, पर्रीकर यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र त्यांनी आहारात पथ्य पाळायला हवे. किमान पंधरा दिवस त्यांना सक्तीच्या पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असून नंतर ते आपले नियमित कारभार हाताळू शकतील असे त्यांनी पुढे सांगितले. योग्यवेळी योग्य इस्पितळात आणले गेल्याने त्यांना अगदी वेळेवर चांगले उपचार मिळाले याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

पर्रीकर कुटुंबीयांचे आवाहन
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीला वेगाने आराम पडावा यासाठी त्यांना दोन आठवडे सक्त विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे या विश्रांतीच्या काळात त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न त्यांचे हितचिंतक, चाहते व कार्यकर्ते यांनी टाळावा, असे विनंतीवजा आवाहन पर्रीकरांच्या कुटुंबीयांनी केले आहे.

करमणे येथील सुपर सेंटर खाक

४० लाखांची हानी

मडगाव, दि.३० (प्रतिनिधी) : करमणे येथे रस्त्यालगत असलेल्या मेंडिस सुपर सेंटर ऍण्ड वाइन शॉपला आज सकाळी अचानक आग लागल्याने दारूच्या बाटल्यांसहित विक्रीच्या वस्तू तसेच लाकडी सामान खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार या आगीमुळे ४० लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
आज सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आगीच्या ज्वाळा व आवाज येऊ लागल्याने शेजारचे लोक तत्काळ घटनास्थळी धावले. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. मडगाव व वेर्णा येथील अग्निशमन बंबांनी तेथे धाव घेऊन आग विझवण्याचे काम सुरू केले. दुपारी ११.३० वाजेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. दरम्यान, आगीचे कारण कळू शकलेले नसले तरी मोठ्या प्रमाणात नुकसानी झाल्याचे सांगण्यात आले. कायतान गोम्स मेंडिस यांच्या मालकीचे हे सेंटर असून त्यांनी आपली सर्व मिळकत सदर इमारत व शॉपिंग सेंटरमध्ये गुंतवली होती. या आगीमुळे त्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.

कुठ आहे वाघ?


वनखात्याचा उलटा सवाल


पणजी, दि.३० (प्रतिनिधी)-"कोण म्हणतो वाघाची हत्या झाली. कोठे आहे मृत वाघाचे अवशेष, कोठे आहे मृत वाघाचे छायाचित्र' असे सवाल उपस्थित करून मुख्य वनपाल शशीकुमार यांनी तथाकथित वाघाची हत्याप्रकरणाची हवाच काढून घेतली आहे. केरी-सत्तरी येथील तथाकथित पट्टेरी वाघाच्या हत्येबाबत खात्याकडे कोणताही पुरावा नाही तसेच हा प्रकार खरा असल्याच्या खुणाही सापडल्या नाहीत. ही वार्ता पहिल्यांदा उघडकीस आणलेले पर्यावरणतज्ज्ञ प्रा. राजेंद्र केरकर यांनी तथाकथित छायाचित्राची सखोल माहितीही दिली नसल्याचे शशीकुमार यांनी यावेळी सांगितले.
पणजी येथील वनखात्याच्या मुख्यालयात आज मुख्य वनपाल शशीकुमार यांची भेट घेतली असता त्यांनी ही माहिती दिली. मुळात या भागात पट्टेरी वाघाची हत्या झाल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर येथे सर्वत्र तपासणी करण्यात आली. मुळात वाघाची हत्या झाल्याची जागा तर मिळाली नाहीच परंतु कोणते अवशेषही सापडले नाहीत, असे ते म्हणाले. वृत्तपत्रात आलेल्या माहितीच्या आधारे चौकशी सुरू असून हा अहवाल पुढील आठवड्यात सादर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे तर काही लोकांच्या जबान्या नोंदवण्यात आल्या आहेत. परंतु, एखाद्या निष्कर्षाप्रत येण्यासारखे काहीही सापडले नाही, असेही स्पष्टीकरण शशीकुमार यांनी दिले. दरम्यान, या ठिकाणी वाघाची हाडे सापडली असून ती हैदराबाद येथे चाचणीसाठी पाठवण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याची माहिती दिली असता ही माहिती खोटी असल्याचे ते म्हणाले. केरी येथे पट्टेरी वाघाची हत्या झाल्याचा एकमेव पुरावा म्हणजे काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेले छायाचित्र आहे. मुळात या छायाचित्राबाबत प्रा. केरकर यांच्याकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्याचेही यावेळी शशीकुमार म्हणाले.
याप्रकरणी वनखाते राजकीय दबावाखाली हे प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना, असाही सवाल उपस्थित होत आहे. मुळात या भागात वाघाचा संचार सुरू असल्याची माहिती वेळोवेळी वनखात्याला देऊनही त्यांच्याकडून कोणतीही उपाययोजना आखण्यात आली नाही, अशी तक्रारही करण्यात येत आहे. वाघांच्या अस्तित्वाबाबत खुद्द वनखात्याकडून काही वर्षांपूर्वी अहवाल तयार करण्यात आला असताना आता वाघ नसल्याचा दावा खाते करत आहे. वाघाची हत्या करणे हा वन्यसंरक्षण कायद्याअंतर्गत मोठा गुन्हा असल्याने व केरी सत्तरी येथील तथाकथित वाघाच्या हत्याप्रकरणात स्थानिकांचाच हात असल्याने त्यांना अभय देण्यासाठी हे प्रकरण मिटवण्याचे जोरदार प्रयत्न उच्च पातळीवर सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

जाळलेल्या स्थितीत त्या वाघाची हाडे व पंजा वन खात्याच्या हाती

केरी सत्तरीतील पट्टेरी वाघ हत्या प्रकरण

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी) - केरी सत्तरी येथील पट्टेरी वाघाची हत्या झाली आहे ही खरी गोष्ट आहे व त्याबाबतचे काही महत्त्वाचे पुरावे वन खात्याला मिळाले आहेत. या प्रकरणाची चौकशी योग्य दिशेने सुरू आहे व येत्या काही दिवसांत गुन्हेगारांचा शोध लागेल,असे स्पष्टीकरण या प्रकरणाची चौकशी करणारे प्रमुख तथा वन खात्याचे उपविभागीय वनाधिकारी सुभाष हेन्रीक यांनी केले आहे. वाघेरी पठाराच्या खाली केरी गावातील एका काजू वनात एका ठिकाणी जाळलेल्या जागेत वाघाच्या पायाचा पंजा व हाडे सापडली आहेत.ही जागा केरी गावातील माजीकवाड्यापासून केवळ ३ किलोमीटर अंतरावर आहे,अशीही माहिती मिळाली आहे.
दरम्यान, केरी येथील गणेश माजिक याच्या मालकीच्या काजू वनात हे अवशेष सापडले आहेत. केवळ तेवढाच भाग जळालेला आढळल्याने मृत वाघाला या ठिकाणी जाळण्यात आल्याचा संशय बळावला आहे.मुळात वाघाची हत्या करणे हा वन्य सरंक्षण कायद्याअंतर्गत मोठा गुन्हा आहेच वरून पुरावे नष्ट करणे हा त्याहुनही गंभीर गुन्हा आहे,अशी माहिती श्री.हेन्रीक यांनी दिली. याठिकाणी वाघाची कवटी व इतर महत्वाच्या अवयवांचे अवशेष सापडले नसले तरी या जागेच्या जवळच वाघाचे सात दात व रक्त सांडलेली काही पाने सापडल्याची माहिती देण्यात आली. हे सर्व अवशेष भारतीय वन्यजीव संस्था,देहराडून येथे पाठवण्यात आले आहेत व तेथील अहवालानंतरच हे अवयव वाघाचे आहेत की काय,हे स्पष्ट होणार आहे.याप्रकरणी वन खात्याकडून यापूर्वी अंकुश रामा माजीक,गोपाळ माजीक व भीवा उर्फ पिंटू गावस यांना अटक केली होती व नंतर त्यांना सोडण्यातही आले. दरम्यान, केरी गावातील अनेकांनी सध्या वन खात्यावर टीकेची झोड उठवली आहे.वाघ हत्या प्रकरणी वनाधिकाऱ्यांकडून विनाकारण सतावणूक सुरू असून काही लोकांना विनाकारण मारहाण केली जात असल्याचाही आरोप या लोकांनी केला आहे. वनाधिकाऱ्यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले असून केवळ या चौकशीत अडथळे निर्माण करण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचे खात्याकडून सांगण्यात आले..तरीही जर खरोखरच वनाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून विनाकारण मारहाण केली असेल तर त्याची चौकशी केली जाईल,असे मुख्य वनपाल डॉ.शशिकुमार यांनी सांगितले.
पर्यावरणप्रेमीची अशीही व्यथा
केरी सत्तरी येथील तथाकथीत पट्टेरी वाघ हत्या प्रकरण सध्या बरेच गारज आहे खरे; परंतु खुद्द केरी गावातच राहणारे पर्यावरणप्रेमी प्रा. राजेंद्र केरकर यांनी हे प्रकरण उघडकीस आणल्याने त्यांना मात्र खूपच मनस्ताप सहन करावा लागत असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी केरी गावातीलच काही लोक गुंतल्याचा संशय असल्याने प्रा.केरकर यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात रोष पसरला आहे.त्यांनी या प्रकरणाची वाच्यता केल्याने भर गावात सभा बोलावून त्यांना अपमानीत करण्याचा प्रकारही घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे प्रकरण मिटवण्यासाठी वन खात्यावर राजकीय दबाव टाकण्यात आल्याने त्यांनीही सुरूवातीला प्रा.केरकर यांनाच लक्ष्य बनवण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणी एकमेव पुरावा असलेले मृत वाघाचे मोबाईलवरील छायाचित्र हेच मुळी बनावट असल्याचे सिद्ध करण्याचा बराच प्रयत्न वन खात्याकडूनही झाला परंतु वाघाची हत्या हा मोठा गुन्हा असल्याने व हा प्रकार केंद्रातील वन खात्याच्या लक्षात आल्याने त्यांनी राज्य वन खात्याला फैलावर घेतल्यानेच या प्रकरणाची चौकशी नेटाने सुरू झाल्याची माहितीही मिळाली आहे. हे वाघ हत्या प्रकरण उघड केल्याबद्दल प्रा.केरकर व त्यांचे कुटुंब सध्या अत्यंत मानसिक दडपणाखाली वावरत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

१०८ ने झिडकारले, मृत्यूने कवटाळले

वास्को, दि. ३० (प्रतिनिधी)- आपत्कालीन सेवा पुरवताना अनेकांना जीवनदान देणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आज वास्को शहरात मदतीची याचना करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीला मृत्यूने कवटाळले. येथील अन्नपूर्णा हॉटेलसमोर मरणासन्न अवस्थेत पडलेल्या इसमाला काहीही होणार नसल्याचे सांगून त्याची साधी दखलही रुग्णवाहिकेसोबत आलेल्या कर्मचाऱ्यांनी न घेतल्याने ही घटना घडली, असा सूर येथून ऐकू येत आहे. जीवनदायिनी ठरलेल्या या सेवेकडून अशी वागणूक अपेक्षित नसल्याचे येथे बोलले जात आहे.
येथील अन्नपूर्णा हॉटेलसमोर असलेल्या पदपथावर एक ३५ ते ४० वर्षीय अज्ञात आजाराने फडफडत असल्याची माहिती आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास येथील नागरिकाने वास्को पोलिस तसेच १०८ च्या रुग्णवाहिकेपर्यंत पोचवली. सदर इसम एकदम आजारी असल्याचे नजरेस येऊन सुद्धा त्याला काहीच होणार नसल्याचे वक्तव्य १०८ च्या कर्मचाऱ्यांनी केले व त्याला तेथेच सोडून निघून गेल्याची माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली. मृत्यूशी झुंजणाऱ्या या इसमाने संध्याकाळी चारच्या सुमारास आपल्या प्राणाचा त्याग केला. संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्यानंतरही संध्याकाळी ७ वाजेपर्यंत वास्को पोलिसांनी याची दखल घेतली नव्हती.
दरम्यान, पोलिसांच्या पीसीआर वाहनातून १०८ रुग्णवाहिकेबरोबर सदर ठिकाणी पोचलेल्या साहाय्यक उपनिरीक्षक देविदास राणे यांनी "गोवादूत'शी बोलताना रुग्णवाहिकेने त्या आजारी इसमाकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट करताना याला पोलिस जबाबदार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. येथील एका कापड व्यापाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रुग्णवाहिका येथे वेळेवर पोचली, मात्र त्यासोबत आलेल्या कर्मचाऱ्याने त्याची तथाकथित चेष्टा करून त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. रुग्णवाहिकेचा चालक मेहबूब अंबेकरी, ईएमटी (ईमरजन्सी मेडिकल टेक्निशियन) संकल्प सावंत यांनी याविषयी सारवासारव करताना सांगितले की, एक इसम अन्नपूर्णा हॉटेलसमोरील पदपथावर आजारी असल्याची माहिती मिळताच आम्ही रुग्णवाहिकेसह तेथे दाखल झालो. यावेळी या ठिकाणी चार जण झोपले होते, त्यातील एका इसमाला उठवला असता तो ठीकठाक असल्याचे आमच्या नजरेस आले. यानंतर ज्या दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला होता तेथे पुन्हा संपर्क साधला असता तो पी.सी.ओ. फोन असल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.
१०८ वरील कर्मचाऱ्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांनी वेळीच उपाययोजना केली असती तर कदाचित त्या इसमाचे प्राण वाचू शकले असते, अशी शक्यता व्यक्त करताना संबंधित खाते याबाबत कोणती कारवाई करणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच मृत झालेल्या व्यक्तीची माहिती वास्को पोलिसांना देऊनसुद्धा दोन तास ते घटनास्थळी न पोचल्याने पोलिस खरोखरच जनतेच्या समस्यांचे निवारण करण्याच्या बाबतीत सक्षम आहेत का, असा सवालही उपस्थित होत आहे.

राज्यात उष्माघाताची शक्यता

प्रतिबंधात्मक उपायांचे आरोग्य खात्याचे आवाहन
पणजी, दि.३० (प्रतिनिधी) - हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत राज्यातील तापमान ४० अंशापर्यंत पोचून उष्माघाताची लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आरोग्य खात्याने लोकांना काही प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात उष्माघाताची लाट व त्याविरुद्ध जागृती मोहीम हाती घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आरोग्य खात्याला दिल्या आहेत. उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी लोकांनी भरपूर प्रमाणात पाणी प्यावे, हलके आणि सैल कपडे वापरावेत, उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी टोपी, गॉगल आणि छत्रीचा वापर करावा तसेच चहा, कॉफी, सोडा आणि दारू पिण्याचे टाळावे, अशा सूचना केल्या आहेत.
उष्माघाताचा त्रास झालेल्या व्यक्तीस उन्हातून सावलीत नेऊन थंड जागेत झोपायला लावून पाय सुमारे १ फूट उंचीवर ठेवावेत. त्याचे कपडे सैल करावे आणि त्याला थंडावा देण्याचा प्रयत्न करावा. थंड पाणी, स्प्रे, शॉवर, आदी माध्यमांतून थंडावा किंवा थंड पेय द्यावे, एखादा चमचा साखर व चिमूटभर मीठ टाकून पाणी पिण्यास द्यावे. स्नायुभंग झाल्यास दर पंधरा मिनिटांनी मसाज करावा असे उपाय आरोग्य खात्यातर्फे सुचवण्यात आले आहेत. या उपायांनी अशा इसमामध्ये सुधारणा न झाल्यास त्याला जवळच्या आरोग्य सुविधा केंद्रात हालवावे.

वेश्याव्यवसाय प्रकरण टोळीचा सरपंच म्होरक्या!

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी) - पेडणे येथील तथाकथित वेश्या व्यवसायात गुंतल्याप्रकरणी पेडणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या राजेश सावंत याच्याकडून अद्याप कोणतीही माहिती उघड झाली नसल्याचा दावा पेडणे पोलिसांनी केला आहे. या प्रकरणातील अन्य एक संशयित नेताजी परब हा अद्याप फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, पोलिस या प्रकरणी गप्प असले तरी आता नागरिकांनी मात्र आपले तोंड उघडण्यास सुरुवात केली आहे. झटपट पैसा कमावण्याच्या या धंद्यात या भागातील अनेक युवकांचा समावेश असून त्यात एक "सरपंच' हा या टोळीचा म्होरक्या आहे,अशी जोरदार चर्चा या भागात सुरू आहे.
पेडणे पोलिस स्थानकाचा शिपाई राजेश सावंत हा सध्या वेश्या व्यवसायात गुंतल्याप्रकरणी आपल्याच पोलिस स्थानकाच्या कोठडीत असल्याचा अजब प्रकार इथे घडला आहे. या पोलिस शिपायाला निलंबित करण्यात आले असले तरी या प्रकरणांत आणखी काही पोलिस गुंतल्याचा संशय आहे. मुळात हे सगळे प्रकार पेडणे पोलिस स्थानकाच्या कक्षेत सुरू आहेत. त्यामुळे एखाद्या निःपक्ष यंत्रणेकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जावा, अशी स्थानिकांची मागणी आहे. कारण, या प्रकरणी पेडणे पोलिसच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे राजेश सावंत याच्याकडून आपल्याच सहकाऱ्यांची नावे उघड होणे शक्यच नाही,असा दावा नागरिकांकडून केला जात आहे.
या भागातील विविध बेकायदा तथा अनैतिक व्यवहारांचे हप्ते गोळा करण्याचे कामही हीच टोळी करीत होती,अशी माहिती प्राप्त झाली आहे. हे सर्व हप्ते पेडणे पोलिसांमार्फतच गुन्हा विभाग तथा इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले जात होते. या संपूर्ण प्रकरणाचा मोठा वाटा हा गुन्हा विभागाला पाठवण्यात येत होता, अशी माहिती मिळाली आहे.
यासंदर्भातील चौकशी पेडणे पोलिसांकडे सोपवणे म्हणजे कारवाईच्या नावाने लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकणे आहे. "वेड पांघरून पेडगावला जाण्याच्या' या पोलिसांच्या कृतीबाबत इथे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या टोळीला या भागातील काही पुढाऱ्यांकडून राजाश्रय मिळाल्याने त्यांच्याकडूनही हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी दबाव येत असल्याची माहिती मिळाली आहे. फोंड्यातील महानंद प्रकरणाने गृह खात्याच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले आहे. तरीही त्यापासून घेतला जात नाही, अशी खंत व्यक्त करून गृहमंत्री रवी नाईक यांनी याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश द्यावेत व ही चौकशी पेडणे पोलिसांकडून काढून घेऊन ती स्वतंत्र तपास पथकामार्फत करावी,अशी मागणीही करण्यात आली आहे.

आणखी किती खुनांची कबुली?

फोंडा, दि.३१ (प्रतिनिधी) - सीरियल किलर महानंद नाईक याने आत्तापर्यत सोळा खुनांची माहिती दिली असून आणखी किती खुनांची वाच्यता करीत याचा अंदाज करणे कठीण बनले आहे.
महानंदची गेल्या रविवार २४ मे ०९ पासून कसून चौकशी सुरू करण्यात आली. त्याने पोलिस अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी सुरुवातीला खोटी माहिती दिली. खून करून युवतीचे मृतदेह पाण्यात टाकले असे सांगितले होते. यासंबंधी पोलिसांनी विविध पोलिस स्टेशनवर चौकशी केली असता महानंद पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचे आढळून आले. जबानीत दिलेली माहिती खोटी असल्याचे तपासात उघड झाल्याने महानंदने अखेर खरी माहिती देऊन युवतीचे खून केलेल्या काही खऱ्या जागा दाखविल्या. त्यात अंजनी गावकर हिचा खून करण्यात आलेल्या राय येथून मानवी हाडे हस्तगत करण्यात आली. त्यानंतर बांबोळी येथे सुशीला फातर्पेकर हिचा खून केलेल्या जागेतून मानवी हाडे हस्तगत करण्यात आली. त्यानंतर दीपाली जोतकर (मडगाव), भागी सतरकर (केरी फोंडा), भागू उपसकर (सातपाल साकोर्डा), निर्मला आमोलकर (रिवण), शकुंतला कवठणकर (हातुर्ली) , गुलाबी गावकर (दाभाळ) यांच्या खुनांची कबुली दिली आहे.
महानंदने आतापर्यंत केलेले सर्व खून अत्यंत क्रूरपणे केलेले आहेत. खून करण्यात आलेल्या युवतींची ओळख पटू नये म्हणून त्यांच्या अंगावर कपडे ठेवत नव्हता. शकुंतलाचे नाव पोलिसांना मिळालेल्या यादीत नव्हते. हे नाव महानंदने सांगितले आहे. ती बेपत्ता असल्याच्या प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केलेली नव्हती, असे आढळून आले आहे. घरातून पैसे, दागिने घेऊन पळून गेलेल्या अन्य काही युवतींबाबत त्यांच्या पालकांनी पुढे येऊन तक्रार केल्यास महानंदने आणखी किती जणांचा खून केले हे स्पष्ट होऊ शकते. केवळ लोक लज्जेमुळे अनेक जण तक्रारी करण्यास पुढे येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. तक्रार केल्यानंतर तिचा पाठपुरावा आदी गोष्टी शक्य नसल्याने काहींनी यापूर्वीच तक्रारी केल्या नाहीत. काही बेपत्ता युवतीबाबत लोकांत चर्चा सुरू असते. मात्र, तक्रार नसल्याने कुणीही काहीच करू शकत नाही.
महानंद याने आत्तापर्यंत कबुली दिलेली खुनांची यादी -
१ - योगिता नाईक (नागझर कुर्टी) - मोर्ले सत्तरी - जानेवारी २००९ ,
२- दर्शना नाईक (तरवळे शिरोडा) - बांबोळी - सन १९९४,
३- वासंती गावडे (मडकई) - बेतोडा - सप्टेंबर १९९५,
४- केसर नाईक (पंचवाडी) - सांगे - जून २००७,
५- नयन गावकर (पंचवाडी) - केपे - मार्च २००८,
६ - सुनीता गावकर (बेतोडा) - आमोणा - मार्च २००३,
७ - अंजनी गावकर (निरंकाल) - राय - ऑगस्ट २००५,
८ - निर्मला घाडी ( बेतकी ) - बोरी - मे २००७,
९ - सूरत गावकर (पंचवाडी) - केपे - मार्च २००६,
१० - सुशीला फातर्पेकर ( कुडका) - बांबोळी - ऑक्टोबर २००७,
११ - दीपाली जोतकर (दवर्ली मडगाव) - फातर्पे कुंकळी २००७,
१२ - भागी सतरकर ( केरी फोंडा) - बोरी - २००५,
१३ - भागू उपसकर ( सातपाल साकोर्डा) - केपे २००७,
१४ - निर्मला आमोलकर ( रिवण) - वेर्णा - फेब्रुवारी २००८,
१५ - शकुंतला कवठणकर ( हातुर्ली) - कुंकळ्ये म्हार्दोळ - डिसेंबर २००५,
१६ - गुलाबी गावकर ( दाभाळ) - केरये खांडेपार - जुलै १९९४.

Thursday, 30 April 2009

संधिसाधूंना प्रवेशास मगोत वाढता विरोध

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप यांना मगो पक्षात फेरप्रवेश देण्यासंबंधी सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे पक्षात एकच खळबळ उडाली आहे. पक्षातील एक गट ऍड. खलप यांच्या फेरप्रवेशास अनुकूल आहे तर दुसरा गट मात्र या प्रस्तावास तीव्र विरोध करत आहे. मगोच्या "सिंहा'चा वापर केवळ आपले राजकीय हित साधण्यासाठी केलेल्या आणि पक्षाचा विश्वासघात करून अन्य पक्षात उडी घेतलेल्यांना अजिबात थारा देता कामा नये, अशी भूमिका या गटाने घेतली आहे. नव्या दमाच्या युवकांनी पक्षात खुशाल प्रवेश करावा व राजकारणात सक्रिय बनून पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यावे, अशी प्रतिक्रिया या गटातील नेत्यांनी व्यक्त केली आहे. या गटाला ढवळीकर बंधूंचाही पूर्ण पाठिंबा असल्याची माहिती मिळाली आहे.
माजी केंद्रीय कायदामंत्री तथा एकेकाळचे मगोचे सर्वेसर्वा ऍड. रमाकांत खलप यांना पुन्हा एकदा मगो पक्षात आणून पक्षाच्या संघटनेची फेररचना करण्याचा प्रयत्न एका गटाने चालवला आहे. ऍड. खलप यांची कॉंग्रेस पक्षात फरफट सुरू आहे, त्यांना संघटनात्मक पातळीवर कोणतेही स्थान देण्यात आले नाही. यावेळी उत्तर गोव्याची उमेदवारी त्यांना मिळू नये यासाठीही कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न केले होते, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, मगो पक्षातून कॉंग्रेसमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्वच धोक्यात आल्याने आता पुन्हा एकदा मगोच्या नावाने आपली गमावलेली पत मिळवण्यासाठी काही नेत्यांनी ही शक्कल लढवली आहे. पक्षातील काही कार्यकर्त्यांना पुढे करून या नेत्यांना परत पक्षात बोलावण्याचे नाटक करून वातावरण निर्मिती करण्याचे काम सुरू असल्याची माहिती एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.
कॉंग्रेसकडून मगो 'हायजॅक' करण्याचा प्रयत्न
भाजपची राज्यात वाढती ताकद रोखायची असेल तर मगो पक्षाला संजीवनी देण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षातील काही नेत्यांकडून आपल्या सूत्रांच्या साहाय्याने मगो पक्षातील जुन्या नेत्यांच्या फेरप्रवेशाचे नाट्य रचत असल्याची माहिती देण्यात आली. मगो व भाजप हा काही प्रमाणात समविचारी पक्ष असल्याने हे दोन्ही पक्ष कोणत्याही परिस्थितीत एकत्र येता कामा नये, यासाठी कॉंग्रेसचे हे नेते सक्रिय बनले आहेत. दरम्यान, पक्षाच्या केंद्रीय समितीवरील काही पदाधिकारी हे कॉंग्रेसचे "दलाल' असल्याची प्रतिक्रियाही एका नेत्याने व्यक्त केली. या लोकांकडून पक्षाची इत्थंभूत माहिती सत्ताधाऱ्यांकडे पोचवली जाते, असेही यावेळी सांगण्यात आले. या पदाधिकाऱ्यांना येत्या काही दिवसांत लक्ष्य बनवण्याची तयारीही सुरू झाली आहे. दरम्यान, कॉंग्रेस पक्षातील जुन्या नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन ढवळीकर बंधूंचे पक्षावरील वर्चस्व संपुष्टात आणण्याचा घाट काही नेत्यांनी घातला असल्याने ढवळीकर बंधूंचा गटही मोठ्या प्रमाणात सतर्क बनल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
युवकांना प्राधान्य ः सुदिन ढवळीकर
मगो पक्षातून केवळ आपल्या स्वार्थासाठी उडी घेऊन आपले राजकीय हित साधलेल्या नेत्यांमुळे हा पक्ष पूर्णपणे मोडकळीस आला होता. परंतु, प्रामाणिक कार्यकर्त्यांनी स्वबळावर या पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले. माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर व पांडुरंग राऊत यांच्यासारख्या नेत्यांनी पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यात महत्त्वाचे योगदान दिले. आता या पक्षाची धुरा नव्या दमाच्या नेतृत्वाकडे जाण्याची गरज असताना पुन्हा एकदा जुन्या नेत्यांना पक्षात आणून काय साधणार, असा सवाल वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला. पक्षाचा विस्तार व या पक्षाला पुन्हा नव्याने गतवैभव मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता नवे नेतृत्व तयार करण्याची व त्यांना पाठिंबा देण्याची गरज असून त्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही ढवळीकर यांनी यावेळी केले.
मी अद्याप कॉंग्रेसचाच : ऍड.खलप
मगो पक्षात आपले असंख्य चाहते व हितचिंतक आहेत व या पक्षाबद्दल अद्यापही आपल्या मनात आत्मीयता आहे. सध्याच्या परिस्थितीत आपण कॉंग्रेस पक्षात आहे व मगो पक्षात फेरप्रवेश करण्याबाबत आपण काहीच निर्णय घेतला नाही, अशी प्रतिक्रिया ऍड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केली. विद्यमान सरकारने आपल्याला कायदा आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. मगो पक्षाने सुरुवातीच्या काळात अनेक लोकोपयोगी कायदे तयार केले होते व त्याची माहितीही कोणाला नाही. या कायद्यांना कार्यन्वित करून त्याचा लाभ सर्वसामान्य लोकांना करून देण्याचे कार्य आपल्याला या संधीमुळे मिळणार असल्याने या पक्षाबाबतची भावना आपण याद्वारे पूर्ण करणार, असेही त्यांनी सांगितले. कॉंग्रेस पक्षात प्रवेश करताना आपले असंख्य कार्यकर्ते व हितचिंतकही या पक्षात आले पण त्यांची दखल मात्र घेतली नसल्याने ते नाराज बनले आहेत. पक्षाने यावेळी आपल्याला उमेदवारी नाकारली तरी विधानसभा व लोकसभेची उमेदवारी यापूर्वी दिली. त्यामुळे आपल्यावर पक्षाने अन्याय केला, यात तथ्य नाही. सध्याचे राजकारण हे पैशांच्या भोवती केंद्रित झाल्याने राजकीय नेते स्वत्व हरवत चालले आहेत. आता युवकांनी पुढे येऊन ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. युवकांनी राजकारणाच्या शुद्धीकरणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यास त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्यास तयार आहे, असेही ते शेवटी म्हणाले.

लईराईचा जत्रोत्सव सुरू


शिरगाव येथील जत्रोत्सवानिमित्त श्री देवी लईराईच्या दर्शनासाठी जाणारे भक्तगण. (छाया : दुर्गादास गर्दे)

डिचोली, दि. २९ (प्रतिनिधी): गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री लईराई देवीचा पाच दिवसीय जत्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरू झाला आहे. गोव्यातील तसेच शेजारच्या राज्यांमधील भक्तांचे आज सकाळपासूनच शिरगाव येथे आगमन सुरू झाले. देवीच्या दर्शनासाठी आज सकाळपासूनच मंदिरापुढे भक्तांची रांग लागली होती. येथील पवित्र तळीत स्नान उरकून व्रतस्थ धोंडांनी देवीचे दर्शन घेतले. "लईराई माता की जय' अशा घोषणा देत व्रतस्थ धोंड हातात सजवलेली वेताची काठी घेऊन येथे मांडण्यात आलेल्या होमकुंडाला मोठ्या श्रद्धेने प्रदक्षिणा घालत होते.
आज रात्री मध्यरात्रीनंतर हे व्रतस्थ घोंड अग्निदिव्यातून (होमकण) जाणार आहेत. रविवार दि. ३ मे पर्यंत भक्तांना कौल देणे सुरूच राहणार आहे.
जत्रेच्या निमित्ताने मोठी फेरी भरली असून अस्नोड्याहून शिरगावपर्यंत जाता यावे यासाठी वाहतूक, सुरक्षा आदी चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

वनाधिकाऱ्यांच्या संगनमताने ६ कोटी चौ.मी. जागा हडप

पर्रीकरांचा आरोप
पणजी, दि.२९ (प्रतिनिधी): राज्यातील वनखात्याची जमीन महसूल अधिकारी तथा मामलेदार व जिल्हाधिकाऱ्यांच्या साहाय्याने आपल्या नावावर करण्याचे प्रकार वाढत आहेत. गेल्या वीस वर्षांत सुमारे ६ कोटी चौरसमीटर जागेवर वनखात्याला पाणी सोडावे लागले आहे. या प्रकरणात काही राजकीय नेत्यांचे असलेले साटेलोटे शोधून काढल्यास या भानगडींचा उलगडा होईल, असा दावा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला आहे.
सांगे नेत्रावळी येथील सर्व्हे क्रमांक ३०/१ अंतर्गत येणाऱ्या सुमारे ६० लाख चौरसमीटर जागेवर लक्ष्मण पुर्सो गावकर व इतरांनी केलेला दावा आणि मामलेदारांनी त्यांच्या बाजूने दिलेला निकाल याबाबत वनखात्याकडून मुख्य सचिवांना पत्र पाठवण्यात आले आहे. सरकारने वेळीच हस्तक्षेप करून वनखात्याच्या जमिनीचा मालकी हक्क बेकायदा वैयक्तिकरीत्या आपल्या नावावर करण्याचे प्रकार रोखावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. वनक्षेत्रात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात बेकायदा खाण व्यवसाय सुरू झाला आहे व खाणमंत्री या नात्याने मुख्यमंत्री दिगंबर कामत या लोकांना अभय देत असल्याची टीकाही श्री. पर्रीकर यांनी केली. अशा वादग्रस्त निकालांबाबत मामलेदार व जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीची सखोल चौकशी करावी व ते दोषी आढळल्यास त्यांनी दिलेले वादग्रस्त निकाल अवैध ठरवावे, असेही पर्रीकर म्हणाले. अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी वन खात्याने विशेष पथकाची नेमणूक करावी व गेल्या वीस वर्षांतील झालेल्या प्रकारांचा अभ्यास करावा, असेही ते म्हणाले.
सांगे नेत्रावळी येथे वनखात्याच्या मालकीची सर्व्हे क्रमांक ३०/१ अंतर्गत सुमारे ६०० एकर जमीन आहे. ही जागा घनदाट जंगलाने व्यापली आहे. या जागेवर आके मडगाव येथील लक्ष्मण पुर्सो गावकर व इतरांनी आपला दावा करताना भू महसूल कायद्याअंतर्गत प्रशासकीय लवादाकडे याबाबत दाद मागितली होती. मुळात ही जागा वनखात्याच्या मालकीची असतानाही खात्याला विश्वासात न घेता लवादाने आपला निकाल याचिकादाराच्या बाजूने दिला. नाकेरी येथील सर्व्हे क्रमांक २२/०,२६/० व२५/० याबाबतही असाच प्रकार घडला असून याची माहितीही मुख्य सचिवांना देण्यात आली आहे. मुळात हे प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित असताना सांगे मामलेदारांनी या जागेचे मालकी हक्क संबंधितांच्या नावे करण्याची घाई का केली, असा सवाल उपस्थित होतो व त्यामुळे संशयाचे वातावरण पसरले आहे. भटपाळ काणकोण येथील जागेवर स्थानिक कोमुनिदाद संस्थेने अतिक्रमण केल्याची तक्रार वनखात्याने जानेवारी २००९ रोजी केली आहे. तर, नाकेरी येथील वनखात्याच्या अखत्यारीत असलेली जागाही हातातून जाण्याचा धोका असल्याचे पत्र २६ फेब्रुवारी २००९ रोजी सरकारला पाठवले आहे. सरकारकडून मात्र अद्याप वनखात्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने या प्रकरणाकडे अजिबात गांभीर्याने पाहिले जात नसल्याची वनखात्यातील अधिकाऱ्यांची भावना बनली आहे.

'कसाबला तंदुरी, मला दुधीची भाजी'

वरुणची सरकारवर टीका
मेरठ, दि. २९ : मुंबई हल्ल्यातील आरोपी मोहम्मद अजमल आमीर कसाब याने आज चक्क अत्तर आणि टूथपेस्टची मागणी केली असतानाच भाजपचे नेते वरुण गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडीत, अतिरेक्याला या सरकारच्या राज्यात तंदुरी चिकन मिळतेय, पण माझ्यासारख्या कैद्याला मात्र कारागृहात दुधी भोपळ्याची भाजी दिली जाते, असे म्हटले आहे.
मेरठ येथे एका जाहीर सभेत २९ वर्षीय वरुण गांधी म्हणाले की, आपल्या देशातील विरोधाभास जगावेगळाच म्हणावा लागेल. येथे रासुकाअंतर्गत कारागृहात असणाऱ्या वरुण गांधीला दुधी भोपळ्याची भाजी दिली जाते. याउलट, मुंबईवर अतिरेकी हल्ला करून असंख्य लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या कसाबसारख्या अतिरेक्याला तंदुरी चिकन जेवणात वाढले जाते. अर्थात, मी शाकाहारी असल्याने मला दुधी आवडते, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
मी मुस्लिमांच्या विरोधात बोललो असा आरोप ठेवून मला रासुका लावण्यात आला आणि २६ नोव्हेंबरचा भीषण हल्ला घडविणाऱ्या आरोपीवर साध्या भारतीय दंड विधानाची कलमे लावण्यात आली. यातूनच सरकारचा उद्देश स्पष्ट दिसतो. त्यांनी केवळ मला लक्ष्य बनवून ही कारवाई केली आहे. मी कॉंग्रेसविषयी थेट काहीही बोलणार नाही. कारण आता त्यांचे दिवस भरले आहेत. जे लोक मरणासन्न स्थितीत अखेरच्या घटका मोजत असतात त्यांच्याविषयी काहीही वाईट बोलू नये, असे मला माझ्या आईने सांगितले आहे. अशा कॉंग्रेसला मत देणे म्हणजे आपले मौल्यवान मत एखाद्या खड्ड्यात टाकण्यासारखे आहे, असेही वरुण गांधी म्हणाले.
मायावतींचा हत्ती
मायावती सरकारवर टीका करताना वरुणने म्हटले की, मी काल लखनौत गेलो होतो. तेथे इरिगेशन कॉलनीत कांशीराम मेमोरियल उभारले जात आहे. त्यासाठी सुमारे ३२ हजार कोटी रुपये इतका खर्च येणार असल्याचे समजते. इतकी रक्कम आज देशातील सुमारे पाच लाख युवकांना रोजगार देण्यासाठी कामी पडू शकते. सरकारी पैशाचा असा दुरुपयोग करणे मायावतींना शोभत नाही. आता त्या लोकसभेत जाऊन पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत आहेत. पण, हत्तीसाठी लोकसभेचे दार फारच लहान आहे. तेथे तो शिरू शकणार नाही, असे म्हणत वरुण गांधी यांनी आपण हे विधान मायावती नव्हे तर बसपाचे निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तीसाठी वापरल्याची स्पष्टोक्ती देऊन उपस्थितांमध्ये हास्याची कारंजी उडविली.

शिवोली येथे सापडला अज्ञात तरुणीचा सापळा

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) : आसगाव शिवोली येथील डोंगरावर एका अद्यात तरुणीचा सापळा पोलिसांना आढळून आला असून तो वैद्यकीय चाचणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठवून देण्यात आला आहे.
या सापळ्याची उंची १४० ते १४४ सेंमी असून त्याच्या बाजूला काही हाडे व केस तसेच काही अवयव आढळून आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे महिलेचे एक सॅंडल, गुलाबी रंगाच्या चुडीदाराचा टॉप व पॅंट, विविध रंगाच्या बांगड्या, "एवा' कंपनीचे एक मनगटी घड्याळ व केसांना घालण्याचे चंदेरी रंगाचे "हेअरक्लिप' सापडल्याची माहिती हणजूण पोलिसांनी दिली आहे. सदर तरुणीचा मृत्यू एका महिन्यापूर्वी झाला असून तिचे २८ ते ३० च्या आसपास असण्याची शक्यता वैद्यकीय अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
याविषयाची अधिक तपास हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक रमेश गावकर करत असून कोणालाही यासंदर्भात माहिती असल्यास त्याने हणजूण पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

बलात्कारप्रकरणी रोहितवर आरोप निश्चितीचे आदेश

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) : अल्पवयीन जर्मन मुलीवर बलात्कार प्रकरणात गुंतलेल्या रोहित मोन्सेरात याच्याविरोधात आज बाल न्यायालयाने आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि अश्लील "एसएमएस' पाठवल्याचे त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप आज निश्चित करण्यात आले.
शारीरिक संबंध आल्याचा वैद्यकीय अहवाल आणि साक्षीदारांची जबानी रोहितवर आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे असल्याचा जोरदार युक्तिवाद यावेळी सरकारी वकिलांनी केला. तर, रोहित याच्या विरोधात कोणतेही पुरावे नसल्याचा दावा करून हे आरोप फेटाळून लावण्याचा प्रतिवाद रोहित याच्या वकिलाने न्यायालयात केला.
गेल्या दोन महिन्यापूर्वी रोहितच्या विरोधात कळंगुट पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. त्यापूर्वी रोहित याला या प्रकरणात काही रात्री तुरुंगात घालवाव्या लागल्या होत्या. सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयाने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन कळंगुट पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आरोपपत्र दाखल झाले होते.

Wednesday, 29 April 2009

स्वाइन फ्लू रोखण्यास सरकारी यंत्रणा सज्ज, प्रामुख्याने विदेशी पर्यटकांवर नजर

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) : मेक्सिको,अमेरिका,न्यूझीलंड,फ्रान्स,कॅनडा आणि ब्रिटन आदी देशांत सध्या वराह ज्वराचे ("स्वाइन फ्लू') थैमान माजले असून तेथून पर्यटक मोठ्या प्रमाणावर गोव्यात येत असल्याने राज्य सरकारने या रोगाची साथ गोव्यामध्ये पसरू नये यासाठी आपली यंत्रणा पूर्ण सज्ज ठेवली आहे.
सार्स आणि बर्ड फ्लूनंतर आता 'स्वाइन फ्लू' या डुकरांपासून होणाऱ्या जीवघेण्या रोगाची साथ जगभर पसरण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या साथीच्या प्रादुर्भावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. येत्या मंगळवारपर्यंत आढावा घेतल्यानंतर संबंधित देशांत "महामारी' घोषित करण्याची तयारी ठेवण्यात आल्याने या रोगाची व्याप्ती मोठी बनली आहे.
दरम्यान,गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असल्याने येथे लाखो विदेशी पर्यटक भेट देतात. परिणामी जागतिक आरोग्य संघटनेकडून गोव्याचा समावेश संभाव्य ठिकाण म्हणून करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी सरकारला अत्यंत सावध राहण्याचा सल्ला संघटनेतर्फे देण्यात आला आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून ही साथ गोव्यात पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे आदेश दिले आहेत. लोकांनी या साथीची धास्ती बाळगण्याचे कारण नाही, अशी सूचना मुख्यमंत्री कामत यांनी केली आहे.
दरम्यान,या विषयातील तज्ज्ञ डॉ.राजेंद्र तांबा यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व आरोग्य केंद्रांतील अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. विदेशी पर्यटकांच्या घशात कापसाचा बोळा घालून त्याचे "सॅपल्स'चाचणीसाठी पाठवण्याची तयारीही करण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ब्रिटन,अमेरिका,कॅनडा आणि न्यूझीलंड या देशांतील पर्यटकांची आरोग्य तपासणी विमानतळावरच करण्याची सूचना केली आहे. या आदेशानुसार दाबोळी विमानतळावर आरोग्य अधिकाऱ्यांच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या असून त्यांच्याकडून या पर्यटकांच्या घशाचे "सॅंपल्स'काढण्यात येत आहेत.गेल्या दहा दिवसांत ब्रिटनमधून सुमारे पाचशे पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. या पर्यटकांचा शोध घेऊन त्यांना जवळच्या आरोग्य केंद्राद्वारे चाचणी करून घेण्याची सूचना करण्यात येईल, असेही डॉ.तांबा म्हणाले. गोव्यात फक्त ब्रिटनमधून यंदा सुमारे २०,२८३ पर्यटक आले आहेत. त्यात आता गेल्या दहा दिवसांत ५०० अतिरिक्त पर्यटकांची भर पडली आहे. पर्यटन खात्याकडून उपलब्ध माहितीनुसार गेल्या १८ एप्रिल रोजी मोनार्क चार्टर विमानातून ८० पर्यटक ब्रिटनमधून आले. नंतर १९ रोजी एकूण पाच चार्टर विमाने दाखल झाली असून त्यातून ३२७ पर्यटक गोव्यात दाखल झाले.२० एप्रिल रोजी थॉमस कूक या चार्टरमधून आणखी ५० पर्यटक आले आहेत. त्यानंतरच्या पर्यटकांची माहिती अद्याप खात्याकडे पोहचली नसल्याचे सांगण्यात आले. हे सगळे पर्यटक राज्यातील विविध किनारी भागांत पसरले असून त्यांचा शोध घेऊन त्यांची आरोग्य चाचणी करण्याचे आव्हान आरोग्य खात्यासमोर आहे.
दरम्यान,आरोग्य खात्याच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या साथीचा प्रादुर्भाव डुकरांच्या संपर्कात आल्यास होऊ शकतो. वराहज्वर हा श्वसन नलिकेला होणारा रोग आहे व तो प्रामुख्याने डुकरांना होतो. हा रोग माणसाच्या खोकल्यातून,शिंकण्याने,रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या जागेला स्पर्श होऊन तो हात तोंडाला, नाकाला किंवा डोळ्याला लागल्याने इतरांना होऊ शकतो. या रोगाची लक्षणे ताप येणे,आळस वाटणे,भूक व लागणे,खोकला येणे,नाक वाहणे,घसा सुकणे,मळमळणे,उलटी येणे आणि जुलाब होणे आदी आहेत.
गृहमंत्री रवी नाईक व मुख्य सचिव हौजेल हौखुम यांनी आरोग्य आणि पशुचिकित्सा खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर या साथीबाबत चर्चा केली. हे प्रतिबंधात्मक उपाययोजना उद्या २९ पासून राबविण्यात येणार आहेत.
विशेष पथकाची स्थापना
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या साथीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय,आरोग्य खाते,पशुचिकित्सा व संवर्धन खाते आणि पर्यटन खाते यांच्या प्रमुखांची एक विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या पथकावर या संपूर्ण कामाची जबाबदारी असेल. घशात कापसाचा बोळा घालून त्याचे सॅंपल घेऊन ते पुणे येथे संशोधन प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. दरम्यान,चिखली येथील इस्पितळात यासाठी स्वतंत्र वॉर्डची सोय करण्यात आली असून गरज भासल्यास तेथे उपचार करण्यात येतील व चाचणीनंतर आवश्यक औषधे देण्याची तयारीही ठेवण्यात आली आहे.
विदेशात कहर
या रोगाचा सर्वांत जास्त प्रादुर्भाव मेक्सिकोमध्ये झालेला असून रविवारपर्यंत १०३ जण दगावले असून ४०० जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आहे. आणखी १,६०० लोकांना बाधा झाली असावी, अशी भीती मेक्सिको सरकारने व्यक्त आहे.
अमेरिका खंडातील कॅनडा आणि अमेरिकेतही स्वाइन फ्लूने प्रवेश केला असून कॅनडात सहा तर अमेरिकेत २० जणांना प्रादुर्भाव झाल्याचे त्यांच्या सरकारांनी स्पष्ट केले आहे. त्यांपैकी कॅनडातील दोघांना मेक्सिकोत गेल्यानंतर स्वाइन फ्लूची लागण झाली असून ते १६ ते १८ वर्षीय तरुण आहेत. याशिवाय न्यूझीलंड, हॉंगकॉंग, स्पेन या देशांतही स्वाइन फ्लूूची बाध झाल्याचे वृत्त आहे.
हा रोग अत्यंत घातक असल्याने जपान, चीन, रशिया, इंडोनेशिया, थायलंड तसेच संयुक्त अरब आमीराती या देशांनी स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. जपानने तातडीने फ्लूविरोधी लसनिमिर्ती सुरू केली असून विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या लोकांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक तैनात केले आहे. चीनने मेक्सिकोतून येणाऱ्या डुकरच्या मटणावर बंदी घातली आहे. मेक्सिकोतील गंभीर परिस्थिती पाहून स्वाइन फ्लू रोखण्यासाठी आरोग्यसुविधा उभारण्यासाठी जागतिक बॅंकेने तातडीने २० कोटी डॉलर्सचे कर्ज देऊ केले आहे.

'मोस्ट वॉन्टेड'च्या यादीतून सीबीआयने क्वात्रोचीला वगळले

इंटरपोलनेही 'रेडकॉर्नर' नोटीस रद्द केली
सीबीआयच्या कार्याची ताबडतोब चौकशी करा : विरोधकांची मागणी

नवी दिल्ली, दि. २८ : बोफोर्स घोटाळ्यातील प्रमुख आरोपी ओट्टाव्हिओ क्वात्रोची याला सीबीआयने "मोस्ट वॉन्टेड'च्या यादीतून वगळत त्याला "क्लीन चिट' दिली आहे. सीबीआयच्या या निर्णयापाठोपाठ इंटरपोलनेही क्वात्रोचीविरुध्दची "रेडकॉर्नर' नोटीस रद्द केली आहे.
सीबीआयच्या या निर्णयाने कॉंगे्रसविरोधी पक्ष संतप्त झाले असून, कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकारचा कार्यकाळ संपण्यासाठी शेवटचे तीन आठवडे बाकी असताना असा निर्णय घेतला गेला म्हणून संपुआच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील सीबीआयच्या कामाची ताबडतोब चौकशी केली जावी, अशी मागणीही विरोधी पक्षांनी केली आहे.
क्वात्रोची हा इटलीतील एक प्रमुख व्यावसायिक असून, बोफोर्स तोफ खरेदी घोटाळ्यातील तो एक प्रमुख आरोपी आहे. सीबीआयच्या मोस्ट वॉन्टेड यादीत क्वात्रोचीचे नाव होते. त्याला पकडण्यासाठी इंटरपोलनेही "रेडकॉर्नर' नोटीस जारी केलेली होती. परंतु, सीबीआय व इंटरपोल यांच्यात झालेल्या संदेशाच्या आदानप्रदानानंतर गेल्या दशकाहून जास्त काळापासून जारी असलेली ही रेडकॉर्नर नोटीसही आता मागे घेण्यात आली आहे.
यासंदर्भात बोलताना सीबीआयचे प्रवक्ते हर्ष बहल यांनी सांगितले की, १९९९ पासून हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. उच्चपदस्थ व्यक्तींनी दिलेल्या कायदेशीर आदेशाच्या आधारावर सीबीआयने उपरोक्त निर्णय घेतला आहे. येत्या ३० एप्रिल रोजी आम्ही याबाबतची माहिती संबंधित सक्षम न्यायालयाला देणार आहोत. अटर्नी जनरल मिलन बॅनर्जी यांच्या कायदेशीर सल्लानंतरच सीबीआयने ही कारवाई केली आहे, असे ते पुढे म्हणाले.
१९८६ साली स्वीडनच्या बोफोर्स तोफा विकत घेण्याच्या सौद्यात क्वात्रोचीने दलाली घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे. हा घोेटाळा उघड झाल्यानंतर त्यावेळी देशातील संपूर्ण राजकारण ढवळून निघाले होते. याच मुद्यावर राजीव गांधी याचे सरकार गडगडले होते. कॉंगे्रसच्या अनेक नेत्यांची नावे यात गोवली गेली होती.
केंद्रातील कॉंगे्रस पक्षाच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकारच्या सत्तेचे आता अवघे काही आठवडे उरले आहेत. मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सुरू असलेल्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असला, तरी चौथ्या व पाचव्या टप्प्याचा प्रचार आता वेग घेणार आहे. त्यामुळे बोफोर्सचे भूत पुन्हा एकदा कॉंगे्रसच्या मानगुटीवर बसणार हे निश्चित.
सीबीआयच्या कारवाईला सुप्रीम कोर्टात आव्हान
बोफोर्स दलाली प्रकरणातील इटालियन व्यापारी क्वात्रोची याचे नाव मोस्ट वॉन्टेडच्या यादीतून वगळण्याच्या सीबीआयच्या निर्णयाला आज एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
सीबीआयच्या या निर्णयापाठोपाठ ऍडव्होकेट अजय अग्रवाल यांनी ही याचिका ताबडतोब न्यायालयात सादर करत सीबीआयच्या या कारवाईला स्थगनादेश देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. याआधीही ऍड. अग्रवाल यांनी जानेवारी २००६ मध्ये सीबीआयच्या एका निर्णयाला याचिकेद्वारा आव्हान दिले होते. लंडनच्या बॅंकेत असलेली क्वात्रोचीची खाती मुक्त करण्यात यावी, असे सीबीआयने त्यावेळी म्हटले होते.
सीबीआयची विश्वसनीयता संशयाच्या भोवऱ्यात : नितीश कुमार
पाटणा : बोफोर्स प्रकरणात अडकलेले इटालियन उद्योगपती क्वात्रोची यांना क्लीन चिट दिल्याने सीबीआयची विश्वसनीयताच संशयाच्या भोवऱ्यात अडकल्याची प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे नेते नितीश कुमार यांनी व्यक्त केली आहे.
आज पत्रकारांशी बोलताना नितीश कुमार म्हणाले की, ६४ कोटींच्या बोफोर्स घोटाळा प्रकरणी क्वात्रोची यांचे नाव संशयितांच्या यादीतून काढून टाकणे हा प्रकार सीबीआयसारख्या एजन्सीला शोभणारा नाही. सध्या केंद्रात असणारे सरकार सीबीआयचा स्वत:च्या सोयीसाठी वापर करीत आहे. क्वात्रोची यांचे नाव सीबीआयने हटविल्याने देशातील या सर्वात मोठ्या चौकशी संस्थेची विश्वसनीयताच धोक्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणी सीबीआयची एकूणच चौकशीची प्रक्रिया संशयास्पद वाटत होती. त्यांनी कोणत्याही विशेष हालचाली केल्याचे दिसत नव्हते. आता तर त्यांनी क्वात्रोचींचे नाव हटविल्याने केंद्र सरकारचा सीबीआयवर किती प्रभाव आहे, हे सिद्धच झाले असल्याचे नितीश कुमार म्हणाले.
सीबीआयच्या दुरुपयोगाचा हा नवा अध्याय
नवी दिल्ली : सीबीआयचा दुरुपयोग आणि खटले दाबण्याचा कॉंग्रेसचा हा नवा अध्याय क्वात्रोची प्रकरणाने समोर आला आहे, अशा शब्दात डाव्या पक्षांनी कॉंग्रेस आघाडीच्या संपुआ सरकारवर टीका केली आहे.
बोफोर्स प्रकरण इतके गाजल्यानंतर यात पुन्हा संशयिताचे नाव खटल्यातून गाळून टाकणे, हा प्रकार सीबीआयच्या दुरुपयोगाचा नवा साक्षात्कार आहे. या लाच प्रकरणातील गुंता सोडविण्यात सरकार अपयशी ठरल्याचा हा पुरावा आहेच. सोबतच कॉंग्रेसने प्रक़रणे दाबण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे, अशा शब्दात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्युरोने आपल्या पत्रकात टीका केली आहे.
भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे सचिव डी.राजा म्हणाले की, हे प्रकरण आता कॉंग्रेसच्या अंगलट येणार आहे. अतिशय वादग्रस्त ठरलेल्या या प्रकरणी आता कॉंग्रेस आघाडीच्या संपुआ सरकारने योग्य ते उत्तर द्यायचे आहे. यापूर्वीही अनेक घटनांनी सीबीआयच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तसाच प्रकार आता पुन्हा उघडकीस आला आहे. याचे उत्तर सीबीआय आणि केंद्र सरकार दोघांनीही द्यायचे आहे. सीबीआयच्या दुरुपयोगाचा हा नवाच अध्याय असून कॉंग्रेसने आपल्या राजकीय स्वार्थासाठी सीबीआयचा कसा वापर करून घेतला, याचे हे आणखी एक उदाहरण ठरले आहे.
क्वात्रोची प्रकरणी केंद्राचा हात नाही
नवी दिल्ली : इटालियन उद्योगपती क्वात्रोची यांचे नाव रेड कॉर्नरच्या यादीतून काढून टाकण्यात केंद्र सरकारचा हात नाही, असे केंद्रीय कायदा मंत्री हंसराज भारद्वाज यांनी आज स्पष्ट केले आहे.
क्वात्रोची प्रकरणी सरकार आणि सीबीआयवर टीका होत असताना भारद्वाज यांनी सरकारची बाजू मांडली. ते म्हणाले की, आमच्यावर होत असलेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत. मुळात, कोणत्याही न्यायप्रविष्ट प्रकरणात आजवर सरकारने हस्तक्षेप केलेला नाही. बोफोर्स प्रक़रणही न्यायालयाच्या अखत्यारीतील आहे. त्यामुळे त्याविषयी सरकारने काहीही बोलण्याचा, करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
रेड कॉर्नर नोटीस हा इंटरपोलच्या अखत्यारीतील मुद्दा आहे. त्यावर आमचा जोर नाही. क्वात्रोची यांच्यावरील अजामीनपात्र अटक वॉरन्टच्या आधारे त्यांच्यावर ही नोटीस जारी झाली होती. याबाबत क्वात्रोची यांनी इंटरपोलच्या आयोगाकडे याचिका दाखल केली. त्यांनी या याचिकेच्या आधारे सीबीआयला स्पष्टीकरण मागितले. रेड कॉर्नर नोटीस पाच वर्षांसाठी असतात. या नोटीसचा कालावधी संपत आला की, सीबीआय हे प्रकरण महान्यायवादींकडे सोपवितात. त्यानुसार त्यांच्याकडे हे प्रकरण देण्यात आले. त्यांनी क्वात्रोचींविरुद्ध कोणताही वॉरन्ट नसल्याचा निर्वाळा दिला. त्यातूनच त्यांचे नाव "वॉन्टेड' च्या यादीतून निघाले, असे स्पष्टीकरणही भारद्वाज यांनी दिले.
हे प्रकरण सध्या कनिष्ठ, उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयातही प्रलंबित आहे. कायद्यानुसार खटल्याची कार्यवाही यथावकाश होईलच, असेही ते म्हणाले.

क्वात्रोचींविरुद्ध पुरावे आहेत सीबीआयच्या माजी प्रमुखांचा दावा

नवी दिल्ली : एकीकडे देशातील सीबीआयने बोफोर्स घोटाळ्या प्रकरणी इटालियन उद्योगपती क्वात्रोची यांना "क्लीन चिट' दिली असतानाच सीबीआयचे माजी संचालक जोगिन्दर सिंग यांनी क्वात्रोचींनी या प्रकरणी लाच घेतल्याबद्दल भारताकडे सबळ पुरावे असल्याचा दावा केला आहे.
१९९७ मध्ये बोफोर्स तोफ व्यवहारातील लाच प्रकरण उघडकीस आले. तेव्हा स्वीत्झर्लंड येथे जाऊन स्वीस बॅंकेने जारी केलेल्या ५०० पानांचे दस्तावेज भारतात आणणाऱ्यांमध्ये सीबीआयचे तत्कालीन संचालक जोगिन्दर सिंग यांचाही समावेश होता. आज हे प्रकरण नव्याने उद्भवल्यानंतर सिंग म्हणाले की, जेव्हा मी सीबीआयचे काम हाती घेतले तेव्हा मला लक्षात आले की, एक संपूर्ण खोली बोफोर्स घोटाळा प्रकरणातील दस्तावेजांनी भरलेली होती आणि त्या कागदपत्रांना कोणी हातही लावलेला नव्हता. मी हे प्रकरण हाती घेतले आणि स्वीत्झर्लंड येथून दस्तावेज आणून सरकारला तीन महिन्यांच्या आत अहवाल पाठवला होता. तो अहवाल स्वीकारायचा की नाही, हा सरकारचा प्रश्न आहे. आम्ही क्वात्रोचीविरुद्धचे पुरावे सोपवले होते. त्यांचे पुढे काही झाले नाही, याचा मला खेद वाटत नाही. कारण मी माझे काम पूर्ण केले होते, असेही ते म्हणाले.
इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसमधून क्वात्रोचीचे नाव हटवले जाणे अयोग्य आहे का, असे विचारले असता जोगिन्दर सिंग म्हणाले की, सीबीआय ही स्वतंत्र एजन्सी नाही. याचे सर्वाधिकार सरकारकडे आहेत. कदाचित आपण या मताशी सहमत नसाल. पण, ही वास्तविकता आहे.

कॉंग्रेसला पापांचे प्रायश्चित्त मिळेलच : अडवाणी

बोफोर्स घोटाळा सर्वांत स्फोटक
गांधीनगर, दि. २८ : पंतप्रधानांनी सोनिया गांधींच्या दबावापुढे झुकून बोफोर्स घोटाळ्याचे सत्य कायमचे गाढून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. कॉंग्रेसच्या या पापांचे प्रायश्चित्त त्यांना १९८९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसला मतदारांनी जसे नाकारले होते, त्याची पुनरावृत्ती यंदाच्या निवडणुकीत होणार असून पक्षाला आपल्या कर्माची फळे भोगावी लागणार आहे,असे प्रतिपादन भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी केले. गांधीनगर येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कॉंग्रेस सरकारचा कार्यकाळ संपत आलेला असताना बोफोर्स घोटाळ्यातील सूत्रधार ओट्टाव्हियो क्वात्रोचीचे नाव सीबीआयच्या "मोस्ट वॉन्टेड'च्या यादीतून गायब झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. सरकारी यंत्रणेला आपल्या इशाऱ्यावर नाचवणाऱ्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची ही सर्वांत ताजी लाजिरवाणी कृती आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वांत स्फोटक बोफोर्स घोटाळ्यामुळे १९८९ साली राजीव गांधी यांचे सरकार गडगडले होते. १९८४ साली भरघोस यश संपादन केलेल्या या सरकारच्या विरोधातील रोष त्यावेळी स्पष्ट झाला होता.
१९८७ साली हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर कॉंग्रेसने त्याचे सत्य दडपण्याचाच प्रयत्न केला आहे. १० जनपथच्या दबावाखाली तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहाराव यांनी ओट्टाव्हियो क्वात्रोची यांना देश सोडून जाण्यास परवानगी दिली होती, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
न्यायप्रणातीलील सर्वांत निर्लज्ज असे निकाल संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात देण्यात आल्याचे सांगून अडवाणी पुढे म्हणाले की, क्वात्रोची हा मूळ इटालियन नागरिक या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असतानाही त्याची बॅंक खाती मुक्त करण्यात आली. सोनिया गांधी यांच्याशी आणि पर्यायाने गांधी घराण्याशी क्वात्रोची याचे संबंध सर्वश्रुत आहेत. अर्जेंटिना येथे क्वात्रोची याला अटक करण्यात आलेली असतानाही कॉंग्रेसच्याच आदेशानुसार त्याला मुक्त करण्यात आले. क्वात्रोचीचे नाव सीबीआयच्या "मोस्ट वॉन्टेड' यादीतून काढून टाकताना न्यायप्रणालीच्या शवपेटीला शेवटचा खिळा ठोकण्याचा संयुक्त पुरोगामी आघाडीचा डाव आहे, असेही अडवाणी यांनी यावेळी सांगितले.
बोफोर्सचे सत्य गाडून टाकण्याच्या या प्रयत्नांचा तीव्र शब्दांत निषेध करत असल्याचे सांगून अडवाणी पुढे म्हणाले की, यासाठी पूर्णपणे डॉ. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी जबाबदार आहेत. १० जनपथच्या आदेशानुसारच ही कृती करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांत सीबीआयचा हेतुपुरस्सर गैरवापर आणि त्याबद्दल पंतप्रधानांनी पाळलेले मौन हेच सिद्ध करते की ते एक कमकुवत पंतप्रधान आहे, जे १० जनपथच्या आदेशानुसार निर्णय घेत आहेत. सरकारच्या या पापांची सजा मतदार देणार असून १९८९ च्या निकालांची पुनरावृत्ती होणार असा दावा अडवाणी यांनी यावेळी केला.
दरम्यान, स्वित्झर्लंडमध्ये गुप्तपणे साठवून ठेवलेला भारतीयांचा पैसा पुन्हा भारतात आणण्याची शपथ भाजपने घेतली आहे. बोफोर्ससाठी देण्यात आलेली लाच स्विस बॅंकेत जमा करण्यात आली असून भाजपनंतर आता कॉंग्रेसमधील काही नेते हलक्या आवाजात हा पैसा परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याची भाषा करू लागले आहेत. परंतु, बोफोर्सच्या विषयावर वेगवेगळ्या दिशेला तोंड करून असलेल्या भाजप व कॉंग्रेसमधील फरक स्पष्टपणे दिसत आहे. बोफोर्स प्रकरण दडपून टाकण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या कॉंग्रेसकडून हा पैसा परत आणण्याची अपेक्षा कशी काय केली जाऊ शकते, असा सवाल अडवाणी यांनी शेवटी उपस्थित केला.

आघाडी सरकारचे नेतृत्व करण्यात कामत अपयशी, डॉ. विलींचे टीकास्त्र

पणजी, दि.२८(प्रतिनिधी): मुख्यमंत्री दिगंबर कामत हे विद्यमान आघाडी सरकारचे नेते या नात्याने सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी ठेवला आहे. आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांना ताब्यात ठेवण्याचे कसब कामत यांच्याकडे नाही. विद्यमान मंत्रिमंडळातील एक नेता आपल्याच सहकाऱ्यांविरोधात अपात्रता याचिका दाखल करतो व मुख्यमंत्री मात्र त्रयस्थपणे हा प्रकार बघतात, ही नामुष्की आहे, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्यात राजकीय स्थित्यंतर घडेल, अशी भविष्यवाणीही डॉ. विली यांनी केली.
"प्रुडंट मीडिया'या स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. विली यांनी हे सडेतोड भाष्य केले.विद्यमान आघाडी सरकारात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा प्रमुख घटक आहे पण मुख्यमंत्री मात्र राष्ट्रवादीच्या तिन्ही आमदारांवर अविश्वास दाखवतात, असा टोलाही यावेळी डॉ. विली यांनी हाणला. आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती, त्या समितीची एकही बैठक झालेली नाही. मुख्यमंत्री कामत समन्वय समितीची बैठक बोलावण्यास पुढाकार घेत नाहीत, असा ठपकाही त्यांनी यावेळी ठेवला.
राष्ट्रवादीचे नेते तथा पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्याशी डॉ. विली यांचे असलेले वैरही या मुलाखतीच्या निमित्ताने प्रकट झाले. राष्ट्रवादीतर्फे आपण सुरुवातीस एकमेव आमदार सरकारात होतो. "अलोन' आमदार अशी आपली ओळख करून दिली जात होती, परंतु जेव्हा मिकीकडून भाजपचा राजीनामा देण्यात आला तेव्हा त्यांनी आपल्याशी संपर्क साधला व त्यांना आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश दिला. मिकी यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार अजिबात अनुकूल नव्हते. त्यांनी आपल्याकडे संपर्क साधून मिकी यांना पक्षप्रवेश देण्याच्या निर्णयाबाबत विचारपूसही केली परंतु आपण त्यांना याबाबत खात्री दिल्याचा गौप्यस्फोटही डॉ. विली यांनी यावेळी केला. मिकी यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात दिलेल्या प्रवेशाबाबत पश्चात्ताप होतो का, असे विचारण्यात आले असता राजकारणात पश्चात्ताप करायचा नसतो तर आपण केलेल्या चुका सुधारायच्या असतात, बोध घ्यायचा असतो, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. मिकी यांनी आपलेच सहकारी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव व सरकार पक्षातील आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्स यांच्याविरोधात दाखल केलेली अपात्रता याचिका ही मुख्यमंत्री कामत यांच्यासाठी नामुष्की असल्याची टीका डॉ. विली यांनी केली. याप्रकरणी आपण मुख्यमंत्री कामत यांना मिकी यांच्याविरोधात तात्काळ कारवाई करण्याचा सल्ला दिला होता परंतु हे धाडसी पाऊल उचलण्याची ताकद त्यांच्यात नाही, असेही यावेळी डॉ. विली म्हणाले.
राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र देशप्रभू यांच्या विजयाबाबत आशावाद व्यक्त करणारे डॉ. विली याबाबत ठामपणे मात्र काहीही सांगू शकले नाही. ही टक्कर अटीतटीची होणार व विजेत्या उमेदवाराचे मताधिक्य नाममात्र असेल, असे ते म्हणाले. निवडणूक झाली असली तरी उत्तर गोव्यात झालेल्या मतदानाबाबत उमेदवाराकडून आपल्याला कोणताही अहवाल पुरवण्यात आला नसल्याचे ते म्हणाले. देशप्रभू यांनी आपल्याला विश्वासात घेऊन अधिक नियोजनबद्ध प्रचार केला असता तर त्याचा अधिक लाभ झाला असता असेही खोचक विधान त्यांनी यावेळी केले. राष्ट्रवादीकडे लोकसभेसाठी एकही उमेदवार नव्हता काय, असे विचारले असता त्यांनी याचा ठपका पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांवर ठेवला. पक्षातर्फे उमेदवारीसाठी नावांची यादी तयार झाली असतानाही मिकी व नीळकंठ हळर्णकर यांनी माजीमंत्री निर्मला सावंत यांचे नाव पुढे केले. श्रीमती सावंत यांच्यासाठी ते इतकेच आग्रही होते तर त्यांना उमेदवारी का दिली नाही, असा प्रतिसवाल त्यांनी केला. दिल्लीत शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी ही उमेदवारी देशप्रभू यांना निश्चित झाली व त्यामागचे गूढ आपल्याला ठाऊक नाही, असेही ते म्हणाले.
येत्या लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता यावेळी डॉ. विली यांनी व्यक्त केली. हा काय बदल असेल याबाबत मात्र त्यांनी भाष्य करण्यास टाळले. हा बदल एक तर गोव्याच्या हिताचा ठरेल, अन्यथा गोव्याला बाधक ठरेल, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला.

वास्कोतील 'त्या' जन्मदात्याला जन्मठेप

मडगाव, दि. २८ (प्रतिनिधी) : कर्त्यासवरत्या पण नशाबाज मुलाकडून सून व नातू यांचा होणारा छळ सहन न झाल्याने त्या जाचांतून त्यांची कायमची सुटका करण्याच्या हेतूने मुलाच्या डोक्यात पिकास हाणून खून केल्याच्या आरोपावरून काल दोषी ठरवलेल्या नवे वाडे वास्को येथील मारियान जुवांव या ६० वर्षीय आरोपीला आज येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रदीप व्ही. सावईकर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
७ जून २००६ रोजी नवे वाडे येथे ही घटना घडली होती, प्रकरणाची वाच्यता न करण्याची धमकी आरोपीने आपली सून तथा मयताची पत्नी मारिया हिला दिली होती. सुमारे वर्षभरानंतर तिने पोलिसांत तक्रार केल्यावर आरोपीला त्याच दिवशी अटक करण्यात आली होती.
निकालपत्रानुसार मारियान जुवांव याला आपल्या मुलाचा खून केल्याच्या आरोपाबद्दल जन्मठेप व ५००० रु. दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्त मजुरी तर पुरावा नष्ट केल्याच्या आरोपाबद्दल एक वर्ष सक्त मजुरी व एक हजार रु. दंड, दंड न भरल्यास आणखी एक वर्ष सक्त मजुरी अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. परंतु, मयताच्या पत्नीला धमकी दिल्याच्या आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सर्व शिक्षा त्याला एकाच वेळी भोगावयाच्या आहेत. आरोपीने दंड भरला तर ती रक्कम मयताच्या विधवेला द्यावी असेही निकालपत्रात नमूद करण्यात आले आहे.
आरोपी हा वयस्कर आहे. आपल्या नशाबाज मुलाकडून होणाऱ्या अत्याचारांतून सुनेला व नातवाला वाचवण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना सुखाने जगता यावे याच हेतूने आरोपीकडून हे कृत्य घडले, त्यात दुसरा कोणताच हेतू नव्हता, आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही की त्याचे वर्तन फाशीच्या शिक्षेसाठी योग्य नव्हते असा निष्कर्ष काढून यापुढे त्याचे आचरण सुधारेल अशी आशा न्यायाधीशांनी व्यक्त केली आहे.

कसाब 'बच्चा' नाही, वैद्यकीय अहवालात निर्वाळा

मुंबई, दि. २८ : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पकडण्यात आलेला आरोपी मोहम्मद अजमल कसाब हा अल्पवयीन नाही. त्याचे वय २० वर्षांपेक्षा जास्त आहे, असा स्पष्ट निर्वाळा येथील जे. जे. हॉस्पिटलच्या चार डॉक्टरांच्या चमूने आज विशेष न्यायालयासमोर दिला. दरम्यान, या संदर्भात कसाबचे वकील अब्बास काझमी उद्या साक्षीदारांची उलटतपासणी घेणार असून, त्यानंतरच कसाब अल्पवयीन आहे की नाही, याचा अंतिम निर्णय न्यायालय करणार आहे.
अतिरेकी कसाबचे वकीलपत्र घेतल्यानंतर ऍड. अब्बास काझमी यांनी तो साडेसतरा वर्षांचा असल्याचा दावा केला होता, हे येथे उल्लेखनीय. कसाब लहान असल्याने त्याचा खटला अल्पवयीन मुलांचे खटले ज्या न्यायालयापुढे चालतात तेथे चालवण्यात यावा, अशी मागणी कसाबचे वकील आझमी यांनी केली होती. त्यानुसार कसाबच्या वयाची खात्री करून घेण्यासाठी जे. जे. हॉस्पिटलच्या फोरेन्सिक सायन्स विभागाच्या चार डॉक्टरांची एक चमू नेमण्यात आली होती. या चमूने कसाबच्या वैद्यकीय व शारीरिक चाचण्या घेतल्या. या चमूचा वैद्यकीय अहवाल आज विशेष न्यायालयासमोर ठेवण्यात आला. कसाबचे वय २० वर्षांपेक्षा जास्त आहे, असे या अहवालात या चारही डॉक्टरांनी स्पष्ट नमूद केले आहे.
कसाबला २६ नोव्हेंबरच्या रात्री अटक केल्यानंतर त्याला तपासणीसाठी नायर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. त्यामुळे नायरच्या ट्रॉमा वॉर्डचे डॉ. व्यंकटरमण मूर्ती व ऑर्थर रोड कारागृहाच्या अधीक्षक स्वाती साठे यांच्याही साक्षी नोंदवण्यात आल्या. कसाबला नायर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले त्यावेळी त्याने आपले वय २१ असल्याचे सांगितले होते, असे डॉ. मूर्ती यांनी सांगितले तर २६ डिसेंबर २००८ ला जेव्हा कसाबला ऑर्थररोड येथे आणण्यात आले त्यावेळी तेथेही त्याने आपले वय २१ असल्याचे, तसेच आपली जन्मतारीख १३ सप्टेंबर १९८७ असल्याचे सांगितले होते, अशी माहिती स्वाती साठे यांनी दिली.
दरम्यान, कसाबचे वकील काझमी उद्या साक्षीदारांची उलटतपासणी घेणार आहेत. नायर हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी व मेडिकल रेकॉर्डस असिस्टंट यांनाही साक्षीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यानंतरच कसाब अल्पवयीन आहे की नाही याचा निर्णय न्यायालय देणार आहे.

Tuesday, 28 April 2009

भाजप यंदा १८० ते २०० जागा जिंकेल - व्यंकय्या



मुंबई, दि. २७ - पंधराव्या लोकसभा निवडणुकीचा ज्वर देशभर जाणवू लागलेला असून सुर्यनारायणासोबतच नेतेमंडळीदेखील वातावरण तापवायचे काम करत आहेत. तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येत असतानाच देशाच्या आर्थिक राजधानीत राष्ट्रीय नेत्यांनी जोरदार प्रचार आरंभला शिवसेना भाजप तर यंदा चांगलेच जोशात असल्याचे जाणवते. या पार्श्वभूमीवर, भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी तर यंदा भारतीय जनता पक्षाला १८० ते २०० जागा मिळणे कठीण नसल्याचे प्रतिपादन केले आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अन्य घटक पक्षांच्या साथीने यंदा आम्हीच सरकार स्थापन करू, असा विश्वास त्यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
कॉंग्रेसला लक्ष्य करताना त्यांनी आज चौफेर फटकेबाजी केली. प्रादेशिक पक्ष हे देशविरोधी असल्याच्या कॉंग्रेसच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांनी प्रादेशिक पक्ष ही देशाची गरज असल्याचे नमूद करत कॉंग्रेसच्या सोबत असलेले संपुआतील घटक पक्ष कॉंग्रेसच्या धोरणांना कंटाळून आज त्यांना सोडून जात आहेत याकडे लक्ष वेधले. शिवसेना, अकाली दल सारख्या पक्षांनी विशिष्ट तत्वे जपून प्रादेशिक स्तरावर पक्षांची बांधणी केली व त्या तत्वांशी कॉँग्रेसप्रमाणे प्रतारणा केली नाही अशी पुस्ती देखील नायडू यांनी जोडली.
कॉंग्रेसचे नेते आज भाजपप्रणित रालोआवर भर सभांत टीका करत फिरत आहेत; मात्र ते धादांत असत्य बोलत असून महागाई, बेरोजगारी, चलनवाढ सारख्या समस्या "संपुआ'च्या कारकिर्दीतच वाढल्या असल्याचे सांगत यंदा जनताच कॉंग्रेसला आपली जागा दाखवेल असे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रातून यंदा सर्वाधिक जागा शिवसेना भाजप युतीला मिळतील व यंदा राज्यातही जनता युतीकडेच सत्ता सोपवेल असे त्यांनी सांगितले. भाजप राम मंदिर बांधण्यास कटिबद्ध आहेच; परंतु राम मंदिर हा राष्ट्रीय प्रश्न नसून जनतेच्या भावनांशी निगडित असा मुद्दा आहे. महागाई, बेरोजगारी सारखे प्रश्न हे सध्या भाजपच्या मुख्य अजेंड्यावर असल्याचे त्यांनी सांगितले. "लिट्टे'सारख्या संघटनांवर कारवाई करताना श्रीलंकेच्या सरकारने सामान्य तमिळ लोकांवर अत्याचार केले, मात्र भारत सरकार राजकीय मुत्सद्देगिरीत कमी पडले. सामान्य श्रीलंकन तामिळी लोकांवरचे अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारने कटीबद्धता दाखवलीच पाहीजे असे सांगताना तामिळनाडू राज्यात करूणानिधींचे सरकार असताना ते या प्रकरणी कोणाविरूद्ध आंदोलने करतात असा सवाल तेथील जनता विचारत आहे, असे त्यांनी सांगितले.
मतदान हा फक्त आपला हक्क नसून ते एक राष्ट्रीय कर्तव्य आहे, यंदा प्रत्येकाने ते बजावावे, असे आवाहन करतानाच, शिवसेना - भाजप युतीलाच कौल द्या अशी पुरवणी जोडत त्यांनी उपस्थितांत हशा पिकवला.

१.६० लाखांची सुरावलीत चोरी

मडगाव, दि. २७ (प्रतिनिधी) : शनिवारी वास्को, काल रविवारी खारेबांध असे सलग पडलेले दरोडे व त्यातून दरोडेखोरांनी पळवलेला लाखोंचा ऐवज या घटना ताज्या असतानाच काल रात्री चोरट्यांनी सुरावली येथील एका घरातून १.६० लाखांचा ऐवज लांबवला. त्यामुळे पोलिस चक्रावले आहेत.
विशेष दखल घेण्याजोगी बाब म्हणजे कालच्या खारेबांध दरोड्याप्रमाणे आजची ही चोरीही कोलवा पेालिस स्थानकाच्या कार्यकक्षेतच घडली आहे. या प्रकरणी सुरावली येथील सींथिया डिसोझा यांनी पोलिसांत नोंदविली आहे. त्या तक्रारीनुसार घरातील मंडळी झोपलेली असताना हा प्रकार घडला. चोरटे कौले काढून घरात शिरले व कपाटाच्या किल्ल्या शोधून काढून त्यांनी कपाट उघडले. रोख २० हजार, १ हार, ५ बांगड्या, कर्णफुलांचे तीन जोड व दोन अंगठ्या मिळून १. ६० लाखांचा ऐवजावर डल्ला मारून चोरटे मागील दारातून पसार झाले.
पोलिसांनी पंचनामा केला व तपासकाम सुरू केले असले तरी आरोपींचा कोणताही मागमूस लागलेला नाही. दरम्यान काल खारेबांध येथील बंगल्यावर पडलेल्या दरोडा प्रकरणी कोणताच धागादोरा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तथापि, पोलिस सर्व शक्यता आजमावून पाहात आहेत, असे सांगण्यात आले.

मंत्रिमंडळ व्यतिरिक्त कॅबिनेट दर्जाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान

विशेष अनुमती याचिका दाखल

पणजी, दि.२७ (प्रतिनिधी)- मंत्रिमंडळात समावेश न झालेल्या आमदारांना केवळ राजकीय सोयीसाठी सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार घालून संसदीय सचिवपदांची वाटलेली खैरात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्दबातल ठरवल्यानंतर आता इतर पदांना दिलेल्या कॅबिनेट दर्जालाही ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ही याचिका पुढील आठवड्यात सुनावणीस येणार आहे.
ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका (स्पेशल लीव्ह पिटीशन) दाखल केली असून त्यात आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आग्नेल फर्नांडिस, राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा व अनिवासी भारतीय आयुक्त एदूआर्द फालेरो यांच्या कॅबिनेट दर्जाला आव्हान देण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या २२ जानेवारी रोजी दिलेल्या ऐतिहासिक निकालात संसदीय सचिवपदांची नेमणूक घटनाबाह्य असल्याचे नमूद करताना रद्दबातल ठरवली होती. सदर याचिकेत या तीन पदांचाही समावेश होता. परंतु, त्यांना बहाल केलेला कॅबिनेट दर्जा "जैसे थे' ठेवण्यात आला होता. ऍड. रॉड्रिगीस यांनी आपल्या अनुमती याचिकेत या पदांना दिलेल्या कॅबिनेट दर्जाला हरकत घेतली आहे. जंबो मंत्रिमंडळावर निर्बंध लादण्यासाठी तसेच सरकारी तिजोरीचा अपव्यय टाळण्यासाठी घटनेच्या १६४ (१अ) कलमानुसार मंत्रिमंडळ संख्या निश्चित करण्यात आली आहे. परंतु, केवळ आपली राजकीय सोय व सत्ता टिकवण्यासाठी मंत्रिमंडळ व्यतिरिक्त इतर पदांनाही कॅबिनेट दर्जा बहाल करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी वरील तीनही पदांना दिलेला कॅबिनेट दर्जा हा घटनेतील या कलमाच्या नेमका विरोधात आहे व हा उघडपणे सरकारी तिजोरीचा अपव्यय असल्याचा ठपकाही ऍड. रॉड्रिगीस यांनी ठेवला आहे. या अवैध पद्धतीला कायद्याचे पाठबळ मिळाल्यास भविष्यात अशा पदांना कॅबिनेट दर्जा देण्याचा सपाटाच सुरू होईल, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.

सोनसोडो कचरा प्रकरणी दिलेले ४ कोटी गेले कुठे?

पाच मेपर्यंत अहवाल सादर करण्याचा कोर्टाचा आदेश

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) - सोनसोडो येथील कचऱ्याचा विल्हेवाट लावण्यासाठी व तेथे योग्य उपाययोजना आखण्याकरता सरकारने मडगाव पालिकेला दिलेल्या ४ कोटी रुपयांचे काय झाले, याचा संपूर्ण अहवाल येत्या ५ मे पर्यंत न्यायालयात सादर करण्याचा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे. त्याचप्रमाणे पावसाळा सुरू होण्यापूर्वी तेथील कचऱ्याचा ढीग "ताडपत्री'ने झाकण्याचा आदेशही देण्यात आला.
सरकारने दिलेल्या चार कोटी रुपयांचा विनियोग कसा केला गेला याचा आढावा घेण्यासाठी खास समिती स्थापण्यात आली होती; परंतु, अद्याप या समितीने काहीच केले नसल्याचे आज न्यायालयात उघड झाले. त्यामुळे न्यायालयाने त्वरित या समितीची बैठक घेऊन त्या पैशांचे काय झाले आहे, याचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. त्याचप्रमाणे गेल्या महिन्यात या कचऱ्याला लागलेली आग अद्याप पूर्ण विझली नसल्याचे ऍड. नॉर्मा आल्वारीस यांनी न्यायालयात सांगितले. पावसाळा जवळ आल्याने सोनसोडो येथील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे अत्यंत महत्त्वाचे बनल्याचे ऍड. आल्वारीस यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
या कचऱ्यावर पावसाळ्यापूर्वी प्रक्रिया न केल्यास सोनसोडो परिसरातील पाणी दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या कचऱ्यावर ताडपत्रीचे आच्छादन घालण्याची सूचना ऍड. अल्वारीस यांनी केली. न्यायालयाने याची दखल घेत पावसाळ्यापूर्वी या कचऱ्यावर ताडपत्रीचे आच्छादन घालण्याचे आदेश मडगाव पालिकेला दिला.

वन खात्याची जमीन हडपण्याचा डाव उघड

पणजी, दि.२७ (प्रतिनिधी)- सांगे नेत्रावळी येथील सर्व्हे क्रमांक ३०/१ अंतर्गत येणाऱ्या सुमारे ६० लाख चौरसमीटर जागेवर लक्ष्मण पुर्सो गावकर व इतरांनी केलेला दावा भू महसूल कायद्याअंतर्गत प्रशासकीय लवादाने ग्राह्य धरला आहे. लवादाने दिलेल्या आदेशाची कार्यवाही करण्याची प्रक्रिया सांगे मामलेदारांकडून सुरू असून हा प्रकार वनखात्याच्या लक्षात आल्याने त्यांनी लगेच राज्य सरकारला पत्र पाठवून वेळीच हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी प्राप्त झालेल्या माहितीनुसार सांगे नेत्रावळी येथे वनखात्याच्या मालकीची सर्व्हे क्रमांक ३०/१ अंतर्गत सुमारे ६०० एकर जमीन आहे. ही जागा घनदाट जंगलाने व्यापली आहे. या जागेवर आके मडगाव येथील लक्ष्मण पुर्सो गावकर व इतरांनी आपला दावा केला असून त्यांनी भू महसूल कायद्याअंतर्गत प्रशासकीय लवादाकडे याबाबत दाद मागितली होती. मुळात ही जागा वनखात्याच्या मालकीची असतानाही खात्याला विश्वासात न घेता लवादाने आपला निकाल याचिकादाराच्या बाजूने दिल्याची माहिती खात्यातील सूत्रांनी दिली. २००० सालापासून हे प्रकरण सुरू असताना अचानक हा प्रकार गेल्या २००७ साली वनखात्याच्या लक्षात आला. त्यांनी लगेच यासंबंधी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, मडगाव येथे नागरी खटला दाखल करून या निकालाला हरकत घेतली. मध्यंतरी लक्ष्मण गावकर यांनी सांगे मामलेदारांना पत्र पाठवून प्रशासकीय लवादाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करण्याचे पत्र पाठवले व ही जागा याचिका दाखल केलेल्यांच्या नावे करण्याची विनंती केली होती. प्राप्त माहितीनुसार सांगे मामलेदारांकडून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ती अंतिम टप्प्यात असल्याची माहिती वनखात्यातील सूत्रांनी दिली. वनखात्याने वेळोवेळी याबाबत हस्तक्षेप करूनही सांगे मामलेदारांकडून ही जागा सदर याचिकादारांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू केल्याने आता वनखात्याने थेट राज्य सरकारलाच हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. याबाबत १ एप्रिल २००९ रोजी पाठवलेल्या या पत्रात सांगे मामलेदारांना समज देण्याची विनंती केली आहे. मुळात हे प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित असताना सांगे मामलेदारांनी या जागेची मालकी संबंधितांच्या नावे करण्याची घाई का केली, असा सवाल करून त्यांच्या भूमिकेबाबतही संशय व्यक्त केला आहे.
भटपाळ येथेही वनखात्याच्या भूखंडावर अतिक्रमण
भटपाळ काणकोण येथील जागेवर स्थानिक कोमुनिदाद संस्थेने अतिक्रमण केल्याची तक्रार वनखात्याने जानेवारी २००९ रोजी केली आहे तर नाकेरी येथील वनखात्याच्या अखत्यारीत असलेली जागाही हातातून जाण्याचा धोका असल्याचे पत्र २६ फेब्रुवारी २००९ रोजी सरकारला पाठवले आहे.

सीआयडीची पसंती कॉंग्रेसला तर "आयबी'ची भाजपला

गोव्यातील लोकसभा निवडणूक

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) - गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत कुणाचा विजय होईल,याबाबत भाजप,कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे दिसून आले आहे. या दोन्ही पक्षांनी विजयाचा भक्कम दावा केला असला तरी यावेळच्या मतदान पद्धतीने काही नेत्यांच्या मनात जयपराजयाबद्दल चांगलीच संभ्रमावस्था निर्माण केली आहे. एकीकडे राजकीय पक्षांचे अंदाज सुरू असताना सरकारच्या गुप्तचर यंत्रणांच्या अंदाजातही चांगलीच तफावत असल्याचे दिसून आले आहे. प्रामुख्याने स्थानिक पोलिसांच्या गुप्तचर विभागाने (सीआयडी) राज्यातील दोन्ही जागा कॉंग्रेस व राष्ट्रवादीला मिळतील असा अंदाज वर्तवला आहे; तर केंद्र सरकारची विश्वासार्ह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयबी (इंटेलिजन्स ब्युरो) ने गोव्यातील दोन्ही जागा भाजपलाच मिळतील असा अहवाल केंद्र सरकारला पाठवला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
उत्तर गोवा मतदारसंघात एकूण ७ उमेदवार रिंगणात हो. तथापि, खरी लढत भाजपचे विद्यमान खासदार श्रीपाद नाईक व राष्ट्रवादीतर्फे उतरलेले जितेंद्र देशप्रभू यांच्यातच आहे. सतत दोनदा उत्तरेतून निवडून येण्याची किमया साधलेल्या श्रीपाद नाईक यांनी आपण "हॅटट्रिक' अवश्य करणार असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र देशप्रभू हे मात्र आपल्या विजयाबाबत कमालीचे आश्वासक दिसतात. श्रीपाद नाईक यांच्यामागे ठामपणे उभा राहणारा बहुजन समाज दुभंगल्याचे कारण त्यांच्या समर्थकांकडून पुढे केले जात आहे व नेमका त्याचा फायदा पेडण्याचे जमिनदार असलेल्या देशप्रभू यांना होणार आहे,असाही त्यांचा दावा आहे. आतापर्यंत आपली "वोटबॅंक' समजून केवळ मतांसाठी आपला वापर करून घेतला जातो,अशी भावना बनलेल्या अल्पसंख्याक मतदारांनी यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान केल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
प्रामुख्याने सुशिक्षित अल्पसंख्याक विद्यमान सरकारच्या राजवटीस उबगला आहे व त्यामुळे त्यांनी यावेळी सरकारच्या विरोधात मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे.
उत्तरेत २००४ च्या निवडणुकीत श्रीपाद नाईक यांनी आपले प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.विल्फ्रेड डिसोझा यांचा ५६,२१३ मतांनी पराभव केला होता.डॉ.विली यांना ८८,६२९ व श्रीपाद यांना १,४४,८४२ मते मिळाली होती. मुळात श्रीपाद यांची ५६,२१३ मतांची आघाडी मागे टाकणे सहज शक्य आहे का,असा सवाल उपस्थित होतो. देशप्रभू हे मात्र याबाबत ठामपणे बोलताना दिसतात. गेल्यावेळी डॉ.विली हे कमकुवत उमेदवार होते व त्यांच्यासाठी कुणी प्रामाणिकपणे कामही केले नव्हते. यावेळी मात्र श्रीपाद यांच्यासमोर तोलामोलाचा उमेदवार म्हणून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रेष्ठींनी आपली निवड केली व त्याचबरोबर आघाडी सरकारच्या सर्व घटकांनी प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम केल्याने ही आघाडी पिछाडीवर पडण्यास अजिबात वेळ लागणार नाही,असा दावा त्यांनी काही पत्रकारांसमोर केला आहे.
दरम्यान,यावेळी दोन्ही नेते आपल्या विजयाचा दावा करीत असले तरी त्यात एक विशेष फरक स्पष्टपणे दिसून येतो. श्रीपाद नाईक हे केवळ निवडणुकीपुरते लोकांच्या संपर्कात नसून खासदार या नात्याने त्यांचा संपर्क सातत्याने सुरू आहे. एवढेच नव्हे तर त्यांची उमेदवारी सर्वांत प्रथम जाहीर झाल्याने त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पादाक्रांत केला आहे. विविध ठिकाणी मतदारांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद व मतदारांनी आपल्या विजयाची खात्री दिल्याचा दावा ते करतात. दुसरीकडे देशप्रभू यांची उमेदवारी अखेरच्या क्षणी जाहीर झाली त्यामुळे प्रत्यक्ष मतदारांची भेट घेणे त्यांना शक्य झाले नाही. त्यांनी अधिकतर प्रमुख कार्यकर्ते व नेत्यांवर आपली मदार ठेवली आहे. विद्यमान आघाडी सरकारातील नेत्यांनी आपल्याला आघाडी मिळवून देण्याची हमी दिल्याने ते आपल्या विजयाची खात्री बाळगून आहेत. बाकी आघाडी सरकारकडून भाजपची मते कमी करण्यासाठी उतरवण्यात आलेले मगोपचे उमेदवार पांडुरंग राऊत यांना उतरवण्याची शक्कल कितपत यशस्वी ठरते हा देखील चर्चेचा विषय आहे.
खासदार श्रीपाद नाईक हे बहुजन समाजाचे नेते आहेत व तीच त्यांची खरी ताकद आहे. यावेळी श्रीपाद नाईक यांच्याबाबतीत अपप्रचार करून त्यांच्या मागे ठामपणे उभ्या राहणाऱ्या बहुजन समाजात फूट पाडण्याचेही प्रयत्न झाले. राष्ट्रवादीचे उमेदवार देशप्रभू यांच्या विजयाबाबत खात्री बाळगणाऱ्या नेत्यांकडून याच अपप्रचाराचा लाभ त्यांना मिळणार आहे,असे बोलले जाते. उत्तर गोवा हा बहुजन समाजाचा बालेकिल्ला आहे,असे असताना बहुजन समाजाच्या उमेदवारांना डावलून मतदार उच्चवर्णीय उमेदवाराला पसंती देतात काय, हेदेखील या निकालावरून स्पष्ट होईल. आतापर्यंत वेळोवळी आपल्या एकतेचे दर्शन घडवून आपल्या नेत्यांच्या मागे ठामपणे उभा राहणारा बहुजन समाज यावेळी खरोखरच अशा अपप्रचाराला बळी पडला आहे का, की "ऐकावे जनाचे करावे मनाचे' या उक्तीप्रमाणे हे सारे दावे फोल ठरवून हा समाज आपल्या एकजुटीचे दर्शन पुन्हा घडवेल, हेच या निकालावरून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे साहजिकच निकालाबाबत लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

फोंड्यात वाढतायत अत्याचाराच्या घटना

युवतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

फोंडा, दि.२७ (प्रतिनिधी) - फोंडा तालुक्यात युवतींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना गेल्या काही महिन्यांपासून उजेडात येत असून त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. एका बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपीने दोन मुलींचा खून केल्याची माहिती उघड केल्याने लोकांत खळबळ माजली आहे. अत्याचाराच्या वाढत्या प्रकरणांमुळे फोंडा भागसुद्धा युवतींसाठी आता सुरक्षित राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
फोंडा भागात युवतींवरील अत्याचाराच्या प्रमाणात होणारी वाढ हा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या काही महिन्यांत अल्पवयीन युवतींवरील सामूहिक बलात्काराची दोन प्रकरणे या भागात उघडकीस आली आहेत. त्यात आता दोन युवतींच्या खुनाची भर पडली आहे. फोंड्याजवळील मोले येथेही सामूहिक बलात्काराचे एक प्रकरणी उघडकीस आले आहे. या प्रकरणात मोले पंचायतीच्या एका पंच सदस्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. या विविध प्रकरणांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
फोंडा भागात गाजलेल्या निरुक्ता शिवडेकर आत्महत्या प्रकरणाची गुन्हा अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरू आहे. या युवतीने आत्महत्या का केली, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. या युवतीची आक्षेपार्ह छायाचित्रे आढळून आली असून त्या छायाचित्रांबाबत पोलिस तपास सुरू आहे. हे प्रकरण गाजल्यानंतर त्याचे तपासकाम फोंडा पोलिसांकडून गुन्हा अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
दरम्यान, मडकई येथील एका चौदा वर्षाच्या शालेय मुलीवर सामूहिक बलात्काराचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी फोंडा पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. या प्रकरणात काही प्रतिष्ठित घराण्यातील युवक सहभागी असून बाल न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे.
लोकांत या बलात्कार प्रकरणाची चर्चा सुरू असताना माशेल येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. त्यात गोवा पोलिस दलातील एका पोलिस शिपायाचा सुद्धा समावेश असून त्याला निलंबित करण्यात आले आहे. तिस्क उसगाव येथे मुलींवरील बलात्काराचे एक प्रकरण उघडकीस आले असून संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. अशा या बलात्कार प्रकरणांमुळे फोंडा तालुक्याचे नाव बदनाम होत आहे.
या बलात्कार प्रकरणाची चर्चा सुरू असताना शिरोडा येथील एका युवतीवर बलात्काराचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले. गेली दोन वर्षे धमकी देऊन महानंद रामनाथ नाईक (तरवळे शिरोडा) हा युवक एका युवतीवर बलात्कार करीत असल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा तपास सुरू असताना महानंद नाईक याने दोघा युवतींचा खून केल्याचे उघड केल्याने खळबळ माजली आहे. साधा, भोळा वाटणाऱ्या महानंद नाईकने दोन युवतींचे खून केले, गेली दोन वर्षे एका मुलीवर सतत बलात्कार करत होता. असे असतानाही तो शांतपणे समाजात वावरत होता. १९९४ साली तरवळे येथील दर्शना नाईक हिला बांबोळी येथे नेऊन त्याठिकाणी तिचा खून करण्यात आला. जानेवारी ०९ मध्ये कुर्टी येथील योगिता नाईक हिला मोर्ले सत्तरी येथे नेऊन तिचा खून करून तिच्या अंगावरील दागिन्याची चोरी त्याने केली होती. या प्रकरणातील संशयित महानंद नाईक याची कसून चौकशी होण्याची गरज आहे. आणखी अनेक प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
फोंडा भाग हा शांत तसेच संस्कृतीप्रधान भाग म्हणून गोव्यात ओळखला जात होता. आजच्या काळात घडणाऱ्या विविध घटनांमुळे फोंडासुद्धा असुरक्षित बनत चालल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.

Monday, 27 April 2009

वास्कोच्याच धर्तीवर मडगावात दरोडा



खारेबांद येथील याच बंगल्यावरील दरोड्यात साडेआठ लाखांचा ऐवज पळविण्यात आला. (छाया - गोवा दूतसेवा)

सुरक्षा रक्षकाला बांधून बंगला फोडला
साठेआठ लाखांना लुबाडले

मडगाव, दि. २६ (प्रतिनिधी) : काल वास्को येथे झालेल्या दरोड्या पाठोपाठ तसाच धाडसी दरोडा काल उत्तररात्री येथील खारेबांध भागांत पडला व चोरट्यांनी तेथील सुरक्षारक्षकाला बांधून घालून साधारण साडेआठ लाखांचा ऐवज पळविला .पोलिसांना या दोन्ही दरोड्यात साम्य आढळलेले असून त्या दिशेने त्यांनी तपास सुरू केला आहे.
खारेबांध पुलाजवळच्या रिव्हर साळ रिअल इस्टेटमधील ज्युडी परेरा यांच्या बंगल्यावर हा दरोडा पडला. हा भाग कोलवा पोलिसांच्या हद्दीत येतो व तेथील पोलिस निरीक्षक फ्रांसिस कोर्त यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर बंगला एरवी बंदच होता पण परैरा यांचे नातलग असलेले माजी आमदार लिओ व्हेल्यो यांचे पुत्र व सून त्यांच्या निवासाचे नूतनीकरण चालू असल्याने महिनाभरापूर्वीच तेथे राहावयास आले होते. काल ही मंडळी लिओ व्हेल्यो यांच्या मूळ घरी काही तरी कार्यक्रम असल्यामुळे गेली होती. बंगल्यावर सुरक्षा रक्षक तेवढा होता.
रात्रौ साधारण एक ते दीडच्या सुमारास आठजण फाटकाच्या बाजूने आत घुसले व त्यांनी सुरक्षा रक्षकाचे हात व पाय बांधून घातले व त्याच्या तोंडांत बोळा कोंबला. नंतर बंगल्याचे दार फोडून ते आत घुसले व बंगल्याचा कोपरानकोपरा त्यांनी धुंडाळला पण कपाटाच्या किल्ल्या न सापडल्याने त्यांनी कपाटाची दारे फोडून ती उघडली व आतून १७ अंगठ्या, १४ कर्णफुलांचे जोड,साखळ्या मिळून साधारण ८.०५ लाखांचा ऐवज पळविला.
जाताना त्यांनी बंगल्यात सापडलेली विदेशी बनावटीची उंची व्हिस्की बाटली नेली व आतून पाण्याच्या बाटल्या नेऊन बाहेर आवारात बसून ते साधारण अर्धी बाटली व्हिस्की प्याले व नंतर तेथून जाताना बाटलीतील व्हिस्की त्यांनी सुरक्षारक्षकाच्या डोळ्यांत ओतली .
ते गेल्याची खात्री पटल्यावर तो सुरक्षा रक्षक तसाच बांधलेल्या व व्हिस्की डोळ्यात गेल्याने आग आग होणाऱ्या डोळ्याच्या अवस्थेत पडून राहिला व नंतर सरकत सरकत फाटकाबाहेर गेला व तसाच खारेबांध पुलाजवळ राहणाऱ्या नातेवाइकाकडे जाऊन मेाठ्याने हाका मारत त्यांना उठविले. त्यांनी येऊन त्याच्या हातापायांच्या दोऱ्या कापल्या व त्यांना सर्व माहिती दिली. नंतर घरमालकाला कळविण्यात आले व त्यांनी येऊन पोलिस तक्रार नोंदविली .
पोलिसांनी लगेच हालचाल केली व तपासासाठी श्र्वानपथकाचाही मदत घेतली पण कुत्रे बंगल्यामागील भागापर्यंत गेले व परत फिरले.त्यावरून त्यांनी तेथे आणून एखादे वाहन ठेवलेले असावे असा कयास आहे.पोलिसांना बंगल्यात काही ठसे मिळालेले असून ते तपासाची दिशा ठरविण्यात मदतरुप ठरतील असा कयास आहे.
काल वास्को येथे एका वृद्ध दांपत्याला बांधून घालून झालेला दरोडा व आजचा हा दरोडा यात विलक्षण साम्य असून दोन्ही प्रकरणात एकच टोळी असावी की काय याचा तपास पोलिस करीत आहेत.

देशी इतिहासावर भर हवा

एनसीईआरटी पुस्तकावरील चर्चासत्राचा सूर

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) - गोवा शालान्त मंडळाने सातवीच्या विद्यार्थ्यासाठी "एनसीईआरटी' अभ्यासक्रमाचे लागू केलेले इतिहासाचे पुस्तक रद्द करून त्यात तीस टक्के देशी इतिहासाचा समावेश करण्याची जोरदार मागणी आज हिंदू जनजागृती समितीने आयोजित केलेल्या चर्चासत्रात करण्यात आली. त्याचप्रमाणे हे पुस्तक रद्द करण्यासाठी वैचारिक पातळीवर लढा देण्याचाही निर्धार यावेळी करण्यात आला. त्याचप्रमाणे पहिले ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाचा पुनर्अभ्यास केला जावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या सातवीच्या पुस्तकात मोगलांची विस्तृत माहिती देण्यात आली असून त्या समकालीन भारतातील राजांची मात्र पुसटशीही माहिती देण्यात आलेली नाही. या पुस्तकात एका विशिष्ट धर्माचा उदो उदो करण्यात आला आहे. "मशीद'चे बांधकाम कसे असायचे याचीही माहिती या इतिहासाच्या पुस्तकात देण्यात आल्याचे यावेळी मडकई येथील आनंदीबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश नाईक यांनी दिली. भगतसिंग क्रांतिकारी नसून दहशतवादी होते, रामायण काल्पनिक असून श्रीहनुमानाचीही विटंबना या पुस्तकात करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. देशद्रोही शक्तीने "एनसीईआरटी'च्या माध्यमातून भारताचा उज्ज्वल भूतकाळ लपवून ठेवण्याचा कटकारस्थान रचले आहे, असे मत श्री. नाईक यांनी यावेळी व्यक्त केले. शिक्षणात अन्य विषयांप्रमाणेच इतिहास हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याने नवी पिढी घडते. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहास शिकवला जावा, असा राज्याचा नियम आहे. परंतु, त्याला फाटा देऊन केवळ मोगलांचा आणि ब्रिटिशांचा इतिहास शिकवला जात असल्याचे सांगून हे पुस्तक रद्द करून स्थानिक इतिहासाचा समावेश करूनच नव्याने पुस्तक प्रकाशित केले जावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
कागद कमी पडतो म्हणून "मनुस्मृती' ग्रंथ पुसून तो कागद लिहिण्यासाठी एका लेखकाने वापरला, असे उदाहरण या पुस्तकात देण्यात आल्याची माहिती यावेळी धर्म शक्ती सेनेचे प्रमुख सदाशिव धोंड यांनी दिली. हे आंदोलन गोवा तसेच महाराष्ट्र राज्यातही चालवले जात असल्याचे ते म्हणाले. शिक्षणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा भारत ताब्यात घेण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचे मत यावेळी जयेश थळी यांनी व्यक्त केले.
मोठ्या प्रमाणात सनातन संस्थेला विरोध केला जात आहे. काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते धमक्या देत आहेत. सनातन प्रभात या वर्तमान पत्राच्या संपादकांना दोन वेळा तुरुंगात डांबण्याचा प्रकार घडला. मुंबईत बॉंम्बस्फोट झाला त्यावेळी कोणतेही पुरावे नसताना "सनातन संस्थेवर बंदी घातली' अशा बातम्या प्रसिद्ध करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती यावेळी सौ. शोभा सावंत यांनी दिली. सनातन संस्थेने राष्ट्र पुरुषांचे छायाचित्र वापरून वह्या छापल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांची माहितीही पहिल्या व शेवटच्या पानांवर देण्यात आली आहे, अशी माहिती शुभांगी गावणेकर यांनी दिली. यावेळी मुख्याध्यापक अरुण नागवेकर, पालक प्रकाश मळीक, सुशांत दळवी, निवृत्त शिक्षिका कुमुद कामत यांनी आपले मत व्यक्त केले.

गस्तीवरील निरीक्षकावर पोलिसाकडूनच हल्ला

निलंबनाची खात्याची कारवाई

वास्को, दि. २६ (प्रतिनिधी)- रात्रीच्यावेळी गस्तीवर असलेल्या मुरगाव पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करून त्यांचा गणवेश फाडल्याने अनिल कवळेकर या पोलिस शिपायाला (सशस्त्र विभाग) अटक करण्यात आली. रायबंदर पोलिस स्थानकावर नियुक्त असलेल्या पोलिस शिपायाने दारूच्या नशेत पोलिस उपनिरीक्षक प्रशल देसाई यांच्यावर हल्ला केला असून त्याला अटक केल्यानंतर आज निलंबित करण्यात आले.
मुरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल (दि२६) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. मुरगाव पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रशल देसाई व इतर पोलिस कर्मचारी रात्रीच्या वेळी पी.सी.आर.गाडीमध्ये पोलिस गस्तीवर असताना सडा भागातील एका दारूच्या दुकानासमोर त्यांना पाच तरुण उभे असल्याचे दिसून आले. त्या तरुणांना तेथून निघून जाण्यास बजावले असता चार जण येथून निघून गेले, मात्र पाचवा (अनिल) तरुण येथून जाण्यास नकार देत असल्याने त्यांनी यावेळी त्याच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी अनिलने आपण पोलीस शिपाई असल्याचे गस्तीवर असलेल्या पोलिसांना सांगण्यास सुरुवात केली. या बाचाबाचीत अनिलने तेथे गस्ती घालत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना ढकलाढकली करण्यास सुरुवात केली, त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक देसाई यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. अनिलने त्यांच्यावर हल्ला करून त्याचा गणवेश फाडला व येथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तो दारूच्या नशेत असल्याने येथे असलेल्या गटारात पडल्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशल देसाई यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगून त्यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आल्याची माहिती यावेळी दिली.
मुरगाव पोलिसांनी रायबंदर येथील पोलिस स्थानकावर नियुक्त असलेल्या अनिल कवळेकर (वय २५, रा. सडा) या पोलीस शिपायाला भा.द.स ३३२ कलमाखाली अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राम आसरे यांनी दिली असून आज संध्याकाळी त्याची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, सदर प्रकरणावर कारवाई करत अनिल यास निलंबित करण्यात आले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले असून मुरगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक राम आसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

पाकमध्ये स्फोटात १३ विद्यार्थीनी ठार

इस्लामाबाद, दि.२६ - पाकमधील वायव्य सरहद्द प्रांतात मुलींच्या प्राथमिक शाळेबाहेर झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात १३ विद्यार्थीनी ठार तर ४० हून अधिक जखमी झाल्याची भीषण घटना घडली.
वायव्य पाकिस्तानातील दिर जिल्ह्यात ही घटना घडली. येथील मुलींच्या प्राथमिक शाळेबाहेर एका खेळण्यामध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. लहान मुलींनी हे खेळणे उत्सुकतेपोटी हातात घेतले आणि खेळायला लागल्या, तेवढ्यातच स्फोट झाला. या दुर्दैवी घटनेत १३ बालिका जागीच ठार झाल्या. अधिकृतरित्या मात्र सात विद्यार्थीनींचाच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
या स्फोटात ४० विद्यार्थी जखमी असून सर्वांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मरण पावलेल्या विद्यार्थीनींचे वय ४ ते १२ वर्षांदरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्राध्यक्ष आसीफ अली झरदारी आणि पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी या घटनेची कठोर शब्दात निंदा केली असून चौकशीचे आदेश जारी केले आहेत.

Sunday, 26 April 2009

योगिता नाईक व दर्शना नाईक खून प्रकरणांना वाचा फुटली

फोंडा, दि.२५ (प्रतिनिधी) : शिरोडा येथील एका युवतीवर बलात्कार प्रकरणी फोंडा पोलिसांनी अटक केलेल्या तरवळे शिरोडा येथील महानंद आर. नाईक याने फोंडा भागातील दोन युवतींचा खून केल्याची कबुली दिली आहे.
योगिता खुशाली नाईक ( नागझर कुर्टी) आणि कु. दर्शना तुकाराम नाईक (शिरोडा) अशी खून करण्यात आलेल्या युवतींची नावे आहेत. योगिता हिची मोर्ले सत्तरी येथे गळा आवळून आणि दर्शना नाईक हिचा बांबोळी येथे खून करण्यात आला आहे. चोरीच्या उद्देशाने हे दोन्ही खून करण्यात आल्याचे फोंड्याचे पोलिस उपअधीक्षक सेराफीन डायस यांनी सांगितले.
नागझर कुर्टी येथे कु. योगिता नाईक बेपत्ता प्रकरणी फोंडा पोलिस चौकशी करीत असताना शिरोडा येथील एका युवतीवरील बलात्कार प्रकरणाला वाचा फुटली. त्यानंतर आता योगिता नाईक आणि दर्शना नाईक यांच्या खून प्रकरणाला वाचा फुटली आहे. नागझर कुर्टी येथील प्रमोद खुशाली नाईक यांनी १२ जानेवारी ०९ रोजी त्याची बहीण कु. योगिता खुशाली नाईक (३० वर्षे) बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. बाजारमळ फोंडा येथे एका समारंभाला जाते असे सांगून कु. योगिता घरातून बाहेर पडली होती. यावेळी तिने अंगावर सोळा ग्रामाची सोनसाखळी, चार सोन्याच्या बांगड्या, कानात सोन्याची कर्णफुले, सोन्याची अंगठी आहे तक्रारीत म्हटले होते.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी कु. योगिता हिच्या मोबाईल क्रमांकाची सविस्तर माहिती संबंधित मोबाईल कंपनीकडून मिळविली. ह्या माहितीची तपासणी करताना एक मोबाईल क्रमांक योगिता हिच्याशी सतत संपर्कात होता. पोलिसांनी सदर मोबाईल क्रमांक धारकाचा पत्ता शोधून त्याला चौकशीसाठी पोलिस स्टेशनवर बोलावून घेतले. सदर व्यक्तीने आपला हा मोबाईल फोंडा ते सावर्डे मार्गावर प्रवास करताना जून - जुलै २००८ मध्ये हरवल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल कंपनीशी संपर्क साधून सदर क्रमांकाची अधिक चौकशी केली. सदर क्रमांकाचे सीम कार्ड चार मोबाईल हॅण्डसेट मध्ये घालून वापरण्यात आलेले आहे, अशी माहिती प्राप्त झाली. त्यानंतर ज्याच्या मोबाईल मध्ये सिमकार्ड घालण्यात आले त्या सर्वांना पोलिसांनी चौकशीसाठी पाचारण केले. त्यात एका मोबाईल दुरुस्ती करणाऱ्या मॅकेनिकचा समावेश होता. महानंद नाईक आणि एका युवतीला चौकशीसाठी बोलाविण्यात आले. सदर युवतीकडील सिमकार्ड महानंद वापरीत असल्याची माहिती त्या युवतीने पोलिसांना दिली. तरीही महानंद ह्या प्रकरणी आपला काहीच सहभाग नसल्याचे पोलिसांना सांगत होता. गेल्या चार वर्षापासून महानंद आपल्याला ब्लॅकमेल करीत असून धमकी देऊन आपल्यावर बलात्कार करीत आहे, अशी तक्रार त्या युवतीने केली. त्यानंतर पोलिसांनी महानंद याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महानंद फोंड्यात आला होता. त्यावेळी त्याने योगिता हिच्याशी ओळख केली आणि तिचा मोबाईल क्रमांक घेतला होता. महानंद हा त्याला सापडलेल्या मोबाईलवरून योगिता व इतरांशी संपर्क करीत होता. ६ ते १० जानेवारी ०९ पर्यंत महानंद याने योगिता हिच्याशी भरपूर वेळा संपर्क साधला. ज्या दिवसापासून योगिता बेपत्ता झाली त्या दिवसापासून दोन्ही मोबाईल क्रमांक बंद ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी महानंद याला उलटसुलट प्रश्न विचारून तपास केला. तरीही त्याने कबुली दिली नव्हती. आपण बोरी व फोंड्याच्या बाहेर गेलेलो नाही, असे महानंद याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी मोबाईल कंपनीशी संपर्क साधून चौकशी केली असता १० जानेवारी ०९ रोजी महानंद हा साखळी येथे असल्याची माहिती उजेडात आली. त्यानंतर पोलिसांनी आपला हिसका दाखविल्यानंतर महानंद याने खुनाची कबुली दिली. योगिता हिने अंगावर घातलेले दागिने चोरण्यासाठी संशयित महानंद याने तिला १० जानेवारी ०९ रोजी साखळी मार्गे मोर्ले सत्तरी येथील एका काजू बागायतीमध्ये नेऊन तेथे तिचा गळा आवळून खून केला. कु. योगिता हिची ओळख पटू नये म्हणून तिच्या अंगावर मोजकेच कपडे ठेवले. तिचे इतर कपडे व दागिने सोबत घेऊन पलायन केले. चोरण्यात आलेले दागिने डिचोली येथील एका सोनाराला विकण्यात आले, अशी कबुली संशयित महानंद नाईक याने दिली आहे. खून करण्यात आलेली जागा संशयित महानंद याने पोलिसांना दाखविली आहे. १५ जानेवारी ०९ रोजी एका युवतीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वाळपई पोलिसांना मोर्ले येथे काजू बागायतीमध्ये आढळून आलेला आहे. महानंद याच्या विरोधात भा.दं.सं.च्या ३९२, ३०२, २०१ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच पद्धतीने १९९४ साली शिरोडा येथील कु. दर्शना तुकाराम नाईक हिचा बांबोळी येथे खून केल्याची कबुली संशयित महानंद नाईक याने दिली आहे. यासंबंधी पोलिसांनी आगशी पोलिसांशी संपर्क साधून चौकशी केली असताना संशयास्पद स्थितीत एका युवतीचा मृतदेह आढळून आलेला आहे, असेही पोलिस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी सध्या तपास जोरात सुरू आहे. उत्तर गोव्याचे अधीक्षक टोनी फर्नांडिस, उपअधीक्षक सेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील, उपनिरीक्षक संजय दळवी या प्रकरणी तपास करीत आहेत.